April 28, 2019

डॉ वरदा गोडबोले - राग परज.

अवश्य ऐका -
https://youtu.be/a6qSKarnkbY

खूप दिवसांनी एक खानदानी परज ऐकला. उत्तमच जमलाय. सुरवातीची नोमतोमच पकड घेत होती. अजून चालली असती.

काही जागा, हरकती अगदी अस्सल ग्वाल्हेरच्या..सहज आलेल्या..कुठलीही मुद्दाम ओढाताण नाही..तालातलं छान प्रवाही काम..रागातली एकतानता ज्याला म्हणतात ती सुरवातीपासूनच लागली आहे.. शुद्ध माध्यमाचं balancing, रागात सहजसुंदर वावरणं,,सगळंच सुरेख..



दर्जेदार गाणं..

वरदाघं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा!

तात्या.

May 02, 2018

अाापुलकी..

काल वाहिन्यांवर काही क्षणचित्र बघितली. पवार साहेबांनी स्वत: पुढाकार घेऊन स्व. अाबा पाटलांच्या लेकीचं लगीन ठरवून ते व्यवस्थित पार पाडलं.

काल पवार साहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते लग्नाला हजर नव्हते, पण सुप्रियाताईने स्वत: लक्ष घालून यजमानपद उत्तमरित्या पार पाडलं. स्वत: अक्षता वाटल्या..

अापल्याच एका अकाली मृत्यू पावलेल्या सहकार्‍याप्रती दाखवलेली अशी प्रेमाची अापुलकी मला खूप भावली..

व्यक्तिश: पवार साहेबांचा अाणि अामच्या सुप्रियाताईचा हा सुसंस्कृतपणा, साधेपणा मला नेहमीच खूप भावतो..

स्व. अाबांच्या लेकीला माझ्याही मनापासून शुभेच्छा..

(सांगली-सातार्‍याचा) गावरान तात्या.

February 18, 2017

पळसुलेकाकू..

“तात्या, एकदा येऊन जा रे. तुझ्याकरता कोकणातून अमृत कोकम आणलं आहे..”

असा पळसुले काकूंचा फोन आला. त्या दरवर्षी मला प्रेमाने अमृतकोकमचा एक कॅन देतात. पळसुलेकाकू आमच्या गाण्यातल्याच. भावगीतं वगैरे अगदी हौशीने गातात. छान गातात..

ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो. पळसुलेकाका चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून मस्त पंख्याखाली वारा खात बसले होते..

“ये तात्या. बस. बाझव अजून महाशिवरात्र झाली नाही तो उकडायला लागलं सुद्धा..!”

पळसुले काकानी स्वागत केलं. पळसुल्यांची छान अगदी दोनच खोल्यांची नेटकी जागा. पळसुलेकाकूंनी छान आवरलेलं घर. बाहेरची खोली, आत स्वयंपाकघर. एकुलती एक मुलगी लग्न होऊन सिंगापूरला गेलेली.

स्वयंपाकघरातून पळसुलेकाकू अमृतकोकम घेऊन आल्या. छान गो-या, चेहे-यावर सात्विक आणि प्रसन्न भाव.

“बस तात्या, रव्याचा लाडू आणते..”

मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिथे एक सुरेश नावाचा माणूस बसला होता. “तात्या, हा सुरेश. estate agent आहे.” – पळसुलेकाकानी ओळख करून दिली..

“छ्या साले ठाण्यात जागांचे भाव कायच्या काय झाले हो..” – आता सुरेशने संभाषणात भाग घेतला..

"तिथे लुईसवाडीमध्ये एक चांगला तयार राहता बंगला आहे. मालक ५ करोड मागतो आहे..” – सुरेश म्हणाला..

सुरेशचं हे वाक्य संपतं न संपतं तोवर पळसुलेकाकू आतून आमच्याकरता रव्याचे लाडू घेऊन आल्या.

“पाच करोड.. हम्म... अगं माझं जरा चेकबुक आण गं..”

पळसुलेकाकांनी आता पळसुलेकाकुना चेकबुक आणायला सांगितलं..

आम्हाला काही कळेचना. बंगल्याची ५ करोड किंमत ऐकून पळसुलेकाका आता advance बयाणाचा चेकबिक देतात की काय? असं क्षणभर वाटून गेलं..

पळसुलेकाकूंनी त्यांना चेकबुक दिलं..“हे घ्या चेकबुक. का हो पण..?”

“अगं काही नाही, MSEB चं साडेआठशे रुपये बील आलं आहे. तात्याला चेक देतो. तो जाता जाता भरून टाकेल. छ्या.. वीज साली काय महाग झाली आहे हल्ली. आणि तात्या, जाताना जरा त्या कोप-यावरच्या प्लंबरला आमच्याकडे यायची आठवण कर रे. तसा मी फोन केलाय म्हणा. सालं संडासचं फ्लश काम करत नाहीये. पाणी गळत राहतं आणि टाकी भरतच नाही..”

तोंडात रव्याचा लाडू असतानाच मला हसू आवरेना. कुठे त्या ५ करोडच्या बंगल्याचा बयाणा आणि कुठे ते MESB चं साडेआठशे रुपये बील आणि गळका फ्लश..!

मला असेच साधे लोक मनापासून आवडतात..

रव्याचा लाडू खाउन सुरेश निघून गेला. पळसुले तो बंगला खरीदनेसे रह गये..”

“अगं उद्याच्या भिशीमध्ये तू ते सुमनताईचं गाणं म्हणणार आहेस ना? तात्याला ऐकव की..”

पळसुलेकाकूंनी लगेच उत्साहाने मला ते सुमनताईचं गाणं गाऊन दाखवलं..

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद होऊनी मी जावे धुंद त्या सुरांनी..

काकूंनी खूप छान म्हटलं गाणं.. अगदी त्यांच्या रव्याच्या लाडवासारखंच साधं, परंतु तितकंच गोड आणि सात्विक..

-- तात्या अभ्यंकर..

July 29, 2016

कवडसे..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
मी जरा थांबले आणिक किंचित हसले
पाण्यावर नवखे स्फटिक शुभ्रसे काही
उन्मुक्त कवडसे तलम रेशमी उठले

कवडसे..  - येथे क्लिक करावे..

आमच्या सुचेता जोशी-अभ्यंकरची ही अप्रतिम तरल कविता. सुचेताने स्वत:च या कवितेला सुंदर चाल दिली आहे आणि तिची बहीण प्राजक्ता रानडेने हे गाणं खूप सुंदर गायलं आहे. प्राजक्ता सुरेल आहे..

मी नेहमीच अशा काही उत्कट गाण्यांच्या शोधात असतो आणि असं कुठलं गाणं सापडलं की खूप आनंद होतो..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
मी जरा थांबले आणिक किंचित हसले

गाण्याचा मुखडा सुचेताने पुरियाधनश्रीत बांधला आहे. फार सुंदर..

पाण्यावर नवखे स्फटिक शुभ्रसे काही..

यातला शुद्ध धैवत सुखावणारा..

की तुझे असे हे रूप नवे बघताना
आकाशी धूसर निळे जांभळे रावे

'आकाशी धूसर' मधला शुद्ध मध्यम एकदम मस्त. परंतु प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ मात्र पुन्हा पुरियाधनश्रीमध्ये आहे त्यामुळे गाणं छान balanced झालं आहे, निभावून गेलं आहे. निभावून नेणे हे शब्द इथे व्यावहारिक अर्थाने न घेता व्यापक अर्थाने घ्यावे. गाण्यात निभावून नेणं हेच सर्वात महत्वाचं आणि credible असतं हे लक्षात घ्या..

धुळभरल्या पिकल्या पिवळ्या आंब्यावरती
तांबूस आभा अनुराग होऊनी गाते

क्या बात है.. अप्रतिम शब्द..




अरे असं काहीतरी चांगलं करत जा रे! हल्लीच्या या सांगीतिक बजबजपुरीत असा एखादा शुद्ध पाण्याचा झरा सुख देऊन जातो..

प्राजक्ताचंही तेवढंच कौतुक. तिनेही तेवढंच छान आणि तरल गायलं आहे हे गाणं..

गाण्याचं चित्रिकरणही अगदी प्रेक्षणीय आणि तितकंच गाण्याला साजेसंही!

ही ध्वनिचित्रफीत जेवढी ऐकण्यासारखी तेवढीच पाहण्यासराखीही आहे. दोघीही बहिणी सुरेख दिसतात..

संगीत संयोजक केदार परांजपे आणि ध्वनिचित्रफीत दिग्दर्शिका अश्विनी अभ्यंकर-घैसास यांचंही कौतुक..

जियो..

-- (संगीतप्रेमी) तात्या..

July 15, 2016

विठ्ठल उभा पहावा विटेवरी..

आज संध्याकाळी ठाण्याच्या गोखले रस्त्यावरून चाललो असताना अचानक पाठीवर थाप पडली..

"तात्या..भोसडीच्या..."

मागे वळून बघतो तर खूप जुनी ओळख निघाली. 30 वर्षांपूर्वेचा कोलेजमधला जुना दोस्त भेटला होता.

"अरे.. तू...? इथे कुठे..? किती वर्षांनी भेटतो आहेस" वगैरे जुजबी बोलणं झालं..

"तात्या, आता घरीच चल ५ मिनिटं. मी तुझं काही ऐकणार नाही. तुला आठवतंय, पूर्वीही आमच्या घरी तू आला आहेस. आईलाही भेटशील माझ्या.."

मी काहीही आढेवेढे न घेता त्याच्या घरी गेलो.

"आई..तात्या आलाय. ओळखलंस का? अजून साला जिवंत आहे.."

पक्षाघताने डावी बाजू गेलेली त्याची आई खुर्चीवर बसली होती. त्याच्या बायकोने पुढ्यात पाणी आणून ठेवलं. मी म्हातारीच्या पाया पडलो..

"अरे तू गायचास ना रे..? इथेही एकदा गाणं म्हटलं होतंस.."

पक्षाघातामुळे म्हातारीचं बोलणं तसं पटकन कळत नव्हतं..पण मेमरी sharp होती.

"तात्या..चहा टाकलाय. बघ, आईनेही तुला ओळखलं. चहा होईपर्यंत म्हण एखादं गाणं.."

सगळ्या घटना पटापट घडत होत्या. मीही लगेच त्या म्हातारीच्या पुढ्यात बसून 'फिरत्या चाकावरती देसी..' हे गाणं लगेच हातवारे करून हौशीहैशीने गायलं. म्हातारी खुश झाली. तिच्या चेहे-यावर छान समाधान पसरलं. पक्षाघाताने तिचा वाकडा झालेला चेहेरा आता एकदम छान दिसू लागला.

चहा आला. बाकरवडी आली. आमच्या जनरल गप्पा सुरू होत्या. त्याची बायकोही अगदी सात्विक, समाधानी दिसत होती.

तेवढ्यात १०-१२ वर्षाची एक मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिला पाहून मला जरा भलतीच शंका आली. ती मुलगी स्पेशल चाईल्ड होती. Autistic..

"हा कोण आहे माहित्ये का? हा तात्याकाका.. नमस्कार कर बघू तात्याकाकाला..त्याला hello म्हण.."

"तात्या..ही माझी लाडकी लेक. तुझ्याकडे कशी छान बघते आहे बघ.."

मला हे सगळं जरा धक्कादायकच होतं. तरी मी पटकन स्वत:ला सावरत त्या मुलीच्या गालावर आणि चेहे-यावर प्रेमाने हात फिरवला.

"खूप सुंदर आहे रे तुझी मुलगी.."

माझं फक्त एवढं एक वाक्य. परंतु त्या वाक्यामुळे मला लाख मोलाचं समाधान आणि आनंद दिसला त्या नवरा-बायकोच्या चेहे-यावर..

आणि खरंच ती मुलगी सुंदर होती. अगदी निष्पाप...

जरा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि एकदम माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं..

एका वेगळ्याच दुनियेतली मुलं आहेत ही. त्यांना तुमच्या दयेची भीक मुळीच नकोय. त्यांना फक्त आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे. आणि तुम्ही कोण लागून गेलात त्याच्यावर दया दाखवणारे..? तुमची so called बुद्धी शाबूत आहे हा तुमचा भ्रम आहे.. अरे..तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील मुलं आहेत ती..!

"चल निघतो रे..उशीर होतोय..पुन्हा येईन."

म्हातारीच्या पाया पडलो आणि निघालो. ते दोघे आणि ती मुलगी जिन्यापर्यंत मला सोडायला आले..

"तात्याकाकाला टाटा कर.."

पुन्हा एकदा त्या मुलीचा तो सुंदर चेहेरा..

मी इमारतीखाली उतरलो. दुकानातून एक छान डेअरीमिल्क घेतलं आणि पुन्हा त्याच्या घरचं दार वाजवलं.

'अरे..तुझ्या लेकीकारता खाऊ आणलाय..' असं म्हणून त्या मुलीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर डेअरीमिल्क ठेवलं..

पुन्हा एकदा तेच निष्पाप, निरागस हास्य..

उद्या आषाढी. पण मला मात्र तिच्या त्या निर्व्याज, निष्पाप हास्यामधून विठोबाने आजच दर्शन दिलं होतं..

-- तात्या अभ्यंकर..

March 27, 2016

मोहे रंग दो लाल..

मोहे रंग दो लाल..

येथे ऐका - https://www.youtube.com/watch?v=GjvAqRj6dHk

सनई, सतारीने सुरवात आणि सुरवातीच्या 'मोहे रंग दो लाल..' चे पुरियाधनश्रीचे स्वर. म'गम' रेग संगती. (शुद्ध गंधार, तीव्र मध्यम, कोमल रिखब)

'नंद के लाल..' दुसरी ओळ अचानक पुरियाकल्याण मध्ये शिरते. अगदी सुखद शिरते. (शुद्ध धैवत अचानक entry करतो) अर्थात, त्यामागे पहिल्या ओळीची पुरियाधनश्रीची सापेक्षता आहेच..

छेडो नाही बस, रंग दो लाल..

म'पधनिधप म'पगमरेसा.. (म'-तीव्र, म-शुद्ध, नि-कोमल, रे-शुद्ध)

जबरदस्त स्वरसंगती. आणि अहो 'छेडो नाही बस रंग दो लाल..' हे केवळ शब्द नाहीत, तर ती 'मोहे..' हा समेचा मुखडा पकडणारी सुंदर बोल लयकारी आहे!

देखू देखू तुझको मै होके निहाल
छू लो कोरा मोरा काच सा तन..
नैन भर क्या रहे निहाल..

पुढच्याही सगळ्या स्वरावली केवळ अप्रतिम आहेत. आणि हा अंतरा झाल्यावर मोहे रंग दो लाल चा अचानक पुन्हा कोमल धैवातावर न्यास ठेवला आहे, जेणेकरून पूर्वीचा पुरियाधनश्री पुन्हा एकदा स्थापित होतो. क्या बात है..

मरोडी कलाई मोरी...  इथे अचानक यमनच सुखद entry घेतो.

मरोडी कलाई मोरी,
चुडी चटकाई,
इतराई तो चोरी से गरवा लगाई..
हरी ये चुनरीया जो झटकेसे छीनी
मै तो रंगी हरी, हरि के रंग, लाज से गुलाबी गाल..

शब्दस्वरांची अप्रतिम उधळण. अन्य शब्द नाहीत..

आणि मगाशी 'नैन भर क्या रहे निहाल..' ही एका आवर्तनाची बोल-लयकारी करून सम गाठली आहे. तर दुस-या अंत-यात 'मै तो रंगी हरी, हरि के रंग लाज से गुलाबी गाल..' ही दोन आवर्तनांची बोल-लयकारी करून सम गाठली आहे..

अफाट बांधलं आहे गाणं. Hats off to श्रेया घोषाल. Matured गायकी. जियो..

गाण्याचं भव्यदिव्य चित्रिकरण, उत्कृष्ट चित्रीकरण. Hats off to संजय भन्साली..

सुरेख दीपिका, गाण्यात खुद्द पं बिरजू महाराजांनी म्हटलेली पढंत..

क्या बात है! अरे अशी गाणी करत जा रे बाबानो. बरं वाटतं जिवाला.

आपल्या स्वत:ला आवडणारं गाणं आणि न आवडणारं एवढे फक्त दोनच प्रकार आहेत गाण्याचे. मग काळ कोणताही असो, संगीतकार, गायक, कवी, कुणीही असो..

जे गाणं मला मनापासून आवडतं, त्याचे स्वर, त्याची लय उलगडून पाहायला मजा येते. त्यामुळे गाण्याचा आनंद द्विगुणीत होतो इतकंच..

-- तात्या अभ्यंकर..

February 05, 2016

आमचे बागवे सर..केळूसकर सर... गुरुवर्यांचे आशीर्वाद...

काल आमचे कविवर्य अशोक बागवे सर, कविवर्य महेश केळूसकर, आमचा कवी मित्र केशव कासार.. यांच्यासोबत एक छान मैफल झाली.. त्या सर्वांनी खूप गायचा आग्रह केला म्हणून मस्त गायलो जरा वेळ..

काविवर्य अशोक बागवे सर तर मला कोलेजात शिकवायलाच होते. मराठीच्या तासाला सुंदर गुंगी यायची. ऐकत राहावं असं बोलायचे..

आमचे कविवर्य महेश केळूसकर सर.. त्यांनी तर आता मला दम दिला आहे..आणि माझं सगळं लेखन घेऊन घरी बोलावलं आहे.. आता पुस्तक काढण्याकरता ते माझा पिच्छा पुरवणार आहेत..

"तात्या..अरे लेका तुला अजून माहिती नाही.. तुझा दर्जा काय आहे ते.. तुझी लेखनाची रेंज काय आहे ते अजून तुला माहित नाही... फोरासरोड ते शास्त्रीय संगीत ते राजकारण - समाजकारण ते ललित लेखन... तात्या..तुझं पुस्तक बाजारात आलं तर महाराष्ट्राला एक अव्वल दर्जेदार लेखक मिळेल.. भल्याभल्यांची छुट्टी करशील तू.."







यातला शब्द आणि शब्द महेश केळुस्कर सरांचा आहे.. महेश केळूसकर यांच्यासारख्या आजच्या घडीच्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या कौतुकाच्या त्या दोन शब्दांनी मला खरंच खूप बरं वाटलं..

आमचे मित्र कविवर्य आणि संवेदनशील अभिनेते किशोर सौमित्र यालाही माझं कौतुक आहे..

मी या सगळ्यांचा फक्त आणि फक्त कृतज्ञ आहे..

___/\___

-- तात्या अभ्यंकर..

February 01, 2016

पंगतीची परंपरा...

हल्ली निदान पुण्या-मुंबईच्या तरी लग्नामुंजीत पंगतीची पद्धत गेली ती गेलीच..निदान मला तरी शेवटचा पंगतीत केव्हा जेवलो होतो ते आठवत नाही..

सगळीकडे जळले ते बुफे असतात. त्यामुळे जेवणही आता तितकंस छान मिळेनासं झालं आहे. कारण बुफेत डाळ, पुलाव, दोन पंजाबी भाज्या, एखादे बेचव पक्वान्न असा ठराविकच मेनू असतो..

व्यवस्थित सुरवातीचा वरणभात, मसालेभात, बटाट्याची छान पिवळी धमक भाजी, पंचामृत, खिरीचा चमचा, थोडं पुरण, तोंडल्याची रसभाजी किंवा अळूची लग्नी भाजी.. असा व्यवस्थित स्वयंपाक हल्ली दुरापास्त झाला आहे..

हल्ली बुफेमध्ये अंगूर मलाई, मुगाचा हलवा अशी तीच तीच बेचव पक्वान्न असतात..गुलाबजाम असले तरी ते पारंपारिक पद्धतीचे नसतात..gits type बेचव असतात..

झकास जिलब्यांचे ताट घेउन किंवा श्रीखंडाचं पातेलं घेउन कुणी जोरदार वाढायला येत नाही..यजमान मंडळी सावकाश जेवा असं सांगत पंगतीतून फिरत नाहीत...

लाचारासारखं हातात थाळी घेउन लायनीत उभं रहायचं.. आणि अन्नछत्रात जेवल्यासारखं जेवायचं.. छ्या..!

सुरवाती सुरवातीला बरी वाटलेली ती बुफेची पद्धत आता एक बांडगूळ झाली असून तिने पंगतीची परंपरा गिळून टाकली आहे..

म्हणून आत्ताच सावध व्हा.. आपल्या परंपरा जपा रे बाबानो...

-- (खिन्न) तात्या..

परंपरा...

मला गाणं आणि खाणं यात जराही कुठे परंपरा ढळलेली आढळली की ते एखाद्या कुलीन स्त्रीचा पदर ढळल्यासारखं वाटतं..

नाविन्य..नवे नवे प्रयोग वगैरेसारख्या गोष्टी मला गाण्या-खाण्यात रुचत नाहीत..कदाचित माझा तो दोष असू शकेल.. मान्य आहे..!

पण आपल्या पूर्वजांनी गाण्या-खाण्यात हजारो वर्षांपूर्वीच योग्य ते बदल करून संशोधन करून या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत.. त्या तशाच हव्यात.. वैद्यकीय क्षेत्रात म्हणा किंवा शेती-तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणा.. नवे नवे शोध, नवी तत्र यांचे स्वागतच आहे..

परंतु यमनमध्ये किंवा मालकंस मध्ये तुम्ही आता नवे शोध लावायला जाऊ नका. फ्युजन वगैरे सारखे घाणेरडे प्रकार करू नका..

दही चांगले घट्ट बांधून त्याचा चक्का टांगत ठेवणे ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी सिद्ध केलेली आहे. तिथे बदल करायला तुम्ही जाऊ नका.. रबडीही चुलीवर पितळेच्या कढईत चांगली आटवत आटवतच होते..instant रबडी mix हा गलिच्छ प्रकार आहे..

उत्तम गोश्त बिर्याणी करायला चार-सहा तास लागतात.. तिथे काहीही instant चालत नाही.. एकूणातच गाण्या-खाण्यात instant या शब्दालाच मज्जाव आहे..

जुनं आहे ते सगळं कृपया तसंच राहू द्या.. त्यात शाणपणा करून त्या गोष्टी instant करायला जाऊ नका. उत्तम खवा चांगला मळून आणि मग ते गुलाबजाम तळताना चांगले आतपर्यंत शिजू द्या..आणि मगच पाकात टाका.. gits चे भिकारडे गिळगिळीत instant गुलाबजाम खाऊ नका..

तूप-गूळ पोळीच्या गुंडाळीला गुंडाळीच म्हणा किंवा कुस्करा म्हणा..त्याला franky हे दळभद्री नाव देऊ नका..

नाथ हा माझा हे पद नाट्यसंगीतासारखच म्हणा... त्याचं भावगीत करू नका..

मला नाही आवडत असं कुठलंही नाविन्य.. कदाचित माझा तो दोष असू शकेल..

-- (गाण्या-खाण्यात कट्टर परंपरावादी) तात्या.. 

December 30, 2015

पाडगावकर..

आज पाडगावकर गेले. वयस्कर होते. एक ना एक दिवस जाणारच होते, ते आज गेले.

Normally कुणी दिवंगत झालं की पहिल्या दिवशी खूप दु:ख होतं आणि जसा काळ जाईल तसं ते दु:ख कमी होत जातं.. यावर आपण 'काळ हाच खरा वैद्य. तो भल्या भल्या जखमा बुजावतो..' असं म्हणतो..आणि पुढील वर्ष-दोन वर्षात माणसं सावरतात..

परंतु पाडगावकर यांच्या सारख्या मंडळींच्या बाबतीत निदान माझा तरी नेमका उलटा अनुभव आहे..

मला आज दु:ख झालं असलं तरी ते तितकंसं जाणवत नाहीये..परंतु जसा जसा काळ जाईल तसं हे दु:ख तीव्र होईल. आपण काय गमावून बसलो आहोत याची कल्पना मग जास्त त्रास द्यायला लागेल..

हाच अनुभव मला बाबूजी, भीमण्णा, भाईकाका, हृषिदा..किशोरदा, पंचमदा..यांच्या बाबतीत आला आहे.. यांच्यासारखी मंडळी तात्कालिक तेरा दिवसांचं किंवा वर्षभराचं दु:ख देत नाहीत. ही मंडळी कधीही भरून न येणा-या Long Term खोल जखमा देवून जातात..!

पाडगावकरही त्यांच्यापैकीच..!

कुमार किंवा अण्णांची एखादी गाण्याची मैफल ऐकली की दुस-या दिवशी अधिक त्रास होतो आणि मग मन सैरभैर होऊ लागतं..!

-- तात्या अभ्यंकर..