July 29, 2016

कवडसे..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
मी जरा थांबले आणिक किंचित हसले
पाण्यावर नवखे स्फटिक शुभ्रसे काही
उन्मुक्त कवडसे तलम रेशमी उठले

कवडसे..  - येथे क्लिक करावे..

आमच्या सुचेता जोशी-अभ्यंकरची ही अप्रतिम तरल कविता. सुचेताने स्वत:च या कवितेला सुंदर चाल दिली आहे आणि तिची बहीण प्राजक्ता रानडेने हे गाणं खूप सुंदर गायलं आहे. प्राजक्ता सुरेल आहे..

मी नेहमीच अशा काही उत्कट गाण्यांच्या शोधात असतो आणि असं कुठलं गाणं सापडलं की खूप आनंद होतो..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
मी जरा थांबले आणिक किंचित हसले

गाण्याचा मुखडा सुचेताने पुरियाधनश्रीत बांधला आहे. फार सुंदर..

पाण्यावर नवखे स्फटिक शुभ्रसे काही..

यातला शुद्ध धैवत सुखावणारा..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
आकाशी धूसर निळे जांभळे रावे

'आकाशी धूसर' मधला शुद्ध मध्यम एकदम मस्त. परंतु प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ मात्र पुन्हा पुरियाधनश्रीमध्ये आहे त्यामुळे गाणं छान balanced झालं आहे, निभावून गेलं आहे. निभावून नेणे हे शब्द इथे व्यावहारिक अर्थाने न घेता व्यापक अर्थाने घ्यावे. गाण्यात निभावून नेणं हेच सर्वात महत्वाचं आणि credible असतं हे लक्षात घ्या..

धुळभरल्या पिकल्या पिवळ्या आंब्यावरती
तांबूस आभा अनुराग होऊनी गाते

क्या बात है.. अप्रतिम शब्द..




अरे असं काहीतरी चांगलं करत जा रे! हल्लीच्या या सांगीतिक बजबजपुरीत असा एखादा शुद्ध पाण्याचा झरा सुख देऊन जातो..

प्राजक्ताचंही तेवढंच कौतुक. तिनेही तेवढंच छान आणि तरल गायलं आहे हे गाणं..

गाण्याचं चित्रिकरणही अगदी प्रेक्षणीय आणि तितकंच गाण्याला साजेसंही!

ही ध्वनिचित्रफीत जेवढी ऐकण्यासारखी तेवढीच पाहण्यासराखीही आहे. दोघीही बहिणी सुरेख दिसतात..

संगीत संयोजक केदार परांजपे आणि ध्वनिचित्रफीत दिग्दर्शिका अश्विनी अभ्यंकर-घैसास यांचंही कौतुक..

जियो..

-- (संगीतप्रेमी) तात्या..

No comments: