या पूर्वी -
...घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!
They named her
We call her
त्यानंतर दोनचारदा तरी दाईमाकडे गेलो असेन. दाईमादेखील माझ्यासारख्या अभ्यागतासोबत मनमोकळेपणाने बोलली, अगदी बरंच काही..
दाईमा, वेळोवेळी अनेक ठिकाणी छापून आलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणी, टाईम्सच्या हापिसातली काही जुनी विंग्रजी वृत्तपत्र, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इत्यादी अनेक ठिकाणांहून मधुबालेबद्दल माहिती घेतली खरी परंतु ही लेखमाला लिहिताना मात्र गडबडून गेलो आहे. तिचं हास्य, तिची बुद्धीमत्ता, तिचा वक्तशीरपणा, तिचं अभिनय सामर्थ्य, तिच्या आयुष्याची सर्वाथाने वाट लावणारा तिचा कर्दनकाळ बाप, तिची दानशूरता, तिचं प्रेमप्रकरण, तिची मानसिकता, गर्दीपासून नेहमी दूर राहण्याचा तिचा स्वभाव, तिची अत्यंत साधी राहणी, एकाच वेळी बाहेरून अगदी विलक्षण अल्लड तर आतून तर अगदी अंतर्मुख आणि कमालीची विवेकी.. किती कंगोरे असावेत या शापित यक्षिणीच्या व्यक्तिमत्वाला? या सगळ्याबद्दल इतकं भरभरून वाचायला मिळालं तरी याचं संकलन कसं करावं, सुरवात कुठून करावी आणि संपवावं कुठे याबद्दल भांबावून गेलो आहे.. तरीही बघतो प्रयत्न करून...
देव आनंदला जिथे जिथे तिच्याबद्दल काही लिहायची, बोलायची वेळ आली तेव्हा तेव्हा त्याने तिच्याबद्दल अत्यंत आदरपूर्वक गौरवोद्गारच काढलेले पाहायला मिळाले. देवच्या 'कालापानी'च्या चित्रिकरणाच्या वेळची गोष्ट. कुठल्याही चित्रपटाचं शुटींग असो, सकाळी ठीक ९ वाजता स्टुडीयोत हजर रहाणं आणि काहीही झालं तरी संध्याकाळी ठीक ६ वाजता घरी परतणं हा मधुबालेचा पायंडा बराच प्रसिद्ध होता. इतका की मधुबाला हजर झाली किंवा निघाली की त्यानुसार आसपासची लोकं अनुक्रमे ९ व ६ वाजताची स्वत:ची घड्याळे जुळवत असत! परंतु देव काही तिच्या या शिस्तीला सरावलेला नव्हता. त्यामुळे कालापानीच्या पहिल्याच दिवशी देवची गाडी जरा उशिरानेच फाटकात शिरली. पाहतो तर तिथेच मधुबाला उभी..
"आ गये मालिक? अभी कुछ काम भी किया जाए..?! :)
हे तिनं गंमतीनं म्हटलं. सोबत तिचं नेहमीचंच 'मारडाला -मोहक' हास्य..
देवने त्याच्या नेहमीच्या ष्टाईलने तिला म्हटलं, 'हमे 'मालिक' नही बुलाना. हम आपको दोस्त समझते है..' त्यावर 'वह तो आपका बढःपन है. लेकिन इस वक्त, इस जगह आप हमारे प्रोड्युसरसाब है, अन्नदाता है, मालिक है..!" - पुन्हा एकदा छानसं हास्य! :)
हृदयविकाराने तिचा अंत झाल्यावर टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत देवसाब तिच्याबद्दल म्हणतात -
Her smile was veritable celebration of living. She was the beautiful fountain of laughter. She was robust, full of life and energy. One could never conceive that she was ill. She enjoyed her work. She was always laughing. Then out of the blue one day, she disappeared..!
अनेक प्रश्न, शंकाकुशंका विचारून दिग्दर्शकाकडून भूमिका पूर्णत: समजून घेण्याची तिची वृत्ती खरोखरंच कौतुकास्पद होती. त्यामुळेच 'महल' मधली अद्भूत स्त्री, 'कालापानी' तली पत्रकार, 'चलती का नाम गाडी' मधली एक अल्लड खोडकर मुलगी, 'मोगलेआझम' मधली राजपुत्र सलीमची एक यःकश्चित 'कनीज' असलेली पराजित प्रेयसी, तर कधी 'तराना'मधील अत्यंत सुरेख असलेली परंतु एक खेडवळ अशिक्षित मुलगी. किती विविध भूमिका आणि तेवढीच तिच्या अभिनयातील विविधता..!
'मोगलेआझम' हा तिच्या आयुष्यातला आणि एकंदरीतच भारतीय चित्रसृष्टीतला एक माईलस्टोन चित्रपट. हा चित्रपट म्हणजे मधुच्या आयुष्यातलं एक मोठ्ठं प्रकरणच. याबद्दल जमल्यास पुढे विस्तृत लिहिणारच आहे. जवळजवळ ८-१० वर्ष या चित्रपटाची निर्मिती सुरू होती. परंतु या संपूर्ण काळातील तिच्यातील दोन टोकाची (एक - दिलिपकुमारसोबतचं बहरीला आलेलं प्रेम आणि दोन - त्या प्रेमाचा संपूर्णपणे चक्काचूर, बी आर चोपडा ने तिच्यावर केलेली न्यायालयीन कारवाई आणि त्या कारवाईत दिलिपची तिच्या विरोधातील साक्ष - त्याबाबतही जमल्यास नंतर लिहीन,) मानसिक स्थित्यंतरं, असे एकूणच या काळातील तिच्या आयुष्यातले अनेकानेक चढउतार.. परंतु या सगळ्याचा तिच्या अभिनय क्षमतेवर कुठेही परिणाम नाही.. अर्थात, तिचं जगप्रसिद्ध हास्य किंचित लोप पावू लागलं होतं असं तिच्या जवळचे सांगायचे.
'मोगलेआझम' गाणी हा त्या चित्रपटाचा प्राण. आणि त्या गाण्यातली मधुबालाची अदाकारी केवळ 'लाजवाब', 'क्या केहेने' अशी..! ' मोहे पनघट पे' मधली घायाळ करणारी अनारकली, 'प्यार किया तो डरना क्या' मधली बिनधास्त अनरकली, किंवा दीदीच्या केवळ अद्भूत स्वरांच्या साथीत 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' या गाण्यातली, गळ्यात-अंगाखंद्यावर जाडजूड साखळदंड असलेली एक थकलेली, हारलेली अनारकली..!
कधी वाटतं, ती इतिहासातली अनारकली आणि मधुबाला या दोघी एकच तर नव्हेत? सारख्याच दुर्दैवी?!
बोलीभाषा अन् त्याच्या बारकाव्यांबद्दलचा तिचा अभ्यास असे आणि त्याकरता ती विशेष प्रयत्न करत असे. 'मोगलेआझम' ची निर्मिती सुरू असतांनाच एकीकडे ती 'हावडा ब्रिज'चंही चित्रिकरण करत होती. पण आपल्या लक्षात येईल की 'मोगलेआझम' मधलं उर्दू-फारसीचं वर्चस्व असणारं तिचं एका 'कनीज'चं अदबशीर हिंदी, तर 'हावडा ब्रिज' मधलं तिचं 'ए तुम क्या बोलता है, हमको समझमे नही आता..' असं अँग्लोइंडियन ढंगाचं हिंदी..! 'मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए' तली हारलेली ती, तर 'आईये मेहेरबा..' मधली समोरच्याचं अगदी सहजच काळीज घायाळ करणारी तिची अदाकारी..!
खूप मेहनत घ्यायची हो ती. खूप लगन होती तिची..!
१९६४ मध्ये तिचा 'शराबी' हा चित्रपट प्रसिद्ध झाला तेव्हा त्या चित्रपटाची जाहिरात अशी होती -
The poet saw
Beauty
The sculptor carved her
Image
They named her
Venus
We call her
Madhubala…!
(क्रमश:...)
-- तात्या अभ्यंकर.
2 comments:
Sundar lihala aahe...
Only thing is that u kept too many links open in this one...
Aata maza kam nahi honar office madhye! ;-)
khupach chan lekh aahet madhubala baddal...ajun pan vachayala khup avadel!!
Post a Comment