August 30, 2013

पल्लवीताई...

"कसा आहेस रे तात्या? घरी ये ना रे एकदा.. आज येतोस? काहितरी छान खायला करते.."

पल्लवीताईचा असा अधनंमधनं फोन येतो..

"हो, येतो."

पल्लवीताईचं घर.. अतिशय स्वच्छ आणि तेवढंच साधं..घरातल्या इंचाइंचात तिनं राखलेलं घराचं घरपण..!

तीनच खोल्या..एक हॉल, एक स्वयंपाकघर आणि तिसरी एक खोली. त्या खोलीत पल्लवीचे अंथरुणाला खिळलेले वडील..वडिलांचं थोडंफार येणारं उत्पन्न आणि बाकी पल्लवीताईच्या घरातच चालणार्‍या सकाळ-संध्याकाळच्या शिकवण्या.. घरी आता पल्लवीताई आणि तिचे अधू वडील हे दोघेच..

"तात्या, तुझ्या आवडीची मोकळी भाजणी केली आहे.. आणि सोबत गोड दही.."

अतिशय साधा, घरगुती म्हणावा असा पंजाबी ड्रेस..कपाळाला न चुकता लावलेलं कुंकू..काना-गळ्यात आणि हातात अगदी मोजकं आणि तेवढंच साधं, शोभेलसं.. भडकपणा कुठेही नाही.. तरीही पल्लवीताई खूप छान दिसायची. साधेपणातलं सौंदर्य वेगळंच असतं हेच खरं..!

"ए तात्या, कशी झाल्ये रे मोकळी भाजणी? तू काय बुवा, मोठा बल्लवाचार्य..!"

असं म्हणतानाची पल्लवीताईची मिश्किलता आणि तिच्या चेहेर्‍यावरचं कौतुक. आणि एकंदरीतच, माझं काय किंवा इतर कुणाचं काय.. नेहमी कौतुक करणं, तुमच्यातल्या गुणांना प्रोत्साहन देणं हाच पल्लवीताईचा स्वभाव..

"कुणाचं गाणं ऐकलंस अलीकडे? येत्या रविवारी गडकरीला भावसरगम आहे. आपण जाऊया का रे? येशील माझ्याबरोबर? दोन-तीन तास मी तानीला बसायला सांगेन आप्पांजवळ.. जाऊया खरंच..?"

"आई गेल्यापासून कुठे असं बाहेरच जाणं झालं नाही रे.. आई गेली आणि आप्पांनीही त्याचा धसका घेऊन ते असे अंथरुंणाला खिळले.."

पल्लवीताई असं म्हणाली आणि झर्र्कन माझ्या डोळ्यासमोर पूर्वीची पल्लवीताई आली. अत्यंत हौशी.. ट्रेकिंग करणं, हौसेने नाटकात काम करणं.. अगदी हौशीहौशीने गणपतीची आरास करणं, दिवाळीचा तो झिरमिळ्यावाला कंदील करणं..मज्जा-मस्ती-गाणी-गप्पा-गोष्टी-भेंड्या- उत्साहाचा अगदी झरा होती आमची पल्लवीताई..

"अरे तात्या, कमल पाध्येचं हे पुस्तक वाचलंस बंध-अनुबंध? कालच आणलंय मी लायब्ररीतून.."

पूर्वीची पल्लवीताई आणि आता माझ्यासमोर बसलेली पल्लवीताई.. खूप फरक होता दोघांमध्ये.. तिच्या आईला कावीळ झाली..ती पोटातच फुटली आणि महिन्याभरातच ती गेली.. ती केवळ तिची अई नव्हती तर अगदी जवळची मैत्रिण होती.. उत्साहाचा झरा असलेल्या पल्लवीताईला नाही सोसला तो धक्का आणि त्यानंतर पल्लवीताई अगदी अबोलच झाली..पुढे लगेच वडिलांचं अंथरुणाला खिळणं.. एक कुणीतरी तिला खूप आवडत होता, तिच्या मनात भरला होता..तिथेही काही योग जुळून आला नाही.. असा सगळा अक्षरश: दोन-तीन महिन्यातला प्रकार आणि एक उत्साहाचा झराच आटला.. अकाली वृद्धत्व वगैरे नक्कीच आलं नव्हतं, तशी आजही ती काही नकारात्मक वागत नव्हती की सतत कुठले दु:खाचे उसासे टाकत नव्हती..पण मी एक वेगळीच पल्लवीताई पाहात होतो एवढं मात्र नक्की.. मॅच्युअर्ड नाही म्हणता येणार कारण मॅच्युअर्ड तर ती पूर्वीही होती..

"आत येतोस? आप्पांना भेटतोस? त्यांना जरा बरं वाटेल.."

मी आतल्या खोलीत आप्पांच्या पलंगापाशी गेलो.. पक्षाघाताने तोंड वाकडं झाल्यामुळे आप्पांना काही बोलता येईना.. आप्पांनी हात पुढे केला..मी त्यांचा हात हातात घेतला..आणि अंथरुणात पडल्यापडल्याच त्यांच्या दोन्ही डोळ्यातून धारा वाहू लागला..पल्लवीताईकडे बघू लागले.. 'माझ्यामुळे अडकली आता माझी पोर..' असं सांगणं होतं आप्पांच्या त्या अश्रुधारांमध्ये..स्वत:च्या लेकीबद्दल विलक्षण कृतज्ञता होती..!

"आप्पा, मी काय सांगितलंय तुम्हाला? रडायचं नाही म्हणून सांगितलंय ना? तुम्ही असे रडलात तर सांगा कोण येईल का आपल्याकडे? आणि मग अशाने तुम्ही लवकर बरे तरी कसे होणार..?"

"ए तात्या, म्हणतोस का रे जरा बाबूजींचं गाणं 'तुझे गीत गाण्यासाठी?' आप्पांना खूप आवडतं ते गाणं..आप्पा, तुम्हीही थोडी कॉफी घ्याल ना आमच्यासोबत..?"

मला खरंच खूप कौतुक वाटत होतं पल्लवीताईचं.. वास्तविक असं अकाली वृद्धत्व येण्याचं तर तिचं वयही नव्हतं..

"येत जा की रे अधनं मधनं.. पुढच्या वेळेला रम्या आणि मोहनला पण मी बोलावीन..एखाद्या रविवारी दुपारपासूनच या तुम्ही तिघे. आपण मनसोक्त कॅरम खे़ळूया आणि मग मी संध्याकाळी मस्तपैकी पावाभाजी करेन.."

हे ज्या उत्साहाने ती म्हणाली त्यात मला क्षणभर का होईना..पुन्हा पूर्वीची पल्लवीताई दिसली..

उगीचंच भरून आलं...

"येतो गं.."

"थांब जरा..हा घे रव्याचा लाडू.. अरे आप्पांना खूप आवडतात म्हणून केलेत.."

मी चपला घातल्या आणि निघालो.. मनात पल्लवीताईचा साधेपणा, सात्विकता घर करून राहिली होती आणि जिभेवर तिनं केलेल्या लाडवाचा गोडवा होता..

-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

Abhishek said...

चला तात्या च्या आसवांमध्ये आपले पण दोन आसू... पण मग मला रे का नाही लाडू? पल्लवीताई अशीच रहा सहजसुंदर प्रेरणा...