November 12, 2008

प्रभात राग रंगती...

भल्या पहाटे 'ललत'
षड्ज मध्यमी मूर्च्छना
चालली 'भटियारा'ची
प्रभातरंगी अर्चना

डमडम डमरूची
आली 'भैरवा'ची स्वारी
तीव्र मध्यम वाढवी
'रामकली'ची खुमारी

कारुण्यमय 'तोडी'ची
'आसावरी'शी संगती
'अहिरभैरवा' संगे
प्रभात राग रंगती..!

-- तात्या अभ्यंकर.

हीच कविता इथेही वाचता येईल..

November 06, 2008

माझे काही "पाहण्याचे" कार्यक्रम... :)

राम राम मंडळी,

(ह्या लेखातल्या ष्टोर्‍या या सूर्याइतक्या सत्य आहेत. परंतु पात्रांची नावे मात्र बदलली आहेत!)

तसा मी वृत्तीने खुशालचेंडूच! आजपर्यंत लग्नकार्य वगैरे काही केलं नाही. नाही, म्हणजे एक मुलगी तशी मला खूप आवडली होती परंतु तिच्याशी काय आपलं लग्न जमलं नाय बुवा! आमच्या हृदयावर पाय का काय म्हणतात तो देऊन एक भल्या इसमाशी विवाह करून ती बया माझ्या लाईफमधून कायमची चालती झाली. परमेश्वर त्या दोघांना सुखी ठेवो. असो, तो विषय डिटेलमंदी पुन्ना केव्हातरी.

तर काय सांगत होतो? हां! तर आपण अजूनपर्यंत लगीनकार्य वगैरे काय केलेलं नाही. अलिकडे एकेका विवाहीत पुरुषांचे हताश, निराश, न्यूनगंडग्रस्त, वैफल्यग्रस्त, भितीग्रस्त चेहेरे पाहिले की मी लगीन केलं नाय, हे एका अर्थी बरंच झालं असं अजूनही मला वाटतं! साला, आपण आपले अद्याप खुशालचेंडू 'भवरा बडा नादान' आहोत तेच बरं आहे!

पण बरं का मंडळी, अद्याप जरी मी लग्न केलेलं नसलं तरी मुली पाहण्याचे कार्यक्रम मात्र आपण अगदी चिक्कार केले बरं का! ती हौसच होती म्हणा ना आपल्याला! मुली पाहण्याचे कार्यक्रम करत होतो तेव्हा लगीन करायचंच नाही असं काय ठरवलं नव्हतं. च्यामारी बगू, आवडलीच एखादी, समजा अगदीच भरली मनात आणि तिनंही जर आपल्याला पसंद केलं तर करूनदेखील टाकू लग्न! हा विचार मनात होताच. साला आता चाळीशीत खोटं कशापायी बोला? पण तो काय योग आला नाय. काही मुली मला पसंद पडल्या नाहीत आणि एखाद दोन मुली मला प्रथमदर्शनी पसंद पडल्या, परंतु च्यामारी त्यांना काय आपलं थोबाड आवडलं नाय!

ते असो. परंतु मुली पाहण्याचे जे काही कार्यक्रम केले ते काही अणुभव मात्र खरोखरीच मजेशीर होते. आमचे पिताश्री चचलेले आणि म्हातारी जरा पायाने अधू, त्यामुळे मुलगी पाहायला मी नेहमी एकटाच जात असे.

आता मंडळी, मला सांगा की मी तिच्यायला जन्मजात थोराड दिसतो, दोन पोरांचा बाप दिसतो हा काय माझा दोष झाला का? अहो दिसणं काय कुणाच्या हातात असतं का? साला, आम्ही म्यॅट्रिक पास झालो तेव्हाच बीकॉम झाल्यासारखे दिसत होतो त्याला आता आमचा काय इलाज? मग बीकॉम नंतर दोन वर्षांनी तर आम्ही अजूनच थोराड दिसत असणार! त्याचा अनुभव मला लवकरच एक मुलगी पाहायला गेलो होतो तेव्हा आला. एका भल्या मुलीच्या भल्या बापाने त्याच्या नकळतच आमच्या थोराडपणाचे धिंडवडे काढले होते!

बोरिवलीचं एक स्थळ होतं. जुजबी पत्रिका जुळली, फोनाफोनी झाली आणि एका रविवारी भल्या सकाळी मी त्या स्थळाचा बोरिवलीचा पत्ता हुडकत हुडकत त्या बिल्डिंगपाशी पोहोचलो. खाली नावांच्या पाट्या पाहिल्या. आमचं भावी सासर दुसर्‍या मजल्यावर होतं. पहिला मजला चढलो. जिन्यासमोरच्याच एका ब्लॉकचं दार उघडं होतं. बाहेरच्याच खोलीत कुणी काकू काही निवडत टीव्ही पाहात बसल्या होत्या. आमची नजरानजर झाली. माझ्या चेहेर्‍यावर नवख्या माणसाचे भाव होते. दुसरा मजला चढण्याकरता म्हणून मी वळलो तर मागून त्या काकूंची हाक ऐकू आली.

"कोण पाहिजे?"

"जोशी दुसर्‍या मजल्यावर राहतात ना? त्यांच्याकडे जायचंय."

"हो, हो, दुसरा मजला, ब्लॉक नंबर १०" काकू हासत हासत म्हणाल्या आणि आत वळल्या. मी तीन-चार पायर्‍या चढलो असेन नसेन, तोच मला त्या काकूंचा संवाद ऐकू आला. त्या बहुधा आपल्या 'अहों'शी बोलत असणार,

"बहुधा आरतीला पाहायला आले असावेत!"

छ्या! साला मी त्या आरतीला पाहायला जाणारा कुणी असेन किंवा तिच्या बापावर कोर्टाचं समन्स बजावणारा कुणी असेन! ह्या काकूला करायचंय काय!

दुसर्‍या मजल्यावर पोहोचलो. १० नंबरचा ब्लॉक जोश्यांचाच होता. मी दार ठोठावलं. एका सद्गृहस्थानं दार उघडलं. तो बहुतेक स्वत: जोश्याच असावा.

"नमस्कार. मी अभ्यंकर."

"या, या! आम्ही तुमचीच वाट पाहात होतो!" जोश्या शक्य तितक्या अदबीनं म्हणाला.

मी घरात शिरलो. जोश्या 'बसा' म्हणाला. पुढचा क्षण हा नियतीने आमच्या थोराडपणावर घातलेला घाला होता!

"हे काय? मुलगा कुठे आहे? तो नाही का आला?" जोश्याने आपलेपणाने, भोळेपणाने विचारलंन, परंतु आपण नक्की कुठला बाँब टाकला आहे याची त्या बिचार्‍या जोश्याला कल्पना नव्हती!

"मुलगा? अहो मीच मुलगा आहे!" :)

"हो का? वा वा वा!" जोश्या मनसोक्त हासत उद्गारला! :) :)

पुढची ष्टोरी सांगवत नाही!

तिथनं सुटलो आणि जिने उतरू लागलो. त्या पहिल्या मजल्यावरच्या तांदूळ निवडणार्‍या काकू दारातच उभ्या होत्या. त्या मला खो खो हासत आहेत असा उगाचंच मला भास झाला!

------------------------------------------------------------------------------------------------

बिवलकर! मुलुंडचं एक स्थळ. दुपारची ५ ची वेळ. ठरल्या वेळेनुसार मुलगी पाहायला म्हणून मी त्या घरी पोहोचलो. दारावरची बेल दाबली.

एका आठवी-नववीतल्या पोरसवदा मुलीने दार उघडलं. बहुधा नवर्‍या-मुलीची धाकटी बहीण असावी. पत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार मुलीला एक धाकटी बहीण आणि भाऊ आहेत हे मला आठवलं!

"नमस्कार. मी अभ्यंकर."

ती मुलगी दार उघडून खुदकन हासत आत पळाली. बहुधा ताईला "भावी जिज्जाजी आले बरं का!" हे सांगायला गेली असावी!

"या या!"

बिवलकराने माझं स्वागत केलं. खाली कारपेटवर उघड्या अंगाचा बिवलकर बसला होता. बसला कसला होता, पसरलाच होता जवळजवळ! पट्ट्यापट्ट्याची अर्धी चड्डी आणि उघडाबंब! छ्या! या बिवलकराला अगदीच सेन्स नव्हता. अरे तुझ्या मुलीला पाहायला मंडळी येणार आहेत ना? अरे मग निदान लेंगा आणि एखादा साधा शर्ट घालून तरी बस ना! पण मंडळी, मला तरी तो बिवलकर तसाच आवडला होता! सेन्सबिन्स गेला खड्ड्यात!

"बसा! काय म्हणताय? घर सापडलं ना पटकन? की शोधायला काही त्रास झाला?"

बिवलकरने जुजबी संभाषण सुरू केलं.

"छ्या! सालं मुंबईत काय भयानक उकडतं हो आजकाल!" एका टॉवेलनं मानेवरचा घाम पुसत बिवलकर म्हणाला! बिवलकराने एव्हाना माझ्यातला व्यक्तिचित्रकार जागा केला होता!

एकंदरीत ते घर मला फार आवडलं होतं, बिवलकर आवडला होता. अवघडलेपण जाऊन मीही तिथे अगदी लगेच रुळलो. आतल्या खोलीतून खाण्याचा सुंदर वास येत होता. हम्म! खायचा बेत कहितरी जोरदार असणार!

थोड्या वेळाने नवरीमुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. सोबत बिवलकरकाकूही होत्या. घरगुती साडीतल्या, दात अंमळ पुढे असलेल्या बुटक्याश्या बिवलकरकाकू तेवढ्याच साध्या आणि सालस वाटत होत्या.

"नमस्कार मेहेंदळे!" बिवलकरकाकू म्हणाल्या.

"मेहेंदळे??" साला, आता हा मेहेंदळ्या कोण? मला काही कळेना!

"आग्गं! कम्माल आहे तुझी पण!" बिवलकर डाफरलाच जवळजवळ!

"अगं हे मेहेंदळे नाहीत, अभ्यंकर आहेत!"

बिवलकर आता बायकोवर चांगलाच वैतागला होता. आईने केलेल्या नावाच्या घोटाळ्यामुळे नवर्‍यामुलीचा चेहराही एव्हाना कसनुसा झाला होता.

"अभ्यंकर? अरे हां हां! बरोबर! अभ्यंकरच. सॉरी हां, माझा जरा घोटाळा झाला. मेहेंदळे सात वाजता यायच्येत!"

असं म्हणून भाबडेपणाने, मोकळेपणाने हासत काकू उद्गारल्या! छ्या! मला तर आता त्या मुलीपेक्षा काकूच जास्त आवडू लागल्या होत्या!

इथे बिवलकराच्या कपाळावर पुन्हा एकदा आठ्या चढल्या होत्या. वेंधळ्या बायकोने मेहेंदळे नावाची कुणी अजून एक पार्टी त्यांच्या मुलीला पाहायला सात वाजता येणार आहे ही माहिती उगाचंच उघड केली होती!

नवर्‍यामुलीशी, बिवलकर फ्यॅमिलीशी माझ्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. जरा वेळाने मात्र त्या बिवलकरकाकूंचा मी आजन्म ऋणी राहीन असा बेत पुढ्यात आला. अप्रतीम चवीचा वांगी-भात, सोबत तितकीच सुंदर काकडीची कोशिंबिर आणि घरी केलेली अतिशय सुरेख अशी नारळाची वडी! माझ्यातला लाजराबुजरा नवरामुलगा केव्हाच पळाला होता आणि रसिक खवैय्या जागा झाला होता. मी मनमुराद दाद देत त्या बेतावर तुटून पडलो! स्वत: बिवलकर आणि बिवलकर काकू मला आग्रहाने खाऊ घालत होते. वांगीभाताचा आग्रह सुरू होता, नको नको म्हणता दोनपाच नारळाच्या वड्याही झाल्या होत्या!

"अहो घ्या हो अभ्यंकर! अहो लग्न जमणं, न जमणं हे होतच राहील. पण तुम्ही इतकी दाद देत आपुलकीने खाताय हीच आमच्याकरता खूप मोठी गोष्ट आहे!" बिवलकरकाकूंमधली अन्नपूर्णा प्रसन्नपणे मला म्हणाली!

मंडळी, बिवलकरांच्या मुलीने मला पसंद केलं की नाही किंवा मी तिला पसंद केलं की नाही हा भाग वेगळा, परंतु आजही वांगीभात म्हटलं की मला बिवलकरकाकू आठवतात! तसा खमंग आणि चवदार वांगीभात मी पुन्हा कधीच खाल्ला नाही!

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल...

November 01, 2008

आमचे मधुभाई...!

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या सर्वेश सभागृहात मधुभाईंची एक अत्यंत रंगलेली मैफल. तबल्याच्या साथीला तालयोगी पं सुरेश तळवलकर. श्रोतृवर्गात पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर, पं अरूण कशाळकर, पं उल्हास कशाळकर आणि यांसारखे अनेक उत्तम कलाकार. यमन रागाने मैफलीला सुरवात व पुढे संपूर्ण मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेलेली! यमन, सावनी, बसंतबहार असे एकापेक्षा एक सुरेख राग मघुभाईंनी लीलया पेश केले व श्रोत्यांना स्वरलयीच्या आनंदात अक्षरश: न्हाऊ घातले. मी त्या मैफलीचा साक्षिदार होतो. मधुभाईंच्या काही मोजक्याच मैफली ऐकण्याचं परमभाग्य मला लाभलं आहे!

"बाजुबंद खुली खुली जाए.."

मधुभाईं अगदी रंगात येऊन भैरवीच्या सुरांची लयलूट करत होते. 'बाजुबंद...' मधल्या एकसे एक खानदानी, थेट 'दिलसे' आलेल्या जीवघेण्या जागा! जागा कसल्या, बाजुबंद, पाटल्या-तोडेच त्या! श्रोते मंडळी अक्षरश: चुकचुकत होती, हळहळत होती, रडत होती आणि त्या शापित यक्षाला दाद देत होती!

मधुकर गजानन जोशी, ऊर्फ पं मधुकर जोशी, ऊर्फ आमचे मधुभाई! गाण्यातला एक शापित यक्ष!
मुक्काम पोस्ट - डोंबिवली.

विलक्षण सांगितिक प्रतिभा लाभलेला एक गुणी कलाकार. पण लौकिक अर्थाने फारसा पुढे न आलेला, फारसा कुणाला माहीत नसलेला!

मधुभाईंना घरातनंच संगीताचं बाळकडू मिळालेलं. आजोबा पं अंतुबुवा जोशी. थोरल्या पलुसकरांच्या शिष्यपरंपरेतले ग्वाल्हेर गायकीचे एक दिग्गज गवई! वडील पं गजाननबुवा जोशी. ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकी पचवलेले एक अत्यंत प्रतिभावन गवई आणि तेवढेच थोर गुरू! पं उल्हास कळाळकर, पं अरूण कशाळकर, विकास कशाळकर, पद्मा तळवलकर, शुभदा पराडकर यांसारख्या गायकांना ज्यांनी घडवलं असे गजाननबुवा! घरातच गाणं असल्यामुळे साहजिकच संगीताचे सूर मधुभाईंच्या कानावर जन्मापासूनच पडलेले.

कुशाग्र बुद्धीचा मधु भराभर गाणं उचलू लागला, टिपू लागला. भूप, यमन, मुलतानी, हमीर, छायानट, शंकरा, बिहाग, बसंत, सोहोनी आदी राग मधुभाईंच्या गळ्यावर चढू लागले आणि खास ग्वाल्हेर परंपरेचं अष्टांगप्रधान गाणं मधुभाई गाऊ लागले. गजाननबुवांना ग्वाल्हेरसोबतच आग्रा आणि जयपूरचीही अतिशय उत्तम तालीम मिळालेली, त्यामुळे मधुभाईंनाही साहजिकच या गायकींचं बाळकडू घरातच मिळालं! रायसा कानडा, ललिता गौरी, शुद्धनट, बसंतीकेदार यांसरखे एकापेक्षा एक सुरेख व दिग्गज राग मधुभाईही लीलया गाऊ लागले, मांडू लागले! सूरलयतालावर मधुभाईंची अफाट हुकुमत निर्माण झाली. बालपणीची काही वर्ष आजोबांकडूनही, म्हणजे अंतुबुवांकडूनही मधुभाईंना तालीम मिळाली. त्यानंतर वडिलांचं,म्हणजे गजाजनबुवांचं गाणं मधुभाईंनी अक्षरश: टिपलं, वेचलं! मुळात घरात गाणं, रक्तात गाणं, त्यात उत्तम तालीम आणि त्याला जोड म्हणून मधुभाईंची कुशाग्र बुद्धी! मधुभाईंमधला उत्तम गवई घडवायला या गोष्टी पुरेश्या होत्या!

गाण्याच्या सोबतीनेच व्हायोलीनचाही छंद मधुभाईना जडला आणि मधुभाई व्हायोलीनदेखील अतिशय उत्तम वाजवू लागले. गजाननबुवा स्वत:ही अगदी उत्तम व्हायोलीन वाजवायचे. लेकाने वडिलांचा हाही गूण अगदी सहीसही उचलला. पुढे काही वर्ष व्हायोलीनवादक म्हणून स्टाफ आर्टिस्ट या पदावर मधुभाईंनी मुंबई आकाशवाणीवर नोकरीही केली! मधुभाई व्हायोलीनही फार सुरेख वाजवतात!

मला मधुभाईंची मुलुंड मध्ये झालेली एक गाण्याची मैफल आठवते. मधुभाईंनी तेव्हा भूप मांडला होता. इतका अप्रतीम भूप मी त्यानंतर आजतागायत ऐकलेला नाही! ग्वाल्हेर पद्धतीने सादर केला गेलेला अगदी ऑथेन्टिक भूप! भूपासारख्या अत्यंत अवघड रागाचं शिवधनुष्य मधुभाईंनी अगदी लीलया पेललं होत! त्याच मैफलीत मधुभाईंनी तेवढ्याच सुंदरतेने ललितागौरी मांडला. 'प्रितम सैया..' ही ललितागौरीतली पारंपारिक बंदिश! ओहोहो, क्या बात है! मधुभाईंच्या ललितागौरीतल्या त्या "प्रितम सैया, दरस दिखा..."च्या त्या विलक्षण सुरांनी त्या संध्याकाळी अक्षरश: अंगावर काटा आणला. सगळी मैफलच त्या ललितागौरीने मंत्रमुग्ध होऊन गेली! आधी ग्वाल्हेर परंपरेतला भूप, ग्वाल्हेर गायकीच्या सौंदर्याची उधळण करत गाणारा हा शापित यक्ष नंतर जेव्हा त्याच ताकदीने जयपूर गायकीही तेवढ्याच समर्थपणे मांडत ललितागौरीही गाऊ लागला तेव्हा श्रोतृवर्ग अक्षरश: थक्क झाला. आजही ती मैफल मला आठवते आणि मी बेचैन होतो!

मंडळी, माझं भाग्य हे की मला मधुभाईंचा अगदी भरपूर सहवास लाभला. त्यांच्याकडून मला गाण्यातलं खूप काही शिकायला मिळालं आहे, आजही मिळतं आहे! अगदी कधीही त्यांच्या घरी जा, मधुभाई अगदी हसतमुखाने स्वागत करणार! मंडळी तुम्हाला काय सांगू, आमचे मधुभाई स्वभावानेही अगदी साधे हो! वास्तविक इतका विद्वान गवई परंतु त्या विद्वत्तेचा कुठेही गर्व नाही की शिष्टपणा नाही!

"मधुभाई, जरा ती यमनमधली "नणंदीके बचनवा सहे ना जाय.." ही बंदिश दाखवा ना!" असं नुसतं म्हणायचा अवकाश की लगेच मधुभाईंनी केलीच सुरू ती बंदिश! आणि मग ती गातांना तिचं सौंदर्य कुठे आहे, कुठे आघात द्यावा, शब्दांचा कसा कुठे उच्चार करावा, एखाद्या रागाकडे कसं बघावं, रागात काय मांडावं, कसं मांडावं, तालालयीचे हिशेब कसे साभाळावेत, कुठल्या रागाचं किती पोटेन्शियल आहे ते ओळखून कसं गावं, इत्यादी अनेक गोष्टींवर मधुभाई अगदी भरभरून बोलतात, हातचं काहीही राखून न ठेवता शिकवतात!

"अरे ताला-लयीशी खेळा रे, पण तिच्याशी मारामार्‍या नका करू! सम कशी सहज आली पाहिजे, तिला मुद्दामून ओढून-ताणून आणू नये! हां, आणि समेवर येण्यात वैविध्य पाहिजे, एकाच एक पद्धतीने समेवर येऊ नये! तुम्ही एखाद्याशी बोलताय, संवाद साधताय असं गायलं पाहिजे!"

मधुभाई सांगत असतात, शिकवत असतात, आम्ही शिकत असतो!

एका शिष्येला गाण्याची तालीम देताना मधुभाई -आमच्या मधुभाईंचा स्वभावही अत्यंत बोलका आहे. सतत गाण्यातल्या कुठल्या ना कुठल्या विषयावर गप्पा मारतील, गजाननबुवांच्या, अंतुबुवांच्या, अन्य जुन्याजाणत्या बुजुर्गंच्या आठवणी सांगतील. मधुभाईंनी गाण्यातला खूप मोठा जमाना बघितला आहे, अनेक दिग्गज गवई अगदी भरभरून ऐकले आहेत. जगन्नाथबुवा, अण्णासाहेब रातंजनकर, मिराशीबुवा, कितीतरी गवयांची गाणी मधुभाईंनी अगदी भरभरून ऐकली आहेत! आणि घरात काय, साक्षात अंतुबुवा आणि गजाननबुवा! या सग़ळ्या मंडळींकडून मधुभाई खूप काही शिकत गेले, शिकले!

"अरे गजाननबुवांना मी फार घाबरायचो बरं का! खूप मार खाल्ला आहे मी बुवांच्या हातचा!" मधुभाई मोठ्या मिश्किलपणाने आपल्या वडिलांबद्दल बोलत असतात!

"काय सांगू तुला लेका, आमच्या नानांच्या (गजाननबुवांच्या) वार्‍यालाही मी फारसा उभा रहात नसे. शिक म्हटलं की चुपचाप शिकत असे. उल्हासला, पद्माला किंवा त्यांच्या इतर शिश्यांना तालीम द्यायचे तेव्हा मीदेखील तिथे हळूच जाऊन बसत असे आणि काय गातात,कसं गातात या सगळ्या गोष्टी टिपत असे! पण मी भाग्यवान रे, मला शेवटची काही वर्ष वडिलांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं! म्हातारपणी त्यांच्या हातापायांना मालिश करावं लागत असे तेव्हा त्यांना मीच लागायचो. दुसरी कुणी भावंडं गेली की म्हणायचे, तुम्ही नको, मधुला बोलवा!" तीच सेवा आज थोडीफार उपयोगी पडते आहे आणि चार स्वर गाता येत आहेत!"

खरंच मंडळी, गाण्याची अन् गाणार्‍यांची ही विलक्षणच दुनिया आहे. भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर या दुनियेतली कुळं निराळी, इथले कुळाचार निराळे! मधुभाईंसारख्या जिनियस गवयाचा उल्लेख मी काही वेळा 'शापित यक्ष' असा का केला आहे याची कारणमिमांसा मी इथे करणार नाही! पण कारणमिमांसा जरी करणार नसलो तरी तो एक शापित यक्ष आहे हे नाकारता येणार नाही व म्हणून फक्त तसा उल्लेख मात्र मला करणं भाग आहे, नव्हे तो मी मुद्दामून केला आहे! परंतु बस इतकंच! लौकिक अर्थाच्या दुनियेत या शापित यक्षाचं स्थान काय आहे, काय नाही याच्याशी मला काही एक देणंघेणं नाही! माझा मतलब आहे तो त्यांची गायकी, त्यांचे सूर आणि त्यांची लयकारी, सरगमवरची त्यांची विलक्षण हुकुमत, याच्याशी! मधुभाईंसारखे गवई कुठच्या एका अज्ञात परंतु विलक्षण अश्या तिडिकेतून गातात, कुठली एक कसक त्यांच्यात संचारते आणि ते स्वरलयींची अप्रतीम अशी शिल्प घडवतात त्या तिडिकेबद्दल, त्या अज्ञात शक्तिबद्दल मी पुन्हा केव्हातरी बोलेन! अगदी भरभरून आणि मनमोकळेपणाने! हातचं काही राखून ठेवता! एक गोष्ट मात्र खरी की मधुभाईंसारखे काही गवई, काही कलाकार, हे लौकिक अर्थांच्या चौकटीत नाही बसत आणि त्यांना तसं बसवूही नये! कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं काही आपल्याला माहीत नसतात! करायचंच असेल तर आपण फक्त त्याच्या कलेला वंदन करावं! असो...!

आमच्या मधुभाईंना नॉनव्हेज जेवण फार प्रिय बरं का मंडळी! मी कधी डोबिवलीला त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो की मुद्दामून म्हणतो,

"बुवा, आज जेवायला बाहेर जाऊया बरं का! सत्कार हॉटेलात मालवणी जेवण फार झकास मिळतं तिथे जाऊया!"

हे ऐकल्यावर बुवांच्या चेहेर्‍यावर एक निरागस आनंद पसरतो परंतु मला म्हणतात,

"अरे कशाला तुला उगाच खर्च? बरं चल, म्हणतोस तर जाऊया! पण पैसे मी देईन हो!"

"ते आपण बघुया बुवा! तुम्ही चला तर खरे!"

"बरं चल!"

असा आमचा संवाद होतो आणि आम्ही बाहेर जेवायला जातो. रस्त्याने एका दिग्गज गवयासोबत चालल्याची ऐट असते माझ्या चेहेर्‍यावर!

तात्या आणि मधुभाई मालवणी मटणाचं जेवत आहेत!"आज सुरमई घेऊ या का रे? ताजी दिसते आहे!"

थोड्याच वेळात सुरमईची कढी आणि तळलेली तुकडी असलेली ताटं आमच्या पुढ्यात येतात!

"आणि बरं का रे, मटणसुद्धा मागव रे! आज जरा मन लावून मटणही खाईन म्हणतो!"

एखाद्या लहान मुलाने ज्या निरागसतेने चॉकलेट मागावं ना, अगदी तीच निरागसता मटण मागवताना आमच्या बुवांच्या चेहेर्‍यावर असते! त्यांची मटणाची फर्माईश पुरी करायला मला अगदी मनापासून आवडतं! कारण मी त्यांना फक्त तेवढंच देऊ शकतो! त्यांनी मला आजतागायत किती भरभरून दिलं आहे त्याची काही गणतीच नाही!

-- तात्या अभ्यंकर.