नमस्कार मंडळी,
आता लवकरच गुरूपौर्णिमा येईल. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती.
२००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते. मी बाबुजींच्या घरी फोन लावला. फोनवर सौ ललिता मावशी (बाबुजींची पत्नी) होत्या. तेव्हा मला समजलं की बाबुजींना हिंदुजा रुग्णालयांत दाखल केले आहे. मी लगेच हिंदुजाला जायला निघालो तर त्या मला म्हणाल्या की ते अत्यवस्थ आहेत, तेव्हा तू आत्ता लगेच नको येउस, बऱ्याच तपासण्या सुरू आहेत, संध्याकाळी ये.
संध्याकाळ होईपर्यंतचा काळ मी खूप अस्वस्थतेत काढला. अनेकवेळा त्यांच्याघरी मी गेलो होतो. त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडे जेवलो होतो. ते घरांत नसले की ललिता मावशींकडून त्यांच्या खूप आठवणी ऐकल्या होत्या. काही काही वेळेला बाबुजी मूड मध्ये असले की माझी चेष्टाही करायचे. म्हणायचे, "मग काय पंडितजी, आम्हाला तुमच गाणं केव्हा ऐकवणार? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडसं..!"
संध्याकाळी हिंदुजात गेलो. पण दुर्देव! बाबुजी कोमात गेले होते. बाहेरच व्हरांड्यात श्रीधरजी भेटले. त्यांनी खुणेनंच आंत जा असं सांगीतलं. मी घाबरतच आय. सी. यू. त गेलो. मला खूप भरून आले होते. आंत जाऊन पाहतो तर बाबुजी जवळजवळ मरणशय्येवरच विसावले होते. तात्यारांव सावरकरांचा हा शिष्य हळूहळू शांत होत होता. आता जीवनाशी झगडा संपत आला होता. मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली.
बाहेर आलो, ललितामावशींजवळ थोडा वेळ बसलो. काही सुचेना. एकटाच बाथरूममध्ये जाऊन हमसाहमशी रडलो.
अचानक माझ्या एका मित्राची मला आठवण झाली. तो दादरलाच रहायचा. मला नेहमी म्हणायचा, "तात्या लेका इतक्यावेळा बाबुजींकडे जातोस, मला पण ने की केव्हातरी त्यांच्या घरी. पण नेहमी जाऊ जाऊ म्हणता ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून. मी त्याला फोन केला आणि बोलावून घेतले हिंदुजामध्ये. तो लगेच आला, मी त्याला सर्व कल्पना दिली. तो मला एवढंच म्हणाला, "तात्या, खूप उशीर केलास रे तू"....!!!!
तात्या.
1 comment:
तुम्ही फारच नशिबवान आहात तुम्ही की तुम्हाला बाबुजीनचा सहवास लाभला.
Post a Comment