December 23, 2010

(४३) - आलो कुठून कोठे..


(येथे ऐका)
'आलो कुठून कोठे..' - नीधनीसां.. 
या संगतीने किंचितशी 
मल्हाराची आठवण करून देणारी सुरवात..परंतु पुढच्याच 'तुडवीत पायवाट..' ची 'मधध' ही संगती मल्हाराची पायवाट सोडून अचानक शहाण्यात (शहाणा कानडा) शिरते तेव्हा त्या बदललेल्या पायवाटेचं कौतुक वाटतं.. कानांना सुखावतं ते शहाण्यातलं वळण..!

काटे सरून गेले..उरली फुले मनात..! - यातला शुद्ध रिखभ आश्वासक वाटतो. पायवाटेत भेटलेले काटे सरून गेले. त्याचं आता दु:ख नाही.. मनात उरली आहेत ती फक्त त्या वाटेवरली फुलं..!

प्रत्येक पाउलाचे होते नवे इशारे..
सार्‍या ऋतूत लपला हृदयातला वसंत..!


गाण्याचा अंतराही छान. 'तू तिथे मी..' चित्रपटातले आयुष्यभर नौकरी करून, सोबत सार्‍या सांसारिक जिम्मेदार्‍या पार पाडून निवृत्त झालेले मोहन जोशी - ऊर्फ नाना आता निवांतपणे आरामखुर्चीत विसावले आहेत. सुहास जोशी ही त्यांची 'अगं..' देवापाशी काहीबाही पोथी वाचत बसली आहे. आता अगदी कृतार्थ आहेत म्हातारा-म्हातारी..! Smile

संगीतकार आनंद मोडकांचं हे एक छोटेखानी गाणं. गाण्याची चाल अगदी मोकळी परंतु तितकीच सुरेख. छान जमलेला अध्ध्या त्रितालाचा ठेका. गाण्यातली संतूरही अगदी प्रसन्न..! शेवटी काय हो, ' काटे सरून जाऊन मनात फुलं उरणं हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

December 22, 2010

कृष्णा नी बेगने..

कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)

(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)

कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..

साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! :)

'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!

'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! :)

'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..

खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! :)

'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! :)

काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..

मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! :)

तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..

कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्‍या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्‍या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!कृष्णाने सार्‍या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्‍या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!

असो,

कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..

सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!

अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार!
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्‍या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..

-- तात्या अभ्यंकर.

December 21, 2010

भेट आभाळांची..!

नुकताच सचिनने टेस्ट मालिकेत ५० शतकांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. या अभूतपूर्व विक्रमाबद्दल सर्वप्रथम त्याचे मन:पूर्वक अभिनंदन..!त्याची डोळे दिपवून टाकणारी उत्तमोत्तम फटकेबाजी आम्हाला यापुढेही बघायला मिळावी हीच शुभकामना..

इथे मी काही सचिनच्या खेळाबद्दल भाष्य करणार नाही. मी सांगणार आहे एक आठवण.. खुद्द सचिननेच कुठल्याश्या दिवाळी अंकात सांगितलेली. तो कुठलासा मुलाखतवजा लेख होता एवढं नक्की आठवतंय. पण कुठला दिवाळी अंक हे आता आठवत नाही.. परंतु १९९५/९६चा सुमार असेल.. कारण अण्णा तेव्हा हवाईगंधर्व म्हणून कार्यरत होते!

ती आठवण अशी होती, की सचिन एकदा काही खाजगी कामाकरता मुंबैहून कलकत्त्याला विमानाने निघाला होता. हा साधारण दीड तासाचा प्रवास. मंडळी स्थिरस्थावर झाली होती.. विमान नभात होतं. सचिनला बसल्याबसल्या डुलकी लागली..काही वेळाने झोपेतच आपल्या जवळ कुणी उभं आहे अशी त्याला जाणीव झाली आणि त्याने डोळे उघडले..पाहतो तर जवळच एक सद्गृहस्थ उभे होते.. त्यांची व सचिनची नजरानजर झाली आणि ते सद्गृहस्थ दोन्ही हात जोडून सचिनला म्हणाले,

"नमस्कार. माझं नांव भीमसेन जोशी. आपला खेळ मला फार आवडतो, मी आपला चाहता आहे. आज अशी विमानात अचानक आपली भेट झाली याचा मला आनंद वाटतो!"

त्या आठवणीत सचिन पुढे असं लिहितो की 'मी बसल्याजागी उडालोच अक्षरशः! एवढा मोठा माणूस आणि इतका साधा आणि नम्र! मी पटकन उठून उभा राहिलो. त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले व स्मितहास्य करून ते आपल्या जागेवर निघून गेले!'

मंडळी, 'गुणीजन जाने गुणकी बात' असं म्हणतात ते खरंच.. वास्तविक जेव्हा ही भेट झाली तेव्हा सचिनच्या ऐन भरारीचा तो काळ होता, सचिन घडत होता.. पण त्याला अभिवादन केलं ते एका सिद्ध पुरुषाने, एका योग्याने, एका स्वरभास्कराने! तेही आपल्या मानमरातबाचा, वयाचा, नावाचा कसलाही मोठेपणा न बाळगता! एक भारतरत्न, तर एक होऊ घातलेलं भारतरत्न!Smileमंडळी, ही भेट खरंच दुर्मिळ.. ही भेट अनमोल.. ही भेट दोन आभाळांची, आभाळातच झालेली!

-- तात्या अभ्यंकर.

December 20, 2010

काही स्वरचित्रे काही शब्दचित्रे (४१).. तुम हो मेरे दिलकी धडकन..


तुम हो मेरे दिल की धडकन.. (येथे ऐका)

मंझील चित्रपटातलं 'रिमझिम गिरे सावन' हे गाणं सगळ्यांनाच माहित्ये. परंतु हे गाणं त्या मनानं अनवट...पंचमदांच्या या गाण्याचा स्वभाव, चाल, अगदी शांत.. शब्दही छान..हास्य

बच्चनसाहेबांची मैफल सुरू आहे.. पुढ्यात हार्मोनियम घेऊन गवयाचं जॅकेट वगैरे घालून बच्चनसाहेब शांतपणे गाताहेत..

तुम जो़ नही तो कैसी खुशी
मायुसियोंमे डुबी है जिन्दगी..


बच्चनसाहेब गाताहेत परंतु मैफलीत त्यांचं मन नाही. कारण गाणं ऐकायला त्यांची प्रेयसी मौशमी चॅटर्जी अजून आलेली नाहीये.. Sad

तुम्हे जो देखा तो पलको तले
लाखो दियेसे देखो जलने लगे!


आली! सुंदर, प्रसन्न दिसणारी मौशमी मैफलीत आली आणि बच्चनसाहेबांचा चेहरा खुलला! हास्य

म्हटलं तर अगदी साधंच गाणं, पण तितकंच सुरेख आणि शांत! अमिताभ बच्चन.. एक खूप मोठा कलाकार.. अगदी साधा, सुंदर परंतु बोलका अभिनय केला आहे हे गाणं म्हणताना त्यांनी..

मै हू 'झुम झुम झुम झुम झुमरू' किंवा 'देखा ना हाए रे सोचाना..' या सारखी गाणी गाणारेही किशोरदाच आणि हे शांत गाणं गाणारेही किशोरदाच! असा कलावंत होणे नाही..!
 
-- तात्या अभ्यंकार.

December 10, 2010

फेसबुकातलं ' तुम्हाला रस आहे का? ' हा काय प्रकार आहे..? ! :)

राम राम मंडळी,

आज फेसबुकावर हिंडत असताना अचानक मी http://apps.facebook.com या पानाकडे कुठुनसा ओढला गेलो. समोर विचारणा होती - तुमचा देश, तुम्हाला कोणत्या वयोगटाची आवड ( हास्य ) आहे वगैरे वगैरे..

साहजिकच आणि नैसर्गिकरित्याच मला या प्रकरणात रस वाटू लागला. आता मी चाळीशी प्लस असलेला. म्हटलं उगाच १८ ते २४ ही वयाची रेंज देऊन आपल्या वडीलकीला लाज येईल असं का उगाच काही करा ?..! हास्य

म्हणून मी मग ३१-३५ ही अनुभवी व ऐन तारुण्य बहरत असलेली रेंज निवडली आणि माझ्यासमोर एकेक फोटो येऊ लागले. प्रत्येक फोटोच्या वर तीन पर्याय -

१) तुम्हाला रस आहे का? (पक्षी - आर यू इंटरेष्टेडचं मराठी भाषांतर)
२) हो
३) पुढे चला (पक्षी - स्कीप!)

मी फटाफट हो किंवा स्कीप हे ऑप्शन क्लीक करू लागलो. माझ्या पुढ्यात आलेले वानगीदाखल हे काही फोटो आणि मनातले काही प्रश्न, शंका -ही मुलगी अभ्यास करते आहे ना? मग फेसबुकात ' तुम्हाला रस आहे का..' या संदर्भात स्वत:चे फोटो कशी काय देते? अभ्यासात लक्ष नाही का हिचं? हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आता ही आमची हैद्राबादची ३१ वर्षाची अमिना. पण ही तर ऑलरेडी एका काळसर इसमाला चांगली खेटून उभी आहे. मग आता मला सांगा, माझ्या पुढ्यात हिचं प्रोफाईल आलं असताना मी 'रस आहे..' या पर्यायावर टिचकी कशी मारणार?! हास्य तो काळा इसम एक तर तिला तरी किंवा मला तरी मारील नाय? ! हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पुढल्या पानावर गेलो तर अचानक दिल्लीच्या एक भैय्याचंच चित्र पुढ्यात आलं! छ्या..! आता भय्ये फेसबुकावर पण येऊ लागले की काय..! हास्य
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


पुढल्या पानावर गेलो तर ३२ वर्षाच्या निलूचा फोटो पुढ्यात आला. हा फोटो पाहून मात्र मी लगेच ' रस आहे..! ' हा पर्याय निवडला.

बघुया आता काय होतं ते..! हास्य

नीलू मात्र अंमळ मोहक आहे हे खास..! हास्य

--(क्षणभंगूर का होईना, परंतु नीलूवर जीव जडलेला) तात्या.

December 04, 2010

काही स्वरचित्रे काही शब्दचित्रे (४०).. बिती ना बिताई..बिती ना बिताई..(येथे ऐका)
हे केवळ एक गाणं नाही..,हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे जगातला सारा चांगुलपणा, सारी सृजनशिलता, सर्जनशिलता..! हे गाणं म्हणजे गुलजार-पंचमदांची प्रतिभा, दीदी-भुपेन्द्रसिंगची गायकी, जया-हरिभाईचा अभिनय! हे गाणं म्हणजे मृदुता, हे गाणं म्हणजे हळवेपणा..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे पूर्वस्मृति, हे गाणं म्हणजे जे जे काही उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व.. हे गाणं म्हणजे गायकी, हे गाणं म्हणजे लयकारी, हे गाणं म्हणजे हार्मनी, हे गाणं म्हणजे केरव्यातला वजनदार ठेका!
हे गाणं म्हणजे, 'वो गोलिया क्या खतम हो गई?' या डॉक्टरांच्या प्रश्नावर 'सासें खतम हो गई!' हे हरिभाईचं उत्तर! हे गाणं म्हणजे पतीपत्नीचं गूज, बापलेकीचं गान, पितापुत्राचं अबोल, मुकं प्रेम!
'तुम्हाला 'मेथी का साग' खूप आवडायचं, असं बाबूजी नेहेमी सांगायचे..' असं जया भादुरी प्राणला सांगते..त्यावर 'वो मुझे याद करता था?' हा प्राणचा सवाल..त्यावर 'मेरे बाबूजी जैसा उसुलोंका पक्का और कोई नही..! असं माझे बाबूजी नेहमी म्हणायचे!' हे जयाचं उत्तर.. त्यावर भितीवरील हरिभाईच्या फोटोकडे पाहताना आलेलं प्राणच्या डोळ्यातलं पाणी..! त्याच्या पोटातलं तुटणं..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!

-- तात्या अभ्यंकर.

December 02, 2010

बम्बई मेरी जान..१ - मुंबैच्या लोकलगाड्यांच्या लाईनी..


राम राम मंडळी,

आजवर पोटापाण्याच्या निमित्तानं सारी मुंबै फिरलो. अगदी अनेकदा..

ह्या भटकंतीत प्रामुख्यानं साथ मिळाली ती आमच्या बेस्ट बसेसची आणि मुंबैच्या लोकल ट्रेन्सची. मुंबैच्या उपनगरी गाड्या म्हणजे मुंबैच्या धमन्या. मध्य रेल्चे, पश्चिम रेल्चे, हार्बर रेल्वे, अलिकडे निघालेली पनवेलपुतुरची रेल्वे वगैरे वगैरे..


अफाट जाळं आहे हे सगळं. नानाविध ठेसनं, क्रॉसिंग. छोटी मोठी जंक्शन्स, तर कधी मध्य-पश्चिम, तर मध्य-हार्बर तर कधी हार्बर-पश्चिम असं हे रेल्वेचं अंतर्गत छोटंमोठं क्रॉसिंग, रेल्वे रुळांचा परस्पर काटशह आणि या काटशहाचे उडाणपूल..

मुंबै फिरताना हे सगळं खूप अनुभवलं, पाहिलं. मुंबै उपनगरीय रेल्चे प्रवासाला कंटाळून न जाता कधी डब्यातल्या लोकांचे चेहेरे वाचायचा प्रयत्न केला तर कधी खिडकीबाहेर पाहात तर कधी मस्त मजेत फुटबोर्डावर उभं राहून आपण घाटातून जाताना कशी मजा बघतो तसं मनसोक्त मुंबै दर्शन घेतलं..भरभरून प्रेम केलं मुंबै नावाच्या अजब शहरावर..

आता सुरवातीपासनंच जशी आठवेल तशी सुरवात करतो आमच्या मुंबैच्या रेल्वे जाळ्याची उकल करण्याची.


या लेखाचा हेतू?

फक्त थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या पलिकडे काहीही नाही. यामुळे झालाच तर या माहितीचा थोडाफार उपेग मुंबैत येणार्‍या काही नवख्यांना होऊ शकेल. माझ्यासारखे जाणते मुंबैकर उगाचंच डोळ्यासमोर क्षणभर तो रेल्वेमार्ग आणतील आणि मी लिहिलेली माहिती चूक की बरोबर हे तपासून पाहतील इतकंच..!हास्य

मुंबैच्या उपनगरीय गाड्यांची उकल संपली की मग सार्‍या आशिया खंडात जी उत्कृष्ट मानली जाते ती आमच्या मुंबैच्या बेस्ट बशींची रोचक माहिती मी देईन.. आणि त्याचसोबत जमलंच तर मुंबैच्या रस्त्यांबद्दल लिहिन. आजतोवर जवळजवळ सारीच मुंबै कधी बेस्टच्या संगतीत तर कधी पायी तुडवली आहे.

हा सगळा लेखनप्रपंच का? कारण एकच. मंडळी, खूप पिरेम करतो आम्ही या शहरावर..! हास्य

असो.. तर आता सुरुवात करुया..

चर्चगेटाहून पश्चिम रेल्चेने तुम्ही निघालात की तुम्हाला पहिलं जंक्शन भेटतं ते दादर. हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचें एक कॉमन स्टेशन. तूर्तास दादरला बाजूला ठेउया. त्याच पश्चिम रेल्वेने तुम्ही दादरहून फुडे सरकलात की पुढे माटुंगारोड नावाचं एक लहानसं, निरुपद्रवी स्टेशन लागतं. ते ओलांडून पुढे सरकलात की तुमच्या पश्चिम रेल्वेला पहिला काटशह बसतो तो आमच्या हार्बर रेल्वेचा. वडाळा-किंग्जसर्कल कडून येणारी मध्यरेल्वेची लाईन माटुंगारोडच्या पुढे पश्चिम रेल्वेला पूर्वेकडून येऊन काटते आणि मग येथून पुढे मध्य व पश्चिम रेल्वेच्या ह्या दोन्ही लाईनी गुण्यागोविंदाने एकत्र धावतात व माहिम स्टेशनात विसावतात. त्यामुळे माहिम स्टेशनला 'जंक्शन' ही पदवी मिळाली आहे. म्हणजे माहिमहून येताना एक लाईन चर्चगेटाकडे तर एक लाईन वडाळ्याकडे..

इथून मग पुढे ह्या दोन्ही लाईनी खार, सांताक्रुज, विलेपार्ले करत थेट अंधेरीपर्यंत एकत्र धावतात. मी जेव्हा जेव्हा माहिम ते अंधेरी हा पश्चिम रेल्वेचा प्रवास करतो तेव्हा खिडकीबाहेर माझ्यासंगती धावणार्‍या मध्य रेल्वेच्यादेखील लाईनी पाहून मला खूप भरून येतं. अहो या तर माझ्या माहेरच्या लाईनी. कारण मी ठाण्याचा, म्हणजे शेन्ट्रल रेल्वेचा..! हास्य

आता जरा वेळ अंधेरीला थांबुया. हम्म..का थांबुया? तर तूर्तास नाही परंतु आज ना उद्या अंधेरी स्टेशनलादेखील पूर्व पश्चिम असा एक काटशह बसणार आहे..! हास्य

आमच्या मध्यरेल्वेवरच्या गुज्जूभाईंचं घाटकोपर स्टेशन हे जंक्शन होणार आहे कारण घाटकोपर ते थेट पश्चिमेला वर्सोव्यापर्यंत अश्या एका नव्या मोनो रेल्वेलाईनची आखणी/कामकाज तूर्तास प्रस्तावित आहे. मज्जा मज्जा आहे बरं का मंडळी य लाईनीवर. कोण-कोणती स्टेशनं असणार आहेत या लाईनीवर? ऐकाल तर खुश व्हाल. कारण या अत्यंत गजबजलेल्या आणि ट्राफिक जामने सदैव हैराण असलेल्या या मार्गावर रेल्वेमार्गाची कृपा होणार आहे. असल्फा, सुभाषनगर, साकिनाका, मरोळनाका, एयरपोर्ट रोड, चकाला, त्यानंतर अंधेरीला काटशह देत डीन एन रोड आणि वर्सोवा..! आहे की नाही मज्जा? त्यात पुन्हा मरोळनाका ते साक्षात छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत एक लाईन जाणार आहे. त्यामुळे वर्सोव्याकडून व घाटकोपर मार्गे ज्यांना विमानतळावर जायचं आहे ते बापडे ट्रॅफिक जाम मधून कायमचे वाचतील..

पण काय सांगावं मंडळी? ही मुंबै आहे. आणि आमचे मुंबैकर एकेदिशी ही मोनोरेलदेखील पार जाम करून टाकतील.. हास्य

तर कुठे होतो आपण?

येस्स. अंधेरीला होतो. (अंधेरी म्हणजे आपल्या माधुरीचं गाव बर्र का..! या लेखमालेत मी जाता जाता काही हिंदी-म्हराटी नट्यांचीही उपनगरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.. हास्य

तर अंधेरीहून आता पश्चिम रेल्वेनं सरळ फुडे चला. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली (अस्सल मुंबैकरांच्या उच्चारी बोरोली. जसं डोंबिवलीचं डोंबोली तस्सच बोरिवलीचं बोरोली..! हास्य , आणि मग दहिसर.

इथेच थांबा मंडळी. कारण दहिसर चेकपोस्टाच्या पुढे मुंबै पालिकेची हद्द संपते अन् आमचा ठाणे जिल्हा सुरू होतो. मुंबै महापा संपून मिरारोड-भाईंदर महापा सुरू होते.. (भाईंदर उच्चारी - भैंदर!) आणि त्यानंतर नायगाव हे स्टेशन घेऊन गाडी येते वसईला. वसई..! माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, वसईची खाडी..! नक्की लिहीन एकदा केव्हातरी वसईच्या गंमती.. हास्य कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. आहाहा..! काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! हास्य

काय सांगू मंडळी, गोरेगाव हा शब्द लिहिताना गोरेगाव पूर्वला स्टेशनच्या बाहेरच असलेलं आमच्या गाळवणकरशेठचं हॉटेल सत्कार आठवलं हो. फारा वर्षांपूर्वी जेव्हा फक्त मुंबै दूरदर्शन होतं तेव्हा मनाली दीक्षित नावाची एक सुंदर स्त्री दूरदर्शनवर निवेदिका होती. वा वा! काय दिसायची छान. तर सांगायचा मुद्दा काय तर आमची मनालीही गोरेगावचीच..! हास्य

मालाडला असलेले भैय्यांचे तबेले-गोठे आठवले, आणि कांदिवली? एका वेड्या वयात चित्रा जोशी नावाच्या मुलीवर जीव जडला होता माझा. चित्राला आता कांदिवलीला दिल्यालादेखील अनेक वर्ष झाली. पण जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा मिश्किल चेहेर्‍याची चित्रा आठवते. असो.. हास्य

अजून बरीचशी माहिती बाकी आहे मंडळी. ती 'मुंबै मेरी जान..'च्या ती फुडल्या भागात.. हास्य

तोवर हे गाणं ऐका....

