किनारे किनारे.. (येथे ऐका..)
कुमारांची एक छान रंगलेली मैफल. कुमार रंगून गात आहेत आणि श्रोते तेवढ्याच रसिकतेने दाद देत आहेत अशी ही मैफल..
राग सुरू आहे अर्थातच यमन..!
'किनारे किनारे किनारे किनारे दर्या...' ही यमनातली पारंपारीक बंदीश कुमार गात आहेत..
समोरच्या श्रोत्यांशी अगदी सहज संवाद साधावा, आत्मियतेचं काही बोलावं अश्या थाटात कुमार ही बंदीश गात आहेत.. क्या केहेने..! आमच्या कुमारांना यमनचं खूप कौतुक होतं, ते ही बंदीश ऐकताना अगदी जाणवतं..!
बर्याच दिसांनी भेटलेल्या एखाद्या सुहृदाच्या पाठीवर प्रेमाने, आपुलकीने सहज हात ठेऊन, " काय रे बाबा, कसा आहेस? ठीक ना सगळं?" असं विचारावं तशी ही बंदीश कुमार गात आहेत..! यमन म्हणजे प्रेमानं केलेली चौकशी, यमन म्हणजे आपुलकी..!
सुंदर लागलेले तानपुरे, मध्यलय म्हणावा असा जमलेला त्रिताल, 'किनारे.' या शब्दावरच्या जागा, गातानाच्या यमनातल्या लहानसहान हरकती-ताना, अगदी मोजून मापून घ्यावेत तसे लागणारे गंधार-पंचमासारखे एकेक सूर.. लयीवरची हुकुमत..! सगळंच लाजवाब..!
काय अन् किती लिहू यमनाबद्दल अन् या गाण्याबदल? माझे शब्द खूप तोकडे आहेत..
'किनारे..' शब्दावरचा गंधार दैवी आहे हो. खूप काही सांगून जातो हा गंधार..!
आज तूनळीवर फिरत असताना ही ध्वनिचित्रफित हाती लागली आणि मी एकदम देवासला पोहोचलो..
काही वर्षांपूर्वी देवासला कुमारांच्या घरी गेलो होतो त्याची याद आली..!
आज कुमार हयात असते तर पुन्हा एकदा त्यांना भेटलो असतो अन् 'किनारे..' या शब्दातल्या गंधारात जी आत्मियता आहे त्याच आत्मियतेने त्यांना विचारलं असतं,
" काय बुवा कसे आहात.."? " नाथ हा माझा" चं ओरिजनल "हारवा मोरा" ऐकवता का जरा?"..
-- तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment