October 16, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१४) -- दिल चीज क्या है


दिल चीज क्या है...
(येथे ऐका)

खय्याम साहेबांनी बांधलेलं श्रीमंत, समृद्ध, सर्वार्थाने Rich म्हणता येईल असं हे मुजर्‍याचं गाणं!

सुरवातीला सारंगीच्या सुरासंगे येणारा आशाताईंचा थेट हृदयाला भिडणारा आलाप एका क्षणात सारी मैफल ताब्यात घेतो.

आशा भोसले! या बाईंचा आवाज किती सुरेख असावा, किती व्हर्सटाईल असावा याला काही सुमार? 'रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील..' असं अत्यंत सात्विकतेने, भक्तिभावाने गाणार्‍या आशाताई याच का? खरंच कमाल वाटते!

स्वच्छ निकोप आवाज, त्याचा लगाव आणि खानदानी बाज, सांभाळलेला मुजर्‍याचा लहेजा, ढंग, शब्दोच्चार, आलाप, हरकत, मधेच एखादी छोटेखानी दाणेदार तान, तार सप्तकात एखाद्या तळपत्या बिजलीगत पोहोचणारा आणि तेथील मध्यम-पंचम क्षणात उजळून टाकणारा आशाताईंचा तो दैवी स्वर! काय, कशी आणि किती दाद द्यावी आशाताईंना?!

सुंदर ठेके, त्याची लयीची वजनं, सारंगी-सतारीची सुंदर साथसंगत, जीवंतपणी दंतकथा बनलेल्या रेखा नावाच्या यक्षिणीचं दिसणं!

सगळंच लाजवाब!

--तात्या अभ्यंकर.

October 15, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१३) -- राजसा जवळी जरा बसा


राजसा जवळी जरा बसा..
(येथे ऐका..)

दिदीच्या स्वरातली एक उच्च दर्जाची बैठकीची लावणी.

पुरियाधनाश्रीच्या जवळची. शुद्ध मध्यमाचा अपवाद. 'कोणता करू शिणगार' मधला आश्चर्यकारकरित्या लागलेला शुद्ध मध्यम किंवा 'सांगा तरी काही..' दिल खलास करणारा तीव्र मध्यम! सगळाच चमत्कार! दिदीचा जवारीदार स्वर. एक एक श्रुती मोजून घ्यावी!

शब्द, चाल, दिदीची गायकी, ठेका, मधले संवादिनीचे तुकडे, सगळंच भन्नाट च्यामारी! लावणी संपतानाची दिदीची आलापी केवळ जीवघेणी!

त्या दिशी करून दिला विडा,
पिचला माझा चुडा, कहर भलताच!
भलताच रंगला काथ लाल ओठात!


क्या केहेने..!

-- तात्या अभ्यंकर.

October 11, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१२) -- ने मजसि ने


ने मजसि ने..
(यथे ऐका)

'ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला!' या गाण्यापाशी उत्तम काव्याच्या, उत्तम गायकीच्या सर्व व्याख्या पूर्ण होतात!

'नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा
मज मातृभूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी,
आईची झोपडी प्यारी!'


सुरेख...!

बाबुजींनी केवळ हार्मोनियमच्या साहाय्याने गायलेलं हे गाणं! हे गाणं म्हणजे केवळ गाणं नव्हे. ती आहे बाबुजींची आयुष्यभराची स्वरसाधना. आयुष्यभराची स्वरतपस्या! त्यांनी गायलेल्या एकेका स्वरातून, एकेका शब्दातून आपल्याला दिसते ती त्यांची प्रखर देशभक्ति, सावरकर निष्ठा!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! स्वातंत्र्यसूर्य सावरकर!

सावरकर महात्मा होते किंवा नाही ते माहीत नाही. नसतीलच बहुतेक! अंदमानात अनन्वीत छळ सहन करणं, हाताची सालपटं निघेस्तोवर काथ्या सोलणं/कुटणं, छाती फुटेस्तोवर कोलू पिसणं या गोष्टींपुढे 'महात्मा' हे बिरूद खरंच खूप तोकडं वाटतं!

-- तात्या अभ्यंकर.

October 02, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (११) -- मेरे मन ये बता


मेरे मन ये बता...
(येथे ऐका)

अलिकडच्या काळातलं शंकर-एहसान-लॉयचं शफाकत अमानत अलीने गायलेलं एक सुंदर गाणं. शब्द जावेद अख्तर साहेबांचे. अर्थ, चाल, लय, ठेका, चित्रिकरण, लोकेशनस् इत्यादी सर्वच गोष्टी अगदी छान जमून आल्या आहेत..

'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच आहे जो सुखावून जातो.

'मितवा' हा शब्द सुरेखच आहे. हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या कोमल निषादामुळे गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतं!

गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. 'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. शंकर महदेवन या विलक्षण प्रतिभावानाने केलेली सरगमही सुंदर. त्या सरगमच्या पार्श्वभूमीवर राणीने केलेला नाचही छान. राणी दिसतेही सुरेख!

एकंदरीत या गाण्याला १०० पैकी १०० मार्क!
Smile

--तात्या अभ्यंकर.