March 30, 2015

तात्याचे आध्यात्मिक विचार.. :)

एका चटणी-भाकरीहून अधिक आस नाही..खरंच नाही..थोडी भाकरी आणि गडवाभर पाणी..!

एक वितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..

आणि बाकी साथीला असते ती भागवतधर्मात सांगितलेली नामस्मरणाची अक्षय शिदोरी..

मग त्या शिदोरीत सुदाम्याचे पोहेही असतील, ग्यानबा-तुकयाची अमृतवाणीही असेल..परंतु ते अक्षय असेल, अवीट असेल..

ऐहिक सुखं सगळ्यानाच हवीहवीशी वाटतात..त्यात काही चुकीचं आहे किंवा तो गुन्हा आहे असं म्हणण्याचा मानभावीपणा मी करणार नाही.. त्यातून मीही नाही सुटलो आणि तुम्हीही सुटला नाहीत...पण आपलं चुकतं इतकंच की आपण ती सुखं अवीट आणि अक्षय आहेत हे धरून चालतो..!

आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की एक दिवस असा येईल की हात उचलून तोंडात घास घ्यायची देखील आपल्यात ताकद उरणार नाही..भले मग समोर उच्चप्रतीच्या सुवासिक बासमतीचा भात असेल..कानानं धड ऐकू येणार नाही..डोळ्यांनी धड दिसणार नाही..

पण तेव्हाही आपल्याला गोड वाटेल तो फक्त विठोबाच..! कारण तो अक्षय आहे..अवीट आहे..त्याकरता दिसंयाचीही गरज नाही आणि ऐकू येण्याचीही गरज नाही..

या जगात देव नाही..असं जे लोक म्हणतात त्यांचं मला हसू येतं.. माझं काही भलं झालं नाही..माझ्या आयुष्यात अमुक अमुक वाईट गोष्टी घडल्या म्हणून या जगात देव नाही..

अहो पण मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला देव बसलेलाच नाहीये..तो तुमचं भलंही करत नाही आणि वाईटही करत नाही..तुमचं भलं होतं किंवा तुमचं वाईट होतं ती तुमची destiny..! शिवाय भलं आणि वाईट या गोष्टी सापेक्ष आहेत..त्यात देवाचा काहीही संबंध नाही..तो या सगळ्याच्या परे आहे..परंतु तरीही त्याच्या नामस्मरणात सात्विक आनंदाचा अक्षय झरा शोधणं म्हणजेच आध्यात्म..!

ग्यानबा-तुकयाला हा अक्षय आनंदाचा झरा सापडला आणि त्यांनी तो तितक्याच उदारतेने हातचं काहीही राखून न ठेवता इदं न मम या भावनेने लोकाना वाटला म्हणून ते मोठे..म्हणून ते संत..

अन्यथा.. मला आणि माझ्या भावंडाना आमचे आईवडील टाकून गेले..आम्ही उघड्यावर पडलो..देवानं आमचं भलं केलं नाही आणि म्हणून या जगात देवच नाही..असं ज्ञानोबाना देखील सहज म्हणता आलं असतं..!

अर्थात, आमचे ज्ञानोबाराया निरीश्वरवाद्यांइतके बुद्धिमान नव्हते हे आमचं भाग्य..! :)

त्यामुळे आम्ही निरीश्वरवादी आहोत..आम्ही देव मानत नाही..असं जे लोक म्हणतात त्यांना माझ्या शुभेच्छा.. :)

-- श्री श्री तात्याशंकर..

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार.. - या महान ग्रंथातून साभार..) :)

March 28, 2015

सोरट.. :)

१५ पैशांना उत्तम लिंबू सरबत..

२० पैशांची ती काचेची जादू.. तिच्या मधोमध काच असे आणि चहुबाजूंनी प्राण्यांची चित्र असायची..समजा हत्ती यायला हवा असेल तर या बाजूने काचेवर आधी हत्तीचं चित्र पालथं घालायचं आणि मग काच गुंडाळायाची.. दुसरीकडून कागद उघडले की काचेआड तो हत्ती दिसायचा..!

आठवते का कुणाला ती काचेची जादू..? :)

१० -१५ पैशात लीचीवाला सांगेल त्या प्राण्याचे आकार करून द्यायचा..एका जाड लाकडी बांबूला गुंडाळलेली ती चिकट लीची..

१० पैशाला बुन्दिचा उत्तम लाडू मिळायचा.. वाण्याकडच्या काचेच्या बरणीत ते लाडू ठेवलेले असयाचे.. :)

१० पैशात सोरट खेचायचं.. समोर आमिष म्हणून बक्षिसांमध्ये एक आणि दोन रुपायाच्या करकरीत नोटा असायच्या.. पण सोरट मध्ये त्या नोटा कधीच कुणाला लागत नसत.. पण तेव्हा हे कळायचं नाही..

अहो..दहा पैशात जर कुणाला एक आणि दोन रुपायच बक्षिस लागलं असतं तर त्या बिचा-या सोरटवाल्याने  काय खाल्लं असतं हे समजायला आयुष्याची चाळीस वर्ष जावी लागली..!

असो..

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी..!

-- (मनाने अजूनही १९७० च्या दशकातच वावरणारा) तात्या..:)

March 22, 2015

तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे..

मी म्हटलं होतं ना.. की भीमण्णा, बाबूजी, भाईकाका, पंचमदा, किशोरदा, हृषिदा, प्राणसाहेब, दादामुनी, उत्पल दत्त यापैकी कुणी ना कुणी रोज माझ्या सोबतीला असतात..

काल रात्री माझ्या घरी भाईकाका आले होते.. खूप गप्पा मारल्या आम्ही..

घरी आल्याआल्या मला म्हणाले की गुढीपाडवा आहे आज..गोड काय केलं आहेस..?

"चितळेचं आम्रखंड आणलं आहे.."

"मला आण पाहू लगेच.." :)

पण नंतर का माहीत नाही..अचानक थोडं वातावरण गंभीर झालं.. अंतुबर्वा येऊन बसला आमच्यात..!

"विशाल सागरतीर आहे, नारळाची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत..सारं काही आहे..पण त्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देउन जातं..आणि मग उरतं ते केवळ भयाण विनोदाचं अभेद्य असं कवच..!"

"संध्याकाळी त्या माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरतं..!"

"भाईकाका.. केवळ या दोन वाक्यांकरता मी तुम्हाला माझ्या मनाचं ज्ञानपीठ देउन टाकलं आहे.."

"अरे असू दे रे.." -- भाईकाका म्हणाले..

"का हो भाईकाका.. नारायणच्या मुलाच्या मुठीत तो सकाळपासूनचा काळवंडलेला लाडूच तुम्ही का हो ठेवलात..?"

"जाऊ दे रे.. चल..आपण गजा खोतला भेटू..!" - भाईकाका हसून म्हणाले.. :)

गजा खोत मात्र निखळ आनंद देउन जातो.. पेटीच्या पट्टीत उगीच का कांता मधला उ शोधणारा भाबडा गजा खोत..:)

कलेवर, माणसांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारे रावसाहेब..

जिंदादिलीने आयुष्य जगायला शिकवणारे काकाजी..

केरसुणीने समुद्राच्या लाटा अडवायला जमलं नाही हे आयुष्याच्या अखेरीस कबूल करणारे आचार्य...

"सापडला रे सापडला..मला चितळेच्या आम्रखंडातही आत्मा सापडला.." असं म्हणून भाईकाका मनमुराद हसले..:)

"तात्या.. लेका चाळीशी ओलांडलीस.. पण उसासे टाकणारा तुझ्यातला नाथा कामत अजून तसाच तरूण आहे रे.."

माझ्या स्टेटसं वरचा प्रियामणीचा फोटो पाहत भाईकाका मिश्किलीने म्हणाले.. :)

"हो..भाईकाका.. पण नंदा प्रधान लिहून तुम्ही आम्हाला जखमी का केलंत..? त्यापेक्षा नाथा कितीतरी आनंद देणारा नाही का..?

नंदा प्रधान..आणि इंदू वेलणकर.. जीव ओवाळून टाकावासा वाटतो..!

पुष्कळ गप्पा रंगल्या आमच्या.. सगळ्याच इथे लिहिणं शक्य नाही..ज्या सहज आठवल्या त्या लिहिल्या..

मग मला भाईकाकनी आठवणीने त्यांचे नेहमीचे सल्ले दिले..

'तुला जे काही आवडेल..मग ते गाणं असो..कविता असो..चित्रपट असो.नाटक असो..काहीही असो..ते तू जगालाही मनमुराद सांग.."

"कुठल्याही माणसाकडे एकाच एक चष्म्यातून बघू नको..त्याला अनेक कंगोरे असू शकतात..ते तपासून बघायचा प्रयत्न कर..एखाद्याचे दोष शोधण खूपच सोपं आहे रे..!"

"दुस-याच्या कलेचे, गुणांचे योग्य ते कौतुक करून तू मोठा होत असतोस हे लक्षात ठेव..!"

"चल निघतो रे..कुमारच्या घरी मैफल आहे..भीमसेनही यायचा आहे..आता मस्त मैफल जमणार..तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे.."

असा आशीर्वाद देउन भाईकाका निघून गेले..

आता स्वर्गात ती मैफल जमली असेल.. कुमारांचं "उड जाएगा हंस अकेला.." भन्नाट सुरू असेल..!

-- तात्या अभ्यंकर..

March 14, 2015

घाल घाल पिंगा वा-या..

कसा असेल तो परस.. जेव्हा मोबाईल नव्हते, sms नव्हते, whatsapp नव्हतं.. काही काही नव्हतं..?

तेव्हा कसा असेल तो परस. जिथे फक्त वारा हाच सखासोबती होता..तिथे जाऊन पिंगा घालणारा होता.. माझ्या माहेरचा परस.. जिथे मी काचापाणी खेळले..जिथे मी सगरगोटे खेळले..असा माझ्या माहेरचा परस..!

परसात पिंगा घालणारा वारा..
'सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..' इतकाच निरोप पोहोचवणारा वारा..!

अरे भादव्यात वर्ष झालं की रे.. अरे वा-या, ना आईची काही खबर..ना भावाची काही खुशाली..तू जाशील का रे माझ्या माहेरी..आणि घालशील का रे पिंगा..?

माझी काळी ढूस्स कपिला..आणि तिची खोडकर नंदा.. अरे पण वा-या..ते तिचं तिच्या आईला ढूशी मारणं मला इथून दिसतं आहे रे.. मलाही माझ्या आईच्या मांडीवर मनसोक्त डोकं खुपसायचं आहे..तिच्याकडून डोक्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे रे..!

माझ्या बाबांनी लावलेला माझ्या परसातला तो पारिजातक...त्या माझ्या परसात त्याच्या फुलांचा पडलेला सडा.. अरे वा-या..आपण जाऊया का रे ती फुलं वेचायला..? नेशील तू मला..?

अरे ही अशी भाकरीसारखी दाट साय येते रे माझ्या कपिलेच्या दुधाला.. तशीच माझ्या आईची माया.. आणि मग ती माझ्या माहेराची साय-साखरेची खरवड..!

वा-या..तुला हवी आहे का रे ती सायसाखरेची खरवड..? मग जाशील माझ्या माहेरी..? खूप खूप समृद्ध आहे रे माझं माहेर.. तिथे सात्विकता आहे माझ्या आईची..माझ्या कपिलेची..आणि माझ्या पारीजातकाची..!

जाशील का रे माझ्या माहेरी..? घालशील मनसोक्त पिंगा.. मी ही तेव्हा तुझ्याचसोबत असेन..जाऊया आपण..?

-- तात्या अभ्यंकर..

March 10, 2015

राना..

"तात्यासाब, ये बॉटल में पिने का थंडा पानी भरके दो ना.."

रिकामी पाण्याची बाटली घेऊन नबिला आमच्या बारवर यायची. मग मी तिला बर्फाचं थंडगार पाणी त्या बाटलीत भरून द्यायचो..

शफाक आणि नबिला..
मुंबैच्या कोंग्रेसहाऊस येथील कोठ्यावर रोज रात्री प्रत्येक आपाच्या कोठ्यावर शफाक गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे विकायला यायचा.. जी उमराव अमीर मंडळी कोठ्यावर गाणं ऐकायला बसलेली असतील त्यांना तो ही गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे विकायचा.. मग ती मंडळी आपापल्या लाडक्या तवायफांना ती गुलाबाची फुलं द्यायची, हाताला गजरे बांधायची..

शफाक रोज दादरच्या फुलबाजारात जाऊन भरपूर गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याच्या कळ्या आणायचा आणि मग दिवसभर नबिला ते गजरे विणायची.. रात्री नऊ - साडे नऊ वाजले की शफाक काँग्रेस हाऊसला हजर व्हायचा..

आमच्या बारच्या मागेच त्यांचं खोपटं होतं.. तिथे शफाक-नबिलाचा आणि त्यांच्या २-३ कच्च्याबच्च्यांचा संसार चालायचा.. त्यांची मोठी मुलगी राना दहावीमध्ये होती..चांगली हुशार आणि चुणचुणीत होती..
मोगर्‍याचे गजरे आणि गुलाबाची फुलं यातून त्यांची कमाई मात्र भरपूर व्हायची.. कारण ती गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे शफाक कोठ्यावरच्या तवायफबाजांना भरपूर चढ्या भावात विकायचा..

त्यांची दहावीतली मुलगी राना एकदा संध्याकाळी माझ्या बारमध्ये आली.. संध्याकाळच्या वेळेला ही इथे का? हा प्रश्न मला पडला.. रानाच्या हातात दहावीच्या बीजगणिताचं पुस्तक होतं आणि त्यातला Quadratic equation चा एक प्रॉब्लेम घेऊन ती तो मला विचारायला आली होती..!

