पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया!
एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्याच्या चेहेर्यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते. कोकणस्थी गोरा रंग असलेले पाटणकर आजोबा देखण्यातच जमा होत होते, हँडसम दिसत होते!
गाण्याचं मध्यंतर झालं. मंडळी जरा इकडेतिकडे करत होती, चहापान वगैरे करत होती. माझादेखील चहा घेऊन झाला होता व मी बांधून आणलेलं १२० पान सोडून खायच्या तयारीत होतो. समोरच पाटणकर आजोबा उभे होते व मिश्किलपणे माझ्याकडे पाहात होते. मीदेखील त्यांना एक तोंडदेखला स्माईल दिला तशी मला म्हणाले,
"आज नेमकी मी माझी पानसुपारीची चंची घरी विसरलो! गाण्याला खूपच गर्दी आहे आणि आता लवकरच पुन्हा मध्यंतरानंतरचं गाणं सुरू होईल. तू जरा माझी जागा पकडतोस का?, मी बाहेर जाऊन पटकन पान खाऊन येतो. नाहीतर मी पान खायला म्हणून बाहेर जायचो आणि नेमकी माझी जागा जायची!"
'तुम्ही कोण', 'तुमचं नांव काय', 'कुठे असता' इत्यादी नेहमीचे औपचारिक प्रश्न न विचारता अगदी वर्षानुवर्षाच्या ओळखीतल्या माणसाशी बोलावं तसं एकदम एकेरीवर येत पाटणकर आजोबा माझ्याशी बोलते झाले! पुलंच्या भाषेत सांगायचं तर 'इतक्या एकदम सलगीत आलेला हा म्हातारा कोण?' हे मला कळेचना! पण काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. पाटणकर आजोबांच्या चेहेर्यावरही असेच 'दोस्ती करण्याकरता उत्सुक' असे भाव होते. मला तो माणूस कुणी परका आहे असं वाटलंच नाही! मग मीच त्यांना म्हटलं, "आजोबा तुम्ही बसा आणि माझीही जागा पकडा, मी तुमच्याकरता बाहेरून पान घेऊन येतो. तुमचं पान कोणतं ते सांगा!"
"उत्तम! बनारसी १२०, कच्ची सुपारी" आजोबा खुशीत येऊन म्हणाले.
चढत्या भाजणीने रंगत गेलेलं मालिनीबाईंचं गाणं संपलं. मंडळी, मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं ऐकायला भाग्य लागतं! पाटणकर आजोबा आणि मी मैफलीत पहिल्या रांगेत शेजारी शेजारीच बसलो होतो. समोरच अवघ्या दोन तीन फुटांच्या अंतरावर अत्यंत साध्या आणि घरगुती व्यक्तिमत्वाच्या मालिनीबाई बसल्या होत्या. त्यांच्या स्वरास्वरात, लयीच्या प्रत्येक वळणात 'संगीत!' 'संगीत!' म्हणतात ते हेच!' याची साक्ष मिळत होती. अत्यंत कसदार आणि खानदानी गाणं! स्वच्छ, मोकळा आणि अत्यंत सुरेल आवाज, सुरालयीवर, तानेवर, सरगमवर असामान्य प्रभुत्व. 'चाल पेहेचानी' हा टप्पा आणि त्यानंतर 'फुल गेंदवा अब ना मारो' या भैरवीने मालिनीबाईंनी अक्षरश: आभाळाला गवसणी घातली आणि मैफल खूप उंचावर नेऊन ठेवली! मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! मंडळी, संगीतक्षेत्रात असं मानलं गेलं आहे की जी मैफल संपल्यानंतर टाळ्यांच्या ऐवजी नुसताच सन्नाटा निर्माण होतो ती खरी मैफल! मालिनीबाईंची मैफल म्हणजे नादब्रह्माचा साक्षात्कार! मला आजपावेतो मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं अगदी भरपूर ऐकायला मिळालं हे माझं भाग्य! असो, मालिनीबाईंचा गानविष्कार हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
गाणं संपलं. मालिनीबाईंच्या पाया पडून मी बाहेर पडलो.
"कुठे राहतोस?"
मागनं पाटणकर आजोबांचा आवाज ऐकू आला. त्यांचा हात माझ्या खांद्यावर होता. आयला!, म्हातारा मला सोडायलाच तयार नव्हता!
मग 'तुम्ही कोण, कुठले', 'आम्ही कोण, कुठले' या आमच्या गप्पा झाल्या, रीतसर ओळख झाली. पाटणकर आजोबा दादरलाच एका चाळीत राहणारे. नोकरीधंद्यातून निवृत्त होऊन फंड-पेन्शनीत निघालेले.
"चल, मस्तपैकी पावभाजी आणि नंतर भैय्याकडची कुल्फी खाऊ! घरी जायच्या गडबडीत नाहीयेस ना?"
मला जरा आश्चर्यच वाटलं. रात्रीचा जवळजवळ एक वाजला होता आणि या म्हातार्याला घरी जाऊन चांगलं झोपायचं सोडून खादाडीचे वेध लागले होते! :) पण मला त्यांचा आग्रह मोडवेना. मग आम्ही मस्तपैकी गाडीवर पावभाजी झाल्ली. तेव्हा बिसलेरी-फिसलेरीचं एवढं फ्याड निघालं नव्हतं त्यामुळे बाजूच्याच प्लाष्टीकच्या पिंपातलं पाणी प्यायलो आणि नंतर झकासपैकी मलई कुल्फी खाल्ली. मजा आली तिच्यायला! :)
"काय मग, कसं वाटलं मालिनीबाईंचं गाणं? चल जरा चौपाटीवर थोडी शतपावली घालू म्हणजे पावभाजी पचेल!"
आणि खरोखरंच रात्री एक वाजता पाटणकर आजोबांबरोबर मी मुकाट्याने दादरच्या चौपाटीवर शतपावली घालू लागलो. 'च्यामारी कोण हा? का असा मला वेठीस धरतो आहे?' असा विचार माझ्या मनात आला. पण पाटणकर आजोबांचं व्यक्तिमत्वच एवढं प्रभावी आणि छाप पाडणारं होतं की मला त्यांना 'नाही' म्हणताच येईना! मग आम्ही जरा वेळ गाण्यावर गप्पा मारल्या. त्यांनी माझा पत्ता,फोन नंबर घेतला आणि आम्ही एकमेकांना बाय बाय करून निरोप घेतला. पण त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या माणसाने अभिजात संगीत अगदी भरपूर ऐकलं होतं. आमच्या गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक लहानमोठ्या कलाकारांची नावं घेतली, त्यांची वैशिष्ठ्ये सांगितली. एकंदरीत हा माणूस गाण्यावर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारा वाटला, माणसांचा भुकेला वाटला! शिवाय 'भीमण्णांच्या गाण्यावर तुडुंब प्रेम' ही आमच्या दोघातली कॉमन गोष्ट निघाली. त्यामुळे मला तर माझ्या वारीतलाच एक वारकरी भेटल्याचा आनंद झाला! वारीत फक्त मागेपुढे चालत होतो त्यामुळे इतके दिवस भेट नव्हती! परंतु आमचा रस्ता एकच होता, वारी एकच होती. आम्हा दोघांचंही पंढरपूर म्हणजे पुण्यनगरीतल्या नव्या पेठेतील 'कलाश्री' बंगला आणि त्यातला 'कानडाऊ भीमसेनू' हाच आमचा विठोबा! असो...
त्यानंतर चारच दिवसांनी पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे अमुक अमुक ठिकाणी अण्णांचं गाणं आहे. येणारेस का? नक्की ये."
मंडळी, ही तर केवळ आमच्या गानमैत्रिची सुरवात होती. त्यानंतर पाटणकर आजोबांबरोबर मी गाण्याच्या अगदी भरपूर मैफली ऐकल्या. कधी मालिनीबाई तर कधी भीमण्णा, कधी उल्हास कशाळकर तर कधी आमच्या मधुभैय्या जोश्यांसारखा शापित गंधर्व! कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे. कधी शाहिदभाईंची गाणारी सतार, तर कधी आमच्या दातारबुवांचं लयदार व्हायलीन! कधी भाई गायतोंड्यांनी तबल्यात मांडलेला नादब्रह्माचा महायज्ञ तर कधी विश्वमोहन भट्टांची मोहनवीणेतली मोहिनी! कधी अजय चक्रवर्तीचं चमत्कृतीपूर्ण परंतु प्रतिभावन गाणं, तर कधी राशिदखानचं मस्त मिजास भरलेलं आमिरखानी गाणं! खूप खूप ऐकलं, अगदी मनसोक्त ऐकलं!
माझ्यासोबत काही वेळेला माझ्या काही समवयस्क मित्रमैत्रिणीही असायच्या. मग पाटणकर आजोबा आणि आम्ही सारी त्यांची नातवंड (!) एकत्र गाणं ऐकायचो आणि त्यानंतर कुठेतरी भरपूर खादाडीही करायचो, धमाल करायचो! वास्तविक पाटणकर अजोबांचं वय तेव्हाही पंचाहत्तरीच्या आसपास होतं. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. त्यांचा उत्साह सर्वात अधिक!माझी सगळी मित्रमंडळी मला 'तात्या' म्हणत ते पाहून पाटणकर अजोबाही मला 'तात्या' म्हणू लागले. कधी मूड मध्ये असले की मला बाजूला घेऊन, "काय रे तात्या, ती अर्चना तुझ्यावर जाम खुश दिसते. जमवून टाक ना लेका! मी मध्यस्थ म्हणून बोलून पाहू का तिच्याशी?" असं हळूच डोळा मारून मला म्हणायचे! :)
पाटणकर आजोबांच्या घरीही मी अनेकदा गेलो आहे. मस्तपैकी चाळीतलं घर. आजोबा तिथे स्वतःपुरता स्वयंपाक करून एकटेच रहायचे. स्वयंपाक तर ते अतिशय उत्तम करायचे. त्यांच्या हाताला चव होती. "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" असं म्हणून झकासपैकी कांदेपोहे करून आणायचे. खूप गप्पा मारायचे. भरभरून बोलायचे. त्यांच्या उत्तम तब्येतीचा तर मला नेहमीच हेवा वाटायचा. ७५-७६ व्या वर्षीही हा माणूस चांगली तब्येत राखून होता, स्वतःची सगळी कामं स्वतःच करायचा!
त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फोनोग्राम होता. त्यावर त्यांच्याकडे असलेली, त्यानी चोरबाजारातून पाच पाच, दहा दहा रुपायाला विकत घेतलेली नारायणराव बालगंधर्वांची, हिराबाईंची आणि इतर अनेकांची ७८ आर पी एम च्या प्लेटांवरची ध्वनिमुद्रणे आम्ही एकायचो.
ध्वनिमुद्रणे ऐकता एकता पाटणकर आजोबा चंची उघडून स्वतःच्या हातानी माझ्याकरता पान जमवायचे. "तात्या, कात-चुना-सुपारी मी घालतो पण तंबाखू मात्र तुझा तू मळून घे हो!" असं गंमतीने म्हणायचे. वर पुन्हा "आपली व्यसनं आपण स्वत:च करावीत" हेही मिश्किलपणे सांगत. पाटणकर आजोबांच्या घरी खाल्लेल्या चमचमीत पोह्यांची, खमंग मुरबाडी आमटीभाताची, थालिपिठाची, आणि चुना-तुकडा कात- कच्ची रोठा सुपारी घालून जमवलेल्या पक्क्या कळीदार पानाची चव आजही माझ्या तोंडावर आहे! चुना-काळ्या तंबाखूच्या मळलेल्या चिमटीचा तो कडवट-मातकट स्वाद आजही मला पाटणकर आजोबांची आठवण करून देतो!
एकदा असाच पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे तात्या, येत्या रविवारी मी ८० वर्षांचा होतोय रे. दुपारी तुम्ही सगळे माझ्या घरी जेवायला या. अगदी नक्की आणि आठवणीने! वाट पाहतो!"
पाटणकर अजोबा ८० वर्षांचे झाले? केव्हा? मनाने तर ते एकविशीचे होते. आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी जेवायला? आम्हा ५-६ मित्रमंडळींचा स्वयंपाक हा म्हातारा एकटा करणार? असा विचार करतच आम्ही तिघेचौघे मित्रमैत्रिणी आजोबांच्या बिर्हाडी गेलो. बघतो तर काय? घरात अक्षरश: गोकूळ नांदत होतं! पाटणकर आजोबा स्वतःच्या कुटुंबियांबद्दल कधीच माझ्याशी बोलले नव्हते आणि 'एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात उगाच कशाला नाक खुपसा?' असा विचार करून मीही कधी तो विषय काढला नव्हता!
पाटणकर आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी चक्क त्यांची दोन कर्ती-सवरती मुलं अशोक आणि विद्याधर, सुना प्राजक्ता आणि नेहा, मुलगी सीमा आणि जावई प्रसाद, एवढी मंडळी जमा झालेली होती. आजोबांच्या आजुबाजूला ५-६ नातवंडं खेळत बागडत होती. पाटणकर आजोबांनीच त्या सगळ्यांशी, "हा माझा गाण्यातला जिवलग दोस्त तात्या" अशी माझी आणि आमची सर्वांची ओळख करून दिली!
मंडळी, खरंच सांगतो, आजोबांच्या घरचं ते गोकूळ पाहून अगदी आपोआपच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार!
पुढे असाच एकदा आजोबांच्या घरी गेलो असताना गप्पांच्या ओघात आजोबा कधी नव्हे ते स्वतःबद्दल बोलले. तसे ते खूप गप्पीष्ट होते परंतु स्वतःबद्दल फारच कमी बोलत. मला म्हणाले, "अरे तात्या, आमची सौ आम्हाला मध्येच सोडून गेली रे! तिला जबरदस्त कावीळ झाली, ती पोटात फुटली आणि सगळा खेळ खलास..मी मध्यमवर्गीय माणूस. तसा मला ग्लॅक्सो कंपनीत पगारबिगार बरा होता. शिवाय गावाकडचाही थोडाबहुत पैसा मिळाला म्हणून संसार तरी पूर्ण करू शकलो. माझी तिनही मुलं मात्र गुणी हो! उत्तम शिकली आणि आपापल्या मार्गाला लागली. सीमाही सुस्थळी पडली. दोन्ही मुलांनी उपनगरात मोठाल्या जागा घेतल्या आणि तिथे रहायला गेली. अरे त्यांचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत. या चाळीतल्या दोन खोल्यात ते कसं जमणार?
मला प्रेमाने त्यांच्याकडे रहायला बोलावतात. इथे एकटे राहू नका म्हणतात. पण मीच जात नाही रे! चाळ सोडवत नाही बघ! आणि अजून परमेश्वराच्या कृपेने तब्येत चांगली आहे. उत्तम दिसतंय, उत्तम ऐकू येतंय, स्वतःचं सगळं स्वत:ला करता येतंय, आणि मुख्य म्हणजे गाठीशी चार पैसे आहेत हे महत्वाचं! पैशाचं सोंग घेता येत नाही रे तात्या! तेव्हा असा विचार केला की उगाच कशाला त्यांच्यात जा? त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे की सुखाने! तेव्हा जमेल तितके दिवस इथे चाळीतच रहायचं असं ठरवलं आहे. मस्तपैकी गाण्याच्या मैफली वगैरे ऐकायच्या, धमाल करायची. शिवाय तुमच्यासारखी तरूण मित्रमंडळीही अधनंमधनं भेटतात, बरं वाटतं!"
पाटणकर आजोबा प्रसन्नपणे बोलत होते. बोलण्यात कुठेही खंत नव्हती, कडवटपणा नव्हता! पाटणकर आजोबांच्या रुपात एक उमदा मित्र मला बघायला मिळत होता. त्यांच्या आयुष्यात कसलीच तक्रार नव्हती, दु:ख नव्हती असं मी तरी कसं म्हणणार? त्यांच्याही काही तक्रारी असतील, दु:ख असतील, पण पाटणकर आजोबांची एकंदरीतच वृत्ती अशी होती की तिथे दु:खांना हा माणूस फार वेळ थाराच देत नसे! हिंदित 'सुलझा हुआ' असं काहीसं म्हणतात ना, तशी होती त्यांची पर्सनॅलिटी! जे आहे, जसं आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं.
पाटणकर आजोबांना मी कधी फारसं रागावतानाही बघितलं नाही. "आजोबा, तुम्ही नेहमीच आनंदी दिसता, कधीच भडकत नाही, रागावत नाही, हे कसं काय?" असं त्यांना विचारल्यावर ते हसून मला म्हणाले होते, "अरे समोरच्या माणसाने कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही ना! त्याला जसं वागायचंय तसंच तो वागणार! असं असताना मी त्याच्यावर उगाच कशाला रागावू? त्याला जसं वागायचंय तसं तो वागेल आणि मला जसं वागायचंय तसं मी वागेन! झाली की नाही फिट्टंफाट! मग कशाला उगाच रागावून भडकाभडकी करा आणि स्वत:चंच बीपी वाढवून घ्या?! खरं की नाही? दे पाहू टाळी!" असं म्हणत मोठ्याने हसले होते! :)
तर अशी पाटणकर आजोबांची आणि आमची दोस्ती बर्करार होती. गाण्याच्या मैफली झडत होत्या, खादाडीचे कार्यक्रम सुरू होते. म्हातारा अगदी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या चालीने आयुष्य जगत होता आणि अशातच एके दिवशी ध्यानीमनी नसताना आजोबांच्या मुलाचा, विद्याधरचा मला फोन आला.
"कोण तात्याच ना? अरे मी विद्याधर पाटणकर बोलतोय! आज सकाळी बाबा वारले. त्यांच्या डायरीत तुझा नंबर सापडला म्हणून तुलाही कळवतोय."
झालं! आमच्या सांगितिक वारीतला एक वारकरी स्वतःच वैकुंठवासी झाला होता. मंडळी, हे सांगितिक ऋणानुबंध फार त्रास देतात. रक्ताच्या नात्यापेक्षा संगीतातली नाती अधिक घट्ट असतात! मी चुपचाप उठलो आणि आजोबांच्या घरी पोहोचलो. मुलं, सुना, लेक, जावई, नातवंडं सगळी जमली होती.
आमचा म्हातारा शांतपणे घोंगडीवर विसावला होता. झोपेत असतानाच मृत्यु आला होता. चेहेरा अगदी शांत दिसत होता, त्यावर कुठल्याही वेदना दिसत नव्हत्या. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार!
आजोबांना पोचवून आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो. सुनबाईंनी पिठावर पणती वगैरे लावली होती. तिला नमस्कार केला. तिथून निघायला तर हवं होतं पण निरोप तरी कुणाचा घेणार? आता तिथे माझं कुणीच नव्हतं! शेवटी मी अशोक आणि विद्याधरशी औपचारिक पद्धतीने हात मिळवला व त्यांचा निरोप घेतला.
चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,
"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"
--तात्या अभ्यंकर.
3 comments:
पाटणकर आजोबांचं चित्रं डोळ्यासमोर उभं केलंत! तुमच्या हुबेहुब वर्णनामुळे ते आपल्याही ओळखीचे होते असं मला उगाचच वाटु लागलं आहे.
रोशनीवरची मालिकाही चांगली सुरू आहे. समाजातल्या एका अगदी वेगळ्या स्तराचं वर्णन लिहायला घेतल्याबद्दल धन्यवाद.
शेवटी तीही माणसंच आहेत. अध:पतनाचा शिक्का बसलेल्यांची माणुसकी व सभ्य जीवन भाग्यात असुनही तशी कामं करण्याची तुलना फार प्रभावी झाली आहे.
अभ्यंकर - मागचं वर्षभर तुमचं काहिना काही वाचतोय, पण मुद्दामच जssरा अंतर ठेऊन राहु म्हटलं. कारणं दोन - एकतर संगीतातलं मला काहिही कळत नाही आणि दुसरं म्हणजे तुमची काही ठिकाणची शिवीगाळ पाहुन - शिवीगाळ हा खरंतर चुकीचा शब्द आहे, न गाळता दिलेल्या शिव्या म्हणुयात - ’कशाला फंदात पडा’ असा केलेला विचार!
एनीवे - सांगायचा मुद्दा हा कि - लेख आवडला!
कोण कुणाला कसं भेटतं आणि त्यांच्यात कसलं नातं निर्माण होतं याबद्दल बोलण्याच्या फंदात पडत नाही कारण मग ते ’लाल करणं’ होईल. पण अधुन मधुन एखादा चांगला पिक्चर बघुन, किंवा चांगलं पुस्तक वाचुन किंवा एखाद्या रगेल/रंगेल (या खरंतर नाण्याच्या दोन बाजु) व्यक्तिमत्वाला भेटुन, किंवा तुमच्या भाषेत सांगायचं तर एखादं चांगलं गाणं ऐकुन - जशी अचानक सलाईन लावल्यासारखी तरतरी येते, तशी पाटणकरांबद्दल वाचुन आली.
त्या तरतरी बद्दल पाटणकरांना धन्यवाद आणि तुमचे आभार.
Wow zakkass
Post a Comment