August 30, 2013

पल्लवीताई...

"कसा आहेस रे तात्या? घरी ये ना रे एकदा.. आज येतोस? काहितरी छान खायला करते.."

पल्लवीताईचा असा अधनंमधनं फोन येतो..

"हो, येतो."

पल्लवीताईचं घर.. अतिशय स्वच्छ आणि तेवढंच साधं..घरातल्या इंचाइंचात तिनं राखलेलं घराचं घरपण..!

तीनच खोल्या..एक हॉल, एक स्वयंपाकघर आणि तिसरी एक खोली. त्या खोलीत पल्लवीचे अंथरुणाला खिळलेले वडील..वडिलांचं थोडंफार येणारं उत्पन्न आणि बाकी पल्लवीताईच्या घरातच चालणार्‍या सकाळ-संध्याकाळच्या शिकवण्या.. घरी आता पल्लवीताई आणि तिचे अधू वडील हे दोघेच..

"तात्या, तुझ्या आवडीची मोकळी भाजणी केली आहे.. आणि सोबत गोड दही.."

अतिशय साधा, घरगुती म्हणावा असा पंजाबी ड्रेस..कपाळाला न चुकता लावलेलं कुंकू..काना-गळ्यात आणि हातात अगदी मोजकं आणि तेवढंच साधं, शोभेलसं.. भडकपणा कुठेही नाही.. तरीही पल्लवीताई खूप छान दिसायची. साधेपणातलं सौंदर्य वेगळंच असतं हेच खरं..!

"ए तात्या, कशी झाल्ये रे मोकळी भाजणी? तू काय बुवा, मोठा बल्लवाचार्य..!"

असं म्हणतानाची पल्लवीताईची मिश्किलता आणि तिच्या चेहेर्‍यावरचं कौतुक. आणि एकंदरीतच, माझं काय किंवा इतर कुणाचं काय.. नेहमी कौतुक करणं, तुमच्यातल्या गुणांना प्रोत्साहन देणं हाच पल्लवीताईचा स्वभाव..

"कुणाचं गाणं ऐकलंस अलीकडे? येत्या रविवारी गडकरीला भावसरगम आहे. आपण जाऊया का रे? येशील माझ्याबरोबर? दोन-तीन तास मी तानीला बसायला सांगेन आप्पांजवळ.. जाऊया खरंच..?"

"आई गेल्यापासून कुठे असं बाहेरच जाणं झालं नाही रे.. आई गेली आणि आप्पांनीही त्याचा धसका घेऊन ते असे अंथरुंणाला खिळले.."

पल्लवीताई असं म्हणाली आणि झर्र्कन माझ्या डोळ्यासमोर पूर्वीची पल्लवीताई आली. अत्यंत हौशी.. ट्रेकिंग करणं, हौसेने नाटकात काम करणं.. अगदी हौशीहौशीने गणपतीची आरास करणं, दिवाळीचा तो झिरमिळ्यावाला कंदील करणं..मज्जा-मस्ती-गाणी-गप्पा-गोष्टी-भेंड्या- उत्साहाचा अगदी झरा होती आमची पल्लवीताई..

"अरे तात्या, कमल पाध्येचं हे पुस्तक वाचलंस बंध-अनुबंध? कालच आणलंय मी लायब्ररीतून.."

पूर्वीची पल्लवीताई आणि आता माझ्यासमोर बसलेली पल्लवीताई.. खूप फरक होता दोघांमध्ये.. तिच्या आईला कावीळ झाली..ती पोटातच फुटली आणि महिन्याभरातच ती गेली.. ती केवळ तिची अई नव्हती तर अगदी जवळची मैत्रिण होती.. उत्साहाचा झरा असलेल्या पल्लवीताईला नाही सोसला तो धक्का आणि त्यानंतर पल्लवीताई अगदी अबोलच झाली..पुढे लगेच वडिलांचं अंथरुणाला खिळणं.. एक कुणीतरी तिला खूप आवडत होता, तिच्या मनात भरला होता..तिथेही काही योग जुळून आला नाही.. असा सगळा अक्षरश: दोन-तीन महिन्यातला प्रकार आणि एक उत्साहाचा झराच आटला.. अकाली वृद्धत्व वगैरे नक्कीच आलं नव्हतं, तशी आजही ती काही नकारात्मक वागत नव्हती की सतत कुठले दु:खाचे उसासे टाकत नव्हती..पण मी एक वेगळीच पल्लवीताई पाहात होतो एवढं मात्र नक्की.. मॅच्युअर्ड नाही म्हणता येणार कारण मॅच्युअर्ड तर ती पूर्वीही होती..

"आत येतोस? आप्पांना भेटतोस? त्यांना जरा बरं वाटेल.."

मी आतल्या खोलीत आप्पांच्या पलंगापाशी गेलो.. पक्षाघाताने तोंड वाकडं झाल्यामुळे आप्पांना काही बोलता येईना.. आप्पांनी हात पुढे केला..मी त्यांचा हात हातात घेतला..आणि अंथरुणात पडल्यापडल्याच त्यांच्या दोन्ही डोळ्यातून धारा वाहू लागला..पल्लवीताईकडे बघू लागले.. 'माझ्यामुळे अडकली आता माझी पोर..' असं सांगणं होतं आप्पांच्या त्या अश्रुधारांमध्ये..स्वत:च्या लेकीबद्दल विलक्षण कृतज्ञता होती..!

"आप्पा, मी काय सांगितलंय तुम्हाला? रडायचं नाही म्हणून सांगितलंय ना? तुम्ही असे रडलात तर सांगा कोण येईल का आपल्याकडे? आणि मग अशाने तुम्ही लवकर बरे तरी कसे होणार..?"

"ए तात्या, म्हणतोस का रे जरा बाबूजींचं गाणं 'तुझे गीत गाण्यासाठी?' आप्पांना खूप आवडतं ते गाणं..आप्पा, तुम्हीही थोडी कॉफी घ्याल ना आमच्यासोबत..?"

मला खरंच खूप कौतुक वाटत होतं पल्लवीताईचं.. वास्तविक असं अकाली वृद्धत्व येण्याचं तर तिचं वयही नव्हतं..

"येत जा की रे अधनं मधनं.. पुढच्या वेळेला रम्या आणि मोहनला पण मी बोलावीन..एखाद्या रविवारी दुपारपासूनच या तुम्ही तिघे. आपण मनसोक्त कॅरम खे़ळूया आणि मग मी संध्याकाळी मस्तपैकी पावाभाजी करेन.."

हे ज्या उत्साहाने ती म्हणाली त्यात मला क्षणभर का होईना..पुन्हा पूर्वीची पल्लवीताई दिसली..

उगीचंच भरून आलं...

"येतो गं.."

"थांब जरा..हा घे रव्याचा लाडू.. अरे आप्पांना खूप आवडतात म्हणून केलेत.."

मी चपला घातल्या आणि निघालो.. मनात पल्लवीताईचा साधेपणा, सात्विकता घर करून राहिली होती आणि जिभेवर तिनं केलेल्या लाडवाचा गोडवा होता..

-- तात्या अभ्यंकर.

August 29, 2013

सुधा आणि खरवस..

काय पण म्हणा.. केळशी हे कोकणातलं एक फार सुरेख गाव आहे..

आपण साला जाम प्रेम करतो या गावावर..


काही वर्षांपूर्वी एक कुणी सुधा भेटली होती केळशीत.. तिच्यावरही जीव

जडला होता माझा..असेल विशीतली..


सुरेख होती.. हनुवटीवर एक जीवघेणा तीळ.. छ्या..!


लेकडेमोचा घरगुती कार्यक्रम होता.. तात्या फार सुरेख गातो आणि गाणं

समजावूनही सुरेख सांगतो असा ठाम गैरसमज असलेल्या काही भल्या

लोकांनी तो कर्यक्रम ठेवला होता.. त्या कार्यक्रमाला आली होती सुधा..


हाताखाली उजवा गाल ठेऊन अगदी छान, एकाग्रचित्ताने आणि

भाबडेपणाने माझं गाणं ऐकत होती...


कार्यक्रम संपला.. गरमागरम पोळ्या, मटकीची उसळ..छानसा

वांगीभात होता.. 


सुधा आणि तिची आई माझ्यापाशी आल्या..


सुधाची आई.. छान होती अगदी. सुहास्य वदनी. ‌सुबक ठेंगणी.. 


"सुंदरच झाला हो कार्यक्रम तात्या... काय छान समजावून दिलात

पुरियाधनाश्री..! मी पण विशारद आहे तात्या.. पण आम्हाला असं कुणीच समजावून सांगितलं नाही.. आणि

तानपुऱ्यावर ऐकायला खूप छान वाटतं

हो तात्या. पण आमच्या विशारदच्या बाई पेटी घेऊनच शिकवायच्या..!"


मी मनातल्या मनात विष्णू दिगंबर पलुस्करांना नमस्कार केला आणि

त्या 'विशारदच्या बाईंना माफ करा' म्हणून सांगितलं..


"आमच्या सुधालाही फार आवड आहे तात्या.. तुमच्याकडेच शिकायला

पाठवली असती.. पण तुम्ही मुंबैला असता ना? कसं जमणार..?"


केळशीत काही व्यवसाय आणि भाड्याचं एखादं घर मिळेल का? हा

विचार वीज चमकावी त्याहीपेक्षा जलद गतीने क्षणार्धात माझ्या मनात

येऊन गेला... 


वांगीभातानंतर छान खरवस होता.. गुळाचा.. खमंग...!


मुंबैला परतीच्या वाटेला लागलो होतो.. सुधा आणि खरवस.. दोन्हींचा

गोडवा सोबत घेऊन..!


-- तात्या अभ्यंकर.

August 24, 2013

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी..

संत तुकाराम चित्रपटातला एक विलक्षण मेलडियस, उत्साहाने, चैतन्याने भरलेला एक अभंग.. 
बिहागसारख्या रागात बांधलेला..

संत तुकाराम चित्रपटातला तुकोबांचा कट्टर विरोधक सालोमालो.. ह्या सालोमालोच्या तोंडी हा अभंग आहे.. 

ह्या सालोमालोचं काम करणारा नट कोण आहे देव जाणे, पण या नटाने अगदी झक्कास अभिनय केला आहे हा अभंग गाताना. हा अभंग कुणी गायला आहे हेही माहीत नाही.. कदाचित तो सलोमालोचं काम करणारा नटच गायकनटही असावा..

परंतु ज्याने कुणी हा अभंग गायला आहे त्याने हा अभंग केवळ अप्रतिम गायला आहे असंच म्हणावं लागेल.. हा जो कुणी आहे तो अतिशय सुरेल मनुष्य आहे... गाण्याची उत्तम तालीम घेतलेला आहे..

मुळत हा अभंग तुकोबांचा.. सालोमालो तो ढापून आपल्या नावावर खपवू पाहात आहे.. त्यांमुळे त्याच्या सादरीकरणात एक प्रकारचं नाट्य आहे, अभिनय आहे.. त्यामुळे त्याची चालही बदलली आहे.. मूळ तुकोबांची चाल ही अतिशय साधी, त्यांच्यासारखीच सात्त्विक आहे जी विष्णूपंत पागनीसांनी गायली आहे.. परंतू सालोमालोची चाल ही बिहागमधली, त्याच्यासारखीच रंगेल आणि राजस गुणांची आहे हे ध्यानात घेण्यासारखं आहे..!

कुठल्याही चित्रपटातल्या एखाद्या गाण्याकडे बघताना अशाच दृष्टीने पाहिलं पाहिजे..कारण ते नुसतं गाणं नसतं तर त्या गाण्याला एक पार्श्वभूमी असते हेही लक्षात घ्यावं लागतं.. आणि त्या दृष्टीने या अभंगाकडे पाहिल्यास आपलाच आनंद अधिक दुणावतो..

पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी..

गंधारावरची सुंदर सम.. वा!

सालोमालोबुवा छान नटूनथटून कीर्तनाला उभे आहेत.. हाती चिपळ्या आहेत.. 

एका श्रोत्याला छान डुलकी लागली आहे.. त्यामुळे सालोमालोबुवा त्याला,

'जागृती-स्वप्नी पांडुरंग..' असं म्हणत खणकन त्याच्या कानाशी चिपळी वाजवाताहेत.. मस्तच जमलंय हे टायमिंग.. 

आणि पांडुरंगातल्या त्या शुद्धनिषादाची क्वालिटी खास बिहागातली. अतिशय सुरेख..

स्वर नुसतेच छान आणि सुरेल लागून उपयोगाचं नाही तर ते त्या त्या रागाच्या क्वालिटीनुसार(च) लागले पाहिजेत..! असो.

'पहिले वळण ऐंद्रिया सकळा..'

वा..! सालोमालोच्या आवाजाचा पोत खरंच सुरेख आहे.. उत्तम फिरत आहे आवाजाला.. आवाजाची जात थोडी सुरेशबुवा हळदणकरांसारखी वाटते आहे.. 

'भाव तो निराळा नाही दुजा.. '

धत तेरीकी..! येथे तुकोबांना काय म्हणायचं आहे हेच मुळी सालोमालोला कळलेलं नाही.. नाहीतर त्याने तुकोबांशी असा दुजाभाव केलाच नसता..!

'भाव तो निराळा.. ' नंतरची थोडी लयकारीवजा गोलाकार आलापी सुंदर आणि त्यानंतर 'नाही दुजा.. ' वरचा पुन्हा एकदा बिहागचा देखणा निषाद आणि त्यानंतर त्या अज्ञात गायकाने धैवत, पंचम आणि मध्यमावर अनुक्रमे केलेला ठेहेराव देखील सुरेख.. मध्यमावरच्या ठेहेरावावरती त्याची डोळ्यातनं टिपं गाळायची नाट्यमयता.. सगळंच सुंदर..!

सालो म्हणे नेत्री केली ओळखण..

हा हा हा.. इथे' तुका म्हणे' च्या ऐवजी त्याने 'सालो म्हणे' टाकलं आहे. ‌शिवाय 'सालो म्हणे.. ' या शब्दांवर विशेष जोर देऊन ते तो ठासून सांगायचा प्रयत्न करतोय तेही मस्त.. त्यावेळची तोड, तिहाया, चौथाया. ‌सगळंच मस्त ..

'तटस्थ ते ध्यान विटेवरी..' असं म्हणताना त्याने कमरेवर हात ठेऊन घेतलेली विठोबाची पोझ.. पण त्याचा तो म्हातार नोकर जो आहे तो हे सगळं ओळखून आहे.. तो आपल्या मालकाच्या 'ध्याना'लाच नमस्कार करतो आहे..! 

गायकीचे बारकावे आणि सुरेलता तर आहेच परंतु इतरही अनेक बारकावे आहेत या गाण्यात..त्यामुळेच एकदा या गाण्यावर भरभरून लिहायचं ठरवलं होर्त.. आज योग आला..

आज इतके वर्ष झाली या चित्रपटाला परंतु त्यातल्या या अभंगाची नोंद कुणी घेतली आहे की नाही माहीत नाही..आणि म्हणूनच मी ती आवर्जून घेतो आहे..

सालोमालोंनी गायलेला हा सुंदर अभंग ऐकून स्वतः तुकोबा इतकंच म्हणाले असते..

"बाबारे, काय छान गातोस.. पांडुरंगाने तुला काय गोड गळा दिला आहे.. वाटल्यास मी माझे सगळे अभंग तुला देतो.. फक्त तुझ्यातला दुजाभाव तेवढा बाजूला ठेव म्हणजे झालं..! "

-- तात्या अभ्यंकर.

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी...

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी.. अचानक शाळेच्याच आठवणी येऊन घेरतात..

शाळेत केलेली धमाल, मजामस्ती, वांडपणा.. अभ्यास सोडून केलेलं सर्व काही..

बाईंनी, मास्तरांनी बाकावर उभं केलं अनेकदा.. ते तेव्हाही आवडायचंच.. पण आता तर ते बाकावर उभं 
राहणं आठवलं की पार हळवा होतो मी..

वर्गात सगळी मुलं बसलेली आहेत.. आपण एकटेच बाकावर उभे आहोत.. बाई मला बाकावर उभं करून 
पुन्हा आमच्याकडे पाठ करून फळ्यावर काही लिहित आहेत.. बाईंची पाठ वळताच माझ्या इतर द्वाड 
सवंगड्यांनि मला चिडवणं.. मीही मग बाकावर उभ्या उभ्या त्यांच्या टिवल्याबावल्या करणं..

मध्येच कुठेतरी हरवून जातो मी आणि माझ्यापुढे दृश्य येतं.. वर्गाबाहेर अंगठे धरून उभा असलेला मी... 
छान रग लागायची पायाला आणि पाठीला.. 

मधल्या सुट्टीत डबे उघडल्यावर येणारा पोळीभाजीचा निरनिराळा वास.. कुणाकडे कोबी, तर कुणाकडे 
बटाट्याची भाजी.. कुणाकडे फर्मास मटकीची उसळ.. तर कुणाच्या आईनं तूप-गूळ-पोळीचा छानसा करून 
दिलेला कुस्करा .. त्या कुस्कऱ्याच्या गोडव्यात पार हरवून जातो मी..!

श्रावणी शुक्रवारी आम्ही एक-एक, दोन दोन रुपये काढून आणलेले चणे.. आणी इतर साहित्य.. मग वर्गात 
सगळ्यांनी सामुहिकपणे केलेला चणे खायचा प्रोग्राम..

मला आठवतात ती वर्गातली बाकडी.. त्या बाकड्यावर पेन्सिल्ने, खडूने काहीबाही लिहिलेलं.. तास सुरू 
असताना कधी अगदी एकाग्रतेने कर्कटकाने त्या लाकडावर केलेली छानशी कलाकुसर खूप अस्वस्थ करते 
आहे आज..!

पेन आणि पेनातली शाई.. हे तर विलक्षण हळवे विषय.. 

'तुझ्यामुळे माझ्या शर्टावर शाईचा डाग पडला..' मग मी पण त्याच्यावर माझं पेन शिंपडणार..मग आमची 
जुंपणार.. मग बाई दरडावून मध्ये पडणार..

'बाई, मी नाही.. आधी त्याने माझी खोडी काढली..'

मग बाई दोघांपैकी कुणा एकाचा, किंवा दोघांचे कान पिळणार..!

त्यानंतर आज खूप वर्ष झाली.. शर्टाला एखादा छानसा निळा शाईचा डाग पडलाच नाही..!

डस्टर, खडू आणि फळा.. या तर म्हणजे अतिशय जिव्हाळ्याच्या वस्तू होत्या. सकाळी सकाळी शाळेच्या 
डस्टरने फळा छान स्वच्छ करून सर्वात वरती एखादा छान सुविचार लिहायचा..ते फळ्याच्या डाव्या की 
उजव्या कोपऱ्यात असलेलं हजर-गैरहजर-एकूण.. असं एक लहानसं कोष्टक असायचं.. ते कोष्टक आजही 
जसंच्या तसं आठवतं..!

"ही? ही तुझी गणिताची वही आहे?? काहीही व्यवस्थित लिहिलेलं नाही.. तुझं तुला तरी समजतंय का काय 
लिहिलं आहेस ते.. ही बघा रे याची गणिताची वही.. "

असं म्हणून त्या मारकुट्या मास्तरांनी सगळ्या वर्गात उंचावून फडकावून दाखवलेली माझी गणिताची वही 
आजही जशीच्या तशी आठवते मला..आणि डोळ्याच्या कडा नकळत ओल्या होतात..

शाळेची घंटा.. जनगणमन च्या रोजच्या रेकॉर्डचे स्वर..

आजही ते स्वर दूरून कुठूनतरी ऐकू येतात.. आणि सगळ्या आठवणी जुळतात..!

-- तात्या अभ्यंकर.