फोरासरोडच्या देशीदारूच्या एका बारचा कॅशियर अभ्यंकर, आणि त्याला तवायफांच्या कोठ्यावर गजरे विकणार्‍या शफाक-नबिलाची चुणचुणीत मुलगी राना बीजगणित विचारायला आलेली होती..!

अजब प्रकार होता..!

मी माझ्या कुवतीनुसार तिला तो Quadratic equation चा प्रॉब्लेम बरोब्बर सोडवून दिला होता.. राना आनंदित झाली होती..

"तुझे कैसे पता.. की मै तुझे मदद कर सकता हू..?" -- मी तिला विचारलं..

"अम्मी ने कहा.. आप पढे-लिखे हो.. आप जानते होंगे.."

रानाने मनमोकळं हसून उत्तर दिलं होतं. मला खूप कौतुक वाटलं त्या पोरीचं.. मी तिला एक थंडा पाजला..
त्यानंतरी ८-१० वेळेला राना मला गणित विचारायला आली होती.. पोरगी खरंच हुशार होती.. काही एक चांगलं शिकायची जिद्द असलेली होती.. फोरासरोडच्या त्या भयाण दुनियेत राना म्हणजे चिखलात उगवलेलं एक कमळंच म्हणावं लागेल..

एके दिवशी रानाने माझ्याकरता स्वत:च्या घरून अंडाभूर्जी करून आणली होती.. एकदा खिमापाव घेऊन आली होती..

दिवस चालले होते, राना शिकत होती.. मी तिच्याकडे केवळ दहावीतली एक कष्टाळू विद्यार्थिनी म्हणून पाहात होतो.. पण या माझ्या कल्पनेला धक्का बसला जेव्हा तिचे आईवडील शफाक आणि नबिला मला मुद्दाम भेटायला आले तेव्हा..!

"तात्यासाब, राना अगर आपके यहा आए तो उससे बात मत करना.. आपकी कुछ गलती नही है..लेकीन अल्ला के लिये उससे कुछ बात मत करना.."

मला काही कळेचना..

"तात्यासाब, बुरा नही मानना.. लेकीन राना मोहोब्ब्त करने लगी है आपसे.. हम उसके माबाप है.. हम उसके दिल की बात समझ सकते है.. लेकीन वह अभी नासमझ है..जो बात हो नही सकती वो हो नही सकती.. बस..!"

बाझवला.. दहावीतली नासमजझ पोर गणिताच्या तात्यामास्तरांवर चक्क भाळली होती..?

पण ते वयच वेडं असतं.. फोरासरोडच्या त्या दुनियेत, जिथे ती वाढली, दहावीपर्यंत उत्तम शिकली होती..तिला एका सुशिक्षित घरातल्या, सभ्य, शिकलेल्या व्यक्तिबद्दल, तिच्याशी आपुलकीने बोलणार्‍या व्यक्तिबद्दल आपुलकी, प्रेम वाटणं ही काही अशक्य गोष्ट नवह्ती.. कुणाचं मन कुठे आधार शोधेल हे काही सांगता यायचं नाही..!

परंतु त्यानंतर राना विशेष कधी मला भेटायला आलीच नाही.. फार तर एकदोनदाच आली असेल.. तिचे आईवडील जे तिच्याबद्दल बोलले होते ते तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं..!

परंतु नंतर मात्र फारशी आली नाही.. तिला बहुतेक घरूनच तंबी मिळालेली असणार..! मीही तो विषय तिथेच सोडला होता, कारण मला मुळात त्यात कधीही इंटरेस्टच नव्हता..

राना काही यायची नाही परंतु शफाक आणि नबिला मात्र नेहमी मला आदाब करायचे..

पुढे फोरास रोड सुटला, देशीदारू बार सुटला..

शफाक आणि नबिला दोघेही अशिक्षित होते..परंतु त्यांची वागणूक किंवा समझदारी ही खूपच स्पृहणीय होती..
रानाचा आता निकाह झाला असणार.. शफाकची ती झोपडीही आता पाडली.. तो दुसरीकडे कुठेतरी राहतो.. रोशनआपच्या कोठ्यावर एकदा फुलं विकताना दिसला होता परंतु आमची काही बोलाचाली झाली नाही..
मुंबैचा अंधारलेला फोरास रोड.. आणि तेथील काळी, गलीच्छ परंतु तितकीच अनोखी दुनिया.. आणि त्या दुनियेत राना नावाची माझ्यावर जीव असलेली एक मुलगी..!

-- तात्या अभ्यंकर..