August 31, 2006

एका विद्वानाशी चर्चा..!

राम राम मंडळी,

एका विद्वानाशी झालेल्या चर्चेचा काही भाग येथे देत आहे. वाचा आणि सोडून द्या हो!
उगाच जास्त टेन्शन घेऊ नका! ;)

विद्वानाचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं च्यामारी निळ्या!

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही.

अहो मालक, कुणी काय करवं हे लिहिणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि मुळात तुमचा वर्णाश्रमच माझ्या मते फोल आहे.

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही. तो वर्ग (व्याख्येनुसार - रूढ अर्थानुसार नव्हे) आता लोप पावलेला आहे. आसारामबापू, मुरारीबापू, रमेशभाई ओझा, सुधांशु महाराज इ. इ. हे आता असणारे खरे ब्राह्मण.

खरे ब्राह्मण?? नाही, आपण म्हणता तर असतीलही हो ते खरे ब्राह्मण. पण आपण जी (ब्राह्मणांची!) चार नांवे लिहिली आहेत त्यापैकी दोन ब्राह्मण तर महाचालू आणि बाईलवेडे आहेत अशी खात्रीलायक बातमी मला आहे. मी नांवं कुणाचीच घेणार नाही. अर्थात असेनात का ते बाईलवेडे! अहो साक्षात तुमचा विश्वा जिथे मेनकेसमोर पाघळला तिथे इतरांचं काय? मेनका नाचायला लागल्यावर तुमच्या विश्वाने मनगटाला थुंकी लावत ध्यानधारणेला 'टाईमप्लीज' असं म्हटलंन आणि गेला फोकलिचा तिच्यामागे धावत.. ! :D

शूद्राची व्याख्या कशी करायची , आणि गवंडी (म्हणजे मिस्त्री नव्हे - मिस्त्री, सुतार, मेकॉनिक हे विशेष कला आवश्यक असणारे उद्योग आहेत, त्यासाठी काही वर्षेही घालवायवी लागतात ह्याची मला जाण आहे) वा पाट्या टाकणारे ह्यांना काय म्हणायचे ते सांगायची कोणी तसदी घेईल का ? का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो मालक, पण मला एक सांगा, मुळात कुणाची व्याख्या कराच कशाला? कुणाला काय म्हटलं पाहिजे आणि कुणाला काय नाही हा उद्योग पाहिजे कशाला? सगळी 'माणसं' आहेत एवढं पुरेसं नाही का?

का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो हे रांडेचे शास्त्रकारच तर सगळ्या आगी लावत आहेत. त्यांना नव्हता उद्योग, त्यामुळे बसले लिहीत लोकांना शहाणपणा शिकवत! शास्त्र सांगून वस्त्रात परसाकडला बसणारे ते शास्त्रकार!

कोण ब्राह्मण आहे, की क्षत्रिय आहे, की वैश्य आहे. की शूद्र आहे या गोष्टी कराच कशाला? कुणाचं काम काय, कुणाची व्याख्या काय करायची हे ठरवण्याचे अधिकार या शास्त्रकारांना जळ्ळे कुणी दिले?

असो, माझ्यापुरता हा चर्चाविषय मी थांबवत आहे.
मंडळी,
एकंदरीत अशी काहीशी झाली आमची चर्चा! नाही, माणूस तसा धर्मिक आणि विद्वानच हो. पण त्यांच्या विद्वत्तेची आमच्यासारख्या धर्मलंडांनी नोंद करायची ती कुठच्या खात्यावर?

असो...
चला मला आता मार्केटात जायचंय. चांगली सुरमई मिळते का ते बघतो. थोडीशी मांदेलीही घेईन म्हणतो. च्यामारी म्हावरं हल्ली लई महाग झालंय. सालं या कोळी लोकांच्यावर एकदा एखाद-दोन शास्त्रकारांना सोडले पाहिजेत. भीक नको पण धर्म आवर म्हणत सुतासारखे सरळ येतील! ;)
बराय तर मंडळी,

--तात्या.

August 29, 2006

दामू-गोविंदा जोड रे...

राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला,
"तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
--तात्या अभ्यंकर.

पं भाई गायतोंडे...

राम राम मंडळी,
पं भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्यातलेच. संगीत क्षेत्रातलं एक मोठं नांव. त्यांचं खरं नांव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना याच नांवाने ओळखतात. त्यांचा माझा खूप चांगला परिचय हे माझं भाग्य! त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, अजूनही बरंच काही शिकायचं आहे. मंडळी, भाईंबद्दल विचार करायला लागलो की किती लिहू आणि किती नाही असं होतं!

भाईंची तबला क्षेत्रातली कारकीर्द पाहिली की मन थक्क होतं. भाई मूळचे कोकणातले. कणकवली/कुडाळ भागातले. भाईंचे वडील व्यवसायाने डॉक्टर. त्याकाळी त्या लहानश्या गावातच त्यांची डॉक्टरकी चालायची. डॉक्टर स्वतः उत्तम पेटी वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताची आवड भाईंच्या घरातच होती. हौस म्हणून लहानश्या सुरेशनेही तबला शिकण्यास सुरवात केली.

त्यानंतर शिक्षणाकरता, आणि नोकरी-धंद्याकरता भाई कोल्हापुरात दाखल झाले. इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी कोल्हापुरातच केला. पण मन एकीकडे संगीतात, तबल्यात गुंतलं होतं. त्याला भरपूर खाद्य मिळालं ते कोल्हापुरातल्या देवल क्लबमध्ये. देवल क्लबात अनेक दिग्गजांची नेहमी गाणी-वाजवणी व्हायची. भाईंमधला गुणी विद्यार्थी ते सगळं टिपू लागला. भाईंची आणि भीमण्णांची प्रथम भेट कोल्हापुरातच झाली. एकीकडे तबल्याचा रियाज सुरू होताच. ऐकणं-वाजवणंही सुरू होतं. तरीदेखील कशाची तरी कमतरता होती. काहीतरी अजून हवं होतं! मंडळी, ती कमी होती एका चांगल्या गुरुची. कारण अजून खूप काही शिकायचं होतं/शिकायला हवं होतं. पण कोणाकडे?

आणि अशातच एक दिवस जगन्नाथबुवा पुरोहित हे भाईंना गुरू म्हणून लाभले. हिऱ्यालादेखील पैलू पाडणारा कोणीतरी लागतो! तो भाईंना जगन्नाथबुवांच्या रूपाने मिळाला. जगन्नाथबुवा तेव्हा कोल्हापुरातच होते. संगीतक्षेत्रात तेव्हा बुवांचा विलक्षण दबदबा होता. आग्र्याची घराणेदार गायकी, आणि तबला या दोन्ही क्षेत्रात बुवांचा अधिकार. लोक अंमळ वचकूनच असत बुवांना. अशातच एके दिवशी भाई गुरूगृही पोहोचले आणि तबला शिकायची इच्छा व्यक्त केली. बुवांनीही शिकवण्याचे मान्य केले.

आणि आपल्या 'गुरू-शिष्य' या वैभवशाली परंपरेनुसार रीतसर तालीम सुरू झाली. रियाज सुरू झाला. तबल्यातील मुळाक्षरांचा रियाज! अगदी चार चार, सहा सहा तास हा रियाज चाले. जगन्नाथबुवा समोर बसून शिकवत, आणि खडा रियाज करून घेत. तबल्यातील अक्षरांच्या निकासावर बुवांचा जबरदस्त भर असे. कायदे, गती नंतर! आधी अक्षरं! अक्षरं नीट वाजलीच पाहिजेत, दुगल असो की चौगल असो की आठपट असो. कुठल्याही लयीत तेवढ्याच सफाईने अक्षरांचा निकास झाला पाहिजे. शिकवणीबरोबरच बुवांनी स्वतः समोर बसून हा रियाज भाईंकडून करून घेतला हे बुवांचे डोंगराएवढे उपकार मानताना आजही भाईंचे डोळे पाणावतात! ८ ते ९, ९ ते १० असा गाण्याचा क्लास नव्हता तो. बुवा सांगतील तेवढा वेळ रियाज करावा लागे. कुठलंही क्रमिक पुस्तक भाईंच्या हाताशी नव्हतं. बुवांचा करडा चेहरा हेच क्रमिक पुस्तक! शिष्याचं कौतुक वगैरे करणे हा प्रकार तर बिचाऱ्या जगन्नाथबुवांना माहीतही नव्हता. कितीही जीव तोडून वाजवा, बुवा साधं 'ठीक!' एवढंही म्हणत नसत! पण बुवा आमच्या कोकणातल्या फणसासारखे होते. आतून अतिशय प्रेमळ आणि गऱ्यासारखे गोड आणि बाहेरून काटेरी.

उस्ताद अहमदजान थिरखवाखासाहेब यांचीही भाईंना फार उत्तम तालीम मिळाली. खासाहेबांकडून भाईंनी काय नी किती घेतलं याची काही गणतीच नाही. पण थिरखवासाहेबाचं आणि जगन्नाथबुवांचं नेमकं उलटं होतं. बुवा स्वतः लक्ष घालून तासंतास शिकवीत तसे खासाहेब शिकवत नसत. 'मी वाजवतोय. त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या! जमलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या!' अशीच खासाहेबांची भूमिका असे! पण भाईंनी अक्षरशः एखाद्या टीपकागदाने टिपाव्यात तश्या तबल्यातील बंदिशी, त्यातील सौंदर्यस्थळं टिपली. खासाहेबांचीही हळूहळू भाईंवर मर्जी बसू लागली. पेणचे पं विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे भाई केवळ झपतालातल्या खासियती शिकण्याकरता गेले आणि तिथे झपतालाचे धडे गिरवले, तालीम घेतली.
हे सगळं करताना भाईंना विशेष अडचण वाटली नाही. कारण हात तयार होता. जगन्नाथबुवांकडे तासंतास केलेल्या अक्षरांच्या रियाजाचं हे फळ होतं! कुठलीही नवी बंदिश ऐकली की ती तशीच्या तशी त्यांच्या हातातून अगदी सहजपणे आणि तेवढ्याच सुंदरतेने वाजू लागली.

एक शिष्य घडत होता, गुरू-शिष्य परंपरा धन्य होत होती!
"आज आमच्या भाईंनी इतकं सुरेख वाजवलंय की 'घरी गेल्यावर भाईची नको, पण त्याच्या हातांची एकदा दृष्ट काढून टाका!' असं मी वहिनींना सांगणार आहे."!

वरील उद्गार कविवर्य विंदा करंदीकर यांचे आहेत. प्रसंग होता वांद्रे येथील कलामंदीरात झालेला भाईंच्या एकल-तबलावादनाच्या (तबला-सोलो) कार्यक्रमाचा. विंदा आणि भाईंची चांगली मैत्री. त्यांनीही पं विनायकबुवा घांग्रेकरांकडून काही काळ तबल्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना तबल्यातली उत्तम जाण आहे. विंदा राहतातही साहित्य-सहवासात. त्याच्या बाजूलाच कलामंदीर. त्यामुळे ते आवर्जून भाईंच्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला माझ्या सुदैवाने मीही हजर होतो आणि भाईंच्या मागे तानपुऱ्याला बसलो होतो. त्यादिवशी भाईंनी झपताल इतका अप्रतिम वाजवला की कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यात बसलेले विंदा न राहून उठले आणि रंगमंचावर येऊन बोलू लागले. त्यादिवशी विंदा भाईंबद्दल खूप भरभरून बोलले. अगदी कोल्हापुरापासूनच्या आठवणी निघाल्या. विंदाही काही काळ कोल्हापुरात होते. बरं का मंडळी, करवीर ही केवळ चित्रनगरी नव्हती, तर देवलक्लबमुळे ती काही काळ संगीतनगरीही झाली होती! (मिसळनगरी तर ती आहेच!:)

गाण्याला साथसंगत तर भाई उत्तम करतातच, त्याशिवाय एकल तबलावादन हा तर भाईंचा हातखंडा आणि जिव्हाळ्याचा विषय.

साथसंगत करताना तबलावादकाला नुसता तबला येऊन चालत नाही, तर त्याला गाण्याचीही उत्तम जाण असावी लागते. शिवाय ज्याच्या गाण्याला साथ करायची आहे त्या गवयाच्या गायकीची, त्याच्या घराण्याची तबलजीला थोडीफार तरी माहिती असावी लागते. साथसंगतीचा तबला वाजवताना भाईंनी या सगळ्यावर अगदी बारकाईने विचार केला आहे. आपण कोणाला साथ करतो आहोत? त्याचं गाणं कसं आहे? किराण्याच्या संथ आलापीचं आहे, की ग्वाल्हेर अंगाचं तालाशी खेळणारं आहे, की जयपूरची लयप्रधान गायकी आहे, की बोलबनाव करत बंदिशीच्या अंगाने जाणारी आग्रा घराण्याची गायकी आहे? या सगळ्याचा विचार तबलजीच्या साथीत दिसला पाहिजे आणि त्या अंगानेच त्याची साथ झाली पाहिजे. तरच ते गाणं अधिक रंगतं. भाईंनी आजतागायत अनेक मोठमोठ्या गवयांना साथ केली आहे. यात पं रामभाऊ मराठे, पं कुमार गंधर्व, पं यशवंतबुवा जोशी यांची नावं तर अगदी आवर्जून घ्यावी लागतील.

एकदा एका मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे पं शरदचंद्र आरोलकर यांच्याबरोबर भाईंना साथ करायची होती. तस पाहता भाईंना गाण्यातलं ग्वाल्हेर अंग चांगलंच परिचयाचं होतं. पण मंडळी, ग्वाल्हेरातदेखील दोन पाती आहेत. एक विष्णू दिगंबरांचं आणि एक कृष्णराव शंकर पंडितांचं. (तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा.) तर काय सांगत होतो? आरोलकरबुवा दुसऱ्या पातीचे! (सध्या अधिक तपशिलात शिरत नाही.)
बरं का मंडळी, ग्वाल्हेरवाला गवई पटकन हमीर गातो असं म्हणणार नाही. तो म्हणणार, चला जरा झुमरा गाऊया आणि झुमऱ्यातलं 'चमेली फुली चंपा' सुरू करणार. तेच आग्रावाला म्हणणार 'चलो, जरा 'चमेली फुली चंपा' गायेंगे!' तोही 'हमीर' गातो असं म्हणणार नाही. वर 'हम राग नही गाते, हम बंदिश गाते है!' असंही म्हणणार :) याउलट आमचे किराण्याचे अण्णा 'ग म (नी)ध नी‌.ऽ प अशी अत्यंत सुरेल आलापी करून एका क्षणात हमिराचं फार मोहक दर्शन घडवणार! प्रत्येक घराण्याची वेगळी खासियत! असो..
तर कुठे होतो आपण मंडळी? हां, तर आरोलकरबुवांची मैफल होती. आपल्याला त्यांच्याबरोबर वाजवायचं आहे, ते वादन नीट त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे ही भाईंची भावना. भाई कलेशी इतके प्रामाणिक, की आदल्या दिवशी चक्क आरोलकरांच्या घरी गेले आणि म्हणाले, "बुवा, उद्या आपल्याबरोबर वाजवायचंय. आत्ता बसूया का जरा वेळ? आपल्याला काय हवं नको ते सांगा"!

मला सांगा मंडळी, आज किती लोकांजवळ हा गूण आहे? तसे भाईही साथसंगतीत तयार होतेच की. तशीच जर वेळ आली असती तर ऐनवेळेला प्रत्यक्ष मैफलीतही त्यांनी आरोलकरबुवांना अगदी उत्तमच साथसंगत केलीच असती की! मग अशी काय मोठी गरज होती की ते आरोलकरबुवांच्या घरी गेले?
मंडळी, मला वाटतं इथेच भाईंची संगीतकलेविषयीची तळमळ दिसते!
धीऽ क्ड्धींता तीत् धागे धीं....

सभागृह श्रोत्यांनी भरलं होतं. भाईंच्या एकल वादनाचा (तबला-सोलो) कार्यक्रम सुरू झाला आणि भाईंनी वरील पेशकार सुरू केला. आहाहा, मंडळी काय सांगू तुम्हाला!

या भागात आपण एक एकल तबलावादक म्हणून भाई कसे आहेत हे पाहणार आहोत. एकल तबलावादनात भाईंचं नांव विशेषत्वाने घेतलं जातं. भीमण्णा जसे यमन गाताना त्याच्या ख्यालातून तो राग फार सुंदरपणे दाखवतात, त्यांचे विचार मांडतात, तसंच आहे एकल तबलावादनाचं. एकल तबलावादनात एखाद्या कलाकाराचा तबल्यातील विचार दिसतो. त्याची दृष्टी कशी आहे हेही कळतं. हाताची तयारी दिसते. लयीवरचं प्रभुत्व दिसतं.

आयुष्यभर तबल्यावर केलेला विचार, चिंतन, आणि रियाज ह्या सगळ्या गोष्टी भाईंच्या एकल तबला वादनातून अगदी पुरेपूर दिसतात. मंडळी, भाईंचं एकल तबलावादन ऐकायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असं वाटतं. नादब्रह्मच ते! अहो वर उल्लेखलेला पेशकार नुसता सुरू झाला तरी सभागृह भारून जातं. एखादा सार्वभौम राजा सोन्याची अंबारी असलेल्या हत्तीवर बसून जात आहे आणि दुतर्फा माणिकमोती उधळत आहे असं भाईंचा पेशकार सुरू झाला की वाटतं!
धींऽ धाऽग्ड् धा तत् धाऽग्ड्धातीं ताक्ड् ता तत् धाग्ड्धा

ओहोहो, मंडळी हाही एक पेशकाराचाच प्रकार. हा प्रकार थिरखवाखासाहेबांनी बांधला आहे. हा खेमट्या अंगाचा पेशकार. तसं म्हटलं तर खेमटा हा लोकसंगीतातीलच एक तालप्रकार. यावरूनच हा पेशकार खासाहेबांनी बांधला आहे. आपल्या रागसंगीताचं, शास्त्रीय संगीताचं कुठेतरी आपलं लोकसंगीत हेच मूळ आहे असं म्हणतात ते पटतं! हा पेशकार जेव्हा भाईंच्या हातातून वाजू लागतो तेव्हा सभागृह अक्षरशः डोलू लागतं. काय हाताचं वजन, दाह्याबाह्याचं किती सुरेख बॅलंसींग़! दादऱ्या अंगाचा रेला हा तर केवळ भाईंनीच वाजवावा! रेला वाजवताना लयीवरचं आणि अक्षराच्या निकासावरचं त्यांचं प्रभुत्व पाहिलं की थक्क व्हायला होतं. भाईंची पढंतही अत्यंत रंजक आणि नाट्यपूर्ण असते. अगदी ऐकत राहावीशी वाटते. अहो तबल्यावरचे हातदेखील अगदी देखणे दिसले पाहिजेत असं भाई म्हणतात.

मंडळी, भाईंनी नेहमी वेगवेगळ्या गतींना, बंदिशींना एक काव्य मानलं. 'ही बंदिश बघ, ही गत बघ. अरे यार सुरेख कविता आहे रे ही" असं भाई म्हणतात. आणि खरंच मंडळी, आज अशी अनेक काव्य भाईंच्या हातात सुरक्षित आहेत. नव्हे, ती त्यांनी आयुष्यभर जपली आहेत.

आपल्या गुरुंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा भाईंचा अभ्यास आहे. आमिरहुसेनखासाहेबांकडे भाई कधी शिकले नाहीत, पण खासाहेबांचा भाईंवर फार जीव! अल्लारखासाहेबांचं भाईंवर अतिशय प्रेम होतं. भाईकाकांनी, कुमारांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. आज उ झाकीर हुसेन, पं सुरेशदादा तळवलकर, पं विभव नागेशकर, यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना खूप मानतात.
अर्जुन शेजवलांसारखे अत्यंत थोर पखवाजिया भाईंचा फार आदर करीत. अलीकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समसी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे एक आदर्श म्हणून पाहतात. याचं कारण एकच. ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार. काय नी किती लिहू भाईंबद्दल!

मंडळी, आमचे भाई स्वभावानेही अगदी साधे, निगर्वी आणि प्रसिध्दीपऱमुख आहेत. आमच्या उषाकाकूही अगदी साध्या आहेत. भाईंचे चिरंजीव डॉ दिलिप गायतोंडे हे ठाण्यातले एक यशस्वी नेत्रशल्यविशारद आहेत. तेही फार छान पेटी वाजवतात. त्यांनी पं बाबुराव पेंढारकरांकडे पेटीची रीतसर तालीम घेतली आहे.
आजही काही अडलं की कोणीही भाईंकडे जावं. ती व्यक्ती विन्मुख परत येणं शक्य नाही. गेली अनेक वर्ष भाई तबल्याची विद्या सर्व शिष्यांना मुक्तहस्ते वाटत आहेत. ते नेहमी सर्वांना सांगतात, "बाबानो माझ्याकडे जे काय आहे ते मी द्यायला, वाटायला तयार आहे. तुम्ही या आणि घ्या!" अगदी भाई स्वतःदेखील आत्ता आत्ता पर्यंत पुण्याच्या पं लालजी गोखल्यांकडे मार्गदर्शनाकरता जायचे. लालजी आता नाहीत.

वयाच्या पंचाहत्तरीतदेखील भाईंचा स्टॅमिना आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजपर्यंत भारतभर तबल्याच्या अनेक शिबिरांत, प्रात्यक्षिक-व्याख्यानासारख्या कार्यक्रमांत भाईंनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. आपले विचार लोकांना ऐकवले आहेत. काही काही वेळेला जोडून सुट्टी वगैरे आली की सर्व शिष्यांना घेऊन भाई बाहेरगावी जातात. तिथे त्यांच्याकडून ३-३ दिवस रियाज करून घेतात. जगन्नाथबुवांनी भाईंकडून असाच रियाज करून घेतला होता. भाई आज तेच करत आहेत. गुरू शिष्य परंपरा!!
मला माझ्या सुदैवाने भाईंचं खूप प्रेम मिळालं. गाण्यातल्या, तबल्यातल्या अनेक गोष्टींवर भाई माझ्याशी अगदी भरभरून बोलले आहेत. कधीही भेटलो की कौतुकाने "काय तात्या, काय म्हणतोस" असं विचारणार. मग मी हळूच त्यांचं पान त्यांना देणार. मग मला म्हणणार "क्या बात है! आणलंस का पान! अरे पण तंबाखू फार नाही ना घातलास?:)

त्यांच्या एकलतबलावादनात त्यांच्या मागे मी अनेकदा तंबोऱ्याला बसलो आहे. तंबोरा छान लागला की लगेच "क्या बात है" असं म्हणून कौतुक करणार! इतक्या मोठ्या मनाचे आहेत आमचे भाई. ठाण्यात माझा एक बंदिशींचा कार्यक्रम झाला होता. त्याला ते आवर्जून आले होते. "चांगल्या बांधल्या आहेस बंदिशी" असं कौतुक केलं आणि पाठीवरून हात फिरवला. "नेहमी असंच काम करत रहा" असं प्रोत्साहनही दिलं!

मंडळी, अनेकदा भाईंशी बोललो आहे. पण बोलता बोलता भाई मनानं कोल्हापुरात जातात आणि पुन्हा एकदा हा शिष्य जगन्नाथबुवांच्या आठवणीने हळवा होतो. स्वतःच्या वडिलांचादेखील मृत्यू अगदी धीराने घेणारा हा माणूस, पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा मात्र हमसाहमशी रडला होता. आजही त्यांचे डोळे पाणावतात. मला म्हणतात, "कोणाच्याही मृत्युचं विशेष काही नाही रे तात्या. तो तर प्रत्येकाला येणारच आहे एके दिवशी. पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला काही अडलं तर विचारणार कोणाला? हे चूक, हे बरोबर, असं कर, असं करू नको हे सांगणारं कोणी राहिलं नाही रे तात्या. असं वाटतं की पुन्हा एकदा जगन्नाथबुवांसमोर बसावं आणि अक्षरांचा रियाज करावा, अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत!"

--तात्या अभ्यंकर.

देवासचे कुमारजी...

नमस्कार मंडळी,
१९८९-१९९० च्या दरम्यानची गोष्ट. मी काही कामानिमित्त भोपाळला गेलो होतो. एका सकाळी विशेष काही काम नव्हते, म्हणून जरा भोपाळात भटकत होतो. झकासपैकी जाडनळीची, पाकाने भरलेली, साजुक तुपातली गरमागरम जिलेबी, त्यावर २ ग्लास गरमागरम केशरी आटीव दुध रिचवून आणि १२० जाफरानीपत्तीयुक्त पानाचा तोबरा भरून मस्त मजेत भोपाळात हिंडत होतो. नोव्हेंबर महिन्यातली भोपाळमधली सुरेखशी थंडी, गरमागरम दुध-जिलेबी, आणि १२० तंबाखूपानाची लज्जत! क्या बात है!! मस्त माहोल जमला होता. नकळत सकाळचा भटियार मनाचा ताबा घेत होता. हिंडता हिंडता s t stand पाशी आलो. समोरच "भोपाल-देवास" अशी पाटी असलेली बस उभी दिसली. आणि एकदम मला कुमारजींची (पं कुमार गंधर्व) आठवण झाली! कुमारजी देवासला रहायचे. "जायचं का कुमारजींना भेटयला"? क्षणभर मनामध्ये विचार आला आणि चढलोसुध्दा त्या बसमध्ये!

बसमध्ये मोजकीच माणसं. झकासपैकी खिडकीतली जागा मिळाली होती. पान तर फारच सुरेख जमलं होतं. पिचकारी मारायला खिडकीही मिळाली होती! :) आता मगासच्या भटियारची जागा "सोहनी-भटियार" ने घेतली होती! सोहनी-भटियार हे खास कुमारांचं combination! सोहनी हा उत्तररात्रीचा बादशहा आणि भटियार हे सकाळचं वैभव! कुमारांनी या दोघांना एकत्र आणून "सोहनी-भटियार" हे एक अजब रसायन बनवले आहे. त्यांची त्यातली "म्हारुजी, भुलो ना माने" ही बंदिश प्रसिध्द आहे.

दुपारी एक दिडच्या सुमारास देवासांत उतरलो. वातावरणांत सुरेख गारवा होता. एक छानसा फुलांचा गुच्छ घेतला. समोरच टांगा दिसला. कुमारांचा पत्ता मला माहीत नव्हता. पण देवास तसं फार मोठं नाही. त्या टांगेवाल्यालाच विचारलं,
"कुमारजी कहा रहते है पता है आपको"?
तो लगेच म्हणाला,"देवासमे उन्हे कौन नही जानता? आप बौठिये बाबुजी, हम छोडे देते है आपको उनकी कोठीपे"!

आता मात्र मला थोडंसं टेन्शन यायला लागलं. इथपर्यंत आपण आलो खरे, पण बोलणांर काय त्यांच्याशी? तशी त्यांची माझी ओळख होती. यापूर्वी अनेकदा मुंबै-पुण्याला त्यांच्या बैठकी मी ऐकल्या होत्या, त्यांना भेटलो होतो. पण त्यांचा स्वभाव थोडासा तापट आणि विक्षिप्त होता हे मला माहीत होतं!

तेवढ्यांत त्यांचं घर आलं. मी टांग्यातून उतरलो. देवासचा फारच सुंदर आणि निसर्गरम्य परिसर! एका लाहानश्या टेकडीपाशी आमचा टांगा थांबला होता. त्या टेकडीवरच त्यांचा सुरेख बंगला होता. मी हळूच फाटकापाशी आलो, आणि बघतो तर काय, समोरच कुमारजी त्यांच्या बंगल्याबाहेरील बागेत निवांतपणे बसले होते. मला पाहून स्वतः फाटकापाशी आले आणि मला पाहून म्हणाले,
"अरेच्च्या, तुम्ही इकडे"? "हो, जरा कामाकरता भोपाळपर्यंत आलोच होतो. तुम्हाला भेटावसं वाटलं म्हणून मुद्दाम आलो"
"वा!, या की मग. आतच बसुया"

हुश्श! माझं मगासचं टेन्शन एकदम नाहीसं झालं! ते मला त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे वसुंधराताई बसल्या होत्या. मी त्या दोघांनाही वाकुन नमस्कार केला. "काय, कसं काय" वगैरे प्राथमिक बोलणं झाल्यावर साहजिकच आमच्या गप्पांचा ओघ गाण्याकडे वळला.

मला याची पूर्ण जाणीव होती की मी एका विलक्षण प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वासमोर बसलो होतो! सर्व परंपरांच्या परे गाण्याकडे बघणारा, ख्यालगायकीमध्ये संपूर्णपणे एक वेगळीच वाट शोधणारा, अत्यंत प्रयोगशील, सर्जनशील असा कलावंत म्हणजे कुमारजी! राग, सूर, लय, ताल, गाण्यातली घराणी, बंदिशी, रागसंगीत व लोकसंगीत, कबीर, मीराबाई यांचं साहित्य, निसर्ग, ऋतुमान यांचा गाण्याशी संबंध इ. अनेक गोष्टींवर त्यांनी फार बारकाईने विचार केला होता हेही मला माहीत होतं. त्यामुळेच मला त्यांच्याशी बोलायचं टेन्शन आलं होतं.

कुमारजी म्हणजे मध्यलयीचे बादशहा! त्यामुळे मी हळूच माझ्या बोलण्यातून त्यांना "लयी बद्दल तुमच्याकडून काही विचार ऐकायची इच्छा आहे" असं सांगीतलं. आणि ते भरभरून बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी अक्षरशः त्यांच्या विचारांचा खजिना माझ्यासमोर ओतला. रागसंगीताबद्दलचे आणि ख्यालगायकीचे त्यांचे अनेक विचार त्यांनी मला सांगितले. त्यांची प्रतिभा खरंच थक्क करणारी होती! त्यानंतर त्यांच्या निर्गुणी भजनांचा मी विषय काढला. त्यावरदेखील ते माझ्याशी खूप चांगलं बोलले.
"उड जायेगा हंस अकेला,
जगदर्शन का मेला"

ह्या कबिराच्या भजनाबद्दल ते बोलू लागले. त्यातल्या,
"जम के दूत, बडे मजबूत,
जमसे पडा है झमेला,
उड जायेगा हंस अकेला"!!

या ओळी वाचतानाच या भजनाची चाल त्यांना सुचली असं ते म्हणाले.
बोलता बोलता तंबोऱ्यांचा विषय निघाला. मला म्हणाले, "अरे तंबोरा उत्तम लागला नाही तर गाणार कसं? तंबोरा हा तर गायकाचा आरसा. आरसा जर धुसर असेल तर आपण त्यांत स्वतःला नीट पाहू शकतो का? मग तंबोरा जर नीट लागला नसेल तर गायक त्याची साथ घेऊन चांगली अभिव्यक्ती करु शकेल का"?!! कुमारजींच्या घरी तंबोऱ्याची एक सुरेल जोडी सुंदर गवसणीत घालून ठेवली होती.
मी म्हटलं, "गवसणी फार सुंदर आहे हो, कुठून आणल्या ह्या गवसण्या"?तर ते हसून मला म्हणाले, "अरे त्या शिवून घेतलेल्या आहेत. ते रजईचं जाडं कापड आहे"!!"रजईचं कापड"?"अरे आता थंडी पडेल ना? मग तंबोऱ्यांना नाही का वाजणांर थंडी"?!! या दिवसांत रजईच्या कापडाच्या गवसण्या माझ्या तंबोऱ्यांना असतांत आणि उन्हाळ्यातल्या पात्तळ तलम कापडाच्या गवसण्या वेगळ्या आहेत!!

मला गाणं म्हणजे काय ते हळुहळु कळत होतं!!

वसुंधराताईंनी मस्तपैकी कन्नड पध्दतीचा थालीपिठासारखा एक पदार्थ खायला दिला. त्याचं नांव आता माझ्या लक्षात नाही. गरमागरम कॉफी केली. पुन्हा एकदा त्या दोघांनाही नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला. जातांना त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर चारही बाजूला फार सुंदर बाग केली होती, ती त्यांनी मला दाखवली.

बसस्टॉपपाशी आलो. एव्हांना संध्याकाळ झाली होती. अर्धा तास थांबल्यावर मला भोपाळची बस मिळाली. आम्ही अवघे ८-१० प्रवासीच त्यात होतो. अंधार पडायला लागला होता. बस भोपाळच्या दिशेने भरधाव निघाली होती. खिडकीत गजाला डोकं टेकून शांत बसलो होतो. देवासच्या आसपासच्या परिसरातल्या गर्द झाडीतून आता बोचरा गार वारा अंगावर येत होता. कुमारजीं आणि वसुंधराताईंनी माझा फार उत्तम पाहूणचार केला होता. मनांत फक्त कृतार्थतेची भावना होती. खूप काही हाती लागल्यासारखं वाटत होतं! आणि अजून आपल्याला बरंच शिकायचं आहे हेदेखील समजलं होतं!!

"उड जायेगा हंस अकेला, जगदर्शन का मेला"

या ओळींचा अर्थ, आणि त्यातल्या सुरावटींतली आर्तता त्या धावत्या बसमध्ये मला अस्वस्थ करून गेली!!
--तात्या अभ्यंकर.

बाबुजींची एक आठवण...

राम राम मंडळी,
आज मी आपल्याला बाबुजींची (स्व सुधीर फडके यांची) एक आठवण सांगणार आहे. माझ्या मनांत तो दिवस आजही घर करून राहिला आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मला आता महिना आणि वर्ष नक्की आठवत नाही, मात्र वीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीची ही घटना आहे, एवढं नक्की.

त्या काळात मी बऱ्याचदा त्यांच्या घरी जात असे. त्यांच्याबद्दल मनात नेहमी आदरयुक्त भितीच असायची. तसे ते माझ्याशी बोलायचे, नाही असं नाही. कधी मुडात असले तर माझी, "काय पंडितजी, आम्हाला कधी ऐकवणार तुमचं गाणं? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडं थोडं!" अशी फिरकीही घ्यायचे!! पण मीच फारसा त्यांच्या वाऱ्याला उभा रहात नसे! त्यांच्या घरी गेलो तरी जास्त वेळ ललितामावशींशीच बोलत असे. खूप गोड आहेत हो आमच्या ललितामावशी!

बाबुजींना एकदा रुटीन चेकप् करता दादर येथील डॉ फडके (माझ्या आठवणीप्रमाणे हिंदु कॉलनीतील डॉ अजित फडके) यांना भेटावयाचे होते. पण डॉ फडके यांनी तो वार केईएम् रूग्णालयाच्या व्हीजीटसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे बाबुजींनी तपासणीकरता केईएम् लाच जायचे ठरवले होते. योगायोगाने मी त्या दिवशी बाबुजींच्या घरी त्यांना भेटावयास गेलो होतो.
ललितामावशींनी मला म्हटलं, "अरे तू आज बाबुजींसोबत केईएम् ला जाशील का?" मी आनंदाने होकार दिला! एकीकडे मनात भितीही होती, पण बाबुजींचा सहवास काही वेळ मिळणार म्हणून मला आनंदही झाला होता. ललितामावशींनी मला टॅक्सीनेच जा, जपून जा असं बजावून सांगितलं होतं.

झालं! आम्ही दोघे शंकर निवासच्या बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर लगेच मला बाबुजी म्हणाले, "अरे अमुक अमुक नंबरची बस केईएम् ला जाते. आपण तिनेच जाऊया. टॅक्सी वगैरे उगाच नको"!! आता मडळी, आली का माझी पंचाईत? बाबुजींनी पहिलाच बॉल अवघड टाकला होता! पण मावशींनी मला बजावलं होतं, त्यामुळे मी टॅक्सीचाच आग्रह धरला. अखेर त्यांनी मान्य केलं. मी हुश्श केलं!

आम्ही दोघे टॅक्सीत बसलो. टॅक्सीवाल्याने विचारलं, "कहा जाना है?" झालं! बाबुजी त्याच्यावर वैतागले. "तुम्ही मुंबईत टॅक्सी चालवता आणि तुम्हाला मराठी येत नाही"? त्यावर तो उर्मटपणे म्हणाला, "तो क्या हुआ?"वातावरण अंमळ तापू लागलं तेव्हा मीच मध्ये पडलो. आणि बाबुजींची समजूत घातली!

थोड्याच वेळात आम्ही केईएम् ला पोहोचलो. आम्हाला तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं. बाबुजी जिन्याकडे जाऊ लागले. मी त्यांना म्हटलं, "जिन्याने नको. लिफ्टची सोय आहे, आपण लिफ्टनेच जाऊ. उगाच आपल्याला त्रास होईल" झालं! पुन्हा माझ्यावर बाबुजी वैतागले. "तुम्ही लोकांनी मला अपंग करायचं ठरवलं आहे की काय? मी जिन्यानेच जाणार. काही होत नाही मला"! मी पुन्हा त्यांची समजूत काढली, "ललितामावशींनी मला अगदी निक्षून सांगितलं आहे की आपल्याला अगदी जपून, सांभाळून घेऊन जा म्हणून. आपण कृपया ऐका माझं"थोडेसे वैतागूनच ते लिफ्टकडे वळले. आम्ही डॉक्टर फडके यांच्या खोलीपाशी गेलो. दरवाजा बंद होता. बाहेर १०-१२ रुग्ण नंबर लावून वाट पहात होते. डॉक्टर आत एका रूग्णाला तपासत होते.

तेवढ्यात काही कामाकरता डॉक्टर बाहेर आले, आणि त्यांनी बाबुजींना बाहेर थांबलेलं बघितलं. अदबीनेच ते आमच्या जवळ आले, आणि म्हणाले, "बाबुजी, आत चला. आता आपल्यालाच तपासतो."

"नाही! मी रांगेतच थांबतो. माझा नंबर येईल तेव्हाच मी आत येईन! "

डॉक्टर म्हणाले, "कमालच करताय आपण. अहो, आपल्याला कशाला हवा नंबर? आपण please आत चलावं".
"नाही! इथे मी बाबुजी वगैरे कोणी नाहीये. ही मंडळी इथे इतका वेळ थांबली आहेतच की नाही? तसाच मीही थांबेन"! पुन्हा ठाम उत्तर.

साधारण तासाभराने आमचा नंबर लागला! तपासणी झाली आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर बाबुजींच्या एका चाहत्याने त्यांना गाठलं. वाकून नमस्कार केला. बाबुजींनी त्यांची कुठे असता, काय नांव वगैरे आस्थेने चौकशी केली.
ते गृहस्थ बाबुजींना म्हणाले, "माझी आई इथेच ऍडमीट आहे. आम्ही सगळे कुटुंबीय आपले चाहते आहोत. आपण येता का २ मिनिटाकरता माझ्या आईच्या खोलीत? तिला खूप आनंद होईल"!

बाबुजींना त्या गृहस्थाचा आग्रह मोडवेना. आम्ही त्यांच्या आईच्या खाटेपाशी गेलो. बाबुजींना पाहताच त्या वृध्द स्त्रीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. उठवत नसतानाही ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली! बाबुजीनी तिचीदेखील आस्थेने चौकशी केली. आकाशवाणीवर प्रथमच जेव्हा गीतरामायणाचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारीत झाला तो मी ऐकला आहे, असं तिने बाबुजींना अडखळत सांगितलं! आजारपणामुळे तिला बिचारीला धड बोलताही येत नव्हतं!

मंडळी, बाबुजी काय, भीमण्णा काय, फार मोठी माणसं ही! वरील लेख वाचतांना टॅक्सीच्या, लिफ्टच्या, उदाहरणांवरून एखाद्याला बाबुजी खूप हट्टी वाटतील. मलादेखील वाटले!! पण मंडळी, हा हट्टीपणा नव्हे. जीवनाशी आयुष्यभर झगडा करून कमावलेलं तेज आहे हे! या झगड्यातूनच त्यांनी हा पीळ कमावला होता!!

आम्ही टॅक्सीत बसलो. आता मात्र बाबुजी मुडात आले होते. अब्दुलकरीमखासाहेब, हिराबाई बडोदेकर, नारायणराव बालगंधर्व यांच्यावर भरभरून बोलू लागले. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य ते मला समजावून देऊ लागले. या तीनही दिग्गजांना बाबुजी गुरूस्थानी मानत. किती मधुकरवृत्तीने त्यांच्या गायकीचा अभ्यास करून त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या संगीतात केला होता!! त्यांच्याबद्दल बोलताना ते अगदी भारावून गेले होते.

मी एकाचवेळी एका माणसाचा जिद्दीपणा, हट्टीपणा पहात होतो, आणि एका शिष्याचं त्यांच्या गुरुंवरचं प्रेम, भारावलेपण बघत होतो.

आजही मी शिवाजीपार्क येथील त्यांच्या घरी जातो. ललितामावशींना, श्रीधरजींना भेटतो. मात्र आजही त्यांच्या दिवाणखान्यात गवसणीत बंद करून ठेवलेली तंबोऱ्यांची जोडी मला अस्वस्थ करून जाते!!!!

तात्या अभ्यंकर.

बुवा.

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

आमचा बुवा हे गाणं बऱ्याचदा म्हणतो. रात्रीचे दहा/साडेदहा वाजले आहेत. बुवा आता झोपायच्या तयारीत आहे. पण गेली अनेक वर्षे झोपायच्याआधी अशी काही गाणी बुवा गुणगुणतो. अगदी छान आणि सुरेल! रात्रीचं जेवण झालं की बुवा विडी शिलगावणार. त्याच्या भाषेत सांगायचं तर खाकी! बुवा विडीला 'खाकी' म्हणतो. खाकी ओढून झाली की मग बुवा मुडात येणार. मग कधी एखादा अभंग, एखादं भावगीत असं काहीतरी गुणगुणणार आणि झोपी जाणार. गेली अनेक वर्ष त्याचा हा क्रम सुरू आहे.

बुवा मूळचा सुधागड तालुक्यातील एका लहानश्या गावातला. शिक्षण तसं फार नाही. असाच पोटापाण्याकरता भटकत मुंबईत आलेला. कोणाच्यातरी ओळखीने लागला एकदाचा गोखल्याच्या भटारखान्यात, तो आजतागायत तिथेच आहे. याहून अधिक बुवाचा पूर्वइतिहास मलाही माहीत नाही. मी तरी त्याला 'गोखल्याच्या हाटेलातला एक आचारी' म्हणूनच इतके वर्ष ओळखतो.

आमच्या गोखल्याचं हाटेल म्हणजे हाटेल कसलं ते, रस्त्यापासून सुरू होत मागील दारापर्यंत जाणाऱ्या तीन लहान लहान खोल्या. बाहेरच्या खोलीत फळ्या टाकलेल्या. त्यावर प्लेटा ठेवून उभ्याउभ्याच खायचं. त्याच्या मागे भटारखान्याची खोली. त्याच्या मागे हाटेलचा शिधा ठेवण्याची खोली. आमचा बुवाही त्याच खोलीत गेली अनेक वर्ष राहतो आहे. कपड्याचे एखाद-दोन जोड, एक लहानशी ट्रंक, आणि फटका मारल्याशिवाय सुरू न होणारा एक लहानसा ट्रान्जिस्टर, एवढंच काय ते बुवाचं सामान. रेडियोवरची गाणी मात्र बुवा आवडीने ऐकतो. तेवढीच काय ती त्याची करमणूक. "तात्या, तू फटका मारून बघा एकदा. नाही सुरू होणार हा रेडियो. त्याला मालकाचाच हात कळतो" असं बुवा गमतीने म्हणतो.

एका मोडकळीस आलेल्या रेडियोवरच काय ती बुवाची मालकी!

मिसळीच्या प्रेमापायी गोखल्याच्या हाटेलात माझा नेहमीचा राबता. मालकांपासून सगळे ओळखीचे. मालकांच्या गैरहजेरीत स्वतःलाच मालक समजत कॅशेरचं काम पाहणारा म्यॅनेजर शंकरराव, पाण्याचे गिल्लास, कपबश्या, प्लेटा धुणारा आमचा काशिनाथ, ('च्यामारी या शंकररावाला एकदा चांगला हाणला पाहीजे' हे काशिनाथाचं नेहमीचं स्वगत!;) गिऱ्हाईकांना मिसळ, बटाटवडे, साबुदाणाखिचडी, पोहे, थालीपीठ असली परब्रह्म प्लेटीतून आणून देणारा रघ्या, आणि बुवाचा स्वयंपाकातला अशिष्टंट दामू, आणि आमचा बुवा. बुवा मात्र तिकडचा मुख्य आचारी!

"मिसळप्रेमी तात्या" अशीच माझी गोखल्याकडे ख्याती आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी माझ्या अगदी घरोब्याची. मला तिथे उभं राहून मिसळ खाताना पाहून आत वड्यांकरता उकडलेले बटाटे कुस्करत असलेला, तर कधी साबुदाणावड्याचं पीठ मळत असलेला बुवाही कधी कधी आतूनच ओरडतो, "काय रे तात्या, थोडा रस्सा पाठवू काय? जा रे रघ्या, तात्याला थोडी तिखट 'तरी' नेऊन दे.!" का माहीत नाही, पण शंकर, काशिनाथ, रघ्या, दामू या सगळ्या मंडळींत बुवा माझा विशेष लाडका, आणि मीही बुवाचा! ;)

बुवा आता पन्नाशीच्या थोडा पुढेच असेल. तो सदैव खाकी हाफ पँट आणि बाह्यांचा गंजी, ह्याच वेषात असतो. आज जवळ जवळ ३०-३५ वर्ष बुवा गोखल्याकडे आचाऱ्याचं काम करतोय. लग्नकार्य त्याने केलेलं नाही. दिवसभर भटारखान्यात काम करणे, ते संपलं की तिथेच मागच्या शिध्याच्या खोलीत झोपणे. झालं, संपला दिवस बुवाचा. १०-१२ मिनिटं रोजचं वर्तमानपत्र चाळतो, आणि आकाशवाणी मुंबई 'ब' वरची गाणी आणि मराठी बातम्या मात्र आवर्जून ऐकतो. इतकाच काय तो बुवाचा बाह्य जगाशी संपर्क. दर सोमवारी हाटेल बंद असतं. त्या दिवशी मात्र बुवाला अख्खा दिवस आराम. मग कुठेतरी दिवसभर तलावपाळी, कौपिनेश्वर मंदिर, येऊरचा डोंगर, असा भटकत असतो.

बुवाची रोजची सकाळ मात्र अगदी लवकर सुरू होते. मिसळीकरता उसळ बनवणे, बटाटवड्यांचं पुरण तयार करणे, उपासाच्या पदार्थांची तयारी करणे, अशी अनेक कामं त्याला करायची असतात. पण या कामात त्याला दामुची बरीच मदत होते. मग बेसनाचे/डिंकाचे लाडू, अनरसे, शंकरपाळे, पोह्यांचा चिवडा, असे पदार्थही त्याला अधनंमधनं संपतील तसे करायला लागतात. हे पदार्थ बरण्यांत ठेवून गोखल्या त्याची काउंटरवरून विक्री करतो. मग केव्हातरी दुपारी बुवाच्या मुख्य कामांचा उरका पडतो. पुढची कामं करायला दामूचीही आताशा पुष्कळ मदत होते. त्यानंतर निवांतपणे जेवून, एखादी खाकी शिलगावून दोन घटका मागीलदारी जाऊन बुवा जरा वेळ वर्तमानपत्रही चाळतो.

अशीच एक छानशी दुपार. मी मिसळ खायला हाटेलात गेलो होतो. गिऱ्हाईकांची फारशी वर्दळ नव्हती. मिसळ खाता खाता मध्येच मला,

"हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा मायमाऊली काळी
एकवितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी"

या सुंदर ओळी भटारखान्यातून ऐकू आल्या. नकळत, "वा, क्या बात है" अशी माझी दाद गेली. समोरच डिंकाचे लाडू वळत वळत हे गाणं म्हणत बुवा बसला होता. माझी दाद गेल्यावर मिश्किलपणे माझ्याकडे पहात म्हणाला,

"काय तात्या, लाडू खायचाय काय? आत ये पाहू."

मी भटारखान्यात शिरलो. गोखल्याच्या हाटेलात आपल्याला सगळीकडे फ्री पास आहे.;) डिंकाचे लाडू बाकी आमचा बुवा झकासच करतो हो!

"लाडू मस्तच झालाय रे बुवा. गाणंही फार छान गातोस तू"

"कसलं छान बोडक्याचं! अरे रेडियोवर लागणारी गाणी ऐकून ऐकून जरा आपलं गुणगुणतो झालं."

"अरे नाही. खरंच फार छान वाटतं रे ऐकायला."

असा आमचा संवाद बऱ्याचदा झाला आहे. मी 'तुझं गाणं ऐकायला फार छान वाटतं रे बुवा' असं म्हटलं की मग मात्र बुवाची कळी नेहमीच खुलते. मग त्या नादात बुवा माझ्याशी बऱ्याच गप्पा मारतो. मध्येच, "अरे दाम्या लेका रश्श्याखालचा ग्यास पेटव पाहू. रस्सा गार झाला असेल बघ!" किंवा "काय तात्या, आल्याची फर्मास वडी खाणार काय? ए दाम्या, तात्याला त्या बरणीतली आल्याची वडी दे पाहू" असा बॉसच्या थाटात दामूला हुकूमही सोडतो;)

"काय सांगू तुला तात्या, लहानपणी शाळेत तसा चार यत्ता शिकलो आहे हो मी. मला गाण्यांची, कवितांची खूप आवड. मास्तर जे काय शिकवायचे ते अगदी मन लावून शिकायचो. पण परिस्थितीमुळे फार काळ शिकता नाही आलं रे. बाप वारला आणि खायचेच वांधे झाले म्हणून घराबाहेर पडलो. इकडूनच कसे बसे चार पैसे जमतील तसे गावी आईला पाठवत होतो. आता तीही खपली."

आज मी इतके वर्ष बुवाला ओळखतोय, पण त्याच्या बोलण्यात चुकूनसुद्धा कधी मालकांबद्दल उणा शब्द मी ऐकला नाही. त्याला पगार किती हेही मला माहीत नाही. पण जेव्हा जेव्हा मालकांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा 'आमचा मालक म्हणजे देवमाणूस हो' असंच बुवा म्हणतो. काय सांगू तुला तात्या, "अरे इथे आलो तेव्हा धड कांदासुद्धा मला चिरता येत नव्हता. पण मालकांनी प्रेमाने ठेवून घेतलं हो. हळूहळू मग मीच सगळी कामं शिकलो. पदार्थ बनवायला शिकलो. आता मात्र बरं चाललं आहे. आणि तसंही एकंदरीत बरंच आयुष्य गेलं असंच आता म्हणायचं रे तात्या. कशाला उगाच कोणाकडे तक्रार करा, रडगाणं गा?!"

"काय रे बुवा? आज ठीक आहे, पण उद्या हातपाय थकल्यावर कुठे जाणारेस? काय करणारेस? कुठे राहणारेस, काही विचार केला आहेस का? मालक काही काम न करता बरा राहू देईल तुला म्हातारपणी?"
मला गेले अनेक दिवस हा प्रश्न बुवाला एकदा विचारायचाच होता.

"खरं सांगू का तुला तात्या? तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आजतरी माझ्याकडे नाही. उद्याचं उद्या बघू! आणि तुला सांगतो, अरे आजपर्यंततरी दोन वेळच्या भुकेला आणि डोक्यावरच्या छताला काहीही कमी पडलं नाही आणि यापुढेही पडणार नाही. अरे तात्या, उगाच आपल्या हातात नसलेल्या भविष्यातल्या गोष्टींची फार कशाला काळजी करा?

"महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी."


"एवढंच माझं मागणं आहे रे. आणि ते नक्की पुरं होईल याची खात्री आहे. अरे आयुष्यभर जीव लावून हे गाणं गातोय ते थोडंच फुकट जाणारे? आणि काय सांगावं, अरे उद्या कदाचित तो देणारा इतकं देईल की ते घ्यायला माझीच झोळी दुबळी पडेल रे तात्या!"

बुवाचं हे उत्तर ऐकून मात्र मी एकदम भारवूनच गेलो. 'गाणं' शब्दशः जगणारी फार कमी माणसं असतात, त्यापैकी बुवा एक! बोलबोलता एक गाणं बुवा मला किती सहज शिकवून गेला!

आज बुवाबद्दल चार ओळी लिहायला बसलो आहे खरा, पण काय लिहू ते सुचत नाही. आणि तसं पाहता एखादा लेख लिहिण्याएवढा बुवा लौकिकअर्थाने मोठाही नाही. पण लौकिकअर्थाने कुणीही नसला तरी माझ्याकरता मात्र बुवा खरंच खूप मोठा आहे.

बरं का मंडळी, माझ्या बऱ्याचदा मनात येतं की बुवाला एखादा छानसा रेडियो भेट म्हणून द्यावा. वास्तविक शंभर-दिडशे रुपायांचा रेडियो घेणं आज बुवालाही तसं जड नाही. पण मला मात्र उगाचच वाटतं की आपणच तो रेडियो बुवाला द्यावा. पण माझं मन धजत नाही.

रेडियोच्या पाठीवर जोरात थाप मारून तो सुरू झाल्यावर त्याच्या मालकाला होणारा आनंद मी कशाला हिरावून घेऊ? आणि नवा रेडियो आणल्यावर मग आमचा बुवा मला मोठ्या मिश्किलीने हे तरी कसं म्हणणार,

"तात्या, तू फटका मारून बघा एकदा. नाही सुरू होणार हा रेडियो. त्याला मालकाचाच हात कळतो"!!!

--तात्या अभ्यंकर.

August 28, 2006

कधी रे येशील तू..

नमस्कार मंडळी,

'सुवासिनी' चित्रपटातील '
जीवलगा कधी रे येशील तू' http://www.musicindiaonline.com/p/x/3UXv-6v4zd.As1NMvHdW/?done_detect हे बाबुजींनी बांधलेलं आणि आशाताईंनी गायलेलं गाणं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चांगलंच परिचयाचं आहे. मंडळी, हे माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. याची कारणं म्हणजे अर्थातच या गाण्याची चाल, गदिमांचे शब्द, आणि आशाताईंसारखी समर्थ गायिका. एखादं गाणं कुणाला कसं भावेल हे काही सांगता येत नाही. मला हे गाणं आवडण्याचं प्रमूख कारण म्हणजे या गाण्याची पूर्णतः रागदारी संगीतावर आधारीत असलेली चाल! हे गाणं ऐकतांना बाबुजींच्या प्रतिभेची अक्षरशः कमाल वाटते. कारण केवळ एकाच रागात हे गाणं नसून एकूण अनेक रागांचा बाबुजींनी फार सुंदर रितीने वापर केला आहे. रागदारी संगीताने नटलेलं एक श्रीमंत गाणं, असंच या गाण्याचं वर्णन करावं लागेल. कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी याचा कंटाळा येत नाही, उलट प्रत्येकवेळी हे गाणं तेवढंच ताजं आणि टवटवीत वाटतं आणि मनाला आनंद देऊन जातं.

जाता जाता थोडीशी या गाण्यामागची चित्रपटातील situation समजून घेऊ. हे अशाकरता, की ज्या नायिकेच्या तोंडी हे गाणं आहे तिची मानसिक अवस्था कशी आहे हे समजून घेतलं तर गाणं ऐकतांना अधिक आनंद होईल. हे एक चित्रपटगीत असल्यामुळे या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. या चित्रपटाचा नायक हा सैन्यात लढाईला गेलेला असतो आणि युध्द सुरू असतांना बेपत्ता होतो. त्याचा काहीच थांगपत्ता लागत नाही त्यामुळे त्याच्या घरातली सर्व मंडळी तो मरण पावला असं समजतात. फक्त त्याची बायको तो मरण पावला आहे हे मुळीच मान्य करायला तयार नसते. तिचा नवरा एके दिवशी नक्की परत येईल असा दृढविश्वास तिला असतो. ती त्याची खूप आतुरतेने वाट पहात असते आणि याच प्रसंगावर आधारीत हे गाणं आहे.

दिवसामागून दिवस चालले,
ऋतू मागुनी ऋतू,
जीवलगा, कधी रे येशील तू!

वरती या गाण्याचा दुवा दिलेला आहेच, त्यामुळे हे गाणं आपण ऐकू शकाल, पाहू शकाल. माझे मित्र शशांक जोशी यांच्याशी एकदा याहू निरोपकावर बोलत असतांना मी त्यांना या गाण्यावर लिहायचा विचार आहे असं सांगीतलं आणि त्यांनी अत्यंत उत्साहानी मला या गाण्याचा, आणि शब्दांचा दुवा तातडीने दिला! शिवाय तू लिही, आम्हाला वाचायला नक्की आवडेल अशी दादही दिली. अशी गुणी, दाद देणारी, आणि मदत करणारी माणसं भेटली की माझ्यासारख्यांचं फावतंच! :)

असो, आपल्यापैकी अनेकांनी हे गाणं यापूर्वीही अनेकदा ऐकलं असेल, तरी पण पुन्हा एकदा आपण हे गाणं ऐकावं अशी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे. म्हणजे यातल्या रागदारी सौंदर्याबद्दल वाचतांना आपल्याला अधिक आनंद होईल असा विश्वास वाटतो. हिंदुस्थानी रागदारी संगीताच्या प्रसाराकरता आणि प्रचाराकरता हा सगळा खटाटोप.

असो, मंडळी, या गाण्यात मला जे सौंदर्य दिसलं ते मी इथे सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला तसं वाटेलच असं नाही. मी फक्त यातलं रागदारी सौंदर्य समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही शिकवणी नक्कीच नाही. पण हे गाणं ऐकतांना यातले रागदारी संगीताचे बारकावे मनाला अत्यंत आनंद देऊन जातात. तो आनंद आपल्याबरोबर share करावासा वाटला, आणि या गाण्याला भरभरून दाद द्यावीशी वाटली म्हणून हा लेख.
प्रस्तावनेनंतर आता आपण 'जीवलगा कधी रे येशील तू' या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे पाहुया. या गाण्याचं हे एक शास्त्रीय संगीताच्या दृष्टीतून केलेले एक रसग्रहण आहे असं आपण म्हणुया.

धृवपद आणि ४ कडवी असं हे गाणं आहे. हे गाणं अत्यंत प्रवाही लयीत आहे. धृवपद आणि पहिलं कडवं अर्थातच आपल्या सर्वांच्या आवडत्या यमन रागात आहे. यमन हा बाबुजींचा अत्यंत आवडता राग. अतिशय प्रसन्न राग. का बरं बाबुजींनी यमन रागाचा उपयोग केला असावा? आपण जरा विचार करूया. आधी सांगीतल्याप्रमाणे चित्रपटाच्या नायिकेचा पती हा युध्दावर गेला असतांना बेपत्ता झालेला असतो. पण तो मरण पावलेला नसून एक दिवस नक्की परत येईल असा विश्वास या नायिकेला असतो. आणि हा विश्वास इतका दृढ असतो की कुठलाही अमंगल विचार तिच्या मनांतदेखील येत नाही. उलट तिची तर ही लाडीक तक्रार आहे की 'दिवसा मागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू मागुनी ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू?' ती प्रियकराची वाट पहात आहे, तरी तिचं मन प्रसन्न आहे! (अभिनेत्री सीमा यांनी हे काम फार छान केलं आहे.) म्हणूनच यमन निवडला असेल का बाबुजींनी? 'जीवलगा' किंवा 'कधी रे' या शब्दांचं उच्चारण बघा किती प्रेमळ आणि रसीलं आहे! क्या बात है!

'धरेस भिजवूनी गेल्या धारा' मधल्या यमनचा प्रवाहीपणा बघा काय सुरेख आहे. खास करून 'भिजवुनी गेल्या धारा' मध्ये यमनची अनुक्रमे तीव्र मध्यम, शुध्द गंधार, आणि शुध्द निषाद अशी छान उतरती कमान आहे. हे तीनही शब्द बोलतानेच्या स्वरुपात आहेत. 'फुलून जाईचा सुके फुलोरा' हा अगदी स्वाभाविक यमन म्हणावा लागेल. सुके फुलोरा हे शब्द पुन्हा प्रवाही बोलतानेमध्ये बांधले आहेत! पहिल्या ओळीतील 'धारा' या शब्दात तीव्र मध्यमातून जो प्रश्न विचारला आहे, त्याचं सुंदर उत्तर दुसऱ्या ओळीतल्या 'फुलोरा' तल्या षड्जाने दिलं आहे! 'नभ धरणीशी जोडून गेले सप्तरंग सेतू' या ओळीतला "गेले' या शब्दातला प्रवाहीपणा पहा. 'सप्तरंग' हा शब्द काय सुरेख बांधला आहे पहा. अगदी र वरचा अनुस्वार देखील आपल्याला ऐकू येतो!! आणि अर्थातच सेतू तल्या तू वरची खास यमनातली उकाराची तान आपल्याला अगदी स्वाभाविकपणे 'कधी रे येशील तू' या मुखड्यावर आणून सोडते! क्या बात है!

'कधी रे येशील तू' हे शब्द गाण्याकरता आशाताईच हव्यात! आपण नेहमी ऐकतो की बाबुजी शब्दांना आणि त्यातल्या भावांना फार महत्व देतात, त्याच्या प्रत्यय 'जीवलगा, कधी रे येशील तू' ही ओळ ऐकतांना येतो. ही जरी एकच ओळ असली तरी ती ओळ बाबुजींनी 'जीवलगा' आणि 'कधी रे येशील तू' या दोन Phrases मध्ये किती चपखलपणे बांधली आहे पहा!!

झालं. आता ऋत्तू बदलला. अजून जीवलग येत नाहीये! शरद ऋतु सुरू झाला, आणि संपला देखील!
'शारद शोभा आली गेली,
रजनीगंधा फुलली सुकली'!
मंडळी, हे कडवं बाबुजींनी 'केदार' रागात बांधलं आहे. राग केदार! मंडळी, केदार म्हणजे स्वरांचा उत्सव! एक रसिला, रंगीला राग! केदारची महती मी काय वर्णावी? आपल्याला पटकन संदर्भ लागावा म्हणून इथे एक उदाहरण देत आहे. गुड्डी चित्रपटातलं 'हमको मन की शक्ती देना' हे गाणं आठवून पहा. हे सुंदर गाणं केदार रागात बांधलेलं आहे. "शारद शोभा आली गेली, रजनीगंधा फुलली सुकली'! वा वा! काय सुंदर केदार मांडला आहे इथे! 'शारद शोभा' तला शुध्द मध्यम पहा! मंडळी, शुध्द मध्यम हा स्वर म्हणजे केदारातला एक अधिकरी स्वर! संपूर्ण केदार रागात या शुध्द मध्यमाची सत्ता असते. 'आली गेली' तल्या 'गेली' तल्या ली वरचा लाडीक धैवत पहा काय गोड आणि नटखट आहे! 'रजनीगंधा फुलली सुकली' तल्या फुलली तल्या ली वरून सुकली तल्या सु वरचं मोहक मिंडकाम पहा! 'चंद्रकलेसम वाढून विरले' हा पुन्हा स्वाभाविक केदार! 'चंद्रकलेसम' च्या सुरावटीतलं केदारचं शृंगारीक अंग! क्या बात है! आणि 'वाढुन विरले' तल्या विरले मधल्या शुध्द मध्यमाचा सवाल, आणि त्याला 'अंतरीचे हेतू' चा जवाब तर केवळ लाजवाब! आणि मंडळी आता करायचं काय? गाणं तर यमन रागात सुरू झालं होतं, आणि आपण आहोत केदारमध्ये! हे कडवं पुरं होऊन पुन्हा यमनतल्या धृवपदात जायचं कसं?!! इथे बाबुजींना का मोठं म्हणायचं ते समजतं. 'अंतरीचे हेतू' तल्या तू वरची जी उकारची तान आहे ती आपल्याला अतिशय बेमालूमपणे यमन मध्ये घेऊन जाते!!! ही तान आणि तिच्या माध्यमातून केदारचा यमनात प्रवेश!! ओहोहो.. एखादी वीज चमकावी असं क्षणभर वाटतं! मला या गाण्यातली ही गोष्ट सर्वात जास्त आकर्षित करते! ही उकाराची तान जेव्हा केदार मधून यमन रागात जाते ना, तेव्हा कानांना विलक्षण सुख देऊन जाते. बरं ही तान नुसतीच यमन मध्ये घेऊन जात नाही तर लगेच तिला जोडून 'कधी रे येशील तू' मधला मुळचा यमन पुन्हा प्रस्थापित करते! मंडळी, ही गोष्ट ऐकायला किंवा वाचायला फार सोप्पी वाटते, परंतु हे एक फार मोठं सांगितीक कौशल्य आहे!!
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरीरा दुर्बळ

मंडळी आता ऋतू बदलला. शारदातली शोभा संपली. 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ बाबुजींनी सोहनी रागात बांधलेली आहे. मंडळी, सोहनी हा एक स्वतंत्र प्रस्थ असलेला राग आहे. एक विलक्षण आस असलेला हा राग आहे. मारवा थाटातला असल्यामुळे एक अनामिक हुरहूर सतत या रागात जाणवते. आपण वसंतरावांनी गायलेलं अभिषेकीबुवांचं 'सुरत पिया किन छिन बिसराई' हे गाणं ऐकून पहा! (अर्थात हे संपूर्ण गाणं सोहनी, मालकंस, आणि केदार या रागात आहे.) यातल्या 'हर हर दम उनकी याद आयी' या ओळीतली जी हुरहूर आहे ना तीच तर नाही ना 'हेमंती तर नुरली हिरवळ' या ओळीत? पहा बरं आपणच तपासून! :) किंवा मोगल ए आजम मधलं बडे गुलामअलीखासाहेबांचं 'प्रेम जोगन बन' ऐकून पहा बरं! ओहोहो! दिलिपकुमार आणि मधुबालेचा प्रणय, आणि पार्श्वभूमीवर खासाहेबांच्या लोचदार गायकीतला हा सोहनी!! किंवा कुमारजींचं 'रंग ना डारो शामजी' हे ऐकून पहा. मी वर म्हटल्याप्रमाणे एक अनामिक हुरहूर सतत जाणवते या रागात. तसं म्हटलं तर शृंगाररसही आहे आणि त्याच्या पूर्ततेकरताची लागलेली एक हुरहूर. तीही आहे! असं अजब रसायन असलेला हा राग आहे! 'हेमंती तर नुरली हिरवळ' ही ओळ सोहनी मध्ये बांधतांना बाबुजींना हेच तर नसेल ना सांगायचे? 'शिशीर करी या शरीरा दुर्बळ'! मंडळी, हे अर्थातच 'हेमंती तर नुरली हिरवळ' या सोहनीला उत्तर आहे. हा सोहनी नाही. कारण या ओळीतलं 'या' हे अक्षर पंचमावर आहे आणि पंचम हा स्वर सोहनीत वर्ज्य आहे. मग या ओळीतली सुरावट काय सांगते? पुरियाधनाश्री? त्याचं नक्की स्वरूप स्पष्ट होत नाही. मग आता पुढे काय? सोहनी तर नाही. मग आता कोण? हेमंतातली नुरलेली हिरवळ, शिशीरातली कडाक्याची थंडी, सोहनीमुळे झालेलं एक आतूर, अस्वस्थ वातावरण! जीवलग तर येत नाहीये! मंडळी, याचं उत्तर आपल्याला पुढच्या ओळीत मिळतं!!

'पुन्हा वसंती डोलू लागे,
प्रेमांकित केतू'!!
काय, मिळालं का उत्तर? :)

अहो हा आपल्या सगळ्यांचा लाडका बसंत!
झाली की नाही मगासची शिशीरातली सगळी हुरहूर, आतुरता क्षणांत दूर?! अहो, बसंत रागच तसा आहे! बसंत म्हणजे उत्साह, एक नवी उमेद. बसंत राग म्हणजे वैभव! वसंत ऋतूत सगळा निसर्गच अक्षरशः गात असतो!! बाबुजींनी 'पुन्हा' या शब्दात शुध्द मध्यमाचा अत्यंत प्रभावी उपयोग करून, 'पुन्हा वसंती' या शब्दद्वयाद्वारे गाणं एका क्षणात बसंत रागात नेलं आहे! मंडळी, आशाताईंनी गायलेला 'डोलू लागे' हे शब्द आपण नीट ऐका. एवढा काळ लोटूनसुध्दा त्या नायिकेचाचा नवरा युध्दावरून नक्की परत येणारच अशी जी खात्री तिला आहे ना, ती खात्री, ती आशा या 'डोलू लागे' या दोन शब्दात स्पष्ट दिसते!! पुढच्या 'प्रेमांकित केतू' तल्या 'प्रेमांकित' या शब्दाने बसंत पूर्ण झाला आहे आणि 'केतू' तल्या 'तू' वरून गाडी पुन्हा 'जीवलगा कधी रे येशील तू' या ध्रुवपदातल्या यमनच्या मूळ साम्राज्यात!! 'पुन्हा वसंती डोलू लागे, प्रेमांकित केतू', 'जीवलगा कधी रे येशील तू' नीट ऐका मंडळी, गाडीने कुठे फाटा बदलला तो!! :)
पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली,
मेघावली नभी पुनरपी आली,
पुनश्च वर्षा लागे अमृत,
विरहावर ओतू

वसंतपण संपला आणि ग्रीष्मातील काहिली सुरू झाली! ग्रीष्मही रखरखीतच गेला, पण जीवलग अजून काही आला नाही. आता ग्रीष्मही संपत आला, आणि हे दाखवण्याकरता बाबुजींनी'पुनरपी ग्रीष्मी तीच काहिली' ही ओळ मिया मल्हारात बांधली आहे! 'पुनरपी ग्रीष्मी' या थोड्याश्या अवखळ मल्हारच्या सवालाला बाबुजींनी 'तीच काहिली' च्या सुरावटीतून मल्हारातूनच तेवढंच वजनदार उत्तर दिलं आहे! खास करून काहिली या शब्दाचं वजन पहा! क्या बात है!! 'मेघावली नभी पुनरपी आली'!! मंडळी, ही ओळ नीट ऐका. बाबुजींनी छान चढत्या क्रमाने, आरोही अंगाच्या मल्हाराचे फार सुरेख रूप या ओळीत दाखवले आहे! 'मेघावली नभी' हे दोन शब्द छानपणे सप्तकाच्या पूर्वांगात आहेत, आणि 'पुनरपी आली' हे दोन शब्द उत्तरांगात! बोलबोलता अंधारून येतं आणि हळुहळू पाऊस सुरू होऊन काही वेळातच चांगलाच जोर धरतो असं वाटतं की नाही? मंडळी, हीच तर ताकद आहे मल्हारची! 'पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू'! आहाहा! गाणं गेलं की हो संपूर्णपणे मल्हारच्या ताब्यात!! :) 'पुनश्च वर्षा लागे' ची सुरावट ऐकतांना धो धो पाऊस सुरू आहे आणि त्यातच मधूनच एखादी कडाडून वीज चमकावी असं वाटतं की नाही? आणि 'लागे अमृत' हे शब्द थोड्याश्या विलंबानेच, अवकाशानेच उच्चारले आहेत, त्यामुळे संपूर्ण आसमंतात दूरदूरपर्यंत सुसाट पाऊस सुरू आहे, असा परिणाम त्यातून बाबुजींनी साधला आहे! क्या बात है!'विरहावर ओतू' तल्या 'वर' या शब्दातून आपण पुन्हा अत्यंत चपखलपणे मूळच्या यमनमध्ये जातो! येथे आपण असं म्हणू शकतो की 'पुनश्च वर्षा लागे अमृत' या मल्हाराच्या सवालाला 'विरहावर ओतू, जीवलगा कधी रे येशिल तू' हे यमनचं फार सुरेख उत्तर बाबुजींनी दिलं आहे!!!

असो! मंडळी काय आणि किती लिहू या गाण्यावर? माझ्या परिने मी या गाण्याच्या शास्त्रीय अंगाकडे बघायचा प्रयत्न केला आहे. जो आनंद हे गाणं ऐकतांना मला स्वतःला झाला तो मी आपल्याला सांगायचा हा एक प्रयत्न केला आहे. जे काही चुकलं असेल तर ते माझं, आणि जे काही चांगलं लिहीलं असेल ते माझ्या बाबुजींचं!!

वास्तवीक, हे एक तीन-चार मिनिटात संपणारं गाणं, पण काय काय सांगीतलं आहे त्यात बाबुजींनी इतक्या थोड्या अवधीत?! खरंच कमाल वाटते!! गदिमांच्या शब्दांची जादू केवळ अवर्णनीय! आणि आशाताई? जाऊ दे मंडळी. त्यांच्याबद्दल मी काय बोलू?!!

मंडळी, साधारण १०-११ वर्षांपुर्वी मी याच गाण्याच्या संदर्भात अशाच अर्थाचं एक विस्तृत पत्र बाबुजींना पाठवलं होतं. तेव्हा बाबुजींनी "अरे तू किती छान विचार केला आहेस या गाण्यावर! तुझी अशीच चांगली प्रगती होऊ दे", असा असा आशिर्वाद दिला होता! "तुझं पत्र वाचून खूप बरं वाटलं, आणि मी तुझं हे पत्र जपून ठेवणार आहे", असंही म्हणाले होते!!

असेल का हो अजूनही माझं पत्र बाबुजींच्या घरी?!!

--तात्या अभ्यंकर.

साधना कोळीण..

राम राम मंडळी,

मी आयुष्यात प्रथमच आमच्या ठाण्याच्या मासळी बाजारात उभा होतो. तसा मी नावाला जन्माने ब्राह्मण. पण लहानपणापासूनच जिभेला मासळीची चव लागलेली!, त्यामुळे खाण्याची आणि करून पाहण्याची आवड. मासळी कशी करावी हे शिकण्याकरता २-४ चांगले गुरू केले. त्यांच्या हाताखाली ट्रेनिंग घेतलं. माझी लतामामी ही माझी प्रथम गुरू. ती मासळीचा स्वयंपाक फार सुरेख करते. तिच्या कडून संथा घेतली, दीक्षा घेतली. २-४ मालवणी पाककृतींची पुस्तके उलथी-पालथी घातली. आणि आता एकदा घरीच मच्छी करून पहावी या विचाराप्रत आलो. हातात पिशवी घेतली आणि एका भल्या रविवारी सकाळी बाजारात पोहोचलो. अभ्यंकर कुलोत्पन्न एका कोकणस्थ ब्राह्मणाने प्रथमच मासळी बाजारात पाऊल टाकलं. च्यामारी काय पण पराक्रम!! :)

बाजारात ही गर्दी! सगळा कोलाहल. सगळ्या कोळणी आपापल्या गिऱ्हाईकांना मच्छी विकत होत्या, भावावरून वाद घालत होत्या. माझा चेहरा चांगलाच कावराबावरा झाला होता. काय करावं? इथूनच परत जावं की काय असा एक विचार माझ्या मनांत आला.

पण तेवढ्यात, "ए भाऊऽऽऽ, काय पाहिजे रे? पापलेट घेऊन जा. मस्त खापरी पापलेट आहे" अशी जोरदार हाक ऐकू आली. मी दचकून बघितलं तर एक गोरी-गोमटी, देखणी, ठसठशीत कोळीण मला हाक मारत होती. मी भांबावलेल्या अवस्थेतच तिच्या पाटीपाशी गेलो आणि आमचा संवाद सुरू झाला.
"काय पाहिजे रे भाऊ" (मी या कोळणींचं एक बघितलं आहे. बाजारात त्या कुणालाही अहो-जाहो करण्याच्या भानगडीत पडत नाहीत!)मग मात्र मी वर्षानुवर्षे मासळी खाणारा कोणी गुप्ते, राऊत, राजे (छायाताई, माफ करा हं! :) असल्याचा चेहऱ्यावर आव आणला आणि तिला विचारलं,"कसं दिलंस पापलेट?""८० रुपये जोडी बघ. तुला जास्त भाव नाय सांगणार"(आवाजात सुरवातीपासूनच खास कोळीण टाइप भांडण्याचा आव!!) ८० रुपये??? (हे आपलं उगाच हं! च्यामारी मला कुठे माहीत होता खरा भाव!)"अरे १०० चा भाव तुला ८० सांगितला. बाजार किती ताजा आहे बघ!" असं म्हणून तिने एक पापलेट माझ्या हातात दिलंन!

झालं! आणि नेमकं इथे आमचं ब्राह्मण्य उघडं पडलं! मी पापलेट त्यापूर्वीही खात होतो, पण असा भर मासळी बाजारात एका कोळणीसमोर उभा राहून मासळी किती ताजी आहे हे कधी बघितलं नव्हतं. बरं पापलेट ताजं आहे की नाही हे कसं बघायचं हेही मला माहीत नव्हतं. नुसती पुस्तकं वाचून विद्या येत नाही असं म्हणतात हेच खरं. त्याकरता प्रॅक्टिकलच पाहिजे!! आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात, "विशारद होणं, अलंकार होणं, समीक्षा करणं खूप सोप्प आहे. दोन तंबोऱ्यामध्ये बसून १०० लोकांसमोर १० मिनिटं सुरेखसा यमन गाऊन दाखवणं कठीण आहे!!"असो.

झालं! त्या पापलेटला ताजं आहे का हे पाहण्याकरता मी थरथरत हात लावला. मगासचे गुप्ते, राजे, राऊत माझी साथ सोडून केव्हाच निघून गेले होते. (हे म्हणजे एखादा हुशार मुलगा खिडकीबाहेर माझ्याकरता उभा राहणार असा आधी दिलासा , आणि प्रत्यक्ष पेपर हातात पडल्यावर खिडकीतून वर्गाबाहेर बघतो तर तो हुशार विद्यार्थीच गायब! असंच झालं की हो! :)

बर्फात ठेवलेलं ते गारेगार पापलेट माझ्या हाती आलं. चेहऱ्यावर आणलेला मगासचा उसना आव झपाट्याने उतरत होता. हे नेमकं त्या चतुर कोळणीच्या लक्षात आलं. तिने मिष्किलपणे पटकन मला म्हटलं,

"भट दिसतोस की रे तू!!"

साधनाच्या ह्या बोलण्याने मी चांगलाच वरमलो. सगळा बाजारच खो खो हसत माझ्याकडे पहात आहे असंच मला क्षणभर वाटलं. तेवढ्यात साधना म्हणाली,"अरे ऐक माझं. ताजा बाजार आहे. भटाला नाय फसवणार मी. आई एकविरे शप्पथ! पण काय रे, तू तर भट, मग हा बाजार बनवणार कोण?" मी पुन्हा एकदा, "अं? काय? मीच बनवणार" असं काहीसं पुटपुटलो आणि तिथून काढता पाय घेतला. साधना पुन्हा एकदा माझ्याकडे पहात मनसोक्त हसत होती. तिला काय गंमत वाटत होती कोण जाणे!"

त्यानंतर मी अनेक वेळा त्या बाजारात गेलो. बाजारात मला आलेला पाहिला रे पाहिला की साधना जवळजवळ ओरडतेच! "आला गंऽऽ बाई माझा भट!" :)

त्यानंतर मी तिलाच माझा गुरू केलं. तिनेच मला पापलेट, सुरमई, मांदेली, कोलंबी, कर्ली, बोंबील, हलवा, अशी वेगवेगळ्या प्रकारची मासळी ताजी कशी असते, काय बघून घ्यायचं, हे सगळं शिकवलं.
आमच्या घरी, कुटुंबात, नातेवाईकांत सगळे एक बंडखोर कोकणस्थ म्हणून मला ओळखतात. बहुतेक बुधवार, रविवार मला मासळी लागते. त्यामुळे मासळीबाजारात आठवड्याच्या दोन फेऱ्या तरी होतातच. आई तर नेहमी मला म्हणते, "तू एखादी कोळीणच बघ, आणि तिच्याशीच लग्न कर!" पण नको रे बाबा तो प्रसंग. सासू कोकणस्थ आणि सून कोळीण! म्हणजे मधल्या मध्ये माझी हालत काही विचारायलाच नको! ;) असो..

एकदा माझ्याबरोबर माझा एक मित्र बाजारात आला होता. त्यानेही ती, "आला गंऽऽ बाई माझा भट" ची आरोळी ऐकलीन, आणि गधडा सगळीकडे सांगत सुटला. माझी आई आणि इतर नातेवाईक मला म्हणतात, "काय रे हे? तुला शरम वाटत नाही का रे? भर मासळी बाजारात तुला पाहून, "आला गंऽऽ बाई माझा भट" असं एक कोळीण चारचौघात ओरडते! कोकणस्थ जातीला अगदीच काळिमा आहेस तू" वगैरे वगैरे ! पण आपण साला कोणाची पर्वा नाय करत. का माहीत नाही, पण साधनाला माझ्याबद्दल आणि मला साधनेबद्दल एक विलक्षण आत्मीयता वाटते. त्यामागे माझं 'मासळीप्रेम' हेच कारण असावं. आणि तिच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं तर, 'एक गोलमटोल भट आपल्याकडे मासळी घ्यायला येतो' याचंच तिला कौतुक वाटत असणार! काहीही असो, आम्हा भावा-बहीणीचे कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध होते हे तपासून पहायची मला कधी गरजच वाटली नाही.

एके दिवशी अचानक ही साधना मला तिच्या घोवाबरोबर ठाण्याच्या खाडी पुलावर भेटली. झालं असं की, नारळी पुनवेचा दिवस होता. कोळी लोकांत या दिवसाचे फार महत्त्व. समिंदराला सोन्याचा नारळ अर्पण करून त्याला शांत करायचा आणि पुन्हा बोटी दर्यात नेऊन मच्छीमारीच्या नव्या शिजनला सुरवात करायची, असा हा दिवस. जिथे जिथे समुद्र, खाडी असते तिथे तिथे या दिवशी हे कोळी लोक गर्दी करतात आणि उत्सव साजरा करतात. आम्ही दोघं-तिघं मित्र असेच भटकत भटकत ती मजा पहायला खाडीवर गेलो होतो. तिथे मला साधना आणि तिचा नवरा असे दोघे भेटले. साधनाने माझी तिच्या नवऱ्याशी, महेन्द्रशी ओळख करून दिली.

हा महेंद्र मला अगदीच साधासुधा माणूस वाटला. चेहऱ्यावर एक मिश्किल शांत भाव, थोडासा अबोल, असा काहीसा महेंद्र होता. मला तो पाहताचक्षणी आवडला. साधना महेंद्रला म्हणाली, "बरं का, हा भट आहे. पण नेहमी येतो बाजारात. आपल्याकडनंच मच्छी नेतो."

मंडळी, हा महेंद्र इतका साधा दिसत होता की पटकन त्याच्याशी काय बोलावं हेच मला कळेना. मी आपला त्याच्याशी रीतसर हात मिळवला. महेंद्रलाही माझ्याशी काय बोलावं ते कळेना. पण आमची साधना मात्र एकदम बिनधास्त आणि फटकळ बाई. ती महेंद्रच्याच अंगावर ओरडली. "अहो असे बघत काय उभे राहिलात? आज संध्याकाळी त्याला बोलवा ना आपल्या घरी तीर्थप्रसादाला. काय रे भटा, संध्याकाळी घरी पूजा आहे. येशील ना? आम्ही महागिरी कोळीवाड्यात राहतो. 'महेंद्र गॅरेज' म्हणून कोणलापण विचार."

झालं! संध्याकाळच्या सुमारास मी किंचित बिचकतच महागिरी कोळीवाड्यात शिरलो. 'महेंद्र गॅरेज' आणि त्यामागेच असलेलं साधनाचं बैठं घर शोधून काढणं मला अवघड गेलं नाही. साधनाच्या घराबाहेर विळे-कोयते, मासळीच्या मोठमोठ्या टोपल्या ठेवल्या होत्या. लाईनीत दहा-बारा बैठी घरं होती. सगळी कोळ्यांचीच. साधनाने मला दारात उभं असलेलं पाहिलं आणि म्हणाली, "ये भटा ये. आलास, खूप बरं वाटलं".

साधनाचं घर लहानसंच, परंतु अत्यंत टापटीप होतं. एक तर नारळीपुनवेचा, सणाचा दिवस. त्यातून घरात सत्यनारायणाची पूजा. त्यामुळे पाहुण्यांची, शेजारा-पाजाऱ्यांची बरीच वर्दळ दिसत होती. बहुतेक सगळी मंडळी कोळीच दिसत होती. काही जण दर्शन घेत होते, काही जण जेवत होते, असा सगळा ऐसपैस कारभार सुरू होता. माझ्या शेजारीच घट्ट नऊवारी साडीतल्या दोन म्हाताऱ्या कोळणी बसल्या होत्या. त्यातल्या एकीने उगाचच माझ्या पाठीवरून हात फिरवत, "बरा आहेस ना बाबा?" अशी चौकशी केली. ओळख ना पाळख, ही कोण बया बरं? नंतर कळलं की ती साधनाची आई होती!

टेपरेकॉर्डरवर मोठ्याने 'ये ढंगार टकार, ढंगार टकार' अशी खास कोळीगीतं लागली होती. कधी 'बिलानशी नागीन', तर 'कधी आठशे खिडक्या नऊशे दारं', तर कधी 'चालला माझा घो दर्यावरी' तर कधी 'घ्या हो, घ्या हो ताजं म्हावरं', 'आई तुझं मलवली टेसन गो' अशी एकापेक्षा एक उत्साहवर्धक गाणी सुरू होती. येणारा-जाणारा प्रत्येकजण माझ्याकडे जरा नवलाईनेच बघत होता. 'हा कोण बरं? हा कोळी तर दिसत नाही. हा इथे कसा?' असे प्रश्नार्थक भाव बऱ्याच मंडळींच्या चेहऱ्यावर होते.

मग मी जरा वेळ महेंद्रशी गप्पा मारल्या. रोज भल्या पहाटे उठून भाऊच्या धक्क्यावरून घाऊक बाजारातून मासळी आणण्याचं काम महेंद्र करतो. पुढे त्याची सगळी उस्तवार, बाजारत नेणे, विक्री करणे ही कामं साधना आणि सोना (महेंद्रची बहीण) या करतात. एकदा मुख्य बाजारातून माल आणला की महेंद्र पुन्हा त्यात लक्ष देत नाही. उरलेला वेळ तो घराबाहेरच असलेलं दुचाकीचं गॅरेज सांभाळतो. साधनाला ३ मुलं. सर्वात मोठा आता आठवीत आहे.

जरा वेळ बसून मग मी सत्यनारायणाचं दर्शन घेतलं, आणि साधनाने जेवायचा आग्रह केला. मी कुठलेही आढेवेढे न घेता तिथेच एक चटई मांडली होती, त्यावर जेवायला बसलो. सत्यनारायणाची पूजा असल्याने शाकाहारीच बेत होता. साधा वरण-भात, बटाट्याची भाजी, पुऱ्या, गोडाचा शिरा (प्रसाद) असा सुरेख स्वयंपाक साधनाने केला होता. ती आणि महेंद्र या दोघांनी मला अगदी आग्रह करून जेवायला वाढलं. मला ते जेवण अमृताहुनी गोड लागलं!

मंडळी, असं म्हणतात की ज्या घरी आलेल्या पाहुण्याला जेव्हा पती-पत्नी दोघे जोडीने जेवायला वाढतात, आग्रह करतात ते घर अत्यंत सुखी समजावं! आमच्या साधनेचं भरलेलं घरदेखील सुदैव सुखी रहावं हीच त्या एकविरा आईपाशी प्रार्थना!

आता पुन्हा बाजारात जाईन, आणि साधना पुन्हा एकदा प्रसन्न चेहऱ्याने ओरडेल,
"आला गंऽऽ बाई माझा भट'! ;)

--तात्या कोळी.

बसंतचं लग्न..१० (तोडी)

बसंतच्या लग्नाच्या स्वरोत्सवाचा आज दहावा भाग! आपल्या सर्वांच्या सहकार्याने येथपर्यंत येऊ शकलो याचा आनंद वाटतो. या दहाही भागातलं जे काही चुकलेलं असेल तर ते माझं, आणि जे काही बरं, चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं अशीच माझी भावना आहे. ही लेखमाला म्हणजे भीमसेनअण्णा आणि बाबूजी यांचीच पुण्याई, असं मी मानतो.

आजपर्यंत बसंतच्या लग्नात आपण ९ राग पाहिले. आज कोण येणार आहे बरं? मंडळी, आज एक खूप खूप मोठा पाहुणा आपल्या बसंतला आशीर्वाद द्यायला येणार आहे. अगदी 'झाले बहु,....परंतु यासम हा' असं म्हणावं, अशीच या पाहुण्याची थोरवी आहे!
मांडवाच्या बाहेर नुकताच एक रथ येऊन थांबला आहे. मांडवात क्षणभर एकदम स्तब्धता पसरली आहे. मांडवातली बरीचशी रागमंडळी रथातून आलेल्या रागाला अगदी अदबीने उतरवून घ्यायला आली आहेत. का बरं अशी स्तब्धता, एवढी अदब? कुठला बरं राग उतरत आहे त्या रथातून? मंडळी, त्या रागाचं नांव आहे 'तोडी'!

तोडीची पुण्याईच मोठी!

राग तोडी! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक दिग्गज राग. ऐकणाराची अगदी समाधी लागावी असा. या रागाला माझ्यामते एक 'माईलस्टोन राग' असंच म्हणावं लागेल. विलक्षण स्वरसामर्थ्य अंगीभूत असलेला एक करूणरसप्रधान राग. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे लहानसे ध्वनिमुद्रण ऐकावे.

आज मी तोडीच्या स्वभावाबद्दल/व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडं बोलणार आहे. तोडीच्या स्वरांत काय विलक्षण ताकद आहे हे माहीत नाही, पण ते ऐकताच मनुष्य एकदम स्तब्धच होतो. अंतर्मुख होतो. मंडळी, तोडीचा विलंबित ख्याल ऐकताना नेहमी अज्ञात असं एक व्यक्तिमत्त्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन मी आज करणार आहे. तोडी या रागाबद्दल मला जे काही सांगायचं आहे ते या वर्णनातूनच सांगायचा प्रयत्न मी करणार आहे. कशी आहे ही तोडी नांवाची व्यक्ती?

आयुष्यभर अनेक टक्केटोमणे, खस्ता खाल्लेली ही व्यक्ती आहे. या व्यक्तीकडे नुसतं पाहूनच आयुष्यात हिने काय काय भोगलं आहे याची कल्पना यावी. पण मंडळी, काही वेळेला आयुष्याचे भोग भोगता भोगताच बरेच जण कोलमडतात, दुर्दैवाने शेवटपर्यंत निभावून नेऊ शकत नाहीत. पण मला तोडीत दिसणारी व्यक्ती तशी नाही. अनेक वादळं पचवून ही व्यक्ती तेवढ्याच स्वाभिमानाने अगदी खंबीरपणे उभी आहे. आणि म्हणूनच ती मला मोठी आहे. मंडळी, परिस्थितीमुळे काही काही व्यक्तींना दिवसेंदिवस उपाशी रहावं लागतं. पण त्या कधी कोणापुढे लाचारीचा हात पसरत नाहीत. ध्येयापासून न ढळता यांची तपश्चर्या सुरूच असते. या तपश्चर्येतूनच स्वाभिमानाचं, कर्तृत्वाचं असं एक तेज यांच्या चेहऱ्यावर झळकतं. मंडळी, तोडी रागाच्या व्यक्तिमत्त्वात (खास करून पंचमात!) असंच एक तेज मला नेहमी दिसतं. त्या तेजाला कर्तृत्वाचा गर्व नाही, उलट गतआयुष्यातल्या कारुण्याची, भोगलेल्या हाल-अपेष्टांची एक झालर आहे! मंडळी, मला तरी तोडी हा राग नेहमी असाच दिसला, असाच भावला. प्रत्येकाला तो तसाच दिसावा असा आग्रह मी तरी का करू? शेवटी गाणं ही प्रत्येकाने स्वतः अनुभवायची गोष्ट आहे हेच खरं!

बिलासखानी, गुजरी-गुर्जरी, भूपाली, ही तोडीची काही नातलग मंडळी. ही सर्वच मंडळी फार सुरेख आहेत. यावर पुन्हा कधीतरी विस्तृतपणे लिहायचा प्रयत्न करेन. आपण आज बोलतोय ते 'मिया की तोडी' याबद्दल. उत्तर हिंदुस्थानात हिला काही ठिकाणी 'पंचमवाली तोडी' असंही गाण्यातल्या बोलीभाषेत म्हटलं जातं. बाकी हिचा इतिहास काय, उगम काय, पुस्तकात हिला काय म्हणतात ते मला माहीत नाही.

सुरश्री केसरबाई केरकर! जयपूर घराण्याच्या एक समर्थ गायिका. विलंबित त्रितालाचा भारीभक्कम दमसास, गोळीबंद आवाज, आणि निकोप तान या केसरबाईंच्या गाण्यातील खासियती. अगदी ऐकत रहावं असं बाईंचं गाणं! त्यांनी गायलेला तोडी रागाचा एक तुकडा येथे ऐका. किती सुरेख आहे पहा हा तोडी. बाईंनी मध्यलयीतील बंदिश काय सुरेख धरून ठेवली आहे! क्या बात है..

भारावलेलं वातावरण. वडिलांच्या इच्छेप्रमाणे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम वनवासात निघाले आहेत. अवघी अयोध्या शोकाकुल झाली आहे, आणि गदिमांची लेखणी लिहू लागली आहे,

राम चालले तो तर सत्पथ,
थांब सुमंता, थांबवी रे रथ.

थांबा रामा, थांब जानकी,
चरणधूळ द्या धरू मस्तकी,
काय घडे हे आज अकल्पित?
थांब सुमंता, थांबवी रे रथ.

मंडळी, बाबूजींसारख्या प्रतिभावंताला त्या अयोध्येच्या शोकाकुल, भारावलेल्या वातावरणात जे दिसलं ना, त्यालाच तोडी म्हणतात!

सवाईगंधर्व संगीतमहोत्सव. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक मानाचं पान! तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. सकाळची वेळ आहे. पुण्याच्या रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलचं पटांगण दहा-बारा हजार श्रोत्यांनी तुडुंब भरलं आहे. तीन दिवस चाललेल्या गानयज्ञाची सांगता करण्यास मंचावर स्वरभास्कर पं भीमसेन जोशी सिद्ध आहेत.

विलंबित आलापी संपवून अण्णांनी तोडीची मध्यलयीतली बंदिश सुरू केली आहे, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत साऱ्या त्रिखंडाकरता शुभ, आणि मंगलदायी ठरत आहे!
--तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..९ (मुलतानी)

राम राम मंडळी,
आज आपण बसंतच्या लग्नात 'मुलतानी' या रागाबद्दल बोलणार आहोत. मंडळी मुलतानी हा आपल्या संगीतातला एक अत्यंत भारदस्त राग. मला तर या रागाला "Rich' या शिवाय दुसरा शब्दच सुचत नाही. मुलतानी तो मुलतानी! पण मंडळी, हा नुसताच Rich नाही तर मला तो थोडासा अद्भुतही वाटतो. अगदी सुरवातीपासूनच यातल्या स्वरांचं वजन आणि त्याचा भारदस्तपणा मनाचा ताबा घेतो. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे ध्वनिमुद्रण ऐका.
"नैनमे आनबान कोनसी परी रे"
ही मुलतानीतली पारंपारिक बंदीश सौ श्रुती सडोलीकरांनी गायली आहे. त्यांनी मध्यलय एकतालात काय मस्त जमवली पहा ही बंदिश! काय पण स्वरांचं आणि लयीचं वजन! क्या बात है.. तीव्र मध्यम, मगरेसा, धप इत्यादी संगती काय सुरेख वाटतात!

या रागाशी आपला अजून परिचय व्हावा म्हणून दिनानाथरावांचं हे पद ऐका. 'प्रेम सेवा शरण' हे झपतालातलं विलक्षण ताकदीचं मुलतानीतलं पद आहे हे. यात फक्त एके ठिकाणी शुद्ध धैवत लावला आहे. पण सध्या आपण पहिल्या दोन ओळींकडे लक्ष देऊ. मंडळी, या पदातल्या मुलतानीच्या स्वरांचं वजन पाहूनच भारावून जायला होतं! 'सहज जिंकी मना' ही ओळ ऐका. काय सुरेख मुलतानी दिसतो या ओळीत. 'सहज' या शब्दातला निषाद हा खास मुलतानीचा निषाद. अगदी आमच्या अण्णांच्या तंबोऱ्यातला!! आहाहा..

हे पद मूळ भीमपलास या रागातलं. त्यातही हे पद अतिशय सुरेखच वाटतं. करीमखासाहेब हे पद भीमपलासातच फार सुरेख गात असत. पण मुलतानी या रागाने दिनानाथरावांवर अशी काही भुरळ घातली की त्यांनी हे पद मुलतानीत अत्यंत समर्थपणे बांधलं. पण क्या बात है, त्यामुळे श्रोत्यांची मात्र चंगळच झाली की हो! त्यांना भीमपलासातला प्रासादिकपणा, सोज्वळपणा आणि मुलतानीतला भारदस्तपणा हे दोन्ही अनुभवायला मिळालं!

'तरून जो जाईल सिंधू महान
असा हा एकच श्री हनुमान'

ओहोहो, क्या बात है! बाबुजींनी गीतरामायणातलं हे गाणं बांधताना मुलतानीचा फार सुरेख उपयोग केला आहे. हनुमानाचं वर्णन करायला हाच राग हवा हो! हनुमानाइतकाच अद्भुत! एकेका कडव्यातून यातला मुलतानी आपल्याला अधिकाधिक सुंदर दिसू लागतो.
बरं का मंडळी, या गाण्यातलं,
'शस्त्र न छेदील या समरांगणी,
विष्णुवराने इच्छामरणी,
ज्याच्या तेजे दिपे दिनमणी,
चिरतर आयुष्मान,
असा हा एकच श्री हनुमान..'

हे वर्णन रागदारी संगीताचा विचार केल्यास जसंच्या तसं आमच्या मुलतानीलाही लागू आहे हो. खरंच अत्यंत तेजस्वी राग. अगदी हनुमानाइतकाच! हा राग मैफलीचा एकदम ताबाच घेतो आणि अशी काही हवा करून टाकतो की क्या बात है!
या रागातल्या दोन स्वरांमधलं अंतरदेखील अत्यंत पारदर्शक आणि देखणं आहे. इतर रागांच्या तुलनेत हा राग गायलादेखील जरा कठीणच आहे. हा खास रियाजाचा, समाधीचा राग आहे. हा राग गाताना अगदी भल्या भल्या गायकांचा कस लागतो. मुलतानीला प्रसन्न करायचं म्हणजे महामुश्किल काम. पण एकदा का जमला की मात्र मुलतानी असा काही चढतो! आहाहा. भन्नाट जमलेल्या मुलतानीच्या ख्यालाची मैफल म्हणजे या पृथ्वीतलावावरील मैफलच नव्हे ती. मंडळी, एकूणच हा एक मस्तीभरा, चैनदार राग आहे. जमला तर याच्यासारखा दुसरा कोण नाही. दुपारी यथास्थित बासुंदी-पुरीचं जेवण, त्यानंतर ताणून झोप आणि पाचच्या सुमारास दोन तंबोऱ्यात जमलेला सुरेल मुलतानी. अजून काय पाहिजे आयुष्यात?!

बसंतच्या लग्नाच्या मंडपात याची शान आणि रुबाब काय विचारता मंडळी! सगळेजण त्याच्याकडे नवलाईनेच पहात आहेत. आपल्या बसंतला आनंदाचं कोण भरतं आलं आहे. मुलतानीनेही बसंताची उराउरी भेट घेतली आहे आणि आपल्याच मस्तीत मोठ्या ऐटीने मंडपात सोफ्यावर दरबारी, मालकंसाच्या शेजारी विराजमान झाला आहे. "हम जानते है के हम मुलतानी है!" अशी मिष्किली चेहऱ्यावर ठेवून!

कर्नाटकातल्या गदग गावचा भीमसेन जोशी नांवाचा एक मुलगा उठतो, गुरूगृही जातो, आणि सकाळी तोडी, दुपारी मुलतानी, आणि संध्याकाळी पुरिया या तीन रागांवर अक्षरशः भीमसेनी मेहनत करतो, आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी होतो! ऐका मंडळी, अण्णांचा मुलतानी इथे ऐका आणि धन्य व्हा!
--तात्या अभ्यंकर.

August 27, 2006

बसंतचं लग्न..८ (भीमपलास)

बसंताच्या लग्नाची धामधूम मंडपात सुरू आहे. आतापर्यंत भले भले राग आपल्या बसंतला आशिर्वाद, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. आणीही काही राग येत आहेत, येणार आहेत. हिंदुस्थानी रागसंगीताची एक मांदियाळीच आहे ही!.
एक राग मात्र कौतुकाने बसंतच्या लग्नाची ही सगळी लगबग पहात उभा आहे. फार गोड राग आहे तो. वा! काय प्रसन्न मुद्रा आहे त्याची! मंडळी, काही काही माणसं अशी असतात, की त्यांना कधी रागावताच येत नाही. त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल फक्त कौतुक आणि कौतुकच भरलेलं असतं. तसाच हा राग आहे. कोण आहे बरं हा?

मंडळी हा आहे राग भीमपलास..!!

भीमपलास म्हणजे सात्त्विकता. मी काय वर्णावी भीमपलासची गोडी! आपला भीमपलासशी पटकन परिचय व्हावा म्हणून हे एक लहानसं क्लिपींग ऐका.

"बीरज मे धूम मचावत कान्हा
कैसे के सखी जाऊ अपने धाम"
ही भीमपलासातील पारंपारिक बंदिश आपल्याला ऐकायला मिळेल. कान्ह्याने आपल्या लीलांनी एवढी धूम मचावून ठेवली आहे की घरी कसं जायचं हा प्रश्न गोपींना पडला आहे. कधी वाट रोखून तो खोड्या काढील, हे काही सांगता यायचे नाही. पण मंडळी, खरं पाहता या गोपींची ही तक्रार काही खरी नाही. त्यांना खरं तर कान्ह्याने खोडी काढलेली हवीच आहे. त्यांची आंतरिक इच्छा तीच आहे. ही आंतरिक इच्छा म्हणजेच भीमपलास..!
मंडळी, काय काय सांगू भीमपलासाबद्दल? कसा आहे भीमपलासचा स्वभाव? अत्यंत सात्त्विक, प्रसन्न. मला तर भीमपलास म्हटलं की शनिवारचा उपास, साबुदाण्याची खिचडी, गरम मसाला दूध, आणि छानसा बर्फीचा तुकडा या गोष्टी आठवतात..!
आपण आजपर्यंत बसंतच्या लग्नात अनेक राग पाहिले. गोडवा, प्रसन्नपणा हा यातील प्रत्येकाचा स्थायीभाव आहे. तरीही या प्रत्येकाचं वेगळं असं एक वैशिष्ट्य आहे. त्यातले काही यमन सारखे हळवे असतील, बिहाग, हमीर सारखे शृंगारिक असतील, मालकंसासारखे साधूजन असतील, तर काही मिया मल्हारासारखे अद्भुत असतील. तसंच भीमपलास हा राग प्रसन्न, गोड तर आहेच, पण त्यातली सात्विकता ही मला विशेष भावते. आज आपल्या मराठी संगीतात या रागात अगदी भरपूर गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. तरी या रागाची गोडी तसूभरही कमी होत नाही.

"स्वकुल तारक सुता,
सुवरावरूनी वाढवी वंशवनिता"
स्वयंवरातल्या नारायणराव बालगंधर्वाच्या वरील पदातला भीमपलास पहा काय सुरेख आहे. असा भीमपलास झाला नाही, होणे नाही. भास्करबुवांचं संगीत, अत्यंत लडिवाळ गायकी असणारे नारायणराव आणि राग भीमपलास! मंडळी, अजून काय पाहिजे?

"अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
मन माझे केशवा, का बा न घे?"

माणिकताईंचं हे गाणं ऐका. आहाहा! अरे काय सांगू माझ्या भीमपलासाची थोरवी! अहो, देवाचं नांव तर अमृताहूनी गोड आहेच, पण यातला भीमपलासही अमृताहुनी गोड आहे! भीमपलासमधील सात्त्विकता, गोडवा समजून घ्यायचा असेल तर या गाण्याचा अवश्य अभ्यास करावा. एक तर माणिकताई या नारायणरावांच्याच पठडीतल्या. त्यामुळे हे गाणंदेखील 'स्वकुल तारका' इतकंच भावतं! यातली 'सांग पंढरीराया काय करू यासी' ही ओळ ऐका. ही ओळ ऐकतांना तो कर कटावरी ठेवूनी विटेवरती उभा असलेला प्रसन्नमुद्रेचा पंढरीराया अगदी डोळ्यासमोर येतो हो!! भीमपलास राग हा त्या विठोबाने दिलेला प्रसादच आहे. चाखून तर बघा एकदा..

दशरथा घे हे पायसदान,
तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो,
हा माझा सन्मान...

मंडळी, अहो या भीमपलासाने बाबुजींना मोहिनी नसती घातली तरच नवल! वरील गाणं ऐकावं म्हणजे या रागाचा आवाका लक्षात येईल. या गाण्यातलं एक कडवं आहे-
'श्रीविष्णूंची आज्ञा म्हणूनी,आलो मी हा प्रसाद घेवूनी,या दानासी, या दानाहून अन्य नसे उपमान....दशरथा घे हे पायसदान....
या ओळी ऐकतांना भीमपलासबद्दल 'या रागासी, या रागाहून अन्य नसे उपमान..' असंच म्हणावसं वाटतं! :)
गीतरामायणातलंच अजून एक गाणं-

"मुद्रिका अचूक मी ओळखिली ही त्यांची
मज सांग अवस्था, दूता रघुनाथांची"

हादेखील फार सुरेख भीमपलास आहे. गीतरामायणातल्या गाण्यातल्या गाण्यांवर एक स्वतंत्रच लेखमालाच लिहावी लागेल!

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी ज्ञानेशाची....

ओहोहोहो..!! मंडळी, काय बोलू मी यावर? आपणच ठरवा भीमपलासचं सामर्थ्य! भाईकाकांचं संगीत, राग भीमपलास आणि साक्षात स्वरभास्करांचा आवाज..!!
मंडळी, अण्णांचा तसंच अनेक गवयांचा भीमपलासातील फार सुरेख ख्याल मला माझ्या सुदैवाने अनेकवेळा ऐकायला मिळाला आहे. अण्णांचे 'सुखाचे हे नाम आवडीने गावे', 'याच साठी केला होता अट्टाहास', 'यादव नी बा रघुकुलनंदन' यासारखे अनेक मराठी, कानडी अभंग भीमपलास रागात आहेत. ते त्यांच्या संतवाणी या कार्यक्रमातून अनेक वेळेला अगदी भरभरून ऐकले आहेत. कविवर्य वसंत बापट फार सुरेख निरूपण करीत. संतवाणी म्हणजे अण्णांचं दैवी गाणं आणि वसंत बापटांचं फार रसाळ निरूपण असं केशर घातलेलं आटीव दूधच!

असो..

मंडळी, खरंच सांगतो आपलं हिंदुस्थानी रागसंगीत एक खजिना आहे. उगाच इकडे तिकडे कुठे जाऊ नका. आपल्याच पोतडीत थोडं डोकावून पहा!

सरते शेवटी भीमपलासातल्या अभंगातील,

"अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन, तिन्ही लोकी"
एवढेच सांगणे आहे...!

--तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..७ (हमीर)

राम राम मंडळी,
आपण सगळेजण बसंतच्या लग्नाला जमलो आहोत. आत्तापर्यंत भले भले राग मांडवात येऊन बसले आहेत. सुरेख माहोल जमला आहे. नवऱ्यामुलाजवळ नंद, बिहाग, केदार, शामकल्याण, कामोद, नट, छायानट, गौडसारंग ही त्याची सगळी मित्रमंडळी धमाल करत बसली आहेत!
हे काय? तो कुठला राग त्यांच्यात बसला आहे हो? त्याचा उत्साह तर नुसता ओसंडून वाहतोय! त्या सगळ्यात तो अगदी विशेष उठून दिसतोय? कोण आहे तो?
मंडळी, तो आहे राग हमीर! ओहोहो, क्या केहेने!! अहो हमीर रागाबद्दल किती बोलू अन् किती नको! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक फार सुरेख राग. याचा मूळ स्वभाव शृंगारीक. पण प्रसन्नता, उमद्या वृत्तीचा या याच्या स्वभावाच्या इतरही बाजू आहेत. आज मी इथे माझ्या परीने हमीर समजावून सांगणार आहे. वर उल्लेख केलेल्या त्याच्या मित्रमंडळींबद्दल सवडीने लिहिणारच आहे, पण आज आपण हमीर या रागाबद्दल बोलूया. आधी आपली या रागाशी पटकन तोंडओळख व्हावी म्हणून हे रागाचं एक लहानसं क्लिपिंग ऐका. हे ध्वनिमुद्रण आपल्याला रागाची बेसिक माहिती देईल."धीट लंगरवा कैसे घर जाऊ" ही एक फार सुरेख पारंपारीक बंदीश आपल्याला ऐकायला मिळेल. पहा किती प्रसन्न स्वभाव आहे आमच्या हमीरचा!!
मंडळी, आता आपण हमीराचं शास्त्रीय संगीताच्या दुनियेतलं स्थान पाहू. हा राग जास्त करून ग्वाल्हेर घराण्यात गायला जातो, इतरही घराण्याची मंडळी हा राग गातात, नाही असं नाही. परंतु या रागाची तालीम प्रामुख्याने ग्वाल्हेर घराण्यात दिली जाते. "चमेली फूली चंपा" ही हमीरातली झुमऱ्यातली पारंपारीक बंदीश फार प्रसिध्द आहे. वा वा! गायकाने स्थायी भरून चंपा या शब्दावर प्रथम सम गाठली की मैफल हमीरच्या ताब्यात गेलीच म्हणून समजा. मला पं उल्हास कशाळकर, पं यशवंतबुवा जोशी, सौ पद्मा तळवलकर, आमचे पं मधुभैय्या जोशी यांच्या मैफलीत भरपूर हमीर ऐकायला मिळाला आहे. पं गजाननबुवा जोशी व्हायोलीनवर हा राग काय सुरेख वाजवायचे!वा! फारच श्रीमंत राग हो! ऐकून मन कसं प्रसन्न होतं!! ग्वाल्हेरवाली मंडळी मस्तपैकी झुमऱ्याबरोबर खेळत खेळत असा सुंदर हमीर रंगवतात, वा! अगदी ग्वाल्हेर घराण्याचे एक अध्वर्यु पं विष्णू दिगंबर पलुसकर यांचे तितकेच गुणी चिरंजीव पं दिगंबर विष्णू, अर्थात बापुराव पलुसकर यांची 'सुरझा रही हो' ही हमीरमधली बंदीश ऐका! बघा, त्यांनी हमीर काय सुरेख गायला आहे! एक तर बापुरावांचा आवाज म्हणजे खडीसाखर, त्यात त्यांचं ग्वाल्हेर गायकीवरील प्रभूत्व आणि त्यात हमीरसारखा उमदा राग! का नाही गाणं रंगणार महाराजा?
मंडळी, आपल्या नाट्यसंगीतातदेखील हमीर रागाचा उत्तम उपयोग करून घेतला गेला आहे. पटकन एक उदाहरण देऊ? पं सुरेश हळदणकरांचं "विमलाधर निकटी मोह हा" हे संगीत विद्याहरणातलं पद ऐका. बघा, हमीर किती उठून दिसतो यात. आणि त्यात हळदणकरबुवांसारखा समर्थ गायक! आणि हो, "नमन नटवरा विस्मयकारा" ही नांदीदेखील आपल्या हमीरातीलंच की! वा वा!!
मंडळी, ही झाली हमीर रागाची रागसंगीतातली बाजू. काय म्हणता? तुम्हाला लाईट संगीत जास्त आवडतं? मग इथेही हमीर आहेच की! अगदी प्रसिध्द उदाहरण म्हणजे रफीसाहेबांचं हे गाणं!
काय? पटली की नाही हमीरची पुरती ओळख?:) क्या केहेने! या सुंदर गाण्याबद्दल नौशादसाहेबांना, रफीसाहेबांना आणि आपल्या हमीरला कितीही दाद दिली तरी कमीच!
"पगमे घुंगर बांधके,
घुंगटा मुखपर डारके,
नैनमे कजरा लगाके
रे मधुबन मे राधिका नाचे रे"!!

ओहोहो! हे गाणं ऐकून डोळ्यात आनंदश्रू उभे रहातात हो! मंडळी, काय गोड गळा! काय सुरेख गायचे हो रफीसाहेब! इतका मधुर पण तयारीचा आवाज! रफीसाहेबांना आपला सलाम!! नौशादसाहेबांनी तर यात हमीराचं सोनं अक्षरशः मुक्तहस्ते लुटलं आहे हो! पण काय सांगू? कितीही लुटली, तरी हमीराची श्रीमंती जराही कमी व्हायची नाही! खरंच मंडळी, आपलं रागसंगीत फार फार श्रीमंत आहे.
आणि मंडळी राग म्हणजे तरी काय हो? तर एक ठरावीक स्वरसंगती, आणि त्यातून निघालेला एक विचार. प्रत्येक रागाला स्वतःचा असा एक चेहरा असतो. एखादा राग ऐकतांना आपल्या कानांना तो कसा लागतो, त्यातून आपल्या मनात कोणते विचार येतात, कोणत्या भावना निर्माण होतात हे महत्वाचं!
आता हमीरचंच उदाहरण घेऊ. मी तात्या अभ्यंकर, या हमीरचा एक श्रोता. त्याच्या प्रेमात पडलेला. आता हमीर हा राग मला जसा वाटेल, अगदी तसाच तो प्रत्येकाला वाटेल असं नाही. पण हा राग मला कसा वाटला याची मी काही उदाहरणं देऊ शकेन. आता बघा हां, हमीर ऐकून तो समजून घेतांना माझ्या मनात आलेली एक situation. अगदी साधं उदाहरण. बघा आपल्याला पटतंय का!
समजा मी २४-२५ वर्षांचा एक तरूण मुलगा आहे. घरदार, पै-पैसा, नोकरीधंदा सगळं व्यवस्थित आहे. घरची मंडळी आता माझ्या लग्नाचं बघू लागली आहेत.(समजा हां! :D) स्थळं येत आहेत. पिताश्री हळूच विचारत आहेत, "काय रे, तुझं तू कुठे जमवलं नाहीयेस ना? बघू ना तुझ्याकरता स्थळं?" मी त्यांना स्थळं बघायला सांगतो. वास्तवीक मी एका मित्राच्या लग्नात गेलो असतांना तिथे वधूची एक मैत्रीण माझ्या मनांत भरली होती!;). ओहोहो, काय सुरेख होती ती! गोरीपान, बोलके डोळे. पण मंडळी मी थोडा बुजरा आहे. तिच्याकरता पण स्थळं बघताहेत अशी जुजबी माहिती मला खरं तर मिळाली होती, पण ओळख काढून तिला डायरेक्ट विचारायची हिंमत नाही. आता मनांत भरली होती खरी, पण काय करणार? त्यापेक्षा पिताश्री स्थळं बघतच आहेत त्यातल्याच एकीशी चुपचाप लग्न करावं, असा पापभिरू विचार मी केला आहे!!
एक एक स्थळं बघतो आहे, आणि काय सांगू महाराजा!! ज्या संस्थेत नांव नोंदवलं होतं तिथून नेमकी तीच मुलगी मला सांगून आली!! ती हो.., मांडवात दिसलेली!!
झालं. हवेत तरंगतच आमचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, आणि तिचा होकारही आला. साखरपुडा झाला, आणि आम्ही दोघे प्रथमच बाहेर फिरायला गेलो. तेव्हा तिने मिष्किलपणे मला विचारलं,
"खरं सांग. त्या लग्नात चोरून चोरून सारखा माझ्याकडे बघत होतास ना? मला तेव्हाच लक्षात आलं होतं! आणि खरं सांगायचं तर मलाही तू तेव्हा आवडला होतास!!
ओहोहो मंडळी, आपण खल्लास! अहो हमीर हमीर म्हणतात तो हाच की!! :)
अशी आणखीही काही उदाहरणं देता येतील. तेवढी ताकद आपल्या रागसंगीतात आहे. आपल्या प्रत्येक भाव-भावनांचं फार सुरेख दर्शन आपल्याला रागसंगीतातून होतं. नाही, मायकेल जॅक्सन मोठा असेल हो! मी नाही म्हणत नाही, पण प्रथम आपण आपल्या घरी काय खजिना भरून ठेवला आहे तो नको का बघायला? पिझ्झा, बर्गर जरूर खा, पण त्याआधी थालिपीठ, खरवस, अळूवड्या खाऊन तर बघा!!!
मग? करणार ना हमीरशी दोस्ती? करूनच पहा. आयुष्यभर साथ सोडणार नाही असा मित्र लाभेल तुम्हाला!!

धन्यवाद,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक आणि प्रचारक,
हिंदुस्थानी रागसंगीत.

बसंतचं लग्न..६ (मालकंस)

नमस्कार मंडळी,
बसंतच्या लग्नाची लगबग मांडवांत सुरूच आहे. विविधरंगी फुलांची सजावट केली आहे. अत्तराचा घमघमाट सुटला आहे. झकपक कपडे, दागदागीने घालून सगळी रागमंडळी नटुनथटून आली आहेत.
ते सर्वांत पुढे सोफ्यावर मल्हार महाराजांच्या बाजुलाच कोण बुजुर्ग व्यक्तिमत्वं बसलंय बरं? काय विलक्षण तेज आहे त्याच्या चेहेऱ्यावर!! एखादा योगी बसला आहे असंच वाटतंय! खुद्द आपला यमन त्यांच्या बाजुला अत्यंत अदबीने उभा राहून त्यांना काय हवं नको ते पाहतोय! इतर सगळे राग मोठ्या आदराने त्याला भेटत आहेत, वाकुन नमस्कार करत आहेत!! कोण, आहे तरी कोण ते?
मंडळी, ते आहेत मालकंसबुवा! राग मालकंस!!

मालकंसची थोरवी मी काय वर्णावी? धन्य ते आपलं हिंदुस्थानी रागसंगीत ज्यात मालकंस सारखा राग आपल्याला लाभला आहे! मालकंस, एक भक्तिरसप्रधान राग. समाधीचा राग. मंडळी, मालकंस तसा समजावून सांगायला कठीण आहे. यमन, भूप, हमीर, बिहाग जितक्या पटकन समजावून सांगता येतील तितक्या पटकन मालकंस नाही समजावता येणार! याचा अर्थ असा नव्हे की यमन खूप सोपा आहे, आणि मालकंस खूप कठीण आहे. याचा अर्थ असाही नव्हे की यातला एक मला जास्त आवडतो आणि एक कमी आवडतो. प्रश्न आहे तो हा, की मी आज भक्तिमार्गाच्या कितव्या पायरीवर उभा आहे? की अजून सुरुवातच झालेली नाहीये? कारण शेवटी प्रत्येक रागाचा प्रत्येक सूर त्या अंतीम शक्तीकडेच जातो, हे जर मान्य केलं तर आपण एवढंच म्हणू शकतो की आज यमनच्या प्रत्येक सुराबरोबर परमेश्वराशी संवाद साधणं मला जेवढं सोपं जात आहे तेवढं मालकंसमधून नाही!! माझी अजून तेवढी पोहोच नाही असं म्हणू आपण हवं तर!

भक्तिमार्गाच्या काही पायऱ्या असतांत. तात्या अभ्यंकरने विठोबाचं नांव घेणं, आणि तुकोबांनी विठोबाचं नांव घेणं यात जमीन-आस्मानापेक्षा सुध्दा कित्येक पट जास्त अंतर आहे की नाही?:) का आहे हे अंतर? तर तुकोबांची विठ्ठलापाशी जी लगन आहे, एकरुपता, एकतानता आहे, त्याच्या कित्येक मैल आसपासही तुमची माझी नाही! ती तुकोबांच्या पातळीची एकतानता, तेवढी एकरूपता, तेवढी लगन म्हणजे मालकंस!!!

गुंदेचाबंधू हे तरूण गायक माझे अत्यंत आवडते ध्रुपद गवय्ये आहेत. भोपाळला राहतात. त्यांचा प्रत्यक्ष मालकंस ऐकायचादेखील योग मला आला आहे. त्यांना इथे ऐका. गुंदेचाबंधूंनी मालकंसात केलेली आलापी आहे ही. बघा तरी ऐकून!

"जयती जयती श्री गणेश,शंकरसुत लंबोदर"

गुंदेचाबंधूंनीच गायलेली ही गणेशवंदना येथे ऐका. डोळ्यात पाणी येतं हो! अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असा भास होतो!!

मंडळी, धनश्री लेले नावाची माझी एक ठाण्याचीच मैत्रीण आहे. उच्चशिक्षित आहे. संतसाहित्याची, गीतेची, भाषेची खूप व्यासंगी आहे. वक्तृत्वही छान करते, आणि लिहितेही छान. तीच्याशी बोलतांना एकदा मालकंसचा विषय निघाला. मी लगेच माझं पांडित्य सुरू केलं!:) आणि मालकंस मला कसा भावतो हे सांगीतलं. मला एकदा मालकंस गुणगुणतांना एक एकतालातली धून सुचली होती, ती मी तिला गुणगुणून दाखवली. लगेच त्यावर तिने पहा काय छान शब्द रचले!

अस्थाईः
गुणीजन कर नित वंदन,
मन समाए सुख बसंत,
गुणीजन हरिसम जानत
अंतराः
रसिक रंग, मन उमंग,नवतरंग छायत हो,
नमो नमो, नमो नमो,गुणीजन सबको!

मालकंसमधली ही एक छान बंदीश झाली असं म्हणता येईल. वरदा गोडबोले नावाची माझी अजून एक मैत्रीण आहे. शास्त्रीय संगीत खूप छान गाते. आम्ही तिघांनी एके ठिकाणी होळीनिमित्त एक कार्यक्रम सादर केला होता, त्यात वरदाने ही बंदीश फार सुरेख गायली होती.
अजून काय काय नी किती दाखले देऊ मालकंसचे महाराजा?!! दिनानाथरावांनी गायलेलं तात्याराव सावरकरांचं "दिव्य स्वातंत्र्य रवि" येथे ऐका. म्हणजे मालकंसची Depth काय आहे ते लक्षात येईल. बाबुजींनी तर कमालच केली आहे. बाबुजींना तर मालकंसमध्ये देव, आणि देश हा एकच दिसला, आणि त्यांनी "वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम्" हे फार अप्रतीम गाणं याच रागात बांधलं! या संकेतस्थळावर बैजुबावरा या चित्रपटातलं "मन तरपत" हे मालकंसातलं गाणं ऐका. नौशादसाहेबांना आणि रफीसाहेबांना आपला सलाम! फार सुरेख गाणं आहे हे!

मंडळी, अजून काय सांगू मालकंसबद्दल? मनुष्य अक्षरशः गुंग होतो. आत्मानंदी होतो! मालकंस आपल्याला परमेश्वरी अस्तित्वावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. आयुष्यात केव्हातरी अशी वेळ येते की जिथे मनुष्य जरा थांबतो आणि त्याला थोडसं मागे वळून पहावसं वाटतं. इथपर्यंत आलो खरे. काय चुकलं आपलं? आपल्याकडून कोणी उगीचच्या उगीच दुखावलं तर नाही ना गेलं? आता पुढचा प्रवास कसा होईल? कुठेतरी जरा काही क्षण डोळे मिटुन स्वस्थ बसावसं वाटतं, आणि थोडसं आत्मचिंतन करावसं वाटतं. हे आत्मचिंतन म्हणजे मालकंस! मंडळी, मालकंसच्या सुरांत एवढी विलक्षण ताकद आहे की, हेवे-दावे, द्वेष-मत्सर, तुझं-माझं, यासारख्या गोष्टी क्षणांत क्षूद्र वाटायला लागतात! वाल्मिकी होण्यापूर्वी वाल्याने रामनामाचा जो जप केलान ना, तो जप म्हणजेच मालकंस!!

आणि Last, but not least!

"अणुरणीया थोकडा, तुका आकाशाएवढा" हे गाण्याकरता भीमण्णांना मालकंस रागासारखा दुसरा आधार नाही. ते सामर्थ्य फक्त मालकंसमध्येच! अण्णांसारखा स्वरभास्कर जेव्हा दोन तंबोऱ्यांमध्येबसून "तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता" अशी आळवणी करतो ना, तेव्हा त्या सभागृहात तो "सावळा"कमरेवर हात ठेऊन प्रसन्न मुद्रेने उभा असतो!!

--तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..५ (बिहाग)

नमस्कार मंडळी,

और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!

आपल्या बसंतचं लग्न थाटामाटांत सुरू आहे. या लग्नाला सगळे रथी महारथी राग व रागिण्या आल्या आहेत, येत आहेत. भले भले राग येऊन आपापली आसने ग्रहण करत आहेत. तो कोण आहे बरं? एखाद्या हिरोसारखा? देखणा, रुबाबदार, सुंदर डोळ्यांचा? मांडवातल्या सगळ्या मुली तर त्याच्याकडेच बघत आहेत!
नाही ओळखलंत? अहो तो तर आपला बिहाग!! बिहागची शोभा काय वर्णावी महाराजा!! माणसांतली रसिकता, आयुष्याचा भरभरून आस्वाद घेण्याची वृत्ती म्हणजे बिहाग. एक अत्यंत रसाळ, शृंगाररसप्रधान राग. बिहाग म्हणजे चाहत!
बरेच दिवसांची नजरानजर, मग ओळख, मग चोरून भेटीगाठी, आणि मग एका सुरेख संध्याकाळी, निसर्गरम्य एकांती तीने भरलेला होकार! खल्लास!! अहो, बिहाग बिहाग म्हणतांत तो म्हणजे हा होकार!
"तुझा तो अमक्या अमक्या रंगाचा ड्रेस आहे ना? तो जाम आवडतो आपल्याला. त्यात तू एकदम फाकडू दिसतेस. तो घालशील उद्याच्या गॅदरींग ला?" तो."तो नको रे, मी तो नाही घालणांर. माझा अमका अमका घालायचं ठरलं आहे, मी तोच घालून येणार. तू सांगशील तसं सगळं होणार नाही!!" ती.
आणि मग गॅदरींगच्या दिवशी ती नेमका त्याने सांगीतलेलाच ड्रेस घालून येते!! मैत्रीणीदेखील त्याच ड्रेसचं कौतुक करतांत! ती हळूच त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल विजयी भाव! त्याने सांगीतलं म्हणून तर तीने हा ड्रेस घातला होता, हे त्या मैत्रीणींना कुठे माहीत होतं? ते फक्त त्या दोघातलंच गूज होतं!! रोमँटीक शिक्रेटच म्हणा ना! :) मंडळी, हे त्या दोघातलं गूज म्हणजेच बिहाग!!
या ओळी पहा,
"धडकन मे तू है समाया हुआ,
खयालो मे तू ही तू छाया हुआ
दुनिया के मेले मे लाखो मिले,
मगर तू ही तू दिल को भाया हुआ"!!

वसंत देसाईंचं संगीत असलेल्या, लतादीदींनी गायलेल्या बिहाग रागातल्यांच या ओळी आहेत. त्यातल्या "मगर तू ही तू दिल को भाया हुआ" मधलं ते "भाणं" आहे ना? तोच बिहाग!! "दुनिया के मेले मे लाखो मिले"! अरे लाख असतील, पण तू म्हणजे तूच. दुसरं कोणी नाही!! मंडळी, बिहाग म्हणजे शृंगारातलं un-conditional surrender!!

बिहाग रागातलं नारायणराव बालगंधर्वांचं "मम आत्मा गमला" हे गाणं ऐका! नारायणरावांच्या गळ्यात फार शोभून दिसतो बिहाग! बालगंधर्वांनी "मम आत्मा गमला" या बिहागमधल्या पदामध्ये फार सुरेख रितीने कोमल निषादाचा एके ठिकाणी वापर केला आहे! वास्तवीक हा स्वर बिहागांत वर्ज्य आहे. पण नारायणरावांनी इतक्या चपखलपणे ही जागा घेतली आहे की क्या केहेने!! आता गाण्यामध्ये २+२=४ असं करणारी काही जन्मजांत क्लिष्ट मंडळी कपाळाला आठ्या घालतील! अहो पण बालगंधर्वांसारख्या, ज्याला खुद्द गाण्याचाच आत्मा गमला आहे त्याला मम आत्मा गमलातल्या बिहागात असं करायची मुभा आहे! असो.
"अब हू लालन मै का,
जुग बीत गये रे,
तुमरे मिलन को
जियरा तरसे रे.."
ही बिहागमधली पारंपारीक बंदीश आहे. फार सुरेख बंदीश आहे ही! येथे ऐका

"बोलीये सुरीली बोलीया,खठ्ठीमिठी आखो की रसिली बोलिया"
गृहप्रवेश या सिनेमातलं हे एक फार अप्रतीम गाणं आहे. यातला बिहाग फारच छान आहे. हे गाणं येथे ऐका

बिहागची नुसती सुरावट जरी कानी आली तरी मनुष्य लगेच फ्रेश होतो. शुध्द गंधाराची आणि षड्जाची अवरोही संगती, शुध्द मध्यमाची आणि मिंडेतल्या तीव्र मध्यमाची गंधार व पंचमामधली चाललेली लपाछपी, आश्वासक पंचम, सांभाळा हो, असं म्हणणारा शुध्द धैवत, सुरेखसं शृंगारीक अवरोही वळण असलेला शुध्द निषाद, आणि सगळे क्लायमॅक्स् उधळून लावणारा तार षड्ज! अरे यार काय सांगू बिहागची नशा!! मला तर आत्ता हे लिहितानांच खास खास मित्रमंडळी गोळा करून, झकासपैकी पान जमवून, तंबोऱ्याचा सुरेल जोडीच्या सानिध्यांत बिहाग गावासा वाटतोय! मनोगतींनो, येतांय का आत्ता माझ्या घरी? मस्तपैकी काहीतरी चमचमीत हादडू आणि सगळे मिळून बिहाग enjoy करू!!
असो, अजून काय नी किती लिहू बिहागबद्दल. मंडळी एकच सांगतो, हा राग माणसाला जिंदादिलीने जगायला शिकवतो. खरंच, आपलं गाणं खूप मोठं आहे. त्याची कास धरा! आत्तापर्यंतच्या माझ्या तोकड्या श्रवणभक्तीत मी अनेक दिग्गजांचा बिहाग अगदी मनापासून enjoy केला आहे. अजून खूप काही ऐकायचं आहे, शिकायचं आहे!

--तात्या अभ्यंकर.

August 26, 2006

बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)

नमस्कार मंडळी,
मी निघालो होतो बसंतच्या लग्नाला. इतर सर्व राग तर होतेच, पण आम्हा काही बसंतप्रेमी मंडळींना सुध्दा बसंतने आमंत्रण केलं होतं, म्हणून मीही चाललो होतो. चालतां चालतां दुपार झाली म्हणून एका गावांत भाजी भाकरी खाल्ली आणि तसांच पुढे निघालो. संध्याकाळपर्यंत तरी वऱ्हाडाच्या ठिकाणी पोचायचं होतं.
गावाबाहेर पडलो. पुढचा सगळा रस्ता मोकळ्या रानांतला, पायवाटेचा होता. दुपारचा दीड वाजला असेल. मस्त मोकळी राना-शेताडीची वाट. मी एकटाच. दूरदूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. वाराही सुटला होता, त्यामुळे वातावरणांत सुखद गारवा होता. मी माझ्याच तंद्रीत मस्त मजेत काहीबाही गुणगुणंत चाललो होतो.
पण हळुहळू अंधारून यायला लागलं. तेवढ्यांत जोराचं गडगडलं, आणि लखकंन वीज चमकली. आता मात्रं चांगलंच अंधारून आलं. सहज माझं लक्ष वरती आकाशाकडे गेलं. पाहतो तर काय, आकाशांत कृष्णमेघांची चांगलीच दाटिवाटी झाली होती. सूर्यमहाराज माझी साथ सोडुन केव्हांच त्या ढगाआड लपले होते. विजांचा चमचमाट आणि ढगांचं गडगडणं घाबरवायला लागलं. मगासच्या स्वच्छंदपणाच्या जागी थोडीशी भितीही वाटायला लागली. आणि नकळंत मला मंद्रसप्तकातले म प नि ध नी सा हे स्वर ऐकू यायला लागले!! सुरवातीचा गूढ कोमल निषांद आणि त्यानंतरचा शुध्द निषांद! मध्यातल्या कोमल गंधाराचा आणि शुध्द मध्यमाचा बेहलावा!! माझ्या मागून कोणतरी येतंय असं जाणवलं मला. तेवढ्यांत त्याने गाठलंच मला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला!! मंडळी, कोण होतं ते?ओहोहो, अहो तो तर मिया मल्हार!! त्या भरदुपारी अंधारल्या कुंद वातावरणांत मल्हारही निघाला होता बसंतच्या लग्नाला!!
मंडळी, काय लिहू मल्हारबद्दल? आपल्या रागसंगीतांतला विलक्षण ताकदीचा एक बलाढ्य राग! अंधारून येणं, सोबतीला कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट, वीजांचा चमचमाट, समोरचंही दिसू नये असा पाऊस, त्याचं ते रौद्र रूप हे सगळं मंद्र ते तार सप्तकातून दाखवण्याची ताकद मल्हारांत आहे. मंडळी, आपल्याला सृष्टीच्या सौंदर्याची अनोखी रुपं माहित आहेत. छान कोवळं ऊन, सुरेखसा गुलमोहर, स्वच्छ सुंदर हवा, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे वगैरे. पण आमच्या मल्हारनी एकदा ताबा घेतला, की या सगळ्यांची छुट्टी!आहे की, मल्हारचंही सौंदर्य आहे, पण ते रौद्र आहे. ते झेलायला माणूसही तेवढांच Dashing पाहिजे. येरागबाळ्याचं काम नाही ते!! "कर तुला हवा तितका गडगडाट, पाड विजा, कोसळ रात्रंदिवस. मी enjoy करतोय" असं म्हणणारा कोणीतरी हवा!!
मंडळी, येथे मला आग्रा गायकीचे बुजुर्ग पं दिनकर कायकिणी यांची मिया मल्हारमधील एक बंदिश आठवते. बुवा "दिनकर" या नावांने बंदिशी लिहितांत आणि बांधतात. अहो हा मल्हार त्या प्रेयसीला तिच्या पियाकडे जाऊ देत नाहिये!! बघा दिनकररावांनी काय सुंदर बंदिश बांधली आहे..
कारी रे बदरिया,
दामनी दमकत चमकत.
धधक उठत जिया मोरा,
अंग थरथर कापे, कारी रे बदरिया....
घन गरजे, मेहा बरसे
पी मिलन नैना तरसे
जाउ अब कैसे दिनरंग कहो,
मोरा मन, धीरज, धर धर तापे, कारी रे बदरिया....
क्या बांत है!! मंडळी, आत्तापर्यंतच्या वाटचालीत मल्हार खूप अनुभवलाय मी. तो चाललेला असतो त्याच्या वाटेने, कोणाशी बोलंत नाही आणि दुसरं कोणी त्याच्याशी बोलण्याची हिम्मत करत नाही! छान रिमझीम पाऊस पडणे, त्यात मस्तपैकी भिजणे, छोट्या ओहोळांत कागदी बोटी सोडणे, आणि नंतर घरी येऊन गरमागरम कांदाभजी खाणे व वाफाळलेली कॉफी पिणे म्हणजे मल्हार नव्हे, एवढं लक्षांत घ्या.
"आकाशांत ढगांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू झाला होता" असं फार सुरेख वर्णन पुलंनी तुझं आहे तुजपाशी नाटकांत केलं आहे, तो खरा मल्हार!!!गौड मल्हार, शुध्द मल्हार, सूर मल्हार, मीरा मल्हार ही काही नातलंग मंडळी आहेत मिया मल्हारची. त्यांच्याशी मात्र थोडीफार दोस्ती करता येते. ही मात्र पाऊसाचे छान छान रंग दाखवतांत. आषाढांत आमचे मल्हारबा बरसून गेले की श्रावणांत हे नातलंग येऊन छानसं इंद्रधनुष्य पाडतांत!!
असो. मंडळी, मी मल्हारबद्दल कितीही लिहिलं आणि तुम्ही कितीही वाचलंत तरी आपण त्याचा lively अनुभव घ्यायला हवा, हेच खरं! मल्हार कोणी गावा? अरे क्या बात है, तो तर आमच्या भीमण्णांनीच गावा. मी मगाशी म्हटलं ना, येरागबाळ्याचं ते काम नाही. तिथे आमच्या भीमण्णांचाच बुलंद आणि धीरगंभीर आवाज हवा!!!
और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!

मंडळी, काय सांगू कौतुक त्या बसंतचे, त्याच्या लग्नाला आणि त्याला आशिर्वाद द्यायला आमचे मल्हार महाराजही निघाले आहेत! मला खात्री आहे, की लग्न मंडपात दाखल झाल्यावर भले भले आदबीने बाजुला होऊन आपल्या मल्हार महाराजांना सर्वांत पुढच्या सोफ्यावर बसवतील आणि आदरयुक्त भितीने चुपचाप बाजुला उभे राहतील!!!

--तात्या अभ्यंकर.