December 03, 2007

रौशनी.. ३

>>शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!! <<

भाग ३ -

"आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!" रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली.

माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. 'वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!' या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्‍यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्‍या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना!

बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती!

साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!

ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्‍यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल?

सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)

"काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!" रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत.

साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्‍या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्‍यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! 'ये कौन चुतिया इधर आ गया' असंच त्या आपापसात म्हणत असणार! 'च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?' असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो!

तेवढ्यात, "एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!"

अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्‍या रांडांना दम भरला असणार! 'ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या..:) सानेगुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे' ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! :)

"थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!"

रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? :)

"अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!"

आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला.

"बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!"

आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्‍यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

क्रमशः..

तात्या अभ्यंकर.

रौशनी.. २

>>'कोण कुठली रौशनी! मी का जावं तिच्याकडे?' असा विचार करून मी मन्सूरकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर दोनतीनदा मन्सूरने रौशनी बोलवत असल्याचं पुन्हा सांगितलं. शेवटी 'च्यामारी बघू तरी एकदा ही भानगड तरी काय आहे?' असा विचार करून एके दिवशी मी त्या रौशनीला भेटायला जायचा विचार पक्का केला. <<

...रात्रीचे १० वाजले असावेत. मी मन्सूरला सोबत घेऊन बारच्या बाजुलाच असणार्‍या चाळीमध्ये रौशनीला भेटायला निघालो. त्या चाळीत जाण्याची माझी पहिलीच वेळ! दोन्ही बाजूला परकरपोलकी घातलेल्या, चेहेर्‍यावर रंगरंगोटी केलेल्या वेश्या उभ्या होत्या. त्यातल्या बर्‍याचश्या रंगरुपाने दिसायला केवळ भयानक होत्या. गलीच्छ होत्या. काळ्याकुट्ट देहावर, चेहेर्‍यावर मेकपची पुटं चढवलेल्या! रंगीबेरंगी भडक कपडे घातलेल्या! चेहेर्‍यावर आचकट विचकट भाव अन् हसू! कोण कुठल्या या मुली? इथे कश्या आल्या असतील? कुणी आणल्या असतील? किती रुपायाला विकल्या गेल्या असतील? छे! सगळेच नुसते प्रश्न...! उत्तर एकाचंही माहीत नाही! मला त्या मुलींची किळसही आली आणि एकिकडे दयाही आली! पाच पंचवीस पन्नास रुपयांकरता फालतूतल्या फालतू, अत्यंत थर्डरेट माणसांसमोर पाय फाकवायचे? आणि त्यानंतर होणार्‍या फक्त यंत्रासारख्या हालचाली! कॉटवर आडवं पडून पाय फाकवणारं फक्त एक यंत्र! आणि यांच्याकडे येणारी गिर्‍हाइकं? ती एवढी भुकेली असतील?? काहीही करून कसंही करून स्त्रीशरीर मिळाल्याशी कारण!

आपण नेहमी म्हणतो, 'की काय रे माणूस आहेस की जनावर?' हे म्हणण्यामागे माणसाकडून जनावरापेक्षा निश्चित काहीतरी वेगळ्या अपेक्षा असतात. अहो पण कुत्र्यामांजरांच्या संभोगातदेखील एक वेळ शृंगार सापडेल, प्रेम सापडेल! पण इथे मी खरोखरंच माणसातली जनावरं बघत होतो. कारण माझ्या आजुबाजूला गिर्‍हाइकांचीदेखील वर्दळ, येजा सुरू होती. माणूसरुपी जनावराचा आणि एका माणूसरुपी पाय फाकवणार्‍या यंत्राशी पाच पंचवीस रुपायांच्या बोलीत ठरलेला व्यावहारिक संभोग! तो म्हणणार, 'चल लेट जा. बहुत नखरा कर रहेली है', आणि ती म्हणणार, 'चल, जल्दी कर. आज धंदा कम है साला, जादा टाईम मत ले. धंदे का खोटी मत कर!' मंडळी, हे सगळंच खूप कठीण होतं. भयानक होतं!

पण मला त्या मुलींची, त्या माहोलची, त्या गिर्‍हाइकांची किळस का येत होती? मी यांच्यापेक्षा वेगळ्या सोसायटीतला, वेगळ्या समाजातला होतो म्हणून?? माझ्या समाजात किंवा माझ्यापेक्षा उच्चभ्रू समाजात नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो, तुफान पैसा कमावतो. आणि इथे त्याची धर्म(!)पत्नी स्वतःच्या पॉकेटमनीकरता, वरखर्चाकरता पाच, दहा, पंधरा, पंचवीस हजारांची रक्कम घेऊन (तिच्या सुंदरतेनुसार, कमनीयतेनुसार!) अज्ञात ठिकाणी हेच काम करते की! अश्याही आहेतच की काही स्त्रीया! पण त्यांचा कुठे बाजार नसतो! बरीचशी कामं एसएमएस द्वारा चुपचाप होतात! बर्‍याचवेळा मध्यस्थांमार्फत ही कामं होतात, किंवा पेजथ्री मधल्या पार्ट्यांमधून एकमेकांशी ओळख तरी असावी लागते, मैत्री व्हावी लागते! मग कदाचित पैशांचाही प्रश्न येत नाही. सगळंच उच्चभ्रू आणि हायफाय लेव्हलवर चालतं!! पण तरीही त्यापैकी एखादी बाई समोर आली की नकळत माझ्या तोंडून कदाचित, 'हॅलो मॅडम, हाऊ आर यू?' हेच शब्द बाहेर पडणार! मंडळी, तेव्हा मात्र मला त्या बाईची किळस नाही येणार! कारण ती छान दिसते, पॉश राहते! 'तिचा नवरा सहा सहा महिने बोटीवर असतो ना, अहो मग काय करणार? शेवटी माणूस आहे आणि माणसालाही काही भुका असतात, गरजा असतात!' असा सोयिस्कर विचार मी करणार! 'च्यामारी आपल्यालाही या बाईबरोबर चान्स मिळाला तर काय मजा येईल!' हाही विचार माझ्या मनात येऊ शकतो. पण तेव्हादेखील मी माणूसच असतो बरं का! जनावर नसतो!

मंडळी, माझा एक करोडपती पंजाबी क्लाएंट आहे. बिझिनेस एथिक्स म्हणून मी त्याचं नांव नक्कीच घेऊ शकत नाही. साला भगवान आहे तो आपला! मंडळी, हा माणूस मुळचा चंढीगढचा. पण कामधंद्याकरता नेहमी फिरतीवर असतो. तुफान पैसा कमावतो. त्याचे शेअर्सचे सगळे व्यवहार मी पाहतो. तो एकदा दोन तीन महिन्यांच्या परदेशवारीकरता गेला होता. आल्यावर त्याने मला फोन केला. त्याला त्याच्या शेसर्ससंबंधी मला नित्याची माहिती द्यायची होती, माझ्या फीचे पैसेही त्याच्याकडून घ्यायचे होते. 'अरे तात्यासेठ, कैसा है? एक काम करना तात्या, मै आज शामतकही बंबईमे हू, बाद मे मुझे दिल्ली जाना है. तुम अंधेरीमे फलाना हॉटेलमे मुझे ये ये टाईमपे मिलना. फुरसतमे बात करेंगे. बियर पियेंगे!' असा आमचा फोन झाला.


आपल्याला काय हो, धंदेसे मतलब! मी ठरल्यावेळी अंधेरीला असलेल्या त्या पॉश होटेलात त्याला भेटायला गेलो.

स्वागतकक्षात चौकशी करून तो उतरलेल्या खोलीपाशी गेलो, दारावर टकटक केली. माझ्या पंजाबी क्लाएंटने आतून दार उघडलं. 'आओ तात्या, बैठो. स्टेटमेन्ट लाये हो?' मंडळी, मी आत जाऊन क्षणभर उडालोच! आतल्या डबलबेडवर मराठी वाहिन्यांतून, चित्रपटांतून काम करणारी एक प्रसिद्ध प्रतिथयश नटी बसलेली होती! तीदेखील माझ्याकडे पाहून फिल्मी पद्धतीने हसली. त्या पंजाबी माणसाने आमची एकमेकांशी ओळख करून दिल्यावर आम्ही एकमेकांना 'हाय हॅलो' केलं!

