गायकी, चाल, वन-टू-थ्री-वन-टू-थ्रीचा ठेका, लय, माऊथ ऑर्गन, गाण्यातला जॉनी वॉकर! सगळ्याच बाबतीत एक फक्कड गाणं. रफीसाहेब आणि गीता दत्त नेहमीप्रमाणेच लाजवाब!
मुंबापुरी! काय लिहावं या शहराबद्दल? सारे शब्द अपुरे पडतात. मुंबापुरी, तिची दिवसरात्रीची धावपळ, तिची लगबग, तिची गर्दी, तिचे सण, तिचे उत्सव, तिची भांडणं, तिचं मनगटाला नव्हे तर मानेला घड्याळ बांधल्यासारखं वागणं! कुणीही कितीही पानच्या पानं लिहिली, नव्हे प्रबंध लिहिले तरी मुंबै शिल्लक राहतेच. सव्वा करोड पेक्षा अधिक लोकांचं पोट भरणारी मुंबई. सुखाने नांदते आहे, दु:ख पचवते आहे. मुंबादेवीचा आशीर्वाद असलेली अजब नगरी मुंबापुरी!
कही बिल्डिंग, कही ट्रामे, कही मोटर, कही मिल
मिलता है यहा सबकुछ एक मिलता नही दिल!
याच्याशी मात्र आम्ही सहमत नाही.. एखादा बाँबस्फोट होतो, २६ जुलै २००५ सारखा जेव्हा प्रलय होतो तेव्हा लहान-थोर-गरीब-श्रीमंत सारा मुंबैकर एक होतो, एकमेकांकरता जीव टाकतो, धावपळ करतो, जिवाभावाचा सखा असल्यागत वागतो..!
असो, उगीच वाद कशाला? गीता दत्त गाते त्याप्रमाणे,
'सुनो मिस्टर, सुनो बंधू ये है बॉम्बे मेरी जान' हेच खरं! :)
-- तात्या अभ्यंकर.
2 comments:
श्री तात्या अभ्यंकर : 'ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ' हे माझंही आवडतं गाणं आहे. ओ पी नय्यरचं मला हे आश्चर्य वाटतं की मला न आवडणारे तीन गायक हाताशी धरून त्यानी कारकीर्द गाज़वली. गीता दत्तचा हेल मला ऐकवत नाही. आशा भोसले गाणी अधिक ढसढसून (over-emoting) म्हणते. लताला मिळतात तशी गाणी आपल्याला मिळत नाही याचा न्यूनगंड घेऊन ही बाई आयुष्यभर गायली. तिच्या उथळ स्वभावाला हिंदी सिनेमातल्या उथळ ज़मावानी, या उथळपणात पंजाब्डे आघाडीवर, खतपाणी घातलं. म्हणून तिची खरी चांगली गाणी मनापासून संगीत देणार्या वसंत प्रभू आणि हृदयनाथकडे गायली गेली. का कोण ज़ाणे, बाबूजी-आशा युती मला कधीच आवडली नाही. गाण्यात नको तितक्या भावना ओतण्याचा केविलवाणा प्रयत्न हा रफ़ीमधेही दिसतो. पण त्या साहेबांची उथळपणापर्यंत गाडी पोचण्याइतकी बौद्धिक वाढच झाली नाही. ज़र clueless या शब्दाचं चालतं-बोलतं-गातं उदाहरण द्यायचं झालं तर रफ़ीसाहेबांचा पहिला नंबर लागणार. त्यातही त्यांच्यावर प्रभाव कोणाचा तर खर्या-खोट्या गोष्टी ठोकून देणार्या नौशादचा. विशेष धार्मिक नसलेल्या आपल्या आईला जाऊन 'मम्मी, मम्मी, लेकिन नौशाद चाचा तो कहते हैं कि दुनिया में ख़ुदा ही सब कुछ हैं' म्हणणार्या चार-पाच वर्षाच्या मुलाचं निर्व्याज़ आणि वाढ न झालेलं मन रफ़ीच्या सगळ्या गाण्यांतून ऐकू येतं. अशा तीन गायकांकडून नय्यरनी चांगली गाणी गाऊन घेतली ही कमालच झाली. त्यातही गीता-आशा यांची गाणी एका पातळीपर्यंतच चांगली झाली. रफ़ीचे मात्र नय्यरशी छान सूर ज़ुळले.
> कही बिल्डिंग, कही ट्रामे ...
>
इथे 'कहीं' असा शब्द आहे, 'कही' नाही. अनुस्वारविरहित 'कही'-चा अर्थ 'बोलणे' (जाने क्या तू ने कही') होतो. आपण मराठीत अनुस्वाराविषयी सैल वृत्ती स्वीकारली आहे आणि ती काही ठिकाणी मला ठीकही वाटते. तो प्रकार हिंदीत नाही. हिंदीतही चंद्रबिंदु वगळून 'कहाँ' शब्द 'कहां' असा लिहिलेले शब्दकोश मी पाहिले आहेत, पण अज़ूनही बरेच लोक लेखनशुद्धतेबद्दल ज़ुन्या नियमांचे आग्रही आहेत.
- नानिवडेकर
तात्या,’यस्स्स.....ये है बॊम्बे मेरी जान ’हेच खरं.
Post a Comment