December 31, 2007

सालस...

नमस्कार मंडळी,
ही एक जुनी हकिगत आहे. आत्ता केबलवर "त्रिदेव" नावाचा हिंदी चित्रपट लागला होता, तो जरा बघत बसलो होतो. पण त्यामुळे माझ्या काही पूर्वस्मृती जाग्या झाल्या. म्हटलं, त्या तुमच्याबरोबर share कराव्या.

१९८७-८८ सालचा सुमार असेल. आम्ही मित्रमंडळी कॉलेजचे रमणीय दिवस फारसा अभ्यास-बिभ्यास न करता फार मजेत व्यतीत करत होतो. मस्तपैकी रोज सकाळी कॉलेजांत टाईमपास करायचा, जोक्स सांगायचे, गाणी म्हणायची आणि धमाल करायची. त्यांत मी म्हणजे काय, एकदम फेमस! "तात्या जरा म्हण रे गाणी" असं कोणी म्हटलं की मी लगेच त्या हरबऱ्याच्या झाडावर चढायचो आणि गायचो. मग काय, सगळ्या मुलामुलींचा घोळका साला आपल्याभोवती!! मग काय विचारता, कँटीनमध्येच रोज एक छोटीशी मैफलच रंगायची. एहेसान तेरा होगा, अभी ना जाओ छोडकर, दिवाना हुआ बादल, हम प्यार मे जलनेवालोको वगैरे गाण्यांच्या फैरी झडायच्या.

तसा मी यथातथाच गायचो. पण च्यामारी मैफल मारून नेण्यांत आपण पटाईत! अहो, चांगल्या चांगल्या, छान छान दिसणाऱ्या मुलीसुध्दा कौतुकानं कम प्रेमानं म्हणायच्या, "कोण तात्या ना, क्या बात है, छानच गातो!" साला आपण खुष!!
वर्गांत कमीच बसायचो. सदैव कँटीन मध्येच पडलेला असायचो. आमचा कँटीनवाला बबल्या शिंदे सामोसे फक्कड करायचा. तोही माझा भक्त कम दोस्त होता. आमच्याच वयाचा बबल्या खरंच खूप छान मुलगा होता. मिष्कील होता. त्याला syjc मधली वैशाली जोगळेकर फार आवडायची. तसं त्यानं एकदा मला हळूच सांगीतलंही होतं. "च्यामारी तात्या, काय नशीब बघ माझं! साला कँटीनवाल्या पोऱ्याला कोण पोरगी पटणांर?, जाऊ दे" असं म्हणायचा!! पण कधी कधी वैशाली कँटीनमध्ये आलेली असायची तेव्हा बबल्या सामोसे जरा जास्तंच खरपूस आणि अधिक प्रमाने तळायचा! मध्येच माझ्या सुरू असलेल्या मैफलीत डोकावायचा, आणि तात्या, "चैनसे हमको कभी, आपने जिने ना दिया" हे गाणं म्हण, एक सामोसा फ्री देईन अशी ऑफरही द्यायचा!

एकूण काय, सगळी धमाल चालायची. गायचो-बियचो बरा, त्याच्या जोडीला बोलबच्चनगीरी, त्यामुळे काही मुलीं सुध्दा आमच्या गोटांत सामील झाल्या होता. त्याही आमच्या बरोबर खुप मजा करायच्या. मी त्या सगळ्या ग्रुपचा म्होरक्या!! अगदी "तात्या म्हणेल तसं" इतपत मी माझं प्रस्थं माजवलं होतं! असो. (गेले ते दिवस आता. हल्ली गेले ते दीन गेले हे गाणं खरंच फारच सुरेख म्हणतो मी! वेदनेतून गाणं जन्माला येतं म्हणतांत ना, ते असं!!)

संध्याकाळी पुन्हा सगळेजण (फक्त मुलंच) न चुकता ठरलेल्या नाक्यावर हजर! आमच्या ठाण्याच्या गोखले रोडला संध्याकाळी फार सुंदर हिरवळ असायची. (आजही आहे, पण हल्ली मुली मला "काका, जरा वाजले किती ते सांगता?" असं विचारतांत!, असो.) नाक्यावर उभं राहून आमची भरपूर थट्टा-मस्करी चालायची. शिवाय आमच्यातला प्रत्येकजण आपापला सभ्यपणा जपत, लाईनी मारत असे. ते वयच तसं होतं. एक मात्र खरं, की आमच्यापैकी कधी कोणी असभ्यपणा केला नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींवर फालतू कॉमेंटस् पास करणे, आचकट विचकट हावभाव करणे असले प्रकार आम्ही कधीच केले नाहीत. पण हळूच एखादीकडे बघणे, लाईन मारणे इतपतच आमची पापभिरू हिरोगिरी चालायची! त्यातच मजा असायची.

रोज संध्याकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला त्या रस्त्यावरून एक मुलगी जायची. रोजचा क्लासबीस संपवुन जात असेल घरी. तुम्हांला खरं सांगतो मंडळी, मला ती मुलगी अतिशय आवडायची! तशी ती दिसायला फार सुरेख वगैरे नव्हती पण एकंदरीत फारच आकर्षक व्यक्तिमत्व होतं तीचं. आपण तर बाबा मरायचो तिच्यावर. अत्यंत सालस दिसायची. पण तीचं तर नांवही आम्हाला माहीती नव्हतं, पण सालस दिसायची म्हणून तिचं नांवही आम्ही "सालस" हेच ठेवलं. ती येतांना दिसली की सगळे म्हणायचे, "अरे तात्या, लेका तुझी सालस येत्ये बघ!". "तात्या, तुझी सालस!" झालं, मी लगेच लाजेने चूरचूर व्हायचो! मग मी हळूच तिच्याकडे बघायचो. मंडळी, काय सागू तुम्हांला. खल्लास दिसायची हो ती! आहाहा, आत्ता हा लेख लिहितांना सुध्दा डोळ्यात पाणी आलं बघा!! दिवसभरच्या व्यापातून(?) संध्याकाळी एकदा का सालसचं दर्शन झालं की धन्य वाटायचं. एव्हढं होईपर्यंत ७.३०-७.४५ वाजलेले असायचे. सिगरेटचे झुरके आणि कटिंग मारून आम्हा मित्रांची पांगापांग व्हायची. मीदेखील सालसच्या आणि माझ्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत रंगवत घरच्या वाटेला लागायचो!!

असा रोजचा दिनक्रम सुरू होता. दिवस फार मजेत चालले होते. दिवसेंदिवस मी सालसच्या अधिकच प्रेमांत पडत चाललो होतो. सालस ही जगातली सर्वांत देखणी, सर्वांत आकर्षक, सर्वांत गुणी मुलगी वाटायची मला. पण सालसला त्याचा पत्ताच नव्हता!

अशीच एक छानशी संध्याकाळ. मस्तपैकी आमचा अड्डा जमला होता. सालस यायची वेळ झालेलीच होती. च्यामारी जी मुलगी आपल्याला एवढी आवडते, तिच्याशी आपली साधी ओळखदेखील नसावी, याचं मला राहून राहून वाईट वाटत होतं. एरवी मी अनेकींना माझ्या झुरणाऱ्या मित्रांबद्दल बिनधास्त अगदी भर रस्त्यात गाठून, कुठूनतरी ओळख काढून विचारलं होतं. पण सालसशी कसं बोलायचं? अरे यार, वो तो लाखोमे एक थी.. आहाहा, काय दिसायची हो.. छान सावळा रंग, आकर्षक, बोलकी चेहरेपट्टी.. मंडळी, काय सांगू तुम्हाला!

एकीकडे माझे मित्र मला म्हणत होते, "काय तात्या? अरे एवढा शूर तू. एका मुलीशी बोलायला घाबरतोस? च्यामारी, भीड बिनधास्त! अरे एवढा बोलबच्चन तू! आपल्या कॉलेजातल्या मुलींवर सफाईने शाईन मारतोस! फार फार तर काय होईल? नडेल, आखडेल! अरे यार, खरं काय ते एकदा कळू तरी देत. असा किती दिवस झुरणार तू?!"

गणेश सुतावणे नावाचा एक खट्याळ पोरगा आमच्या ग्रुपमध्ये होता. आम्ही त्याला गण्या म्हणायचो. महा खट्याळ कार्ट! नेहमी कुजबुजल्यासारखं बोलायचा. सदैव कुचकट टोमणे मारायचा, आणि स्वतःशीच खट्याळपणे हसायचा. तो एकदा मला गंभीर आवाजात म्हणाला," हे बघ तात्या, पू होऊन पिकायच्या आधीच कोणतंही गळू फोडलेलं बरं..!!! ...काय? तू एकदा तिला विचारूनच टाक...!!"

प्रसाद भणगे नावाचा आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता. माझा अगदी विशेष भक्त! त्याचं तर भलतंच निरीक्षण! तो तर एकदा मला म्हणाला, "तात्या, अरे ऐक माझं. मला खात्री आहे, तिलाही तू जाम आवडतोस!! अरे ती जेव्हा आपल्यासमोरून पास होते ना, तेव्हा तीही हळूच तुझ्याकडे बघते. मी स्वतः पाहिलंय!!":) "तू नुसतं एकदा तिला विचारायची हिंमत कर! बस! अरे, तुला सालस नक्की पटेल आणि तसं झालं तर मी अख्ख्या ठाण्याला पेढे वाटीन आणि बिल्डिंगला लाईटींग करीन..!!"

अहो कसलं काय मंडळी, हे सगळं प्रसादची माझ्यावरची भक्ती, मला धीर देण्याकरता बोलत होती. म्हणे तूही तिला जाम आवडतोस! छ्या..!! तिनं आजतागायत एकदाही ढुंकूनही माझ्याकडे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं!

एके दिवशी मात्र मी ठरवलंच! च्यामारी, आज तिच्याशी ओळख काढायचीच. बिनधास्त बोलायचं. जो होगा देखा जायेगा! घरातल्या घरातच आरशासमोर दोन-तीन रिहर्सल केल्या, डायलॉग पाठ केले! आणि पक्का निश्चय करूनच नाक्यावर गेलो. हळूहळू बाकीचीही मित्रमंडळी नाक्यावर जमली. नेहमीच्या गप्पा, कटींगचाय, सिगरेट सुरू झाली. आज मी तिच्याशी ओळख काढणार आहे, डायरेक्ट भिडणार आहे याबाबत मी कुणालाच थांगपत्ता लागू दिला नव्हता. पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझी फाटायला लागली! आज ती आलीच नाही तर फार बरं होईल असासुद्धा एक पळपुटा विचार माझ्या मनांत येऊन गेला! तेवढ्यात गण्या कुजबुजला, "तात्या, तुझी सालस...!!"

लांबूनच ती येताना दिसत होती. छानसा पांढऱ्या शुभ्र रंगाचा पंजाबी ड्रेस! चेहऱ्यावरती नेहमी दिसणारा एक आत्मविश्वास!! क्षणभर मनात विचार आला, जाऊ दे! आज नकोच हिला विचारायला!! आज ही इतकी छान दिसत्ये की आपल्याला नक्की नाहीच म्हणेल!! :) उगाच रिस्क कशाला घ्या! :)

"अरे! तात्याची सालस आली वाटतं!" "अरे यार तात्या, आज खरंच काय मस्त दिसत्ये रे!" विन्या म्हणाला.
एव्हाना ती येताना इतरही मित्रांना दिसली होती. पण तिला आज भिडण्याचा मी मनोमन प्लॅन केला आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं.

तेवढ्यात सुरेशचं माझ्यावरचं प्रेम उचंबळून आलं! तो हिंदीत म्हणाला, "चल तात्या, आज तेरे वास्ते आपून भिडता है उसको..!!"

"नको रे बाबा. तू वाटच लावशील माझी!" आमचा सुऱ्या म्हणजे एक अवतारच होता. हे जीवन म्हणजे एक हिंदी पिक्चरच सुरू आहे असं त्याला सदैव वाटायचं! उगाच काहीतरी तिच्यापुढे बरळायचा, आणि सगळं मुसळ केरात जायचं!!

कशी माहीत नाही, पण माझ्या मनातली घालमेल गण्याला कळली. तो नेहमीप्रमाणे हळूच कुजबुजला, "तात्या, ती येत्ये बघ! आज हे गळू फोडूनच टाक एकदाचं..!!" असं म्हणाला आणि हलकेच फीस्स्स करून हसला..!!
छ्या! हा गण्या म्हणजे खरंच एक हलकट माणूस होता...!! :)

'बस्स! ठरलं! नकोच ते! आज नाहीच विचारायचं! आज तिला नुसतं एक स्माईल देऊन बघावं काय होतंय ते..!!' असा मी ऐनवेळी निर्णय घेतला!! च्यामारी मंडळी, बघा काय पण माझी निर्णयक्षमता..!! आहे की नाही वाखाणण्याजोगी..!! :)
'काय सांगावं? कदाचित तीही मला उत्तरादाखल प्रतिस्माईल देईल.!!' या गण्याला नाही अक्कल! नुसत्या गोळ्या घेऊन भागत असताना मला ऑपरेशन (गळवाचं हो...!!) करायला सांगत होता...!! :)

हुश्श!! पण या निर्णयाने किती बरं वाटलं माझं मलाच!! :)

तिचं माझ्याकडे लक्ष जाईल, माझा चेहरा तिला स्पष्ट दिसेल हे पाहून मी थोडा ऍडजस्ट होऊन उभा राहिलो. नाहीतर मी नुसताच स्माईल द्यायचो, आणि ती आपल्याकडे बघायचीच नाही! साला, आपलं स्माईल फुक्कट!! :) शिवाय, पचका वेगळाच..!!

आता मात्र ती आमच्या खूपच जवळ आली होती, आणि ५-१० सेकंदातच आमच्या समोरून पास होणार होती, आणि मी तिला एक छानसा (माझ्या परीने..!!) स्माईल देणार होतो. आणि आज कधी नव्हे ती आमची नजरानजर झाली!

पक्षांची किलबिल थांबली, वारा स्तब्ध झाला, साऱ्या जगानं क्षणभर एक पॉज घेतला, आणि.....

(क्रमशः)--

तात्या.

December 21, 2007

सुगम रूप सुहावे...

राम राम मंडळी,

गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो! :) विशारद, अलंकार शिकणारे काही होतकरू विद्यार्थी कार्यक्रम संपल्यानंतर चक्क आमच्या पायाबिया पडले! अर्थात, आम्हीही एक विद्यार्थीच असल्यामुळे ते सर्व नमस्कार आम्ही मुखाने गोविंद गोविंद म्हणत भीमण्णांच्या पायाशी रुजू केले!

पण मंडळी, एकंदरीतच कार्यक्रमाला खूप मजा आली. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थी खरोखरंच चांगले गाणारे होते, मेहनत करणारे होते ही मला समाधानाची बाब वाटली. असो..

कालचा माझा विषय होता,
'

यमन रागातील बंदिशींचे सौंदर्य आणि विविधता!'

मंडळी, आजपर्यंत आंतरजालावर अनेक वेळेला मी यमनचे, यमनकल्याणचे अगदी भरभरून गोडवे गायले आहेत. तो रागच तसा आहे. अगदी अवीट. स्वभावाने अत्यंत तरल, हळवा आणि प्रसन्न! गेली अनेक वर्षे या रागाने संगीतकारांवर, गायकांवर, बंदिशकारांवर अक्षरश: मोहिनी घातली आहे. आमच्या अभिजात संगीताच्या दुनियेत तर असं मानलं गेलं आहे की ज्याला यमन गाता आला त्याला गाणं आलं! तसे आपल्या रागसंगीतात शेकडो राग आहेत. प्रत्येक कलाकार त्यातला प्रत्येक राग सादर करतोच असं नाही. परंतु असा क्वचितच कुणी कलाकार असेल की ज्याने यमनची साधना केली नाही, ज्याला यमनने भुरळ घातली नाही. म्हणूनच अभिजात संगीताच्या मैफलींतून आजही प्रत्येक लहानथोर गायक यमन गातो, यमनची साधना करतो. आमच्या भीमण्णांसारखा वयोवृद्ध कलाकार मैफलीच्या सुरवातीला आजही पटकन यमनची आलापी करू लागतो! असो..

तर मंडळी, अश्या या यमन रागात अभिजात संगीताच्या दुनियेत अनेक बंदिशी आहेत. माझ्यासारख्या यकश्चित कलाकारापासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाला यमनमध्ये काही ना काही बांधावसं वाटलं, त्याच्या स्वरांच्या माध्यमातून काही ना काही अभिव्यक्त करावंसं वाटलं. कालच्या शिबिरात मी यमन आणि यमनकल्याणमधील एकंदरीत चार वेगवेगळ्या बंदिशींबद्दल विस्तृत बोललो, त्याचं सौदर्य, त्यातल्या जागा श्रोत्यांना उलगडून दाखवायचा प्रयत्न केला. अभिजात ख्याल संगीत अतिशय उत्तम रितीने सादर करणारी ठाण्यातली माझी मैत्रिण वरदा गोडबोले हिने मोठ्या मनाने मला मदत केली व वानगीदाखल त्या चारही बंदिशींचे प्रात्यक्षिक दाखवण्याचे मान्य केले. त्या चारही बंदिशी तिने अतिशय उत्तम तर्‍हेने गाऊन दाखवल्या. त्या चारही बंदिशींबद्दल मी इथे दोन शब्द लिहिणार आहे आणि ऐकवणार आहे. हां हां. घाबरू नका मंडळी, मी स्वत: गाणार नाहीये तर युट्युबच्या साहाह्याने वरदाने गायलेल्या आपल्याला ऐकवणार आहे! :)

सुरवातीला मी तानपुरा उत्तम तर्‍हेने कसा लावावा, त्यात कोणकोणत्या गोष्टींना महत्व असतं याबद्दल दोन शब्द बोललो. एका विद्यार्थ्याने त्याचं लहानसं चित्रण केलं आहे ते आपल्याला खाली पाहा. मंडळी, तानपुरा कसा लागलाय ते ऐकून सांगा बरं का! जोड, खर्ज, पंचम सगळं बरोबर आहे ना बघा! :) असो..=====================================================================================

पहिली बंदिश आहे -


अस्थाई -

मतवारी हू आज मै
स्वच्छंद मंद स्वर सुगंध
देत हृदय आनंद

अंतरा -

दिनरंग की कृपा
मोपे है आसिस
तब होवे ग्यान सुलभ
श्रुति, सूर, लय, राग


ऐका ही बंदिश!मंडळी, ही बंदिश आग्रा गायकीचे बुजुर्ग असलेल्या पं दिनकरराव कायकिणींनी बांधली आहे. मुळात आग्रा गायकी ही उत्तमोत्तम बंदिशींकरता प्रसिद्ध. त्यात यमन रागातील बंदिश नसेल तरच नवल! कायकिणीबुवांनी या बंदिशीत काय सुरेख एकताल ठेवला आहे पाहा. 'मतवारी'त ल्या 'वा' वरच्या गंधारावर सम कशी अलगद येते! हा गंधार किती सुरेख आहे! 'स्वच्छंद मंद स्वर सुगंध' हे शब्द आरोही पद्धतीने किती सुंदर रितीने पुढे जातात! आणि 'देत हृदय आनंद' मधील 'आनंद' या शब्दात कायकिणीबुवांनी किती सुरेख शुद्ध मध्यम ठेवला आहे! क्या बात है.. 'आनंद' या शब्दात यमनातला हळवा भाव प्रकट होऊन तिथे यमनकल्याणची छानशी सावली पडते! अंतर्‍यातील 'दिनरंग की कृपा, मोपे है आसिस' या ओळीतील 'आसिस' शब्दावरील जागा कशी ठेवली आहे बघा! आणि श्रुति, सूर, लय, राग हे शब्द सुटे सुटे असून किती उत्तम तर्‍हेने चालीत बसले आहेत! मंडळी, माझं भाग्य हे की ही बंदिश खुद्द कायकिणीबुवांकडूनही मी मैफलीत ऐकली आहे...

=====================================================================================

मंडळी, गेल्या वर्षी होळीनिमित्त मी, माझ्या मैत्रिणी धनश्री लेले व वरदा गोडबोले, आम्ही तिघांनी मिळून मुंबईत काही ठिकाणी होळीवरील बंदिशिंचे कार्यक्रम केले होते. सवडीने मी या बंदिशींवर इथे विस्तृत लिहिणारच आहे. या सर्व बंदिशी धनश्री लेलेने रचल्या होत्या, मी त्या स्वरबद्ध केल्या होत्या आणि वरदाने त्या गायल्या होत्या. त्यात यमनकल्याण रागातलीही एक बंदिश होती. परवाच्या शिबिरात आम्ही प्रत्यक्षिकाकरता ही बंदिशदेखील घेतली होती. ही बंदिश मी अध्ध्या त्रितालात बांधली आहे. तात्या अभ्यंकरांनी धनश्रीच्या शब्दांना चाल कशी लावली आहे तेही सांगा हो! :)

ऐका ही बंदिश -
सजधज रंगत झुमे ब्रिजवा
नंदसुत खेलत होरी संगवा..

ठुमकत नाचत आवत गिरिधर..
लुपतछुपत सब गोपी राधा.
बिनती करत अब,
छेडो ना मनवा, छोडोरी संगवा, डारो ना रंगवा,
पीत, हरीत, नील, धुमल, पाटल.


क्या बात है, धनश्रीने किती सुंदर शब्द लिहिले आहेत! डोळ्यासमोर बृजवासात होळीची धमाल सुरू आहे, नंदसुत कन्हैय्या गोपींसमवेत होळी खेळत आहे, छेडखानी करत आहे असं चित्र उभं राहतं. 'नंदसुत' हा शब्द मला अतिशय आवडला. 'झुमे' शब्दावरल्या पंचमाचे आणि 'खेलत' या शब्दातल्या शुद्ध गंधाराचे सौंदर्य पाहा.

'ठुमकत नाचत आवत गिरिधर'!

'ठुमकत नाचत'! किती छान शब्द आहेत हे! 'आवत गिरिधर' मधली वरदाच्या आवाजातली तार सप्तकातील गंधारापर्यंतची सहजता पाहा! ठुमकत, नाचत येणार्‍या गिरिधराला पाहून धनश्री पुढे लिहिते,


'लुपत छुपत सब गोपी राधा!'

'क्या बात है.... त्या सगळ्या गोपी कृष्णाला लाडिकपणे विनवत आहेत, की बाबारे आमच्यावर उगाच रंगांची उधळण करू नकोस! (म्हणजे खरं तर उधळण कर! :)

कुठले रंग?


'पीत, हरित, नील, धुमल, पाटल!...:)

वरदाने किती सुंदर तर्‍हेने या सगळ्या रंगांची नावं गायली आहेत!

मंडळी, धनश्रीची ही बंदिश म्हणजे केवळ रंगांचीच उधळण नव्हे तर यमनच्या स्वरांचीदेखील उधळण आहे! रचनाकार आमची धनश्री असो, वा कविकुलगुरू कालिदास असो, वा अगदी माडगुळ्याचे महाराष्ट्र वाल्मिकी असोत, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतामध्ये कुठल्याही रचनेला सामावून घ्यायची ताकद आहे हेच खरं!

असो, मंडळी तात्या अभ्यंकरांचं हे कॉम्पोझिशन आपल्याला कसं वाटलं ते ऐकून अभिप्राय द्या बरं का! :)


=====================================================================================

त्यानंतर प्रात्यक्षिकादाखल आम्ही पं यशवंतबुवा महाले यांची एक बंदिश घेतली होती. तिचे शब्द आहेत,


जियरा नही माने,
उनबिन, जियरा नही माने...
कैसे कटे अब घडी पलछिन दिन

कासे कहू अब
जियाकी बिथा मोरी
चैन नाही मोहे, उनके दरस बिन..


ऐका ही बंदिश -मंडळी, पं यशवंतबुवा महाले हे आग्रा परंपरेतलेच. अण्णासाहेब रातंजनकरांचे शिष्य. पण महालेबुवांचा परिचय एवढ्या दोन ओळीतच पुरा होत नाही, होणार नाही. महालेबुवांवर एक विस्तृत लेखच मी लिहिणार आहे. गाण्यातला खूप मोठा माणूस. आमच्या महालेकाकूही उत्तम गाणार्‍या. पं गजाननबुवा जोश्यांच्या शिष्या. महालेबुवांचं आणि काकूंचं मला खूप प्रेम लाभलं हे माझं भाग्य!

महालेबुवा एकदा राजधानी एक्सप्रेसने दिल्लीला चालले होते तेव्हा त्याना ही बंदिश सुचली. राजधानीने द्रुत लयीत अगदी सुरेखसा ठेका पकडला असणार आणि महालेबुवांनी अगदी बिनचूकपणे ती लय पकडली असणार असंच ही बंदिश ऐकताना वाटतं! अश्या वेळेस 'गाडीची लय म्हणजे 'कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! :)


'जियरा नही माने..'

बंदिशीचा मुखडा तानेतला आहे. 'जियरा' शब्दावर बोलतान असून तिचं समेवर विसर्जन होतं! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं!

'कैसे कटे अब, घडी पलछिन दिन'

'कैसे कटे अब' मधल्या 'कैसे' तला फर्म पंचम आणि 'कटे' तला छानसा शुद्धमध्यम! या बंदिशीची अस्थाई ऐकताना असं वाटतं की 'जियरा'च्या तानेतल्या मुखड्यानंतर ही बंदिश 'कैसे कटे अब' च्या फलाटावर आमच्या शुद्धमध्यमाला गाडीत चढू देण्याकरता क्षणभर विसावली आहे! :) पण अगदी क्षणभरच बरं का! त्यानंतर लगेच समेला ऑफबिट पकडून 'घडी पलछिन दिन, जियरा नही माने' असं म्हणत बंदिशीतल्या राजधानीने पुन्हा आपली मूळ लय पकडली असावी!

'कासे कहू अब, जिया की बिथा मोरी' मधला तार षड्ज फारच सुरेख. 'चैन नाही मोहे' मधली अस्वस्थता पुढे 'उनके दरस बिन..'मधून फारच उत्तम रितीने अभिव्यक्त होते आणि त्याला जोडूनच गाडी पुन्हा 'जियरा नही माने..' या तानेतल्या मुखड्यावर येते! क्या केहेने..!

खरंच मंडळी, गाण्याकडे आपण जसं पाहू तसं आपल्याला गाणं दिसतं! फक्त गाण्याकडे पाहण्याची नजर हवी! आणि ती नजर बुजूर्ग कलाकारांना ऐकूनच मिळते, सतत गाण्यात राहूनच मिळते, गाण्यावर विचार करूनच मिळते! महालेबुवांनी किती सुरेख बंदिश बांधली आहे आणि वरदानेही ती तेवढीच छान गायली आहे. सध्या वरदाला महालेबुवांचीच तालीम मिळत आहे.

=====================================================================================

And now, Last but not the least...


सुगम रूप सुहावे, सलोने
माई, सुगम रूप सुहावे..
जलक ज्योत चित चोरत नित
सखिया संग मिल गाओ, रिझाओ
माई सुगम रूप सुहावे

जो देखेत चित, सोहिरी झरत
बिन देखे अमर, जिया आकुलावे,
माई सुगम रूप सुहावे....


मंडळी, ऐका ही भेंडीबाजार घराण्यातली पारंपारिक बंदिश!इस बंदिश के बारेमे क्या केहेने! माझी ही अत्यंत आवडती बंदिश आहे. या बंदिशीचा मूड किती सुरेख आहे बघा! क्या बात है..

मंडळी, राग जरी एकच असला तरी त्यातल्या वेगवेगळ्या बंदिशींमुळे त्याच रागाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बंदिशीचा एक मूड असतो, एक स्वभाव असतो हेच मी या लेखातून सांगायचा प्रयत्न केला आहे. आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातील 'आग्रा गायकी' म्हणजे बंदिशींचा खजिनाच. भातखंडेबुवा, रातंजनकरबुवा, जगन्नाथबुवा, कायकिणीबुवा, गिंडेबुवा अश्या एकापेक्षा एक दिग्गजांच्या बंदिशींमुळे आग्रा गायकी समृद्ध झाली आहे, संपन्न झाली आहे.

बंदिशींमधली ही विविधता पाहिली की 'हम राग नही, बंदिश गाते है' असं आग्रावाली मंडळी नेहमी म्हणतात ते पटतं. वर आपण दिनकररावांच्या 'मतवारी आज मै..' मधला प्रासदिकपणा पाहिला, 'सजधज रंगत झुमे ब्रिजवा' मध्ये वृंदावनातली होळी अनुभवली, 'जियरा नही माने..' मधली अस्वस्थता, ओढ पाहिली. त्याचप्रमाणे 'सुगर रूप सुहावे..' मधल्या अनामिक ओढीवर मला तरी जान निछावर कराविशी वाटते!

जेव्हा जेव्हा मी ही बंदिश ऐकतो तेव्हा तेव्हा एका निवांत अश्या एखाद्या फार्महाऊसवरची सुंदर संध्याकाळ माझ्या डोळ्यासमोर येते. तिन्ही सांजांची वेळही उलटली आहे. बाहेरच्या लॉनवरच खुर्ची टाकून मंद दिव्याच्या प्रकाशात आपण बसलो आहोत, समोर जीव ओवाळून टाकावा अशी लावण्यवती बसली आहे. समोरच्या प्याल्यातली ग्लेनफिडिच मला म्हणते आहे,

'अरे तात्या, तुझ्या समोर बसलेली लावण्यवती जेवढी सुरेख आहे, तेवढीच मीही सुरेख सोनेरी आहे रे! माझं माहेर स्कॉटलंड! तेथील मावळतीने मला हा सोनेरी रंग बहाल केला आहे! मला ऑन द रॉक्सच पी, त्यात सोडा किंवा पाणी टाकून माझी सोनेरी छटा, माझं 'स्कॉचपण' गढूळ नको करूस रे! :)

'सुगम रूप सुहावे..' या बंदिशीतल्या मध्यलयाची चैन जिवाला वेड लावते. या बंदिशिचा मूड थोडासा गझलेकडे झुकणारा आहे. पतियाळा, भेंडिबाजार गायकीचा खास बाज या बंदिशिला आहे. या बंदिशीचा नुसता अस्थाई-अंतरा मांडणं देखील वाटतं एवढं सोपं नाही. परंतु वरदाने मात्र ही बंदिश चांगलीच मांडली आहे. किराणा, पतियाळा गायकीचे बुजूर्ग कलाकार पं अजय पोहनकर ही बंदिश अतिशय सुरेख गातात. वरदालादेखील काही काळ पोहनकरांची तालीम मिळाली असल्यामुळे त्यांचाकडून तिने ह्या बंदिशींचे विधिवत शिक्षण घेतले आहे!

'रंजिश ही सही..' चा जो मूड आहे ना, तोच या बंदिशीचा मूड आहे. 'सुहावे' हा शब्द काय ठेवलाय! वा वा! 'सलोने माई' मधल्या पंचमाचा, रिषभाचा आणि गंधाराचा आपापसातला समजूतदारपणा पाहा! मंडळी, माणसं जर एकमेकांशी या स्वरांप्रमाणे समजुतदारपणे वागू लागली तर अजून काय पाहिजे?

जाऊ द्या मंडळी, या बंदिशीबद्दल किती लिहू आणि किती नको! आणि कितीही लिहिलं तरी ते कमीच पडणार आहे! या बंदिशीच्या सौंदर्यापुढे माझं शब्दसामर्थ्य अगदीच तोकडं आहे!

असो..

तर असा एकंदरीत हा बंदिशींच्या दुनियेतला प्रवास.. आपलं रागसंगीत आणि त्यातल्या बंदिशी हा कधीही न संपणारा एक अनमोल खजिना! ऐकणार्‍याने अगदी मनसोक्त ऐकत रहावं, बंदिशींच्या माध्यमातून रागांचे विविध रंग न्याहाळावेत, अनुभवावेत..!

मंडळी, या बंदिशींच्या दुनियेतला, रागसंगीताच्या दुनियेतला मी एक आनंदयात्री! काही प्रमाणात आपल्या सारख्या रसिकांनाही ही आनंदयात्रा घडावी याच हेतूने हा लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. परंतु एकंदरीतच गाणं ही अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं! कारण जिथे शब्द संपतात, तिथे सूर सुरू होतात! ह्या बंदिशी मला जश्या दिसल्या ते मी शब्दात मांडायचा प्रयत्न केला आहे. माझे शब्द आपल्याला कदचित आवडतील, न आवडतील. परंतु ह्या बंदिशी मात्र ऐकून कश्या वाटल्या हे अगदी अवश्य सांगा!

आपलाच,
(गाण्यातला!) तात्या अभ्यंकर.

December 20, 2007

मेरे मन ये बता दे तू...

राम राम मंडळी,

'मेरे मन ये बता दे तू..मितवा' या गाण्यातली मला दिसलेली सांगितिक सौंदर्यस्थळे सांगण्याचा हा एक प्रयत्न!
'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू..'


'मेरे' तल्या शुद्ध गंधाराने श्रीगणेशा. 'मन', 'ये' चा पंचमावरील सुरेख ठेहेराव. 'ये बता' मधली 'पसां' संगती गाण्यातला स्वाभाविक 'षड्ज-पंचम' भाव दाखवते. 'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच जाणवतो आणि अक्षरशः सुखावून जातो. क्या बात है..

'दे' वरील पंचम व 'तू' वरील शुद्ध धैवत यांची कानाला अत्यंत गोड लागणारी 'पध' ही संगती. याच संगतीमुळे 'मेरे मन ये बता दे तू' मधला 'दे तू' कमालीचा गोड आणि लोभसवाणा वाटतो! शिवाय 'पध' ही आरोही संगती 'मेरे मन ये बता दे तू' या वाक्याचा उत्तरार्ध कायम ठेवते आणि श्रोत्यांना, आता पुढे काय ? अशी उत्सुकता लावते! ;)

'किस ओर चला है तू' हे त्याचं उत्तर लगेचंच मिळतं! फक्त इथे 'है तू' तली 'पप' ही संगती आणि तिच्यातील इनबिल्ट पंचमावरील न्यास ह्या गोष्टी पूर्वीच्या 'दे तू' तल्या 'पध' संगतीसारखी श्रोत्यांची उत्सुकता अधिक ताणून न धरता श्रोत्यांचे समाधान करतात! विशेषत: 'चला' या शब्दावरील जागा फारच सुरेख आणि तरल आहे. क्या बात है.. ;)

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

वा! किती गोडवा आणि हळवेपणा आहे या ओळींत! साला ऐकूनच दिल खुष होतो. आता पुढच्या ओळी पाहू..

'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'

वा, किती साधे पण सुंदर शब्द आहेत! सरगम बरीचशी वरच्यासारखीच. तोच 'पध' आणि 'पप' चा संवाद. एक महत्वाचा फरक असा की 'क्या पाया नही तूने' मधली 'नही' ही तार सप्तकातल्या शुद्ध रिषभावरून तार षड्जावर स्थिरावलेली 'रेंसा' ही संगती आहे. 'नही' तल्या 'ही' या अक्षरावरचा बेहलावा ऐका काय सुरेख आहे! मस्त वाटतं ऐकायला..

'क्या ढुंड रहा है तू' मधला 'है' ही असाच सुखावह आहे! आणि त्यानंतर किंचितसा ऑफबीट टाकलेला 'तू'! वा..

मंडळी, खूप मजा येते हे गाणं ऐकतांना. हा लेख ज्यांना थोडीफार स्वरांची, लयीची ओळख आहे त्यांना अधिक चांगल्या रितीने समजू शकेल असे वाटते! अर्थात, ज्यांना स्वर समजत नाहीत त्यांचंही काहीच अडत नाही. कारण गाणं हे भावल्याशी कारण व हृदयाला भिडल्याशी कारण! ;)

पुढे जाऊया!

'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

यातल्या 'वो बात क्या है बता' मध्ये पहा कसा एक एक स्वर ठेवला आहे! 'वो', 'क्या' आणि 'बता' तल्या 'ता' वर धीम्या केरव्यातल्या समेची कशी छान टाळी येते पहा. मस्त...!

आगे बढेंगे!

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!'

मंडळी, 'वो बात क्या है बता...' या ओळीनंतर हे गाणं 'पनीसां' ही संगती घेऊन डायरेक्ट तार षड्जाला अनपेक्षितपणे भिडतं! एकदम वळण घेतं. इतका वेळ सुरातल्या सुरात डुंबणारं हे गाणं ताल तोच असला तरी लयीच्या दुगुनचौगुन मध्ये शिरतं! तालाच्या एका छानश्या लयबद्ध पकडीत जातं! क्या बात है मंडळी, खरंच क्या बात है! शंकर महादेवनसारखा विलक्षण प्रतिभावान कलावंत आपल्याला लाभला ही मी अत्यंत भाग्याची गोष्ट समजतो!

दिल्ली स्थानकाला भले १० फलाट असतील. १० नंबरच्या फलाटाहून मुंबईकडे येणारी पंजाबमेल सुटते. दिल्ली स्थानकाबाहेर पडते. दिल्ली स्थानका बाहेरही रुळांची गर्दी असते. त्यातून एक एक रूळ बदलत, ओलांडत अखेर ती मुंबईकडे जाणार्‍या ठाराविक रुळावर येते आणि मग एका लयबद्ध रितीने धावू लागते. या गाण्यातल्या मितवावरही थोडंफार असंच होतं बरं का मंडळी! ;)

'मेरे मन ये बता दे तू, किस ओर चला है तू.. '
'क्या पाया नही तूने,क्या ढुंड रहा है तू'
'जो है अनकही, जो है अनसुनी,वो बात क्या है बता...'

या छानपैकी गुणगुणाव्याश्या वाटणार्‍या ओळी ओलांडून गाठलेला,

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या!' हा टप्पा खासच! ;)

आणि मग पुन्हा वरील सर्व ओळी आणि मितवा हे सगळं एकाच लयीत धावू लागतं.

'मितवा....कहे धडकने तुझसे क्या,मितवा....ये खुदसे ना तू छुपा'

बाकी 'मितवा' हा शब्द सुरेखच आहे! का माहीत नाही, पण हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या 'कहे' तल्या 'हे' वर इतकावेळ पिक्चर मध्ये नसलेला कोमल निषाद अचानक प्रवेश करतो आणि या गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतंम् एक वेगळाच टच येतो. खरंच मंडळी, स्वरांची जादू काही औरच! क्या बात है..

'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. सरगमही छान केली आहे. गाणं लिहिलंही उत्तम आहे. त्याचा अर्थ मनाला भिडतो. गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. मंडळी, गाण्याचं ऍरेंजिंग हेदेखील संगीत दिग्दर्शनाइतकंच महत्वाचं असतं तरच चालीचा परिणाम उत्तमरीत्या साधला जाऊ शकतो. एकंदरीतच या गाण्याची भट्टी मस्तच जमली आहे हे निर्विवाद!

शाहरुख आणि राणीवर चित्रित झालेलं हे गीत. आमची राणी बाकी काय छान दिसते हो, क्या बात है! आपंण तर साला तिच्या प्रेमातच आहोत!

श्शश्श शाहरुख हा प्राणीदेखील आपल्याला आवडतो. तसा टॅलेंटेड आहे! :)

शंकर महादेवन जेव्हा सरगम गातो तेव्हा बाकी राणी मस्तच नाचली आहे हो! वा..! शंकरने सरगम छानच गायली आहे!

जीवन डगर मे, प्रेम नगर मे
आया नजर मे जबसे कोई है,
तू सोचता है, तू पुछता है
जिसकी कमी थी, क्या ये वही है?

राणीकडे पाहता पाहता मितवाचा हा स्वतःच्या मनाशीच चाललेला संवाद सुंदर आहे. जिसकी कमी थी, क्या है वही है? या प्रश्नाचं उत्तर मितवा लगेचंच देतो..

हा ये वही है, हा ये वही है
तू इक प्यासा, और ये नदी है

मग? :)

काहे नही इसको तू खुलके बता?..

अरे भाई, अगर छोकरी अच्छी लगती है तो बोल दे ना बॉस!

काहे नही, इसको तू, खुलके बता या सर्वांमधला ऑफबिट छानच टाकला आहे!

अरे बाबा माझ्या मितवा, मनोगता,

ये जो है अनकही, हो है अनसुनी
वो बात क्या है बता, मितवा....

मेरे मन ये बता दे तू,
किस और चला है तू
क्या पाया नही तुने,
क्या ढुंड रहा है तू..

बा माझिया मना, सांगून टाक एकदा तू नक्की कुठे चालला आहेस? तुला काय हवं आहे अन् तू काय शोधतो आहेस :)

मस्त गाणं आहे! गाण्याचं चित्रिकरण आणि लोकेशनस् ही छान आहेत. हिंदी चित्रपटांत अशी छान छान गाणी यापुढेही यावीत हीच इच्छा!

असो! मंडळी सध्या इथेच थांबतो. माझं हे खूप आवडतं गाणं आहे म्हणून यातल्या काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या.

हा लेख मी माझा मित्र राजीव देसाई याला समर्पित करत आहे. छ्या! कधी कधी ही NRI लोकं खूप त्रास देतात. राजीव आता लंडनला असतो. अलिकडेच नोकरीधंद्यानिमित्त बदली होऊन तिकडे गेला. मुंबईत होता तेव्हा नेहमी मला आग्रहाने घरी बोलवायचा. 'ये रे तात्या, काय भाव खातो? मस्तपैकी गप्पा मारू ' असं त्याने अक्षरशः अनेकदा बोलावलं असेल! पण कामाच्या व्यापात मलाच त्याच्याकडे कधी जायला जमलं नाही. किंबहुना मी गेलो नाही असं म्हणूया!
का माहीत नाही, पण आज अचानक राजीवची खूप आठवण झाली. त्याला खरंच आज मी खूप मिस करतोय! आज संध्याकाळी राजीवकडे जांण्यासाठी खरं तर वेळही होता. भरपूर गप्पा मारल्या असत्या त्याच्याशी आणि उर्मिलाशी! पण आता राजीवच मुंबईत नाही! त्याने १० वेळा प्रेमाने बोलावलंन तेव्हा गेलो नाही, आता वाटून काय उपयोग? ;)

शेवटी माणसं जपली पाहिजेत हेच खरं. गाणं तरी माणसाला अजून वेगळं काय शिकवतं?!

पुन्हा एकदा,

'मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू.. '

या दोन ओळी गुणगुणतो आणि हा लेख संपवतो! ;)

आपलाच,
तात्या मितवा! :)

December 17, 2007

खूप काही हरवलं आहे!

राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.

कुठलं होतं ते भावगीत?

'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! :) अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं! :)

कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं! :)

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !

यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे! :)

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत! :)

हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? :) पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही! :)

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे! सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला! :)

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही! :)

आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला! माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीची वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचावयास मिळेल!

December 14, 2007

शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई! ..१

राम राम मंडळी,

ख्याल गायन, ज्याला 'ख़याल गायन' असेही म्हटले जाते हे आपल्या भारतीय अभिजात संगीताचं, विशेष करून हिंदुस्थानी रागदारी संगीताचं एक प्रमूख अंग आहे. मैफलीत गाताना गवयाकडून ख़याल (यापुढे ख्याल) गायला जातो, तसाच तो श्रोत्यांकडून ऐकलाही जातो. आता ख्याल किंवा ख़याल म्हणजे विचार. 'आपका क्या ख़याल है', किंवा 'आपका क्या विचार है' हे संवाद आपण नेहमी ऐकतो. मग मंडळी, आता दोन मुख्य प्रश्न असे पडतात की,

१) अभिजात संगीतातला 'ख्याल' म्हणजे काय?
२) आणि जर तो 'ख्याल' असेल तर तो कसा मांडतात? आणि तो व्यक्त करण्याची माध्यमं जरी वेगवेगळी असली (भाषण/वक्तव्य आणि गाणं!) तरीही त्यात काय साम्य आहे किंवा काय फरक आहे?

'वा! काय सुंदर विचार मांडले आहेत!' असं आपण एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण ऐकून अगदी सहजच म्हणतो, त्याचप्रमाणे अभिजात संगीताच्या क्षेत्रात देखील 'किशोरीताईंचा ख्याल ना?, वा! ताई काय सुंदर आणि वेगळेच विचार मांडतात!' असंही आपण म्हणतो.

लोकगीत, भावगीत, नाट्यगीत इत्यादी गायनप्रकार जेवढ्या प्रमाणात ऐकले जातात त्या तुलनेत ख्यालगायन ऐकलं जात नाही असं माझं निरिक्षण आहे. त्यामुळे मला कल्पना आहे की हा लेख वाचणारा प्रत्येकच वाचक काही ख्यालगायन ऐकणारा असेल असे नाही. परंतु प्रत्यक्ष जरी कधी मैफलीत बसून ख्यालगायन ऐकले नसले आपल्यापैकी अनेकांच्या कानांवरून 'ख्यालगायन' हा शब्द निश्चितच गेला असावा!

तर मंडळी, 'वक्तृत्वातील ख्याल' आंणि गायनातील ख्याल' यात काय साम्य आहे (बरचंसं साम्यच आहे,) आणि काय फरक आहे हे या लेखातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. इथे मी 'वक्ता' म्हणजे 'उत्तम वक्ता' (जो दहा हजारात एक असतो असं काहीसं संस्कृत मध्ये म्हणतात तसा!) आणि ख्यालगायक म्हणजे 'उत्तम ख्यालगायक' हे गृहीत धरूनच लिहिणार आहे एवढं आपण कृपया लक्षात घ्या. मला सर्वच नसली, तरी उत्तम वक्त्याची आणि उत्तम ख्यालगायकाची काही लक्षणे माहिती आहेत, त्याचाच आधार मी घेणार आहे.

एखादा वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा 'शब्द' हे त्याचं माध्यम असतं. मैफलीमध्ये एखादा वक्ता जेव्हा गात असतो तेव्हा अर्थातच 'सूर' किंवा 'स्वर' हे त्याचं माध्यम असतं. इथे एक महत्वाचा फरक लक्षात घ्या की शब्द हे सगुणरूप घेऊन श्रोत्यांपुढे येतात तर ख्यालगायनातल्या आलापीचे, लयकारीचे, तानेतले, मंद्र-मध्य-तार सप्तकातले स्वर हे निर्गुणरुपी असतात! ते श्रोत्याला समजून घ्यावे लागतात, जाणून घ्यावे लागतात आणि जरी समजले/जाणता आले नाहीत तरी ते त्याच्या काळजाला भिडावे लागतात! परंतु श्रोता जर जाणकार आणि बहुश्रुत असेल तर त्याला श्रवणाचा आनंद तर मिळेलच परंतु समोरचा गवई काय गातो आहे, कसं गातो आहे हेही तो डोळसपणे पाहू शकेल, गायकीवर काही भाष्यही करू शकेल. परंतु दोन्हीही क्षेत्रात शब्द आणि स्वर ह्यांनाच अनन्यसाधारण महत्व आहे हे निर्विवाद!

मग आता वक्त्याचा शब्द आणि गवयाचा स्वर (वर म्हटल्याप्रमाणे मला येथे अभिजात ख्यालगायन अपेक्षित आहे, ज्यात निर्गुणी स्वरांचं साम्राज्य अधिक असतं.भावगीत नव्हे, ज्यात स्वरांसोबतच शब्दांचंही प्राबल्य असतं आणि जे बरचसं सगुणरूप असतं!) यांनाच जर सर्वाधिक महत्व असेल तर मग उत्तम शब्द आणि उत्तम स्वर यांचे निकष काय? अहो एखाद्या उत्तम गवयाचं गाणं जसं काळजाला भिडतं तसंच एखाद्या उत्तम वक्त्याचं भाषण देखील अक्षरश: रोमांच उभे करणारं असतं, उघड्या मैदानावरील हजारोंचा श्रोतृवृंद स्तब्ध करून टाकणारं असतं!

अर्थातच माध्यमं असतात, शब्द आणि स्वर!

मग कसे असावेत बरं हे शब्द आणि स्वर?

(क्रमश:)

-- तात्या अभ्यंकर.


हाच लेख इथेही वाचायला मिळेल!

December 10, 2007

अण्णा गायले!

राम राम मंडळी,

काही वैयक्तिक कारणांमुळे या वर्षी पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावू शकलो नाही, परंतु आजच त्या महोत्सवाला हजेरी लावलेले आमचे पुण्यातील मित्र चित्तोबा यांच्याशी फोनवर बोलणं झालं आणि त्यात आम्हाला एक अतिशय म्हणजे अतिशय आनंदाची बातमी समजली!

प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली ३ वर्ष गाऊ न शकलेले भारतीय अभिजात संगीताचे अध्वर्यु, पद्मविभूषण, स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी या वर्षी या महोत्सवात आपली गानहजेरी लावून आपले गुरू रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाईगंधर्व यांना स्वरांजली वाहिली!

मंडळी, संगीतक्षेत्रातल्या मंडळींकरता यापरीस दुसरी आनंदाची बातमी ती काय असू शकते?

आज वयाच्या ८५ व्या वर्षी अण्णांनी मुलतानी हा राग सादर केला आणि नारायणराव बालगंधर्वांचा 'अवधाची संसार' हा अभंग सादर केला. मुलतानी हा तर किराणा घराण्याचा खास राग आणि त्यावर अण्णांची असामान्य हुकूमत! तर 'अवघाची संसार' मधून त्यांच्या गुरूस्थानी असलेल्या नारायणरावांचं त्यांच्या जागा घेत घेत, त्यांची आठवण करून देणारं गाणं!

आत्ताच ईटीव्हीवरील बातम्यांवर ही बातमी दाखवली, अण्णांना गातांना बघितलं आणि धन्य धन्य झालो.

आजच्या फाष्ट, इन्स्टंट आणि एस एम एस ची भीक मागण्याच्या काळात अण्णांचा सच्चा सूर ऐकला आणि समाधान वाटलं! तोच सच्चा सूर, तीच श्रद्धा, तोच प्रामाणिकपणा, तीच सगळी तपस्या!! तीन वर्षच काय, परंतु तीनशे वर्ष जरी खंड पडला तरी अस्स्ल सोनं कधी बदलत नाही, त्याचा कस, त्याचा बावनकशीपणा कधी कमी होत नाही!!

मी संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या स्वरभास्कराला वंदन करतो आणि परमेश्वर त्यांना उत्तम प्रकृतीस्वास्थ आणि उदंड आयुष्य देवो अशीच मनापासून प्रार्थना करतो! तमाम संगीतसाधकांवर, विद्यार्थ्यांवर, आणि आम्हा संगीत रसिकांवर त्यांची छत्रछाया आणि त्यांच्या आशीर्वादाचा वयोवृद्ध थरथरता हात असाच राहो हीच मनोकामना!

आपला,
(भीमसेनभक्त) तात्या.

December 05, 2007

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

राम राम मंडळी,

रामचंद्र सहदेव प्रभू, ऊर्फ रामभाऊ प्रभू!

हे नांव म्हणजे काही लोकमान्य टिळकांचे नांव नव्हे की ते सर्वांना माहीत असायला हवे! :) परंतु तरीही हे नांव माझ्याकरता खूप मोठे आहे. माझ्याकरताच नव्हे, तर माझ्यासारख्या अनेक मत्स्यप्रेमींकरता, खानावळीच्या जेवणावर दोन टाईम अवलंबून असण्यार्‍यांकरता या नांवाचे महत्व आहे.

रामभाऊ हे मुळचे आमच्या कोकणातल्या कुडाळचे! पत्ता- मुक्कामपोष्ट पाट, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग! रामभाऊ हे कुडाळदेशकर, परंतु कोकणातल्या 'बाल्या' समाजातले! कोकणातले बाले! :)

साठाच्या दशकात पोटापाण्याच्या उद्योगाकरता रामभाऊ कोकणातून मुंबईस आले अन् मुंबईत बाँबेडाईंग कंपनीत गिरणी कामगार म्हणून कामावर रुजू झाले. कोकणातला बाल्या आता मुंबईकर 'बाल्या' झाला! :) गिरगावातील दोन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत रामभाऊंचा संसार सुरू झाला. रामभाऊंच्या पत्नी रजनीबाई म्हणजे साक्षात मालवणी अन्नपूर्णा! त्यांच्या हाताला जबरदस्त चव. मच्छीमटणाचे प्रकार तर सोडाच, पण रजनीबाईंनी साधा आमटीभात जरी केला तरी साक्षात भगवंत जगाच्या पाठीवर जिथे कुठे असेल तिथून रामभाऊंच्या गिरगावातल्या घरी जेवायला येईल! :)

रामभाऊंना तीन मुलं. एकट्याच्या पगारात भागेना म्हणून १९७२ साली रामभाऊंनी राहत्या घरातच पत्नीच्या मदतीने घरगुती स्वरुपाची खानावळ सुरू केली. स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच रजनीबाईंनीं आपल्या अंगावर घेतली आणि अगदी घरगुती स्वरुपाच्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची ही खानावळ उत्तम तर्‍हेने सुरू झाली. जेवायला येणारी गिर्‍हाईकं म्हणजे आजुबाजूचे सर्व मध्यमवर्गीय मराठी गिरगावकर चाकरमानी! बरीचशी कनिष्ठ मध्यमवर्गीयच मंडळी. त्या काळात गिरगावात मराठी माणसांची वस्ती बर्‍यापैकी होती. आजुबाजूच्या चाळी बर्‍यायचश्या चाकरमानी मराठी कुटुंबियांनी भरलेल्या होत्या. त्या काळात गुजराती, मारवाडी समाजाचा गिरगावातील शिरकाव आजच्या मानाने अगदीच कमी होता. असो! तर काय सांगत होतो?

तर 'समर्थ भोजनालय' या नांवाने ही खानवळ सुरू झाली. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबिल, कोलंबी, मांदेली, मुडदुशा, गाबोळी, कुर्ल्या, आदी मत्स्यप्रकार तसेच मटणवडे, कोंबडी, सुकं मटण, कोकम कढी असा न्यारा बेत ह्या खानावळीत शिजू लागला. अप्रतिम अशी घरगुती चव, वातावरणही घरगुती, आणि दरही वाजवी, त्यामुळे रामभाऊंची ही खानावळ अगदी उत्तम रितीने चालू लागली. आजतागायत अनेक मंडळी येथून जेवून, पोटातला अग्नी शांत करून गेली आहेत/आजही जात आहेत!कामधंद्याच्या निमित्ताने मला बरीचशी मुंबई फिरण्याचा योग आला. मासे, मटण खायची आवड असल्यामुळे बोरीबंदर जवळच्या पलटणरोड पोलिस ठाण्याजवळचं उत्तम खिमा मिळणारं आमच्या लक्ष्मणशेठचं 'ग्रँट हाऊस कँटीन', गिरगावातलंच ठाकुरद्वारचं 'सत्कार हॉटेल', त्याच्याच भावाचं डोंबिवलीतलं हॉटेल 'श्रीसत्कार', गिरगावातलंच उत्तम मटण-भाकरी मिळणारं 'भारतीय लंच होम', लालबागेतील गिरण्यांमधल्या कोकणी चाकरमानी गिरणी कामगारांचं आश्रयस्थान असलेलं 'क्षिरसागर हाटेल', बजारगेट स्ट्रीटवरचं 'संदीप भोजनालय', त्याच्याच भावाचं हॉर्निमन सर्कलचं 'प्रदीप भोजनालय', खोताच्या वाडीतलं खडपेबंधुंचं 'अनंताश्रम' (येथे प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी नेहमी जेवायला यायचे. दळवी हे आमच्या कोकणभूमीचेच सुपुत्र! :) अश्या अनेक ठिकाणी माझा नेहमीचा राबता असे. (या सगळ्या हॉटेलांवर मी सवडीने, परंतु अगदी भरभरून लेखन करणार आहे!)

अश्यातच एके दिवशी गिरगावातील गायवाडी बस स्टॉप जवळच्या गल्लीतील 'समर्थ भोजनालयात' जेवायचा योग आला आणि जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं! मी समर्थ भोजनालयाचा झालो आणि समर्थ भोजनालय माझं झालं! तिथली माशाची आमटी खाल्ली, तळलेली मांदेली खाल्ली अन् अण्णांच्या अभंगातील,

'याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा'


च्या ऐवजी 'शेवटचा दिस गोड झाला!' असे म्हणावेसे वाटले! :)

मंडळी, आमचे रामभाऊ हा वृत्तीने देव माणूस! खानावळ चांगली चालली आहे म्हणून हावरेपणाने वाट्टेल तसे दर वाढवणारा, जेवणात काहीतरी चालू माल वापरून गिर्‍हाईकांना फसवणारा किंवा लुटणारा नव्हे! सगळ्यांशी आपलेपणाने वागणारा, प्रसंगी दाराशी आलेल्या एखाद्या गरीबाला स्वतः आस्थेने जेवू घालणारा! कधी कधी पुढे बरीच कामाची गडबड असे म्हणून मी सकाळी ११ वाजताच त्यांच्या खानवळीत जेवायला जायचो. त्या सुमारास फारशी गर्दी नसायची. मग रामभाऊ हळूच गल्ल्यावरून उठून माझ्या शेजारी येऊन बसायचे. "काय तात्या, आज लवकर? आज सुरमई अगदी ताजी फडफडीत मिळाली आहे. देऊ?" मग माझ्या उत्तराची वाट न पाहताच, "अरे संज्या, तात्याला एक सुरमई ताट आण रे" असा मुदपाकखान्यातील त्यांचा मुलाला, संजयला हुकूम सोडायचे! :)

मंडळी, शेवटी काहीही झालं तरी रामभाऊ हा आमच्या कोकणातला. त्यामुळे कोर्टकचेर्‍या न करेल तरच नवल! रामभाऊचा आणि त्यांच्या भाड्याच्या जागेच्या मालकाचा काही कारणावरून कोर्टात खटला सुरू होताच! 'मग आता मी अन् माझा वकील काय काय कारवाया करणार आहोत, 'ही केस आपणच कशी जिंकणार', 'आपले सगळे मुद्दे कसे स्ट्राँग आहेत', हे सगळं सांगायला रामभाऊंना आस्थेने ऐकणारं कुणीतरी हवं असे! मी ते काम जेवता जेवता एकदम चोख करीत असे! :) मग मध्येच बोलण्याच्या भरात रामभाऊंचं माझ्या पानाकडे लक्ष जात असे. "अरे तात्या, अजून चपाती घे रे. हे काय? फक्त दोनच चपात्या? अरे संज्या, तात्याला गरम गरम चपाती आण रे. आणि थोडंसं कोलंबीचं कालवण पण घेऊन ये. बघ तरी तात्या, आज कोलंबी किती छान मिळाली आहे ती. अरे बाबा, कोलंबीच्या कालवणाचे पैशे नको देऊ फार तर! ते वाटल्यास माझ्याकडून भेट समज!" असं हसून म्हणायचे! आणि बिल देतेवेळी खरोखरंच ते पैसे रामभाऊ माझ्याकडून घेत नसत! आज रामभाऊ या जगात नाहीत. १९९९ साली रामभाऊ वारले. ती बातमी समजल्यावर घरचंच कुणीतरी गेल्यासारखं मला वाटलं आणि खूप भरून आलं!

हे आमचे रामभाऊ प्रभू. मुंबईच्या खानावळ संस्कृतीचे एक प्रतिनिधी!आज रामभाऊंच्या पश्चात आमच्या रजनीमावशी अन् त्यांची दोन मुलं संजय (संज्या) आणि विश्वनाथ (नाथा) आता ही खानावळ चालवतात. मंडळी, ही सगळी मंडळी त्यांच्या कुटुंबातलाच एक असल्यासारखं मला वागवतात. संज्याचं तर माझ्यावर भारी प्रेम. मी अजून लग्न केलं नाही याची माझ्यापेक्षा संज्यालाच अधिक चिंता! :) अगदी आजही कधी त्यांच्या खानावळीत जेवायला गेलो की संज्या मला मुली सुचवतो. "तात्या, अरे अमूक अमूक मुलगी आहे. आमच्या नात्यातलीच आहे. तुला चांगली मच्छी करून खाऊ घालेल आणि तुझ्या आईचीही काळजी घेईल. लग्न करून टाक बाबा आता. किती दिवस असा राहणार?!":)

माझ्या लग्नाच्या चिंतेत असलेला आमचा देवभोळा संज्या! :)मंडळी, रामभाऊ, रजनीमावशी, संज्या, नाथा, ही सगळी कोण आहेत माझी? ना रक्ताच्या नात्याची, ना गोत्याची! पण एक धागा आहे ज्याने मला व त्यांना जोडलं आहे, अगदी घट्ट बांधून ठेवलं आहे. तो धागा आहे परब्रह्म अश्या अन्नाचा, घरगुती चवीचा, अन् खानावळ संस्कृतीचा! आजच्या लोप पावत चाललेल्या या खानावळ संस्कृतीत हा धागा अजूनच घट्ट होत जाईल याची मला खात्री आहे!

तात्या जेवायला बसला आहे. तो मुंबईच्या खानावळ संस्कृतीचा एक वारकरी आहे!


आज मुंबईतच काय, तर सार्‍या जगात शेट्टी हाटेलांचे साम्राज्य पसरले आहे. अत्यंत महाग दर आणि तीच तीच पंजाबी चव! कधी टॉमेटोच्या मिश्रणात काजू पेस्ट, तर कधी काजूपेस्टमध्ये टोमेटो प्युरी वापरून केलेल्या त्या महागड्या पंजाबी भाज्या! मंडळी, हे सगळं पाहिलं की गिर्‍हाईकाला आस्थेने, घरगुती चवीचे पदार्थ वाजवी दरात जेवू घालणार्‍या रामभाऊंसारख्या किंवा अनंताश्रमच्या खडप्यांसारख्या खानावळवाल्यांचं महत्व लक्षात येतं. आजही अशी अनेक मंडळी आहेत की काही कारणांमुळे त्यांना घरचं जेवण मिळत नाही. अश्या मंडळींचं समर्थ भोजनालय सारख्या घरगुती खानावळी म्हणजे एक मोठं आश्रयस्थान आहे, आधार आहे. अहो नाहीतर रोज रोज पोटातली आग विझवायची कुठे? शेट्टीच्या हॉटेलातील महागड्या सोडा मारून केलेल्या पदार्थांनी तर साली पोटाची वाट लागायची!

असो, आता पुन्हा एकदा समर्थ भोजनालयात जाईन आणि आमचा नाथा मला फक्कडसं बोंबलाचं कालवण वाढेल, अन् संज्या पुन्हा एखादी चांगल्याश्या सालस, सोज्वळ अश्या मुलीचं स्थळ मला सुचवेल! मी 'अन्न हे पूर्णब्रह्म' असं म्हणत जेवून तृप्त होईन आणि नकळत माझं लक्ष भिंतीवरील रामभाऊंच्या तसबिरीकडे जाईल आणि त्यांच्या आठवणीने मन भरून येईल!

--तात्या अभ्यंकर.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

राम राम मंडळी,

तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की! मग उगाच कशाला मारे प्रगत मेंदूची अन जातीधर्माची शेखी मिरवा? :)

हां, तर काय सांगत होतो? तर जरी आपण ऍडव्हान्स बुद्धीचे वगैरे असलो तरी शेवटी मनुष्यप्राणीच ना? आणि प्राण्याला कुठे असते जातपात? मग आपल्याला तरी जातीधर्माचं लेबल कशाला हवं?! 'कोकणस्थ वाघ' किंवा 'कुडाळ देशकर सिंह' किंवा 'गौड सारस्वत अस्वल' असं आपण कधी ऐकलं आहे का? किंवा 'मुस्लिमधर्मीय उंट' किंवा 'जैनधर्मीय हरणटोळ' किंवा 'बौद्धधर्मीय खवलेमांजर' असं तरी आपण कधी ऐकलं आहे का? मग तात्याची जात तेवढी कोकणस्थ! किंवा अमूक तेवढा सारस्वत कुडाळदेशकर! किंवा तमूक तेवढा देशस्थ दांडगा! अश्या जाती तरी का आणि कशाला हव्यात, ते सांगा पाहू! :))

तरीही मला या समाजात रहायचं आहे त्यामुळे समाजाच्या चालिरीती, जातपात, धर्म वगैरेची बंधने मला पाळावी लागणार आहेत. अहो समाजाचं सोडा, संकष्टी चतुर्थीला घरी ओल्या बोंबलाचं कालवण केलेलं माझ्या मातोश्रीला तरी चालणार आहे का? माझ्या कानाखाली दोन आवा़ज काढून 'मेल्या, तुला लाज नाही वाटत? कोकणस्थाच्या घरात जन्माला आलास ना? मग संकष्टीला आवर्तनं करायची सोडून ओल्या बोंबलाची कालवणं खायची स्वप्न बघतोस?' असं ती मला खडसावेल! :)

म्हणून मग मंडळी, मी काय गंमत केली आहे ते सांगू का? मी या सगळ्या जातीपाती, धर्म वगैरे माझ्या खाण्यापिण्याच्या सोयीसवयीनुसार ऍडजस्ट केल्या आहेत! सांगतो कसं ते...

आता संकष्टीचंच उदाहरण घ्या किंवा दत्तजयंतीचं उदाहरण घा! त्या दिवशी मी अगदी कोकणस्थ ब्राह्मण असतो. म्हणजे साबुदाण्याची गरमागरम खिचडी, खरवस, उत्तम दर्जाची ताजी मावा बर्फी (उपासाला चालते हो!), बटाट्याचा कीस, आमच्या गोखलेकडचं पियूष किंवा शिंगाड्याच्या पिठाचे किंवा साबुदाण्याचे गरमागरम वडे, उपासाची मिसळ असले पदार्थ अगदी मनसोक्त हाणतो! जिभेचे चोचलेही पुरले आणि जातीपारी जातही राहिली! उपास असलेला कोकणस्थ ब्राह्मण, तात्या अभ्यंकर! जोडीला एखादं आवर्तनही म्हणतो, साला गणपतीबाप्पा पण खुश!! :)
(ओल्या बोंबलाच्या कालवणाचा बदला पुन्हा केव्हातरी घेतोच!:)

मामलेदार कचेरीजवळची किंवा कोल्हापुरातली झणझणीत मिसळ चापतांना मात्र मी ब्राह्मण नसतो बरं का! सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) मग त्या दिवशी मात्र मी मिसळीची तर्री चापणारा कुणी तात्या शिंदे, पाटील, किंवा तात्याबा म्हात्रे वगैरे असतो! :)

'अभ्यंकर' होऊन मिसळ खायला तेवढी मजा येत नाही हो! ती मजा कुणी शहाण्णव कुळी मराठा 'पाटील' बनूनच येते! त्यामुळे जसा खाद्यपदार्थ समोर असेल तशी जातपात, धर्म मी धारण करतो, मनाने त्या 'जाती'त जातो आणि मगच समोरचा पदार्थ चापतो! अगदी अस्स्ल चव लागते आणि वेगळीच मजा येते! आपणही अगदी अवश्य अनुभव घेऊन पाहा! नाहीतरी 'परकाया प्रवेश' नावाचा प्रकार असतोच ना! तसा माझा आपला 'परजात' किंवा 'परधर्म प्रवेश!' :)

छानपैकी सकाळची वेळ आहे, खास तमिळी उदबत्त्यांचा सुवास येतो आहे, कुठूनतरी एम एस सुब्बलक्ष्मींचं 'कौसल्या सुप्रजा' ऐकू येतंय, आणि समोर केळीच्या पानावर अस्सल तमिळी पद्धतीने केलेलं गरमागरम इडलीसांबार आहे! व्वा! तेव्हा मात्र मी तात्या सुब्रमण्यम असतो! मस्तपैकी तात्या सुब्रमण्यम किंवा तात्या अय्यर किंवा तात्या चिदंबरम बनून माटुंग्याच्या (पूर्वेला स्थानकाबाहेरच) श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस मध्ये जावं आणि तमिळी भोजनावर यथेच्छ ताव मारावा! केळीच्या पानावर काय सुंदर जेवण वाढतात! अस्सल तमिळी चव असलेलं सांबार, गरमागरम रस्सम, भात, कच्च्या केळ्याची किंवा सुरणाची किंवा अश्याच कुठल्याश्या कंदाची सुंदर भाजी असते, कुठलंतरी छानसं तमिळ पद्धतीचं पक्वान्न असतं! तमिळ लोकांच्यात परजात प्रवेश करावा आणि गरमागरम सांबार भाताच्या राशीच्या राशी उठवाव्यात! मला तिथे बसून यथेच्छ रस्सम सांबार भात जेवताना श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसचा मालक काय कौतुकाने माझ्याकडे पाहात असतो! समोरचं तमिळी अन्न भक्तिभावाने खातांना पाहून त्याला मी त्यांच्यातलाच कुणीतरी वाटतो! सोबत असलाच कुणी अस्सल तमिळी, तर जेवताजेवता त्याच्याशी 'ग्रॉस जी डी पी रेश्यो', 'बॅन्क रेट' यासारख्या विषयांवर विंग्रजीतून गप्पा माराव्यात! :) तीच तमिळी कथा रुईयाजवळच्या मणीजची! आहाहा, गरमागरम इडली खावी आणि उत्तम सांबार प्यावं ते 'मणीज'कडेच! साला 'मणीज'कडचं सांबार प्यायला नाही तो मुंबईकरच नव्हे!

छानशी दुपारची वेळ आहे, आणि मी गिरगावातल्या
समर्थ भोजनालयात बसलो आहे! बर्‍याचदा खाकी हाफचड्डीत वावरणारा आमच्या शिंदुदुर्ग जिल्ह्यातला मालवणी बाल्या संज्या मला खास मालवणीत विचारतोय, "खय तात्यानू, बर्‍याच दिवसान? गरमगरम सुरमय देवू?" आहाहा! अहो संज्याच्या तोंडातली ती अमृतवाणी ऐकली की कान तृप्त होतात हो! मग काय, समोरचं ते परब्रह्म असलेलं मासळीचं भरलेलं ताट आणि मी! आता मात्र मी तात्या वालावलकर होतो! :) खाणावळीतली इतर मंडळीही ठार गिरणगावकर, गिरगावकर चाकरमानी. मासळीवर ताव मारता मारता मग सचिनच्या बॅटिंगवर चर्चा! भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे अस्सल मुबईकर हा क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं समजतो, या वाक्याचा अनुभव समर्थ भोजनालयात येतो. तिथे सगळेच रमाकांत आचरेकर असतात! :)

मुन्शिपाल्टीत लायसन डिपार्टमेन्टला असलेला कुणी पांडुरंग मालंडकर, "मायझव तिच्यायला तात्यानूऽऽ, सालं क्रिकेटमध्ये हल्ली सगळं राजकारणच शिरलंय हो!" असं म्हणत बांगड्यावर ताव मारत असतो, 'बीईएसटी'त कामाला असलेला कुणी सुरेश पेडणेकर "नाय पण मी काय म्हणतो तात्याऽ, त्या गांगुलीला सचिनचं काय पण चांगलं झालेलं बघवत नाय बघा!" असं म्हणत कोलंबीची आमटी चापत असतो किंवा "अरे संज्या, जरा गरम मांदेली आण रे, आणि मटणात नळी दे म्हणून सांगितलं तुका तर नळी दिलीसच नाऽय! " अशी कंपलेन्ट कुणी वयोवृद्ध गिरणीकामगार करत असतो!

आहाहा! समर्थ भोजनालयात या टाईपच्या गप्पाटप्पा ऐकत ऐकत मासळीचं जेवायला काय मजा येते म्हणून सांगू! हां, पण तिथे मात्र मी तनमनधनानं 'वालावलकर', किंवा 'प्रभू', किंवा 'सावंत' असतो बरं का! तिथे तात्या अभ्यंकर किंवा तात्या चिदंबरम बनून गेलो तर साली मच्छी अळणी आणि बेचव लागेल! :)

भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण खाताना मी कच्छी बनिया तात्याभाई पटेल असतो, तर कोलंबीची खिचडी, वालाचं बिरडं आणि कानवले खाताना मी तात्या गुप्ते असतो! ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :)

क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो!

'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते!

मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :)

चला, आता मुंबईपासून थोडं दूर जाऊ आणि जरा वेळाने पुन्हा मुंबईत परत येऊ!

हैद्राबादेतल्या चारमिनार परिसरात मिळणारं हलीम किंवा लखनऊच्या हनीफभाईची आख्ख्या लखनवात घमघमाट सुटणारी 'दम' केलेली गोश्त बिर्याणी खाताना मात्र मला जातच काय पण धर्मही बदलावा लागतो! छ्या, त्याशिवाय ती चव अनुभवताच येत नाही! जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला!

तिच कथा हनीफभाईकडच्या लखनवी बिर्याणीची. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला लखनवात मनसोक्त भटकावं आणि किंचित दमून हनीफभाईकडे बिर्याणी खायला यावं! (जुनं लखनौ, बडीचावडी, मीरामहलच्याजवळ!) इथे मात्र मनानं 'तात्याशहा जफर' बनल्याशिवाय मला बिर्याणी खाताच येत नाही! आहाहा, मऊ लुसलुशीत गोश्त, कणीकेचा दम, मंद चवीचे, मुस्सलमानी ढंगाचे हनीफभाईच्याकडच्या पिढ्यानपिढ्यांचा वारसा सांगणारे ते पुश्तैनी मसाले! उगवती-मावळतीचे रंग फिके पडावेत अशी रंगसंगती असलेली, केशराचे पाणी शिंपडलेली ती गोश्त दम बिर्याणी! काय सांगू मंडळी तुम्हाला! जाऊ द्या झालं!...

तर मंडळी, अशी सगळी मजा! अजूनही माझ्या बर्‍याच जातीपातींबद्दल मला भरभरून लिहायचे आहे पण ते पुन्हा कधितरी मूड लागेल तेव्हा! :)

'माणूस शेवटी जातीवर जातो' असं म्हणतात. त्यामुळे सगळं फिरून झाल्यावर मीही पुन्हा एकदा 'कोकणस्थ तात्या अभ्यंकर' ही जात धारण करणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे देवगडातल्या सकाळची कोवळी उन्हं पडलेल्या ओसरीवर! शिपणाच्या आवाजाच्या पार्श्वसंगीताच्या साथीने केळीच्या पानावरचा मऊभात खायला! गरमागरम मऊ गुरगुट्या भात, वर तुपाची धार, आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड व आंबोशीचं लोणचं!

घेऊन जाणार आहे आपल्याला भाईकाकांचा 'तात्या बर्वा' बनून रत्नांग्रितल्या मधल्या आळीत गर्‍यांची कढी खायला आणि बरक्या फणसाची सांदणं खायला! :)

असो...

गुरुवर्य भाईकाका म्हणतात ते खरंच आहे! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात!

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":)

म्हणूनच हा एक मोडकातोडका, वेडावाकडा लेख भाईकाकांच्या चरणी समर्पित!

जय भाईकाका!
जय देवी अन्नपूर्णा!
समस्त जातीधर्मांचा विजय असो...

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख येथेही वाचता येईल!


काशीबाई..

राम राम मंडळी,

ठाण्याच्या एकविरा पोळीभाजी केन्द्राच्या बाहेर उभं राहून गरमागरम पोळीभाजी खायची आणि तिथूनच कार्यालयात जायचं हा माझा नित्याचा क्रम. घरगुती स्वरुपाची पोळीभाजी केन्द्रं, हा आम्हा चाकरमानी मुंबईकरांचा एक आधार. आज ठाण्या-डोंबिवली सारख्या शहरांत अशी अनेक पोळीभाजी केन्द्रं उभी आहेत. एकविरा पोळीभाजी केन्द्र हे त्यातलंच एक.

सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले असतात. मी एकविरेच्या बाहेर उभा असतो.

"आज तुझी आवडती वांगीबटाट्याची भाजी आहे रे दादा. आज जेव बाबा जरा निवांत!"

उजळ वर्णाची, म्हातारीशी सुरकुतलेली, गोल चेहेर्‍याची, गालावर छानश्या खळ्या असलेली, कपाळावर पुसटसे तीन हिरवट त्रिकोणी ठिबके गोंदवलेली, चेहेर्‍यावर समाधान असलेली काशीबाई मला म्हणत असते!

काशीबाई!

एकविरा केन्द्रात रोजंदारीवर भाकर्‍या करणारी एक बाई! एकविराच्या त्या लहानश्या जागेत खाली जमिनीवर बसून तीन-चार बायका पोळ्याभाकर्‍या करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यातलीच काशीबाई एक! भाकर्‍या करण्याचं काम काशीबाईकडे . काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची. पण तरीही ती माझ्याकरता खूप काही आहे. तिच्या समाधानी व्यक्तिमत्वाचा मी निस्सिम चाहता आहे!

सकाळी सकाळी लवकर उठून एखाद-दोन घरी जाऊन बाळंतीणींना शेक, अंगाला लावण्याचं काम करणे हेदेखील काशीबाईच्या नित्याचंच एक काम. काशीबाई बाळंतीणींच्या अर्भकांच्या मालिशची कामं करते हे मला माझा मित्र अमित चितळे याच्या घरी मी गेलो असताना कळले. तिथे अमितच्या मुलाला मालिश करायला काशीबाई आली होती. इथे तिचा एक गंमतीशीर संवाद सांगायचा मोह मला आवरत नाही.

पोराचं मालिश करून झाल्यावर काशीबाई अमितला म्हणाली, "दादा तुमचं पोरगं मोठेपणीसुद्धा असंच अगदी गोरंपान राहील"

"ते कसं काय?" अमितने विचारलं.

"त्याचं सामान बघा. कसं अगदी गोरंगुलाबी आहे! ज्याचं सामान असं गोरंगुलाबी असतं तो मोठेपणीही छान गोराच राहतो. पण सामान जरा जरी काळपट असेल तर मात्र गोरेपणा टिकणं कठीण आहे! :)

काशीबाई किती सहजपणे बोलून गेली होती हे! तिचे विचार ऐकून मी आणि अमित खो खो हसलो होतो. या जुन्या बायकांचे काही काही शब्द आणि आडाखे मोठे मजेशीर असतात! :)

मालिशची कामं करून मग काशीबाई एकविरेत येते. तिथे भाकर्‍या बडवायचं काम सुरू! साडेदहा अकराच्या सुमारास भाकर्‍यांच्या कामातून काशीबाई जराशी मोकळी होते व तीही तिथेच चार घास खाते. त्यानंतर हळूच चंची उघडून तंबाखू मळून खाईल. जुन्या खेडवळ बायकांची तंबाखू खायची जुनी सवय काशीबाईलाही आहे.

एके दिवशी मी असाच पोळीभाजी खात एकविरेच्या बाहेर उभा होतो तेव्हा तिथेच खाली जमिनीवर बसून अगदी मन लावून भाकर्‍या करत असलेल्या काशीबाईने माझं लक्ष वेधलं.

'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काशीबाई भाकर्‍या करता करता असं काहीसं छानसं कुठलंतरी खेडवळ लोकगीत आपल्याच नादात गुणगुणत होती. त्याची चाल, शब्द सगळंच मला अपरिचित होतं पण ऐकायला छान वाटत होतं. रोजंदारीवर भाकर्‍या करण्यासारखं कष्टप्रद काम करतानादेखील ही बया काय छान गुणगुणत होती! माझाही स्वभाव तसा बोलघेवडाच. मी पटकन तिला म्हटलं, "मावशे, खूप चांगलं गातेस की गं तू!"

तशी आजुबाजूच्या बायांकडे पाहात काशीबाई एकदम गोड लाजली आणि गायचीच थांबली! म्हातारीच्या खळ्या काय सुंदर दिसल्या लाजताना! त्या दिवसापासून माझी आणि काशीबाईची 'आखो ही आखोमे' गट्टीच जमली! माझ्या रोजच्या वेळेवर मी पोळीभाजी खायला गेलो की नजरेतूनच आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अधिक काही बोलणं, गप्पा मारायला वेळही नसायचा आणि कारणही नसायचं!

एकविरेत रोज तीन चार प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या, झुणका असायचा, भाकरी, पोळ्या असायच्या. एकदा पातेल्यातल्या वांगीबटाट्याच्या रस्साभाजीकडे पाहून, "अरे वा! आज वांगीबटाट्याची भाजी का? वा वा!" अशी नकळतपणे माझ्याकडून दाद गेली!

"आज हीच भाजी मला दे" असं मी काऊंटरवर बसलेल्या शिवरामला सांगितलं.

"अरे दादा, वांगीबटाट्याच्या भाजीसंगती भाकरी खा की! चपाती कशापायी खातो?" काशीबाई प्रथमच माझ्याशी बोलत होती! अगदी डायरेक्ट! :)

तिचं बोलणं ऐकून शिवरामही क्षणभर चाचपडला, मग लेगच सावरून म्हणाला, "खरंच, आज चपाती नको, भाकरीच खावा साहेब. आमची काशीबाई भाकर्‍या एकदम फस्क्लास करते! "
'First Class' या इंग्रजी शब्दांचा उच्चार 'फर्स्ट क्लास' असा आहे हे शिवरामला अमान्य होतं! :) असो, रंगाने जर्द काळ्या, बोलक्या डोळ्यांच्या, अंगाने सडपताळ परंतु देखण्या असलेल्या शिवरामविषयी पुन्हा केव्हातरी! कुणालाही हवाहवासा वाटावा असाच आमचा शिवराम आहे!:)

"थांब जरासा, आत्ता गरम भाकरी करून तुला देते!"

वास्तविक पातेल्यात आधी केलेल्या १०-१२ भाकर्‍या शिल्लक होत्या, परंतु मला गरमगरम भाकरी मिळावी अशीच माझ्या मैत्रिणीची इच्छा होती! माझ्याकडून मी काशीबाईला केव्हाच माझी मैत्रिण मानले होते परंतु तिच्याकडूनही माझ्याबद्दल तेवढाच ओलावा आहे हे वरील भाकरीच्या एका साध्या प्रसंगातून मला समजले आणि त्याचा आनंद त्या गरम भाजी भाकरीपेक्षा अंमळ अधिक होता! किंबहुना, काशीबाईने आपणहून मला गरमागरम भाकरी करून दिली त्यामुळे ती भाजीभाकरी मला अधिक गोड लागली!

मी त्या म्हातारीच्या जवळजवळ प्रेमातच पडलो होतो. मला त्या बाईबद्दल खूप उत्सुकता होती, तिच्याशी भरपूर बोलावंसं वाटत होतं! पण कधी? ती बिचारी आत बसून आपल्या भाकर्‍यांच्या व्यापात मग्न असे आणि मलाही तिथे अधिक काळ थांबायला वेळ नसे. पण एके दिवशी तिच्याशी बोलायचा, तिच्या घरी जायचा प्रसंग आला. मी नेहमीप्रमाणे एकविरेत पोळीभाजी खाण्याकरता गेलो होतो. मला पाहून काशीबाई उठली आणि तिने एक कार्डवजा कागद माझ्यापुढे धरला.

"जरा हे कार्ड बघ रे दादा. ह्याचे पैशे कधी भेटणार मला?"

पोष्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमचं ते कार्ड होतं. पाच वर्ष संपलेली होती आणि आता काशीबाईला व्याजा/बोनससहीत पाच-पंचवीस हजारांची रक्कम मिळणार होती असं ते कार्ड दर्शवत होतं!

"अगं मावशे, तुला फार काही करावं लागणार नाही. आज उद्या केव्हाही टाऊन पोष्टात जा. मास्तरांना भेटून हे कार्ड दाखव, ते सांगतील तिथे सह्या कर म्हणजे लगेच तुला ह्याचे पैशे भेटतील!"

"धत तुझी मेल्या! मला कुठं सही करता येते? तू येशील का माझ्यासंगती? ती पोष्टाची बया धा धा निरोप धाडून पण येईना बघ!" निरागसपणे हसत काशीबाई म्हणाली.

काशीबाईचे पैसे गुंतवणारी कुणी महिला एजंट आता तिला भेटतही नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. एकदोन दिवसातच मी तुझ्याबरोबर पोष्टात येईन असं मी काशीबाईला कबूल केलं आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी दोनअडीचच्या सुमारास मी मुद्दाम वेळ काढून काशीबाईसोबत पोष्टात गेलो. पोष्टाच्या बाहेर आमची रिक्षा उभी राहिली. काशीबाईने आपल्या मळकटश्या बटव्यातून पैसे काढले.

"थांब मावशे. मी देतो रिक्षाचे पैसे" मी सहजंच म्हटलं.

"माझं काम अन तू कशापायी पैशे देणार? वा रं वा!" काशीबाई जवळजवळ ओरडलीच माझ्यावर! पण ते माझ्यावर ओरडणं नव्हतं तर तो तिचा स्वाभिमान होता! काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! त्या भाकर्‍या करणार्‍या बाईची खुद्दारी माझ्यापेक्षा खूप खूप श्रीमंत होती! केवळ 'ओळखीचा चेहेरा' या आधारावर वांगीबटाट्याच्या भाजीसोबत गरम भाकरी खा असा आग्रह धरणारी प्रेमळ काशीबाई आणि रिक्षाचे पैसे मला देऊ न देणारी स्वाभिमानी काशीबाई मी पाहात होतो. प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!

पोष्टातलं काम झालं. काशीबाईला पैसे मिळाले. आम्ही पोष्टाच्या बाहेर पडलो. समोरच रंगीत बर्फाचे गोळे विकणारा उभा होता. मी गंमतीने काशीबाईला म्हटलं, "मावशे, बर्फ खायला घाल ना मला. ऊन खूप आहे, तहान लागली आहे!"

हे ऐकून मगासची स्वाभिमानी काशीबाई पुन्हा एकदा लहान झाली, निरागस झाली! :) मग मी आणि माझ्या त्या मैत्रिणीने दुपारच्या टळटळीत उन्हात मस्तपैकी लिंबूनमक लावलेले रंगीबेरंगी बर्फाचे गोळे एन्जॉय केले! व्हॉट अ डेट! :) एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! :)

"चल, येतोस का माझ्या घरला? इकडनं जवळंच माझं घर आहे. तुला चुरमुर्‍याचे लाडू देते!"

हे ऐकून मला आनंदच झाला. मी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या घरी गेलो. किसननगरच्या वस्तीतील एका चाळीत काशीबाईचं मोजून दीड खोल्यांचं घर. घरी एक तरुणी एका लहानग्या शेंबड्या पोराला बदडत होती. बहुधा त्या मायलेकरांचं काहीतरी बिनसलं असावं. घरात दुसरं एक लहानगं पोर होतं ते झोपलं होतं. मी आणि काशीबाई घरी पोहोचल्यावर ते शेंबडं पोर एकदम धावत आलं आणि काशीबाईला बिलगलं! काशीबाईने आभाळाच्या मायेने त्या पोराला जवळ घेतलं, आंजारलं, गोंजारलं!

बोलण्याबोलण्याच्या ओघात मला त्यांच्या घरातल्या काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या! काशीबाईचा नवरा एक नंबरचा बेवडा, काही कामधंदा करत नसे. दारूच्या अतिआहारी गेला आणि मरण पावला. काशीबाईला तीन मुलं. दोन मुलगे, एक मुलगी. मोठा मुलगा-सुनबाईने वेगळी चूल मांडली होती. ती मंडळी काशीबाईला थुंकूनही विचारत नव्हती. आई मेली काय नी जगली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता! दुसरा मुलगा चांगला हातातोंडाशी आलेला, रेल्वे अपघातात मरण पावला. त्याची बायको लहानगं मूल टाकून, त्याची जबाबदारी काशीबाईवरच सोपवून दुसर्‍या कुणाचातरी हात धरून पळून गेलेली. एक आई आपल्या मुलाला टाकून जाऊ शकते हे अविश्वसनीय होतं पण इथे मात्र तीच वस्तुस्थिती होती! मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वर्षादोनवर्षाच्या आतच नवर्‍याने टाकली म्हणून लहानग्याला घेऊन माघारी परतलेली!

आणि काशीबाई समर्थपणे हा सगळा गाडा ओढत होती, चालवत होती!

मला दूरदर्शनवरील समस्त मालिकांमध्ये कल्पनादारिद्र्य असलेल्या लेखक-दिग्दर्शकांची, ते त्यांच्या मालिकांमधून दाखवत असलेल्या मोठ्यांच्या खोट्या दु:खांची अक्षरश: दया आली, कीव आली!

"ए सुमन, दादाला लाडू दे आणि याला पण आण."

मांडीवर घेतलेल्या लहानग्याला खेळवत काशीबाईने सुमनला, त्या लहानग्याकरता आणि माझ्याकरता लाडू आणायला सांगितले! काशीबाईने केलेले ते गूळ चुरमुर्‍याचे लाडू आम्ही तिचे दोन्ही नातू खाऊ लागलो! एक नातू अगदीच लहान,बापाने टकलेला आणि एक मी! आपली लहानसहान मध्यमवर्गीय पांढरपेशी दु:ख गोंजारणारा!!

तो गूळचुरमुर्‍याचा लाडू त्या लहानग्याच्या एकदम तोंडात जाईना म्हणून काशीबाई त्या लाडवाचे तुकडे करून त्याला भरवू लागली. ते शेंबडं, लहानगं आता तो लाडू मटामट खाऊ लागलं आणि काशीबाईच्या चेहेर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहू लागलं! मला फक्त 'आजीची माया ही घट्ट सायीसारखी' एवढंच पुस्तकी वाक्य पाठ होतं!

"मुंबईची मुंबादेवी,
तिची सोन्याची साखली......"

असं काहीसं गाणं गुणगुणत काशीबाई सुमनच्या मुलाला हसतमुखाने खेळवत होती. बिचारीला 'गतं न शोच्यम' असा काहीसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे हेही ठाऊक नव्हतं! ते संस्कृत वचन न वाचताही ते ती किती सहजपणे आचरणात आणत होती! स्वत:च्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाच होता, पण आता कडेवर पोर घेऊन मुलगी माघारी आली होती आणि धाकट्या मुलाचं पोरही काशीबाईच्याच गळ्यात! बापरे! काशीबाईच्या या वयातही तिच्या अंगावर असणार्‍या जबाबदार्‍या पाहून माझंच धाबं दणाणलं होतं! सुमन मात्र मला खरंच खूप चांगली मुलगी वाटली. धुण्याभांड्यांची चार कामं तिने मिळवली होती. काशीबाईची शेक, अंगाला लावण्याची कामं, भाकर्‍या आणि सुमनची धुणीभांडी यांच्या वेळा त्या मायलेकींनी आपापसात ऍडजस्ट केल्या होत्या आणि दोघीही त्या लहान पोरांना सांभाळत होत्या!

'तुमची पुढील पैशांची व्यवस्था काय आहे?', 'या मुलांचं तुम्ही कसं करणार?' 'सुमनच्या मुलाचं ठीक आहे, पण काशीबाईच्या दुसर्‍या नातवाची जबाबदारी काशीबाईच्या पश्चात कोण घेणार?' 'की ती जबाबदारी सुमनवरच?' असे कोणतेही प्रश्न मी तिथे विचारू शकलो नाही, नव्हे तेवढी हिंम्मतच नव्हती माझ्यात! आणि स्वाभिमानी काशीबाई हे प्रश्न घेऊन माझ्या दाराशी कधीच येणार नव्हती! उलट हे प्रश्न विचारल्यावर, "तुला का रे बाबा आमची चिंता" असं म्हणून काशीबाईनी मला अगदी सहज झाडून टाकला असता याचीही खात्री होती मला!

हीच का ती काशीबाई, जी भाकर्‍या करताना सगळी दु:ख विसरून गाणी गुणगुणते? हीच का ती काशीबाई, मी रिक्षाचे पैसे देऊ लागल्यावर हिचा स्वाभिमान खाडकन जागा होतो? आणि 'मावशे तू छान गातेस बरं' एवढी लहानशीच दाद दिल्यावर चारचौघीत गोड लाजणारी हीच का ती काशीबाई? अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

"दादा, ये हां पुन्हा. लाडू आवडला ना गरीबाघरचा?" काशीबाईने मला हसतमुखाने विचारलं!

'लाडू म्हणजे मोतीचुराचा आणि तोही साजूक तुपातला!' अशी लाडवांबद्दलची माझी व्याख्या! काशीबाईकडच्या गूळचुरमुर्‍याच्या लाडवाने ती व्याख्या साफ पुसून टाकली!

आता पुन्हा एकदा एकवीरेत जाईन, तिथे वांगी बटाट्याची भाजी असेल, आणि पुन्हा एकदा काशीबाई मला म्हणेल,

"आज वांगीबटाट्याची भाजी आहे. तिच्यासंगती भाकरीच खा. आत्ता करून देते गरमगरम भाकरी!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

पाटणकर आजोबा..

अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले!

पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया!

एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते. कोकणस्थी गोरा रंग असलेले पाटणकर आजोबा देखण्यातच जमा होत होते, हँडसम दिसत होते!

गाण्याचं मध्यंतर झालं. मंडळी जरा इकडेतिकडे करत होती, चहापान वगैरे करत होती. माझादेखील चहा घेऊन झाला होता व मी बांधून आणलेलं १२० पान सोडून खायच्या तयारीत होतो. समोरच पाटणकर आजोबा उभे होते व मिश्किलपणे माझ्याकडे पाहात होते. मीदेखील त्यांना एक तोंडदेखला स्माईल दिला तशी मला म्हणाले,

"आज नेमकी मी माझी पानसुपारीची चंची घरी विसरलो! गाण्याला खूपच गर्दी आहे आणि आता लवकरच पुन्हा मध्यंतरानंतरचं गाणं सुरू होईल. तू जरा माझी जागा पकडतोस का?, मी बाहेर जाऊन पटकन पान खाऊन येतो. नाहीतर मी पान खायला म्हणून बाहेर जायचो आणि नेमकी माझी जागा जायची!"

'तुम्ही कोण', 'तुमचं नांव काय', 'कुठे असता' इत्यादी नेहमीचे औपचारिक प्रश्न न विचारता अगदी वर्षानुवर्षाच्या ओळखीतल्या माणसाशी बोलावं तसं एकदम एकेरीवर येत पाटणकर आजोबा माझ्याशी बोलते झाले! पुलंच्या भाषेत सांगायचं तर 'इतक्या एकदम सलगीत आलेला हा म्हातारा कोण?' हे मला कळेचना! पण काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. पाटणकर आजोबांच्या चेहेर्‍यावरही असेच 'दोस्ती करण्याकरता उत्सुक' असे भाव होते. मला तो माणूस कुणी परका आहे असं वाटलंच नाही! मग मीच त्यांना म्हटलं, "आजोबा तुम्ही बसा आणि माझीही जागा पकडा, मी तुमच्याकरता बाहेरून पान घेऊन येतो. तुमचं पान कोणतं ते सांगा!"

"उत्तम! बनारसी १२०, कच्ची सुपारी" आजोबा खुशीत येऊन म्हणाले.

चढत्या भाजणीने रंगत गेलेलं मालिनीबाईंचं गाणं संपलं. मंडळी, मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं ऐकायला भाग्य लागतं! पाटणकर आजोबा आणि मी मैफलीत पहिल्या रांगेत शेजारी शेजारीच बसलो होतो. समोरच अवघ्या दोन तीन फुटांच्या अंतरावर अत्यंत साध्या आणि घरगुती व्यक्तिमत्वाच्या मालिनीबाई बसल्या होत्या. त्यांच्या स्वरास्वरात, लयीच्या प्रत्येक वळणात 'संगीत!' 'संगीत!' म्हणतात ते हेच!' याची साक्ष मिळत होती. अत्यंत कसदार आणि खानदानी गाणं! स्वच्छ, मोकळा आणि अत्यंत सुरेल आवाज, सुरालयीवर, तानेवर, सरगमवर असामान्य प्रभुत्व. 'चाल पेहेचानी' हा टप्पा आणि त्यानंतर 'फुल गेंदवा अब ना मारो' या भैरवीने मालिनीबाईंनी अक्षरश: आभाळाला गवसणी घातली आणि मैफल खूप उंचावर नेऊन ठेवली! मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! मंडळी, संगीतक्षेत्रात असं मानलं गेलं आहे की जी मैफल संपल्यानंतर टाळ्यांच्या ऐवजी नुसताच सन्नाटा निर्माण होतो ती खरी मैफल! मालिनीबाईंची मैफल म्हणजे नादब्रह्माचा साक्षात्कार! मला आजपावेतो मालिनीबाईंचं मैफलीतलं गाणं अगदी भरपूर ऐकायला मिळालं हे माझं भाग्य! असो, मालिनीबाईंचा गानविष्कार हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

गाणं संपलं. मालिनीबाईंच्या पाया पडून मी बाहेर पडलो.

"कुठे राहतोस?"

मागनं पाटणकर आजोबांचा आवाज ऐकू आला. त्यांचा हात माझ्या खांद्यावर होता. आयला!, म्हातारा मला सोडायलाच तयार नव्हता!

मग 'तुम्ही कोण, कुठले', 'आम्ही कोण, कुठले' या आमच्या गप्पा झाल्या, रीतसर ओळख झाली. पाटणकर आजोबा दादरलाच एका चाळीत राहणारे. नोकरीधंद्यातून निवृत्त होऊन फंड-पेन्शनीत निघालेले.

"चल, मस्तपैकी पावभाजी आणि नंतर भैय्याकडची कुल्फी खाऊ! घरी जायच्या गडबडीत नाहीयेस ना?"

मला जरा आश्चर्यच वाटलं. रात्रीचा जवळजवळ एक वाजला होता आणि या म्हातार्‍याला घरी जाऊन चांगलं झोपायचं सोडून खादाडीचे वेध लागले होते! :) पण मला त्यांचा आग्रह मोडवेना. मग आम्ही मस्तपैकी गाडीवर पावभाजी झाल्ली. तेव्हा बिसलेरी-फिसलेरीचं एवढं फ्याड निघालं नव्हतं त्यामुळे बाजूच्याच प्लाष्टीकच्या पिंपातलं पाणी प्यायलो आणि नंतर झकासपैकी मलई कुल्फी खाल्ली. मजा आली तिच्यायला! :)

"काय मग, कसं वाटलं मालिनीबाईंचं गाणं? चल जरा चौपाटीवर थोडी शतपावली घालू म्हणजे पावभाजी पचेल!"

आणि खरोखरंच रात्री एक वाजता पाटणकर आजोबांबरोबर मी मुकाट्याने दादरच्या चौपाटीवर शतपावली घालू लागलो. 'च्यामारी कोण हा? का असा मला वेठीस धरतो आहे?' असा विचार माझ्या मनात आला. पण पाटणकर आजोबांचं व्यक्तिमत्वच एवढं प्रभावी आणि छाप पाडणारं होतं की मला त्यांना 'नाही' म्हणताच येईना! मग आम्ही जरा वेळ गाण्यावर गप्पा मारल्या. त्यांनी माझा पत्ता,फोन नंबर घेतला आणि आम्ही एकमेकांना बाय बाय करून निरोप घेतला. पण त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की या माणसाने अभिजात संगीत अगदी भरपूर ऐकलं होतं. आमच्या गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक लहानमोठ्या कलाकारांची नावं घेतली, त्यांची वैशिष्ठ्ये सांगितली. एकंदरीत हा माणूस गाण्यावर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम करणारा वाटला, माणसांचा भुकेला वाटला! शिवाय 'भीमण्णांच्या गाण्यावर तुडुंब प्रेम' ही आमच्या दोघातली कॉमन गोष्ट निघाली. त्यामुळे मला तर माझ्या वारीतलाच एक वारकरी भेटल्याचा आनंद झाला! वारीत फक्त मागेपुढे चालत होतो त्यामुळे इतके दिवस भेट नव्हती! परंतु आमचा रस्ता एकच होता, वारी एकच होती. आम्हा दोघांचंही पंढरपूर म्हणजे पुण्यनगरीतल्या नव्या पेठेतील 'कलाश्री' बंगला आणि त्यातला 'कानडाऊ भीमसेनू' हाच आमचा विठोबा! असो...

त्यानंतर चारच दिवसांनी पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे अमुक अमुक ठिकाणी अण्णांचं गाणं आहे. येणारेस का? नक्की ये."

मंडळी, ही तर केवळ आमच्या गानमैत्रिची सुरवात होती. त्यानंतर पाटणकर आजोबांबरोबर मी गाण्याच्या अगदी भरपूर मैफली ऐकल्या. कधी मालिनीबाई तर कधी भीमण्णा, कधी उल्हास कशाळकर तर कधी आमच्या मधुभैय्या जोश्यांसारखा शापित गंधर्व! कधी कुमारजी, किशोरीताईंसारखे प्रतिभावंत तर कधी वीणा सहस्रबुद्धे. कधी शाहिदभाईंची गाणारी सतार, तर कधी आमच्या दातारबुवांचं लयदार व्हायलीन! कधी भाई गायतोंड्यांनी तबल्यात मांडलेला नादब्रह्माचा महायज्ञ तर कधी विश्वमोहन भट्टांची मोहनवीणेतली मोहिनी! कधी अजय चक्रवर्तीचं चमत्कृतीपूर्ण परंतु प्रतिभावन गाणं, तर कधी राशिदखानचं मस्त मिजास भरलेलं आमिरखानी गाणं! खूप खूप ऐकलं, अगदी मनसोक्त ऐकलं!

माझ्यासोबत काही वेळेला माझ्या काही समवयस्क मित्रमैत्रिणीही असायच्या. मग पाटणकर आजोबा आणि आम्ही सारी त्यांची नातवंड (!) एकत्र गाणं ऐकायचो आणि त्यानंतर कुठेतरी भरपूर खादाडीही करायचो, धमाल करायचो! वास्तविक पाटणकर अजोबांचं वय तेव्हाही पंचाहत्तरीच्या आसपास होतं. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. त्यांचा उत्साह सर्वात अधिक!माझी सगळी मित्रमंडळी मला 'तात्या' म्हणत ते पाहून पाटणकर अजोबाही मला 'तात्या' म्हणू लागले. कधी मूड मध्ये असले की मला बाजूला घेऊन, "काय रे तात्या, ती अर्चना तुझ्यावर जाम खुश दिसते. जमवून टाक ना लेका! मी मध्यस्थ म्हणून बोलून पाहू का तिच्याशी?" असं हळूच डोळा मारून मला म्हणायचे! :)

पाटणकर आजोबांच्या घरीही मी अनेकदा गेलो आहे. मस्तपैकी चाळीतलं घर. आजोबा तिथे स्वतःपुरता स्वयंपाक करून एकटेच रहायचे. स्वयंपाक तर ते अतिशय उत्तम करायचे. त्यांच्या हाताला चव होती. "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" असं म्हणून झकासपैकी कांदेपोहे करून आणायचे. खूप गप्पा मारायचे. भरभरून बोलायचे. त्यांच्या उत्तम तब्येतीचा तर मला नेहमीच हेवा वाटायचा. ७५-७६ व्या वर्षीही हा माणूस चांगली तब्येत राखून होता, स्वतःची सगळी कामं स्वतःच करायचा!

त्यांच्याकडे जुन्या पद्धतीचा फोनोग्राम होता. त्यावर त्यांच्याकडे असलेली, त्यानी चोरबाजारातून पाच पाच, दहा दहा रुपायाला विकत घेतलेली नारायणराव बालगंधर्वांची, हिराबाईंची आणि इतर अनेकांची ७८ आर पी एम च्या प्लेटांवरची ध्वनिमुद्रणे आम्ही एकायचो.

ध्वनिमुद्रणे ऐकता एकता पाटणकर आजोबा चंची उघडून स्वतःच्या हातानी माझ्याकरता पान जमवायचे. "तात्या, कात-चुना-सुपारी मी घालतो पण तंबाखू मात्र तुझा तू मळून घे हो!" असं गंमतीने म्हणायचे. वर पुन्हा "आपली व्यसनं आपण स्वत:च करावीत" हेही मिश्किलपणे सांगत. पाटणकर आजोबांच्या घरी खाल्लेल्या चमचमीत पोह्यांची, खमंग मुरबाडी आमटीभाताची, थालिपिठाची, आणि चुना-तुकडा कात- कच्ची रोठा सुपारी घालून जमवलेल्या पक्क्या कळीदार पानाची चव आजही माझ्या तोंडावर आहे! चुना-काळ्या तंबाखूच्या मळलेल्या चिमटीचा तो कडवट-मातकट स्वाद आजही मला पाटणकर आजोबांची आठवण करून देतो!

एकदा असाच पाटणकर आजोबांचा फोन आला. "अरे तात्या, येत्या रविवारी मी ८० वर्षांचा होतोय रे. दुपारी तुम्ही सगळे माझ्या घरी जेवायला या. अगदी नक्की आणि आठवणीने! वाट पाहतो!"

पाटणकर अजोबा ८० वर्षांचे झाले? केव्हा? मनाने तर ते एकविशीचे होते. आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी जेवायला? आम्हा ५-६ मित्रमंडळींचा स्वयंपाक हा म्हातारा एकटा करणार? असा विचार करतच आम्ही तिघेचौघे मित्रमैत्रिणी आजोबांच्या बिर्‍हाडी गेलो. बघतो तर काय? घरात अक्षरश: गोकूळ नांदत होतं! पाटणकर आजोबा स्वतःच्या कुटुंबियांबद्दल कधीच माझ्याशी बोलले नव्हते आणि 'एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात उगाच कशाला नाक खुपसा?' असा विचार करून मीही कधी तो विषय काढला नव्हता!

पाटणकर आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी चक्क त्यांची दोन कर्ती-सवरती मुलं अशोक आणि विद्याधर, सुना प्राजक्ता आणि नेहा, मुलगी सीमा आणि जावई प्रसाद, एवढी मंडळी जमा झालेली होती. आजोबांच्या आजुबाजूला ५-६ नातवंडं खेळत बागडत होती. पाटणकर आजोबांनीच त्या सगळ्यांशी, "हा माझा गाण्यातला जिवलग दोस्त तात्या" अशी माझी आणि आमची सर्वांची ओळख करून दिली!

मंडळी, खरंच सांगतो, आजोबांच्या घरचं ते गोकूळ पाहून अगदी आपोआपच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले! 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार!

पुढे असाच एकदा आजोबांच्या घरी गेलो असताना गप्पांच्या ओघात आजोबा कधी नव्हे ते स्वतःबद्दल बोलले. तसे ते खूप गप्पीष्ट होते परंतु स्वतःबद्दल फारच कमी बोलत. मला म्हणाले, "अरे तात्या, आमची सौ आम्हाला मध्येच सोडून गेली रे! तिला जबरदस्त कावीळ झाली, ती पोटात फुटली आणि सगळा खेळ खलास..मी मध्यमवर्गीय माणूस. तसा मला ग्लॅक्सो कंपनीत पगारबिगार बरा होता. शिवाय गावाकडचाही थोडाबहुत पैसा मिळाला म्हणून संसार तरी पूर्ण करू शकलो. माझी तिनही मुलं मात्र गुणी हो! उत्तम शिकली आणि आपापल्या मार्गाला लागली. सीमाही सुस्थळी पडली. दोन्ही मुलांनी उपनगरात मोठाल्या जागा घेतल्या आणि तिथे रहायला गेली. अरे त्यांचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत. या चाळीतल्या दोन खोल्यात ते कसं जमणार?

मला प्रेमाने त्यांच्याकडे रहायला बोलावतात. इथे एकटे राहू नका म्हणतात. पण मीच जात नाही रे! चाळ सोडवत नाही बघ! आणि अजून परमेश्वराच्या कृपेने तब्येत चांगली आहे. उत्तम दिसतंय, उत्तम ऐकू येतंय, स्वतःचं सगळं स्वत:ला करता येतंय, आणि मुख्य म्हणजे गाठीशी चार पैसे आहेत हे महत्वाचं! पैशाचं सोंग घेता येत नाही रे तात्या! तेव्हा असा विचार केला की उगाच कशाला त्यांच्यात जा? त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे की सुखाने! तेव्हा जमेल तितके दिवस इथे चाळीतच रहायचं असं ठरवलं आहे. मस्तपैकी गाण्याच्या मैफली वगैरे ऐकायच्या, धमाल करायची. शिवाय तुमच्यासारखी तरूण मित्रमंडळीही अधनंमधनं भेटतात, बरं वाटतं!"

पाटणकर आजोबा प्रसन्नपणे बोलत होते. बोलण्यात कुठेही खंत नव्हती, कडवटपणा नव्हता! पाटणकर आजोबांच्या रुपात एक उमदा मित्र मला बघायला मिळत होता. त्यांच्या आयुष्यात कसलीच तक्रार नव्हती, दु:ख नव्हती असं मी तरी कसं म्हणणार? त्यांच्याही काही तक्रारी असतील, दु:ख असतील, पण पाटणकर आजोबांची एकंदरीतच वृत्ती अशी होती की तिथे दु:खांना हा माणूस फार वेळ थाराच देत नसे! हिंदित 'सुलझा हुआ' असं काहीसं म्हणतात ना, तशी होती त्यांची पर्सनॅलिटी! जे आहे, जसं आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं.

पाटणकर आजोबांना मी कधी फारसं रागावतानाही बघितलं नाही. "आजोबा, तुम्ही नेहमीच आनंदी दिसता, कधीच भडकत नाही, रागावत नाही, हे कसं काय?" असं त्यांना विचारल्यावर ते हसून मला म्हणाले होते, "अरे समोरच्या माणसाने कसं वागावं हे मी ठरवू शकत नाही ना! त्याला जसं वागायचंय तसंच तो वागणार! असं असताना मी त्याच्यावर उगाच कशाला रागावू? त्याला जसं वागायचंय तसं तो वागेल आणि मला जसं वागायचंय तसं मी वागेन! झाली की नाही फिट्टंफाट! मग कशाला उगाच रागावून भडकाभडकी करा आणि स्वत:चंच बीपी वाढवून घ्या?! खरं की नाही? दे पाहू टाळी!" असं म्हणत मोठ्याने हसले होते! :)

तर अशी पाटणकर आजोबांची आणि आमची दोस्ती बर्करार होती. गाण्याच्या मैफली झडत होत्या, खादाडीचे कार्यक्रम सुरू होते. म्हातारा अगदी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या चालीने आयुष्य जगत होता आणि अशातच एके दिवशी ध्यानीमनी नसताना आजोबांच्या मुलाचा, विद्याधरचा मला फोन आला.

"कोण तात्याच ना? अरे मी विद्याधर पाटणकर बोलतोय! आज सकाळी बाबा वारले. त्यांच्या डायरीत तुझा नंबर सापडला म्हणून तुलाही कळवतोय."

झालं! आमच्या सांगितिक वारीतला एक वारकरी स्वतःच वैकुंठवासी झाला होता. मंडळी, हे सांगितिक ऋणानुबंध फार त्रास देतात. रक्ताच्या नात्यापेक्षा संगीतातली नाती अधिक घट्ट असतात! मी चुपचाप उठलो आणि आजोबांच्या घरी पोहोचलो. मुलं, सुना, लेक, जावई, नातवंडं सगळी जमली होती.

आमचा म्हातारा शांतपणे घोंगडीवर विसावला होता. झोपेत असतानाच मृत्यु आला होता. चेहेरा अगदी शांत दिसत होता, त्यावर कुठल्याही वेदना दिसत नव्हत्या. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार!

आजोबांना पोचवून आम्ही पुन्हा त्यांच्या घरी गेलो. सुनबाईंनी पिठावर पणती वगैरे लावली होती. तिला नमस्कार केला. तिथून निघायला तर हवं होतं पण निरोप तरी कुणाचा घेणार? आता तिथे माझं कुणीच नव्हतं! शेवटी मी अशोक आणि विद्याधरशी औपचारिक पद्धतीने हात मिळवला व त्यांचा निरोप घेतला.

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला,

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!"

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!December 03, 2007

रौशनी.. ४

>>ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत
>>लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता,
>>आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

दोन-पाच मिनिटं अशीच शांततेत गेली. त्यानंतर कृष्णाने सांगितलेली लस्सी आली.

"लिजिये सेठ. कृष्णा, सेठको नमस्ते करो"

त्या काळ्यासावळ्या कृष्णाने मला नमस्कार केला. त्याचा चेहेरा लाघवी होता. माझ्यासमोर थोडासा अवघडलेपणाने उभा होता, थोडासा कसनुसा होऊन उभा होता. 'कोण हा?', 'रौशनीला याच्याबद्दल माझ्याशी काय बोलायचं असेल?' माझ्या मनात पुन्हा एकदा प्रश्न उभे राहू लागले. मी काहीच न बोलता लस्सी पिऊ लागलो.

आता रौशनीने विषयाला हात घातला. "तात्यासेठ, हा कृष्णा. अमिताचा मुलगा. याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामपे लगाओ तो बहोत मेहेरबानी होगी! वैसे बिलकुल गवारा/अनपढ नही है. डोंगरीके मुन्शिपाल्टीके स्कूलमे चारपाच साल तक इसने पढाई की है. याने चांगलं शिकावं, तुम लोग जैसा साब बनावं, अशीच इच्छा होती याच्या आईची. अमिता इसे इस माहोलसे दूर रखना चाहती थी!

"तात्यासाब, तुम बहोत सही और सिधेसाधे इन्सान लगते हो, अच्छे घरानेके लगते हो, बडे बडे लोगोंके साथ उठतेबैठते हो, तुम्ही याच्याकरता कुठेतरी चांगली नोकरी बघा. लडका तसा हुशार आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे, पडेल ते काम करेल!" असं रौशनी म्हणाली तेव्हा मला जरा नवलच वाटलं. मी सिधासाधा, अच्छे घरानेका आणि थोरामोठ्यांसोबत उठबस करणारा आहे, हा शोध तिला कसा लागला देव जाणे! बहुतेक तिच्या अनुभवी नजरेने तिला हे सांगितलं असेल!

"जा बेटा कृष्णा, तू अंदर जा और हिसाब लिख. तात्याभाई, हमारा सेठ है ना, उसके सब हिसाब लिखने का काम आजकल कृष्णाही करता है. जगहे का भाडा, खानापिना-चायपानी, लडकियोके भाडे का हिसाब, वगैरा वगैरा!"

हे ऐकून मी मनाशीच हसलो. साला काय फरक होता माझ्यात आणि कृष्णात? मी देशी दारूचे हिशेब लिहीत असे, तर कृष्णा रांडांच्या खोलीभाड्याचे वगैरे हिशेब लिहीत असे! दोन्ही लाईनी तश्या डेंजरच!" :) ते असो, थोडक्यात त्या कृष्णा नावाच्या मुलाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला लावायचा होता आणि ह्याकरताच रौशनी मला भेटू इच्छित होती हे मला समजलं. निदान आत्तापर्यंत रौशनी प्रकरणातल्या एका गोष्टीचा तरी मला उलगडा झाला होता, हेही नसे थोडके!

पण आता, 'ही अमिता कोण?', 'ही हयात नाही का?' हे पुन्हा काही नवे प्रश्न तयार झाले. च्यामारी एकदा मनात विचार आला की मरेनात का तो कृष्णा, ती अमिता आणि ती रौशनी! आपल्याला सालं काय देणघेणं या रंडीबाजारवाल्यांशी? ही लस्सी संपवावी आणि इथून चुपचाप फुटावं हे खरं! नंतर नेहमीच काहीतरी कारणं सांगून टाळाटाळ करणं मला सहज शक्य होतं!

लस्सी पीत असतांनाच माझी नजर रौशनीकडे गेली. बाई मोठ्या विश्वासाने माझ्याकडे पाहात होती. 'हा मनुष्य चांगला आहे', 'कृष्णाचं काम करील' असा विश्वास तिच्या चेहेर्‍यावर दिसत होता! मग माझी मलाच क्षणभर शरम वाटली. असेना का ही रंडीबाजारातली मावशी! मला तर तिने खूप इज्जत देऊ करून आदराने वागवलं होतं ना? मला काही वावगं तर करायला सांगत नव्हती ना ती? मग मला तिचं काम करायला काय हरकत होती? निदान प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत होती?

आणि खरं सांगायचं तर आता रौशनी मला आवडू लागली होती! हां, आता त्या माहोलमध्ये राहून तिची भाषा काही वेळेला हार्श आणि शिवराळ होती हे खरं, परंतु पहिल्याच भेटीत माझ्या नकळत मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो. गोरापान रंग, रेखीव चेहेरा! तिचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं ही प्रत्येक गोष्ट अत्यंत ग्रेसफूल होती. त्या गलिच्छ वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी अद्याप कशा काय टिकून राहिल्या होत्या देव जाणे! कुठे रौशनी आणि कुठे त्या बाकीच्या काळ्याकुट्ट, पोट सुटलेल्या, बेढब आणि अवाढव्य लोंबत्या स्तनांच्या इतर मावश्या! असो..

"ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. त्या मुलाचं संपूर्ण नांव, कहा तक सिखा है, उसके जनम की तारीख, ये सब मुझे एक कागजपे लिखके दो!"

हे ऐकल्यावर रौशनी निराश हसली!

"कृष्णा हसन हे त्याचं नांव आहे. बस, उसके डोंगरीके स्कूलका एक कागज है मेरे पास. वो देती है आपको. और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!! अमिता किसीसे प्यार करती थी. आता काय सांगू तुम्हाला तात्याभाई, अहो रांडांवर कधी कुणी प्रेम करतं का? फक्त शरीराची भूक भागवायला आलेल्या माणसाचं प्रेमही फक्त तेवढ्यापुरतंच! एकदा पाणी पडलं की त्यांच्या प्रेमाची नशादेखील खाडकन उतरते! (ही खास त्या बाजारातली भाषा! हे वाक्य रौशनीच्या तोंडचं आहे, माझं नाही, याची कृपया सुशिक्षित, सुसंस्कृत वाचकांनी नोंद घ्यावी!! :)

"पण अमिताला हे समजलं नाही. एक गिर्‍हाईक आलं होतं तिच्या आयुष्यात. बस! पडली त्याच्या प्रेमात! तिला भाबडीला वाटलं की तोही तिच्यावर प्रेम करतोय म्हणून! अहो पैसेही घेत नसे त्याच्याकडून. त्याची काय चैनच हो! तो मादरचोद फुकटात ठोक ठोक ठोकायचा अमिताला! कसलं प्यार नी कसलं काय! शेवटी एके दिवशी अमिताचं पोट फुगवून, कृष्णाला तिच्या पोटात सोडून निघून गेला कायमचा! अब तो कृष्णा की जिम्मेदारी मुझपे छोडकर अमिताभी इस दुनियासे चली गयी! अमिता मेरी बहोत अच्छी सहेली थी. कृष्णाका कुछ भला हो तो अच्छाही है, नही तो जिंदगीभर रंडियोके हिसाब लिखते वो भी यही पे पडा रहेगा!"

रौशनी बोलत होती, मी ऐकत होतो! सुशिक्षित, पांढरपेशा समाजातला मी, रितीप्रमाणे कृष्णाचा बायोडेटा मागितला तर रौशनीने मला त्याचा वरील बायोडेटा सांगितला! असला बायोडेटा यापूर्वी कधीच माझ्या पाहण्यात आला नव्हता!! ज्याच्या बापाचं खरं नांव माहीत नाही असा बायोडेटा! अमिताच्या त्या ठोक्याचं नांव हसन असावं बहुधा!

"ठीक है. चलता हू मै. मुझसे जो हो सकेगा मै करूंगा." असं म्हणून मी तिथून उठलो. रौशनी मला सोडायला चाळीच्या जिन्यापर्यंत आली. पुन्हा एकदा त्या रांडांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी जाऊ लागलो.

"दोबारा जरूर आना सेठ. हमे भूल मत जाना." असं म्हणून रौशनीने मला निरोप दिला.

"और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!!"

रौशनीचं ते वाक्य माझ्या कानात घुमत होतं! आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! तो चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला, काळासावळा, भाबड्या चेहेर्‍याचा कृष्णा हरामी होता, हरामखोर होता, हरामाचा होता!! छ्या.. डोकं सुन्न झालं होतं! अमिताला मी कधीही पाहिलं नव्हतं, पण कृष्णाच्या चेहेर्‍यात मला आता तिचा चेहेरा दिसत होता!

आणि रौशनी? मैत्रिणीच्या पोराचं भलं करायला निघाली होती. दोस्ती निभावायला निघाली होती. मृत अमिताचं पोरगं तिथेच सडूकुजू नये म्हणून प्रयत्नशील होती! म्हटलं तर सगळंच अगम्य होतं. आणि मी तरी असा मोठा कोण होतो की त्या चार यत्ता शिकलेल्या कृष्णाला मारे कुठे कामाबिमाला लावणार होतो? तेव्हा मी स्वतःच अवघ्या हजार-बाराशे रुपयावर नोकरी करत होतो. झमझम बारमध्ये हिशेब लिहिण्याचे चार पैसे जरा जास्त सुटत इतकंच!

बारमध्ये परतलो तर बारमधली नेहमीची नोकर मंडळी मिश्किलपणे माझ्याकडे बघत होती. तो चूतमारिचा दीडदमडीचा मन्सूर मला विचारतो, "काय तात्याशेठ, रौशनीकडे काय मजा केलीत? कुणी नवाकोरा माल आला आहे का तिच्याकडे? नथ उतरवायला साली जाम मजा येते!"

पाचदहा रुपायाच्या टीपवर जगणार्‍या मन्सूरने नथ उतरवायची मजा केव्हा अनुभवली होती कुणास ठाऊक! :) पण मला आता या सगळ्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. मन्सूरला तरी मी का दोष देऊ? तो सगळा माहोलच तसा होता!

काही दिवस असेच गेले. अधनंमधनं 'रौशनीने चाय पिने के लिये बुलाया है' असे मन्सूरचे निरोप यायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. 'ही बया मला वारंवार का बोलावते?' कृष्णाच्या नोकरीचं अजून काहीच काम झालं नव्हतं. म्हणजे मी काही प्रयत्नच केले नव्हते. पण रौशनी मात्र मनातून जात नव्हती. तिने दहा निरोप पाठवूनदेखील आपण एकदाही तिला भेटायला जात नाही हे कुठेतरी माझ्याही मनाला खटकत होतं हेही खरं होतं!

अश्यातच एके दिवशी मन्सूरचा पुन्हा एकदा निरोप आला, "तात्याभाई, तुम्हाला आज रौशनीने खानेपे बुलाया है. ना मत केहेना!" बस! मनाशी ठरवलं, तसाच उठलो आणि पुन्हा एकदा रौशनीची माडी चढलो. 'कृष्णाच्या नोकरीकरता प्रयत्न करत आहे' असं तिला सांगायचं असं मनाशी ठरवलं होतं!

"आओ तात्याभाई, आप तो हमारा रास्ताही भूल गये! आज आपको हमारे यहासे खाना खाकेही जाना पडेगा!"

पुन्हा एकदा रौशनीने माझं हसतमुखाने स्वागत केलं! तिच टापटीप, साफ, स्वच्छ खोली आणि तीच आणि तशीच आकर्षक रौशनी!

'साली दुनिया गेली बाझवत!' असा विचार करून आज मी तिच्यासोबत व्हिस्की पिणार होतो, तिच्या हातची बिर्याणी खाणार होतो आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

रौशनी.. ३

>>शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!! <<

भाग ३ -

"आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!" रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली.

माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. 'वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!' या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्‍यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्‍या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना!

बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती!

साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!

ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्‍यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल?

सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)

"काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!" रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत.

साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्‍या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्‍यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! 'ये कौन चुतिया इधर आ गया' असंच त्या आपापसात म्हणत असणार! 'च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?' असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो!

तेवढ्यात, "एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!"

अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्‍या रांडांना दम भरला असणार! 'ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या..:) सानेगुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे' ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! :)

"थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!"

रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? :)

"अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!"

आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला.

"बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!"

आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्‍यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

क्रमशः..

तात्या अभ्यंकर.