आपला,
(हाडाचा मुंबैकर) तात्या.

November 26, 2010

किनारे किनारे..

किनारे किनारे.. (येथे ऐका..)
कुमारांची एक छान रंगलेली मैफल. कुमार रंगून गात आहेत आणि श्रोते तेवढ्याच रसिकतेने दाद देत आहेत अशी ही मैफल..

राग सुरू आहे अर्थातच यमन..!

'किनारे किनारे किनारे किनारे दर्या...' ही यमनातली पारंपारीक बंदीश कुमार गात आहेत..

समोरच्या श्रोत्यांशी अगदी सहज संवाद साधावा, आत्मियतेचं काही बोलावं अश्या थाटात कुमार ही बंदीश गात आहेत.. क्या केहेने..! आमच्या कुमारांना यमनचं खूप कौतुक होतं, ते ही बंदीश ऐकताना अगदी जाणवतं..!

बर्‍याच दिसांनी भेटलेल्या एखाद्या सुहृदाच्या पाठीवर प्रेमाने, आपुलकीने सहज हात ठेऊन, " काय रे बाबा, कसा आहेस? ठीक ना सगळं?" असं विचारावं तशी ही बंदीश कुमार गात आहेत..! यमन म्हणजे प्रेमानं केलेली चौकशी, यमन म्हणजे आपुलकी..!

सुंदर लागलेले तानपुरे, मध्यलय म्हणावा असा जमलेला त्रिताल, 'किनारे.' या शब्दावरच्या जागा, गातानाच्या यमनातल्या लहानसहान हरकती-ताना, अगदी मोजून मापून घ्यावेत तसे लागणारे गंधार-पंचमासारखे एकेक सूर.. लयीवरची हुकुमत..! सगळंच लाजवाब..!

काय अन् किती लिहू यमनाबद्दल अन् या गाण्याबदल? माझे शब्द खूप तोकडे आहेत..

'किनारे..' शब्दावरचा गंधार दैवी आहे हो. खूप काही सांगून जातो हा गंधार..!

आज तूनळीवर फिरत असताना ही ध्वनिचित्रफित हाती लागली आणि मी एकदम देवासला पोहोचलो..
काही वर्षांपूर्वी देवासला कुमारांच्या घरी गेलो होतो त्याची याद आली..!

आज कुमार हयात असते तर पुन्हा एकदा त्यांना भेटलो असतो अन् 'किनारे..' या शब्दातल्या गंधारात जी आत्मियता आहे त्याच आत्मियतेने त्यांना विचारलं असतं,

" काय बुवा कसे आहात.."? " नाथ हा माझा" चं ओरिजनल "हारवा मोरा" ऐकवता का जरा?"..

-- तात्या अभ्यंकर.

November 16, 2010

मुक्तक..

सहज सुचलेलं एक मुक्तक -
ही अशी जर मास्तरीण शिकवायला असेल तर पोरांचं अभ्यासात काय घंटा लक्ष लागणार?चित्राकडे पाहताच एकदम भूतकाळात गेलो अन् शाळेतल्या आमच्या वर्गात जाऊन बसलो. अर्थात, नेहमीप्रमाणे मागल्या बाकावर..पहिल्या बाकावर अनील पेंडसे, काश्या, जाड्या सामंत, महेश गोरे, सचिन सामंत, डिंग्या, मुकुल पालवणकर, चष्मावाला जपे इत्यादी सगळी हुश्शार पोरं..! आम्ही सगळे भिकारचोट मागल्या बाकावर.. :)तर ते असो..या चित्राकडे पाहताच असं वाटलं की ही बया जणू काही म्हणते आहे," काय अभ्यंकर, लक्ष कुठाय? फळ्याकडे बघ, माझ्याकडे नको. मी फळ्यावर लिहिते आहे... ! "पण अभ्यंकरचं लक्षच नव्हतं. बया ओरडली तरीही तो तिच्या गोर्‍यापान उघड्या पाठीकडेच पाहात होता..;)बाय द वे, जप्याला शीघ्रपतनाचा विकार बहुधा याच बाईमुळे जडला असावा.. :)असो.. :)तात्या.

November 10, 2010

दु:खाच्या वाटेवर..


(येथे ऐका)
'...वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली, अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली..!'

भटसाहेबांच्या या शब्दांवर काय बोलावं? खूप काही सांगून जाणारे हे शब्द, आपण फक्त अनुभवायचे इतकंच...!

वाटच मुळी दु:खाची आहे. ते कमी की काय, की त्या वाटेवर तुझं गाव लागावं अन् वेशीपाशीच भेटावी तुझी उदास हाक..त्या हाकेसरशी मग माझे पाय थबकतात अन् माझी पायपीट सांडू लागते माझ्या डोळ्यातनं. अगदी माझ्या नकळत..!

भटसाहेबांचे शब्द, सुधीर मोघ्याचे यमनचे स्वर अन् श्रीकांत पारगावकरच्या गोड गळ्यातील स्वर. खूप खूप मोठं आहे आपलं मराठी संगीत..!

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल..!


इथेच खरे तर शब्द संपतात..!

थोड्याच वेळात त्या सांजवातेमुळे प्रसन्न झालेली कातरवेळ टळेल आणि.. 

'मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद..'

तुझ्या अंगणी टपटपेल प्राजक्त. पण तो प्राजक्त नसेल.. ती माझी हाक असेल, माझी पायपीट असेल, ते माझं आयुष्य असेल..! दु:खाच्या वाटेवर तुझं हे गाव लागलं अन् इथे थबकलो खरा, पण अगदी क्षणभरच. माझा पल्ला लांबचा आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

November 08, 2010

सिमरन...

दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे. सबब, वाचकांनी कृपया या विषयावर चर्चा न केल्यास ते सूज्ञपणाचे ठरेल!

या पूर्वी -
लेबल - 'तात्या अभ्यंकराच्या आयुष्यातील स्रिया' -

रौशनी
नीलम
शबनम
शाहीन
सिमरन...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मुंबैतल्या जुहू विभागातला एक महागडा बार. मालक - अरिवंदस्वामी शेट्टी. माझा अशील.

बारचे स्वरूप - फ्री सर्विस..

बर्‍यापैकी अंधारलेला बार.. गिर्‍हाईक बारमध्ये शिरतं.. आत शिरताच इतका अंधार की आलेल्या गिर्‍हाईकाला कुणी वेटर बॅटरी दाखवून तिच्या प्रकाशात एका टेबलापाशी बसवतो. स्टुवर्ड त्याची ऑर्डर घेतो. बारचे रेट तिप्पट-चौपट. बाहेर २० रुपायांना मिळणार्‍या कोल्ड्रिंकची किंमत इथे चक्क २५० रुपये..!

गिर्‍हाईक त्याला पाहिजे असलेल्या मद्याची ऑडर देतो. थोड्याच वेळात दिलेली ऑर्डर घेऊन एक तरुणी त्या टेबलापाशी येते व अंधारातच त्या गिर्‍हाईकाच्या शेजारी त्याला खेटून बसते. त्याला दारू सर्व्ह करते. मग दारू पिता पिता ते गिर्‍हाईक जवळ खेटून बसलेल्या त्या तरुणीशी अगदी हवे ते चाळे करते. त्याकरता सुरवातीलाच तिला पाचशे-हजार रुपायांची टीप दिली जाते. काही तरुणींच्या बाबतीत ही किमान टीप रु २००० देखील असते. मग त्या अंधारात चुम्माचाटी तसेच अन्य अनेक चाळे करून अजून ५००-१००० रुपायांची त्या तरुणीला वरटीप देऊन ते गिर्‍हाईक बारच्या बाहेर पडते..! हा अगदी रोजचा दिनक्रम. सॉरी, संध्याक्रम..!

"तात्यासाब, जरा बैठो आरामसे.. क्वार्टर-वार्टर मारो. बादमे धंदेकी बात करेंगे..!" - इति अरविंदस्वामी.

'आपल्याला काय, चला बसू. चकटफू दारू मिळते आहे!' - माझं स्वगत.

मला एका अंधारलेल्या टेबलपाशी आणलं जातं.. फुकट असल्यामुळे माझी डायरेक्ट ब्लॅकलेबलची ऑर्डर..!
थोड्याच वेळात एक मुलगी एका ट्रेमध्ये दारू, सोडा, तळलेले काजू, बिसलेरी अशी ऑर्डर घेऊन माझ्या टेबलापाशी येते व अंधारात माझ्या बाजूला अगदी मला खेटून बसते. ती माझा गिल्लास भरते..
"सेठ, ५०० रुपिया दो.."

"५०० रुपये? कसले? माझ्याकडे असे पैसे नाहीत. तुम मत बैठो यहा!"

"बोहोनी करो ना..!"

'आपल्याला साला शेठने येथे बसवला. पण या मुलीची तर ही रोजीरोटी आहे!' असा विचार करून मी खिशातनं पन्नास रुपायाची एक नोट काढली.

"ये लो. मेरी इतनीही हैसियत है.."

सिमरन मनमोकळी हसली. माझ्यासारख्या गिर्‍हाईकाची फक्त ५० रुपायांचीच लायकी पाहून थोडी कुत्सितही हसली..(तिचं नाव सिमरन आहे हे मला नंतर कळलं..)

वास्तविक ती तेथून उठून जाऊ शकत होती. परंतु तिला काय वाटलं कोण जाणे, तिने ते पन्नास रुपये घेतले व मला अजूनच खेटली. दोन पेग पोटात गेले. सोबत खेटून बसलेली सिमरन. तरूण वय. नको ते विचार मनात येऊ लागले. सिमरनच्या शरीरावर इथे-तिथे हात जाऊ पाहात होता..!

पण जमलं मला! केरसुणीनं समुद्राची लाट अडवणं जमलं मला..! (या वाक्याचं ऋण - आचार्य - नाटक- तुझे आहे तुजपाशी)

मी अगदी प्रयत्नपूर्वक कोणतीही चाळे न करता तिच्याशी 'तुम कहासे हो?', 'यहा कैसे आ गयी?' या स्वरुपात तिच्याशी गप्पा सुरू केल्या. तिला विश्वसात घेतलं..!

सिमरनही अखेर एक स्त्रीच! तिच्यातली बारटेन्डर दूर गेली व स्त्री जागी झाली. थोड्याच वेळात मी तिला बोलती केली, किंबहुना ती बोलती झाली..!

"मी मूळची इंदूरची. पैसे कमावण्याकरता मुंबैला आले. माझा बाप माझ्या सख्ख्या मावशीच्या नवर्‍याचं बरंच देणं लागतो. माझा मावसा म्हणजे साक्षात कर्दनकाळ. एक नंबरचा गुंड. त्यानेच धाकधपडशा दाखवून मला मुंबैला आणलं. धंद्याला लावलं आणि आता माझ्या पैशांवर चैन करतो आहे. सुरवातीला मी एकदोनदा कडवा विरोधही केला तेव्हा त्याने माझ्या बापावर खुनी हल्ला केला. ठार मारलं नाही पण वेळ आल्यास मारुही शकतो हे मला दाखवून दिलं..!"

गप्पांच्या ओघात सिमरन हे सगळं ओकली भडाभडा..!

थोड्या वेळानं मी तिथून निघालो. सिमरनचा नंबर घेतला. सिमरन आवडली होती मला..!

पुढे काहीच दिवसात दोन ऑक्टोबर होता. मोहनरावांची जयंती. ड्रायडे होता. मी दुपारच्या सुमारास सिमरनला फोन केला.

"गेटवेपे मिलोगी? खाना खाएंगे..!"

संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास आम्ही गेटवेला भेटलो. मनमोकळं बोललो.. गप्पा मारल्या..भेळपुरी खाल्ली..साखरपुडा झाल्यासारखे गेटवेच्या बांधावर बसून समुद्राकडे पाहात एकमेकांना खेटून बसलो..!

"हा इसम तसा बरा आहे!." हे सिमरनचं स्वगत असावं..

एकंदरीत सिमरन मला चक्क पटली होती हे नक्की..!

"इंदौरमे कंप्युटर सिखा था. थोडा बहुत काम जानती हू.. अंग्रेजीमे बोलने और छोटामोटा लेटर टाईप करनेमे कुछ प्रॉब्लेम नही..!" सिमरनकडनं गप्पांच्या ओघात ही माहीती कळली. पोरगी खरंच चुणचुणीत होती, हुशार होती..!

बापू सोनावणेला सांगून मुंबै क्राईम ब्रॅन्चच्या डीसीपी अर्जुनराव शितोळेंशी ओळख काढली. सिमरनची सारी कहाणी त्यांच्या कानी घातली. सारी सूत्र भराभर फिरली व एका भलत्याच केसमधे अडकवून सिमरनच्या मावश्याला ८-१० वर्षांकरता गजाआड पाठवला..!

'अबक' या मोबाईल कंपनीत माझा मित्र अशोक सातपुते 'जनरल म्यॅनेजर - वेस्टर्न झोन' या पदावर कार्यरत आहे. त्याचं अंधेरीला हापिस आहे. 'ऑफिस एक्झिक्युटीव्ह' या पदावार तेथे सिमरनला चिकटवली. शंकर दयानंद हलवाई हा जौनपूर-भदोईचा भैय्या माझा मित्र कम अशील. चेंबूरचा जागादलाल..त्याला सांगून त्याच्या ओळखीनं महिना हजार-दीड हजार भाड्यावर सिमरनला एक सिंगलरूम घेऊन दिली..

आता सिमरन सुखात आहे. कष्ट करते. एका ओळखीच्या सी ए च्या मदतीने तिला टॅक्स रिटर्नचेही जुजबी काम शिकवले. त्यातही तिला बर्‍यापैकी चार पैशे भेटतात..

"तात्यासाब, आपको ट्रीट देनी है. खाना खिलाना है..!"

सायनच्या पेनिन्सुला या पॉश हाटेलात सिमरनं मला दारू पाजली, भरपेट जेऊखाऊ घातलं..त्या क्षणीचाच हा फोटू..


आयुष्यात काय मिळवलं, काय गमावलं हे मला माहीत नाही.. परंतु सिमरनच्या बाबतीत मात्र मी समाधानी आहे, कृतकृत्य आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

October 31, 2010

रैना बिती जाए..


राग तोडी..! हिंदुस्थानी रागसंगीतातला एक दिग्गज राग. ज्याला तोड नाही असा तोडी..!

सुरवातीलाच सारंगी. भाईकाकांच्या भैय्या नागपुरकराच्या भाषेत सांगायचं तर 'कलिजा खल्लास करणारी जीवघेणी सारंगी..!' 'नी़ नी़सा सा..' ने संपणारा दीदीचा केवळ अशक्य आलाप - तकदीरचा मारा असलेल्या कुणा आनंदबाबूला घायाळ करतो अन् त्याचे पाय थबकतात..! सुरांचा तो प्यासा त्या तोडीच्या झर्‍याच्या शोधात माडी चढतो..!
 
'रैना बिती जाए..!' - पंचमदांची अद्भूत प्रतिभा अन् दीदीचा स्वर.. हिंदुस्थानी सिनेसंगीतातलं एक माईलस्टोन गाणं जन्म घेत असतं..! 

संतूर, गिटार, आणि केहेरव्याचा वजनी ठेका.. सारंच भन्नाट..!

'निंदीया ना आए..' - तोडीच्या स्वरात संपूर्णत: वर्ज्य असणारे, विसंगत वाटणारे शुद्ध मध्यम, शुद्ध धैवत फक्त पंचमच टाकू शकतो. अन्य कुणाची ना तेवढी हिंमत, ना तेवढी प्रतिभा. खूप खूप मोठा माणूस..!

दुर्दैवाने घरात सुख न लाभलेला आमिरजादा आनंदबाबू आणि सुरांची मलिका असलेली त्याची पुष्पा..! 'आय हेट टियर्स, पुष्पा..!' असं म्हणणारा आनंदबाबू. शारिरीक वासनेचा नव्हे तर पुष्पाच्या स्वरांचा भुकेला, तिला प्रेमाने हलवा-पुरीची फर्माईश करणारा आनंदबाबू..! कोठेवालीचा व्यवसाय करणारी पुष्पा - जिच्या घरात नेहमी पूजा-फुलांनी मढलेला देव्हारा अन् सोबतीला रामकृष्ण परमहंसांची तसबीर..!

शब्दांचं प्रेम, स्वरांचं प्रेम, अमरप्रेम..! काय चूक, काय बरोबर हे ज्यानं-त्यानं ठरवू देत.. आमचा मात्र सलाम त्या दीदीला, त्या पंचमला, त्या आनंदबाबूला अन् शर्मिला टागोर नामक त्या पुष्पा कोठेवालीला..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2010

केनू संग खेलू होली..


केनू संग खेलू होली.. (येथे ऐका)

यमनचे स्वर, दीदीचा शांत स्वर. यमनच्या अनेक रुपांपैकी हे एक आगळं रूप.

राग यमन..! सार्‍या विश्वाला कवेत घेणारा, एकत्र बांधणारा..

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातलं एक अजब रसायन.. ज्याचा ठाव, आदी-अंत कुणालाही कधीही लागला नाही आणि लागणार नाही असा राग..!

राग यमन..! आपल्या हिंदुस्थानी रागसंगीतातली सार्‍या जगाला दिलेली एक अनमोल देणगी..

राग यमन..! केवळ शब्दातीत..!

'केनू संग खेलू होली
पिया त्यज गये है अकेली..!'

'त्यज गये है अकेली..' या शब्दांमधला भाव केवळ अनुभवा.. त्यातल्या शुद्ध गंधाराला, तीव्र मध्यमाला मुजरा करा..!

'भोजन भवन भलो नही लागे
पिया कारन भयी रे अकेली
मुझे दुरी क्यो मिली?'

गायकी, गायकी म्हणतात ती हीच..! शब्द, स्वर, भाव.. हे सारं शब्दातीतच, परंतु या ओळी, दीदीची गायकी, यमनचे स्वर हे अजूनही खूप काही सांगून जातात.. आपण त्यातलं देवत्व शब्दात नाही पकडू शकत.. हे फक्त अनुभवायचं.. ज्याने, त्याने..!

दोन कडव्यांमधली सतार फक्त वाजत नाही, ती यमन गाते..!

आपल्या सर्वांना हात जोडून वारंवार फक्त एकच विनंती.. यमनची भक्ति करा, साधना करा, उपासना करा.. यमनवर भरभरून प्रेम करा..!

सुखदु:खात आयुष्यभर जो साथ करतो तो फक्त यमन..! यमनसारखा अन्य सखा नाही, सुहृद नाही..!

'मीरा को प्रभू दरसन दिजो
मै तो जनम जनम की चेली
दरस बिना खडी दुहेली...'

'प़सासासां' या स्वरात जुळलेल्या तानपुर्‍यातून नैसर्गिक गंधार ऐकू येतो..

ज्या दिनानाथ मंगेशकरांनी आपल्या लेकीकरता कल्पवृक्ष लावला त्याच दिनानाथरावांच्या थोरलीच्या गळ्यात हा गंधार वस्ती करून आहे..!

मानाचा मुजरा त्या शुद्ध गंधाराला..!

-- तात्या अभ्यंकर.

October 13, 2010

अभंगवाणीची बिदागी - मुगाची उसळ अन् चपाती..!

राम राम मडळी,

'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे ही आमची पंढरी आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी, अर्थात आमचे अण्णा हे त्या पंढरीतले विठोबा... आजवर अनेक वर्ष, अनेकदा त्या वास्तूत गेलो. अण्णांशी अनेकदा संवाद साधता आला. त्यांचा सहवास लाभला. अगदी त्यांच्या घरी बसून त्यांचं गाणं ऐकता आलं, चार गोष्टी शिकायला मिळाल्या. वत्सलाकाकूही तेव्हा हयात होत्या. त्यामुळे कधी शहापुरी कुंदा तर कधी थालिपिठासारखा कानडी पदार्थही हातावर पडायचा...
Smile
अण्णांची लेक शुभदा, मुलगा श्रीनिवास हेही आपुलकीने स्वागत करायचे. मी एकदोनदा खुलासा करण्याचा प्रयत्न केला परंतु 'ठाण्याचे अभ्यंकर' हे मुंबैच्या हायकोडतात वकील आहेत ही अण्णांची समजूत आजही कायम आहे!Smile

गेल्या बरेच दिवसात अण्णांकडे फारसे जाणे झाले नाही. काही वेळा सवड होती परंतु मुद्दामच गेलो नाही.. कारण म्हणजे अण्णा अलिकडे वरचेवर आजारी असतात. प्रकृती बर्‍याचदा खालावलेली असते. गात्र थकली आहेत. वयोमानही आहे त्यामु़ळे खरे तर एक सारखे कुणी ना कुणी भेटायला येणार्‍यांचा त्यांना आताशा उगाचंच त्रास होतो. हेच जाणून पुण्याच्या फेरीत मीही त्यांच्याकडे जाण्याचं टाळतो. त्यांना त्रास होऊ नये, आराम करू द्यावा इतकाच हेतू..

परंतु साधारण महिन्याभरापूर्वी एकदा अगदीच राहावले नाही म्हणून मुद्दाम त्यांच्या घरी गेलो होतो. अगदी दोनच मिनिटं त्यांच्यापाशी बसायचं आणि पाया पडून निघायचं इतकंच ठरवलं होतं..काका हलवायाकडची त्यांची आवडती साजूक तुपातली जिलेबी सोबत घेतली आणि त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या नातीनं मला आतल्या खोलीत नेलं. अण्णा खाटेवर पडूनच होते. निजलेल्या माणसाला नमस्कार करू नये म्हणतात. मी नुसताच त्यांच्या उशापाशी बसलो. त्यांना आताशा फारसं बोलवतही नाही..मी त्यांचा हात हातात घेतला, हलकेच दाबला.

"अण्णा, थोडी जिलेबी आणल्ये आपल्याकरता. कशी आहे तब्येत? काळजी घ्या.."

अण्णांनी डोळ्यातूनच ओळख दिली.. माझ्या डोळ्यासमोर सवाईगंधर्वात शेवटच्या दिवशी सकाळी ५-१० हजार श्रोत्यांसमोर, मागे विलक्षण सुरेल झंकारणारे चार तानपुरे घेऊन मंत्रमुग्ध करणारा तोडी गाणारे भीमसेन दिसू लागले आणि अगदी भरून आलं..! तिथे अधिक काळ बसवेना. शिवाय तिथे बसून अण्णांनाही उगाच त्रास देणं उचित नव्हतं..पुन्हा एकदा त्यांचा हात हातात घेतला, थोडे खांद्याचे बावळे दाबून दिले, पाउलं चेपून दिली. खूप कृतकृत्य वाटलं, समाधानी वाटलं आणि मी त्यांचा निरोप घेतला.

त्यांच्या बंगल्यातून बाहेर पडत होतो तोच दुसरे एक सत्तरीच्याही पुढे वटणारे गृहस्थ आत येत होते.. त्यांचा चेहेरा चांगला ओळखीचा वाटत होता..त्यांनी मला हसून ओळख दिली व ते आतमध्ये गेले.

'कोण हे गृहस्थ?!'

मला चटकन ओळख लागेना, नाव आठवेना. एक नक्की आठवत होतं, हे गृहस्थ अण्णांच्या अगदी घरोब्यातले आणि त्यांच्या गाण्याचे प्रेमी..त्यांच्याच गावाकडचे. अण्णांच्या बैठकीत अनेकदा भेटलेले.. मुंबैत अण्णांचं कुठेही गाणं असलं की गाण्याआधी ग्रीनरूममध्ये आम्ही ठराविक डोकी नेहमी भेटत असू..अगदी न चुकता. इतकी की अण्णांच्या एका मैफलीकरता मी थोडा उशिराने ग्रीनरूममध्ये पोहोचलो तेव्हा मला पाहून पेटीवाले तुळशीदास बोरकर थट्टेनं म्हणाले होते, "चला, तुम्ही आलेत. आता कोरम पुरा झाला!" Smile
मग ग्रीनरूममधलं गाण्यापूर्वीचे ते धीरगंभीर अण्णा. "नानजीभाई, पान जमवा पाहू.." असं नाना मुळेंना म्हणणार. तानपुरे लागत असणार. "हम्म.. पटकन जुळवा तानपुरे. छान जुळवा.." असं अण्णा म्हणणार. मग कधीमधी मीही घाबरत घाबरत त्या तानपुर्‍यांचे कान पिळायचा.. मग मी लावलेल्या तानपुर्‍याकडे नीट कान देउन अण्णा त्यात सुधारणा सुचवणार.. "हम्म.. खर्ज बघा जरा.. त्याची जवार का बोलत नाही नीट?!"

खूप आठवणी आहेत त्या मैफलींच्या..! असो.. विषयांतराबद्दल क्षमस्व..

तर 'आता भेटलेले हे गृहस्थ कोण?' असा विचार करताच थोड्याच वेळात आमची बत्ती पेटली. अरे हे तर कानडी मुलुखातलेच कुणीसे आप्पा..रामण्णाच्या परिवारातले..!

रामण्णा..! कोण बरं हे रामण्णा?

आणि क्षणात माझं मन १९८० च्या दशकात घडलेल्या एका प्रसंगाशी येऊन थांबलं..हा प्रसंग मला थोर व्याख्याते व माझे ज्येष्ठ स्नेही स्व. वसंत पोद्दारांनी सांगितला होता..

अण्णा तेव्हा सार्‍या भारतभर दौरे करत होते, गाणी करत होते. त्यांची ड्रायव्हिंगची आवड तर प्रसिद्धच आहे. तबले, तानपुरे घेऊन साथीदारांसह स्वत:च मैलोनमैल गाडी चालवायचे. गुलबर्ग्यात कुठंतरी त्यांचं गाणं होतं. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. वेळ असेल रात्री दोनची वगैरे. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. लौकरच ते एका गावात शिरले. साथिदारांना कळेचना..!

"आमचे एक गुरुजी येथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटूया..!"

साथिदारांना पुन्हा काही पत्ता लागेना. गावात सामसूम. थोड्या वेळाने एक अंधार्‍या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली. अण्णांनी खोपट ठोठावलं..कुणा एका वयस्क बाईनं दार उघडलं.. चिमणी मोठी केली. त्या खोपटात एका खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. तोच रामण्णा..! अण्णा त्याच्यापाशी गेले.. त्याला हात देऊन बसता केला.. 'काय, कसं काय? ओळखलं का? बर्‍याच दिवसांनी आलो, अलिकडे वेळच मिळत नाही..' असा त्याला कानडीतनं खुलासा केला.. मग रामण्णाही ओळखीचं हसला..जरा वेळाने अण्णांनी अक्षरश: त्याच्या पायावर डोकं ठेऊन त्याला नमस्कार केला अन् खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्याच्या हातात दिलं.. आणि त्याचा निरोप घेतला..

साथिदार मंडळींना हा प्रकार काय, हेच कळेना तेव्हा अण्णांनीच खुलासा केला -

"येथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपासचं) मी तेव्हा बेवार्शी राहायचा. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपत असे. तेथेच रेल्वेच्या थंड पाण्याने अंघोळ आदी आन्हिकं उरकायचो. खिशात दमडा नव्हता. घरातनं पळालो होतो. कानडीशिवाय अन्य कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती. स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पात्तळ उसळ अन् चपात्या असं विकत असे. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे.. इतपत जुजबी ओळख दिली त्याला. तसा अशिक्षितच होता तो.."

"उसळ-चपाती पाहिजे काय?" असं मला तो विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.

"तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार..!"

"घरी माझी आई जी काही कानडी भजनं अभंग गायची तेवढीच मला येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!"

"जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो तो पर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही. जेवायला पाहिजे ना? मग गाऊन दाखव बघू काही! तुला गाणं येतं ना? मग कशाला उगाच चिंता करतोस पोटाची?!"
गाडी पुन्हा भरधाव परतीच्या वाटेवर लागली होती.. साथिदार मंडळी गप्प होती.. धीरगंभीर चेहेर्‍याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..

रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता..!

-- तात्या अभ्यंकर.

October 04, 2010

झुणकाभाकरीची गोडी अन् वेडा कुंभार..

विठ्ठला तू वेडा कुंभार..(येथे ऐका)

वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचे दिवस होते. दादरला सेनाभवनाच्या अलिकडची गल्ली. तिथे रामचंद्र निवास ही इमारत आहे. तिच्या तिसर्‍या मजल्यावरती बाबूजींनी या चित्रपटाचे कार्यालय थाटले होते. मी अधनंमधनं तिथे दबकत जायचा.. आणि कधी कुठले कागदपत्र फाईल करून ठेव, एखादं बाड इकडून तिकडे पोचव, बँकेची कामं कर, बाबूजींकरता ठाण्याच्या भगवंतराव पटवर्धनांकडे काही काम असेल तर ते कर, अशी बाबूजी सांगतील ती फुटकळ कामं चुपचाप करायचा..कधीमधी उगाचंच त्या कार्याकयात बसून राहायचा.. मग बाबूजीच केव्हा तरी माझ्याकरता चहा मागवायचे.. कधी शांत असत, कधी कुणावर तरी भडकलेले असत, तर कधी कुठल्या विचारात असत..

अशीच एक टळटळीत दुपार.. तेथून जवळच एल जे रस्त्यावर नाना मयेकर नावाचा माझा मित्र राहायचा.. त्याच्याकडे काही कामानिमित्त गेलो होतो. त्याच्या आईनं फक्कडशी झुणकाभाकर केली होती. ती मला वाढू लागली. मी विचारलं, 'बांधून देता का? बाबूजींकडे जायचंय. तिथे खाईन व त्यांनाही देईन." त्या माउलीनं आनंदाने चार भाकर्‍या, लोणी, खर्डा आणि झुणका मला बांधून दिला. मी ती अमृततूल्य शिदोरी घेऊन सावरकर न्यासाच्या कार्यालयात पोहोचलो.

"अरे ये, तुझीच वाट पाहात होतो.."

कुठनंतरी काही कामाचे पेपर्स यायचे होते आणि ते बाड मला बाबूजी देणार होते. ते ठाण्याला भगवंतरावांकडे पोहोचवायचं होतं..

"थोडं जेवायचं आणलं आहे.. आपण जेऊया का?"

झुणकाभाकर पाहताच बाबूजी मनोमन सुखावले.. कार्यालयात आम्ही दोघंच होतो.

"अरे काय योग बघ, कालच मी थोडा वाळा आणून त्या मडक्यात ठेवला आहे.. आता झुणकाभाकर खाऊ अन् वाळ्याचं गार पाणी पिऊ.."

आम्ही तो भाकरतुकडा खाल्ला.. "कुठून आणलास रे? कोण या सुगरण बाई?" बाबूजींनी मनापासून दाद दिली..

आणि अचानक त्या दुपारी माझं भाग्य उजळलं..

'फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला तू वेडा कुंभार..'

जेवणानंतर बाबूजी खुर्चीत बसल्याबसल्या सहजच गुणगुणू लागले.. ! मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसलो होतो ते मला प्रशस्त वाटेना. मी उठून त्यांच्या पायाशी बसलो.."फिरत्या, चाका.. आकारान्त शब्द आहेत. तो आकार स्वच्छ आला पाहिजे, निकोप पाहिजे. नारायणराव बालगंधर्वांच्या तोंडून कधी 'विठ्ठल' हा शब्द ऐकला आहेस का? ठ ला ठ असला तरी त्यात मार्दव हवं, ममत्व हवं.."

बाबूजी बोलत होते.. मी ते ऐकत होतो, शिकत होतो.. गाण्याच्या कुठल्याही क्लासात न शिकवली जाणारी अनमोल शिकवणी माझ्या पदरात पडू लागली..!

"वेडा कुंभार..!" हे शब्द म्हणताना त्यात प्रेम हवं, भक्ति हवी.. अगदी हळवेपणे म्हटले पाहिजेत हे शब्द.. बर्र का!"

'तूच मिसळसी सर्व पसारा..'

"हे गाताना आपण एखाद्या सख्याशी, सुहृदाशी जसं सहजच परंतु आपुलकीनं बोलतो ना, ते भाव आले पाहिजेत.. अरे तू विठ्ठलाशी बोलतो आहेस, त्याच्याशी संवाद साधतो आहेस असं वाटलं पाहिजे ना त्याला? तुझी हाक त्याच्यापर्यंत पोचायला तर हवी!"

"काय म्हमईवाले, कळतंय का आम्ही काय म्हणतोय ते?!" Smile

'तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार..'

"अण्णाची आठवण येते रे.. इतकं सुरेख आणि एकटाकी लिहायचा..!"बाबूजी अचानक हळवे झाले.. ज्यांच्यासोबत अर्धाअधिक काळ केवळ भांडण्यातच गेला होता, त्या अण्णा माडगुळकरांच्या आठवणीनं त्या सावरकरभक्ताला अचानक भरून आलं.. मंडळी, मी साक्षिदार आहे या घटनेचा!

"आणि बर्र का, 'नसे अंत, ना पार..' ची तान अगदी छान गेली पाहिजे बर्र का. तिथं घसरून पडता उपेगाचं न्हाई!" Smile

बाबूजी मुडात असले म्हणजे मधुनच कलापुरी शब्द वापरायचे! Smile

'घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे.."

"एकेक स्वर तोलूनमापून लावायला हवा..तसा तो लागायला हवा. तसा मी प्रयत्न केला आहे.."!

'प्रत्येकाचे' चा उच्चार प्रत्त्येकाचे..' असाच आला पाहिजे.. तो शब्द फ्लॅट लागता कामा नये.. 'दैव' शब्दाचा उच्चारदेखील अगदी वळणदार हवा..!"

'मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार..'

"आता हेच बघ रे म्हमईवाल्या.. मला काय म्हाईत की तू भाकरतुकडा आणशील अन् माझ्या तोंडात लोणी पडेल?! पण आत्ता या क्षणी अशी किती माणसं आहेत की त्यांच्या मुखी हे लोणी नाही..आहे तो फक्त अंगार..! खरं सांग, आहे की नाही?!"

गाणं म्हणजे काय. ते शिकणं म्हणजे काय, हे मला कळत होतं..!

गाण्यातले भाव, शब्दोच्चार, स्वर लावण्याची पद्धत, बालगंधर्व, हिराबाई... अनेक विषयावर ते बोलत होते, मी ऐकत होतो, शिकत होतो..

अजूनही शिकतोच आहे.. कारण बाबूजींचं प्रत्येक गाणं हे त्या पांडुरंगाच्या घटांप्रमाणेच आहे.. ज्याच्या उतरंडीला अंत नाही, ना पार..!


आपण आपलं शिकत रहायचं, ऐकत रहायचं..!

त्यातलीच थोडीशी झुणकाभाकर घेऊन मी ती ललीमावशीला नेऊन दिली. तिथून जवळंच घर होतं बाबूजींचं.. विठ्ठलाकडची शिकवणी संपली होती.. झुणकाभाकर घेऊन रखुमाईकडं चाललो होतो..!

-- तात्या अभ्यंकर.