'बैठ तात्या. बियर पियेगा?' या प्रश्नाने मी भानावर आलो. पाच दहा मिनिटातच हिशोबाची स्टेटमेन्टस मी त्याच्या हवाली केली, माझे पैसे घेतले अन् तेथून निघालो. तो मला सोडायला खोलीच्या बाहेर आला. मला राहवेना. मी त्याला म्हटलं, 'साब, ये मॅडम तो बहोत फेमस है. आप उन्हे कबसे जानते है?'

अरे जानपेहेचान किस बात की? एक बार टीव्हीपे चॅनल सर्फींग करते हुए मैने देखा इसको. सिरियल लाईनके एक आदमीसे पता किया. साला पैसा फेकनेका! बस! तुझे चाहिये क्या बोल?!!' असं म्हणून तो गडगडाटी हसला आणि खोलीत परत गेला. मी माझे पैसे नीट जपून खिशात ठेवले आहेत याची खात्री करत तेथून रवाना झालो!

ती मालिकानटी मला पॉश वाटली. मी तिच्याशी लाळगळूपणा करत हाय हॅलोही केलं. कारण ती सुरेख होती, पॉश होती, स्वच्छ होती!! पण रोशनीच्या चाळीत उभ्या असलेल्या बायका मात्र मला गलिच्छ वाटत होत्या!!

साला दुनियेचा न्यायच अजब आहे! असो, थोडं विषयांतर होतंय, पण ते आवश्यक आहे. रौशनीचे हे व्यक्तिचित्र लेखन म्हणजे तात्याचा एक जीवनानुभव आहे. हे लेखन म्हणजे तात्याची एक भडास आहे. ओकू दे मला मनमोकळेपणाने!

तर कुठे होतो आपण?

मी निघालो होतो रौशनीला भेटायला. तिच्या वस्तीत, तिच्या चाळीत, रात्री दहाच्या सुमारास! मंडळी, खरं सांगायचं तर माझी क्षणभर जरा फाटलीच होती. 'कुठे चाललोय आपण? आणि का चाललोय? काय काम असेल आपल्याकडे या रौशनीचं?, च्यामारी यातून कुठल्या नवीन भानगडीत तर आपण अडकणार नाही ना?' अशा नाना शंकाकुशंका क्षणभर मनात येऊन गेल्या. पण साला आपला पण स्वभाव, 'जो होगा, वो देखा जाएगा भेंडी..!!', या टाईपचा असल्यामुळे मी त्या शंकाकुशंकांना माझ्या मनात फार वेळ थारा दिला नाही! ;)

मन्सूर अर्थातच माझ्यासोबत होता. आम्ही रौशनीच्या खोलीपर्यंत जात असतांना मन्सूर मात्र मोठ्या सराईतपणे आणि सफाईने त्या आजूबाजूच्या वेश्यांना, 'ए हटो सब एक साईड मे. तात्यासाब आ रहे है. साला गोवमेन्ट का आदमी है. लफडा नही मंगता है. नही तो बंद करेगा सबको!' अशा धमक्या देत मला घेऊन रौशनीच्या खोलीकडे निघाला होता! मी 'गव्हर्नमेन्ट का आदमी' केव्हा झालो हे माझं मलाही माहिती नाही! ;)

शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

(क्रमशः )

--तात्या अभ्यंकर.

रौशनी.. १

राम राम मंडळी,

"तात्याभाई, रौशनीने तुमको चाय पिने को बुलाया है!"

मन्सूर हे मला सांगायला आला. मी तेव्हा मुंबईच्या फोरासरोडवरील 'झमझम' या देशी दारूच्या बारमध्ये हिशेब लिहिण्याचं काम करत असे.

फोरास रोड! मुंबईच्या रेडलाईट विभागातला एक प्रमुख विभाग. तेव्हा मुंबईमध्ये फोरास रोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा येथे मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालायचा. आजही चालतो. रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोट्यामोठ्या चाळवजा इमारती. या सर्व इमारतींमधून खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असे. १५ वर्षांपासून ते अगदी पस्तिशी चाळीशी पर्यंतच्या पोरीबाळी व बायका संध्याकाळ झाली की चेहेर्‍यावर रंगरंगोटी करून परकरब्लाऊजच्या वेषात रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या दाराखिडक्यात उभ्या रहायच्या. अनोळखी तसेच ओळखीपाळखीच्या लोकांना खाणाखुणा, शुकशुक करून बोलवायच्या. अगदी २०-२५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत वय, रंगरुपाप्रमाणे पैसे घेऊन आलेल्या गिर्‍हाईकाची भूक भागवायच्या. एका रात्रीत पाच पाच, सहा सहा गिर्‍हाईकं! खरंच, फार भयानक विश्व होतं ते मंडळी. अत्यंत ओंगळवाणं आणि किळस आणणारं होतं!
पण आपली रोजीरोटीच मुळी त्या सरकारमान्य देशीदारूच्या बारमध्ये हिशेब लिहायची होती. त्यामुळे त्या भागात रोज जावं लागत असे!

'बशीर मोराशी' असं काहीसं नांव असणार्‍या माणसाच्या मालकीचे तीन चार बार होते. त्या सर्व बारस् चं अकाउंटस् सेटप करण्याचं काम बशीरभाईनी मला दिलं होतं. मी तेव्हा मुंबईच्या प्रभादेवी भागात असलेल्या जी एम् ब्रेवरीज लिमिटेड या देशीदारूचं उत्पादन करणार्‍या कंपनीतं नोकरी करत होतो. मंडळी, आपल्याला आश्चर्य वाटेल, मुंबईतील सातशेहून अधिक बारमध्ये आमचा माल जायचा. अक्षरशः तुफान खप. मरण नसलेला धंदा! बर्‍याचश्या बार मालकांची आणि माझी चांगलीच ओळख. काही वेळेला त्यांची मागणी जास्त असायची, अन् माल कमी असायचा. मग जास्त मालाकरता कंपनीच्या सेल्स् मॅनेजरकडे वशिला लावण्यासाठी 'तात्यासेठ', 'तात्याभाई' अश्या उपाध्याही मला मिळायच्या! बर्‍याच बार मालकांचे बरेच अनुभव तिथे मी घेतले. बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. त्यांचे दोन नंबरचे व्यवसायही बघितले, पण त्याविषयी पुन्हा केव्हातरी!

झमझम बार! फोरासरोडवरच्या गजबजलेल्या वस्तीत सरकारमान्य देशी दारू मिळणारा बार. तसा हा बार दिवसभरच गिर्‍हाईकांनी गजबजलेला असायचा, पण संध्याकाळी अगदी माणसंनी फुल्ल असायचा. शंभर रुपयांपर्यंत आख्खी बाटली मिळायची. तिथे येणारी बहुतेक सगळी मंडळी ही गुंड अन् मवाली. दिवसभर काहीतरी उलटेपालटे धंदे करायचे, लहानमोठ्या चोर्‍या करायच्या आणि संध्याकाळ झाली की झमझम बारमध्ये हजर! त्यातले काही इकडेतिकडे फुटकळ नोकर्‍या करणारे चतूर्थश्रेणी कामगारही असत. झमझम बारमध्ये यायचं, फुल्लटाईट व्हायचं अन् घरी जाऊन बायकाला मारझोड करायची एवढीच काय ती यांची मर्दुमकी! काही जण मर्दुमकी गाजवायला बाजुलाच असलेल्या इमारतीतल्या वेश्यांकडे जात. २०-२५ रुपयात मर्दुमकी गाजवून होई! शिवाय मारामार्‍या, चाकूवस्तर्‍याचे वार, दादा, भाई, पोलिस, त्यांचे हप्ते, या सगळ्या गोष्टी तर त्या बारमधल्या नित्याच्याच.

याच सर्वांमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, पांढरपेशा समाजातला एक तात्या अभ्यंकरही 'अपनेको क्या? अपने कामसे मतलब!' या भावनेने त्या बारमध्ये हिशेब लिहीत बसलेला असायचा!;)

मन्सूर हा आमच्या बारमधला एक हरकाम्या पोर्‍या. दहापंधरा रुपयांच्या रोजीवर पडेल ती कामं करायचा. राहायचाही तिथेच. शिवाय दिवसाकाठी कुणाकुणाकडून पाचदहा रुपयांची टीपही मिळायची. बारमध्ये अजून तीनचार जण कामाला होते. त्या सगळ्यांकरता दोन टाईम डाळभाताचं जेवण त्या बारमध्येच शिजायचं. डाळभात, लिंबाची फोड अन् पापड! वरतून तुपाबिपाची धार नाही हो. ते सगळे लाड आपल्या दुनियेत! ;) मन्सूरसोबत मीही कधी मूड आला अन् रात्री घरी परतायला उशीर होणार असेल तर तिथेच डाळभात जेवायचा. मजा यायची! ;)

आमच्या बारच्या बाजूलाच एक एकमजली चाळ होती. त्या संपूर्ण चाळीत वेश्याव्यवसाय चालायचा. दिवसभरातल्या फावल्या वेळात मन्सूर तिथल्या वेश्यांचीही काही फुटकळ कामं दोनपाच रुपयांच्या टीपेवर करायचा. त्या काळात माधुरी आणि संजूबाबाचा 'साजन' हा चित्रपट नुकताचा प्रदर्शित झाला होता. मन्सूरने माझ्याकडून तिकिटाकरता उधार पैशे घेऊन तो चित्रपट पाहिला होता. "तात्याभाय, माधुरी बाकी क्या मस्त दिखती है. अपनेको उसे एक बार मिलनेकाईच है! आपुन उसको बोलेगा के तू भोत चिकनी दिखती है";) मला हसू आवरेना. माधुरीचे जे असंख्य चाहते होते त्यात एक आमचा मन्सूरही होता, हे त्या बिचार्‍या माधुरीला माहीत नसावं! ;) हा लेख लिहिताना आत्ता सहजच हा किस्सा आठवला. असो..!

"तात्याभाई, तुमको रौशनीने चाय पिनेकू बुलाया है!" मन्सूर.

"कौन रौशनी?"

"वो बाजुके बिल्डिंगमे नही रहती क्या? वोईच! एक-दो बार उसने तुमको यहा आतेजाते हुए देखा है. तुमारे बारेमे मेरेसे भोत पुछती है. तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है, शरीफ दिखता है! बाजुके बिल्डिंगमे जो लडकीलोग है ना, ये रौशनी उन लडकीलोगकी मौसी है. तुमको उसने एक बार मिलनेको बुलाया है!"

क्रमशः...

-- तात्या अभ्यंकर.

July 10, 2007

आषाढस्य प्रथम दिवसे..


II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मडळी,

ठाण्यातील 'संस्कृत स्थानम्' या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या संस्थेने रविवार दि १५ जुलै, २००७ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता कालिदास दिनाचा मुहूर्त साधून 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून त्या अंतर्गत मेघदुतातील काही श्लोकांचे निरुपण आणि गायन होणार आहे. तसेच नृत्यातील काही भावमुद्रांचेही सादरीकरण होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे -

आषाढस्य प्रथम दिवसे..

१) मेघदुतातील काही निवडक श्लोकांचे निरुपण - संस्कृत विदुषी सौ धनश्री लेले.

२) गायन - अभिजात संगीत गायिका सौ वरदा गोडबोले।

३) श्लोकानुरुप भरतनाट्यममधील भावमुद्रा - नृत्यांगना निलिमा कढे

४) संगीत - तात्या अभ्यंकर

५) निर्मितीप्रमुख - तात्या अभ्यंकर.
कार्यक्रम स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे.
दिनांक व वेळ - १५ जुलै २००७, रात्रौ ८।३० वा.
प्रायोजक - पितांबरी प्रॉडक्टस प्रा लि
प्रवेश विनामूल्य...
सर्व इच्छुकांनी सदर कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.
कालिदसमहाराजांच्या ओळींना हिंदुस्थानी रागसंगीतावर आधारित स्वरसाज चढवायला मिळाला, ही मी माझ्या भाग्याची गोष्ट समजतो.
धन्यवाद!
आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

June 19, 2007

चर्चा एका उपक्रमीशी!

मिलिंद भांडारकर या आमच्या मित्राशी केलेल्या चर्चेचा हा काही भाग.

मूळ संदर्भ - 1) http://mr.upakram.org/node/423#comment-5762
2) http://mr.upakram.org/node/423#comment-5772

मिलिंदचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं तिच्यायला निळ्या!


>>सहा महिने वाट पाहणार होतात ना ?

कशाला वाट पाहायची? एका साध्या प्रश्नाचं 'हो' किंवा 'नाही' एवढंदेखील उत्तर जर उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला देता येत नसेल आणि ही लोकं (की तुम्ही लोकं? कारण उपक्रमबद्दल तू उपक्रमरावाशी चर्चाबिर्चा करतोस म्हणे!) जर मला अनुल्लेखानी मारणार असतील तर इथे राहण्यात काय मतलब आहे??
बरं जाहीर उत्तर नाही तर नाही, पण उपक्रमला 'या विषयावर लिहा' किंवा 'लिहू नका' या आशयाची एखादी खरड किंवा व्य नि तरी मला टाकता नसता आला? उपक्रमाच्या सुरवातीला हगल्यापादल्या कुणाच्याही शंकांना त्वरेने उत्तरे देणारे उपक्रमराव आत्ताच एवढे गप्प का बसले आहेत? पण मिलिंद, एका संकेतस्थळाचे आपण मालक झालो याच गुर्मीवर ही मंडळी वावरत आहेत. एवढी कसली गुर्मी यांना चढली आहे तेच कळत नाही!


बारबालांचा विषय अनायसे निघालाच होता म्हणून मी हा प्रश्न विचारला होता. वास्तविक असा प्रश्नदेखील मी विचारला नसता पण माझा 'रौशनी' हा सामाजिक आशय असलेला लेख मी सर्वप्रथम उपक्रमावरच टाकला होता, पण तो लेख इथून एका मिनिटात उडवला होता हे तुलाही माहित्ये आणि त्यावर तुझ्याकडेही काहीही उत्तर नव्हतं हे तू मला व्य नि ने कळवलं होतंस. यावेळेस पुन्हा असं होऊ नये म्हणूनच मी जाहीर सवाल विचारला होता यात काय चुकलं माझं?

'बारबाला' या विषयावर माझ्याकडे लिहिण्यासारखं खूप आहे. मी येथील काही प्रतिसाद वाचले पण ती फार वरवरची माहिती आहे. वस्तुस्थिती काय आहे, यात हॉटेलमालक काय राजकारण खेळतात, यासर्व गोष्टी मी खूप जवळून पाहिल्या आहेत. पण उपक्रमाला बहुधा संगीत, व्याकरण, हा शब्द कसा आला अन् त्या शब्दाची व्युत्पत्ती काय, अन् महाभारतात व्यासाने काय लिहून ठेवलंय, गणिती कोडी, संगणकशास्त्र इतपतच सगळे गुडीगुडी, छान छान चार भिंतितले, वरणभातवाले सोवळे विषय पचतात असे दिसते! वेश्याव्यवसाय, बारबाला, दोन नंबरचे धंदेवाले, दारुवाले यांच्याविषयीच्या लेखनाच्या नुसत्या कल्पनेने बहुतेक उपक्रमरावाला आणि त्याच्या टीमला घाम फुटत असावा! तर ते पचवणार काय??

