March 28, 2012

पंथी हू मे उस पथ का..

तो गायक होता,
तो गवई होता,
तो रंगीला होता,
तो रसीला होता,
तो दर्दभरा होता,
तो गोड होता,
तो कमालीचा सुरेल होता,
तो लयदार होता,
तो पेचदार होता,
तो अष्टपैलू होता,
तो अवलिया होता,
तो एकमेवाद्वितीय होता,
तो जीनियस होता...!

हम जवान थे उन दिनोंकी बात है! माझ्या महाविद्यालयीन आयुष्याचे ते दिवस होते. वर्ष १९८७. असेन बहुधा तेव्हा एफ वाय किंवा एस वाय बी कॉमच्या वर्षाला. केट्या नेहमीच पडत त्यामुळे नक्की कितवीत होतो ते आता आठवत नाही. सुरांची आवड अगदी लहानपणापासून.. गाणं ऐकत होतो, मधुकरवृत्तीने टिपत होतो, कुणा भल्या गुणीजन मंडळींच्या पायाशी बसून कधी कधी शिकतही होतो. सूर म्हणजे काय, लय कशाला म्हणतात ही न सुटणारी कोडी उलगडण्याचा प्रयत्न करत होतो. दिवस मोठे मजेत जात होते. कालेजच्या उपाहारगृहातील माझ्या भसाड्या मैफली, गप्पाटप्पा, सतत मित्रमैत्रिणींच्या गराड्यात असे मी. भारूनच जाण्याचे दिवस होते ते!त्या दिवसात अखंड साथ होती ती त्याच्या गाण्यांची! (तशी ती अगदी आजही आहे म्हणा!)

जाने क्या सोचकर, मंजिले अपनी जगह, मुसाफिर हू यारो, आनेवाला पल जानेवाला है, मे शायर बदनाम, ये क्या हुआ, कुछ तो लोग कहेंगे, किसका रस्ता देखे, रातकली एक ख्वाब मे, पग घुंगरू बांधकर, हम है राही प्यार के, एक लडकी भिगी भागीसी......... यादी खूप मोठी आहे!

दिवसेंदिवस मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडत होतो. आणि बस! ठरवून टाकलं एके दिवशी. साला जायचंच एकदा त्याला भेटायला. एकदा तरी पायावर डोकं ठेवायचं याच्या! बस, ठरलं...!

"आपण जाणार त्याच्या घरी त्याला भेटायला..! जाहीर करून टाकलं दोस्तलोकांत!

"तो खूप व्हिम्झिकल आहे", "तिथे तुला कोण ओळखतो? हाकलून देतील...!" इत्यादी बर्‍याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. पण आपला इरादा पक्का होता. मुंबईत राहून त्याच्यासारख्या फिल्मी हस्तीचा पत्ता मिळणं मुळीच अवघड नव्हतं. जुहूचा पत्ता होता.

तो बहुधा १९८७ सालातला जानेवारी महिना होता. रविवारी ध्वनिमुद्रणं नसतात त्यामुळे साहेब घरी भेटतील असा भाबडा अंदाज बांधून एका रविवारी पोहोचलो एकदाचा जुहूला. जुहूतारा रोडवरील त्याचा बंगलाही अगदी लगेच सापडला. मुख्य द्वार खुलंच होतं. तसाच आत घुसलो. 'तो अत्यंत कंजूष आहे त्यामुळे रखवालदार वगैरे ठेवत नाही..' हे ऐकून होतो ते खरं होतं. दारावर मला अडवायला रखवालदार वगैरे कुणीही नव्हतं. बंगल्याच्या आवारात शिरलो. डावीकडेच 'चलती का नाम गाडी' शिणेमातली "बाबू, समझो इशारे.." या गाण्यातली ती गाडी उभी होती! एका क्षणात 'चलती का नाम गाडी' सिनेमातली काही दृश्य माझ्या डोळ्यासमोरून गेली! मी मनातल्या मनातच त्या गाडीला आदाब केला.

कधी काळी त्या गाडीत मधुबालाही बसली होती..!

बंगल्याच्या मुख्य दारापाशी गेलो, टकटक केली. आतून कुणा एका अत्यंत तिरसट माणसाने दरवाजा उघडला, तिरस्कार भरल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं.

"क्या है..?" भसाड्या आवाजात जोरात खेकसलाच तो इसम माझ्यावर.

"किशोरदासे मिलना है. मै उनका फॅन हू.."

"वो घरपे नही है...बाद मे आओ.." असं म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत फाडकन दार बंद केलं त्या इसमाने!

झालं! आमची ठाणा ते जुहू ही खेप एका क्षणात फुकट गेली होती. मित्रांच्यात हसं झालं. पण मला या सगळ्याचं काहीच वाटलं नाही. त्याच्यावरील माझी श्रद्धा तसूभरही कमी झाली नाही! मी त्याच्या घरी गेलो म्हणजे त्याने मला भेटलंच पाहिजे असा काही नियम नव्हता. अक्षरश: करोडो चाहते होते त्याचे, त्यापैकीच मी एक..!

१९८७ सालचाच एप्रिल महिना होता बहुधा. त्याच्याबद्दलचं आमचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं. एका रविवारी पुन्हा एकदा उठलो आणि तडक जाऊन थडकलो जुहूला! परत सगळा तोच सीन. मी बंगल्याच्या दरवाज्यावर टकटक केली. दोन पाच मिनिटं कुणीच दार उघडलं नाही. पुन्हा एकदा बेल मारली. आणि....

खुद्द आमच्या भगवंतानेच दार उघडलं! मी आनंद, आश्चर्य, इत्यादीमुळे थक्क. हिंदी चित्रपट संगीताच्या दुनियेतील बादशहा उभा होता माझ्यासमोर! पोशाख - टीशर्ट आणि हाफ प्यॅन्ट! क्षंणभर मला काय बोलावं ते कळेना.

"हम्म! बोलो?"

"आपका फॅन हू. आपसे मिलना था एक बार!" मी अडखळत, बिचकतच पुटपुटलो कसाबसा..!

"हम्म! मिल लिये? बहोत मेहेरबानी आपकी. दुबारा जरूर आना..."

इतकं म्हणून गुरुदेव पुन्हा आत निघून गेले! फरक इतकाच की मागल्या वेळच्या त्या माणूसघाण्या इसमाप्रमाणे या वेळेस माझ्या तोंडावर थाडकन दार नाही लावलं गेलं! आता बाहेर मी पुन्हा एकटाच उभा!

पुन्हा एकदा ठाण्याच्या वाटेला लागलो. पण या वेळेस प्रचंड आनंदात होतो. त्याचं दर्शन झालं होतं! सार्‍या जगातल्या काही मोठ्या गायकांपैकी एकाला मी भेटलो होतो काही क्षणांपूर्वीच.. त्या आनंदात मी घरी आलो. मित्रांना सगळी हकिकत सांगितली.

"अरे तात्या, काय तू पण? का जातोस त्याच्या घरी असा वारंवार अपमान करून घ्यायला? अरे एक नंबरचा चमत्कारिक आणि व्हिम्झिकल इसम आहे तो. आलेल्या पाहुण्यांवर कुत्रं काय सोडतो, लुंगी नेसून दात घासत घासत रेकॉर्डिंगकरता काय जातो!
अरे त्याच्या व्हिम्झिकलपणाच्या इतक्या कथा प्रसिद्ध असताना तू पुन्हा पुन्हा का जातोस त्याच्या घरी? तुला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही?"

त्याच्यापुढे कसला आलाय स्वाभिमान? ज्याच्या सुरांनी, लयतालांनी माझ्या आयुष्याचे अनेक क्षण समृद्ध केले त्याच्यापुढे कसला आलाय माझा मान नी अभिमान? होती ती फक्त कृतज्ञतेची भावना आणि भक्ति! त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात असेना का तो चमत्कारिक! पण मंडळी, विश्वास ठेवा, सच्च्या भक्तीचं फळ केव्हा ना केव्हातरी मिळतंच. तो अनुभव मला पुढे लौकरच आला. १९८७ सालचाच जुलै किंवा ऑगस्ट महिना असेल!

एका रविवारी आम्ही आपले पुन्हा एकदा जुहूला जायला सज्ज!

बंगल्याच्या दारावर टकटक केली. कुणा पोरसवदा नोकराने दार उघडलं. घरात घेतलं. मी काही बोलायच्या आतच दिवाणखान्यात असलेल्या एका सोफ्याकडे बोट दाखवत 'बसा.. 'असा इशारा करून तो पोरगा कुठेतरी आत निघून गेला. मी दिवाणखान्यातल्या त्या सोफ्यावर बसलो. समोरच्याच भिंतीवर दादामुनी, अनुपकुमार आणि किशोरदा या तिघांचाही मनमुराद हसतानाचा एक भलामोठा कृष्णधवल फोटो टांगलेला होता. साला, तो फोटो पाहूनच आपला दिल खुश झाला. फारच सुरेख फोटो होता तो! समोरच अजून एक सोफा होता. त्यावर एक हार्मोनियम ठेवली होती.

दोनच मिनिटात त्या मुलाने माझ्या पुढ्यात पाणी आणून ठेवले, चहाचा कप ठेवला आणि तो मुलगा पुन्हा एकदा अदृश्य झाला! च्यामारी, घरातल्या मालकाप्रमाणेच त्याची नोकरमंडळीही बर्‍यापैकी व्हिम्झिकल दिसत होती!

मी पुढ्यातला चहा संपवला. अर्धा तास तिकडे कुणीच आलं नाही की गेलं नाही. मी आपला तसाच त्या सोफ्यावर बसून होतो. थोड्या वेळाने मात्र माझं भाग्य उजळलं. वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून किशोरदा स्वत:च खाली येत होते. यावेळी झकाससा अंगरखा आणि लुंगी असा पोशाख होता गुरुजींचा! हातात कागदांची कसली तरी चळत होती. ते कागद चाळत चाळतच गुरुजी खाली उतरले आणि माझ्या पुढ्यातल्या सोफ्यावर येऊन त्या हार्मोनियमच्या शेजारी बसले. पुन्हा पाचदहा मिनिटं तशीच गेली. त्यानंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं.

"बोलो भाई, क्या काम है?"

या वेळेस मूड जरा बरा दिसत होता. मी पुन्हा 'आपका फॅन हू, आपसे मिलने आया हू.." असं म्हणत उठलो अन् डायरेक्ट त्यांच्या पायावरच डोकं ठेवलं!

"अरे अरे बस बस.."

"आओ बैठो.." असं म्हणून माझा हात धरत मला उठवलं व सोफ्यावर बसवलं.

तो मगासचा मुलगा पुन्हा एक अवतीर्ण झाला. आता त्याच्या हातात चहाचे दोन कप होते. एक किशोरदांपुढे आणि एक पुन्हा माझ्या पुढ्यात

"चाय पी लो बेटा..! कहासे आये हो? क्या सुनोगे?" असं म्हणून त्यांनी आता समोरची हार्मोनियम उघडली!

मी अक्षरश: हवेत तरंगत होतो. काहीच उत्तर देऊ शकलो नाही. किशोरदांनी चहाचा एक घोट घेतला. पेटीवर हात टाकला, काही कॉर्डस वाजू लागल्या आणि पंथी हू मै उस पथ का, अंत नही जिसका.. (मूळ गाणं आपण इथे ऐकू शकाल)

या गाण्याच्या ओळी अत्यंत अप्रतिम गुणगुणू लागले.

"इस पथ पर देखे कितने, सुखदुख के मेले
फूल चुने कभी खुशियोके, कभी काटोसे खेले..
जाने कब तक चलना है मुझे इस जीवन के साथ...!

