सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.
तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..!
मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी. परंतु या पतंग उडवण्यावर मात्र एक झक्कास लावणी आपल्याकडे आशाताईंनी गाऊन ठेवली आहे.
प्पत्तंग उडवीत होते..!
(कृपया येथे ऐका)
च्यामारी, सुरवातच लै ठसकेबाज आहे. उच्चारी अगदी प ल प आणि त ल त जोडलेला आहे. लावणीच्या सुरवातीलाच 'पतंग' हा शब्द असा काही पडला आहे की क्या बात है..! मंडळी, अगदी गंमत म्हणून तुम्हीच गुणगुणून पाहा. आधी नुसतं 'पतंग उडवीत होते..' हे गुणगुणा. अगदी मिळमिळीत मुगडाळ खिचडीची चव लागेल. परंतु त्यानंतर लगेच 'प्पत्तंग उडवीत होते..' हे म्हणून पाहा.. झणझणीत, ठसकेबाज मिसळीची मजा येईल..!
पतंग शब्दाचा 'प्पत्तंग' हा उच्चार हे या लावणीचं मला भावलेलं मर्मस्थान..! गाणं ऐकावं हे अर्थातच महत्वाचं, परंतु ते कसं एकावं हे अधिक महत्वाचं..!
चढाओढीनं चढवीत होते,
गं बाई मी प्पत्तंग उडवीत होते..!
आहाहा काय साला सीन आहे..!
'चढाओढीनं चढवीत होते..!'
मंडळी, आणा पाहू डोळ्यासमोर, एक झक्कास मर्हाटमोळी ठसकेबाज बया, नऊवारीबिव्वारी नेसून मस्त मोकळ्या हवेत प्पत्तंग बदवते आहे, चढवते आहे. मोप वारं सुटल आहे तिच्यायला. बाईचा पदर मस्त वार्यावर फडफडतो आहे, कपाळावर जीवघेणी बट मस्त खेळते आहे अन् बाई प्पत्तंग उडवत आहे..!
किती कौतुक करावं गदिमांचं आणि आशाताईंचं..!
होता झक्कास सुटला वारा
वर प्पत्तंग अकरा बारा
एकमेकांना अडवीत होते..
डोळ्यासमोर अक्षरश: चित्र उभं करण्याचं कसब तो देशस्थ रांगडा गडी गदिमाच करू जाणे..!
काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळे घुसळीत अंग..!
आता प्पत्तंग उडीवतांना काटाकाटी ही चालायचीच की राव. नायतर काय मजा?
दैव हारजीत घडवीत होते.!
मंडळी, हे आमचे अण्णा माडगुळकर. 'दैवजात दु:खे भरता..' लिहिणारे हेच अण्णा मडगुळकर..!
दैव काय अन् नियती काय..! तिथे जीत कमी. त्या मानाने हारच जास्त..!
मंजूर हाय आमास्नी ही हारजीत...!
काटाकाटी होईल. त्यात कदाचित आपला पतंग गूल होईल, काटला जाऊन झोकांड्या खाईल..!
दैव हारजीत घडवीत होते
तरीही,
प्पत्तंग उडवीत राहिलं पाहिजे, हेच महत्वाचं..!
-- तात्या अभ्यंकर.
1 comment:
वा, तात्या साहेब
लई मजा आली गाण ऐकून. आणि हेही खरच,प्पत्तग
उडवतच राहिला हवा!
Post a Comment