असो, उपक्रम हे माजघरातच ओव्या म्हणत रमणारं संकेतस्थळ दिसतं आहे. तिथे सगळी दुनियादारी केलेल्या आमच्यासारख्या भिकारचोट माणसाचे काय काम? ;)

आम्ही मिसळ, आमरस, मटण हे सगळे पदार्थ खाल्लेली माणसं! उपक्रमला फक्त मऊभात तूप मेतकुटी घरगुती माजघरातले माहितीपूर्ण लेख लिहिणारी मंडळी हवी आहेत! आम्ही कुमार, बाबुजी, भीमसेनही जवळून बघितले आणि वेश्या, दारुवाले आणि दोन नंबरचे धंदेवालेही तेवढ्याच जवळून बघितले!

असो, 'तुम्हा' उपक्रमी संपादक मंडळींना 'तुमचं' उपक्रम लखलाभ! एरवी जाहीरपणे १०० प्रतिसाद देणारा तूही उपक्रमरावाच्या जवळचा असल्यामुळे मूग गिळून आहेस हे पाहून मात्र गंमत वाटली! ;) असो! कुणाचा इंटरेस्ट कशात तर कुणाचा इंटरेस्ट कशात!

असो! आपण आहे नंबर एकचा वेडझवा माणूस. तो 'तुमच्या' उपक्रमापासून दूर राहिलेलाच बरा! 'तुला', 'तुझ्या उपक्रमी टीमला', आणि 'तुझ्या उपक्रमला' माझ्या मनपासून शुभेच्छा! खूप खूप मोठे व्हा आणि मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत पहिलं बक्षिस वगैरे मिळवा! ;)

मला मात्र तुझ्या उपक्रमात इटरेस्ट होताही आणि नव्हताही! एक तात्या गेला तर उपक्रमाचं काहीच बिघडणार नाही आणि एक उपक्रम गेलं तर तात्याचंही काहीच बिघडणार नाही! तात्या क्या है, कैसा है ये सब जानते है!

जोपर्यंत इथे होतो तोपर्यंत इथे बरंच काही संगीतविषयक लिहायचा विचार होता. 'मला आवडलेले भीमसेन' अशी अण्णांच्या ध्वनिमुद्रिकांवर आधारीत लेखमाला त्यातील सौंदर्यस्थळे तुकड्यांच्या रुपाने एखाद्या संकेतस्थळावर ऐकता येतील अशी चढवून त्याबाबत इथे विस्तृत लिहायचं कालच माझ्या मनात आलं होतं. पण भोसडीच्यांनो तुम्ही लोकांनी हा गेम केलात! ;)

चलो कोई बात नही! आता फिरत फिरत असेच कुठले दुसरे संकेतस्थळ दृष्टीस पडले आणि पुन्हा मूड आला तर तिथे लिहीन! आपल्याला काय! जिथे मन रमेल तिथे काही काळ थांबेन. नाहीतर एकला चलो रे आहेच!


>>तात्या, रविवारी रात्री प्रतिसाद टाकून सोमवारी सकाळी उत्तराची अपेक्षा का करतोस बाबा ? जरा धीर धर.

का बरं? एरवी तो फोकलीचा उपसंपादक तर बघावं तेव्हा पोलिसगिरी करत फिरत असतो की! बरं, सोमवार सकाळ तर केव्हाच गेली. आज मंगळवार सकाळ उजाडली आहे. अद्याप कुणाचंही उत्तर नाही!

>>दुसरे, रौशनी आणि बारबालांवरचा तुझा आगामी लेख, ह्यात फरक असेल की नाही ?

फरक आहेही आणि नाहीही. दोन्ही विषय स्त्रीशी निगडित आहेत. नैतिक अनैतिकतेच्या व्याख्येत बसणारे आहेत. तेव्हा विशेष असा फरक नाही. म्हणून म्हटलं आधी विचारून घ्यावं!

>>तिसरे, तुला एकट्याला अपवाद करण्याचा वेगळा पायंडा पाडणे हिताचे आहे का ?

अपवाद करा असं कुठे म्हटलंय मी? मी फक्त सदर लेख टाकू किंवा नको इतकंच विचारलं होतं ना? त्याचंही उत्तर देणं तुम्हाला जड झालंय?? एखाद्या सभासदाच्या जाहीर प्रश्नाला जाहीरपणे नाहीतर नाही पण खरड किंवा व्य नि लिहूनही दोन ओळींचं उत्तर देता येऊ नये? का बुवा असं? एवढा कुठला माज? एवढी कुठली गुर्मी?? उपक्रमाचे मालक आहात याची??

की तात्याला जे काय असेल ते जिंदादिलीने जाहीर उत्तर देतांना तुमचा सोकॉल्ड ईगो दुखावला जाईल अशी तुम्हाला भिती आहे? की अश्या नाजूक विषयावर तात्याने स्वतःहून लिहिलं तर लिहू दे, पण त्याकरता त्याला मुद्दामून परवानगी कशी काय द्यायची अशी तुमची पंचाईत झाली आहे? ;)

की या विषयाला परवानगी देऊन उपक्रमरावाच्या माजघरी परिटघडीच्या कपड्याला आणि सोकॉल्ड नैतिकतेच्या भंपक कल्पनांच्या इस्त्रीला सुरकुती पडेल की काय अशी बहुधा उपक्रमरावाला भिती पडली असावी! ;)

किती रे लहान मनोवृत्तीची माणसं आहात तुम्ही? अरे मिलिंद तू वसंतरावांचा भक्त ना? आठवून बघ एकदा वृत्तीने किती उमदा मनुष्य होता तो!

जाऊ दे मिलिंद. तुम्ही जपा तुमचे ईगो आणि तुमची माजघरातली ध्येयधोरणं. आपण साला आहे नागडा तमासगीर माणूस. तुमचं आमचं नाय जमणार!

असो! माझ्याकडून हा विषयही संपला आणि उपक्रमही संपलं. मी माझे येथील सर्व लेख उडवून टाकायला सांगितले आहेत आणि माझं खातंही बंद करायला सांगितलं आहे. ते अद्याप का केलें नाही हेदेखील कळलं नाही. असो, इथे अधुनमधून नक्की येत राहीन. आणि माहिती व देवाणघेवणीच्या माजघरातील तुमच्या सभ्य परिटघडीच्या चर्चा वाचत जाईन! ;)

तात्या.


June 09, 2007

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..

राम राम मंडळी,

दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..

आमच्या ठाण्याच्याच राहणार्‍या एक संस्कृत भाषेच्या विदुषी सौ अदिती जमखंडिकर यांनी एका कार्यक्रमाकरता संस्कृत भाषेचं वर्णन करणार्‍या,

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी
सकलसंस्कृती मुकुटविलासिनी
ज्ञानविज्ञानविद्याकलाशालिनी
महाकाव्यकथानाटकभूषिणी
नमनं नत शिरसा..

चूभूद्याघ्या - मला संस्कृत नीटसं लिहितादेखील येत नाही! ;)

थोडक्यात मुजिक डायरेक्शणच म्हणा ना! ;)

मी या ओळींना भैरवी रागाचा साज चढवला आणि सौ वरदा गोडबोले व डॉ राम देशपांडे या आजच्या तरूण पिढीतल्या अभिजात संगीत गाणार्‍या आघाडीच्या गायकांनी उत्तम तर्‍हेने गाऊन या ओळींचं आणि माझ्या चालीचं सोनं केलं.

डॉ राम देशपांडे यांनी पं यशवंतबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, पं उल्हास कशाळकर, पं यशवंत महाले यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली आहे. रामवर एखादा लेख मी लवकरच लिहिणार आहे. सौ वरदा गोडबोले यांच्यावर माझा विस्तृत लेख आपल्याला
इथे वाचता येईल. माझ्या अजूनही काही बंदिशी वरदाने गायल्या आहेत त्या मी यथावकाश जालावर चढवीन आणि त्याची माहिती इथे सवडीने देईनच!

या गाण्याला संवादिनीची साथ पं विश्वनाथ कान्हेरे यांनी केली आहे.

कान्हेरेबुवा हे
पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य. कान्हेरेबुवांची संवादिनीची साथसंगत अगदी ऐकण्यासारखी असते. फारच सुरेख! भारतातल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना बुवांनी साथ केली आहे. पं उल्हास कशाळकरांच्या साथीला नेहमी बुवाच असतात.

