Showing posts with label गणगोत... Show all posts
Showing posts with label गणगोत... Show all posts

July 11, 2014

आक्कामावशी...

आदरणीय गुरुवर्य भाईकाका...

शिरसाष्टांग नमस्कार....

एक छोटेखानी व्यक्तिचित्रं लिहायचा प्रयत्न केलाय तेवढा गोड मानून घ्या.. माझ्या गणगोतातली आक्कामावशी..!

तिचं हे व्यक्तिचित्रं तुम्हाला समर्पित...

--------------------------------------------------

आक्कामावशी दारावर यायची.. आम्ही तिला आक्कामावशी म्हणायचो.. एका मोठ्या टोपलीत नाना प्रकारची शेव, फरसाण, मस्का खारी आणि नानकटाई असं घेऊन आक्कामावशी यायची आणि दारोदार विकायची.. तिच्या त्या टोपलीतच दोन तव्यांचा तराजूही असे..

तुम्ही काय शेव, फरसाण घ्याल ते वजन करून कागदातच बांधून द्यायची.. सोबत तो लाँड्रीमध्ये असतो तसा दोर्‍याचा एक मोठा गुंडा असे.. प्लॅस्टिकच्या पिशव्या नाहीत की स्टॅपलर नाही..! :)

"शेव देऊ का रे..? खाऊन तर बघ..."

"आजची भावनगरी.. एकदम मस्त.. खाऊन तर बघ.."

"अरे नानकटाई देऊ का..? एकदम ताजी आहे.. तोंडात विरघळेल.."

आक्कामावशीचं मार्केटिंग मस्त असायचं.. सोबत प्रत्येक गोष्टीचं आमच्या हातावर सँपल ठेवायची.. :)

"अगं आक्कामावशी.. आता कशी काय आलीस तू..? बघतेस ना.. दफ्तर भरतोय..."

आकाशवाणी मुंबई ब वर कामगार विश्व संपलेलं असायचं आणि नंदूरबारचे वगैरे बाजारभाव सांगत असायचे.. आमची पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट चढवून झालेली असायची.. दफ्तर भरायचा कार्यक्रम सुरू असायचा..

"अरे ते पलीकडचे जोशी आहेत ना.. त्यांच्या घरी रेडियोवर 'तुझे गीत गाण्यासाठी..' हे गाणं लागलं होतं.. तेवढी ऐकत बसले बघ.. म्हणून उशीर झाला.."

आक्कामावशी मनमोकळेपणाने उशीर होण्याचं कारण सांगायची..

आमचं घर काय, जोश्यांचं काय, भडसावळ्यांचं काय.. आक्कामावशीचा सर्वत्र हक्काचा राबता होता...

"आज शाळेत डबा काय नेतो आहेस रे..?"

"अगं मावशी.. आज फोडणीची पोळी आहे.."

हे ऐकल्यावर आक्कामावशीने लगेच मूठभर शेव कागदात बांधून दिली..

"दुपारी डबा खाताना तुझ्या त्या फोडणीच्या पोळीवर ही शेव घाल.. छान लागेल.." असं म्हणून छानशी हसलेली आक्कामावशी मला आजही जशीच्या तशी आठवते...!

असाच एक दिवस.. आज आक्कामावशीच्या डोक्यावरच्या त्या टोपलीसोबत हातात एक दुधाची बरणीही होती..

"आई आहे का रे घरात..? उत्तम चीक आणलाय बघ.. खरवस करून खा.."

मध्येच केव्हातरी आक्कामावशी उत्तम प्रतीचा चीक आणायची.. मग काय आमची मजाच मजा.. छान वेलची, जायफ़ळ वगैरे घातलेला गुळाचा उत्तम खरवस खायला मिळायचा.. :)

"मेल्या खरवस खाऊन वर लगेच भसाभसा पा़णी नको पिऊस हो.. नाहीतर मारशील रेघा... हा हा हा.."

मनमुराद, निष्पाप हसायची आक्कामावशी..!

असाच एक दिवस.. बाहेर गडबड ऐकू आली म्हणून डोकावलो तर शेजारच्या भडसावळ्यांना फीट आली होती.. नेमकी तेव्हाच आकामावशीही आली होती.. भडसावळे जमिनीवर आडवे पडून थरथरत होते...

आक्कामावशीने ताबडतोब प्रसंगाचा ताबा घेतला...

"धाव जा पहिला आणि कंगवा घेऊन ये.."

"स्मिता..कांदा आण एक फोडून पटकन..!"

आक्कामावशी आम्हा सगळ्यांना हक्काने आदेश देऊ लागली..  लगेच तिने भडसावळळ्यांचा तोंडात कंगवा घातला.. फोडलेला कांदा नाकाशी धरला.. हातपाय रगडले.. डॉक्टर येईस्तोवर आक्कामावशीच आमची MD FRCS होती...!

कोण होती हो आक्कामावशी..? कुठली होती..?

माहीत नाही...!

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात आक्कामावशी आली होती.. कुलकर्ण्यांनी तिला खास आमंत्रण दिलं होतं..!

मधोमध किंचित सुदृढ आक्कामावशी आणि वरवधू यांचा एक फोटोही काढल्याचं आठवतंय मला..!

आमची पंगत बसली होती.. बघतो तर श्रीखंडाचं पातेलं घेऊन आक्कामावशी येत होती आग्रह करायला..!

माझ्या पानात चांगलं भरभक्कम श्रीखंड वाढत म्हणाली...

"अरे घे मेल्या.. संपवशील आरामात.. लाजतोस काय..?"

दारावर येणारी, शेव फरसाण विकणारी आक्कामावशी..

भडसावळ्यांच्या फीटवर उपचार करणारी आक्कामावशी...

जोश्यांच्या घरी घटकाभर बसून 'तुझे गीत गाण्यासाठी..' ऐकणारी आक्कामावशी...

माझ्या फोडणीच्या पोळीवर मूठभर शेव बांधून देणारी आक्कामावशी...

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात घरचं कार्य समजून श्रीखंडाचा आग्रह करणारी आक्कामावशी...!

पण काय गंमत असते पाहा.. आक्कामावशी दारावर यायची तेवढीच तिची आठवण असायची.. ती केव्हापासून येत नाहीशी झाली हे कळलंच नाही...!

आता आक्कामावशी कुठे असेल हो..?

असेल की नसेल..?..!

आक्कामावशी.. ये की गं फरसाण घेऊन..

आक्कामावशी.. लवकर ये.. तुला बाबूजींची 'तुझे गीत गाण्यासाठी..', स्वर आले दुरुनी..' अशी म्हणशील ती गाणी ऐकवतो..

काय गं आक्कामावशी.. आकाशवाणी मुंबई ब चा कामगार विश्व कार्यक्रम, ते नंदूरबारचे बाजारभाव...यांच्यासोबत काळाच्या ओघात तूही कुठे नाहीशी तर झाली नाहीस ना..??.

आक्कामावशी.. आज फोडणीची पोळी केल्ये.. थोडी शेव हवी होती गं...!

-- तात्या अभ्यंकर..

December 23, 2013

लक्ष्मी..

काल फोरासरोडला गेलो होतो तेव्हा लक्ष्मी गेल्याचं कळलं..

लक्ष्मी..

फोरासरोडवर दिवसरात्र एक गोणपाट घेऊन फिरणारी, रस्त्यावरच्या काही वस्तू उचलून भंगारात विकणारी एक बाई. मी ज्या देशीदारूच्या बारमध्ये नौकरी करत असे तिथनं अगदी जवळच होतं लक्ष्मीचं चंद्रमौळी खोपटं..!

लक्ष्मीचा नवरा एक नंबरचा बेवडा. वेठबिगार होता कुठेतरी. दारू पिऊन पोरं काढायची, एवढं एकच काम त्याला येत होतं. त्याला आणि लक्ष्मीला तीन मुलं होती. त्यातलं एक लहानपणीच वारलं होतं. लक्ष्मीचा हा नवरा असून नही के बराबर होता. सतत घराबाहेर असे. दिवसभर वेठबिगारीचं काही काम करायचा आणि दारू प्यायचा..

आमच्या बारमधला रघू आम्हा नोकर लोकांकरता डाळ-भात बनवायचा. रोज रात्री मी रघूने बनवलेला तो डाळभात जेवायचो..

एकेदिवशी रात्री असाच एकदा बारच्या आतल्या खोलीत मी डाळभात जेवत होतो. बारच्या मागील बाजूस जे दार होतं ते नेहमी उघडंच असायचं. मी जेवत असताना अचानक माझी नजर दाराबाहेर गेली. समोर लक्ष्मी उभी होती. मला काहितरी सांगत होती...

मी रघूला सांगून तिला आत बोलावली..

""सेठ, कुछ खाने को दो ना.. आज कुछ भी पैसा नही मिला. मुझे और बच्चोंको भोत भूक लगा है.."

रघू आम्हा ५-६ नौकर मंडळींकरताच डाळभात बनवायचा पण भरपूर बनवायचा..

मी रघूला ती व तिच्या आणि दोन मुलांना पुरेल इतका भात आणि एका मोठ्या वाडग्यात डाळ अशी थाळी तिला द्यायला सांगितलं..

ती डाळभाताची भरलेली थाळी लक्ष्मीने लगबगीने घेतली आणि आपल्या खोपटात घेऊन गेली..

जरा वेळाने ती रिकामी थाळी घेऊन ती परत आली. मला म्हणाली,

"सेठ.. पेटभर खाना मिला. बदले मे कुछ काम है तो बताओ. झाडू-पोता, साफसफाई, बर्तन धोना..कुछ भी बताओ..."

मला खूप कौतुक वाटल लक्ष्मीचं. तिला फुकट खाणं नको होतं. त्या बदल्यात ती काम करायला तयार होती.."

पण लक्ष्मीने पुढचं वाक्य जे म्हटलं ते ऐकून मात्र माझी मलाच लाज वाटली..

"सेठ, कुछ भी काम बताओ.. लेकीन मै सोती नही.."

???????

लक्ष्मीची चूक नव्हती. हा त्या फोरासरोडचाच गुण की वाण? जिथे प्रत्येक गोष्टीची किंमत किंवा मोबदला हा फक्त "झोपणे" या एकाच क्रियेशी बांधलेला होता..!

वास्तविक मी लक्ष्मीला तो डाळभात केवळ दयेपोटी दिला होता.. कुठलीही अपेक्षा न करता..!

परंतु मी त्या बदल्यात आता लक्ष्मीसोबत झोपायला मागतो की काय अशी त्या बिचारीला शंका आली. ती झाडूपोता, साफसफाई वगैरे इतर सर्व कामं करायला तयार होती..पण त्या रस्त्याच्या गुंणधर्मामुळे मी डाळभाताच्या बदल्यात तिच्यासोबत झोपायला मागेन अशी अनामिक भितीही तिला होती..!

"क्या बकवास करती है? मै तेरेको सोने के लिये पुछा क्या?"

मीही चिडून विचारलं..

"माफ करो सेठ, आप वैसा आदमी नही है.. गलती हुआ.."

"सेठ, मै भी डाल बानाना जानती. आप कभी बोलेगा तो मै खाना बनाएगी.."

मी ठीक है इतकंच म्हटलं आणि तो विषय तिथेच संपला..

त्यानंतर असाच एकदा मी काही कामाकरता बारच्या आतल्या खोलीत गेलो होतो. रघू डाळभाताच्या तयारीत होता. समोर लक्ष्मी उभी होती..

अचानक मी रघूला सांगूल तिला आत बोलावली..

"तू खाना बनाना जानती है ना? डाल बनाएगी..?"

"हा सेठ.. मै बनाएगी.."

'आज इसको डाल बनाने दे..' असं मी रघुला म्हटलं..

तिनं फटाफट कांदा-टोमॅटो चिरला. मिरच्या चिरल्या. राई, जिरा वगैरे टाकून उत्तम फोडंणी केली. त्यात कांदा-टोमॅटो-कढीपत्ता चांगला परतून घेतला, आलं अगदी पातळ चिरून ते घातलं आणि डाळ फोडणीला घातली. अगदी सराईतपणे चवीनुसार मीठ घातलं.. उग्रपणा मारण्याकरता चवीपुरती साखर घातली..!

अगदी थोड्याच वेळात त्या बाईने अगदी चवदार डाळ बनवली होती. त्या मानाने आमचा रघ्या अगदीच कामचलाऊ डाळ करायचा..

त्या दिवशी त्या भंगारवालीच्या हातचा डाळभात मी अगदी चवीन जेवलो... जाताना तिने स्वत:करता आणि आपल्या लेकरांकरता तो डाळभात नेला..!

गरम डाळभात.. !

ही गोष्ट इतकी मौल्यवान असते हे त्या दिवशी मला प्रथम कळलं. त्याची किंमत कळली..!

त्यानंतरही लक्ष्मी अधनंमधनं यायची, डाळभात बनवायची आणि स्वतःकरताही घेऊन जायची.. पण ती रोज येत नसे.. बाई खूप खुद्दार होती. रोज येत नसे. ज्या दिवशी खरोखरच तिला भंगारातून काही कमाई होत नसे तेव्हाच यायची..!

लक्ष्मी या भंगारवालीमध्ये कुठून आले हे संस्कार? कुठून आली तिच्या हाताला चव? य:कश्चित डाळभाताकरता 'झोपणार नाही..' असं म्हणण्याचा सुसंस्कृतपणा कुठून आला तिच्याजवळ..?

मला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. मला इतकंच माहित्ये की मी भंगारवाल्या लक्ष्मी नावाच्या एका सत्शील, सुसंस्कृत अन्नपूर्णेच्या हातचा डाळभात जेवलो होतो..!

खूप काळ लोटला या गोष्टीला. माझा फोरासरोड सुटूनही खूप वर्ष झाली..

काल कुणाकडून तरी लक्ष्मी गेल्याचं कळलं म्हणूनच खूप उदास वाटलं..

"दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम" असं म्हणतात.. आमच्या बारच्या अन्नावर तिचं नाव लिहिलं होतं हे जितकं खरं होतं तितकंच तिच्या हातचा सुग्रास डाळभात खाण्याचं माझ्या नशीबी होतं हेही तितकंच खरं होतं..!

-- तात्या अभ्यंकर.

October 14, 2013

पिवाला बसू. बोंबिल खाऊ.. :)

या वर्षीच्या गणपतीत एके दिवशी दरवर्षीप्रमाणे अगदी पोटभर जेवून तृप्त होऊन आलो आमच्या साधनेकडून..

साधना कोळीण..

मी गेलो की भर मासळी बाजारत.."आला गं बाई माझा भट.." असं ओरडणारी साधना कोळीण.. 

दरवर्षी गणपतीत तिच्याकडे जेवायला जातो मी. आमच्या साधनेचं घर म्हणजे मूर्तीमंत उत्साह, प्रसन्नता.. 

अगदी थाटात गणपती बसवला होता साधनेनं. सगळी फुलांची सजावट..त्यामध्ये खास कोलीलोकांचा रंगीबेरंगीपणा. थोडा भडकपणा. गणपतीच्या दोन्ही बाजूल जिवंत चिंबोर्‍या (खेकडे) टांगलेल्या..!

ही चिंबोर्‍या टांगण्याची पद्धतच आहे सोनकोल्यांची.. महादेव कोली आणि सोनकोली.. 

"आला गं बाई माझा भट. ये भटा.. बस.. "

आजदेखील तसंच दणकून स्वागत.. मुळात ह्या कोळणींचे आवाज चढे असतात.. त्यात साधनेचा आवाज म्हणजे काय विचारायलच नको..! 

घरात एक-दोघी म्हातार्‍या.. घट्ट कोली पद्धतीचं लुगडं नेसलेल्या..पोराबाळांची लगबग, धावपळ.. घरात सणाचं अगदी छान, प्रसन वातावरण..

खुद्द आमची साधना काय सुरेख दिसत होती आज.. ती खास कोलीलोकांची साडी...गळ्यात-हातात-कानात दगिने, मोठं ठसठशीत कुंकू, केसांमध्ये ती टिप्पीकल कोल्यांची वेणी.. 

"भटा..दर्शन घे.. मग जेवायला वाढते तुला...ओ, जरा भटाकडे लक्ष द्या.. त्याला प्रसाद द्या.."

ही सूचना महेन्द्रला.. महेन्द्र म्हणजे साधनेचा घो.. अगदी छान माणूस..आणि तितकाच साधा..

मल नेहमीच खूप आपलेपणा वाटतो साधनेच्या घरात. मी मनापासून रमतो अशा लोकांमध्ये. शाळेतदेखील घनसोलीचा अव्या पाटील, काल्या शिंदे, नाखवा, एकनाथ तांडेल.. हीच माझी जवळची मित्रमंडळी.. प्रतिष्ठित, व्हाईट-कॉलर्ड भटाब्राह्मणांच्या मुलांनी मला कधी फारसा जवळ केलाच नाही. मी मनापासून रमलो तो या आगरी-कोली पोरांच्यातच..!

काय सुंदर सैपाक केला होता आमच्या साधनेने..!

आज घरात गणपती असल्यामुळे सगळं शाकाहारी. गरमगरम चपात्या, उत्तम टोमॅटो-फ्लॉवर-बटाट्याचा रस्सा, काकडीची फर्मास कोशींबीर, खीर, वाफाळलेला भात, वरण ..

"पोटभर जेव रे भटा माझ्या.. देव बसलेत घरात..आज तूच आमचा भट.."

"मी कसला गं भट? तुझ्याकडनंच तर मांदेली-बोंबिल नेतो..." 

"मग? तं काय झालं? रक्त भटाचंच ना रे बाबा..!" 

आमच्या साधनेचे सोवळ्या-ओवळ्याचे, शुचिर्भूततेचे नियम खूप सोपे होते, साधे होते. त्यात जराही बेगडी कर्मठपणा नव्हता..! 

"अरे घे गरम चपाती अजून एक..!"..असं म्हणत तिनं ती पोळी डायरेक्ट तव्यावरून माझ्या पानात वाढलीदेखील..!

तिच्याकडची कुणी एक म्हातारी कोळीण मावशी जेवताना माझ्याजवळ येऊन बसली होती. तीही आग्रह करत होती. महेन्द्र उभा होता कडेला कृतज्ञतेने..!

जेवण झालं. महेन्द्रने, त्या भल्या माणसाने माझ्याकरता १२० पान आणून तयार ठेवलं होतं..!

"पुन्हा ये रे भटा.. ओ, तुमी काय बोला की..!"

पुन्हा महेन्द्रला दटावणी. महेन्द्र बापडा कसनुसा! दोन शब्द बोलला माझ्याशी..

"तुमी नेमी सणावारीच येता.. बाकी पन कदी या. थोडी पिवाला बसू. बोंबिल तलुया तुमच्याकरता. आता गणपतीनंतर म्हावरं चांगलं भेटल..!"

मला मजा वाटली महेन्द्रच्या त्या प्रेमळ 'पिवाला' बोलावण्याची.. 

साधना कोळीण..! 

मला माहीत नाही कुठल्या जन्मीचे हे आम्हा भावा-भैणीचे छान ऋणानुबंध आहेत ते..! एका टिप्पीकल सोनकोळणीचा मी चित्पावन कोकणस्थ भाऊ..  

"आला गं बाई माझा भट.." असं भर मासळीबाजारात प्रेमानं स्वागत होणारा कदाचित मी एकमेव चित्तपावन असेन..! 

-- तात्या अभ्यंकर.

सदर लेख माझे गुरु भाईकाकांना समर्पित...

April 25, 2013

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

खूप छान होती ती, गोड होती...

"जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण..

आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ...

कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता. मरीनड्राईव्हला Queen's Neckless म्हणतात आणि 'ती Queen म्हणजे मीच, हा रस्ता म्हणजे माझाच Neckless आहे' असं मात्र ती गंमतीने म्हणायची. मला जर कधी या संदर्भातला निर्णायक अधिकार प्राप्त झाला तर मी मरीनड्राईव्हच्या रस्त्याला तिचं नांव देईन..

mb

फारा वर्षांपूर्वी वरळी सीफेसला बाबूलाल नावाचा एक पाणीपुरीवाला होता. तिला बाबूलालची पाणीपुरी अत्यँत प्रिय होती. बाबूलालच्या मुलाला धंद्यात मुळीच रस नव्हता पण चांगली नौकरीही मिळत नव्हती. खूप खटपट करून तिने बाबूलालच्या मुलाला टाटासमुहात चिकटवला होता अशी आठवण वहिदाजींनी सांगितली होती. मरण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ऑक्सिजनवर असताना तिने बाबूलालची पाणीपुरी खायची इच्छा व्यक्त केली होती...!

मथुरापेढा, अजमेरी कलाकंद, आणि आमच्या मुंबैच्या मेरवनचा मावाकेक तिला खूप आवडत असे. 'मुंबै माझं First Love' असं ती म्हणत असे आणि त्यानंतर तिला लखनऊ आवडत असे. खूप निष्पाप, निर्विष होती ती...

अंथरुणावर खिळण्यापूर्वीची २-३ वर्ष ती स्पूलवरती एकटीच दीदीची गाणी ऐकायची आणि रडायची. अंथरुणावर खिळल्यावर दीदी तिला एकदा भेटायलाही गेली होती तेव्हा दीदीचा हात हातात घेऊन खूप रडली होती ती...

मुंबईत आता बांद्र्याला तिची कबर आहे..तिच्यावर भरपूर धूळ आहे..

खरं तर त्या कबरस्तानातील तिची कबरही आता हरवत चालली आहे..!

खुदा निगेहेबान हो तुम्हारा या गाण्यात,

उठे जनाजा जो कल हमारा
कसम है तुमको न देना कांधा...!


हे तिनं म्ह्टलं होतं ते तसं एका अर्थी खरंच ठरलं....

शेवटली काही वर्ष फार एकाकी होती ती.. कुणी भेटायला येईल का? निदान फोनवर तरी कुणी बोलेल का..?

कुठल्याही चित्रपटाच्या शुटींगच्या अखेरच्या दिवशी सर्व कामगारांना भरपूर मिठाई वाटायची ती...

तिचा तो अरेबियन व्हिलाही आता नामशेष झाला.. आम्हाला ती वास्तूही जतन करून ठेवता आली नाही..!

इथे वेळ कुणाला आहे..? शापित का होईना, परंतु मधुबाला नावाची एक कुणातरी यक्षिण होती हे देखील आता आम्ही फार काळ लक्षात ठेवू की नाही, हे माहीत नाही..!

-- तात्या.

April 14, 2012

मुडदा शिंपी भिवा..!

सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलीशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!

सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रूटीन कार्यक्रम सुरू होता..

"ए तात्या भडव्या चकणा दे ना..केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"

कुणा गिर्‍हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्‍याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्‍याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..

'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्‍हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?

ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..

"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं.." असं म्हणून तो थोडासा ओशाळा हसला..

त्याच क्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..

हा कोण? कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधुनमधुन मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं सांभाळत होतो..

भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..

"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी शिवी घातली होती..

"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."

माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.

मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारी-टाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला आपटून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!

सर्वांवर उपाय एकच. पोलीस मयत व्यक्तीला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्‍या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !

एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्‍याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!

"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"

ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, फोकलीच्या आज आम्लेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहीतरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..

मध्यम उंची, कुरूप चेहरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहरा मात्र विलक्षण बोलका..!

" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"

"नको रे. मी देशी पीत नाही.."

थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे फुकनीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"

एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????

"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरुण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."

"मग..?"

"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडवीचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"

मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. मग त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"

"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्ल्यांवर बसलेला असतोस..!"

दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखा-सवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!

"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!

"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..

"आमच्यात असाच रेट सांगतात..!"

पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..

"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."

सारं काही भिवाच बोलत होता..!

मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..

"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."

थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!

मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्‍याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्‍यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -

"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. ओकून पडले बघ! भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."

का माहीत नाही, पण भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्‍या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!

त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..

कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!

- तात्या अभ्यंकर.

March 20, 2011

वसंता पोतदार..!

अण्णांना जाऊन आता जवळ जवळ दोन महिने पूर्ण होतील. अण्णा गेले तेव्हादेखील मनात कुठेतरी वसंताचीही आठवण झाली. वसंता अण्णांच्या बराच आधी गेला होता.

वसंता पोतदार!

"ए तात्या, मला चक्क 'अरे वसंता' असं म्हणायचं बरं का! वसंतराव किंवा अहो-जाहो ची भानगङ नाय पाहिजे!"
वास्तविक वसंता माझ्यापेक्षा वयाने. ज्ञानाने कितीतरी मोठा! तरीही मी त्याला केवळ त्याच्या आग्रहाखातर 'वसंता' अशी एकेरीच हाक मारायचा.

अण्णांचं गाणं आणि त्यावर आत्यंतिक प्रेम हाच माझ्या आणि वसंताच्या मैत्रीचा मुख्य मुद्दा. अण्णांच्या गाण्याला वसंता अनेकदा भेटायचा आणि मग गप्पा रंगायच्या, धमाल चालायची!

वसंता हा अत्यंत व्यासंगी आणि विद्वान माणूस. एक चांगला लेखक, उत्तम वक्ता! स्वामिजींवरचं 'योद्धा सन्यासी', भाईकाकांवरचं 'एका पुरुषोत्तमाची गाथा', गाडगेबाबांवरचं 'तोचि साधू ओळखावा', अण्णांवरचं 'भीमसेन' ही त्याची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. वसंता स्वामिजींवर व्याख्यानही फार छान द्यायचा.
अण्णांवर पुस्तक लिहिण्याकरता म्हणून वसंता काही काळ सतत अण्णांसोबत असे. आणि अण्णांचं मुंबईत कुठेही गाणं असलं म्हणजे तिथे माझी हजेरी ही असायचीच. त्यातूनच माझी आणि वसंताची ओळख झाली, परिचय वाढला, दोस्ताना वाढला.

एकदा एका कार्यक्रमाच्या वेळी ग्रीनरूममध्ये साक्षात अण्णांनीच,

"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!"
(मी मुंबैच्या हायकोर्टात वकील आहे हा अण्णांचा समज शेवटपर्यंत तसाच होता. मी एकदोनदा खुलासाही करून पाहिला होता. असो.)
तर,"हे अभ्यंकर. मुंबैच्या हायकोर्टात वकील आहेत आणि आमचे चाहते आहेत..!" अशी आपल्या खर्जातल्या धीरगंभीर आवाजात अण्णांनी वसंताला माझी ओळख करून दिली होती. वास्तविक मी अण्णांच्या लाखो भक्तांपैकीच एक, तसा नगण्यच! परंतु साक्षात अण्णांनीच ओळख करून दिल्यावर आणखी काय पायजेल?!

"क्या बात है, मिलाव हाथ!"

हे त्यावेळचे वसंताचे मनमोकळेपणे आणि आनंदाने उच्चारलेले शब्द मला आजही आठवताहेत!


एका कार्यक्रमानंतर चालायला त्रास होत असल्यामुळे मी आणि वसंता अण्णांना सोबत घेऊन जात आहोत.

त्यानंतर मुंबैतल्याच अण्णांच्या एका चाहत्याच्या घरी अण्णांचा मुक्काम होता. त्या घरी जाऊन विसावतो न विसावतो तोच बुवांचा पुन्हा मूड लागला आणि तंबोरे गवसणीच्या बाहेर निघाले! आणि काय सांगू मंडळी, पुन्हा एकदा जमलेल्या त्या बहारदार मैफलीबद्दल! अण्णांनी आमच्या पुढे दरबारीचा अक्षरश: महाल उभा केला होता! ऐकायला गिनेचुने श्रोते. भाईकाकांच्या शब्दात सांगायचं तर बेहोश झाला होता सारा मामला! वसंता आणि मी बाजूबाजूला बसलो होतो आणि अण्णांच्या दरबारीच्या सुरासुरांवर जीव ओवाळून टाकत होतो!

असो,

आज वसंता हयात नाही, अण्णाही गेले.

आठवणी फक्त उरल्या आहेत..!

-- तात्या अभ्यंकर.

February 26, 2011

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"


"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"


शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.


शबनम..!


मी तसा कडमड्या हौशी गाणारा.. चार मित्रांनी जरा हरबर्‍याच्या झाडावर चढवायचा अवकाश, की लग्गेच मी नरडं साफ करायला घेतलंच म्हणून समजा! आता माझ्यासारख्या बेसुर्‍या, बेताल गवयाला काय गोविंदराव पटवर्धन साथीला मिळणार?! :)


त्यामुळे माझे बाजिंदे-साजिंदेही अगदी माझ्याचसारखे शिकाऊ. शकीलभाय पेटीवाला त्यातलाच एक. दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या या शकीलभाय बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.


"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा तुम्हारा एल आय सी का पॉलिसी लेके देव!"


त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग एल आय सी पॉलिसी म्हणजे काय? विमा म्हणजे काय? कसे आणि किती वर्ष हप्ते भरावे लागतील, लाईफ-कव्हर म्हणजे काय?, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर मी तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना!


शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!


"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश रंडीबाज तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"


इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या. आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी!


दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर त्या मायझव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्‍या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे!


तर काय सांगत होतो?


आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!


अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द तिच्या आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!


एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या शबनमला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!


शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!


काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्‍या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!


शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!




आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा ते डिपॉझिट कंटीन्यू करायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!


करू देत..!


-- तात्या अभ्यंकर.

February 18, 2011

मेघना माझी बहीण..

परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं.

मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच.

मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच!

मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली. पण मेघना खरी रमली ती डबींगच्या क्षेत्रात, संचलन-निवेदनाच्या क्षेत्रात..
परवा सहज म्हणून मेघनाशी गप्पा मारत बसलो होतो, तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी जाणून घेत होतो आणि हळूहळू थक्कही होत होतो! आमची ही लहानशी मेघना आज इतकी कर्तृत्ववान असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं!

"तुला पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क इत्यादी वाहिन्यांवरची नॉडी, निन्जा हातोडी, डिझ्झी, डेक्स्टर्स लॅब मधली डिडी ही पात्रं माहित्येत का? त्या सर्वांकरता माझा आवाज वापरला आहे!"

"बे वॉच" कार्यक्रमात मी पॅमेला अ‍ॅन्डरसनला आवाज दिला आहे!"

"एका लीन नावाच्या चिनी अभिनेत्रीकरता माझा आवाज डब केला गेला आहे. बाल हनुमानमधील 'बाल हनुमानही मीच आहे."

"आणि तुला गंमत महित्ये का? पुणे आणि 'मुंबै-सेन्ट्रल' रेल्वे स्थानकात ध्वनिमुद्रीत उद्घोषणेतून (रेकॉर्डेड अनाउंन्समेन्ट) जी बया बोलते ना, तीही मीच!" Smile

मेघना सांगत होती. आपण तर साला फक्त कौतुकाने तिच्याकडे पाहात होतो!



त्यानंतर मला मेघनाने तिथल्या तिथे निरनिराळ्या आवाजात बोलण्याचा एक छोटेखानी पर्फॉर्मन्सच करून दाखवला..

वाक्य होतं - "खूप दिवसांनी भेटलास, अगदी बरं वाटलं!"

हे वाक्य एक अगदी चिमुरडी, एक तिसरी-चौथीत असलेली, एक कॉलेजकुमारी, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक आज्जीबाई या स्त्रिया कसं बोलतील तसं अगदी एकापाठोपाठ एक बोलून दाखवलं! प्रत्येक पात्राच्या वेळेस क्षणात केलेला आवाजातील बदल, हेल, शब्दोच्चार, प्रत्येक वयाचा लेहेजा तिनं इतका सुंदर सांभाळला की क्या केहेने! अगदी सह्ही पर्फॉर्मन्स होता तो..

मेघनासमोर प्रामुख्याने दोन क्षेत्रं होती -एक म्हणजे अभिनय किंवा दुसरं म्हणजे डबींग- निवेदन-संचलन (रंगमंचीय किंवा दूरचित्रवाणी सादरीकरण इत्यादी.) आणि मेघनाने निवडलं ते डबींगचं क्षेत्र आणि आजमितीला मेघना एक अतिशय व्यस्त डबीग आर्टीस्ट म्हणून कार्यरत आहे. विदेशी चित्रपटाच्या ज्या हिंदी डीव्हीडीज आणि सीडीज इथे बनवल्या जातात त्यातही मेघनाला डबिंग कलाकार म्हणून काम करण्याच्या खूप संधी आहेत/येत असतात.

मेघनाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे. आजमितीस मराठीतील जवळ जवळ सगळ्या कलाकारांशी सह-अभिनयातून म्हणा, एखाद्या रंगमंचीय कार्यक्रमातून म्हणा, मुलाखतीतून म्हणा, मेघनाचा उत्तम परिचय आहे, मैत्री आहे. अभिनय क्षेत्र तिनं सोडलं आहे असं नाही, परंतु त्या क्षेत्रात राहण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स ठेवावे लागतात, काही एक रॅपो ठेवावा लागतो ते ठेवणं मेघनाला तितकसं जमत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही असं आपण म्हणू.. तरीही आभाळमाया, चार दिवस सासूचे, माझं सोनूलं सोनूलं, किंवा सनईचौघडे, मी शिवाजीराजे भोसले.. यासारख्या मोजक्याच चित्रपटांतून तिनं भूमिका केल्या आहेत..परंतु वर म्हटल्याप्रमाणे मेघना खरी रमते ती डबिंगमध्ये किंवा रंगमंचीय/दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातच.

लोभ असावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई - सॉलिड टीम!, 'मी मराठी' वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे तार्‍यासंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, ई टीव्ही वरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयी कार्यक्रम, 'साम' टीव्ही वरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत 'आयुर्वेद' हा कार्यक्रम... यादी मोठीच आहे!

मेघनाने काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे/करते. ते करत असताना तिला राजकीय क्षेत्रातली मंडळी, त्यांची पदं-मानमरातब, प्रोटोकॉल, इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी-विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं (कॉर्पोरेट शोज) सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणार्‍या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शीत करणे ही सर्व कामं मेघना लीलया करते. पण हे सगळं सहज साध्य होत नाही, नसतं! त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास!

श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता मेघनाने भारतातल्या १२ ते १३ राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता माहितीप्रद असे कॉर्पोरेट शोज केले आहेत!

सचिन ट्रॅव्हल्स या नावाजलेल्या यात्राकंपनी सोबतही मेघना निगडीत आहे. त्यांचा 'हॅलो प्रवासी' हा कार्यक्रम ती करते. एकदा त्या कंपनीच्या यात्रेकरूंसोबत मेघना दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावरही गेली होती. तिथं तिनं त्या लोकांकरता विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली आयपीएलचा सामनाही कव्हर केला होता.

"दक्षिण अफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलात चार दिवस राहण्याचा अनुभव केवळ रोमांचकारी होता!"
मेघना सांगते!

किती हरहुन्नरी! किती क्षेत्रात तिचा वावर आहे! किती नानाविध विषयात तिला गती आहे, तिचा अभ्यास आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत! खरंच अभिमान वाटतो..!



रुपारेल महाविद्यालयातून बी ए ही पदवी घेणार्‍या मेघनाचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून एम ए ला लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबै विद्यापिठातून ती एम ए ला पहिली आली आहे!

काय नी किती लिहू मेघनाबद्दल?
जियो मेघना, जियो...!

-- तात्या अभ्यंकर.

January 25, 2011

काका हलवायाकडची जिलबी..

लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.

अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं. आज जेव्हा खरोखरच विमान आलं आणि त्यांना तुकोबांच्या पंक्तित घेऊन गेलं तेव्हा त्या वास्तवातली प्रखरता जाणवली..!

नाही पचवू शकत आहे ते वास्तव. मीही सामान्यच..! ना त्यांच्यासारखा योगीसाधक, ना तुकोबांसारखा परब्रह्म कळलेला..!

अगदी १९८८-८९ पासूनच्या त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांचा अत्यंत साधा सादगीभरा स्वभाव..सारं काही मनात रेंगाळत आहे..

प्रयत्न करतोय पण सूत्ररुपात नेमकेपणाने मांडता येत नाहीयेत त्या आठवणी या क्षणी..!

तसे अबोल होते ते..! पण कधी कधी आपणहून बोलायचे. ख्यालाबद्दल, गाण्याबद्दल, जुन्या गायकांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल भरभरून बोलायचे..

कधी कधी थट्टाही करायचे,

"काय अभ्यंकर, काय म्हणतंय तुमचं गाणं? काय रियाजवगैरे..?"

"छे हो अण्णा, मी कुठला गातोय? मी दगड आहे अजून.."

"तेही नसे थोडके..! तुम्ही दगड आहात हे स्वतःहून कबूल करताय, ही एक चांगली सांगितिक खूण आहे. परंतु काही लोकांना आपण दगड आहोत हेच कळत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला घातक आहे..! दगड असण वाईट नाही परंतु आपण दगड आहोत हे न समजणं, हे मात्र घातक..

असं अगदी नेमकं आणि मार्मिक बोलायचे..!

"वा..! काका हलवायाकडची जिलेबी का? तुम्ही अगदी न चुकता आणता बरं..!"

कधी असं कौतुक करायचे.. मग ते पंजाबात जलंधरला असताना तिथे कशी जिलेबी मिळायची ते सांगायचे..

जलंधरलाच कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जोरबैठका आणि नंतर डायरेक्ट विहिरीत उडी मारून केलेली अंघोळ..!

आठवणीत रमून जायचे.

मग त्या बोलण्यात हाफिजअली यायचे, बिस्मिल्लाखा यायचे, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई यायच्या..!

कधी विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाची गोष्ट..

विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाला अण्णा 'फ्री पास होल्डर' असं गंमतीने म्हणत..!

कधी तंबोरा कसा लावावा, जवारी कशी काढावी, तंबोरा जवारदार कसा वाजला पाहिजे याचे धडे नेहरू सेन्टरच्या किंवा बिर्ला मातुश्रीच्या ग्रीनरूममध्ये मिळायचे..!

खूप आठवणी आहेत, पण वर म्हटल्याप्रमाणे आत्ता धड काही सुचत नाहीये..

पण ते सारं सूत्ररुपाने लिहायचं आहे एकदा..

क्षमा करा, तूर्तास इथेच थांबवतो या ओबधधोबड ओळी..

तात्या.

September 27, 2010

घाल घाल पिंगा वा-या - कमलाकर भागवतांना विनम्र आदरांजली..

मी प्रभादेवी येथील जी एम ब्रेवरीज मध्ये नौकरीला असतानाची गोष्ट..

सर जिमि विल्यम आल्मेडा हे आमच्या कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.. तिथे त्यांना भेटायला नेहमी एक वयस्कर गृहस्थ यायचे.. त्यांचं नाव कमलाकर भागवत. ते जिमीसाहेबांचे दोस्त.

मी एकदा काही कामानिमित्त जिमी साहेबांच्या केबीन मध्ये गेलेला असताना तिथे भागवत साहेब बसलेले होते.
"हा आमचा अभ्यंकर..गाण्यातला दर्दी आहे पण त्यामुळेच काही वेळा कामात चुकतो..!" जिमीसाहेबांनी मिश्किलतेने भागवतसाहेबांशी ओळख करून दिली..त्यानंतर जेव्हा जेव्हा भागवतसाहेब कार्यालयात यायचे तेव्हा प्रथम माझ्याशी गप्पा मारायचे..

"काय, अलिकडे कुणाची मैफल ऐकलीस?"

आम्ही गाण्यावर अगदी मनमुराद बोलायचो..सवडीने केव्हातरी नक्की त्यांच्याचवर एखादा लेख लिहायचा विचार आहे.. पण तूर्तास मूड नाही आणि वेळही नाही..

संगीतकार कमलाकर भागवत. माझ्या गणगोतातलेच एक. अलिकडेच वारले. तूर्तास त्यांचं व्यक्तिचित्र रंगवणे पेन्डिंग ठेवतो..

काही महिन्यापूर्वी त्यांच्याच एका अप्रतिम गाण्याबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या त्या इथं पुन्हा एकदा देतो आणि त्यांना विनम्र आदरांजली वाहतो..

(भागवतसाहेबांचा लाडका) तात्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

घाल घाल पिंगा.. (येथे ऐका)

सुमन कल्याणपुरांचा अत्यंत सुरेल, थेट काळजाला भिडणारा आवाज

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात..

भादव्यातच जेमतेम वर्ष झालेल्या सासरी सखा तरी कोण मिळणार? त्यामुळे वार्‍यालाच सखा मानलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधला आहे..

'सुखी आहे पोर' सांग आईच्या कानात..

अतिशय म्हणजे अतिशय हळवी ओळ! इतका सुंदर रिषभ आणि गंधार फार क्वचितच पाहायला मिळतो. 'रे सख्या वार्‍या, माझ्या माहेरी गेलास तर घरात इतर काही मंडळी असतील, वडीलधारी मंडळीही असतील.. त्यांच्यासमोर काही बोलू नकोस.. तसाच थेट माजघरात जा. तिथं माझी आई असेल.. माझं इकडचं सुख हळूच, हलकेच तिच्या कानात सांग.. खूप सुखावेल रे ती..! लगेच तुला खरवस किंवा बेसनाचा लाडू खायला देईल! खूप छान करते रे माझी आई बेसनाचे लाडू!

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे?

धाकटा दीर असावा तसा संवाद आहे हा वार्‍याशी.. 'अरे माझं माहेरही खूप समृद्ध आहे रे.. तेथल्या परसातला पारिजातक मी इथं बसून पाहते आहे.. मला हवी आहेत रे ती सारी फुलं!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

इथे शब्द संपतात..!

मराठी भावसंगीतातलं एक अतिशय सुरेख गाणं..नव्यानेच सासरी गेलेल्या मुलीचं यापरीस हळवं मनोगत ते कोणतं?!

-- तात्या अभ्यंकर.

June 13, 2010

अल्लाजान..

त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला.

तिथे हरकाम्या होता अल्लाजान..

आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता.
उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची! चेहऱ्यावर तसं निरागसच परंतु सततचं एक लाचार हास्य! खूप दयनीय दिसायचा अल्लाजान.. माझ्या पोटात नेहमी खूप तुटायचं त्याच्याकडे पाहून!

त्याचं अल्लाजान हे नाव खरं की पडलेलं? तो त्या वस्तीत केव्हापासून आला, कसा हरकाम्या झाला? मला माहीत नाही! या जगात एका दमडीचीही किंमत नसलेल्या अल्लाजानची माहिती कोण ठेवतो? आणि कशाकरता??

रौशनीच्या चाळीशेजारीच झमझम हा देशी दारूचा बार. मी तिथे कॅशियर कम मॅनेजर. एके दिवशी हा अल्लाजान डायरेक्ट बारमध्येच घुसला आणि एकदम माझ्या काउंटरपाशीच भिडला!.. अंगाला जाम वास मारत होता त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा! मला किळसच आली त्याची..

"दो बोईल अंडा पार्सल! "

लाचारीने हसत अल्लाजानने बोईल अंड्यांची पार्सल ऑर्डर दिली..

"आप तात्यासाब है ना? मन्सूरने बताया! " पुन्हा एकदा लाचारी.. बोलताना स्वत:ची लाळ गळते आहे याचीदेखील त्याला लाज नव्हती, शुद्ध नव्हती..!

"शी! कुठल्या घाणेरड्या वस्तीत आपण काम करतो आहोत? ते देखील पोटाकरता? " माझं सुसंस्कृत पांढरपेशी स्वगत!

हरकाम्या म्हणजे कामं तरी को़णकोणती करायचा हा अल्लाजान? पडतील ती कामं करायचा. वेश्यांना लागणाऱ्या पिना-पावडरी-कंगव्यांपासूनच्या साऱ्या वस्तू बाजारातून आणणे, चहापाणी, भुर्जी-आम्लेट पार्सल आणून देणे.. झाडूपोता करणे.. 

वेश्यांचे कपडे धुणे.. त्यात घाणेरडी, पिवळसर डाग पडलेली त्यांची अंतर्वस्त्रं देखील जमा! साऱ्या जगाची वासना जिथे सांडायची त्या वासनेचे वेश्यांच्या अंतर्वस्त्रांना पडलेले डाग अल्लाजान धुवायचा..!

अगदी पडेल ती कामं करायचा अल्लाजान!

त्या बदल्यात वेश्या त्याला ५-१० रुपयांची रोजी द्यायच्या.. त्या रोजीत अल्लाजान खूश असायचा. आता खूश असायचा असंच म्हटलं पाहिजे..

दुपारच्या फावल्या वेळात, म्हणजे जेव्हा वेश्यांना वासनेचे दणकट घाले सहन करण्यापासून थोडा निवांतपणा मिळायचा त्या वेळेस कधी व्हरांड्यात सगळ्या वेश्या एकत्र जमून अल्लाजानशी हसीमजाक करायच्या.. अल्लाजानही तेव्हा जमेल तसा नाचेपणा करून हसायचा, हसवायचा, खिदळायचा. त्या दुनियेतले हेच काय ते जरा करमणुकीचे, सांस्कृतिक कार्यक्रम!

अल्लाजानशी थट्टामस्करी हीच त्या वेश्यांची करमणूक आणि त्या वेश्या, त्यांची कामं, आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या चार दमड्या हीच अल्लाजानची दुनिया!

"तात्यासाब... पहला पानी पिओ... घबराव मत. पोलिस अब उस मादरचोदकी चमडी उधेडेगा! " असं म्हणून अल्लाजानने पाण्याचा ग्लास माझ्या पुढ्यात धरला होता..

दारू पिऊन, विना पैसे देता बारमधून निघून जाणाऱ्या फोरासरोडवरील एका गुंडाशी माझी हातापायी झाली होती.. मी त्याला जाम मारला होता, त्यानेही मला धुतला होता.. लगेचच तिथे पोलिस आले.. आमचा हप्ता बांधलेला असल्यामुळे त्या गुंडाचा जबरदस्त बंदोबस्त होणार होता..

मी रस्त्यात धुळीत किंचित कोलमडलो होतो. थोडं खरचटलंही होतं. बावरलो होतो, घाबरलो होतो.. अश्या परिस्थितीत भर रस्त्यात माझ्या पुढ्यात पाण्याचा गिल्लास धरला होता तो अल्लाजानने!

तेव्हा कुठे गेली होती माझी किळस? लाज वाटली होती तिला.. तेव्हा मला त्याच्या अंगाचा दर्प आला नाही.. त्याच्या. दळिद्रतेचा, गरिबीचा, लाचारीचा दर्प नाही जाणवला मला! दिसली ती फक्त निरागसता, आणि माणूसकी!. कुठल्याही मिनरल, बिसलेरीच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा अल्लाजानने पुढे केलेल्या त्या ग्लासातलं पाणी अधिक स्वच्छ होतं, शीतल होतं, निर्मल होतं!

अजून काय लिहू? अल्लाजानबद्दल अधिक भरभरून लिहावं असं काही नाही माझ्याकडे.. आणि ज्याच्यावर पानंच्या पानं संपवावीत असं अल्लाजानचं व्यक्तिमत्त्वही नव्हतं..

"तात्यासाब, चिकनका प्लेट और दो रोटी कितनेको? "

मी रक्कम सांगितली.. हातातल्या पैशांची जुळवाजुळव करत अल्लाजान पुन्हा एकदा लाचार हसला होता आणि थोडा वेळ रेंगाळून निघून गेला होता. त्याला चिकन खायचं होतं पण त्याच्यापाशी पैसे होते ते पुरेसे नव्हते, जुळत नव्हते..

असेच काही दिवस गेले. चार दमड्या माझ्या खिशात होत्या. मला अचानक आठवण झाली ती अल्लाजानची.. तो रौशनीआपाच्या चाळीच्या बाहेरच रेंगाळत बसला होता..

"ए अल्लाजान... " मी हाक मारली..

"बोलो तात्यासाब" तो धावतच माझ्यापाशी आला..

"चल मेरे साथ.. "

टॅक्सी केली आणि जवळच असलेलं दिल्ली दरबार गाठलं..

मी आणि एक मळकट, गलिच्छ तृतीयपंथी असे दोघे दिल्ली दरबार मध्ये जेवत होतो..

चिकन मसाला, बिर्याणी, गरमागरम रोट्या, सोबत दहीकांद्याची कोशिंबीर..

हाटेलातले सारे लोक अत्यंत चमत्कारिक नजरेने आमच्याकडे पाहात होते..

सुरवातीला लाजलेला, मुरकलेला अल्लाजान नंतर अगदी मनसोक्त जेवत होता..

धुळीत पडलेल्या तात्याला पाणी आणून देणारा अल्लाजान मनसोक्त जेवत होता..!

-- तात्या अभ्यंकर.

May 27, 2010

ललीमावशी...

माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची.

ललीमावशी!

ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!

ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..

शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे.
.
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्‍या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!

श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्‍यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..

कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची! Smile

उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..

आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!

ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण! Smile


असो..

'मोठं मोठं डोळं तुजं..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..

चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!

-- तात्या अभ्यंकर.

June 02, 2008

गोपाला मेरी करूना...

१९९३/९४ सालचा सुमार असेल, तेव्हाची गोष्ट.

"ग्रँटरोडचा नॉव्हेल्टी सिनेमा माहीत आहे ना? त्याच्याजवळच रेल्वे हॉटेल म्हणून आहे आणि त्याच्याजवळ एस पी सेन्टर म्हणून साड्यांचं दुकान आहे. तीच बिल्डिंग! ये हां नक्की, मी घरीच आहे!"

दस्तुरसाहेब मला फोनवरून पत्ता सांगत होते!

पं फिरोज दस्तूर आणि त्यांच सुंदर गाणं!

या माणसाच्या मी गेली अनेक वर्ष प्रेमात होतो. त्यांना एकदा भेटावं असं मला खूप वाटत होतं. आणि एके दिवशी तो योग आला. त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार मी ग्रँटरोडला त्यांच्या घरी पोहोचलो. लाकडी गोलाकार जिने असलेल्या त्या बिल्डिंगमधलं त्यांचं ते टिपिकल पारशी पद्धतीचं घर. भिंतीवरचं घड्याळ, खुर्च्या, सोफे, कपाटं, अगदी सगळं सगळं पारशी पद्धतीचं, ऍन्टिकच म्हणा ना! मला एकदम विजयाबाईंच्या पेस्तनजी सिनेमाचीच आठवण झाली.

गुलाबीगोर्‍या वर्णाचे दस्तुरबुवा समोर बसले होते. मी प्रथमच त्यांना इतक्या जवळून पाहात होतो. सवाईगंधर्वांचे लाडके शिष्य, किराणा गायकीचे ज्येष्ठ गवई, माझे मानसगुरू भीमण्णा यांचे ज्येष्ठ गुरुबंधू! मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं!

"ये, बस!"

दस्तुरांनी माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं. त्यांचं गाणं जितकं गोड होतं तेवढेच तेही अगदी सुरेख होते, गोडच दिसत होते!

"काय, कुठून आला? गाणं शिकतोस का कुणाकडे?"

दस्तुरबुवा अगदी मोकळेपणानी माझी विचारपूस करू लागले, माझ्याशी बोलू लागले. अगदी साधं-सुस्वभावी बोलणं होतं त्यांचं. जराही कुठे अहंकार नाही, की शिष्ठपणा नाही! गुजराथी-पारशी पद्धतीचं मराठी बोलणं! मला ते ऐकायला खूप गंम्मत वाटत होती. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने दस्तुरबुवांनी त्यांच्या स्वयपाक्याला माझ्याकरता चहा करायला सांगितला. घरात ते दोघेच होते. ते आणि त्यांचा स्वयंपाकी. ह्या पारश्याने लग्न केलं नव्हतं! नातेवाईंकांचा गोतावळा खूपच कमी. त्यांचा एक पुतण्या तेवढा होता, तो तिकडे अमेरिकेत होता. दस्तुरबुवा अधनंमधनं त्याच्याकडे रहायला जायचे.

पहिल्या भेटीतच मला दस्तुरांनी त्यांच्याकडची त्यांचं एक यमनचं लाईव्ह रेकॉर्डिंग असलेली कॅसेट ऐकायला दिली. "अरे माझ्याकडे एवढी एकच कॉपी आहे. तू वाटल्यास टेप करून घे आणि ही मला परत आणून दे हां!" खूप भाबडेपणाने दस्तुरसाहेब म्हणाले. त्यांच्या आवाजात जात्याच कमालीचा मृदुपणा होता. त्यांना मुद्दामून मृदु बोलण्याची गरजच नव्हती!

घाटकोपरच्या एका मैफलीतलं यमन रागाचं फार सुंदर रेकॉर्डिंग होतं ते! किराणा पद्धतीची, सवाईगंधर्वांच्या तालमीखाली तावूनसुलाखून निघालेली फार अप्रतीम गायकी होती त्यांची! किराणा पद्धतीनुसार एकेका स्वराची बढत करून विकसित केलेला राग, अतिशय सुरेल अन् जवारीदार स्वर, स्वरांचं अगदी छान रेशमी नक्षिकाम करावं अशी आलापी! खरंच, दस्तुरबुवांचं गाणं म्हणजे सुरेल, आलापप्रधान गायकीची ती एक मेजवानीच असे! असो! दस्तुरबुवांच्या गायकीवर लिहायला मी अजून खूप लहान आहे. आणि त्यांच्या गाण्यावर कितीही जरी भरभरून लिहिलं तरी त्यांच गाणं शब्दातीत होतं हेच खरं!



मंडळी, दस्तुरबुवांच्या घरी जाण्याचा, त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनेकदा योग आला हे माझं भाग्य! मी जरी समोरसमोर बसून त्यांची तालीम घेतली नसली तरी एका अर्थी ते माझे गुरूच होते. किराणा गायकीबद्दल, आलापीबद्दल, गाणं कसं मांडावं, राग कसा मांडावा, घराण्याची गायकी कुठे अन् कशी दिसली पाहिजे इत्यदी अनेक विषयांवर ते माझ्याशी अगदी भरभरून बोलत! त्यांची जुनी ध्वनिमुद्रणं मला ऐकवत! आपण कुणीतरी मोठे गवई आहोत असा भाव त्यांच्या बोलण्यात कधीही म्हणजे कधीही नसे!

एकंदरीत खूपच साधा आणि सज्जन माणूस होता. अतिशय सोज्वळ आणि निर्विष व्यक्तिमत्व! बोलणं मात्र काही वेळेला मिश्किल असायचं!

एकदा असाच केव्हातरी त्यांच्या घरी गेलो होते. नोकराने दार उघडलं.

"दस्तुरसाब है?"

तेवढ्यात, "अरे ये रे. किचनमध्येच ये डायरेक्ट! चहा पिऊ!" असा आतूनच दस्तुरसाहेबांचा आवाज आला. त्यांच्या स्वयंपाक्याने आमच्या पुढ्यात चहा ठेवला. टेबलावर लोणी, ब्रेड ठेवलेलं होतं! दस्तुरबुवांनी स्वत:च्या हाताने लोणी लावून दोन स्लाईस माझ्या पुढ्यात ठेवले! आम्ही लोणीपाव खाऊ लागलो. तेवढ्यात स्वयंपाकघराच्या एका कोपर्‍यातून दोन मोठे उंदीर इकडून तिकडून पळत गेले! च्यामारी, घरात दोन दोन मोठाले उंदीर! त्यांना पाहताच मी दचकलोच जरा! मला दचकलेला पाहून दस्तुरसाहेबांनी एकदम मिश्किलपणे म्हटलं,

"अरे ते मामा लोक आहेत! खेळतात बिचारे. त्यांना तरी माझ्याशिवाय दुसरं कोण आहे?!"

आमच्या दस्तुरसाहेबांना विडी ओढायची सवय होती बरं का मंडळी! फार नाही, पण अधनंमधनं म्हातारा अगदी चवीने ती खाकी विडी ओढायचा! "दस्तुरसाहेब, विडी चांगली नाही बरं प्रकृतीला! जास्त ओढायची नाही!" असा मी त्यांना जरा माझ्या लहानपणाचा फायदा घेऊन एकदा प्रेमळ दम दिला होता!

"बरं बरं! यापुढे एकदम कमी ओढीन. मग तर झालं?!" मी घेतलेला लहान तोंडी मोठा घास त्यांनी तेवढ्याच मोठेपणाने आणि खिलाडीवृत्तीने मला परतवला होता! त्यानंतर काहीच दिवसांनी नेमका मी फोर्टमधल्या कुठल्यातरी दुकानात गेलो होतो, तिथे मला हमदोनो पिक्चरमध्ये असतो तसा एक म्युझिकल सिग्रेट लायटर मिळाला. त्या लायटरचे स्वर खूप छान होते. तो लायटर पाहिल्यावर मला एकदम दस्तुरसाहेबांचीच आठवण आली. मी तो त्यांना मुद्दाम प्रेझेंट म्हणून देण्याकरता त्यांच्या घरी गेलो. त्यांनाही तो लायटर खूप आवडला!

"अरे खूप महाग असेल रे! कशाला एवढे पैसे खर्च केलेस? असं कुणी काही प्रेझेंट दिलं की मला खूपच अवघडल्यासारखं वाटतं! आणि काय रे, एकिकडे मला विडी कमी ओढा म्हणून दम देतोस आणि दुसरीकडे हा लायटर पण देतोस? आता तू हा इतका सुंदर लायटर दिल्यावर माझी विडी कशी कमी होणार सांग बरं!"

हे म्हणतांना त्यांच्या चेहेर्‍यावर जे निरागस मिश्किल भाव होते ते मी आजही विसरू शकत नाही! खरंच, देवाघरचा माणूस!

त्यांचे गुरू सवाईगंधर्व, यांच्याबद्दल तर ते नेहमीच भरभरून बोलत. त्यात केवळ अन् केवळ भक्तिच असे. सवाईगंधर्वांच्या काही आठवणी त्यांनी मला सांगितल्या होत्या. एक आठवण सांगतांना त्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी यायचं!

दस्तुरबुवा १४-१५ वर्षांचे असतानाची गोष्ट. सवाईंचा नाटककंपनीसोबत जेव्हा मुंबईत मुक्काम असे तेव्हा सवाई त्यांना त्यांच्या घरी येऊन गाणं शिकवायचे. एकदा असेच पावसाळ्याचे दिवस होते. रस्त्यावर खूपच चिखल आणि पाणी साचलं होतं. त्या पावसातही सवाईगंधर्व त्यांच्या घरी शिकवणीकरता आले. गुरूने शिष्याला चांगली तास, दोन तास तालीम दिली अन् सवाईगंधर्व जायला निघाले! दारापाशी आले व स्वत:च्या चपालांकडे पाहून त्यांनी क्षणभर दस्तुरांच्या आईकडे अत्यंत कृतज्ञतेच्या भावनेनं बघितलं, हात जोडले, थोडे हसले आणि घराबाहेर पडले! झालं होतं असं की बाहेरच्या पावसा-चिखलामुळे सवाईंच्या चपला खूपच बरबटलेल्या होत्या. मुलाची शिकवणी होईस्तोवर त्या माऊलीने सवाईंच्या चपला स्वच्छ धुऊन, तव्यावर वाळवून कोरड्या करून ठेवल्या होत्या!!

इंडियन आयडॉल, अजिंक्यतारा, महागायक, महागुरू, एस एम एस चा जमाना नव्हता तो!!

सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता. 'गोपाला मेरी करूना' ही अब्दुलकरिमखासाहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतीम गायचे! साक्षात अब्दुलकरीमखासाहेबच डोळ्यासमोर उभे करायचे!

अण्णा आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!"

अण्णा नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!

असो..!

अजून काय लिहू? आता फक्त दस्तुरबुवांच्या आठवणीच सोबतीला उरल्या आहेत! त्या आठवणींतून बाहेर पडवत नाही. खूप भडभडून येतं. अलिकडेच दस्तुरसाहेब वारले. एका महत्वाच्या कामाकरता, एक महत्वाची कौटुंबिक जबाबदारी निभावण्याकरता त्या दिवशी मी पुण्यात होतो. मला तातडीने मुंबईला परतणं शक्य नव्हतं. दस्तुरांचं अंत्यदर्शन मला मिळालं नाही हे माझं दुर्भाग्य म्हणायचं! दुसरं काय? काल संध्याकाळी थोडा वेळ होता म्हणून मुद्दाम ग्रँटरोडला गेलो होतो. त्या इमारतीपाशी गेलो. पण दस्तुरांच्या घरी जाण्याची हिंमत होईना! खूप भरून आलं. पुन्हा काही आठवणी ताज्या झाल्या. मी दिलेला लायटर असेल का हो अजून त्या घरात? मी येऊन गेल्याचं कळलं असेल का हो आमच्या त्या पारशीबाबाला?

रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. लोकं आपापल्या उद्योगात होते. मी मात्र एकटा, एकाकी उगाच त्यांच्या घराबाहेर घुटमळत होतो. मनात 'गोपाला मेरी करूना'चे सूर रुंजी घालत होते!

--तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

December 31, 2007

सालस...

नमस्कार मंडळी,
ही एक जुनी हकिगत आहे. आत्ता केबलवर "त्रिदेव" नावाचा हिंदी चित्रपट लागला होता, तो जरा बघत बसलो होतो. पण त्यामुळे माझ्या काही पूर्वस्मृती जाग्या झाल्या. म्हटलं, त्या तुमच्याबरोबर share कराव्या.

१९८७-८८ सालचा सुमार असेल. आम्ही मित्रमंडळी कॉलेजचे रमणीय दिवस फारसा अभ्यास-बिभ्यास न करता फार मजेत व्यतीत करत होतो. मस्तपैकी रोज सकाळी कॉलेजांत टाईमपास करायचा, जोक्स सांगायचे, गाणी म्हणायची आणि धमाल करायची. त्यांत मी म्हणजे काय, एकदम फेमस! "तात्या जरा म्हण रे गाणी" असं कोणी म्हटलं की मी लगेच त्या हरबऱ्याच्या झाडावर चढायचो आणि गायचो. मग काय, सगळ्या मुलामुलींचा घोळका साला आपल्याभोवती!! मग काय विचारता, कँटीनमध्येच रोज एक छोटीशी मैफलच रंगायची. एहेसान तेरा होगा, अभी ना जाओ छोडकर, दिवाना हुआ बादल, हम प्यार मे जलनेवालोको वगैरे गाण्यांच्या फैरी झडायच्या.

तसा मी यथातथाच गायचो. पण च्यामारी मैफल मारून नेण्यांत आपण पटाईत! अहो, चांगल्या चांगल्या, छान छान दिसणाऱ्या मुलीसुध्दा कौतुकानं कम प्रेमानं म्हणायच्या, "कोण तात्या ना, क्या बात है, छानच गातो!" साला आपण खुष!!
वर्गांत कमीच बसायचो. सदैव कँटीन मध्येच पडलेला असायचो. आमचा कँटीनवाला बबल्या शिंदे सामोसे फक्कड करायचा. तोही माझा भक्त कम दोस्त होता. आमच्याच वयाचा बबल्या खरंच खूप छान मुलगा होता. मिष्कील होता. त्याला syjc मधली वैशाली जोगळेकर फार आवडायची. तसं त्यानं एकदा मला हळूच सांगीतलंही होतं. "च्यामारी तात्या, काय नशीब बघ माझं! साला कँटीनवाल्या पोऱ्याला कोण पोरगी पटणांर?, जाऊ दे" असं म्हणायचा!! पण कधी कधी वैशाली कँटीनमध्ये आलेली असायची तेव्हा बबल्या सामोसे जरा जास्तंच खरपूस आणि अधिक प्रमाने तळायचा! मध्येच माझ्या सुरू असलेल्या मैफलीत डोकावायचा, आणि तात्या, "चैनसे हमको कभी, आपने जिने ना दिया" हे गाणं म्हण, एक सामोसा फ्री देईन अशी ऑफरही द्यायचा!

एकूण काय, सगळी धमाल चालायची. गायचो-बियचो बरा, त्याच्या जोडीला बोलबच्चनगीरी, त्यामुळे काही मुलीं सुध्दा आमच्या गोटांत सामील झाल्या होता. त्याही आमच्या बरोबर खुप मजा करायच्या. मी त्या सगळ्या ग्रुपचा म्होरक्या!! अगदी "तात्या म्हणेल तसं" इतपत मी माझं प्रस्थं माजवलं होतं! असो. (गेले ते दिवस आता. हल्ली गेले ते दीन गेले हे गाणं खरंच फारच सुरेख म्हणतो मी! वेदनेतून गाणं जन्माला येतं म्हणतांत ना, ते असं!!)

संध्याकाळी पुन्हा सगळेजण (फक्त मुलंच) न चुकता ठरलेल्या नाक्यावर हजर! आमच्या ठाण्याच्या गोखले रोडला संध्याकाळी फार सुंदर हिरवळ असायची. (आजही आहे, पण हल्ली मुली मला "काका, जरा वाजले किती ते सांगता?" असं विचारतांत!, असो.) नाक्यावर उभं राहून आमची भरपूर थट्टा-मस्करी चालायची. शिवाय आमच्यातला प्रत्येकजण आपापला सभ्यपणा जपत, लाईनी मारत असे. ते वयच तसं होतं. एक मात्र खरं, की आमच्यापैकी कधी कोणी असभ्यपणा केला नाही. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींवर फालतू कॉमेंटस् पास करणे, आचकट विचकट हावभाव करणे असले प्रकार आम्ही कधीच केले नाहीत. पण हळूच एखादीकडे बघणे, लाईन मारणे इतपतच आमची पापभिरू हिरोगिरी चालायची! त्यातच मजा असायची.

रोज संध्याकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला त्या रस्त्यावरून एक मुलगी जायची. रोजचा क्लासबीस संपवुन जात असेल घरी. तुम्हांला खरं सांगतो मंडळी, मला ती मुलगी अतिशय आवडायची! तशी ती दिसायला फार सुरेख वगैरे नव्हती पण एकंदरीत फारच आकर्षक व्यक्तिमत्व होतं तीचं. आपण तर बाबा मरायचो तिच्यावर. अत्यंत सालस दिसायची. पण तीचं तर नांवही आम्हाला माहीती नव्हतं, पण सालस दिसायची म्हणून तिचं नांवही आम्ही "सालस" हेच ठेवलं. ती येतांना दिसली की सगळे म्हणायचे, "अरे तात्या, लेका तुझी सालस येत्ये बघ!". "तात्या, तुझी सालस!" झालं, मी लगेच लाजेने चूरचूर व्हायचो! मग मी हळूच तिच्याकडे बघायचो. मंडळी, काय सागू तुम्हांला. खल्लास दिसायची हो ती! आहाहा, आत्ता हा लेख लिहितांना सुध्दा डोळ्यात पाणी आलं बघा!! दिवसभरच्या व्यापातून(?) संध्याकाळी एकदा का सालसचं दर्शन झालं की धन्य वाटायचं. एव्हढं होईपर्यंत ७.३०-७.४५ वाजलेले असायचे. सिगरेटचे झुरके आणि कटिंग मारून आम्हा मित्रांची पांगापांग व्हायची. मीदेखील सालसच्या आणि माझ्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत रंगवत घरच्या वाटेला लागायचो!!

असा रोजचा दिनक्रम सुरू होता. दिवस फार मजेत चालले होते. दिवसेंदिवस मी सालसच्या अधिकच प्रेमांत पडत चाललो होतो. सालस ही जगातली सर्वांत देखणी, सर्वांत आकर्षक, सर्वांत गुणी मुलगी वाटायची मला. पण सालसला त्याचा पत्ताच नव्हता!

अशीच एक छानशी संध्याकाळ. मस्तपैकी आमचा अड्डा जमला होता. सालस यायची वेळ झालेलीच होती. च्यामारी जी मुलगी आपल्याला एवढी आवडते, तिच्याशी आपली साधी ओळखदेखील नसावी, याचं मला राहून राहून वाईट वाटत होतं. एरवी मी अनेकींना माझ्या झुरणाऱ्या मित्रांबद्दल बिनधास्त अगदी भर रस्त्यात गाठून, कुठूनतरी ओळख काढून विचारलं होतं. पण सालसशी कसं बोलायचं? अरे यार, वो तो लाखोमे एक थी.. आहाहा, काय दिसायची हो.. छान सावळा रंग, आकर्षक, बोलकी चेहरेपट्टी.. मंडळी, काय सांगू तुम्हाला!

एकीकडे माझे मित्र मला म्हणत होते, "काय तात्या? अरे एवढा शूर तू. एका मुलीशी बोलायला घाबरतोस? च्यामारी, भीड बिनधास्त! अरे एवढा बोलबच्चन तू! आपल्या कॉलेजातल्या मुलींवर सफाईने शाईन मारतोस! फार फार तर काय होईल? नडेल, आखडेल! अरे यार, खरं काय ते एकदा कळू तरी देत. असा किती दिवस झुरणार तू?!"

गणेश सुतावणे नावाचा एक खट्याळ पोरगा आमच्या ग्रुपमध्ये होता. आम्ही त्याला गण्या म्हणायचो. महा खट्याळ कार्ट! नेहमी कुजबुजल्यासारखं बोलायचा. सदैव कुचकट टोमणे मारायचा, आणि स्वतःशीच खट्याळपणे हसायचा. तो एकदा मला गंभीर आवाजात म्हणाला," हे बघ तात्या, पू होऊन पिकायच्या आधीच कोणतंही गळू फोडलेलं बरं..!!! ...काय? तू एकदा तिला विचारूनच टाक...!!"

प्रसाद भणगे नावाचा आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगा होता. माझा अगदी विशेष भक्त! त्याचं तर भलतंच निरीक्षण! तो तर एकदा मला म्हणाला, "तात्या, अरे ऐक माझं. मला खात्री आहे, तिलाही तू जाम आवडतोस!! अरे ती जेव्हा आपल्यासमोरून पास होते ना, तेव्हा तीही हळूच तुझ्याकडे बघते. मी स्वतः पाहिलंय!!":) "तू नुसतं एकदा तिला विचारायची हिंमत कर! बस! अरे, तुला सालस नक्की पटेल आणि तसं झालं तर मी अख्ख्या ठाण्याला पेढे वाटीन आणि बिल्डिंगला लाईटींग करीन..!!"

अहो कसलं काय मंडळी, हे सगळं प्रसादची माझ्यावरची भक्ती, मला धीर देण्याकरता बोलत होती. म्हणे तूही तिला जाम आवडतोस! छ्या..!! तिनं आजतागायत एकदाही ढुंकूनही माझ्याकडे पाहिल्याचं मला आठवत नव्हतं!

एके दिवशी मात्र मी ठरवलंच! च्यामारी, आज तिच्याशी ओळख काढायचीच. बिनधास्त बोलायचं. जो होगा देखा जायेगा! घरातल्या घरातच आरशासमोर दोन-तीन रिहर्सल केल्या, डायलॉग पाठ केले! आणि पक्का निश्चय करूनच नाक्यावर गेलो. हळूहळू बाकीचीही मित्रमंडळी नाक्यावर जमली. नेहमीच्या गप्पा, कटींगचाय, सिगरेट सुरू झाली. आज मी तिच्याशी ओळख काढणार आहे, डायरेक्ट भिडणार आहे याबाबत मी कुणालाच थांगपत्ता लागू दिला नव्हता. पण जसजसा वेळ जाऊ लागला तसतशी माझी फाटायला लागली! आज ती आलीच नाही तर फार बरं होईल असासुद्धा एक पळपुटा विचार माझ्या मनांत येऊन गेला! तेवढ्यात गण्या कुजबुजला, "तात्या, तुझी सालस...!!"

लांबूनच ती येताना दिसत होती. छानसा पांढऱ्या शुभ्र रंगाचा पंजाबी ड्रेस! चेहऱ्यावरती नेहमी दिसणारा एक आत्मविश्वास!! क्षणभर मनात विचार आला, जाऊ दे! आज नकोच हिला विचारायला!! आज ही इतकी छान दिसत्ये की आपल्याला नक्की नाहीच म्हणेल!! :) उगाच रिस्क कशाला घ्या! :)

"अरे! तात्याची सालस आली वाटतं!" "अरे यार तात्या, आज खरंच काय मस्त दिसत्ये रे!" विन्या म्हणाला.
एव्हाना ती येताना इतरही मित्रांना दिसली होती. पण तिला आज भिडण्याचा मी मनोमन प्लॅन केला आहे, हे कुणालाच माहीत नव्हतं.

तेवढ्यात सुरेशचं माझ्यावरचं प्रेम उचंबळून आलं! तो हिंदीत म्हणाला, "चल तात्या, आज तेरे वास्ते आपून भिडता है उसको..!!"

"नको रे बाबा. तू वाटच लावशील माझी!" आमचा सुऱ्या म्हणजे एक अवतारच होता. हे जीवन म्हणजे एक हिंदी पिक्चरच सुरू आहे असं त्याला सदैव वाटायचं! उगाच काहीतरी तिच्यापुढे बरळायचा, आणि सगळं मुसळ केरात जायचं!!

कशी माहीत नाही, पण माझ्या मनातली घालमेल गण्याला कळली. तो नेहमीप्रमाणे हळूच कुजबुजला, "तात्या, ती येत्ये बघ! आज हे गळू फोडूनच टाक एकदाचं..!!" असं म्हणाला आणि हलकेच फीस्स्स करून हसला..!!
छ्या! हा गण्या म्हणजे खरंच एक हलकट माणूस होता...!! :)

'बस्स! ठरलं! नकोच ते! आज नाहीच विचारायचं! आज तिला नुसतं एक स्माईल देऊन बघावं काय होतंय ते..!!' असा मी ऐनवेळी निर्णय घेतला!! च्यामारी मंडळी, बघा काय पण माझी निर्णयक्षमता..!! आहे की नाही वाखाणण्याजोगी..!! :)
'काय सांगावं? कदाचित तीही मला उत्तरादाखल प्रतिस्माईल देईल.!!' या गण्याला नाही अक्कल! नुसत्या गोळ्या घेऊन भागत असताना मला ऑपरेशन (गळवाचं हो...!!) करायला सांगत होता...!! :)

हुश्श!! पण या निर्णयाने किती बरं वाटलं माझं मलाच!! :)

तिचं माझ्याकडे लक्ष जाईल, माझा चेहरा तिला स्पष्ट दिसेल हे पाहून मी थोडा ऍडजस्ट होऊन उभा राहिलो. नाहीतर मी नुसताच स्माईल द्यायचो, आणि ती आपल्याकडे बघायचीच नाही! साला, आपलं स्माईल फुक्कट!! :) शिवाय, पचका वेगळाच..!!

आता मात्र ती आमच्या खूपच जवळ आली होती, आणि ५-१० सेकंदातच आमच्या समोरून पास होणार होती, आणि मी तिला एक छानसा (माझ्या परीने..!!) स्माईल देणार होतो. आणि आज कधी नव्हे ती आमची नजरानजर झाली!

पक्षांची किलबिल थांबली, वारा स्तब्ध झाला, साऱ्या जगानं क्षणभर एक पॉज घेतला, आणि.....

(क्रमशः)--

तात्या.

December 05, 2007

काशीबाई..

राम राम मंडळी,

ठाण्याच्या एकविरा पोळीभाजी केन्द्राच्या बाहेर उभं राहून गरमागरम पोळीभाजी खायची आणि तिथूनच कार्यालयात जायचं हा माझा नित्याचा क्रम. घरगुती स्वरुपाची पोळीभाजी केन्द्रं, हा आम्हा चाकरमानी मुंबईकरांचा एक आधार. आज ठाण्या-डोंबिवली सारख्या शहरांत अशी अनेक पोळीभाजी केन्द्रं उभी आहेत. एकविरा पोळीभाजी केन्द्र हे त्यातलंच एक.

सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले असतात. मी एकविरेच्या बाहेर उभा असतो.

"आज तुझी आवडती वांगीबटाट्याची भाजी आहे रे दादा. आज जेव बाबा जरा निवांत!"

उजळ वर्णाची, म्हातारीशी सुरकुतलेली, गोल चेहेर्‍याची, गालावर छानश्या खळ्या असलेली, कपाळावर पुसटसे तीन हिरवट त्रिकोणी ठिबके गोंदवलेली, चेहेर्‍यावर समाधान असलेली काशीबाई मला म्हणत असते!

काशीबाई!

एकविरा केन्द्रात रोजंदारीवर भाकर्‍या करणारी एक बाई! एकविराच्या त्या लहानश्या जागेत खाली जमिनीवर बसून तीन-चार बायका पोळ्याभाकर्‍या करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यातलीच काशीबाई एक! भाकर्‍या करण्याचं काम काशीबाईकडे . काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची. पण तरीही ती माझ्याकरता खूप काही आहे. तिच्या समाधानी व्यक्तिमत्वाचा मी निस्सिम चाहता आहे!

सकाळी सकाळी लवकर उठून एखाद-दोन घरी जाऊन बाळंतीणींना शेक, अंगाला लावण्याचं काम करणे हेदेखील काशीबाईच्या नित्याचंच एक काम. काशीबाई बाळंतीणींच्या अर्भकांच्या मालिशची कामं करते हे मला माझा मित्र अमित चितळे याच्या घरी मी गेलो असताना कळले. तिथे अमितच्या मुलाला मालिश करायला काशीबाई आली होती. इथे तिचा एक गंमतीशीर संवाद सांगायचा मोह मला आवरत नाही.

पोराचं मालिश करून झाल्यावर काशीबाई अमितला म्हणाली, "दादा तुमचं पोरगं मोठेपणीसुद्धा असंच अगदी गोरंपान राहील"

"ते कसं काय?" अमितने विचारलं.

"त्याचं सामान बघा. कसं अगदी गोरंगुलाबी आहे! ज्याचं सामान असं गोरंगुलाबी असतं तो मोठेपणीही छान गोराच राहतो. पण सामान जरा जरी काळपट असेल तर मात्र गोरेपणा टिकणं कठीण आहे! :)

काशीबाई किती सहजपणे बोलून गेली होती हे! तिचे विचार ऐकून मी आणि अमित खो खो हसलो होतो. या जुन्या बायकांचे काही काही शब्द आणि आडाखे मोठे मजेशीर असतात! :)

मालिशची कामं करून मग काशीबाई एकविरेत येते. तिथे भाकर्‍या बडवायचं काम सुरू! साडेदहा अकराच्या सुमारास भाकर्‍यांच्या कामातून काशीबाई जराशी मोकळी होते व तीही तिथेच चार घास खाते. त्यानंतर हळूच चंची उघडून तंबाखू मळून खाईल. जुन्या खेडवळ बायकांची तंबाखू खायची जुनी सवय काशीबाईलाही आहे.

एके दिवशी मी असाच पोळीभाजी खात एकविरेच्या बाहेर उभा होतो तेव्हा तिथेच खाली जमिनीवर बसून अगदी मन लावून भाकर्‍या करत असलेल्या काशीबाईने माझं लक्ष वेधलं.

'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काशीबाई भाकर्‍या करता करता असं काहीसं छानसं कुठलंतरी खेडवळ लोकगीत आपल्याच नादात गुणगुणत होती. त्याची चाल, शब्द सगळंच मला अपरिचित होतं पण ऐकायला छान वाटत होतं. रोजंदारीवर भाकर्‍या करण्यासारखं कष्टप्रद काम करतानादेखील ही बया काय छान गुणगुणत होती! माझाही स्वभाव तसा बोलघेवडाच. मी पटकन तिला म्हटलं, "मावशे, खूप चांगलं गातेस की गं तू!"

तशी आजुबाजूच्या बायांकडे पाहात काशीबाई एकदम गोड लाजली आणि गायचीच थांबली! म्हातारीच्या खळ्या काय सुंदर दिसल्या लाजताना! त्या दिवसापासून माझी आणि काशीबाईची 'आखो ही आखोमे' गट्टीच जमली! माझ्या रोजच्या वेळेवर मी पोळीभाजी खायला गेलो की नजरेतूनच आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अधिक काही बोलणं, गप्पा मारायला वेळही नसायचा आणि कारणही नसायचं!

एकविरेत रोज तीन चार प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या, झुणका असायचा, भाकरी, पोळ्या असायच्या. एकदा पातेल्यातल्या वांगीबटाट्याच्या रस्साभाजीकडे पाहून, "अरे वा! आज वांगीबटाट्याची भाजी का? वा वा!" अशी नकळतपणे माझ्याकडून दाद गेली!

"आज हीच भाजी मला दे" असं मी काऊंटरवर बसलेल्या शिवरामला सांगितलं.

"अरे दादा, वांगीबटाट्याच्या भाजीसंगती भाकरी खा की! चपाती कशापायी खातो?" काशीबाई प्रथमच माझ्याशी बोलत होती! अगदी डायरेक्ट! :)

तिचं बोलणं ऐकून शिवरामही क्षणभर चाचपडला, मग लेगच सावरून म्हणाला, "खरंच, आज चपाती नको, भाकरीच खावा साहेब. आमची काशीबाई भाकर्‍या एकदम फस्क्लास करते! "
'First Class' या इंग्रजी शब्दांचा उच्चार 'फर्स्ट क्लास' असा आहे हे शिवरामला अमान्य होतं! :) असो, रंगाने जर्द काळ्या, बोलक्या डोळ्यांच्या, अंगाने सडपताळ परंतु देखण्या असलेल्या शिवरामविषयी पुन्हा केव्हातरी! कुणालाही हवाहवासा वाटावा असाच आमचा शिवराम आहे!:)

"थांब जरासा, आत्ता गरम भाकरी करून तुला देते!"

वास्तविक पातेल्यात आधी केलेल्या १०-१२ भाकर्‍या शिल्लक होत्या, परंतु मला गरमगरम भाकरी मिळावी अशीच माझ्या मैत्रिणीची इच्छा होती! माझ्याकडून मी काशीबाईला केव्हाच माझी मैत्रिण मानले होते परंतु तिच्याकडूनही माझ्याबद्दल तेवढाच ओलावा आहे हे वरील भाकरीच्या एका साध्या प्रसंगातून मला समजले आणि त्याचा आनंद त्या गरम भाजी भाकरीपेक्षा अंमळ अधिक होता! किंबहुना, काशीबाईने आपणहून मला गरमागरम भाकरी करून दिली त्यामुळे ती भाजीभाकरी मला अधिक गोड लागली!

मी त्या म्हातारीच्या जवळजवळ प्रेमातच पडलो होतो. मला त्या बाईबद्दल खूप उत्सुकता होती, तिच्याशी भरपूर बोलावंसं वाटत होतं! पण कधी? ती बिचारी आत बसून आपल्या भाकर्‍यांच्या व्यापात मग्न असे आणि मलाही तिथे अधिक काळ थांबायला वेळ नसे. पण एके दिवशी तिच्याशी बोलायचा, तिच्या घरी जायचा प्रसंग आला. मी नेहमीप्रमाणे एकविरेत पोळीभाजी खाण्याकरता गेलो होतो. मला पाहून काशीबाई उठली आणि तिने एक कार्डवजा कागद माझ्यापुढे धरला.

"जरा हे कार्ड बघ रे दादा. ह्याचे पैशे कधी भेटणार मला?"

पोष्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमचं ते कार्ड होतं. पाच वर्ष संपलेली होती आणि आता काशीबाईला व्याजा/बोनससहीत पाच-पंचवीस हजारांची रक्कम मिळणार होती असं ते कार्ड दर्शवत होतं!

"अगं मावशे, तुला फार काही करावं लागणार नाही. आज उद्या केव्हाही टाऊन पोष्टात जा. मास्तरांना भेटून हे कार्ड दाखव, ते सांगतील तिथे सह्या कर म्हणजे लगेच तुला ह्याचे पैशे भेटतील!"

"धत तुझी मेल्या! मला कुठं सही करता येते? तू येशील का माझ्यासंगती? ती पोष्टाची बया धा धा निरोप धाडून पण येईना बघ!" निरागसपणे हसत काशीबाई म्हणाली.

काशीबाईचे पैसे गुंतवणारी कुणी महिला एजंट आता तिला भेटतही नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. एकदोन दिवसातच मी तुझ्याबरोबर पोष्टात येईन असं मी काशीबाईला कबूल केलं आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी दोनअडीचच्या सुमारास मी मुद्दाम वेळ काढून काशीबाईसोबत पोष्टात गेलो. पोष्टाच्या बाहेर आमची रिक्षा उभी राहिली. काशीबाईने आपल्या मळकटश्या बटव्यातून पैसे काढले.

"थांब मावशे. मी देतो रिक्षाचे पैसे" मी सहजंच म्हटलं.

"माझं काम अन तू कशापायी पैशे देणार? वा रं वा!" काशीबाई जवळजवळ ओरडलीच माझ्यावर! पण ते माझ्यावर ओरडणं नव्हतं तर तो तिचा स्वाभिमान होता! काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! त्या भाकर्‍या करणार्‍या बाईची खुद्दारी माझ्यापेक्षा खूप खूप श्रीमंत होती! केवळ 'ओळखीचा चेहेरा' या आधारावर वांगीबटाट्याच्या भाजीसोबत गरम भाकरी खा असा आग्रह धरणारी प्रेमळ काशीबाई आणि रिक्षाचे पैसे मला देऊ न देणारी स्वाभिमानी काशीबाई मी पाहात होतो. प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!

पोष्टातलं काम झालं. काशीबाईला पैसे मिळाले. आम्ही पोष्टाच्या बाहेर पडलो. समोरच रंगीत बर्फाचे गोळे विकणारा उभा होता. मी गंमतीने काशीबाईला म्हटलं, "मावशे, बर्फ खायला घाल ना मला. ऊन खूप आहे, तहान लागली आहे!"

हे ऐकून मगासची स्वाभिमानी काशीबाई पुन्हा एकदा लहान झाली, निरागस झाली! :) मग मी आणि माझ्या त्या मैत्रिणीने दुपारच्या टळटळीत उन्हात मस्तपैकी लिंबूनमक लावलेले रंगीबेरंगी बर्फाचे गोळे एन्जॉय केले! व्हॉट अ डेट! :) एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! :)

"चल, येतोस का माझ्या घरला? इकडनं जवळंच माझं घर आहे. तुला चुरमुर्‍याचे लाडू देते!"

हे ऐकून मला आनंदच झाला. मी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या घरी गेलो. किसननगरच्या वस्तीतील एका चाळीत काशीबाईचं मोजून दीड खोल्यांचं घर. घरी एक तरुणी एका लहानग्या शेंबड्या पोराला बदडत होती. बहुधा त्या मायलेकरांचं काहीतरी बिनसलं असावं. घरात दुसरं एक लहानगं पोर होतं ते झोपलं होतं. मी आणि काशीबाई घरी पोहोचल्यावर ते शेंबडं पोर एकदम धावत आलं आणि काशीबाईला बिलगलं! काशीबाईने आभाळाच्या मायेने त्या पोराला जवळ घेतलं, आंजारलं, गोंजारलं!

बोलण्याबोलण्याच्या ओघात मला त्यांच्या घरातल्या काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या! काशीबाईचा नवरा एक नंबरचा बेवडा, काही कामधंदा करत नसे. दारूच्या अतिआहारी गेला आणि मरण पावला. काशीबाईला तीन मुलं. दोन मुलगे, एक मुलगी. मोठा मुलगा-सुनबाईने वेगळी चूल मांडली होती. ती मंडळी काशीबाईला थुंकूनही विचारत नव्हती. आई मेली काय नी जगली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता! दुसरा मुलगा चांगला हातातोंडाशी आलेला, रेल्वे अपघातात मरण पावला. त्याची बायको लहानगं मूल टाकून, त्याची जबाबदारी काशीबाईवरच सोपवून दुसर्‍या कुणाचातरी हात धरून पळून गेलेली. एक आई आपल्या मुलाला टाकून जाऊ शकते हे अविश्वसनीय होतं पण इथे मात्र तीच वस्तुस्थिती होती! मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वर्षादोनवर्षाच्या आतच नवर्‍याने टाकली म्हणून लहानग्याला घेऊन माघारी परतलेली!

आणि काशीबाई समर्थपणे हा सगळा गाडा ओढत होती, चालवत होती!

मला दूरदर्शनवरील समस्त मालिकांमध्ये कल्पनादारिद्र्य असलेल्या लेखक-दिग्दर्शकांची, ते त्यांच्या मालिकांमधून दाखवत असलेल्या मोठ्यांच्या खोट्या दु:खांची अक्षरश: दया आली, कीव आली!

"ए सुमन, दादाला लाडू दे आणि याला पण आण."

मांडीवर घेतलेल्या लहानग्याला खेळवत काशीबाईने सुमनला, त्या लहानग्याकरता आणि माझ्याकरता लाडू आणायला सांगितले! काशीबाईने केलेले ते गूळ चुरमुर्‍याचे लाडू आम्ही तिचे दोन्ही नातू खाऊ लागलो! एक नातू अगदीच लहान,बापाने टकलेला आणि एक मी! आपली लहानसहान मध्यमवर्गीय पांढरपेशी दु:ख गोंजारणारा!!

तो गूळचुरमुर्‍याचा लाडू त्या लहानग्याच्या एकदम तोंडात जाईना म्हणून काशीबाई त्या लाडवाचे तुकडे करून त्याला भरवू लागली. ते शेंबडं, लहानगं आता तो लाडू मटामट खाऊ लागलं आणि काशीबाईच्या चेहेर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहू लागलं! मला फक्त 'आजीची माया ही घट्ट सायीसारखी' एवढंच पुस्तकी वाक्य पाठ होतं!

"मुंबईची मुंबादेवी,
तिची सोन्याची साखली......"

असं काहीसं गाणं गुणगुणत काशीबाई सुमनच्या मुलाला हसतमुखाने खेळवत होती. बिचारीला 'गतं न शोच्यम' असा काहीसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे हेही ठाऊक नव्हतं! ते संस्कृत वचन न वाचताही ते ती किती सहजपणे आचरणात आणत होती! स्वत:च्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाच होता, पण आता कडेवर पोर घेऊन मुलगी माघारी आली होती आणि धाकट्या मुलाचं पोरही काशीबाईच्याच गळ्यात! बापरे! काशीबाईच्या या वयातही तिच्या अंगावर असणार्‍या जबाबदार्‍या पाहून माझंच धाबं दणाणलं होतं! सुमन मात्र मला खरंच खूप चांगली मुलगी वाटली. धुण्याभांड्यांची चार कामं तिने मिळवली होती. काशीबाईची शेक, अंगाला लावण्याची कामं, भाकर्‍या आणि सुमनची धुणीभांडी यांच्या वेळा त्या मायलेकींनी आपापसात ऍडजस्ट केल्या होत्या आणि दोघीही त्या लहान पोरांना सांभाळत होत्या!

'तुमची पुढील पैशांची व्यवस्था काय आहे?', 'या मुलांचं तुम्ही कसं करणार?' 'सुमनच्या मुलाचं ठीक आहे, पण काशीबाईच्या दुसर्‍या नातवाची जबाबदारी काशीबाईच्या पश्चात कोण घेणार?' 'की ती जबाबदारी सुमनवरच?' असे कोणतेही प्रश्न मी तिथे विचारू शकलो नाही, नव्हे तेवढी हिंम्मतच नव्हती माझ्यात! आणि स्वाभिमानी काशीबाई हे प्रश्न घेऊन माझ्या दाराशी कधीच येणार नव्हती! उलट हे प्रश्न विचारल्यावर, "तुला का रे बाबा आमची चिंता" असं म्हणून काशीबाईनी मला अगदी सहज झाडून टाकला असता याचीही खात्री होती मला!

हीच का ती काशीबाई, जी भाकर्‍या करताना सगळी दु:ख विसरून गाणी गुणगुणते? हीच का ती काशीबाई, मी रिक्षाचे पैसे देऊ लागल्यावर हिचा स्वाभिमान खाडकन जागा होतो? आणि 'मावशे तू छान गातेस बरं' एवढी लहानशीच दाद दिल्यावर चारचौघीत गोड लाजणारी हीच का ती काशीबाई? अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

"दादा, ये हां पुन्हा. लाडू आवडला ना गरीबाघरचा?" काशीबाईने मला हसतमुखाने विचारलं!

'लाडू म्हणजे मोतीचुराचा आणि तोही साजूक तुपातला!' अशी लाडवांबद्दलची माझी व्याख्या! काशीबाईकडच्या गूळचुरमुर्‍याच्या लाडवाने ती व्याख्या साफ पुसून टाकली!

आता पुन्हा एकदा एकवीरेत जाईन, तिथे वांगी बटाट्याची भाजी असेल, आणि पुन्हा एकदा काशीबाई मला म्हणेल,

"आज वांगीबटाट्याची भाजी आहे. तिच्यासंगती भाकरीच खा. आत्ता करून देते गरमगरम भाकरी!"

-- तात्या अभ्यंकर.

हाच लेख इथेही वाचता येईल!

January 16, 2007

नेनेसाहेब!

तात्या, सवाईची तिकिटं काढली आहेत. लवकर या. वाट पहात आहे. गाणं ऐकू, मस्त धमाल करू.!"
असा नेनेसाहेबांचा मला दरवर्षी फोन यायचा. सवाईगंधर्व महोत्सवाची आम्हा काही मुंबईकर मित्रांची तिकिटं काढायचं काम नेहमी नेनेसाहेबच करत असत.विजय नेने! आम्ही त्यांना 'नेनेसाहेब' म्हणत असू. पत्ता- सदाशिव पेठ, पुणे. नेनेसाहेब म्हणजे एक वल्ली माणूस. वय ५५ च्या आसपास, मध्यम उंचीचे, केस पिकलेले, हसतमुख चेहरा. (सदाशिवपेठी कोकणस्थ असून!;)

नेनेसाहेब तसा मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस. पुण्यातल्याच कुठल्याश्या उपनगरातील एका कंपनीत नोकरीला. माझ्या ना नात्याचा, ना गोत्याचा. मग असं काय बरं विशेष होतं नेनेसाहेबांच्यात की ज्यामुळे त्यांचे माझे जन्माचे ऋणानुबंध जोडले गेले? कारण एकच. नेनेसाहेबांकडे शास्त्रीय संगीताच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या (लाईव्ह रेकॉर्डींग) ध्वनिफितींचा प्रचंड संग्रह होता. प्रचंड म्हणजे शब्दश: प्रचंड! आणि रसिक मंडळींना तो ते कधीही ऐकवायला अगदी हसतमुखाने तयार असत. ठाण्याचे माझे मित्र नंदन म्हसकर यांनी प्रथम त्यांची माझी गाठ घालून दिली.

नेनेसाहेबांच्या घरी म्हसकरांबरोबर मी अगदी प्रथम गेलो तो दिवस मला अजूनही आठवतो. "हे माझे मित्र तात्या अभ्यंकर. गाण्याचे खूप शौकीन आहेत." म्हसकरांनी ओळख करून दिली.
नेनेसाहेबांचं घर म्हणजे सदाशिवपेठेतल्या एका वाड्याची एक लहानशी खोली. त्यात दोन कपाटं, एक खाट, आणि उरलेल्या जागेत ओटा असल्यामुळे त्या जागेला स्वयंपाकघर म्हणायचं. कोपऱ्यातच एक लहानशी मोरी! बास..! एवढाच होता नेनेसाहेबांचा संसार. एकूलती एक मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला गेलेली.

"बोला काय ऐकवू?" नेनेसाहेबांनी सवाल टाकला. एकदम हा प्रश्न आल्यामुळे मी थोडा गडबडूनच गेलो. "काहीही ऐकवा. अण्णांचं काही लाईव्ह ध्वनिमुद्रण असेल तर मला ऐकायला आवडेल!" मी.

"अरे वा! आत्ता ऐकवतो," असं म्हणून नेनेसाहेब उठले आणि त्यांनी एक जाडजूड रजिस्टरच माझ्या हाती ठेवलं. बाडच म्हणा ना!

"ही पहिलीच काही पानं बघा. तुम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणांची सगळी यादीच पहायला मिळेल. पहिला मान अर्थातच भीमसेनजींचा! बोला, कोणतं ध्वनिमुद्रण लावू? अगं ऐकलंस का? कॉफी टाक पाहू झकासपैकी, आणि काहीतरी खायलाही दे! हे माझे मित्र ठाण्याहून आले आहेत. भीमसेनप्रेमी आहेत!"

पहिल्या भेटीतच मला 'मित्र' असं संबोधून नेनेसाहेब मोकळे झाले होते! त्यांची 'अगं' तिथेच ओट्याजवळ उभी होती. ह्या बाईंचा स्वभाव अगदी गरीब असणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी कुणीही ओळखावं. त्यासुद्धा नेनेसाहेबांसारख्याच अगदी हसतमुख होत्या.

नेनेसाहेबांनी माझ्या हाती ठेवलेलं ते जाडजूड बाड मी उलगडून पाहू लागलो. ते पाहताना मला फक्त चक्कर यायचीच बाकी होती. भीमण्णा, किशोरीताई, मालिनीबाई, आमिरखा, कुमारगंधर्व,.... यादी लांबतच चालली होती. त्यांच्या संग्रहात जुना-नवा कुठला कलाकार नव्हता असं नव्हतंच! आणि प्रत्येकाची एखाद दोन नव्हेत तर अक्षरश: शेकड्यांनी ध्वनिमुद्रणं होती. सगळीच्या सगळी प्रत्यक्ष मैफलीतली! बाजारात व्यावसायिक स्तरावर मिळणारं एकही ध्वनिमुद्रण त्यात नव्हतं! मंडळी, ते बाड पाहताना मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकणार!

"बोला तात्या बोला! काय ऐकायचंय?" नेनेसाहेबांच्या या प्रश्नानी मी एकदम भानावर आलो. काय सांगणार होतो मी त्यांना? अहो किती ऐकावं आणि किती नाही अशी माझी परिस्थिती झालेली! त्यादिवशी थोडंफार ध्वनिमुद्रण ऐकून आम्ही तेथून निघालो. "पुन्हा या नक्की. अगदी केव्हाही या. मस्तपैकी गाणं ऐकू." असा आम्हाला नेनेसाहेबांनी हसतमुखानी निरोप दिला.

त्यानंतर मी जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा नेनेसाहेबांच्या घरी फेरी झाली नाही, असं कधी झालंच नाही. कुणाचं गाणं नाही ऐकलं मी त्यांच्याकडे? अरे बापरे माझ्या! मोठ्ठी यादीच होईल त्याची. भीमण्णा, किशोरीताई, कुमारजी, अभिषेकीबुवा, उल्हास कशाळकर, राशिदखान, अजय चक्रवर्ती, वीणाताई, प्रभाताई, रामभाऊ, हे मी प्रत्यक्ष ऐकलेले कलाकार. त्यांचं तर ध्वनिमुद्रण होतंच. त्याशिवाय मास्तर, निवृतीबुवा, गजाननबुवा, मिराशीबुवा, फैयाजखा, आमिरखा, खादिमहुसेनखा, विलायतहुसेनखा, सवाईगंधर्व, या जुन्या मंडळींचीही बरीच ध्वनिमुद्रणं त्यांच्याकडे ऐकायला मिळाली. अगदी मनमुराद, समाधान होईस्तोवर!

नेनेसाहेबांच्या घरच्या प्रत्येक फेरीत मी अगदी मनसोक्त गाणं ऐकत होतो. मनात साठवत होतो, शिकत होतो. अक्षरशः आयुष्यभरची कमाई होती ती नेनेसाहेबांची. मला ते नेहमी म्हणायचे,

"अहो तात्या, हे सगळं मी कसं जमवलं माझं मला माहीत! कुठे कुठे म्हणून नसेन फिरलो मी याच्याकरता? किती पैसे खर्च केले असतील पदरचे! पण आज हा संग्रह पाहिला की माझं मलाच समाधान वाटतं. तुमच्यासारखे चार रसिक घरी ऐकायला येतात, बरं वाटतं! आता नोकरीतून लवकरच निवृत्त होणार आहे. मग काय, फक्त संगीत आणि मीच! अहो पुढचं सगळं आयुष्यभर ऐकत बसलो तरी संपणार नाही एवढं अफाट ध्वनिमुद्रण जमवून ठेवलं आहे मी!

नेनेसाहेबांचा हा अभिमान अगदी सार्थ होता!

खरंच, आमचे नेनेसाहेब म्हणजे खूप मोठा माणूस हो.. मुलखावेगळाच! स्वत: कष्ट करून जमवलेली ध्वनिमुद्रणे लोकांना हौशिहौशीने स्वत:च्याच घरी बोलावून ऐकवणार, वर त्यांची चहापाण्याचीही सरबराई करणार! या माणसाची हौसच दांडगी. मी इतक्या वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा बघितला नाही. संध्याकाळी सहा वाजता गेलो की रात्रीचे दहा कधी वाजायचे ते समजायचंच नाही. " बसा हो तात्या, काय घाई आहे? जाल सावकाश! आता जेवुनच जा!" असा आग्रहही नेहमी व्हायचा.

असाच एक दिवस. मी नेनेसाहेबांच्या घरी गेलो होतो. बाडातून भीमण्णांच्या यमनचं साठ सालातलं एक ध्वनिमुद्रण लेलेसाहेबांना ऐकवायला सांगितलं. त्यावर ते म्हणाले,

"ठीक आहे. काढून आणतो. पुढच्या वेळेला आलात की नक्की ऐकवतो!"
"काढून आणतो? मी समजलो नाही नेनेसाहेब!"
"तात्या, त्याचं काय आहे की काही काही खास ध्वनिमुद्रणं मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहेत. खूप जपायला लागतात ती. तुम्ही म्हणता तो अण्णांचा यमन तसाच अगदी खास आहे.!!!

बँकेच्या लॉकरमध्ये? आणि ध्वनिमुद्रणं???? मंडळी, मी खाटेवरून पडायच्याच बेतात होतो. पण ती वस्तुस्थिती होती. लोक साधाराणपणे सोनं-चांदी-हिरे-मोती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. पण जिवापाड मेहनत घेऊन जमवलेलं एकन्एक ध्वनिमुद्रणाचं मोल आमच्या नेनेसाहेबांकरता कुठल्याही हिऱ्यापेक्षा कमी नव्हतं हेच खरं!

नेनेसाहेबांचं कुटुंब कधी बाहेरगावी गेलेलं असलं की शनिवार-रविवारची सुट्टी पाहून आम्ही चार मित्र तर अक्षरश: धमालच करायचो. मी, म्हस्करसाहेब, सुधांशु वझे हे आमचे पुण्यातलेच आणखी एक मित्र, आणि स्वत: नेनेसाहेब. शनिवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही सगळे नेनेसाहेबांच्या घरी जमत असू. त्यानंतर मग रात्री साडेआठ, नऊपर्यंत श्रवणभक्ती. त्यानंतर मग बादशाही, किंवा पुना गेस्टहाऊस सारख्या एखाद्या ठिकाणी जाऊन रात्रीचे फर्मास भोजन. भोजन झालं की जरा शतपावली, पानबिन खाऊन आमचा डेरा पुन्हा नेनेसाहेबांच्या घरी पडायचा तो अगदी पहाटेपर्यंत!

काय सांगू तुम्हाला मंडळी मी! खूप धमाल यायची हो. कुणाला काय हवं ते नेनेसाहेब ऐकवायचे. ऐकणाराने फक्त बाड उघडून हुकूम करायचा. त्या दोन दिवसात तर नेनेसाहेबांचा उत्साह अगदी ओसंडूनच वहात असायचा! भरपूर गाणं ऐकणं व्हायचं. गप्पाही अगदी भरपूर. मग रात्री दोन-अडीच वाजता नेनेसाहेब स्वत: झकासपैकी कॉफी करायचे!

कोण होते हो नेनेसाहेब? एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस. १० बाय १० च्या अवघ्या एका खोलीत राहणारा! पण खरं सांगतो मंडळी, नेनेसाहेबांची ती त्या लहानश्या खोलीतली संपत्ती कुणा बंगलेवाल्याकडेही नसेल!

आज नेनेसाहेबांवर दोन शब्द लिहायला बसलो आणि मन अगदी भरून आलं. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. १९६० सालात संस्मरणीय ठरेल असा यमन गाणारे आमचे अण्णा तर मोठे आहेतच, पण तेच यमनचं ध्वनिमुद्रण बॅकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणारे आमचे नेनेसाहेबही मोठेच!

सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की निवृत्त झाल्यानंतर एवढं अफाट गाणं ऐकायला, जरा निवांतपणे त्याचा आनंद लुटायला नेनेसाहेब पुढचे अवघे तीन महिनेही जगले नाहीत. किती क्रुर वागली नियती नेनेसाहेबांशी! मधुमेहाचं दुखणं. पायाला जखम झाल्याचं निमित्त झालं आणि आमचे नेनेसाहेब कायमचे निघून गेले ते कधीही परत न येण्याकरता!

मंडळी, संगीतातले ऋणानुबंध खूप त्रास देऊन जातात हेच खरं!

मला एकदा ते गंमतीने म्हणाले होते, "तात्या, तुम्ही एवढे अण्णांचे भक्त. मी मरतांना माझ्याकडील अण्णांच्या काही ध्वनिमुद्रिका तुमच्या नावावर करून जाईन हो!" एखादी इस्टेटच माझ्या नांवावर करावी अशा थाटात मोठ्या मिश्किलपणे हे उद्गार त्यांनी काढले होते!

आज मात्र त्यांना एवढंच सांगावसं वाटतं, 'की नको नेनेसाहेब. तुमची इस्टेट तुमच्याकडेच राहू द्या. फक्त एखाद्या शनिवारी-रविवारी पुन्हा एकदा घरी बोलवा हो आम्हा सगळ्यांना. रात्रभर अगदी मनसोक्त गाणं ऐकू!!!

-तात्या अभ्यंकर.

August 28, 2006

साधना कोळीण..

राम राम मंडळी,

मी आयुष्यात प्रथमच आमच्या ठाण्याच्या मासळी बाजारात उभा होतो. तसा मी नावाला जन्माने ब्राह्मण. पण लहानपणापासूनच जिभेला मासळीची चव लागलेली!, त्यामुळे खाण्याची आणि करून पाहण्याची आवड. मासळी कशी करावी हे शिकण्याकरता २-४ चांगले गुरू केले. त्यांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलं. माझी लतामामी ही माझी प्रथम गुरू. ती मासळीचा स्वयंपाक फार सुरेख करते. तिच्या कडून संथा घेतली, दीक्षा घेतली. २-४ मालवणी पाककृतींची पुस्तके उलथी-पालथी घातली. आणि आता एकदा घरीच मच्छी करून पहावी या विचाराप्रत आलो. हातात पिशवी घेतली आणि एका भल्या रविवारी सकाळी बाजारात पोहोचलो. अभ्यंकर कुलोत्पन्न एका कोकणस्थ ब्राह्मणाने प्रथमच मासळी बाजारात पाऊल टाकलं. च्यामारी काय पण पराक्रम!! :)

बाजारात ही गर्दी! सगळा कोलाहल. सगळ्या कोळणी आपापल्या गिऱ्हाईकांना मच्छी विकत होत्या, भावावरून वाद घालत होत्या. माझा चेहरा चांगलाच कावराबावरा झाला होता. काय करावं? इथूनच परत जावं की काय असा एक विचार माझ्या मनांत आला.

पण तेवढ्यात, "ए भाऊऽऽऽ, काय पाहिजे रे? पापलेट घेऊन जा. मस्त खापरी पापलेट आहे" अशी जोरदार हाक ऐकू आली. मी दचकून बघितलं तर एक गोरी-गोमटी, देखणी, ठसठशीत कोळीण मला हाक मारत होती. मी भांबावलेल्या अवस्थेतच तिच्या पाटीपाशी गेलो आणि आमचा संवाद सुरू झाला.
"काय पाहिजे रे भाऊ" (मी या कोळणींचं एक बघितलं आहे. बाजारात त्या कुणालाही अहो-जाहो करण्याच्या भानगडीत पडत नाहीत!)मग मात्र मी वर्षानुवर्षे मासळी खाणारा कोणी गुप्ते, राऊत, राजे (छायाताई, माफ करा हं! :) असल्याचा चेहऱ्यावर आव आणला आणि तिला विचारलं,"कसं दिलंस पापलेट?""८० रुपये जोडी बघ. तुला जास्त भाव नाय सांगणार"(आवाजात सुरवातीपासूनच खास कोळीण टाइप भांडण्याचा आव!!) ८० रुपये??? (हे आपलं उगाच हं! च्यामारी मला कुठे माहीत होता खरा भाव!)"अरे १०० चा भाव तुला ८० सांगितला. बाजार किती ताजा आहे बघ!" असं म्हणून तिने एक पापलेट माझ्या हातात दिलंन!

झालं! आणि नेमकं इथे आमचं ब्राह्मण्य उघडं पडलं! मी पापलेट त्यापूर्वीही खात होतो, पण असा भर मासळी बाजारात एका कोळणीसमोर उभा राहून मासळी किती ताजी आहे हे कधी बघितलं नव्हतं. बरं पापलेट ताजं आहे की नाही हे कसं बघायचं हेही मला माहीत नव्हतं. नुसती पुस्तकं वाचून विद्या येत नाही असं म्हणतात हेच खरं. त्याकरता प्रॅक्टिकलच पाहिजे!! आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात, "विशारद होणं, अलंकार होणं, समीक्षा करणं खूप सोप्प आहे. दोन तंबोऱ्यामध्ये बसून १०० लोकांसमोर १० मिनिटं सुरेखसा यमन गाऊन दाखवणं कठीण आहे!!"असो.

झालं! त्या पापलेटला ताजं आहे का हे पाहण्याकरता मी थरथरत हात लावला. मगासचे गुप्ते, राजे, राऊत माझी साथ सोडून केव्हाच निघून गेले होते. (हे म्हणजे एखादा हुशार मुलगा खिडकीबाहेर माझ्याकरता उभा राहणार असा आधी दिलासा , आणि प्रत्यक्ष पेपर हातात पडल्यावर खिडकीतून वर्गाबाहेर बघतो तर तो हुशार विद्यार्थीच गायब! असंच झालं की हो! :)

बर्फात ठेवलेलं ते गारेगार पापलेट माझ्या हाती आलं. चेहऱ्यावर आणलेला मगासचा उसना आव झपाट्याने उतरत होता. हे नेमकं त्या चतुर कोळणीच्या लक्षात आलं. तिने मिष्किलपणे पटकन मला म्हटलं,

"भट दिसतोस की रे तू!!"

साधनाच्या ह्या बोलण्याने मी चांगलाच वरमलो. सगळा बाजारच खो खो हसत माझ्याकडे पहात आहे असंच मला क्षणभर वाटलं. तेवढ्यात साधना म्हणाली,"अरे ऐक माझं. ताजा बाजार आहे. भटाला नाय फसवणार मी. आई एकविरे शप्पथ! पण काय रे, तू तर भट, मग हा बाजार बनवणार कोण?" मी पुन्हा एकदा, "अं? काय? मीच बनवणार" असं काहीसं पुटपुटलो आणि तिथून काढता पाय घेतला. साधना पुन्हा एकदा माझ्याकडे पहात मनसोक्त हसत होती. तिला काय गंमत वाटत होती कोण जाणे!"

त्यानंतर मी अनेक वेळा त्या बाजारात गेलो. बाजारात मला आलेला पाहिला रे पाहिला की साधना जवळजवळ ओरडतेच! "आला गंऽऽ बाई माझा भट!" :)

त्यानंतर मी तिलाच माझा गुरू केलं. तिनेच मला पापलेट, सुरमई, मांदेली, कोलंबी, कर्ली, बोंबील, हलवा, अशी वेगवेगळ्या प्रकारची मासळी ताजी कशी असते, काय बघून घ्यायचं, हे सगळं शिकवलं.
आमच्या घरी, कुटुंबात, नातेवाईकांत सगळे एक बंडखोर कोकणस्थ म्हणून मला ओळखतात. बहुतेक बुधवार, रविवार मला मासळी लागते. त्यामुळे मासळीबाजारात आठवड्याच्या दोन फेऱ्या तरी होतातच. आई तर नेहमी मला म्हणते, "तू एखादी कोळीणच बघ, आणि तिच्याशीच लग्न कर!" पण नको रे बाबा तो प्रसंग. सासू कोकणस्थ आणि सून कोळीण! म्हणजे मधल्या मध्ये माझी हालत काही विचारायलाच नको! ;) असो..

एकदा माझ्याबरोबर माझा एक मित्र बाजारात आला होता. त्यानेही ती, "आला गंऽऽ बाई माझा भट" ची आरोळी ऐकलीन, आणि गधडा सगळीकडे सांगत सुटला. माझी आई आणि इतर नातेवाईक मला म्हणतात, "काय रे हे? तुला शरम वाटत नाही का रे? भर मासळी बाजारात तुला पाहून, "आला गंऽऽ बाई माझा भट" असं एक कोळीण चारचौघात ओरडते! कोकणस्थ जातीला अगदीच काळिमा आहेस तू" वगैरे वगैरे ! पण आपण साला कोणाची पर्वा नाय करत. का माहीत नाही, पण साधनाला माझ्याबद्दल आणि मला साधनेबद्दल एक विलक्षण आत्मीयता वाटते. त्यामागे माझं 'मासळीप्रेम' हेच कारण असावं. आणि तिच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं तर, 'एक गोलमटोल भट आपल्याकडे मासळी घ्यायला येतो' याचंच तिला कौतुक वाटत असणार! काहीही असो, आम्हा भावा-बहीणीचे कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध होते हे तपासून पहायची मला कधी गरजच वाटली नाही.

एके दिवशी अचानक ही साधना मला तिच्या घोवाबरोबर ठाण्याच्या खाडी पुलावर भेटली. झालं असं की, नारळी पुनवेचा दिवस होता. कोळी लोकांत या दिवसाचे फार महत्त्व. समिंदराला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याला शांत करायचा आणि पुन्हा बोटी दर्यात नेऊन मच्छीमारीच्या नव्या शिजनला सुरवात करायची, असा हा दिवस. जिथे जिथे समुद्र, खाडी असते तिथे तिथे या दिवशी हे कोळी लोक गर्दी करतात आणि उत्सव साजरा करतात. आम्ही दोघं-तिघं मित्र असेच भटकत भटकत ती मजा पहायला खाडीवर गेलो होतो. तिथे मला साधना आणि तिचा नवरा असे दोघे भेटले. साधनाने माझी तिच्या नवऱ्याशी, महेन्द्रशी ओळख करून दिली.

हा महेंद्र मला अगदीच साधासुधा माणूस वाटला. चेहऱ्यावर एक मिश्किल शांत भाव, थोडासा अबोल, असा काहीसा महेंद्र होता. मला तो पाहताचक्षणी आवडला. साधना महेंद्रला म्हणाली, "बरं का, हा भट आहे. पण नेहमी येतो बाजारात. आपल्याकडनंच मच्छी नेतो."

मंडळी, हा महेंद्र इतका साधा दिसत होता की पटकन त्याच्याशी काय बोलावं हेच मला कळेना. मी आपला त्याच्याशी रीतसर हात मिळवला. महेंद्रलाही माझ्याशी काय बोलावं ते कळेना. पण आमची साधना मात्र एकदम बिनधास्त आणि फटकळ बाई. ती महेंद्रच्याच अंगावर ओरडली. "अहो असे बघत काय उभे राहिलात? आज संध्याकाळी त्याला बोलवा ना आपल्या घरी तीर्थप्रसादाला. काय रे भटा, संध्याकाळी घरी पूजा आहे. येशील ना? आम्ही महागिरी कोळीवाड्यात राहतो. 'महेंद्र गॅरेज' म्हणून कोणलापण विचार."

झालं! संध्याकाळच्या सुमारास मी किंचित बिचकतच महागिरी कोळीवाड्यात शिरलो. 'महेंद्र गॅरेज' आणि त्यामागेच असलेलं साधनाचं बैठं घर शोधून काढणं मला अवघड गेलं नाही. साधनाच्या घराबाहेर विळे-कोयते, मासळीच्या मोठमोठ्या टोपल्या ठेवल्या होत्या. लाईनीत दहा-बारा बैठी घरं होती. सगळी कोळ्यांचीच. साधनाने मला दारात उभं असलेलं पाहिलं आणि म्हणाली, "ये भटा ये. आलास, खूप बरं वाटलं".

साधनाचं घर लहानसंच, परंतु अत्यंत टापटीप होतं. एक तर नारळीपुनवेचा, सणाचा दिवस. त्यातून घरात सत्यनारायणाची पूजा. त्यामुळे पाहुण्यांची, शेजारा-पाजाऱ्यांची बरीच वर्दळ दिसत होती. बहुतेक सगळी मंडळी कोळीच दिसत होती. काही जण दर्शन घेत होते, काही जण जेवत होते, असा सगळा ऐसपैस कारभार सुरू होता. माझ्या शेजारीच घट्ट नऊवारी साडीतल्या दोन म्हाताऱ्या कोळणी बसल्या होत्या. त्यातल्या एकीने उगाचच माझ्या पाठीवरून हात फिरवत, "बरा आहेस ना बाबा?" अशी चौकशी केली. ओळख ना पाळख, ही कोण बया बरं? नंतर कळलं की ती साधनाची आई होती!

टेपरेकॉर्डरवर मोठ्याने 'ये ढंगार टकार, ढंगार टकार' अशी खास कोळीगीतं लागली होती. कधी 'बिलानशी नागीन', तर 'कधी आठशे खिडक्या नऊशे दारं', तर कधी 'चालला माझा घो दर्यावरी' तर कधी 'घ्या हो, घ्या हो ताजं म्हावरं', 'आई तुझं मलवली टेसन गो' अशी एकापेक्षा एक उत्साहवर्धक गाणी सुरू होती. येणारा-जाणारा प्रत्येकजण माझ्याकडे जरा नवलाईनेच बघत होता. 'हा कोण बरं? हा कोळी तर दिसत नाही. हा इथे कसा?' असे प्रश्नार्थक भाव बऱ्याच मंडळींच्या चेहऱ्यावर होते.

मग मी जरा वेळ महेंद्रशी गप्पा मारल्या. रोज भल्या पहाटे उठून भाऊच्या धक्क्यावरून घाऊक बाजारातून मासळी आणण्याचं काम महेंद्र करतो. पुढे त्याची सगळी उस्तवार, बाजारत नेणे, विक्री करणे ही कामं साधना आणि सोना (महेंद्रची बहीण) या करतात. एकदा मुख्य बाजारातून माल आणला की महेंद्र पुन्हा त्यात लक्ष देत नाही. उरलेला वेळ तो घराबाहेरच असलेलं दुचाकीचं गॅरेज सांभाळतो. साधनाला ३ मुलं. सर्वात मोठा आता आठवीत आहे.

जरा वेळ बसून मग मी सत्यनारायणाचं दर्शन घेतलं, आणि साधनाने जेवायचा आग्रह केला. मी कुठलेही आढेवेढे न घेता तिथेच एक चटई मांडली होती, त्यावर जेवायला बसलो. सत्यनारायणाची पूजा असल्याने शाकाहारीच बेत होता. साधा वरण-भात, बटाट्याची भाजी, पुऱ्या, गोडाचा शिरा (प्रसाद) असा सुरेख स्वयंपाक साधनाने केला होता. ती आणि महेंद्र या दोघांनी मला अगदी आग्रह करून जेवायला वाढलं. मला ते जेवण अमृताहुनी गोड लागलं!

मंडळी, असं म्हणतात की ज्या घरी आलेल्या पाहुण्याला जेव्हा पती-पत्नी दोघे जोडीने जेवायला वाढतात, आग्रह करतात ते घर अत्यंत सुखी समजावं! आमच्या साधनेचं भरलेलं घरदेखील सुदैव सुखी रहावं हीच त्या एकविरा आईपाशी प्रार्थना!

आता पुन्हा बाजारात जाईन, आणि साधना पुन्हा एकदा प्रसन्न चेहऱ्याने ओरडेल,
"आला गंऽऽ बाई माझा भट'! ;)

--तात्या कोळी.