May 27, 2010

ललीमावशी...

माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची.

ललीमावशी!

ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!

ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..

शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे.
.
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्‍या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!

श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्‍यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..

कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची! Smile

उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..

आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!

ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण! Smile


असो..

'मोठं मोठं डोळं तुजं..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..

चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!

-- तात्या अभ्यंकर.