माझा बुवांशी अगदी चांगला परिचय आहे, हे मी माझं भाग्य समजतो. कधी बुवांच्या घरी गेलो की बुवा स्वतः प्रेमाने पिठलंभात करून वाढतील, आणि अगदी मनसोक्त पेटी ऐकवतील. 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी कोकणी शिवी देऊन 'बस रे, काय घाई आहे? एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील! ;)

तबल्याच्या साथीला धनंजय पुराणिक आहेत. आज नाट्यसंगीताच्या किंवा भजनाअभंगांच्या साथीला धनंजय पुराणिकच पाहिजेत असा आग्रह अनेक मोठे कलाकार नेहमी धरतात. मंडळी, हा धन्या पुराणिक आपला दोस्त बरं का. राहणारा डोंबिवलीचा. धन्याचं घराणं हे मूळचं कीर्तनकारांच्या परंपरेतलंच घराणं. धन्या स्वतः गातोही उत्तम! असो..

मंडळी, राग भैरवीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या मते राग भैरवी म्हणजे खुद्द आपली भारतीय संस्कृती! आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी! माझ्या तरी भैरवीबद्दल याच भावना आहेत. भैरवीबद्दल विस्तृतपणे एकदा केव्हातरी लिहिणारच आहे.

बराय तर मंडळी, अदितीताईंच्या वरील ओळी आपल्याला
या दुव्यावरून उतरवून घेता येतील आणि ते गाणे ऐकता येईल.

ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा हो! ;)

आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.

May 30, 2007

आकाशाशी जडले नाते..

राम राम मंडळी,

http://mr.upakram.ऑर्ग/ या नांवाचे एक संकेतस्थळ आहे. त्यावर शरद कोर्डे नांवाच्या सद्गृहस्थांनी http://mr.upakram.org/node/356 येथे एक चर्चाप्रस्ताव मांडला आहे. आम्ही त्याला एक प्रतिसाद लिहिला. परंतु उपक्रम हे संकेतस्थळ फक्त माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे संकेतस्थळ आहे, ही गोष्ट कोर्डे यांच्या चर्चाप्रस्तावाला प्रतिसाद देताना आमच्या लक्षात राहिली नाही. आम्ही जसं सुचेल तसं भावनेच्या भरात लिहीत गेलो. परंतु माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये भावनेला शून्य किंमत असते हे आमच्या ध्यानात यायला हवे होते ते आले नाही, ही आमची चूकच झाली. आता निवांतपणे मित्रांसोबत दोन पेग विदेशी व्हिस्की प्यायल्यावर ही चूक आमच्या ध्यानात आली आणि आम्ही त्वरीत तेथील प्रतिसाद काढून टाकून तो इथे आमच्या हक्काच्या जागेवर चिकटवत आहोत. एकतर कुठलीही माहिती लोकांना द्यावी इतका आमचा अभ्यास नाही, आणि काही देवाणघेवाण होण्याइतपत आमचे विचारही प्रगल्भ नाहीत! माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणार्‍या तद्न्य अन हुश्शार सभासदांच्या उपक्रमी मांदियाळीत आम्ही पूर्णत: unfit आहोत हेच खरे!

'तार्कीक कोडी' आणि 'ळ' कसा लिहावा यांसारख्या मोलाच्या चर्चेत आमचा प्रतिसाद म्हणजे ग्रहमालेच्या सभेत एखाद्या लहानश्या पिवळट बल्बने हजेरी लावण्यासारखे आहे! सबब आम्ही तो प्रतिसाद आता तेथून काढून टाकत आहोत व इथे देत आहोत. तो येथे हिरव्या अक्षरात देत आहोत! कोर्डेसाहेबांच्या चर्चेतील आम्ही संदर्भाकरता घेतलेली वाक्ये लाल अक्षरात देत आहोत.


आपणास माझ्या या किंचित् संशोधनाबद्दल काय वाटते?

लय भारी वाटते!

कोर्डेसाहेब, आपले चिंतन स्पृहणीय आहे. अश्या चिंतनातून बर्‍याचदा काही चांगलंच निष्पन्न होतं असा माझा विश्वास आहे.
आता थोड्या विस्ताराने संत तात्याबांचे भाष्य बरं का! ;)



आकाश (परिस्थिति?);

'आकाश' या शब्दाचा अर्थ 'परिस्थिती' या अर्थानेही काही वेळेला घेतला जातो ही कल्पना व्यक्तिशः मला अत्यंत सुंदर वाटते.

'एखाद्यावर आकाश कोसळले', 'आकाश भरून आले', 'मळभ दूर झाले', 'आभाळच फाटले तिथे ठिगळं काय लावणार?' या अर्थाची परिस्थितीशी निगडीत काही वाक्ये आपण बर्‍याचदा ऐकतो. एखाद्या माणसाच्या मानसिकतेचे वर्णन करताना 'आभाळाएवढं मोठं मन', आभाळासारखी माया' यासारखे शब्द वापरले जातात.


'आकाशी झेप घे रे पाखरा,
सोन्याचा पिंजरा'

'Sky is the limit' या इंग्रजी वाक्याचा अर्थ वरील दोन ओळीत फार व्यापकतेने सांगितला आहे असं मला वाटतं!
(मला काव्यातलं फारसं कळत नाही असं काही लोक म्हणतात तो भाग वेगळा! ;)


कोर्डेसाहेब, एकंदरीतच आभाळ ही फार सुरेख गोष्ट आहे. स्वच्छ निरभ्र आकाश, मळभ असलेलं आकाश, काळ्या ढगांनी भरून आलेलं आकाश, कातरवेळची पश्चिमेची लाली दाखवणारं आभाळ, ही आकाशाची सगळी रुपं कुठेना कुठेतरी मनाशीच निगडीत आहेत असं वाटतं. अवघं एक आकाशच आपल्याला खूप काही शिकवून जातं यात वाद नाही!

कोर्डेसाहेब, आकाश या शब्दाचा अर्थ निश्चितच खूप व्यापक असावा व म्हणूनच कदाचित थोरल्या आबासाहेबांसारख्यांच्या बाबतीत गगनाला मिठी मारणे, किंवा गगनभरारी, यांसारखे शब्द शोभून दिसतात!

'इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावेरी'

ओळीतलं माउलीला अभिप्रेत असलेलं आभाळ समजून घेणं ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं!
आपले महानोरसाहेब, मनाचीच एक अवस्था सांगतांना 'नभ उतरू आलं' असे शब्द लिहून जातात! 'पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेघ' यातली काजळाची दाट रेघ दाखवायला आशाताईंचाच स्वर हवा!

गदिमा स्वयंवराचं वर्णन करतांना,

'आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे,
झाले सीतेचे'

या ओळी लिहून जातात!

कोर्डॅसाहेब, वरील ओळींचे संगीतकार व आमचे मानसगुरू बाबुजी जायच्या आदल्या दिवशीच्या भकास संध्याकाळी आम्ही त्यांना भेटायला हिंदुजा रुग्णालयात गेलो होतो तेव्हा आमच्या मनाने भरून आलेल्या, अन् काळवंडलेल्या आकाशाचा अनुभव घेतला होता!

असो!

आपल्या या चर्चेच्या निमित्ताने आम्हालाही थोडे चिंतन करावेसे वाटले आणि हा चार ओळींचा प्रतिसाद लिहावासा वाटला! आकाश या विषयावर एखादा विस्तृत लेख लिहायचा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात होता. पण म्हटलं उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीत ते लेखन बसेल न बसेल! ;)

सदर चर्चेमुळे काही अंशी ही इच्छा पूर्ण झाली याबद्दल आपले आभार. अजूनही लिहिण्यासारखं बरंच काही आहे, पण सध्या इथेच थांबतो!


-- तात्या अभ्यंकर.



March 28, 2007

एक रंगलेला मधुकंस..

