September 01, 2010

प्रिय राहुल देशपांडे,

प्रिय राहुल देशपांडे,

(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,

मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही. स्वत:च्या बुद्धीने गातोस, कसदार गातोस, जमून गातोस.

तीनेक वर्षांपूर्वी प्रथमच तुझी संपूर्ण मैफल मी ऐकली होती आणि दाद देण्याकरता हा लेखही लिहिला होता.. असो.

अभिषेकीबुवा आणि वसंतराव यांनी अमर केलेलं, मराठी संगीत रंगभूमीला नवसंजिवन देणारं, नवचैतन्य देणारं 'कट्यार..' तू करायला घेतलंस तेव्हा तर मला तुझा अभिमान वाटला होता, आजही वाटतो.. 'कट्यारच्या..' एखाददोन तालमींनाही मी हजर होतो..

पण.......

दोनच दिसांपूर्वी मी सहज म्हणून मी झी मराठी सुरू केला आणि मला दु:खद धक्का बसला. मराठी झी सारेगमप मध्ये तू चक्क परिक्षक?? इतकी कशी काय तुझी अधोगती? आणि ती ही अशी अचानक?

मान्य करतो, तिथे जी मुलं गायला येतात ती आपापल्या परिने गुणी असतात. संगीतात काही एक प्रयत्न करणारी असतात, धडपडणारी असतात. अरे पण तुला हे माहित्ये का?(माहिती असेलच नक्की) की तो केवळ एक संगीताचा बाजार आहे? तिथे परिक्षकांच्या मताला पूर्ण किंमत नसते. तिथे अर्धअधिक राज्य हे प्रेक्षकांच्या/श्रोत्यांच्या मतांचं असतं आणि पर्यायाने झी आणि आयडिया सेलच्या आर्थिक राजकारणाचं असतं..

सन्माननीय परिक्षक या नात्याने आणि न्यायाने तू तुझ्या सांगितिक ज्ञानानुसार, अनुभवानुसार एखाद्या स्पर्धकाची गुणवत्ता तपासणार.. परिक्षक या नात्याने जर तुला तो योग्य वाटला, तुझ्या पसंतीस उतरला तर तू त्याला 'क्ष' गुण देणार.. पण कुणीही चार आंडुपांडू श्रोते/प्रेक्षक दुस-याच एखाद्या स्पर्धकाला एसएमएस पाठवून '४क्ष' गुण देणार..!

मला सांग, यात काय राहिली तुझी किंमत? झी मराठी आणि आयडियाला त्या स्पर्धकांशी किंवा तुझ्या गुणग्राहकतेशी काहीही देणंघेणं नसून त्यांचा मतलब आहे तो त्या चार आंडुपांडूंनी पाठवलेल्या एसएमएसशी...!

राहुल देशपांडे म्हणजे नुसतं एक शोभेचं बाहुलं..?

अरे काय रे हे? केवळ एसएमएसच्या अर्थकारणाकरता जी स्पर्धा चालते किंवा जिचे निकाल मॅनिप्युलेट होऊ शकतात अश्या स्पर्धेचा तू एक परिक्षक?

कुणी म्हणेल - एसएमएस पाठवतो तो जनता जनार्दन..!

मान्य.. अगदी मान्य..! साक्षात नारायणराव बालगंधर्व त्यांचा उल्लेख 'मायबाप' असा करायचे..! पण जनता जनर्दनाचं काम दाद देण्याचं, कौतुक करण्याचं. गांभिर्याने जर एखादी सांगितिक स्पर्धा सुरू असेल तर स्पर्धकांना मार्क देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत, जाणकार परिक्षकांचा..! केवळ एक बटण दाबून एसएमएस पाठवून जनता जनार्दनाला तो अधिकार प्राप्त झाला आहे असं तुला खरोखरच वाटतं का? (तसं वाटत असेल तर या माझ्या पत्राचं काही प्रयोजनच नाही.. मी हे पत्र बिनशर्त मागे घेतो आणि तुझी क्षमा मागतो)
अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती?

तू कसा काय असा झी मराठी आणि आयडियाच्या बरबटलेल्या सिस्टिमचाच एक भाग झालास?

अरे तेवढाच जर फावला वेळ तुझ्याकडे असेल तर स्वत:चं गाणं कर की.. खूप चांगला गातोस, अजूनही चांगला गाशील. वसंतराव, भीमण्णा, कुमार यांची नावं घेतली की संगीत म्हणजे 'स्काय इज द लिमिट..' हे मी तुला सांगायला नको.. कर की जरा चिंतनमनन. अजूनही कर की जरा मिळालेल्या तालमीचा वैचारिक आणि रियाजी रवंथ..!

दोन सूर धडपणे नाही गाता आले तर लगेच कालपरवाच्या पोरांची नसती कौतुकं, फजिल लाडावलेलं निवेदन, स्पर्धकांचे आणि त्यांच्या मायबापसांचे रुसवेफुगवे, सारी जाहिरातबाजी, शोबाजी असलेल्या आणि मुख्य म्हणजे एसएमएसच्या अर्थकारणाने बरबटलेल्या झीमराठी आणि आयडियाच्या वाममार्गाला कसा काय लागलास बाबा तू?!

तू एक उत्तम गवई आहेस, याचं कारण तू एक उत्तम शिष्य आहेस, गाणं टिपणारा आहेस..वसंतराव, कुमारजी, आणि अवलिया मुकुल शिवपुत्रांची परंपरा तुला लाभली आहे. मला सांग - वसंतराव, कुमारांनी केलं असतं का रे असं धेडगुजरी परिक्षकाचं काम? ज्यांना चिंतन-मनन करायला दिवसातले २४ तासही कमी पडत अश्या कुमारांचा वारसा ना तुझा?

मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..!

असो..

जे काही वाटलं ते मोकळेपणी लिहिलं.. वरील सर्व मतं माझी व्यक्तिगत मतं आहेत तरीही ती तुला कळवाविशी वाटली.. एक सामान्य श्रोता म्हणून मी नेहमीच तुझा चाहता राहीन. तुझ्या 'मुख तेरो कारो..'च्या यमनकल्याणचा, 'दीप की ज्योत जले..' च्या धनबसंतीचा नेहमीच भुकेला राहीन.!

तुझा,
तात्या.

8 comments:

हेमंत पोखरणकर said...

...तेव्हा आम्हांलाही बसलेल्या धक्क्याला शब्द मिळत नव्हते...आता मिळाले.

हेमंत पोखरणकर said...

...तेव्हा आम्हांलाही बसलेल्या धक्क्याला शब्द मिळत नव्हते...आता मिळाले.

Anonymous said...

मला यात चुकीचे घडले असे वाटत नाही.राहुलच्या प्रेझेंटेशनला यातून आणखी परिमाण मिळू शकते.

Deepak Parulekar said...

तात्यानू,

एकदम बरोबर लिवल्यास, खरोखर मला राहुल देशपांडे सारख्या गवयाला तिथे परिक्षक म्हणुन बघवत नाही...

Milya said...

मला हे पटत नाही. यात 'राहुल देशपांडे' यांची काय चूक?

मान्य आहे हा सगळा बाजार मांडलेला आहे झी टी.व्ही, ने ज्याचा प्रत्यय मागच्या "लिटिल चॅम्प्स" च्या वेळेस आलाच. नाहीतर निकाल वेगळाच लागला असता हे कुणीही अमान्य करणार नाही. तरीसुद्धा या मुलांना, उद्याच्या गायकांना प्रोत्साहन द्यायला व मार्गदर्शन करायला ही मोठ-मोठी गायक मंडळी परिक्षक म्हणून अशा कार्यक्रमात भाग घेत असतात. आज पर्यंत नामांकीत शास्त्रीय संगीतातले दिग्गज या कार्यक्रमात आपली हजेरी लावून गेले आहेत. नावं घ्यायला बसलो तर हे संपूर्ण पान सुद्धा कमी पडेल. त्यानां तुम्ही का जाब नाही विचारला? का ते सगळे बाजार मांडुन बसले आहेत?

टी.व्ही हे एक जबरदस्त आणि प्रखर माध्यम आहे. आज आपल्याला बरेच गायक या अशा कार्यक्रमातून मिळाले आहेत हे सत्य नाकारुन चालणार नाही.

राहुल सारखे परिक्षक या मुलांना उत्तम मार्गदर्शन करु शकतात. असा एखादा कार्यक्रम बघितल्यावर कुणी सांगावं किमान १०० मुलांना शास्त्रिय संगीतामधे गोडी निर्माण होइल व कदचित त्यातलीच १० मुलं शास्त्रिय संगीत शिकण्यासाठी प्रवृत्त होतील. त्या दहातला एखादा गुणी कलाकार, गायक जन्माला येइल. हे श्रेय जितके त्या कलाकाराचे तितकेच राहुलसारख्या गुणी कलावंताचे, परिक्षकाचे.

समसच्या जमान्यात खर्‍या कलाकारांवर अन्याय होतो हे मान्य, पण म्हणुन राहुलसारख्या कलावंताने परिक्षक म्हणुन न येणं हे सुद्धा काही उचित नाही. राहुल एक जबाबदार कलावंत आहे, एक प्रयोगशीलता त्याच्यामधे आहे. कुठल्याही एका घाराण्याच्या पठडीत न राहता नव्या नव्या संकल्पना त्याच्या अंगी तो जोपासत असतो. त्यासाठी जर त्याला एखाद्या कार्यक्रमामधे परिक्षक म्हणुन आमंत्रित केलं तर तो त्याचा व त्याच्या कलेचा सन्मानच असेल.

असो, हे झालं माझं मत.

धन्यवाद

मिलिंद प्रधान

निळकंठ said...

मुकुल शिवपुत्र यान वर सुद्धा लिहा की.त्यांच्या बद्दल बरेच ऐकलंय सांगण्यासारखे आणि न सांगण्या सारखे सुद्धा तसेच रशीदखान यान बद्दल पण ऐकलंय,बरेच!!!
नक्की किती खरे आणि किती खोटे माहित नाही.