सुरवातीलाच सारंगी. भाईकाकांच्या भैय्या नागपुरकराच्या भाषेत सांगायचं तर 'कलिजा खल्लास करणारी जीवघेणी सारंगी..!' 'नी़ नी़सा धसा..' ने संपणारा दीदीचा केवळ अशक्य आलाप - तकदीरचा मारा असलेल्या कुणा आनंदबाबूला घायाळ करतो अन् त्याचे पाय थबकतात..! सुरांचा तो प्यासा त्या तोडीच्या झर्याच्या शोधात माडी चढतो..!
'रैना बिती जाए..!' - पंचमदांची अद्भूत प्रतिभा अन् दीदीचा स्वर.. हिंदुस्थानी सिनेसंगीतातलं एक माईलस्टोन गाणं जन्म घेत असतं..!
संतूर, गिटार, आणि केहेरव्याचा वजनी ठेका.. सारंच भन्नाट..!
'निंदीया ना आए..' - तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत फक्त पंचमच टाकू शकतो. अन्य कुणाची ना तेवढी हिंमत, ना तेवढी प्रतिभा. खूप खूप मोठा माणूस..!
दुर्दैवाने घरात सुख न लाभलेला आमिरजादा आनंदबाबू आणि सुरांची मलिका असलेली त्याची पुष्पा..! 'आय हेट टियर्स, पुष्पा..!' असं म्हणणारा आनंदबाबू. शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला, तिला प्रेमाने हलवा-पुरीची फर्माईश करणारा आनंदबाबू..! कोठेवालीचा व्यवसाय करणारी पुष्पा - जिच्या घरात नेहमी पूजा-फुलांनी मढलेला देव्हारा अन् सोबतीला रामकृष्ण परमहंसांची तसबीर..!
शब्दांचं प्रेम, स्वरांचं प्रेम, अमरप्रेम..! काय चूक, काय बरोबर हे ज्यानं-त्यानं ठरवू देत.. आमचा मात्र सलाम त्या दीदीला, त्या पंचमला, त्या आनंदबाबूला अन् शर्मिला टागोर नामक त्या पुष्पा कोठेवालीला..!
-- तात्या अभ्यंकर.
1 comment:
शॉ...ल्...ली...ड दादा
Post a Comment