April 23, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३४) - व्हायलीन ब्रदर्सची बंदिश सिंफनी...


व्हायलीन ब्रदर्सची
बंदिश सिंफनी..
(येथे ऐका)


उस्ताद अमज़द अली खान. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व..त्यांचे शिष्य देबशंकर आणि ज्योतीशंकर हे 'व्हायलीन ब्रदर्स' म्हणून प्रसिद्ध आहेत.. हे व्हायलीन बंधु हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य अभिजात संगीतात खूप चांगलं काम करत आहेत..पं रविशंकर, उस्ताद अमजदालि खासाहेब, त्याचप्रमाणे झुबिन मेहता यांच्याकडूनही त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळालं आहे..

'बंदिश सिंफनी'ची मूळ संकल्पना आणि संगीत उस्ताद अमजद अलींचे. राग यमन! यमनाची अगदी सुंदर सुरावट बांधली आहे खासाहेबांनी. आलाप-जोड-झाला आणि गत या अंगाने जाणारं प्रत्येक स्वरावलीतलं स्वरांचं नक्षिकाम आणि लयीची गुंफण अतिशय सुरेख..लयीचं काम तर विशेष छान झालं आहे! व्हायलीन ब्रदर्सनी अर्थातच अगदी लयदार, सुरेल, वाजवलं आहे. तानक्रिया सफाईदार आहे. तबला-मृदुंगासहीतचा सारा वाद्यमेळही त्यांनीच बांधला आहे..

अवघ्या तीन-साडेतीन मिनिटांचा हा यमन निश्चितच भव्यदिव्य आहे, श्रवणीय आहे.. यमनची ही सुरेख हार्मनी-सिंफनी मनाला आनंद देऊन जाते!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: