त्रेपन्न सालची गोष्ट. नाटकांची जहिरात. अलिबाग -किहिम जवळील चोंडी नावाच्या लहानश्या गावात संगीत सौभद्र आणि संगीत संशयकल्लोळ ही दोन नाटकं अनुक्रमे १० आणि ११ जानेवारीला झाली त्याची जाहिरात. ब्रह्मचारीफेम मिनाक्षी, मास्टर दत्ताराम, सुरेशबुवा हळदणकर, रामभाऊ मराठे इत्यादींची जोरदार स्टारकास्ट! तबल्याला दामुअण्णा पार्सेकर आणि ऑर्गनवर गोविंदराव पटवर्धन ही जोडगोळी. सुरेशबुवा हळदणकरांनी 'श्रीरंगा कमलाकांता..' या होनाजी बाळा नाटकातील पदातील एका ओळीतील 'धोंडो-सदाशिव जोड रे' ही अक्षरं बदलली आणि तेथे 'दामू-गोविंदा जोड रे' ही अक्षरं टाकली तीच ही जोडगोळी! :)
चोंडीतल्या कुणा दत्तोबा पैठणकर यांच्या दुकानी तिकिटं 'रिझर्व्ह' होणार होती. साहेब नुकताच सोडून गेल्यामुळे 'आरक्षण', नाट्यगृह' या ऐवजी 'थिएटर', 'रिझर्व्ह' अश्या विंग्रजी शब्दांचा प्रभाव अधिक. तिकिटांची किंमत ८ आण्यांपासून ते ५ रुपयांपर्यंत. स्त्रियांकरता मात्र सरसकट बारा आणे हा दर.आणि बसायला? खुर्ची, बाक, ओटा, आणि पिट. साधा जमाना होता! :)
--तात्या अभ्यंकर.
No comments:
Post a Comment