राम राम मंडळी,

आमच्या ठाण्याचे डॉ विद्याधर ओक, आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ओक यांचं घर मला परकं नाही. डॉ विद्याधर ओक यांच्यावर सवडीने एखादा विस्तृत लेख लिहिणारच आहे, आत्ता त्याबद्दल फार लिहीत नाही.


गेल्या वर्षीची गोष्ट. गोकुळअष्टमीचा दिवस होता. संध्याकाळच्या सुमारास मला आदित्य ओकचा फोन आला, "तात्या, जिवंत आहेस का? साडेआठ नऊच्या सुमारास माझ्या घरी पोच. गाण्याची मैफल आहे."


झालं! आपली काय चैनच झाली. मी ठरल्यावेळेला गाण्याची मैफल ऐकायला गेलो. अगदी घरगुती स्वरूपाची मैफल होती. गिने-चुने श्रोते, त्यातच मी एक. मैफल अगदी मस्तच रंगली होती. मंडळी, मोठ्या मैफलींची मजा वेगळी, पण खाजगी, घरगुती स्वरूपाच्या मैफली नेहमीच अधिक रंगतात हा माझा आजपर्यंतचा अनुभव. 'रंगमंच' हा प्रकार नाही, गवई आणि श्रोते एकाच सतरंजीवर. एखाद्या चपखल समेला अगदी गवयाचा हात हातात घेऊन दाद देता यावी असा हा संवाद असतो. ही मैफलही तशीच अगदी छान जमली होती.


"दरस मोहे राम" ही झपतालातली बंदिश. मधुकंस फार सुरेखच जमला होता. अगदी छान लयदार, आणि सुरेल काम सुरू होतं! कोण बरं गात होतं?


मंडळी, ती मैफल होती एका तरुणाची. विलक्षण प्रतिभावंत, अवलिया कलाकार पं वसंतराव देशपांडे यांच्या नातवाची. त्याचं नांव राहुल देशपांडे.


राहुल हा आजच्या तरुण पिढीतला एक उमेदीचा कलाकार. गाणं तर रक्तातच. पण राहुलला आजोबांकडून तालीम घ्यायचा कधी योग आला नाही. कारण राहुल अवघा तीन-चार वर्षांचा असतानाच वसंतराव गेले. पण जाताना तो प्रेमळ आजा आपल्या नातवाच्या डोक्यावर हात ठेवूनच गेला. वसंतरावांचा गाण्यातला वैभवशाली वारसा राहुलला मिळाला आहे हे खरंच. पण मंडळी, गाण्यात नुसता पिढीजात वारसा असून चालत नाही. गाणं हे जरी रक्तातच असलं तरी ते शिकावं लागतं, त्याला श्रवण, चिंतन, मनन याचीही पुरेपूर जोड लागते. शिक्षण, श्रवण, आणि सततचे चिंतन व मनन असेल तरच मुळात असलेला गानझरा अधिक प्रसन्नतेने वाहू लागतो, प्रवाही होतो. राहुलच्या बाबतीत असंच झालं.


राहुलमध्येही गाणं होतंच, पण त्यानेही किराण्याचे पं गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गाण्याची रीतसर तालीम घ्यायला सुरवात केली. गंगाधरबुवांनंतर, पं मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुलने तालीम घेतली. कुमारजींच्या शिष्या उषाताई चिपलकट्टी यांच्याकडेही राहुल जवळ जवळ सात वर्ष गाणं शिकला. अजूनही त्याचं संगीतशिक्षण सुरूच आहे. आजही तो कुमारजींचेच शिष्य पं पंढरीनाथ कोल्हापुरे, कुमारजींचे चिरंजीव पं मुकुल शिवपुत्र यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहे. परंपरेचं गाणं न गाणाऱ्या वसंतरावांच्या नातवाचा ओढा कुमारजींनी सुरू केलेल्या दुसऱ्या अपारंपरिक गानप्रवाहाकडे असणं हे साहजिकच आहे!


मी राहुलची परवाची मैफल ऐकली आणि त्याच्या गाण्यातला सच्चेपणा मला जाणवला. राहुलने मैफलीची सुरवात छायानट या रागाने केली. मंडळी, छायानट हा खास करून ग्वाल्हेर परंपरेत गायला जाणारा राग. या रागाचा मला अपेक्षित असणारा विस्तार राहुलने केला नाही, पण ती वेळेची घडी झाली असे आपण म्हणू. कुमारांच्याच भाषेत सांगायचं तर एखाद्या रागातून प्रत्येक वेळेला हवं तसं मनोगत व्यक्त करता येतच असं नाही. छायानट नंतर राहुलने मधुकंस सुरू केला आणि तिथे मात्र राहुल छान रमला. मधुकंस म्हणजे काय विचारता मंडळी! शृंगाररसातील मधुरता ज्याच्यात पुरेपूर भरली आहे असा मधुकंस! जमला तर भारीच जमतो बुवा. राहुलने मधुकंस मस्तच जमवलान. सुरवातीचा विलंबित झपताल आणि 'आजा रे पथिकवा' ही द्रुत बंदिश छानच रंगली होती.


'बनराई बोराय लागे'! ओहोहो, राहुलने मधुकंस नंतर 'सोहनी-बसंत' सुरू केला. त्यातलीच 'बनराई..' ही बंदिश. 'सोहोनी-बसंत' ही खास कुमारांची रचना. तसं पहायला गेलं तर सोहोनी आणि बसंत हे दोन्हीही दिग्गज राग. त्यांच्यात योग्य तो समतोल साधत हा जोड राग गाणं हे कठीणच. राहुलने मात्र ह्या रागांचं बेअरींग छानच सांभाळलंन असं म्हणावं लागेल. राहुलचा सोहोनी-बसंत ऐकताना मजा आली.


'सोहोनी-बसंत' नंतर राहुलने राजकल्याण रागातील 'ऐसी लाडलीकी..' ही द्रुत बंदिश सुरू केली. क्या बात है, राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच जमलं होतं. मंडळी, राजकल्याण ही खास वसंतरावांची खासियत. राजकल्याण म्हणजे पंचम विरहित यमन. तरीही राजकल्याणचं वेगळं असं चलन आहे आणि ते सांभाळूनच तो राग गावा लागतो. पंचम न लावता नुसताच यमन गायचा असा याचा अर्थ नव्हे! एकंदरीत राहुलचं 'ऐसी लाडलीकी' छानच चाललं होतं. जमून गेलं.


त्यानंतर राहुलने जनसंमोहिनी रागातली एक बंदिश म्हटली. हा राग मला व्यक्तिशः फारसा भावला नाही. कलावती रागात शुद्ध रिषभ, यापलीकडे मला तरी या रागात फारसं काही सापडलं नाही, जाणवलं नाही. सरतेशेवटी 'सुनता है गुरूग्यानी' या कुमारांच्या निर्गुणी भजनाने राहुलने मैफलीची सांगता केली. हे निर्गुणी भजनदेखील राहुलने अगदी तल्लीनतेने सादर करून श्रोत्यांना अंतर्मुख केलं. श्री समय चोळकर यांनी तबल्यावर आणि आदित्य ओक यानी संवादिनीवर अगदी रंगतदार साथ करून मैफलीत मजा आणली.


असो. मंडळी, एकंदरीत राहुल देशपांडे या माझ्या मित्राकडून मला बऱ्याच अपेक्षा आहेत. अगदी सुरेल गातो, ताला-लयीची अतिशय चांगली समज आहे. जे गातो ते स्वतःचं गातो, स्वतःच्या बुद्धीने गातो. त्याच्या गाण्यात मला विचारांचा, बुद्धीचा भाग बराच दिसला. सरगम गायकीवरही त्याची चांगली पकड आहे. आलापी सुरेल असून ताना निश्चितच खूप कल्पक आहेत. त्याचं गाणं अत्यंत प्रवाही आहे, सतत पुढे जाणारं आहे. बुद्धीवादी आहे. अर्थात ही त्याच्या आजोबांचीच खासियत. पण कधीतरी, कुठेतरी राहुलने आलापीतही जरा जास्त वेळ रमावं, त्यामुळे त्याचं गाणं अधिक समृद्ध होईल असं मला वाटतं. तानेतले, किंवा सरगमातले लहान लहान झरे, प्रवाह नक्कीच छान वाटतात, पण कधीतरी आलापीचा एखाद मोठा जलाशयही बघायला खूप सुरेख वाटतो. राहुलशी बोलताना ही बाब मी त्याला सांगितली होती, आणि त्यालाही ती पटली असावी असा माझा अंदाज आहे!
असो. आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!




मंडळी, राहुलचं गाणं ऐकून मला जे जाणवलं ते मी इथे मोकळेपणानी लिहिलं आहे. त्याच्यातली मला जाणवलेली सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 'मी वसंतरावांचा नातू आहे म्हणून मला मोठं म्हणा' असा भाव त्याच्याकडे मुळीच नाही. वास्तविक एवढ्या मोठ्या गायकाचा नातू म्हणजे लोकांच्याही अपेक्षा बऱ्याच असतात. त्याचं दडपण राहुलला येत नसेल, असंही नाही. पण त्याच्या गाण्यातून ते मला जाणवलं नाही. तो जे काय गातो ते अगदी सहज आणि त्याचं स्वतःचं गातो. आणि मंडळी, मलातरी हीच गोष्ट मोठी वाटते. अर्थात, त्याच्या गाण्यात वसंतरावांचा ढंग निश्चितच आहे. आणि ते साहजिकही आहे. पण जे काय आहे ते अस्सल आहे. कुठेही नक्कल नाही.

असो, राहुलला त्याच्या भविष्यातील गानकारकीर्दीकरता मी अनेक अनेक शुभेच्छा देतो, सुयश चिंतितो. आज राहुलचं वय अवघं २७-२८ वर्ष आहे. अजून त्याला गाण्यात खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे आणि अधिकाधिक उत्तम गायचं आहे. या सगळ्याकरता त्याला अगदी मनापासून शुभेच्छा! आज मी राहुल देशपांडेची मैफल ऐकली, अजून ३० वर्षांनंतर मला पं राहुल देशपांडे यांची एखादी जबरदस्त रंगलेली मैफल ऐकायला मिळावी हीच सदिच्छा! ;)

मला घाई नाही, मी थांबायला तयार आहे. कारण मला बऱ्याच आशा आहेत!
--तात्या अभ्यंकर.

March 20, 2007

आणि दीपस्तंभ ढासळला...

राम राम मंडळी,

ही गोष्ट असेल १९९०-९१ सालची. मी तेव्हा प्रभादेवी येथे असलेल्या जी एम ब्रेवरीज या सरकारमान्य देशी दारूच्या कंपनीत लेखा विभागात नोकरी करत होतो. नोकरी, गाणं, खाणं, मित्रमंडळी असं अगदी झकास आयुष्य सुरू होतं. (तसं ते आजही सुरू आहे म्हणा!;)

आमची म्हातारी अगदी सुगरण हो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या शौकाला अगदी घरातूनच खतपाणी मिळालं. घरी आईच्या हातचं अगदी उत्तम, सुग्रास खायला मिळायचंच, शिवाय बाहेरही कुठे काय चांगलं मिळतं अशी ठिकाणं शोधणे, त्या ठिकाणांना नियमितपणे भेटी देणे, हाही माझा एक छंदच. बरं, शिवाय गाणं ऐकण्याचाही शौक. त्या निमित्ताने बहुतेक शनिवार-रविवार अगदी यथास्थित गाणंही ऐकणं व्हायचं. चांगलं गाणं ऐकलं की खाणंही अधिक चवदार लागतं, आणि चांगलंचुंगलं खाऊन गाण्याची मैफल ऐकली की ते गाणंही अधिक सुरेल, लयदार वाटतं! असं हे गाण्या-खाण्याचं सुष्टचक्र! ;)

इथे काय अण्णांची मैफल आहे, चला! तिथे काय मालिनीबाईंचं गाणं आहे, चला! आज काय किशोरीताई, उद्या काय वीणाताई, परवा काय आमच्या उल्हासकाकांचंच गाणं आहे, चला! बरं गाण्याची मैफल संपल्यावर मित्रमंडळींबरोबर पुन्हा मग एकदा यथास्थित कुठेतरी खाणंही व्हायचं. आहाहा, काय तो अण्णांचा शुद्धकल्याण, किंवा काय किशोरीताईंनी आज सुरेख अहीरभैरव मांडलाय, क्या बात है असं म्हणत म्हणत गाण्यानंतर खादाडीही अगदी यथास्थित व्हायची. गाणं आवडल्याच्या आनंदात दोन घास जास्तच जायचे! ;)


तर मंडळी, असा अगदी सुखाचा काळ चालला होता. पण काही लोकांना मी संपादन केलेली शारीरिक माया बघवेना;) मग लागले मला सल्ले द्यायला. 'तात्या, अरे किती जाड्या झाला आहेस. जरा डाएट कर की. नाहीतर तरुण वयातच नाना व्याधी होऊन मरशील ना लेका फुक्कट!' असं घाबरवायचे. कॅलरीजची, आणि त्या प्रमाणातल्या श्रमांची, वजना-उंचीची आणि कसली कसली आकडेमोड करून दाखवायचे.
मग मंडळी, मी पण ठरवलं एक दिवस, की बास्स.. उद्यापासून माझं डाएट सुरू. अगदी मोजकंच खायचं, सात्त्विक खायचं. तिखट, तेलकट, मटण, मासे, पान, तंबाखू, सगळं बंद! गाणंही बंद. म्हणजे मग अनायसे खाणंही जास्त होणार नाही. हे सगळे मोह टाळायचे. बास्स ठरलं, आता दाखवतोच जगाला, तात्या काय करू शकतो ते!


दुसरा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून दुकानातून गायीचं दूध घेऊन आलो. म्हशीच्या दुधात फॅटस् जास्त असतात म्हणे. नकोच ते. सकाळचा चहाही प्यायलो नाही. फक्त अर्धा कप गायीचं दूध. तेही साखर न घालता. आईला काही कळेचना. तिने आदल्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचे तूप-गूळ घालून लाडू केले होते हो. मी ओरडलोच तिच्या अंगावर. "तुला कळत कसं नाही? मुलगा हवाय की नको? आजपासून माझं डाएट आहे. सकाळचा नाष्टाफिष्टा सगळं बंद. तू पटकन मला दोन फुलके आणि सोबत थोडी गाजराची कोशिंबीर, असाच डबा भरून दे. रात्रीही माझ्याकरता फक्त दोन फुलके आणि मुगाची कोशिंबीर एवढंच जेवण कर."

"अरे मग तुला हे तूप-गूळ-पोळीचे लाडू केले आहेत ते नकोत? असं काय रे करतोस. खा की रे एखादा!"
काय सांगू मंडळी, पाणी तरारलं हो त्या माउलीच्या डोळ्यात! देव काही कुठे फार लांब नसतो हो, आपल्या घरातच असतो! असो...


कार्यालयात पोहोचलो. आमचा दत्तोबा शिपाई माझा अगदी लाडका. तो चहा घेऊन आला. झालं! मी जवळ जवळ खेकसलोच त्याच्या अंगावर. "परत घेऊन जा हा चहा. नकोय तो मला. तू चहात साखर जरा जास्तच घालतोस. आणि हो, आजपासून मी चहा सोडला आहे. पुन्हा माझ्याकरता चहा घेऊन येऊ नकोस."
वाईट वाटलं हो बिचाऱ्याला. काही बोलला नाही, चुपचाप परत गेला. नेहमी प्रसन्न असणारा तात्या आज असं का वागला, हे कळेचना त्याला.

जरा वेळाने पुन्हा टेबलापाशी आला. एक झकासपैकी मोतीचुराचा लाडू माझ्यापुढे करत म्हणाला, "घ्या तात्या. लाडू घ्या. कालच माझ्या बहिणीचा साखरपुडा झाला."

लाडू पाहून माझ्या डाएटचं गळू पुन्हा एकदा ठणकायला लागलं होतं. पण ते गीतेत कुठेसं म्हटलं आहे ना, 'क्रोधात भवति संमोह.. का कायसं, म्हणून यावेळी मी क्रोध आवरला. तो बापडा आपल्या बहिणीचा साखरपुडा झाल्याबद्दल कार्यालयातील प्रत्येकालाच मोठ्या प्रेमाने लाडू वाटत होता हो. मी शक्य तितक्या सौम्य शब्दात त्याला म्हटलं. "अरे आजपासून मी डाएटवर आहे. मला फक्त त्यातला एक कण दे आणि तुझ्या बहिणीला माझ्या शुभेच्छा सांग".

तेवढ्यात माझा आणि दत्तोबाचा संवाद कुणीतरी ऐकला आणि "अरे तात्या डाएटवर आहे रेऽऽऽ..." असं आख्ख्या कार्यालयभर तो मनुष्य ओरडत सुटला. कसला कुत्सित हर्षोन्माद त्याला झाला होता कुणास ठाऊक! ;) सगळं कार्यालयच खी खी करत माझ्याकडे पाहून हसायला लागलं.

मी मात्र अगदी शांत होतो. एखाद्या दीपस्तंभासारखा!! मनातल्या मनात म्हणत होतो, 'देवा त्यांना क्षमा कर. ते कुणाला हसताहेत हे त्यांना कळत नाही.'

दुपार झाली. सगळ्यांनी आपापले डबे उघडले. शिवा माहिमकर हा माझा खास दोस्त. कार्यालयात माझ्या शेजारीच बसायचा. त्यानेही आपला डबा उघडला. माझं लक्ष नकळत त्याच्या डब्याकडे गेलं. शिवाच्या डब्यात सुंदरशी बैदाकरी दिसत होती.

"काय तात्या, बैदाकरी खाणार काय? मस्त आहे एकदम."

एक नाही, नी दोन नाही. मी शिवाला काहीच उत्तर दिलं नाही. चुपचाप माझा डबा उघडला. बघतो तर काय? दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर तर होतीच, पण शिवाय बेसनाच्या दोन वड्याही होत्या. कालच आईने केल्या होत्या. 'मुलगा फक्त अर्धा कप दूध पिऊन कामावर निघालेला, शिवाय डब्यात फक्त दोन फुलके आणि गाजराची कोशिंबीर. कसं व्हायचं त्याचं?' राहवलं नसेल हो त्या माउलीला! म्हणून तिने माझ्या नकळत त्या वड्या डब्यात दिल्या असतील!

एकीकडे पोटातली खवळती भूक, आणि दुसरीकडे मारे 'तात्या, काय आहे हे जगाला दाखवूनच देतो' काय, नी 'दीपस्तंभासारखा उभा होतो' काय अशी सगळी पोकळ वाक्य! मारे डाएट करायला निघालो होतो, मोह टाळायला निघालो होतो.

'ख्रिस्ताला जमलं, बुद्धाला जमलं, आम्हीही हुरळून गेलो. पण ते दीपस्तंभ होते. आम्ही मात्र केरसुणीने समुद्राच्या लाटा परतवायला निघालो होतो!' हे गुरुवर्य भाईकाकांच्या 'तुझं आहे तुजपाशी' नाटकातलं एक वाक्य उगाचच आठवून गेलं!

मंडळी खरं सांगतो, आईने डब्यात दिलेल्या, छानशी चारोळीची तीट लावलेल्या त्या बेसनाच्या वड्या पाहिल्या आणि अगदी भरून आलं हो. भूकसुद्धा अगदी फारच लागली होती. बास्स! पुरे झाली ही डाएटची थेरं असं मनाशी म्हटलं आणि, आणि....

दीपस्तंभ ढासळला.........!! ;)


"दत्तोबाऽऽऽ.." अशी मोठ्याने हाक मारली. "कुठायत ते मगासचे लाडू? घेऊन ये मला."

"शिवा, तुझा डबा आण इकडे, त्यातली बैदाकरी मला या फुलक्यांबरोबर खायची आहे."

"दत्तोबा, हे एवढेसे दोन फुलके मला पुरणार नाहीत. समोरच्या हॉटेलमधून गरमागरम पुरीभाजी माझ्याकरता बांधून घेऊन ये. त्याला म्हणावं, "पुऱ्या जरा छान लालसर तळ."

आणि काय सांगू मंडळी, ते मगासचं सुतकी वातावरण क्षणात बदललं. जिवाचा जीवलग शिवा मला म्हणाला, "अरे तात्या, सगळी बैदाकरी संपवलीस तरी चालेल रे!"

फुलक्यांबरोबर बैदाकरी हाणली. सोबतीला गाजराची कोशिंबीर छान लागत होती! ;) दत्तोबाने पुरीभाजी बांधून आणली. ती उडवली. मोतीचुराचा लाडू खाल्ला, आईने दिलेल्या बेसनाच्या वड्या खाल्ल्या! घरी फोन लावला, "आई, रात्री मी व्यवस्थित जेवणार आहे. तू सगळं जेवण कर. सोबतीला थोडी शेवयांची खीरही कर!"

लंचटाइम संपला. दत्तोबाने आणलेल्या बनारसी १२० जाफरानी पत्तीच्या पानाचा तोबरा भरला, आणि "पियू पलन लागी मोरी अखिया" ही गौडसारंग मधली बापुराव पलुसकरांची बंदिश गुणगुणत पुन्हा कामाला लागलो. सकाळी आकडेमोड करण्याकरता कॅल्क्युलेटर लागत होता, आता मात्र पटापट तोंडीच हिशेब जमत होते!

दीपस्तंभ ढासळला होता, पण आत्माराम शांत झाला होता.....

-तात्या अभ्यंकर.

March 19, 2007

आणि वेलणकर सुधारला!

"प्रशसकीय अनुमतीच्या" विरोधात मनोगतावर आम्ही बंड केलं, आणि तिकडचं आमचं लेखन, आमचे प्रतिसाद, आणि आमचे 'विसोबा खेचर' हे खाते प्रशासकाला बंद करायला सांगून आम्ही स्वत:च आमचा बळी दिला.

"प्रशासकीय अनुमतीच्या" विरोधात आम्ही शक्य त्या सर्व ठिकाणी बोंबबोंब आणि शिविगाळ केली. आणि शेवटी वेलणकर सुधारला!! नाक घासत वठणीवर आला..;)

आमच्या काही मनोगती मित्रांकडून "प्रशासकीय अनुमती" चा हलकटपणा बंद झाल्याचं कळलं आणि एक माजी मनोगती म्हणून आम्हाला आनंद झाला!

लेखन आणि त्याला उत्स्फुर्तपणे दिले गेलेले प्रतिसाद आता लगेच प्रसिद्ध होतील आणि नीरस, निर्जीव झालेलं मनोगत पुन्हा जीवंत होईल अशी आम्हाला आशा आहे!

सध्या आम्ही मायबोलीवर सुखाने नांदत असून, मनोगतावर आम्ही यापुढे कधीही नसू. पण भविष्यातही मनोगताच्या अस्तित्वाकरता वेलणकराने मालकी मुजोरी सोडून असंच ताळ्यावर रहावंन हीच इच्छा!

वेलणकरा, सुधारलास आणि वठणीवर आलास याचं बरं वाटलं रे भाड्या...;)

फोकलीच्या वेलणकरा, एक तात्या गेला म्हणून तुला काहीच फरक पडत नाही आणि मलाही काहीच फरक पडत नाही. पण भविष्यात मनोगतावरील असेच काही वेडझवे कोकणी तात्या जाऊ देऊ नकोस रे! त्यांच्या आरत्या नक्कीच करू नकोस, पण त्यांना जप!

कधीकाळी तुझ्या मनोगतावर भरभरून प्रेम केलं होतं, मिसळीची ठिकाणे, लाडवांच्या, नाष्ट्यांच्या मनोगतीय स्पर्धा यासारखी मनसोक्त धमाल केली होती म्हणून या दोन ओळी...

चल, काळजी घे आणि खूप खूप मोठा हो!

तुझा,
तात्या.