March 22, 2011

सजदा..

माय नेम इज खान सिनेमातलं एक वेगळंच गाणं. सुफी संगीताची पार्श्वभूमी असलेलं..
(येथे ऐका)

रोम रोम तेरा नाम पुकारे
एक हुए दिन रैन हमारे..

मिश्र खमाज म्हणता यावा अशी गाण्याची खानदानी सुरवात. (चूभूदेघे.)

'सजदा..'

ख्यालसंगीताची उत्तम बैठक असलेला राहत फतेचा आणि रिचा शर्माचा अविष्कार. आवाजाची जात, फेक ही सारी सुफी गायकीत जमा होणारी. सुरवतीची बोल आलापी संपल्यानंतर गाणं छानशी लय पकडतं..

तेरी काली अखियोसे जिंद मेरी जागे
धडकन से तेज दौडू सपनो से आगे..

शब्द आणि त्यांचा लहेजा उत्तमच..

अब जा लुट जाए
ये जहा लुट जाए..

यातली 'जहा' शब्दावरची जागा आणि गायकी खानदानी..! इथून पुढे गाणं केरव्याची छान लय पकडतं...

'संग प्यार रहे मै रहू ना रहू...'

या ओळीतली सुरावट म्हणजे या गाण्याचा प्राण, त्याचं मर्मस्थान. 'संग..' शब्दातली 'रेम'म' संगती आणि 'रहू ना रहू..' मधली 'रेग, गमधपरेसा..' ही संगती केवळ अप्रतिम..! त्यानंतरचा 'सजदा..' चा कोरसही सुरेख. त्याच्या पार्श्वभूमीवरील सजदा शब्दाची तार शड्जाशी संगती करणारी बोल आलापी आणि गायकी उत्तमच..
रिचा शर्मा या गायिकेची जोडही उत्तम. बाईनं खानदानी आवाज लावला आहे. नक्कीच सुरेल आहे. ही दुगल गाण्याला आवश्यक आणि तेवढीच शोभूनही दिसणरी..

एकंदर पाहता गाण्याला लाभलेली अभिजात गायकीची बैठक नक्कीच कौतुकास्पद आहे..शंकर एहेसान लॉयचं कौतुक वाटतं..

रांझणा नैनो के तीर चल गये
साजना सासो दिल सिल गये..

यातला शुद्ध मध्यम नेहमीप्रमाणेच अद्भूत आणि सुख देणारा..



शाहरुख हा इसम आवडतो मला. लेकाचा तसा प्रो मुस्लिम आणि पाक-धार्जिणा वाटतो पण आवडतो मला. हा प्राणी टॅलेन्टेड आहे हे माझं मत. आणि आमच्या तनुजाच्या काजोलबद्दल काय बोलू? लै आवडते ती मला. हल्लीच्या नट्यांपैकी अभिनयाच्या बाबतीत एक तब्बू मला पयला नंबरवर आवडते आणि त्यानंतर काजोल. काजोलच्या चेहेरा विलक्षण बोलका आहे. तिचे यजमानही मला आवडतात. गंगाजल मध्ये छान काम केलं होतं त्यांनी..!

असो, सिनेमाच्या गप्पा पुन्हा केव्हातरी. तूर्तास सजदा हे गाण ऐका. छानच गाणं आहे..

-- तात्या अभ्यंकर.

No comments: