December 05, 2007

काशीबाई..

राम राम मंडळी,

ठाण्याच्या एकविरा पोळीभाजी केन्द्राच्या बाहेर उभं राहून गरमागरम पोळीभाजी खायची आणि तिथूनच कार्यालयात जायचं हा माझा नित्याचा क्रम. घरगुती स्वरुपाची पोळीभाजी केन्द्रं, हा आम्हा चाकरमानी मुंबईकरांचा एक आधार. आज ठाण्या-डोंबिवली सारख्या शहरांत अशी अनेक पोळीभाजी केन्द्रं उभी आहेत. एकविरा पोळीभाजी केन्द्र हे त्यातलंच एक.

सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले असतात. मी एकविरेच्या बाहेर उभा असतो.

"आज तुझी आवडती वांगीबटाट्याची भाजी आहे रे दादा. आज जेव बाबा जरा निवांत!"

उजळ वर्णाची, म्हातारीशी सुरकुतलेली, गोल चेहेर्‍याची, गालावर छानश्या खळ्या असलेली, कपाळावर पुसटसे तीन हिरवट त्रिकोणी ठिबके गोंदवलेली, चेहेर्‍यावर समाधान असलेली काशीबाई मला म्हणत असते!

काशीबाई!

एकविरा केन्द्रात रोजंदारीवर भाकर्‍या करणारी एक बाई! एकविराच्या त्या लहानश्या जागेत खाली जमिनीवर बसून तीन-चार बायका पोळ्याभाकर्‍या करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यातलीच काशीबाई एक! भाकर्‍या करण्याचं काम काशीबाईकडे . काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची. पण तरीही ती माझ्याकरता खूप काही आहे. तिच्या समाधानी व्यक्तिमत्वाचा मी निस्सिम चाहता आहे!

सकाळी सकाळी लवकर उठून एखाद-दोन घरी जाऊन बाळंतीणींना शेक, अंगाला लावण्याचं काम करणे हेदेखील काशीबाईच्या नित्याचंच एक काम. काशीबाई बाळंतीणींच्या अर्भकांच्या मालिशची कामं करते हे मला माझा मित्र अमित चितळे याच्या घरी मी गेलो असताना कळले. तिथे अमितच्या मुलाला मालिश करायला काशीबाई आली होती. इथे तिचा एक गंमतीशीर संवाद सांगायचा मोह मला आवरत नाही.

पोराचं मालिश करून झाल्यावर काशीबाई अमितला म्हणाली, "दादा तुमचं पोरगं मोठेपणीसुद्धा असंच अगदी गोरंपान राहील"

"ते कसं काय?" अमितने विचारलं.

"त्याचं सामान बघा. कसं अगदी गोरंगुलाबी आहे! ज्याचं सामान असं गोरंगुलाबी असतं तो मोठेपणीही छान गोराच राहतो. पण सामान जरा जरी काळपट असेल तर मात्र गोरेपणा टिकणं कठीण आहे! :)

काशीबाई किती सहजपणे बोलून गेली होती हे! तिचे विचार ऐकून मी आणि अमित खो खो हसलो होतो. या जुन्या बायकांचे काही काही शब्द आणि आडाखे मोठे मजेशीर असतात! :)

मालिशची कामं करून मग काशीबाई एकविरेत येते. तिथे भाकर्‍या बडवायचं काम सुरू! साडेदहा अकराच्या सुमारास भाकर्‍यांच्या कामातून काशीबाई जराशी मोकळी होते व तीही तिथेच चार घास खाते. त्यानंतर हळूच चंची उघडून तंबाखू मळून खाईल. जुन्या खेडवळ बायकांची तंबाखू खायची जुनी सवय काशीबाईलाही आहे.

एके दिवशी मी असाच पोळीभाजी खात एकविरेच्या बाहेर उभा होतो तेव्हा तिथेच खाली जमिनीवर बसून अगदी मन लावून भाकर्‍या करत असलेल्या काशीबाईने माझं लक्ष वेधलं.

'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काशीबाई भाकर्‍या करता करता असं काहीसं छानसं कुठलंतरी खेडवळ लोकगीत आपल्याच नादात गुणगुणत होती. त्याची चाल, शब्द सगळंच मला अपरिचित होतं पण ऐकायला छान वाटत होतं. रोजंदारीवर भाकर्‍या करण्यासारखं कष्टप्रद काम करतानादेखील ही बया काय छान गुणगुणत होती! माझाही स्वभाव तसा बोलघेवडाच. मी पटकन तिला म्हटलं, "मावशे, खूप चांगलं गातेस की गं तू!"

तशी आजुबाजूच्या बायांकडे पाहात काशीबाई एकदम गोड लाजली आणि गायचीच थांबली! म्हातारीच्या खळ्या काय सुंदर दिसल्या लाजताना! त्या दिवसापासून माझी आणि काशीबाईची 'आखो ही आखोमे' गट्टीच जमली! माझ्या रोजच्या वेळेवर मी पोळीभाजी खायला गेलो की नजरेतूनच आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अधिक काही बोलणं, गप्पा मारायला वेळही नसायचा आणि कारणही नसायचं!

एकविरेत रोज तीन चार प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या, झुणका असायचा, भाकरी, पोळ्या असायच्या. एकदा पातेल्यातल्या वांगीबटाट्याच्या रस्साभाजीकडे पाहून, "अरे वा! आज वांगीबटाट्याची भाजी का? वा वा!" अशी नकळतपणे माझ्याकडून दाद गेली!

"आज हीच भाजी मला दे" असं मी काऊंटरवर बसलेल्या शिवरामला सांगितलं.

"अरे दादा, वांगीबटाट्याच्या भाजीसंगती भाकरी खा की! चपाती कशापायी खातो?" काशीबाई प्रथमच माझ्याशी बोलत होती! अगदी डायरेक्ट! :)

तिचं बोलणं ऐकून शिवरामही क्षणभर चाचपडला, मग लेगच सावरून म्हणाला, "खरंच, आज चपाती नको, भाकरीच खावा साहेब. आमची काशीबाई भाकर्‍या एकदम फस्क्लास करते! "
'First Class' या इंग्रजी शब्दांचा उच्चार 'फर्स्ट क्लास' असा आहे हे शिवरामला अमान्य होतं! :) असो, रंगाने जर्द काळ्या, बोलक्या डोळ्यांच्या, अंगाने सडपताळ परंतु देखण्या असलेल्या शिवरामविषयी पुन्हा केव्हातरी! कुणालाही हवाहवासा वाटावा असाच आमचा शिवराम आहे!:)

"थांब जरासा, आत्ता गरम भाकरी करून तुला देते!"

वास्तविक पातेल्यात आधी केलेल्या १०-१२ भाकर्‍या शिल्लक होत्या, परंतु मला गरमगरम भाकरी मिळावी अशीच माझ्या मैत्रिणीची इच्छा होती! माझ्याकडून मी काशीबाईला केव्हाच माझी मैत्रिण मानले होते परंतु तिच्याकडूनही माझ्याबद्दल तेवढाच ओलावा आहे हे वरील भाकरीच्या एका साध्या प्रसंगातून मला समजले आणि त्याचा आनंद त्या गरम भाजी भाकरीपेक्षा अंमळ अधिक होता! किंबहुना, काशीबाईने आपणहून मला गरमागरम भाकरी करून दिली त्यामुळे ती भाजीभाकरी मला अधिक गोड लागली!

मी त्या म्हातारीच्या जवळजवळ प्रेमातच पडलो होतो. मला त्या बाईबद्दल खूप उत्सुकता होती, तिच्याशी भरपूर बोलावंसं वाटत होतं! पण कधी? ती बिचारी आत बसून आपल्या भाकर्‍यांच्या व्यापात मग्न असे आणि मलाही तिथे अधिक काळ थांबायला वेळ नसे. पण एके दिवशी तिच्याशी बोलायचा, तिच्या घरी जायचा प्रसंग आला. मी नेहमीप्रमाणे एकविरेत पोळीभाजी खाण्याकरता गेलो होतो. मला पाहून काशीबाई उठली आणि तिने एक कार्डवजा कागद माझ्यापुढे धरला.

"जरा हे कार्ड बघ रे दादा. ह्याचे पैशे कधी भेटणार मला?"

पोष्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमचं ते कार्ड होतं. पाच वर्ष संपलेली होती आणि आता काशीबाईला व्याजा/बोनससहीत पाच-पंचवीस हजारांची रक्कम मिळणार होती असं ते कार्ड दर्शवत होतं!

"अगं मावशे, तुला फार काही करावं लागणार नाही. आज उद्या केव्हाही टाऊन पोष्टात जा. मास्तरांना भेटून हे कार्ड दाखव, ते सांगतील तिथे सह्या कर म्हणजे लगेच तुला ह्याचे पैशे भेटतील!"

"धत तुझी मेल्या! मला कुठं सही करता येते? तू येशील का माझ्यासंगती? ती पोष्टाची बया धा धा निरोप धाडून पण येईना बघ!" निरागसपणे हसत काशीबाई म्हणाली.

काशीबाईचे पैसे गुंतवणारी कुणी महिला एजंट आता तिला भेटतही नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. एकदोन दिवसातच मी तुझ्याबरोबर पोष्टात येईन असं मी काशीबाईला कबूल केलं आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी दोनअडीचच्या सुमारास मी मुद्दाम वेळ काढून काशीबाईसोबत पोष्टात गेलो. पोष्टाच्या बाहेर आमची रिक्षा उभी राहिली. काशीबाईने आपल्या मळकटश्या बटव्यातून पैसे काढले.

"थांब मावशे. मी देतो रिक्षाचे पैसे" मी सहजंच म्हटलं.

"माझं काम अन तू कशापायी पैशे देणार? वा रं वा!" काशीबाई जवळजवळ ओरडलीच माझ्यावर! पण ते माझ्यावर ओरडणं नव्हतं तर तो तिचा स्वाभिमान होता! काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! त्या भाकर्‍या करणार्‍या बाईची खुद्दारी माझ्यापेक्षा खूप खूप श्रीमंत होती! केवळ 'ओळखीचा चेहेरा' या आधारावर वांगीबटाट्याच्या भाजीसोबत गरम भाकरी खा असा आग्रह धरणारी प्रेमळ काशीबाई आणि रिक्षाचे पैसे मला देऊ न देणारी स्वाभिमानी काशीबाई मी पाहात होतो. प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!

पोष्टातलं काम झालं. काशीबाईला पैसे मिळाले. आम्ही पोष्टाच्या बाहेर पडलो. समोरच रंगीत बर्फाचे गोळे विकणारा उभा होता. मी गंमतीने काशीबाईला म्हटलं, "मावशे, बर्फ खायला घाल ना मला. ऊन खूप आहे, तहान लागली आहे!"

हे ऐकून मगासची स्वाभिमानी काशीबाई पुन्हा एकदा लहान झाली, निरागस झाली! :) मग मी आणि माझ्या त्या मैत्रिणीने दुपारच्या टळटळीत उन्हात मस्तपैकी लिंबूनमक लावलेले रंगीबेरंगी बर्फाचे गोळे एन्जॉय केले! व्हॉट अ डेट! :) एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! :)

"चल, येतोस का माझ्या घरला? इकडनं जवळंच माझं घर आहे. तुला चुरमुर्‍याचे लाडू देते!"

हे ऐकून मला आनंदच झाला. मी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या घरी गेलो. किसननगरच्या वस्तीतील एका चाळीत काशीबाईचं मोजून दीड खोल्यांचं घर. घरी एक तरुणी एका लहानग्या शेंबड्या पोराला बदडत होती. बहुधा त्या मायलेकरांचं काहीतरी बिनसलं असावं. घरात दुसरं एक लहानगं पोर होतं ते झोपलं होतं. मी आणि काशीबाई घरी पोहोचल्यावर ते शेंबडं पोर एकदम धावत आलं आणि काशीबाईला बिलगलं! काशीबाईने आभाळाच्या मायेने त्या पोराला जवळ घेतलं, आंजारलं, गोंजारलं!

बोलण्याबोलण्याच्या ओघात मला त्यांच्या घरातल्या काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या! काशीबाईचा नवरा एक नंबरचा बेवडा, काही कामधंदा करत नसे. दारूच्या अतिआहारी गेला आणि मरण पावला. काशीबाईला तीन मुलं. दोन मुलगे, एक मुलगी. मोठा मुलगा-सुनबाईने वेगळी चूल मांडली होती. ती मंडळी काशीबाईला थुंकूनही विचारत नव्हती. आई मेली काय नी जगली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता! दुसरा मुलगा चांगला हातातोंडाशी आलेला, रेल्वे अपघातात मरण पावला. त्याची बायको लहानगं मूल टाकून, त्याची जबाबदारी काशीबाईवरच सोपवून दुसर्‍या कुणाचातरी हात धरून पळून गेलेली. एक आई आपल्या मुलाला टाकून जाऊ शकते हे अविश्वसनीय होतं पण इथे मात्र तीच वस्तुस्थिती होती! मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वर्षादोनवर्षाच्या आतच नवर्‍याने टाकली म्हणून लहानग्याला घेऊन माघारी परतलेली!

आणि काशीबाई समर्थपणे हा सगळा गाडा ओढत होती, चालवत होती!

मला दूरदर्शनवरील समस्त मालिकांमध्ये कल्पनादारिद्र्य असलेल्या लेखक-दिग्दर्शकांची, ते त्यांच्या मालिकांमधून दाखवत असलेल्या मोठ्यांच्या खोट्या दु:खांची अक्षरश: दया आली, कीव आली!

"ए सुमन, दादाला लाडू दे आणि याला पण आण."

मांडीवर घेतलेल्या लहानग्याला खेळवत काशीबाईने सुमनला, त्या लहानग्याकरता आणि माझ्याकरता लाडू आणायला सांगितले! काशीबाईने केलेले ते गूळ चुरमुर्‍याचे लाडू आम्ही तिचे दोन्ही नातू खाऊ लागलो! एक नातू अगदीच लहान,बापाने टकलेला आणि एक मी! आपली लहानसहान मध्यमवर्गीय पांढरपेशी दु:ख गोंजारणारा!!

तो गूळचुरमुर्‍याचा लाडू त्या लहानग्याच्या एकदम तोंडात जाईना म्हणून काशीबाई त्या लाडवाचे तुकडे करून त्याला भरवू लागली. ते शेंबडं, लहानगं आता तो लाडू मटामट खाऊ लागलं आणि काशीबाईच्या चेहेर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहू लागलं! मला फक्त 'आजीची माया ही घट्ट सायीसारखी' एवढंच पुस्तकी वाक्य पाठ होतं!

"मुंबईची मुंबादेवी,
तिची सोन्याची साखली......"

असं काहीसं गाणं गुणगुणत काशीबाई सुमनच्या मुलाला हसतमुखाने खेळवत होती. बिचारीला 'गतं न शोच्यम' असा काहीसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे हेही ठाऊक नव्हतं! ते संस्कृत वचन न वाचताही ते ती किती सहजपणे आचरणात आणत होती! स्वत:च्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाच होता, पण आता कडेवर पोर घेऊन मुलगी माघारी आली होती आणि धाकट्या मुलाचं पोरही काशीबाईच्याच गळ्यात! बापरे! काशीबाईच्या या वयातही तिच्या अंगावर असणार्‍या जबाबदार्‍या पाहून माझंच धाबं दणाणलं होतं! सुमन मात्र मला खरंच खूप चांगली मुलगी वाटली. धुण्याभांड्यांची चार कामं तिने मिळवली होती. काशीबाईची शेक, अंगाला लावण्याची कामं, भाकर्‍या आणि सुमनची धुणीभांडी यांच्या वेळा त्या मायलेकींनी आपापसात ऍडजस्ट केल्या होत्या आणि दोघीही त्या लहान पोरांना सांभाळत होत्या!

'तुमची पुढील पैशांची व्यवस्था काय आहे?', 'या मुलांचं तुम्ही कसं करणार?' 'सुमनच्या मुलाचं ठीक आहे, पण काशीबाईच्या दुसर्‍या नातवाची जबाबदारी काशीबाईच्या पश्चात कोण घेणार?' 'की ती जबाबदारी सुमनवरच?' असे कोणतेही प्रश्न मी तिथे विचारू शकलो नाही, नव्हे तेवढी हिंम्मतच नव्हती माझ्यात! आणि स्वाभिमानी काशीबाई हे प्रश्न घेऊन माझ्या दाराशी कधीच येणार नव्हती! उलट हे प्रश्न विचारल्यावर, "तुला का रे बाबा आमची चिंता" असं म्हणून काशीबाईनी मला अगदी सहज झाडून टाकला असता याचीही खात्री होती मला!

हीच का ती काशीबाई, जी भाकर्‍या करताना सगळी दु:ख विसरून गाणी गुणगुणते? हीच का ती काशीबाई, मी रिक्षाचे पैसे देऊ लागल्यावर हिचा स्वाभिमान खाडकन जागा होतो? आणि 'मावशे तू छान गातेस बरं' एवढी लहानशीच दाद दिल्यावर चारचौघीत गोड लाजणारी हीच का ती काशीबाई? अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

"दादा, ये हां पुन्हा. लाडू आवडला ना गरीबाघरचा?" काशीबाईने मला हसतमुखाने विचारलं!

'लाडू म्हणजे मोतीचुराचा आणि तोही साजूक तुपातला!' अशी लाडवांबद्दलची माझी व्याख्या! काशीबाईकडच्या गूळचुरमुर्‍याच्या लाडवाने ती व्याख्या साफ पुसून टाकली!

आता पुन्हा एकदा एकवीरेत जाईन, तिथे वांगी बटाट्याची भाजी असेल, आणि पुन्हा एकदा काशीबाई मला म्हणेल,

"आज वांगीबटाट्याची भाजी आहे. तिच्यासंगती भाकरीच खा. आत्ता करून देते गरमगरम भाकरी!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

2 comments:

Ashish K. said...

> अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

Wah ! kya baat hai :-)

आशा जोगळेकर said...

आवडली तुमची काशी बाई. अन तिची ह्रदय हेलावून टाकणारी कथा.