राम राम मडळी,
'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे ही आमची पंढरी आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, अर्थात आमचे अण्णा हे त्या पंढरीतले विठोबा... आजवर अनेक वर्ष, अनेकदा त्या वास्तूत गेलो. अण्णांशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांचा सहवास लाभला. अगदी त्यांच्या घरी बसून त्यांचं गाणं ऐकता आलं, चार गोष्टी शिकायला मिळाल्या. वत्सलाकाकूही तेव्हा हयात होत्या. त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा...
अण्णांची लेक शुभदा, मुलगा श्रीनिवास हेही आपुलकीने स्वागत करायचे. मी एकदोनदा खुलासा करण्याचा प्रयत्न केला परंतु 'ठाण्याचे अभ्यंकर' हे मुंबैच्या हायकोडतात वकील आहेत ही अण्णांची समजूत आजही कायम आहे!
गेल्या बरेच दिवसात अण्णांकडे फारसे जाणे झाले नाही. काही वेळा सवड होती परंतु मुद्दामच गेलो नाही.. कारण म्हणजे अण्णा अलिकडे वरचेवर आजारी असतात. प्रकृती बर्याचदा खालावलेली असते. गात्र थकली आहेत. वयोमानही आहे त्यामु़ळे खरे तर एक सारखे कुणी ना कुणी भेटायला येणार्यांचा त्यांना आताशा उगाचंच त्रास होतो. हेच जाणून पुण्याच्या फेरीत मीही त्यांच्याकडे जाण्याचं टाळतो. त्यांना त्रास होऊ नये, आराम करू द्यावा इतकाच हेतू..
परंतु साधारण महिन्याभरापूर्वी एकदा अगदीच राहावले नाही म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी गेलो होतो. अगदी दोनच मिनिटं त्यांच्यापाशी बसायचं आणि पाया पडून निघायचं इतकंच ठरवलं होतं..काका हलवायाकडची त्यांची आवडती साजूक तुपातली जिलेबी सोबत घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या नातीनं मला आतल्या खोलीत नेलं. अण्णा खाटेवर पडूनच होते. निजलेल्या माणसाला नमस्कार करू नये म्हणतात. मी नुसताच त्यांच्या उशापाशी बसलो. त्यांना आताशा फारसं बोलवतही नाही..मी त्यांचा हात हातात घेतला, हलकेच दाबला.
"अण्णा, थोडी जिलेबी आणल्ये आपल्याकरता. कशी आहे तब्येत? काळजी घ्या.."
अण्णांनी डोळ्यातूनच ओळख दिली.. माझ्या डोळ्यासमोर सवाईगंधर्वात शेवटच्या दिवशी सकाळी ५-१० हजार श्रोत्यांसमोर, मागे विलक्षण सुरेल झंकारणारे चार तानपुरे घेऊन मंत्रमुग्ध करणारा तोडी गाणारे भीमसेन दिसू लागले आणि अगदी भरून आलं..! तिथे अधिक काळ बसवेना. शिवाय तिथे बसून अण्णांनाही उगाच त्रास देणं उचित नव्हतं..पुन्हा एकदा त्यांचा हात हातात घेतला, थोडे खांद्याचे बावळे दाबून दिले, पाउलं चेपून दिली. खूप कृतकृत्य वाटलं, समाधानी वाटलं आणि मी त्यांचा निरोप घेतला.
त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत होतो तोच दुसरे एक सत्तरीच्याही पुढे वटणारे गृहस्थ आत येत होते.. त्यांचा चेहेरा चांगला ओळखीचा वाटत होता..त्यांनी मला हसून ओळख दिली व ते आतमध्ये गेले.
'कोण हे गृहस्थ?!'
मला चटकन ओळख लागेना, नाव आठवेना. एक नक्की आठवत होतं, हे गृहस्थ अण्णांच्या अगदी घरोब्यातले आणि त्यांच्या गाण्याचे प्रेमी..त्यांच्याच गावाकडचे. अण्णांच्या बैठकीत अनेकदा भेटलेले.. मुंबैत अण्णांचं कुठेही गाणं असलं की गाण्याआधी ग्रीनरूममध्ये आम्ही ठराविक डोकी नेहमी भेटत असू..अगदी न चुकता. इतकी की अण्णांच्या एका मैफलीकरता मी थोडा उशिराने ग्रीनरूममध्ये पोहोचलो तेव्हा मला पाहून पेटीवाले तुळशीदास बोरकर थट्टेनं म्हणाले होते, "चला, तुम्ही आलेत. आता कोरम पुरा झाला!"
मग ग्रीनरूममधलं गाण्यापूर्वीचे ते धीरगंभीर अण्णा. "नानजीभाई, पान जमवा पाहू.." असं नाना मुळेंना म्हणणार. तानपुरे लागत असणार. "हम्म.. पटकन जुळवा तानपुरे. छान जुळवा.." असं अण्णा म्हणणार. मग कधीमधी मीही घाबरत घाबरत त्या तानपुर्यांचे कान पिळायचा.. मग मी लावलेल्या तानपुर्याकडे नीट कान देउन अण्णा त्यात सुधारणा सुचवणार.. "हम्म.. खर्ज बघा जरा.. त्याची जवार का बोलत नाही नीट?!"
खूप आठवणी आहेत त्या मैफलींच्या..! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..
तर 'आता भेटलेले हे गृहस्थ कोण?' असा विचार करताच थोड्याच वेळात आमची बत्ती पेटली. अरे हे तर कानडी मुलुखातलेच कुणीसे आप्पा..रामण्णाच्या परिवारातले..!
रामण्णा..! कोण बरं हे रामण्णा?
आणि क्षणात माझं मन १९८० च्या दशकात घडलेल्या एका प्रसंगाशी येऊन थांबलं..हा प्रसंग मला थोर व्याख्याते व माझे ज्येष्ठ स्नेही स्व. वसंत पोद्दारांनी सांगितला होता..
अण्णा तेव्हा सार्या भारतभर दौरे करत होते, गाणी करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. वेळ असेल रात्री दोनची वगैरे. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लौकरच ते एका गावात शिरले. साथिदारांना कळेचना..!
"आमचे एक गुरुजी येथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटूया..!"
साथिदारांना पुन्हा काही पत्ता लागेना. गावात सामसूम. थोड्या वेळाने एक अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपट ठोठावलं..कुणा एका वयस्क बाईनं दार उघडलं.. चिमणी मोठी केली. त्या खोपटात एका खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. तोच रामण्णा..! अण्णा त्याच्यापाशी गेले.. त्याला हात देऊन बसता केला.. 'काय, कसं काय? ओळखलं का? बर्याच दिवसांनी आलो, अलिकडे वेळच मिळत नाही..' असा त्याला कानडीतनं खुलासा केला.. मग रामण्णाही ओळखीचं हसला..जरा वेळाने अण्णांनी अक्षरश: त्याच्या पायावर डोकं ठेऊन त्याला नमस्कार केला अन् खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्याच्या हातात दिलं.. आणि त्याचा निरोप घेतला..
साथिदार मंडळींना हा प्रकार काय, हेच कळेना तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -
"येथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपासचं) मी तेव्हा बेवार्शी राहायचा. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपत असे. तेथेच रेल्वेच्या थंड पाण्याने अंघोळ आदी आन्हिकं उरकायचो. खिशात दमडा नव्हता. घरातनं पळालो होतो. कानडीशिवाय अन्य कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पात्तळ उसळ अन् चपात्या असं विकत असे. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख दिली त्याला. तसा अशिक्षितच होता तो.."
"उसळ-चपाती पाहिजे काय?" असं मला तो विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.
"तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"
"घरी माझी आई जी काही कानडी भजनं अभंग गायची तेवढीच मला येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"
"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तो पर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. जेवायला पाहिजे ना? मग गाऊन दाखव बघू काही! तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?!"
गाडी पुन्हा भरधाव परतीच्या वाटेवर लागली होती.. साथिदार मंडळी गप्प होती.. धीरगंभीर चेहेर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..
रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..!
-- तात्या अभ्यंकर.
3 comments:
Phaar sundar, gahivaroon aale...
kyaa baat hai !
मी एक भजन ऐकले होते फार दिवसांपुर्वी भिमसेन व लता चे एकत्र. हिंदी मधुन होते व अप्रतिम होते. राम नाम राम नाम असे ते होते. नंतर कधीच ते ऐकायला मिळाले नाही.
तात्या आपला ब्लॉग व लिखाण मनोवेधक आहे. आपला फॅन झालो मी.
Post a Comment