पाखरा जा.. (येथे ऐका)
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे..
'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं. मुळातच या गाण्याचा असलेला नंदसारख्या अत्यंत प्रसन्न रागाचा मुखडाच मन प्रसन्न करून जातो. राग नंद, छान-सुंदर अध्धा ताल, पुलंचा लडिवाळ आवाज, आणि तेवढीच उच्च गायकी. फारा वर्षापासून लिहायचं होतं मला या गाण्यावर..!
हे गाणं ऐकताना खरंच खूप कौतुक वाटतं पुलंचं. कारण हे गाणं ऐकायला जितकं साधं-सोपं वाटतं तेवढंच ते गाण्याकरता तसं सोपं नाही. पुलंच्या अनोख्या आणि उच्च दर्जाच्या गायकीचं दर्शन होतं आपल्याला. उभ्या महाराष्ट्राचं आणि खास करून पुलंचं दैवत असलेल्या नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार आणि त्यांची गायकी आपल्याला पुलंच्या या गाण्यात पुरेपूर दिसते. सुरेलपणा, लडिवाळपणा ही बालगंधर्वांच्या गायकीची ठळक वैशिठ्ये आणि तीच आपल्याला पुलंच्या या गायकीत दिसतात. नारायणराव बालगंधर्वांचा प्रभाव कुमारजी, मन्सूरअण्णा, भीमण्णा यांच्यासारख्या भल्याभल्या गायकांवर झाला; पुलंही त्याला अपवाद नाहीत.
प्रेमळ, शीतल छाया हे शब्द अगदी खास करून कान देऊन ऐकण्यासारखे. कुठेही उगाच खटका नाही, आघात नाही. 'छाया' शब्दातलं 'छा' हे अक्षर आणि त्या उच्चार अगदी मुद्दाम आवर्जून ऐकण्यासारखा..! नारायणराव असते तर त्यांनी 'छाया' हा शब्द अगदी अस्साच म्हटला असता!
हरितात्या मला सांगत होते,
"अरे हा पुरुषोत्तम पक्का गवई बरं का! गिरगाव ब्राह्मण सभेतल्या हरी केशव गोखले हॉलमध्ये असे आम्ही गाणं ऐकायला बसलेले. आमच्या शेजारी कोण बसलं होतं सांग पाहू? साक्षात नारायणराव बालगंधर्व! आणि हा देशपांड्यांचा पुरुषोत्तम गात होता. नारायणराव थक्क होऊन त्याचं गाणं ऐकत होते आणि तुला सांगतो तात्या, 'प्रेमळ शीतल छाया..' हे शब्द घेऊन पुरुषोत्तम 'पाखरा जा..' च्या समेवर असा काही आला की नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं हो! ते म्हणाले, 'देवा, पुरुषोत्तमा, काय सुरेख समेवर आलास..!'
'खोटं नाही, अगदी पुराव्याने शाबीत करीन..!'
पसरले विश्व अपार..
भेदुनी गगनाला बघुनी ये देवलोक सारा
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!
पिउनी अमृत, घेउनी संचित
परतुनी ये घरा..!
सुंदर शब्द, सुरेख अर्थ..!
रे पाखरा, नंदच्या स्वरांवर स्वार हो झकासपैकी, आणि घे पाहू भरारी या अफाट पसरलेल्या विश्वात! नंदची लडिवाळता, प्रसन्नता तुला साथ करील. जा जरा देवलोकात आणि त्यांनाही ऐकव जरा नंद! त्या बदल्यात परत घेऊन ये देवलोकातलं ते अमृताचं संचित..!
व्वा भाईकाका, 'भेदुनी गगनाला..' हा अंतरा रंगवतानाची तुमची गायकी मस्तच, अगदी कसदार! खरं सांगतो भाईकाका, तुम्ही खरे तर एक उत्तम गवईच व्हायचात. अजून काही काळ हिंदुस्थानी गायकीत पर्फॉर्मर म्हणून का नाही रमलात? अगदी भीमण्णांसारखा बडा ख्यालिया राहू देत परंतु मध्यलयीतल्या काही प्रचलित, अप्रचलित रागरागिण्या का नाही रंगवल्यात? अजून काही काळ तालिम का हो घेतली नाहीत कागलकरबुवांकडून, मंजिखांकडून वा मन्सूरअण्णांकडून? बेळगाव लौकर सोडलंत म्हणून, की लेखनामध्ये आणि एकपात्रीमध्येच अधिक रमलात म्हणून?
असो. तरीही खूप बरं वाटलं ती नंदतली तुमची लै भारी गायकी ऐकून. जीव तृप्त झाला. तुमच्या स्वभावानुसार एखाद्याला अगदी सहज प्रेमाने पाठीवर हात ठेऊन काही सांगावं, त्याच साधेपणानं आणि त्याच सात्त्विकतेनं तुम्ही पाखराशी साधलेला संवाद मनापासून आवडून गेला.
अजून काय लिहू? तुम्ही आयुष्यभर नारायणरावांच्या, मन्सूरअण्णांच्या गायकीचं भरभरून कौतुक केलंत. पण आज म्या पामराने तुमच्या गायकीचं हे मनमोकळं कौतुक करण्याचं हे धाडस केलं आहे, तेवढं गोड मानून घ्या इतकंच सांगायचं होतं..!
तुमचा,
तात्या.
तात्या.
3 comments:
वाह तात्या! पहिल्यांदा हे गाणं ऐकलं आज! खूप छान लेख...पु.लं ची वेगळी ओळख करून दिलीत मनःपूर्वक आभार!
तात्या, तुमची लेखनशैली अप्रतिम आहे...
प्रश्नच नाही... "हरितात्या" हा शब्द तर बरेच काही फिरवून आणतो डोळ्यासमोरून... तुम्हीही सुरेख वापर केलात... :)
वाह तात्या!!!
सुरेख लिहिलयस रे.
असाच लिहिता रहा.
Post a Comment