November 15, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१५) -- सरणार कधी रण?


सरणार कधी रण?
(येथे ऐका)

काही काही गाणी अशी असतात की ती केवळ ऐकायची आणि नकळत डोळ्याच्या कडा पुसायच्या! पं हृदयनाथ मंगेशकरांचं हे गाणं त्यापैकीच एक. अंतर्मूख करणारी चाल आणि संगीताच्या दुनीयेतली सारी बिरुदं जिथे संपतात, सारे स्वर, सार्‍या श्रुती जिथे हात जोडून उभ्या राहतात असा भारतरत्न लतादिदीचा स्वर!

अशी काय बरं पर्क्विझिटस् दिली होती महाराजांनी बाजीप्रभूंना? तगडं इयर्ली पॅकेज?, गाडी?, बंगला? तरीही तो महाकाय गडी त्या भयानक पावसाळ्या अंधार्‍या रात्री महाराजांना म्हणतो की 'राजे, आपण व्हा म्होरं, मी खिंड सांभाळतो!'

सगळंच अद्वितीय!

'पावनखिंडीत पाऊल रोवून,
शरीर पिंजे तो केले रण...!'

कुसुमाग्रज आपल्याला लाभले हे केवळ तुमचं-आमचंच नव्हे तर मायमराठी भाषेचं भाग्य!

--तात्या अभ्यंकर.

October 16, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१४) -- दिल चीज क्या है


दिल चीज क्या है...
(येथे ऐका)

खय्याम साहेबांनी बांधलेलं श्रीमंत, समृद्ध, सर्वार्थाने Rich म्हणता येईल असं हे मुजर्‍याचं गाणं!

सुरवातीला सारंगीच्या सुरासंगे येणारा आशाताईंचा थेट हृदयाला भिडणारा आलाप एका क्षणात सारी मैफल ताब्यात घेतो.

आशा भोसले! या बाईंचा आवाज किती सुरेख असावा, किती व्हर्सटाईल असावा याला काही सुमार? 'रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील..' असं अत्यंत सात्विकतेने, भक्तिभावाने गाणार्‍या आशाताई याच का? खरंच कमाल वाटते!

स्वच्छ निकोप आवाज, त्याचा लगाव आणि खानदानी बाज, सांभाळलेला मुजर्‍याचा लहेजा, ढंग, शब्दोच्चार, आलाप, हरकत, मधेच एखादी छोटेखानी दाणेदार तान, तार सप्तकात एखाद्या तळपत्या बिजलीगत पोहोचणारा आणि तेथील मध्यम-पंचम क्षणात उजळून टाकणारा आशाताईंचा तो दैवी स्वर! काय, कशी आणि किती दाद द्यावी आशाताईंना?!

सुंदर ठेके, त्याची लयीची वजनं, सारंगी-सतारीची सुंदर साथसंगत, जीवंतपणी दंतकथा बनलेल्या रेखा नावाच्या यक्षिणीचं दिसणं!

सगळंच लाजवाब!

--तात्या अभ्यंकर.

October 15, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१३) -- राजसा जवळी जरा बसा


राजसा जवळी जरा बसा..
(येथे ऐका..)

दिदीच्या स्वरातली एक उच्च दर्जाची बैठकीची लावणी.

पुरियाधनाश्रीच्या जवळची. शुद्ध मध्यमाचा अपवाद. 'कोणता करू शिणगार' मधला आश्चर्यकारकरित्या लागलेला शुद्ध मध्यम किंवा 'सांगा तरी काही..' दिल खलास करणारा तीव्र मध्यम! सगळाच चमत्कार! दिदीचा जवारीदार स्वर. एक एक श्रुती मोजून घ्यावी!

शब्द, चाल, दिदीची गायकी, ठेका, मधले संवादिनीचे तुकडे, सगळंच भन्नाट च्यामारी! लावणी संपतानाची दिदीची आलापी केवळ जीवघेणी!

त्या दिशी करून दिला विडा,
पिचला माझा चुडा, कहर भलताच!
भलताच रंगला काथ लाल ओठात!


क्या केहेने..!

-- तात्या अभ्यंकर.

October 11, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१२) -- ने मजसि ने


ने मजसि ने..
(यथे ऐका)

'ने मजसि ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला!' या गाण्यापाशी उत्तम काव्याच्या, उत्तम गायकीच्या सर्व व्याख्या पूर्ण होतात!

'नभि नक्षत्रे बहुत एक परि प्यारा
मज मातृभूमीचा तारा
प्रासाद इथे भव्य परि मज भारी,
आईची झोपडी प्यारी!'


सुरेख...!

बाबुजींनी केवळ हार्मोनियमच्या साहाय्याने गायलेलं हे गाणं! हे गाणं म्हणजे केवळ गाणं नव्हे. ती आहे बाबुजींची आयुष्यभराची स्वरसाधना. आयुष्यभराची स्वरतपस्या! त्यांनी गायलेल्या एकेका स्वरातून, एकेका शब्दातून आपल्याला दिसते ती त्यांची प्रखर देशभक्ति, सावरकर निष्ठा!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर! स्वातंत्र्यसूर्य सावरकर!

सावरकर महात्मा होते किंवा नाही ते माहीत नाही. नसतीलच बहुतेक! अंदमानात अनन्वीत छळ सहन करणं, हाताची सालपटं निघेस्तोवर काथ्या सोलणं/कुटणं, छाती फुटेस्तोवर कोलू पिसणं या गोष्टींपुढे 'महात्मा' हे बिरूद खरंच खूप तोकडं वाटतं!

-- तात्या अभ्यंकर.

October 02, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (११) -- मेरे मन ये बता


मेरे मन ये बता...
(येथे ऐका)

अलिकडच्या काळातलं शंकर-एहसान-लॉयचं शफाकत अमानत अलीने गायलेलं एक सुंदर गाणं. शब्द जावेद अख्तर साहेबांचे. अर्थ, चाल, लय, ठेका, चित्रिकरण, लोकेशनस् इत्यादी सर्वच गोष्टी अगदी छान जमून आल्या आहेत..

'बता' या अक्षरांनी तार षड्जापाशी केलेले मंजूळ knocking! या ठिकाणी लयीचा फार नाजूक टच आहे जो सुखावून जातो.

'मितवा' हा शब्द सुरेखच आहे. हा शब्द कानी पडला की एकदम आपलेपणा वाटतो. 'मितवा'वरच्या चार आवर्तनांच्या तार षड्जावरच्या ठेहेरावानंतर 'कहे धडकन' मधल्या कोमल निषादामुळे गाण्याला एक वेगळंच फिलिंग येतं!

गाण्यातल्या दोन कडव्यांमधले टाकलेले सांगितिक तुकडे आणि त्याचं ऍरेंजिंगही मस्त आहे. 'मितवा' तल्या 'वा' वर घेतलेल्या आकारच्या जागाही सुरेख आहेत. शंकर महदेवन या विलक्षण प्रतिभावानाने केलेली सरगमही सुंदर. त्या सरगमच्या पार्श्वभूमीवर राणीने केलेला नाचही छान. राणी दिसतेही सुरेख!

एकंदरीत या गाण्याला १०० पैकी १०० मार्क!
Smile

--तात्या अभ्यंकर.

September 14, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१०) -- गुरुरेको जगति त्राता


आजच्या तरूण पिढीतील अभिजात संगीत गायिका वरदा गोडबोले यांनी गायलेले -

'गुरुरेको जगति त्राता..'
(येथे ऐका)

मूळ मराठी गाणे - (दुर्दैवाने कुठेही उपलब्ध नाही)

सुखाच्या क्षणात, व्यथांच्या घणात
उभा पाठिशी एक अदृष्य हात
गुरू एक जगती त्राता...
(शब्द येथे वाचता येतील)

संस्कृत भाषांतर - (सौ अदिती जमखंडीकर)

सुखानां क्षणेषु व्यथानामाघातेषु
तिष्ठति पृष्ठे एकोऽदृष्यो हस्तः
गुरुरेको जगति त्राता....
(शब्द येथे वाचता येतील)

मूळ गाण्याला बाबुजींची पुरियाकल्याण रागातील सुरेख चाल. तीच चाल वरील संस्कृत गाण्याकरताही वापरली आहे.

किराणा घराण्याची उत्तम तालीम मिळालेल्या वरदाने हे गाणं खूपच छान गायलं आहे. सुंदर आवाज, उतम स्वरलगाव, सुरेल आलापी, लयतालावर चांगली पकड, दाणेदार तान ही वरदाच्या गाण्यातली वौशिष्ठ्ये म्हणता येतील.

राग पुरियाकल्याण. हा राग म्हणजे किराणा घराण्याचीच खासियत! आलापप्रधान गायकी गाता येण्याजोगा एक खानदानी राग. पुरियाकल्याण म्हणजे पुरिया आणि कल्याण या दोन रागांचं अद्वैत. पुरियाचा स्वभाव तसा गंभीर. पुरिया म्हणजे एखाद्या जबाबदार, बुजुर्ग अशा अनुभवसंपन्न व्यक्तिचं मनोगतच! पण पुरियाची सगळी सत्ता फक्त पूर्वांगातच. अवखळ, लोभसवाणा 'कल्याण' त्याला उत्तरांगात नेमकेपणाने गाठतो आणि त्याचा छानसा 'पुरियाकल्याण' होतो!

आपल्या घरात अशीच एखादी अनुभवसंपन्न, पण थोडी गंभीर अशी बुजूर्ग व्यक्ती असते. कुणी फारसं तिच्याजवळ गप्पाबिप्पा मारायला जात नाही. पण तिच्या नातवाला मात्र नेमकं कळतं की आजोबांना काय आवडतं आणि काय नाही ते! नातू अवखळपणाने धावत त्यांना बिलगतो आणि या गंभीर आजोबांच्या चेहऱ्यावर पटकन स्मित हास्य उमटतं! Smile

तद्वत, उत्तरांगात कल्याणाने गाठल्यावर 'पुरिया' त्या आजोबांसारखाच काही क्षणाकरता स्वत:चा स्वभाव विसरतो आणि त्याचा 'पुरियाकल्याण' बनतो!

-- तात्या अभ्यंकर.

June 15, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (९) -- हाथ छुटे भी तो..

स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी

'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले काही भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!

हाथ छुटे भी तो..!
'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम..!
हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!


पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर! 'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!
क्या केहेने..! बहुतही बढिया लिखा है. या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!


जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती! हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..!


'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

जगजित सिंग सारख्या अत्यंत सुरेल, तरल, ओल्या गळ्याच्या धनीने या गाण्याचं सोनं केलं नसतं तरच नवल होतं! हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

-- तात्या अभ्यंकर.

मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!

June 12, 2009

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (८) -- दो हंसोका जोडा

स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (७) -- मथुरानगरपती काहे तुम.


'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले काही भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!


दो हंसोका जोडा... (इथे ऐका)

सारंगीचे हृदयाला हात घालणारे सूर सुरू होतात आणि तिचा गळा भैरवीचे स्वर्गीय सूर गाऊ लागतो. सगळ्याच सुरांचं तिच्या गळ्याशी सख्य! नव्हे, गेली अनेक दशके हे सगळे सूर तिच्या गळ्यातच वस्तीला आहेत, तिच्या पुढ्यात हात जोडून उभे आहेत आणि त्यातला प्रत्येक सूर तिला विचारतो
आहे, "मेरे लायक कुछ सेवा?!"

तिचं नांव लता मंगेशकर!

मोरा सुखचैन भी, जीवन भी मोरा छीन लिया
पापी संसारने साजन भी मोरा छीन लिया!

वरील ओळीतील 'पापी संसारने साजनभी मोरा छीन लिया' म्हणताना 'साजन' शब्दावर जीवघेणी हरकत घेऊन त्यातील सूक्ष्म लयीला अत्यंत लीलया सांभाळत ती ज्या तर्हेने 'छीन' या शब्दावरील समेवर येते, तो संगीत क्षेत्रातला अद्भूत चमत्कार म्हटला पाहिजे!

रातकी आस गयी, दिनका सहाराभी गया
मोरा सूरजभी गया मोरा सितारा भी गया!

'मोरा सितारा भी गया' या शब्दांमधून भैरवीचं जे अगदी सहजसुंदर, नैसर्गिक रुपडं दिसतं त्याला तोड नाही!

अर्थपूर्ण शब्द, मन डोलायला लावणारा सुंदर ठेका, सारंगी-सतारीचा सुरेख वापर, सगळंच अप्रतीम! गजब, जुलम, रतिया बिताऊ, असूवन, मुशकील,डगरिया, उमरिया, इत्यादी शब्दांचे देहाती उच्चार केवळ दिदीनेच करावेत आणि केवळ तिनेच उभा करावा अवघ्या तीन मिनिटात भैरवीचा राजमहाल!

हे केवळ एक गाणं नव्हे! हा आहे जीवन समृद्ध करणारा आणि आयुष्यभर पुरणारा भैरवीचा अनमोल ठेवा! तुम्हाआम्हाला हा ठेवा भरभरून वाटणार्या त्या कवीला, नौशादमियांना, लतादिदीला आणि तबला-सारंगी-सतारीच्या त्या अज्ञात वादकांना सलाम..!

-- तात्या अभ्यंकर.


मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळाचे मुखपृष्ठ म्हणून आज हा लेख प्रसिद्ध झाला आहे!
‍‍

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (७) -- मथुरानगरपती काहे तुम.काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (१) -- आमार श्वप्नो तुमी
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (२) -- प्रथम धर घ्यान दिनेश
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३) -- मनमोहना बडे झुटे
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४) -- मेरी सांसो को जो
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (५) -- केनू संग खेलू होली
काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (६) -- अनाम वीरा


'काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे'चे पहिले सहा भाग उपक्रम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. परंतु तिथे अधिक काही लिहावं अशी माझी लायकी नाही, म्हणून हा सातवा आणि यापुढील सर्व भाग मी येथे प्रकाशित करणार आहे..!-- तात्या अभ्यंकर.


काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे ()

मथुरानगरपती काहे तुम...
(येथे ऐका किंवा येथे ऐका)
(शब्द - रितुपर्णो घोष, संगीत - देबोज्योती मिश्रा)रेनकोट चित्रपटातलं शुभा मुद्गलचं एक अप्रतीम गाणं. एक अतिशय सुरेख विरहिणी! वर वर पाहता एखाद्याला हे गाणं लोकगीतासारखंही भासू शकेल, परंतु या गाण्याला शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताची भारीभक्कम बैठक लाभली आहे.

सुबह का ख्याल आज

वापस गोकूल चल मथुरा राज..!

रागाच्या चौकटीतलं हे गाणं. यातला कोमल गंधार थेट हृदयालाच जाऊन भिडतो इतका हळवा आहे. 'वापस गोकूल चल मथुरा राज' या ओळीतल्या 'चल' या शब्दावरील शुद्ध रिषभ आणि पंचमाची संगती जीव लावून जाते!धीरे धीरे पहुचत जमुना के तीर


सुनसान पनघट मृदुल समीर


क्या बात है! अगदी डोळ्यासमोर दृष्य उभं रहातं! गाण्याचे शब्द तर सुरेखच आहेत. 'धीरे धीरे पहुचत जमुना के तीर' ही ओळ त्यातील शुद्ध गंधारामुळे अगदी उल्हासदायक, ताजी टवटवीत वाटते, परंतु पुढल्याच 'सुनसान पनघट मृदुल समीर' या ओळीतला सुनेपणा कोमल गंधार तेवढ्याच परिणामकारकतेने दाखवून देतो. ही ताकद केवळ स्वरांचीच! कोमल आणि शुद्ध या दोन्ही गंधारांमुळे हे गाणं विशेष श्रवणीय झालं आहे.मनोहर वेष, पी कुकुल, अकूल, पूर नारी, व्याकुल नयन, कुसुम सज्जा, कंटक शयन, मृदुल समीर, हे शब्द कानाला खूप छान लागतात, गोड लागतात!शुभा मुद्गलचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, इतक्या सुरेख रितीने तिनं हे गाणं गायलं आहे. अभिजात संगीताची उत्तम बैठक लाभलेल्या शुभाला स्वच्छ, मोकळा परंतु तितकाच सुरेल आवाजही लाभला आहे.हल्ली आपल्याकडच्या गाण्यांना ऑस्कर पुरस्कार मिळण्याचा जमाना आहे, आयटम साँगचा जमाना आहे! या पुरस्कारांच्या आणि आयटम साँगस् च्या भाऊगर्दीत असं एखादं सुरेख, जीवाला लागणारं गाणं ऐकलं की खूप बरं वाटतं!जय हो...!

-- तात्या अभ्यंकर.