मंडळी, खरंच काय वर्णन करू त्या सुरील्या दर्दभर्‍या आवाजाचं? शब्द अपुरे पडतात! एकच सांगतो मी त्या क्षणी माझ्या पत्रिकेतले सगळे ग्रह, सगळी नक्षत्र, कुठल्या कुठल्या ग्रहांच्या युत्या, या सगळ्याच गोष्टी फार उच्चीच्या होत्या. अक्षरश: जगभर प्रसिद्ध असलेला किशोरदांसारखा अवलिया गवई त्या क्षणी फक्त माझ्या एकट्याकरता गात होता..!


मी भारवलेल्या अवस्थेतच तेथून बाहेर पडलो!

क्षणभर मान्य करू की सुरवातीला लागोपाठ दोन वेळा माझा त्या घरात अपमान झाला. परंतु त्या दिवशी त्याच घरात माझा जो सन्मान झाला होता त्याचं मोल कशात करणार?

पण पुलंनी रावसाहेब रंगवताना लिहूनच ठेवलं आहे. "आमची आयुष्य समृद्ध करण्याकरता देवाने दिलेल्या मोलाच्या देणग्या या न मागता दिल्या होत्या, न विचारता परत नेल्या!

शेवटी त्याप्रमाणेच झालं."कभी अलविदा ना केहेना.." असं म्हणणार्‍या हिंदी सिनेसृष्टीच्या या अनभिषिक्त बादशहाने तुम्हा-आम्हाला मात्र शेवटचं अलविदा केलं! तारीख १३ ऑक्टोबर १९८७...!

किशोरदांना निरोप द्यायला माणसांचा महासागर उसळला होता. त्या गर्दीतच एक मीही होतो...! रडवेला झालेला त्यांचा एक चाहता! किशोरदांनी हार्मोनियमच्या सुरांच्या संगतीत त्यांच्या घरी ऐकवलेलं "पंथी हू मे उस पथ का.." हे गाणं मला त्या अफाट गर्दीतही माझ्या कानात रुंजी घालत होतं...!

-- तात्या अभ्यंकर.

March 15, 2012

एकवार पंखावरुनी...सात्विकता म्हणजे काय, गोडवा म्हणजे काय मन:शांती म्हणजे काय, हे सारं सार या गाण्यातनं कळतं..
हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..

'वने माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही'

याला म्हणतात यमन..!

'तुझ्याविना नव्हते कुणी आत अंतरात..!'

ही यमनकल्याणातली भक्ती..!

बाबूजींच्या स्वरातील आर्ततेविषयी, रसाळतेविषयी, गोडवेपणाविषयी मी काय बोलू..?

कुठे गेली आता अशी गाणी..?!

-- तात्या अभ्यंकर.

March 12, 2012

एकदाच यावे सखया...

एकदाच यावे सखया.. (येथे ऐका)

अशोकजी परांजपेंचे सुंदर शब्द असलेलं अशोक पत्की, सुमनताईंचं एक सुरेख गाणं. साधीच परंतु अत्यंत सात्त्विक अन् गोड चाल आणि सुमनताईंचा तितकाच गोड आणि हळवा गळा. 'सखया' हा शब्द खूप म्हणजे खूपच सुरेख!

पुन्हा गूज अंतरीचे हे कथावे व्यथांनी.. - ही ओळ खूप काही सांगणारी.

मध्यंतरीच्या काळात कुठेतरी अंतर पडले आहे, ते दूर व्हावे आणि पुन्हा एकदा तुझे गीत कानी यावे आणि 'भाव दग्ध विटला हा रे, पुन्हा फुलुनि यावा...!'

'पुन्हा फुलुनि यावा...' या ओळीतील पत्कीसाहेबांच्या अत्यंत हळव्या सुरावटीचं सुमनताईंनी अगदी सोनं केलं आहे. ही जागा त्यांच्या गळ्यातून इतकी सात्त्विकपणे उतरली आहे की क्या केहेने..! 'धुंद होऊनी मी जावे..' ही सुरावट देखील तशीच सुरेख...

प्रेमगीतातील ही सात्त्विकशीलता आणि मर्यादशीलता हल्लीच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. कितीही जरी निरनिराळ्या राजसी-तामसी पाककृती असल्या, आपण त्यांचा वेळोवेळी आस्वाद घेतला तरी अहो शेवटी केळीच्या पानावरील साधा गरमागरम वरणभात, सोबत साजून लोणकढं तूप याला जशी सर नाही ना, तसंच या गाण्याचं आहे. अखेर कुठेतरी तुम्हाला निवारा मिळेल आणि तुमचं मन शांत होईल ते 'एकदाच यावे सखया', 'केतकीच्या बनी', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' किंवा विठ्ठला तू वेडा कुंभार..' याचसारख्या गाण्यांमधून..!

पण आमचं हल्ली असं झालंय की आम्हाला 'कोलावरी डी..' सारखी गाणी हेच काय ते उच्च संगीत वाटतं आणि याचं कारण म्हणजे हल्लीच्या बाजारबसव्या वाहिन्या अशीच गाणी अगदी सतत तुमच्याआमच्या वर लादत असतात..


मग माझ्यासारखा नॉस्टालजियाने पछाडलेला एखादा खुळा उठतो आणि 'एकदाच यावे सखया..' या सारख्या गोड, अवीट गाण्याबद्दल आपलं मन मोकळं करतो इतकंच..!

-- तात्या अभ्यंकर.

March 09, 2012

झन झन झन झन पायल..

झन झन झन झन पायल.. (येथे ऐका)

पं मल्लिकार्जून मन्सूर..!

काय बोलू मी त्यांच्याबद्दल..? सिंहगडावरच्या देवटाक्याच्या पाण्याइतकाच स्वच्छ, शुद्ध, निर्भेळ आणि सात्विक माणूस. गवई म्हणून जितका मोठा, त्याहूनही अधिक एक सहृदयी माणूस..!

सोबत मन्सूरअण्णांच्या नटबिहागाचा दुवा दिला आहे. दूरदर्शनवरील कुठल्याश्या कार्यक्रमातील हे ध्वनिमुद्रण आहे. मन्सूरअण्णांना नटबिहागाची फर्माईश केली गेली आहे आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी मन्सूरअण्णांनी 'झन झन झन झन पायल..' ही बंदिश सुरू केली आहे. गाण्यातली सिद्धीच म्हटली पाहिजे ही..! अगदी पहिल्या स्वरापासून, पहिल्या समेपासूनच गाण्यात रंग जमवण्याची विलक्षण हातोटी या कलाकाराला लाभली होती.
गाण्याच्या सुरवातीलाच,

झन झन झन झन पायल मोरी बाजे
जागे मोरी सास ननदिया
और दोरनिया जठनिया..

असं म्हणताना मन्सूरअण्णा 'जठनिया' शब्दावर जी काही तानकृती करून समेवर येतात ते श्रोत्यांना अक्षरश: अचंब्यात पाडतं. त्यानंतर मध्यलयीच्या त्रितालात जमवलेल्या लहानश्या आलापातून, ताना-हरकतीतून प्रत्येक वेळेला 'झन झन झन झन..' चा मुखडा पकडून समेवर आलेले मन्सूरअण्णा..! अभिजात संगीतातील क्लिष्टपणा वगळून ते रंगतदार करणं ते हेच..!

सुरवातीची काही वर्ष ग्वाल्हेर गायकीची उत्तम तालीम लाभलेल्या मन्सूरअल्यांनी त्यानंतर भुर्जिखासाहेबांकडून जयपूर गायकीची रीतसर तालीम घेतली आणि त्यावर हुकुमत मिळवली. गोड, सुरीला गळा, दमसास, गाण्यातील लयदारपणा, बुद्धीवाद, तानेतील पेचदारपणा, नारायणराव बालगंधर्वांचे संस्कार असलेली-गळ्यात कुठेही अटकाव नसलेली पेचदार, लचिली परंतु अत्यंत सुरीली, दाणेदार अशी तान, सहजसुंदर असा तार षड्ज ही मन्सूरअण्णांच्या गायकीतील मर्मस्थळं, शक्तिस्थळं..!

MM

आणि या सार्‍याच्या उपर त्यांच्या गाण्यातील सहजता.. अगदी सहज एखाद्याशी गप्पा माराव्यात, काही संवाद साधावा अशी गायकी. असं वाटतं की मन्सूरअण्णा गात नाहीयेत तर आपल्याशी मस्त बोलताहेत, तो राग सहज सोपा करून समजावून सांगताहेत, त्यातली सौंदर्यस्थळं अगदी जाता जाता उलगडून दाखवताहेत..!
मन्सूरअण्णांच्या गायकीचे वरील वर्णन आणि त्यांचे गाणे एखाद्याला खूप साधे आणि सोपे वाटेल, परंतु त्यामागे असलेली त्यांची विद्या ही अतिशय अवघड आहे, दुर्लभ आहे हेही लक्षात घेतले पाहिजे..!

वयाची ऐशी ओलांडल्यानंतर कपाळावर भस्माचे पट्टे ओढलेला हा शुद्ध सात्विक देवाघरचा शैव एके दिवशी खरंच देवाघरी निघून गेला आणि हिंदुस्थानी रागसंगीताचा हा उत्साहाचा झरा कायमचा आटला..!

असो..

अशी माणसं एखाददाच होतात, पुन्हा पुन्हा होत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यकर.

March 01, 2012

तुपगुळपोळीची गुंडाळी..:)

श्रीमती किशोरी आमोणकर यांचे श्री. दत्ता मारुलकरलिखित चरित्र "गानसरस्वती" 
या पुस्तकाला श्री विनय हर्डीकर यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत श्री विनय हर्डीकर यांनी म्हटले आहे,

"गेल्या पन्नास वर्षातल्या कंठसंगीतामधल्या नायक (गायक नव्हे) कलाकारांची नावे द्यायला एका हाताचीच बोटे पुरेत. श्रीयुत मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी आमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी नावे घेतल्यावर बाकी सगळी नावे सहाव्या बोटावर येतात. "

श्री. हर्डीकर यांच्या मते नायक कलाकार म्हणजे "शिस्त मोडायची नाही पण नावीन्य आणि वैचित्र्य यांची मागणी पुरवून शिवाय संगीतामध्येही भर घालायची" हे करणारे कलाकार.

श्री हर्डीकरांच्या वरील विधानांचा विस्तृत समाचार घ्यावा व त्या निमित्ताने एखादा
संगीतविषयक लेखच प्रसिद्ध करावा या हेतूने हे लेखन करत आहे. वरील विधाने
हे केवळ निमित्त आहे, परंतु एकुणातच आजकाल अभिजात संगीतातील आवश्यक ठरत
चाललेल्या तथाकथित (सो कॉल्ड) नावीन्याबद्दल जो काही डांगोरा पिटला जात
आहे त्याबद्दलही आम्हाला काही भाष्य करावयाचे आहे.

एक गोष्ट मात्र सुरवातीलाच कबूल करतो की मज पामराला कंठसंगितात नायक व
गायक असे काही प्रकार असतात हेच ठाऊक नाही. आमच्या समजुतीप्रमाणे
कंठसंगीतामध्ये जो कंठाने गातो तो गायक आणि फक्त गायकच. आणि गायक म्हटला
की त्याच्याशी संबंधित असते ती त्याची गायकी. आता यात 'नायकी' चा संबंध
कुठे आला हे आम्हाला माहीत नाही..!

हे जे कुणी संगीतज्ञ (? ) हर्डीकर आहेत ते म्हणतात की  'श्रीयुत
मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित कुमार गंधर्व, श्रीमती
किशोरी अमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी नावे घेतल्यावर बाकी सगळी
नावे सहाव्या बोटावर येतात.' आता स्पष्टच सांगायचं झालं तर यातील
नायक-गायक हा आम्हाला केवळ एक फाजील शब्दच्छल वाटतो आणि हर्डीकरांच्या
रसिकतेविषयी आणि बहुश्रुततेविषयी शंका उत्पन्न होते. एक गोष्ट आम्ही
प्रथमच नमूद करतो की वरील ५ गायकांविषयी आणि त्यांच्या कलेविषयी आम्हाला
नितांत आदर आहे. आम्ही वेळोवेळी त्यांच्या उत्तुंग गायकीचा अनुभव घेतलेला
आहे व प्रसंगी आम्ही त्यांच्या गायकीसंदर्भात विस्तृत विवेचनही करू शकतो.
परंतु मुद्दा तो नाही. मुद्दा असा की काहीतरी गायक-नायक च्या अंमळ फाजील
शब्दच्छलाआड वरील ५ गायक हेच काय ते नायक (आणि पर्यायाने गायकसुद्धा!)
आणि मग अन्य सारे गवई काय रावसाहेबांच्या भाषेत केवळ 'मिरजेचे
ब्यँडवाले'?

मग अब्दुल करीमखासाहेब, सवाईगंधर्व, भास्करबुवा, नारायणराव बालगंधर्व,
मास्तर कृष्णराव, अंतुबुवा, विलायतहुसेन खासाहेब, वझेबुवा, गजाननबुवा,
जगन्नाथबुवा ही मंडळी कोण होती? गायक होती की नायक? प्रवाही, सुरेल,
लयदार, बोलांशी मस्त खेळणारे आमचे फैयाजखासाहेब काय नायक नव्हते? जयपूर
गायकीचा अत्यंत शांत व सुंदर आविष्कार करणारे निवृत्तीबुवा कोण होते?
गायक की नायक..? श्रोत्यांना स्वरदार लयीवर अक्षरशः: खेळवत झुलवत ठेवणारे
वसंतराव किंवा लयीवर आरूढ होऊन आक्रमक गायकी मांडणारे पं रामभाऊ मराठे ही
मंडळी कोण होती? गायक की नायक? खडीसाखरेसारखा गळा असणाऱ्या आणि अगदी
सात्त्विक गाणाऱ्या बापुराव पलुस्करांना तुम्ही काय म्हणणार? आणि लास्ट
बट नॉट द लीस्ट, आपल्या तेजस्वी स्वरात साऱ्या विश्वाला उजळून टाकणारे
स्वरभास्कर पं भीमसेन जोशी कोण होते? नशीब आमचं,भीमण्णांच्या गायकीबद्दल
हर्डीकरांचे विचार समजून घेण्याची आमच्यावर अद्याप वेळ आली नाही, आणि
येऊही नये! भीमण्णांच्या बाबतीत,

अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो,
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ॐकार भेटला गा..

असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर म्हणतात, तेवढाच अभिप्राय
आम्हाला आयुष्यभराकरता पुरेसा आहे. त्यावर कुणा अन्य वृषभाने आपला शेणाचा
पो न टाकलेलाच बरा!

उगाच काहीतरी 'गायक-नायक' चे शब्दमैथुन करायचे आणि हाताची बोटं मोजून
आपल्या दळिद्री आणि संकुचित रसिकतेचे प्रदर्शन करायचे याला काय अर्थ
आहे?!

आता जरा आम्ही येतो ते संगीतातल्या सो कॉल्ड नावीन्यावर!

अभिजात संगीताच्या दुनियेत 'नवीन काहीतरी करावं, नावीन्य पाहिजे' अशी एक
फॅशनेबल ओरड आम्ही तरी गेले बराच काळ ऐकत आहोत. ख्यालगायनात
मुख्यत्वेकरून असते ती त्या त्या ख्यालगायकाची अभिव्यक्ती आणि ती
करण्याची पद्धत. आता याचे अपवादात्मक व सन्माननीय उदाहरण म्हणजे पं कुमार
गंधर्व. मान्य, अगदी मान्य. कुमारांनी खऱ्या अर्थाने आपले विचार
मांडण्याकरता कुठल्याही प्रस्थापित घराण्याचा आधार न घेता आपल्या गायकीचा
स्वत:चा असा एक वेगळा ढाचाच निर्माण केला. कुमारांचा हा अपवाद मान्य..!

परंतु अन्य गायकांचं काय? अगदी भीमण्णांसकट असे कितीतरी उत्तुंग गायक
आहेत जे घराण्याच्या चौकटी मानतात आणि त्या चौकटीत राहून तितकाच उत्तुंग
आविष्कारही करतात. परंतु 'नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य! वैचित्र्य! ' असे
डराव डराव करणारे बेडूक हे दर पावसाळ्यात उपजतच असतात आणि पावसाळा संपला
की आपोआप नाहीसे होतात! आमचा या बेडकांवर राग आहे.

अहो घराणेदार-वळणदार गायकी म्हणून काही चीज आहे की नाही? तुम्ही परंपरेनं
चालत आलेली घराणेदार गायकी मानणार आहात की नाही? की नावीन्याच्या आणि
वैचित्र्याच्या नावाखाली सगळा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार माजवणार आहात?
खरंतर घराण्याची शिस्त अंगी बाणवून त्यात काही अभिव्यक्ती करण्याची तुमची
लेको कुवतच नाही. आणि मग तो दोष झाकण्यासाठी उगाच  त्यावर 'आम्ही
घराणेदार गायकी मानत नाही, आम्ही काहीतरी नवीन, वैचित्र्यपूर्ण शोधतो
आहोत' असे काहीसे शब्दमैथुनाचे इमले रचायचे झालं!

केवळ अलौकिक, अप्रतिम अशा चिजांचं भांडार असलेलं समृद्ध आग्रा घराणं आणि
त्यातले नोमतोमवाले, बोलबनाववाले आग्रा गवई, लोचदार-लयदार जयपूर गायकी
अधिक समृद्ध करणारे मन्सूरअण्णा आणि किशोरीताई (हर्डीकरांनी ही दोन नावं
जरी नावीन्यासंदर्भात घेतली असली तरी दोघेही जण घराण्यात राहूनच गातात
असे आमचे म्हणणे आहे! ), तर कुठे ग्वाल्हेरचा 'चमेली फुली चंपा.. ' चा
झुमऱ्यातला जमलेला रंगतदार हमीर, तर कुठे हिराबाई-भीमण्णांचा
हरिद्वारच्या गंगेइतका शुद्ध, सात्त्विक असा शुद्धकल्याण!

हे सारं सारं आपल्या घराणेदार गायकीनेच दिलं ना??

उगाच काय काहीतरी नावीन्याची आणि वैचित्र्याची थेरं माजवायची??

आता तुमचे ते अलीकडच्या काळातले महागडे कॉर्नफ्लेक्स की काय म्हणतात ते
दुधात बुडवून खायचे फ्लेक्स. क्षणभर मान्य करू की ते पौष्टिक असतात,
सात्त्विक असतात. अहो, पण कधीतरी तुम्ही तूप-गूळ घातलेला कुस्करलेल्या
पोळीचा 'भूकलाडू' खाल्ला आहे काय हो? कधीतरी गरम गरम पोळीवर थोडं तूप आणि
लसणीचं तिखट पेरून त्याची गुंडाळी करून खाल्ली आहे काय हो? अहो जळ्ळी
तुमची ती आधुनिक फ्रँकी का काय ती आत्ता आली, पण तिची मूळ कल्पना त्याच
आमच्या पारंपरिक गुंडाळीवर बेतलेली आहे हे तुम्हाला माहित्ये का?!

आधी नाकाला लोंबणाऱ्या शेंबडाच्या लोळ्या पुसायला शिका, किमान पहिली २५ वर्ष
तरी एखाद्या घराणेदार गायकीत मुक्तपणे वावरा, बुद्धी असेल तर
त्यातली डेप्थ शोधायचा प्रयत्न करा. खूप मोठं सात्त्विक समाधान मिळेल,
आनंद मिळेल!

नावीन्य! नावीन्य! वैचित्र्य वैचित्र्य! म्हणून नाचणं बंद करा.. ज्ञानी
व्हा, आनंदी व्हा, स्वानंदी व्हा, सुखी व्हा..!

तथास्तु.. :)

-- तात्या अभ्यंकर.