January 02, 2015

माझा वाढदिवसं...

आज म्हणे माझा वाढदिवस आहे..

एका वर्षाने वाढलो, अजून थोडा गधडा झालो... दुनियाही बदलली.. संगणक, मोबाईल, Tab, whatsapp सगळं काही आलं..

Moll आले, Multiplex आले.. सारं काही आलं.. बोलबोलता मुंबई पुणे express way ही झाला.. लहानपणी दिसणा-या केवळ फियाट आणि आम्बासेडर, या व्यतिरिक्त इतरही अनेक छान छान गाड्या दिसू लागल्या..

पण मी मात्र अजून मुंबई ब वर सकाळी ६ वाहता लागणा-या अण्णांच्या अभंगातच अडकलो आहे.. मी मात्र अजून बाबूजींच्या स्वर आले दुरुनी मध्येच अडकलो आहे..मी मात्र अजून भाईकाकान्च्या म्हैस आणि अंतू बर्व्यातच अडकलो आहे..

मी अजून शाळेतल्या त्या फौंटन पेन मध्येच अडकलो आहे..

माझे कान मात्र अजून सकाळी सात वाजता "सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत.." हे खणखणीत शब्द ऐकण्याकरताच आसुसले आहेत...

मला मात्र अजून सकाळी ११ वाजताचं कामगार विश्व ऐकता ऐकता जेवायचं आहे आणि शाळेचं दफ्तर भरायचं आहे..

मला प्रसन्न जोशी, निखिल वागळे कुणी कुणी नकोत.. मला आजही ते दाढीवाले अनंत भावे आणि प्रदीप भिडेच माझे वाटतात..

मी आजही आसुसलो आहे सुहासिनी मुळगावकरने सादर केलेल्या गजरा ह्या कार्यक्रमाकरता..

मी मात्र आजही अडकलो आहे संध्याकाळी मुंबई ब वर फक्त १५ मिनिटं लागणा-या घाल घाल पिंगा वा-या किंवा तीनही सांजा सखे मिळाल्या या गाण्यात..

नारळ वीस रुपये झाला म्हणे..! मला मात्र आजही नाक्यावारच्या वाण्याकडून २ रुपायाची नारळाची वाटी आणायची आहे..!

मला २४ तास टीव्ही नको आहे..वाहिन्या तर कोणत्याच नको आहेत.. मला फक्त मुंबई दूरदर्शन केंद्रावरचं गुरुवारी लागणारं छायागीत हवं आहे..

मला नको आहेत कोणतेही संगणक आणि व्हिडियो खेळ.. मला फक्त हवे आहेत ऐकलंम खाजा धोबी राजा वाले ढप आणि गोट्याचे खेळ..

मला कोणतेही Realty show नको आहेत.. मला हवी आहे फक्त संध्याकाळची रामरक्षा आणि पर्वाचा आणि पाढे..!

मला बाकावर उभं राहायचं आहे,,मला वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहायचं आहे..

म्हणे आज माझा वाढदिवस आहे..! मग गिफ्ट म्हणून काय हवं आहे मला..?

मला संध्याकाळी ७ वाजताच घरोघरी लागणा-या कुकरच्या शिट्या ऐकायच्या आहेत.. त्यात शिजणा-या सात्विक वरणभाताचा घास मला हवा आहे.. आणि हो.. पोळीसोबत थोडी शिक्रणही हवी आहे मला.. आईनं केलेली..!

-- तात्या अभ्यंकर..

4 comments:

Vishvanath said...

HEartiest wishes Tatya

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

आयला (आईला) किती तरास द्यायचा जरा म्होठे व्हा खोटे व्हायच्या अदुगर आणि बायको आणून (करून) पहा आनी तिला आईच्या हातचा स्वैपाक करायला शिकवा...

बहुतेक अध्यात्मिक गुरुमंडळी करतात ती चूक टुमी करू णका. भीमण्णांसारखी दोन दोन लग्ने नाही जमली तरी एखादे करून पहा...!

इंद्रधनु said...

वाढदिवसाच्या थोड्या उशिराने शुभेच्छा …

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

त्याचं असं झालं की तुमच्या बाढदिवसाला मला माझ्या पोर्टिंग केलेल्या नंबराचे नवे सिम मिळाले. (हे आज लक्षात आले) त्यानंतर ज्या काय उलाढाली झाल्या (घडल्या) ते पाहता तुम्ही नक्कीच कर्तुत्ववान इसम आहात पण बहुदा आमच्या आकलनशक्तीच्या बाहेर. नशीब, काहीतरी शंका आली म्हणून ते सिम मी नंतर बदलून घेतले. नंबर तोच आहे जो वाजल्यावर परमेश्वर चिंततो. आज तुमच्या ब्लॉगवर तात्याशोध घेतल्यावर अनवधाने घडलेल्या परमेश्वरी लीलेची उकल जाहली.