August 26, 2006

बसंतचं लग्न..३ (भूप)

नमस्कार मंडळी,
तर आपण बसंतच्या लग्नाच्या वरातीबद्दल बोलत होतो. "दुल्हा" बसंत घोड्यावर बसला आहे, आणि इतर सगळे राग या वरातींत सहभागी झालेले आहेत. गेल्या लेखांत आपण त्या वरातीमधल्या यमन आणि यमनकल्याण या दोन रागांबद्दल बोललो.

आणखी कोण बरं आहे या वरातीमध्ये?(मध्ये= कर्टसी-वरदा!!;) अरे खरंच की, यमनच्या मागे तो कोण चाललांय? ओहोहो, अरे हा तर आपला भूप! भूप रागाबद्दल काय बोलायचं महाराजा? साक्षांत भूपच तो! तुम्हांला सांगतो मंडळी, अत्यंत गुणी स्वभावाचा राग आहे बरं का हा. गाणं शिकवतांना सुरवातीलाच यमन आणि भूप या सारखे राग शिकवले जातात. राग-संगीताच्या खजिन्याकडे वाटचाल करतांना प्रेमाने आपला हात धरतो तो भूप! भूपाचा हात धरूनच आपल्याला पुढे जायचं असतं. हा भूप आपली आयुष्यभर फार छान साथ करतो.

आपण पाहिलं की यमन प्रसन्न आणि हळवा आहे. पण भूपाचा मला सर्वांत प्रकर्षाने जाणवणारा स्वभाव म्हणजे हा अत्यंत "प्रेमळ"आहे! तुम्हांला सांगतो मंडळी, या आमच्या भूपासारखं प्रेमळ आणि कौतुक करणारं दुसरं कोणी नाही हो. तसा हा राग शृंगाररसप्रधानदेखिल आहे. एकूणच लडिवाळता हा याचा स्थायीभाव आहे.

बरं परत, ना हा कोणाच्या अध्यांत, ना मध्यांत. कुठे आदळआपट नाही, कुणाशी भांडण नाही, की कुणाशी स्पर्धा नाही. स्वतःच्याच पाच स्वरांच्या दुनियेंत हा मग्न असतो. आणि खरं सांगतो मंडळी, विलक्षण जादुई दुनिया आहे या भूपाची.

पटकन एक उदाहरण देऊ? बाबुजींनी बांधलेलं आणि लतादिदींनी गायलेलं भूपातलं "ज्योती कलश छलके" (चित्रपट-भाभी की चुडिया) हे गाणं ऐका. त्या गाण्याच्या अगदी सुरवातीलाच दिदींनी घेतलेली तान ऐका म्हणजे मी "विलक्षण जादुई दुनिया" हे शब्द का वापरले हे कळेल. आपण ते गाणं ऐकतांना बाबुजींना आणि दिदींना दाद देतो, आणि ती द्यायलाच पाहिजे. अहो पण मंडळी, त्यातली थोडीशी दाद आमच्या भूपालाही द्या की!! ;) "हुए गुलाबी, लाल सुनेहरे " ही ओळ ऐकतांना डोळ्यांत पाणी येतं हो! मी म्हटलं ना, की अत्यंत प्रमळ स्वभाव, तो हा!

मंडळी मला आठवतंय, मला दहावी ईयत्तेत सर्वसाधारणच मार्क मिळाले होते. पण दहावी पास झालो म्हटल्यांवर आमच्या आज्जीनी अत्यंत प्रेमळतेने स्वतःच्या हाताने केलेली बेसनाची वडी माझ्या हातावंर ठेवली होती!! भूप म्हणजे तरी दुसरं काय हो, त्या म्हाताऱ्या आज्जीनी केलेलं कौतुक आणि चारोळी घालून केलेल्या त्या बेसनाच्या वडीचा गोडवा!!

मंडळी, तुम्हांला अजून सोप्प करून सांगू का भूपाबद्दल? नारायणरांव बालगंधर्वांचं "सुजन कसा मन चोरी" हे स्वयंवरातलं पद ऐका. "सुजन कसा मन चोरी, अगं हा चोरी यदुकुलनंदन.."! भास्करबुवांनी "फुलबनं सेज बिछाई" या मूळ बंदिशीवरून हे पद बांधलं. भास्करबुवांसारख्या देवगंधर्वाची बांधणी, भूपासारखा राग आणि गाणांर साक्षात श्रीपाद नारायण राजहंस, अर्थांत नारायणराव बालगंधर्व!! मंडळी, श्रीमंती-श्रीमंती का काय ते म्हणतांत ना, ती हीच! दुसरं काही नाही!!

अजून काय बरं लिहू भूपाबद्दल? किशोरीताईंची भूपातली "सहेला रे, आ मिल गायेसप्तं सूरन के भेद सुनावे, सहेला रे..जनम जनम को संग ना भुले,अबके मिले सो, बिछूर न जाए, सहेला रे..

ही बंदिश ऐका. किशोरीताईंसारखी विलक्षण प्रतिभा लाभलेली गानसरस्वती आणि भूपाचा ऐसपैस कॅनव्हास!! अजून काय पाहिजे?
"स्वये श्री रामप्रभू ऐकती" हे गाणं ऐका. म्हणजे भूपाचा आवाका लक्षात येईल! "ज्योतीने तेजाची आरती" हे शब्द फक्त भूपातंच बसू शकतांत!

"सोडुन आसन उठले राघव,उठुन कवळीती आपुले शैशव,पुत्रभेटिचा घडे महोत्सव,परि तो उभयानच माहिती.."
मंडळी, हा तर भूपाचाच महोत्सव!! कोणाकोणाला दाद देणांर? महाकवी गदिमांना, बाबुजींना की भूपाला?

जाता जाता शेवटचं सांगतो. तुम्हाला सकाळी झोपेतून उठवतांना, "रे गधड्या उठ, उन्हं अंगावर आली", असं खेकसून उठवलेलं आवडेल की भूपातल्या "उठी लवकरी वनमाळी, उदयाचळी मित्र आला" हे आवडेल? तुम्हीच सांगा, आणि तुम्हीच ठरवा काय करायचं या भूपाचं ते! मी गेले २० वर्ष गाणं ऐकतोय, श्रवणभक्ति करतोय, पण अजूनही या भूपाचा ठांव मला लागलेला नाही आणि कधी लागणांर्ही नाही. आणि न लागलेलाच बरा!!

बेसनाची वडी देणारी आमची आज्जी नेहमी एक म्हण मला सांगायची, "तातोबा, माणसानं दिलेलं कधी पुरत नाही आणि देवानं दिलेलं कधी सरत नाही"!!!

--तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..२ (यमन, यमनकल्याण)

या बसंतचे खुप लाड केले आहेत बरं का यमनने. घरातल्या कोणी मोठ्या व्यक्तीने (मालकंस म्हणा किंवा दरबारी म्हणा!!) ओरडावं, आणि रुसलेल्या बसंतने यमनच्या कुशीत शिरावं, असंच नेहमी चालंत आलेलं आहे. यमन नेहमी प्रेमाने जवळच घेणार! ओरडणं, दुसऱ्याला लागेल असं बोलणं हे यमनला कधी जमलंच नाही.
मनांतला विवेक, दुसऱ्याला समजून घेण्याची भावना, आपलंही कुठे चुकलं असेल, किंवा चुकू शकेल हे तपासून पहाण्याची वृत्ती यमनच्या श्रवणाने नक्कीच वाढीस लागते. खरंच मंडळी, काय आणि किती लिहू यमन बद्दल! मी तर म्हणेन ज्याला यमन गाता आलां, त्याला गाणं आलं!! माणसातलं माणूसपण म्हणजे यमन!
या यमनला एक जुळा भाऊही आहे बरं का, त्याचं नांव यमनकल्याण! हा तर यमनपेक्षा काकणभर जास्तच तरंल आहे! नास्तिक मंडळींनी यमनकल्याण जरूर ऐकावा, त्यांना परमेश्वरी अस्तित्वाचा आणि आवाक्याचा थोडाफार तेरी अंदाज येईल!!
दोघा भावांच्या दिसण्यात तसा काहीच फरक नाही. यमनकल्याणच्या गालावंर शुद्ध मध्यमाचा एक लहानसा परंतु अत्यंत देखणा तींळ आहे एवढांच काय तो फरक. पण हा तींळ म्हणजे काय हे खरं सांगू का, कृष्णाचं मोरपींस आहे हो ते!!
मला तरी आत्तापर्यंत यमन आणि यमनकल्याण असेच दिसले. तुम्हाला कसे दिसले सांगाल का?
बाबुजींनी "दैवजांत दुःखे भरतां.." हे गाणं बांधतांना यमनकल्याणचा किती सुरेख उपयोग केला आहे. भरताला "मी निश्चितपणे पुढची १४ वर्षे परत येणार नाही, तू परत जा.." असं राम सांगतोय! रामही खूप हळवा झालेला आहे, पण त्याला विवेक तर सोडता येत नाहीये!! मग करायचं काय? मंडळी, यमनकल्याणची ताकद काय आहे ते इथे कळते!
"ज़रा मरण यातून सुटला कोण प्राणीजांत?दु;खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा"!!
हे वास्तविक एक कटू सत्य! दुसऱ्या कुठल्या भाषेत ते ऐकायला आवडलं नसतं आपल्याला कदाचित! पण यमनकल्याणच्या भाषेंत पटलं की नाही लगेच?!!
एका विशिष्ठ पद्धतीने केली की कार्ल्याची भाजी मुळीच कडू लागत नाही असं म्हणतात!!!

तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..१ (ओळख)

नमस्कार मंडळी,
आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीतात बसंत हा एक मन उल्हासित करणारा राग. अनेक बडे बडे गवई हा राग आवडीने गातात. मंडळी, तसं पाहिलं तर आपल्याकडे हा राग ऋतुकालीन मानला जातो. नावावरुनच कळतं की हा खास वसंत ऋतुत गाण्याचा राग आहे. वसंत सुरू झाला की आपल्याला अनेक मैफ़लींतून बसंत ऐकायला मिळतो. बसंत-बहार, बसंती-केदार, धन-बसंती सारख्या जोड रागातसुद्धा हा राग खूप मौज आणतो.
मी एकदा सवाई गंधर्व महोत्सवात पं. जसराज यांचा बसंत ऐकला होता. जसराजजींनी बसंतची मस्तपैकी भट्टी जमवली होती. बसंतमधली एक फार सुरेख बंदिश ते गायले होते. तीचे शब्द असे होते,
"और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!
मदन महोत्सव आज सखीरी,
बिदा भयो हेमंत...."!!!!!

क्या बात है! काय सुंदर कल्पना आहे पहा. आमच्या बसंतचं लग्नं! दुल्हा बसंत घोड्यावर बसला आहे आणि बाकी सगळे राग त्याचे बाराती!!! मंडळी किती सुरेख बंदिश आहे ही!
मग काय? माझ्या डोळ्यासमोर ती बारात साक्षात उभी राहिली. इतर कोणकोणते राग या वरातीला आले असतील बरं? मी माझ्या मनाशी सहज कल्पना करु लागलो आणि काही विचार माझ्या मनांत आले ते इथे मांडत आहे.
सर्वात प्रथम म्हणजे आपले यमन आणि भूप सर्वांत पुढे असतील या बारातीत. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहेत ही. यमन तर खुपच खुष असेल त्याच्या लाडक्या बसंतचं लग्न आहे म्हणून! आणि बरंका मंडळी, आपला यमन जितका प्रसन्न आहे तितकाच तो हळवाही आहे. नवऱ्यामुलाकडचा असुनही नवी नवरी सासरी जातांना पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील!
(क्रमशः)
टिपः या लेखांद्वारे आपल्या रागसंगीतामधल्या रागांमध्ये किती वैविध्य आहे हे इथे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जो राग मला जसा भावला तसा तो मी इथे मांडणार आहे.
तात्या अभ्यंकर.

आबा जोशी...

"ए तात्याऽऽऽऽ.."

एवढी खणखणीत हाक कोणाची? आबा जोशी!!! दुसरं कोण असणार? हाकेसरशी मी मागे वळून बघितलं तर आबाच गोखल्याच्या हाटेलाच्या बाहेर उभं राहून मला हाक मारत होता.

"अरे तात्या ये ये, लेका मिसळ खा"!

झालं! म्हटल्यावर माझंही अवसान गळालं आणि आबाच्या पाठोपाठ मीही गोखल्याकडे घुसलो. आबाची नेहमीची बडबड सुरू झाली.

"साला गोखल्याच्या मिसळीत आता पूर्वीसारखा दम उरलेला नाही" आबा म्हणाला.

"अरे पण तरीही आठवड्यातून दोनदातरी इथे येऊन तू इथली मिसळ हाणतोसच ना?" मी.

"ते झालंच रे. आपले शंकरराव गेले आता. ते असतांना फारच झकास मिसळ मिळायची. त्यांची आठवण म्हणून येतो झालं"! क्षणार्धात हळवा होत आबा म्हणाला.

आबा जोशी!! त्याची माझी गेल्या ३०-३५ वर्षांची दोस्ती. आम्ही दोघेही अकाउंटंट जनरलच्या कचेरीत एकाच विभागातून एकाच दिवशी निवृत्त झालो होतो. दोघेही पेन्शन, फंड घेऊन खाऊन-पिऊन सुखी होतो. आमचा आबा म्हणजे देव माणूस. स्वभावाने मात्र महाबडबड्या, पण तेवढाच हळवादेखील!

त्याचा नेहमीचा पेहराव म्हणजे एक साधा बुश शर्ट, तेवढीच साधी पँट. मॅचिंग-फिचिंगच्या भानगडीत आबा कधी पडला नाही. केशरचना? ती नाहीच! कारण मी तरी आबाला ओळखू लागलो तेव्हापासून तो साफ टकल्याच आहे. उंची जेमतेम ५ फूट. बांधा जाडा (हल्लीच्या भाषेत सुदृढ!), चेहरा गोल गरगरीत, त्यावर देवीचे व्रण. असा एकूण आबाचा अवतार असे.

माझ्यावर त्याचा फार जीव. एकंदरीतच आबा तसा माणूसवेडा. माणसांवर प्रेम करणारा. आता कोण कुठला तो गोखल्यांच्या हॉटेलातला मॅनेजर शंकरराव! तो गेला त्या दिवशी आबा हमसाहमशी रडला होता! मिसळीवर आबाचं प्रेम. त्यामुळे गोखल्याच्या हॉटेलात त्याचा बराच राबता असे. एकदा मला सांगायला लागला, "अरे तात्या, त्या शंकररावाला मी २५००० रुपये उसने दिले. त्याच्या लेकीचं लग्न ठरलंय रे. अरे लग्नाकार्यात नाही म्हटलं तरी खर्च खूप होतो रे"!! मी नेहमीप्रमाणे थक्क!!

"तुला सांगतो तात्या, बाकी सगळं एकवेळ मिळेल रे, पण माणूस पुन्हा मिळायचा नाही. तेव्हा माणसं जपायला हवीत" हे वाक्य आबा एकदिसाआड तरी घोकायचा आणि तसा वागायचादेखील!

"अरे तुला सांगतो तात्या, कसले रे मान-अपमान घेऊन बसतो आपण? आता तो देसाई माझा नेहमी द्वेष करायचा. मला घालूनपाडून बोलायची एक संधीही तो सोडत नसे. आठवतंय ना तुला? मला काय कधी त्याला उलटून बोलता नसतं आलं? पण जाऊ दे रे. अरे माणूस आहे! काय सांगावं? घरी कदाचित त्याची बायको त्याला येता-जाता हाणत असेल, तोच बायकोचा राग त्याला या आबावर काढून समाधान मिळत असेल! मग मिळू दे!!

हे मात्र खरं आहे. देसाई हा आमच्या कचेरीतला एक अत्यंत माणूसघाणा प्राणी होता. सगळ्यांशीच शिष्टपणे वागायचा. स्वतःला जाम शहाणा समजायचा. का माहीत नाही, पण आबाचा तर तो फारच राग राग करायचा. पण एके दिवशी आबाने त्यालाही जिंकलंन!

झालं असं की, त्या देसायाच्या मुलाला एकदा खूप मोठा अपघात झाला. त्याला गाडीने उडवलं होतं. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रविवारचा दिवस. आमच्या कचेरीला सुट्टी. कुठूनतरी आबाला ही बातमी कळली तसा तडक हॉस्पिटलात पोहोचला. देसाई आणि त्याची बायको धीर खचून, हतबल होऊन बसले होते. देसायाचा स्वभाव माणूसघाणा असल्यामुळे नातेवाईक किंवा इतर माणसं तिथे कुणीच नव्हती. देसाई, त्याची बायको आणि तिसरा आमचा आबा!!

क्षणार्धात आबाने परिस्थितीचा ताबा घेतला. डॉक्टरांना भेटला. रक्ताच्या ३-४ बाटल्या लागणार होत्या. आबा म्हणजे जगनमित्र. अर्ध्या तासाच्या आत आबाने ५-६ रक्तदाते उभे केलेन. वेळीच रक्त मिळालं आणि देसायाचा मुलगा वाचला!! तेव्हापासून देसाई फक्त आबाशीच नव्हे, तर कचेरीतल्या प्रत्येकाशी नरमाईने वागू लागला. आबाशी तर तो फारच आदराने वागायला लागला!

मी सहज आबाला म्हटलं, " अरे आबा, लेका त्या देसायाला जिंकलंस रे".

यावर नेहमीप्रमाणे आबाची टिप्पणी-
"अरे तात्या, मूळचा कोणीच माणूस वाईट नसतो रे. परिस्थितीनुसार प्रत्येकाचा स्वभाव घडत असतो. अरे देसाईपण आपलाच आहे रे! त्याला माणसाची किंमत कळली, हेच पुष्कळ झालं"!!

माणसांबद्दलचं आबाचं एवढं साधं सोपं तत्त्वज्ञान ऐकून मी नेहमीच थक्क होत असे. आमच्या डिपार्टमेन्टमध्ये देसाई तसा सगळ्यात श्रीमंत. त्याकाळात त्याची गाडी होती. नेहमी सफारी सुटात वावरायचा. उंची अत्तरं लावायचा. पण फक्त एका फोनवर केवळ १५-२० मिनिटांत ५-६ रक्तदाते उभे करणारा आमचा आबा त्याच्याहून किती श्रीमंत होता हे देसायाला प्रथमच कळत होतं!!

आबाला २ मुलं. मोठी मुलगी स्वाती लग्न होऊन बंगलोरला स्थायिक. धाकट्या अविनाशने संगणकशास्त्रात प्रावीण्य मिळवून, लग्न होऊन तो आणि त्याची बायको आणि २ वर्षांचा मुलगा असे अमेरीकेत असतात. नलूताईचं मात्र मला खरंच खूप कौतुक वाटतं. अत्यंत साधं, सोज्वळ व्यक्तिमत्त्व. दिसायला सुरेख. आमच्या ओबडधोबड आबाला एवढी सुरेख बायको मिळाली याचं नवल आजही अनेकांना वाटतं! आबाचाही तिच्यावर खूप जीव. आबाच्या बोलण्यात नलूताईबद्दल नेहमी कौतुकच असतं. आबा मला नेहमी म्हणतो, "अरे बायकोला उगीच नाही घरची लक्ष्मी म्हणत रे. ती प्रसन्न तर सगळं घर प्रसन्न!! नाहीतर एकीकडे मानभावीपणाने समाजात मिरवायचं आणि घरच्या लक्ष्मीला मात्र शिव्या द्यायच्या, मारझोड करायची. मग काय उपयोग?"! आबाचं हे आणखी एक ठाम तत्त्वज्ञान!!

आबा मला नेहमी गमतीने म्हणतो, "अरे मागच्या जन्मी मी बहुतेक एका पायावर उभं राहून तप केलं असणार म्हणून इतकी गुणी आणि सुंदर बायको मिळाली."

आमची नलूताई स्वयंपाकदेखील एकदम फर्मास करते. तिने साधा आमटी-भात जरी केलान ना, तरी मंडळी आडवा हात मारतात. श्रीखंड, अळूवड्या, बेसनाचे लाडू, पाकातल्या पुऱ्या, वाटली डाळ, फणसाची भाजी, डाळिंब्यांची उसळ हे पदार्थ करावेत तर नलूताईनेच करावेत!! आबा मात्र गमतीने मला म्हणतो, "कसली रे सुगरण? तिला अजून मिसळ करता येत नाही. मी एकदा आपल्या शंकररावाला सांगून त्या गोखल्याच्या भटारखान्यातल्या आचाऱ्याला हिला स्पेशल ट्रेनिंग देण्याकरता घरी बोलावणार आहे!! :)

मीही निवृत्तच झालो होतो. मुलं आपापल्या मार्गाला लागली होती. खिशात चार पैसे होते, म्हणून मी आणि माझ्या बायकोने एका यात्राकंपनीबरोबर दोन महिन्याच्या परदेशयात्रेला जायचं ठरवलं. जायचं जायचं असं म्हणेस्तोवर जाणं अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलं. आबाही बऱ्याच दिवसात भेटला नव्हता. परदेशवारी संबंधात फोनवर त्याच्याशी एक-दोनदा मोघम बोलणं झालं होतं इतकंच. मी त्याला फोन करणारच होतो, तेवढ्यात आबाचाच फोन आला. रात्री गप्पा मारायला म्हणून आबाकडे जायचे ठरले. नलूताईने जेवायलाच बोलावले. ओले पावटे घातलेली, तीळ-खोबरं वाटून लावलेली, चिंचगुळ घालून केलेली शेंगा-वांगी-बटाट्याची फर्मास भाजी तिने केली होती. त्यासोबत झकासपैकी ज्वारीची भाकरी, ताज्या लोण्याचा गोळा, आणि लसणाची चटणी असा न्यारा बेत होता! आबाच्या ४२ पिढ्यांना पुरेल इतका दुवा देत देत मी त्या माऊलीने केलेल्या सुग्रास अन्नावर ताव मारत होतो.

आबा म्हणाला, "खा लेका. खाऊन घे. उद्यापासून २ महिने अमेरीकेला जायचा आहेस ना? तिथे असलं काही खायला मिळणार नाही"! का कुणास ठाऊक, पण आबाचा स्वर थोडा कडवट वाटला. पण मी खाण्यात इतका बुडलो होतो की लक्षच दिलं नाही.

जेवण झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी सहज आबाला म्हटलं, "अरे मी या या दिवशी न्यूयॉर्कला असेन, तेव्हा तुझ्या अविनाशला भेटीन. त्याचा नंबर, पत्ता माझ्याकडे देऊन ठेव."
आबा एकदम खेकसला, "त्याला भेटायची काय गरज आहे? तो मजेतच असणार"! मगासचा कडवटपणा आता जास्तच डोकावत होता. आबा असं कडवट कधीच बोलत नसे.

मी आबाला म्हटलं, "का रे बाबा, काय झालं? स्पष्ट बोल की काय ते."

"काही नाही रे. त्याला भेटलास तर सांग की आबा अजून जिवंत आहे, आणि मजेत आहे. मेला की कळवू म्हणावं"!!

मग मात्र मी आबाला चांगलाच झापला. तेवढी मैत्री होती आमची. तसा मग आबाही भडभडा बोलू लागला.
"अरे फक्त २-३ वर्षांकरता तिथे जातो म्हणाला. आता ८-९ वर्ष होत आली, पण इथे परत यायचं नाव काढत नाही. अरे पैसा पैसा किती करायचं माणसाने? इथेही त्याला चांगली लठ्ठ पगाराची नोकरी होतीच की! तुला सांगतो तात्या, तुझा माझा निवृत्तीच्या वेळचा जो पगार होता ना, त्यापेक्षा जास्त पगार त्याला इथे सुरवातीला होता."

"अरे हल्लीच्या मुलांना असते रे पैशांची क्रेझ‌. शिवाय राहणीमानही उंचावलं आहे, गरजा वाढल्या आहेत. पैसे लागतात रे माणसाला." मी आपली अविनाशची बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला.

"अरे हो. पण पैशाच्या मागे माणसाने किती लागायचं याला काही सुमार? इथे भारतात येऊन राहिला तर काय कमी पडणार आहे रे त्याला? फार तर माझ्याजवळ नको राहू. वाटल्यास याहूनही मोठी जागा घे. कुले धुवायला अगदी सोन्याचं टमरेल ठेव. मग तर झालं?"

इतक्या वर्षांत आबाचं हे वेगळं रूप मी प्रथमच पहात होतो. आबा अगदी पोटतिडिकेने बोलत होता.
तुला सांगतो तात्या, "पोरांना आपली किंमत नाही रे. अरे इतका गोंडस मुलगा आहे त्याचा, इथे मी आणि नलूने नातवाचं कोडकौतुक हौसेने केलं नसतं का? तिथे काही दुखलं खुपलं, लागलं सवरलं तर कोण करणार रे यांचं? कुठलातरी ९११ नंबर फिरवायचा, म्हणजे लागेल ती मदत मिळते असं म्हणाला. अरे पण उद्या तुझ्या पोराला सर्दी झाली तर त्याच्या नाका-कपाळावर सुंठ उगाळून, त्याचा कढत लेप ते ९११ वाले घालणार आहेत का?

नलूताई बिचारी गप्प उभी होती. आबाची तोफ सुरूच होती. "आणि काय रे तात्या? पैसा आणि करियर म्हणजे सर्व काही आहे का? नाही, ते जरूर असावं. कौतुकच आहे आम्हाला. पण या अविनाशला असं वाटत नाही का रे, की आपले आई बाप तिथे एकटे राहतात, त्यांना आपली खूप आठवण येत असेल! आम्ही आमच्या परीने याचे लाड केले, लहानाचा मोठा केला, उत्तम शिक्षण दिलं त्याचं काहीच नाही? की ते आमचं कर्तव्यच होतं? अरे मग याचं कर्तव्य काय? आठवड्याला फक्त एखादा फोन करणं? अरे, तुझा माझा आता काय भरवसा? आज आहोत, उद्या नाही! अरे पण डोळे मिटताना मुलगा समोर असावा एवढी साधी अपेक्षा करणं चूक आहे का रे? अरे किती स्वार्थी असावं माणसाने?
आज विषय निघाला म्हणून तुला सांगतो तात्या, माझा बाप अर्धांगाने ५ वर्ष अंथरुणात होता, मी रोज संध्याकाळी ऑफिसातून परतल्यावर त्याच्या हातपायांना मालीश करायचो, पण एक दिवसही त्याचं ओझं मला वाटलं नाही. माझ्या मांडीवर डोकं ठेवून बाप समाधानाने गेला. मला सांग, काय कमी पडलं रे मला? सगळं उत्तमच झालं की. मगाशी तूच इथे वा वा छान छान करत सुग्रास जेवलास ना? तूच सांग, काय कमी आहे रे आमच्याकडे? तिथे हे लोक काय खाणार रे? पिझ्झा, बर्गर की त्या बाजारात मिळणाऱ्या मशीन मधल्या चामट पोळ्या? अरे दुधाच्या पातेल्यातली साखर घातलेली सायीची खरवड माझा नातू कधी खाणार रे?? अरे अविनाशला आवडतात, पण त्याला मिळत नाहीत म्हणून गेल्या कित्येक दिवसात नलूने बेसनाचे लाडू केले नाहीत! मीच तिला कधीतरी करायला सांगतो तर, 'नको, अविनाश इथे आला की मगच करेन' असं म्हणते! या माउलीची कळकळ कळत असेल का रे त्याला??

आबा तर सुटलाच होता. 'येऊ दे त्याची सगळी भडास एकदची बाहेर' या विचाराने मी गप्पच रहायचं ठरवलं होतं. जरा वेळाने तो बोलायचा थांबला. त्यानंतर थोडा वेळ कुणीच काही बोलेना. नलूताईचं मात्र मला हे सगळं होत असताना कौतुकही वाटत होतं आणि आश्चर्यही वाटत होतं!! चेहऱ्यावर तोच शांत भाव. ती हसतही नव्हती, रडतही नव्हती किंवा काही बोलतही नव्हती. खरंच खूप मोठी बाई! आमच्या आबापेक्षाही मोठी!!

मला मात्र आबाचं मात्र हे असलं रूप पाहून आतून खूप रडू फुटत होतं. आज कधी नव्हे ते आबा माझ्याच फाडफाड कानफटात मारत आहे असं मला वाटत होतं! एरवी कधी अविनाशचा विषय निघाला की आबा त्याच्याबद्दल माझ्याशी नेहमी कौतुकानेच बोलत असे. आज इतके वर्ष मी आबाला माझा अगदी जवळचा मित्र मानत होतो, पण त्याचा हा सल मी मित्र म्हणून ओळखू शकलो नाही हे मला माझं failure वाटत होतं!!

मी काही न बोलता उठलो, शांतपणे आबाच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हटलं,
"बरं, निघतो मी. आता दोन महिन्यांनी भेटू. उद्या रात्री ९ वाजता घरातून निघणार आहे."

माझा अमेरीकेला जायचा सगळा आनंदच आबाने घालवला होता. रात्री घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा आबाला फोन करावासा वाटत होता. पण हिंमत होईना. त्याचाही फोन आला नाही. सगळा दिवस उदास गेला. रात्रीचे ९ वाजत आले, निघायची वेळ झाली. आणि तेवढ्यात दारात स्वतः आबा हजर!!!

त्याचा नेहमीचाच आनंदी स्वर!! "हे काय तात्या, निघालास? मी म्हटलं भेटतोस की नाही. तुम्हा दोघांनाही प्रवासाच्या शुभेच्छा"!!

"अरे काल रात्री जे काय बोललो ते विसरून जा. कधी कधी त्रास होतो इतकंच. आज सकाळीच अव्याचा "आबा BP चेक केलंत का? वेळच्या वेळी औषधं घेत जा" असा फोन आला होता"!!

"अरे शेवटी माणूस आहे रे, आपणच समजून घ्यायचं" हे त्याचं नेहमीचं वाक्य आबा बोलला आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माझा नेहमीचा आबा परत भेटला होता!!

अगदी निघणार तेवढ्यात आबा म्हणाला, "अरे मी बघ किती वेंधळा आहे. ज्या कामाकरता आलो होतो ते काम केलंच नाही!"

"काय झालं?"

एक कागद माझ्या हातात देत आबा म्हणाला, "अरे हा अविनाशचा पत्ता आणि फोन नं आहे. एवढी पिशवी त्याला नेऊन दे. यात बेसनाच्या लाडवांचा डबा आहे. त्याला आवडतात म्हणून आत्ता संध्याकाळीच नलूने केले आहेत."!!!!
-- तात्या.

संगीताचे ऋणानुबंध..

नमस्कार,
मंडळी, ही साधारणपणे १९९८ सालची गोष्ट आहे. एका मित्राशी (सुनील टेंबे) बोलतांना गाण्याबद्दल गप्पा सुरू होत्या, आणि गप्पांच्या ओघात स्व पं निवृत्तीबुवा सरनाईक यांचा विषय निघाला. निवृत्तीबुवा माझे अतिशय आवडते गवई. त्यांना प्रत्यक्षात ऐकण्याची कधी संधी मिळाली नाही, पण त्यांचे काही जुने ध्वनिमुद्रण नेहमी ऐकतो. बुवा छानच गायचे. अत्यंत कसदार परंतु सहजसुंदर गाणं होतं बुवांचं! मुष्किल तानक्रिया असलेल्या जयपूर गायकीवर बुवांचं प्रभुत्व.
सुनील मला म्हणाला, "अरे डोंबिवलीला एक पुरोहीत नावाचे गृहस्थ राहतात. त्यांचा फोन नं. तुला देतो. तू त्यांना फोन कर. त्यांच्याकडे निवृत्तीबुवांचं आणि इतरही बरचसं जुनं ध्वनिमुद्रण आहे"
झालं. एका रविवारी सकाळी मी पुरोहितांच्या घरी फोन लावला. सुनीलचा संदर्भ दिला आणि फोन करण्याचं कारण सांगीतलं. ते एकदम आनंदीत होऊन म्हणाले, "अरे वा वा! तुम्ही केव्हाही या. गाण्याची आवड असणारं कोणी भेटलं की खूप आनंद होतो मला. आज मलाही भरपूर वेळ आहे. मस्तंपैकी गाणं ऐकू. नक्की या, वाट पहात आहे."
मी डोंबिवलीला निघालो आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. ते रहात असलेल्या सोसायटीत पोहोचलो तर खाली १०-१२ माणसं उभी. त्यापैकी एकाला मी पुरोहितांचं घर कुठलं असं विचारलं तर तो म्हणाला, "कोण पुरोहित ना? पहिल्या मजल्यावर. आत्ताच १५ मिनिटापूर्वी गेले हो. तसे आजारीच असायचे. अचानक ऍटॅक आला. आत्ताच डॉक्टर येऊन गेले"!
????! आज सकाळीच तर मी या माणसाशी बोललो होतो! क्षणभर मला काय करावं ते सुचेना. सुनीलला फोन करावा का? पण तो तर पुण्याला गेला होता.
तसाच त्यांच्या घरी गेलो. घरीदेखील ८-१० बायका आणि पुरुष मंडळींची गर्दी. माझ्या ओळखीचं तर कुणीच नाही. जमीनीवर शांतपणे पहुडलेले पुरोहित! मल उगाचंच भरून आलं! त्यांना नमस्कार करून पुन्हा खाली आलो. काय करावं ते कळेना. "आज हा गृहस्थ जर मला भेटला असता तर आमची ओळख झाली असतीच की नाही? नाही नाही, याला पोचवायला गेलंच पाहिजे मला"! असा विचार मनाशी करून तिथेच दोन तीन तास घुटमळलो, आणि कधीही न भेटलेल्या त्या गृहस्थांचा अंत्यविधी आटपून घरी परतलो.
त्यानंतर साधारणपणे दोन महिन्यांनी मला एक फोन आला. "हॅलो, अभ्यंकर का? मी डोंबिवलीहून सुधा पुरोहित बोलत्ये. सुनील टेंबेंकडून तुमचा नं घेतला"!
"हो हो, आलं लक्षात".
"आपल्याला शक्य असेल तर एकदा घरी याल का? आपल्याला निवृत्तीबुवांच्या कॅसेटस् द्यायच्या आहेत. तुम्ही येणार असं मला पुरोहित त्या दिवशी बोलले होते. त्यांनी मुद्दाम तुम्हाला देण्याकरता या कॅसेटस् वेगळ्या काढल्या होत्या"!
मला पुन्हा काय बोलावं ते कळेना. "हो का? वा वा, नक्की येतो, असं म्हणणार होतो मी?"! ही पुरोहित मंडळी माझी सारखी परीक्षा का घेत होती ते कळेना!
पुरोहित गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी मुद्दामून कॅसेटस् आणायला जायचं हे काही मनाला पटेना. पण सुधाताईंचा पुन्हा एकदा फोन आला, आणि एकदा धीर करून त्यांच्या घरी गेलो. सुधाताई या खूपच शांत स्वभावाच्या बाई होत्या. आता पुष्कळच सावरलेल्या दिसत होत्या. त्या दोघांनाही गाण्याची खूप आवड होती असं त्यांच्या बोलण्यातून कळलं. सुधाताईंना गाण्याबरोबरच वाचनाचीदेखील खूप आवड होती. त्या मूळच्या सांगलीच्या. हौस म्हणून काही वेळ काणेबुवांकडे गाणंही शिकलेल्या. काणेबुवा आता नाहीत, पण ग्वाल्हेर गायकी फार उत्तम गायचे. आसावरी ही सुधाताईंची एकुलती एक लग्न झालेली लेक मद्रासला असायची.
त्यानंतर त्या मला नेहमी घरी बोलवायच्या. गाण्यावर आणि इतर गोष्टींवरही खूप बोलायच्या. माझ्या आईशीही त्या एक-दोनदा बोलल्या होत्या. डोंबिवलीत कुठे कुणाचं चांगलं गाणं आहे असं कळलं की "येशील माझ्याबरेबर?" असं विचारायच्या. गाणं झाल्यावर "आता घरीच चल, गरम गरम आमटीभात खाऊनच जा" असं सांगायच्या! कुणा चांगल्या कलाकाराची नवीन कॅसेट आली की मला सांगायच्या, "तू घेऊ नकोस, मी घेतली आहे. तुला कॉपी करून देईन." अनवट रागांबद्दल आम्ही खूप बोलायचो. खूप मायेने वागायच्या माझ्याशी.
दोन महीन्यापूर्वीच त्या अमेरिकेत लेकीकडे रहायला गेल्या होत्या. आसावरी हल्ली अमेरिकेला असते. आज सकळीच आसवरीचा मला त्या गेल्या असा फोन आला! त्यांना तिथे किडनीचा विकार जडला होता. २ दिवसांपूर्वीच त्यांन रुग्णालयात दाखल केले होते. काहीच सुचेना म्हणून हा लेख लिहित आहे.
मंडळी, कसा योग असतो पहा, पुरोहितांची आणि माझी एकदाही भेट नाही, पण तरीही त्यांच्या अंतयात्रेस मी गेलो होतो, आणि सुधाताईंचं साधं अंत्यदर्शनही मला मिळू नये?
यापुढे कधीही कुणाच्या गाण्याला डोंबिवलीला गेलो की सुधाताईंची खूप आठवण येईल. "आता घरीच चल, गरम गरम आमटीभात खाऊनच जा" असं म्हणणारं तिथे कुणीच नसेल!
तात्या.

ने मजसी ने...


नमस्कार मंडळी,
आता लवकरच गुरूपौर्णिमा येईल. माझी काही दैवते आहेत. त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. बाबुजी(स्व.सुधीर फडके), अण्णा(भीमसेनजी) ह्या माझ्या प्रातःस्मरणीय व्यक्ती.

२००२ सालची गुरूपौर्णिमा. सकाळची वेळ. गुरूपौर्णिमेनिमित्त दादरला बाबुजींना भेटायला जायचे होते. मी बाबुजींच्या घरी फोन लावला. फोनवर सौ ललिता मावशी (बाबुजींची पत्नी) होत्या. तेव्हा मला समजलं की बाबुजींना हिंदुजा रुग्णालयांत दाखल केले आहे. मी लगेच हिंदुजाला जायला निघालो तर त्या मला म्हणाल्या की ते अत्यवस्थ आहेत, तेव्हा तू आत्ता लगेच नको येउस, बऱ्याच तपासण्या सुरू आहेत, संध्याकाळी ये.

संध्याकाळ होईपर्यंतचा काळ मी खूप अस्वस्थतेत काढला. अनेकवेळा त्यांच्याघरी मी गेलो होतो. त्यांच्याशी बोललो होतो. त्यांच्याकडे जेवलो होतो. ते घरांत नसले की ललिता मावशींकडून त्यांच्या खूप आठवणी ऐकल्या होत्या. काही काही वेळेला बाबुजी मूड मध्ये असले की माझी चेष्टाही करायचे. म्हणायचे, "मग काय पंडितजी, आम्हाला तुमच गाणं केव्हा ऐकवणार? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडसं..!"

संध्याकाळी हिंदुजात गेलो. पण दुर्देव! बाबुजी कोमात गेले होते. बाहेरच व्हरांड्यात श्रीधरजी भेटले. त्यांनी खुणेनंच आंत जा असं सांगीतलं. मी घाबरतच आय. सी. यू. त गेलो. मला खूप भरून आले होते. आंत जाऊन पाहतो तर बाबुजी जवळजवळ मरणशय्येवरच विसावले होते. तात्यारांव सावरकरांचा हा शिष्य हळूहळू शांत होत होता. आता जीवनाशी झगडा संपत आला होता. मी कॉटजवळ बसून त्यांचा हात हातात घेतला. पण ते रुसले होते माझ्यावर. सहजच माझी नजर खिडकीबाहेर दिसणाऱ्या समुद्राकडे गेली, आणि मला तात्याराव सावरकरांच्या काव्यपंक्ती आठवल्या, "ने मजसी ने...". हातात बाबुजींचा हात, समोर समुद्र, आणि मनांत ह्या काव्यपंक्ती! खरं सांगतो मंडळी, ती भकास कातरवेळ मन विषण्ण करुन गेली.

बाहेर आलो, ललितामावशींजवळ थोडा वेळ बसलो. काही सुचेना. एकटाच बाथरूममध्ये जाऊन हमसाहमशी रडलो.
अचानक माझ्या एका मित्राची मला आठवण झाली. तो दादरलाच रहायचा. मला नेहमी म्हणायचा, "तात्या लेका इतक्यावेळा बाबुजींकडे जातोस, मला पण ने की केव्हातरी त्यांच्या घरी. पण नेहमी जाऊ जाऊ म्हणता ते राहूनच गेलं होतं माझ्याकडून. मी त्याला फोन केला आणि बोलावून घेतले हिंदुजामध्ये. तो लगेच आला, मी त्याला सर्व कल्पना दिली. तो मला एवढंच म्हणाला, "तात्या, खूप उशीर केलास रे तू"....!!!!

तात्या.