राम राम मंडळी,
आत्ताच परततोय गेट वे ऑफ इंडियाहून. आज व्हॅलेन्टाईन डे ना? तसंही काही काम नव्हतं. धंदा आजकाल थोडा डाऊन आहे. नुसतं घरी बसून काय करणार? त्यातून रैवार. मग मी देखील गेलो होतो फिरायला माझ्या एका मैत्रीणीसोबत. .व्हॅलेन्टाईन डे साजरा करायला!
गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रकिनारी तीही आली होती मला भेटायला. त्यातून तिचा आज वाढदिवस. मी तिच्याकरता मेट्रोच्या क्यानीकडचे छानसे मावा नेले होते. आम्ही दोघं गेटवेला एक छानशी जागा पकडून बसलो. सुंदर हवा, गेटवेवरचा आल्हाददायक वारा. मी तिला हॅपी बर्थडे म्हटलं. तिनं तिचं ते नेहमीचं जीवघेणं स्मितहास्य केलं!
तिथेच आसपास एक फिरता भेळवाला घुटमळत होता. आम्ही भेळ खाल्ली, केक खाला. तिखट-चवदार भेळ खाताना ती अजूनच छान दिसू लागली. मला तिच्याशी खूप खूप बोलावसं वाटत होतं पण हाय-हॅलो पलिकडे मी तिच्याशी काहीच बोलू शकलो नाही. तिचं अस्तित्व, तिचं दिसणं, तिचं अवखळ हसणं, तिच्याकडे डोळे भरभरून पहाणं, हे डोळ्यात साठवतानाच माझा सारा वेळ जात होता. बोलायला-गप्पा मारायला वेळच मिळाला नाही..
काही वेळाने ती निघाली. तिला लौकर जायचं होतं.. मला टाटा करून, बाय बाय करून ती निघून गेली. ती आली केव्हा, गेली केव्हा हे कळलंच नाही..
तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पहात गेटवेवर पुन्हा मी एकटाच! तिच्यासारखी सौंदर्यसम्राज्ञी इतका वेळ माझ्यासोबत होती हेच माझं नशीब!
बराच वेळ तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिलो आणि भानावर आलो. अंधारून आलं होतं. समोर गेटवेचा अथांग सागर! अचानक माझ्या कानात आशाताईंच्या आणि गुरुवर्य किशोरदांच्या गाण्याचे काही स्वर गुंजन करू लागले..
काय दिसली होती ती त्या गाण्यात!
तसाच थोडा वेळ गेटवेला घुटमळलो. आणि कानात स्वर ऐकू येऊ लागले..
अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना..
संपलं! त्या गाण्यातल्या तिच्या त्या लाडिक विनवण्या, तिचं ते अवखळ, अल्लड दिसणं!
एका कुल्फीवाल्याकडून कुल्फी घेतली आणि पुन्हा एकदा गेटवेच्या बांधावर बसलो..आणि गाणं ऐकू येऊ लागलं..
जिंदगी भर नही भुलेगी वो बरसात की रात!
काय बोलू या गाण्यावर? ठीक आहे. माझी शब्दसंपदा एक वेळ कमी पडेल, मग वरील दुव्यावर जाऊन तुम्हाला तरी तिच्यावर आणि या गाण्यावर काही शब्द सुचताहेत का ते पाहा! मी मनमोकळी दादच देईन!
आता मात्र हळूहळू त्या गेटवेच्या गर्दीत मला स्वत:ला जरा एकटं वाटू लागलं.. तशी गेटवेला वर्दळ होती, प्रेमीयुगुलांची गर्दी होती पण मी मात्र एकटा पडत चाललो होतो..
कुठून तरी सोहोनीचे स्वर ऐकू येऊ लागले. राग सोहोनी..! शृंगारातील एक जीवघेणी अस्वस्थता आणि त्यात बडे गुलामअलीखासाहेबांची लोचदार-लयदार अशी सुरेल गायकी. मला काही उमगेना, स्वस्थता लाभेना, बेचैन वाटू लागलं! जवळच्याच एका ठेल्यावरून मी १२० पान लावलं. पान मस्त जमलं पण अस्वस्थता जाईना..
प्रेम जोगन बनके चे ते स्वरच बेचैन करणारे होते. त्यातला तिचा तो शृंगार! सलीमच्या भव्य महालातला तो एकांत. दूर कुठेतरी तानसेन सोहोनी गात बसला आहे त्याचे स्वर अंगावर येताहेत, अस्वस्थ करताहेत! आता ती अवखळ-अल्लड दिसत नाही.. नशीली दिसते! सोहोनीतल्या आर्त शृंगाराने तिचाही कब्जा घेतलाय!
सोहोनीचा अंमल उतरायला जरा वेळच लागला..
कोण ती? का घर करून राहिली आहे माझ्या मनात? मी आसपास पाहिलं. गेटवे भोवतालची ती सारी संध्याकाळ आपल्याच नादात मशगुल होती.. मजा करत होती. मग मीच का असा तिथे खुळ्यासारखा घुटमळत होतो?
खुळ्यासारखा कसा काय? तिला कुणी याद करो वा न करो.. पण निदान मला तरी तिला विसरता येणं शक्य नाही. खुळा तर खुळा! येडगळ तर येडगळ! तुम्ही काहीही म्हणा ना, मला फिकिर नाही..
विचार करत होतो तिच्या आयुष्यावर! तिचं अफाट अमर्याद सौंदर्यच तर त्या यक्षिणीकरता शापित ठरलं नाही ना? जिवंतपणीच दंतकथा कशी काय बनली ती? सुख का नाही लाभलं तिला आयुष्यात? मोकळेपणाने कधी कुणाशी काही बोलली का नाही? मरताना अशांत का होती??
परतीच्या प्रवासात होतो..वरील सर्व प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळण्याजोगे असे सूर ऐकू येऊ लागले..
मोहोब्बत की झुठी कहानी पे रोए!
-- तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment