August 29, 2006

दामू-गोविंदा जोड रे...

राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला,
"तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
--तात्या अभ्यंकर.

1 comment:

Anonymous said...

बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."

तात्या, फारच सुरेख!

-चिन्मय.