December 30, 2015

पाडगावकर..

आज पाडगावकर गेले. वयस्कर होते. एक ना एक दिवस जाणारच होते, ते आज गेले.

Normally कुणी दिवंगत झालं की पहिल्या दिवशी खूप दु:ख होतं आणि जसा काळ जाईल तसं ते दु:ख कमी होत जातं.. यावर आपण 'काळ हाच खरा वैद्य. तो भल्या भल्या जखमा बुजावतो..' असं म्हणतो..आणि पुढील वर्ष-दोन वर्षात माणसं सावरतात..

परंतु पाडगावकर यांच्या सारख्या मंडळींच्या बाबतीत निदान माझा तरी नेमका उलटा अनुभव आहे..

मला आज दु:ख झालं असलं तरी ते तितकंसं जाणवत नाहीये..परंतु जसा जसा काळ जाईल तसं हे दु:ख तीव्र होईल. आपण काय गमावून बसलो आहोत याची कल्पना मग जास्त त्रास द्यायला लागेल..

हाच अनुभव मला बाबूजी, भीमण्णा, भाईकाका, हृषिदा..किशोरदा, पंचमदा..यांच्या बाबतीत आला आहे.. यांच्यासारखी मंडळी तात्कालिक तेरा दिवसांचं किंवा वर्षभराचं दु:ख देत नाहीत. ही मंडळी कधीही भरून न येणा-या Long Term खोल जखमा देवून जातात..!

पाडगावकरही त्यांच्यापैकीच..!

कुमार किंवा अण्णांची एखादी गाण्याची मैफल ऐकली की दुस-या दिवशी अधिक त्रास होतो आणि मग मन सैरभैर होऊ लागतं..!

-- तात्या अभ्यंकर..

December 17, 2015

सुगुनामावशी..

मुंबई. दुपारी दीड-दोनची वेळ..

पापी पेट का सवाल है बाबा..

कुणी बायकोच्या हातचा छान छान डबा, तर कुणी हापिसाच्या कॅन्टिनमध्ये, कुणी वडापाव तर कुणी चायनीजच्या गाडीवर, कुणी शेट्टी लोकांच्या सोडा मारलेल्या महागड्या थाळ्या खात असतो, तर काही कॉर्पोरेट्स आपल्या छान छान सुंदर सुंदर बिनबाह्यांचं पोलकं घातलेल्या मैत्रिणीसोबत किंवा सेक्रेट्रीसोबत छानशा पंचतारांकित हाटेलात बफे लंच घेत असतो..

हाटेलं, खाऊ गल्ल्या, भजी-वडापाव-कॅनन पावभाजी-इडली-डोसा-मेंदूवडा-चायनीजच्या गाड्या.. सगळं ओसंडून वाहत असतं.. कष्टकरी मुंबई जेवत असते..

कधी कधी तात्याही मुंबईत उन्हातान्हाचा भटकत असतो आणि तो जर दादर भागात असेल तर त्याला मोठा आसरा असतो तो सुगुनामावशीच्या जेवणाचा..

सुगुनामावशीची रस्त्यावरची राईसप्लेट..रस्त्यावर उभं राहूनच जेवायची..

गेली १५-१६ वर्ष तात्या तिथे जेवतो आहे आणि आंध्रातली तेलुगू सुगुनामावशी त्याला प्रेमाने वाढते आहे..!

३ पोळ्या, एक उसळ, एक भाजी, वरण (मावशी त्याला 'डाळ' हा साधासुधा शब्द वापरते. ) आणि भात..

५०-६० रुपयांमध्ये अगदी समाधान होईल असं पोटभर घरगुती जेवण.. रस्त्यावर उभं राहून तात्या जेवत असतो..

चांगल्या चवीची टामाटू किंवा बटाट्याची रस्सा भाजी, छानशी मटकीची उसळ, कधी वांगी तर कधी शेवग्याच्या शेंगा घातलेली सुरेख चवीची फोडणी दिलेली डाळ, अगदी घरच्यासारख्या मऊसूत पोळ्या आणि उत्तम बारीक तांदळाचा भात..तुमची थाळी भरली जाते आणि मग तिथे रस्त्यावरचं उभं राहून जेवायचं. भुकेकरता अजून काय पंचपक्वान्न पाहिजेत..?

मध्यरेल्वेच्या दादर स्थानकाच्या फलाट क्र ६ वरून शिवाजी स्थानकाकडे तोंड करून शेवटच्या फाटकातून बाहेर पडलं की १०-१५ पावलांवरच रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयाला लागून असलेल्या फुटपाथवर सुगुनामावशी जेवणाचे डबे घेऊन बसते. भात, भाजी, वरण, पोळ्या असा माल भरलेले चार-पाच मोठे डबे असतात. जेवणानंतर स्वच्छ आणि थंडगार पिण्याचं पाणी. सुगुनामावशी रेल्वेच्या फलाट क्रमांक ६ वरच्याच 'पिने का पानी' नामक पाणपोईतून ही व्यवस्था करते..

मी फार पूर्वीपासून या बाईच्या प्रेमात होतो. तिचं एकदा नाव विचारलं होतं, सगळी हकिगत विचारली होती.. तेव्हा कळलं की तिचं नाव सुगुना.. मूळची आंध्रप्रदेशातली..आता मस्त बम्बई-हिंदी बोलते.. :)

"इतने साल से यहा खाना देती हू..लेकीन कभी किसिने नाम भी नही पुछा. तुम पहिला आदमी है जिसने मेरेकू पुछा..!"

मी आपुलकीनं केलेल्या चौकशीचं सुगुनामावशीला भरून आलं होतं, खूप अप्रूप वाटलं होतं..!

आता पुन्हा जाईन केव्हातरी सुगुनाच्या हातचं जेवायला..

भुकेल्या पोटाला छान छान वातानुकूलित, पंचतारांकित, सप्ततारांकित हाटेलातल्या जेवणापेक्षा सुगुनामावशीच्या हातचा सैंपाक केव्हाही बरा..!

मस्त उन्हात फुटपाथवर उभं राहून सुगुनामावशीकडे तात्या जेवत असतो आणि एकीकडे गुणगुणतसुद्धा असतो..

ए दिल है मुष्किल जीना यहा
जरा हटके जरा बचके ये है बाँबे मेरी जान..

-- (मुंबईकर) तात्या. :)

December 15, 2015

कच्च्या कैरीची दारू..

मगाशी उगीचंच मार्लिनचा बाबा आठवला. मस्त होता तो..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..!

याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. धर्मेंद्रला तर ज्यो आन्टीचं अतिकौतुक होतं. तो तर तिला कधी कधी आग्रह करून स्वत:च्या गाडीत बसवून स्वत:चं शुटिंग बघायला घेऊन जायचा..:)

प्राणसाहेबांच्या घरी काही विशेष घरगुती समारंभ असेल तर ज्यो आन्टीला देखील विशेष आमंत्रण असे..:)

कैरीची दारू बनव..अशी खास प्राणसाहेबाची तिला मे महिन्यात फर्माईश असे. पण मे महिन्यातही ज्यो कैरीची दारू रोज बनवत नसे. मात्र फक्त प्राणसाहेबांकरता बनवायची केव्हातरी..:)

इथे वसईला फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा..

आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची.. मी आणि मार्लिन कधी कधी चोरून मुंबई फिरायला जायचो..पिक्चर बघायचो.. अंधारात कोप-यातल्या शिटा पकडून ज्यांनी पिक्चर नाय बघितला त्यांची जवानी फुकट आहे.. :)

मग पिक्चर बघून आम्ही खारदांड्याला ज्यो कडे जायचो. तिथे थोडीशी जांभळाची पिवाची आणि ज्योच्या हातची ताजी मांदेली. मग मी तिथून एकटाच घरी यायचो. कारण उशीर झालेला असे. मार्लिन मग त्या रात्री ज्यो कडेच रहायची. खारला ज्यो कडे जाते आहे अशी थाप मारूनच ती घरातून निघायची. आधी चोरून मला भेटायची, आम्ही पिक्चर वगैरे बघायचो आणि मग ज्यो कडे जायची.. :)

पुढे मग केव्हातरी ज्यो नेच आमचं भांडं फोडलं.. :)

आज मात्र अचानक मार्लिन, तिचा बाबा, ज्यो, फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..

धर्मेंद्र आताशा त्याच्या लोणावळ्याच्या बंगल्यात एकटाच पीत बसलेला असतो. ज्यो च्या हातची कच्च्या कैरीची दारू आवडीने पिणारे आमचे प्राणसाहेबही काळाच्या ओघात कुठेतरी नाहीसे झाले..

असो..

-- तात्या अभ्यंकर..

August 26, 2015

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..

मोबाईल नव्हते, FB नव्हतं, whats app नव्हतं.. त्यामुळे..

"सुखी आहे पोर सांग आईच्या कानात.."

असा निरोप वाऱ्यातर्फे आपल्या आईला पाठवावा लागे.. छान निळ्या शाईने लिहिलेलं एखादं पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र किती सुरेख दिसायचं.. कधी एकदा ते वाचतो असं वाटायचं..

कसं वाटत असेल तेव्हाच्या सूनबाईला..? माझ्या आईचं पत्र आलंय, माझ्या बाबांचं पत्र आलंय! किती उत्सुकता, किती कौतुक असेल!

आता काय whats app आले, सेल्फी आले. मान्य आहे की जग जवळ आलं. पटकन संपर्काची सोय झाली. मला नव्याला दोष द्यायचा नाही..

पण वाऱ्यासोबत पाठवलेल्या त्या निरोपाचा किंवा त्या पोस्टकार्डाचा ओलावा मात्र गेला तो गेलाच!.

whats app वर पाठवलेल्या एका वाक्याच्या त्या निर्जीव मेसेजला भरगच्च लिहिलेल्या त्या आंतरदेशीय पत्राची सर नाही..

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

हा निरोप पोहोचवायला तो पिंगा घालणारा वाराच हवा..whatsapp चं ते काम नाही!

-- तात्या अभ्यंकर..

August 09, 2015

राधेमा सारख्यांची मानसिकता..

disclaimer - माझं हे लेखन सरसकट सर्वच्या सर्व स्त्रीजातीबद्दल मुळीच नाही हे कृपया लक्षात घ्या. परंतु मी जी काही मुंबई बघितली आहे, मग त्यात भुर्जीपावला महाग असलेला आमचा गरीब फोरास रोड आला, महागडे डान्सबार आणि त्यातल्या अत्यंत नखरेल मुली आल्या आणि जुहू-कुलाब्याचे पबही आले. या सर्वातून आणि अनुभवातून माझं जे मत बनलं आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे..
--------------------------------------

आता जरा माझा एक सिरीयस ष्टडीच तुमच्यासमोर मांडतो..चक्क अभ्यासच म्हणा ना..!

एकंदरीतच दिल्ली-आग्रा-यूपी-आणि पंजाब येथील ब-याचशा मुली या जरा छानछोकी प्रिय असतात. स्वत:चंच कौतुक करून घेण्यात या पुढे असतात. त्याना डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी इत्यादी-इत्यादीची जात्याच आवड असते. अवास्तव खर्च करणे, दिखावा करणे या गोष्टीही यात आल्या.

आता एकंदरीतच छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला अत्यंत पूरक असं वातावरण हे मुंबईत आहे. त्यामुळे यांना लहानपणापासूनच मुंबईबद्दल एक सुप्त परंतु जबर आकर्षण असतं.

या मुली रंगारुपानं ब-या असतात. कधी सुरेख असतात, कधी नाजूक असतात तर कधी चांगल्या उफाड्याच्या असतात. कुणी काही म्हणा..उत्तर हिंदुस्थानच्या मातीतच तो रंग आहे..

तर अशाच काही मुलींना कुणी एक भेटतो. हा कुणी एक जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी असतो. हा त्या मुलीना मुंबईची स्वप्न दाखवतो. मी वर म्हट्ल्याप्रमाणे छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला तो इसम पुरेपूर हवा देतो. आणि believe me, त्या मुली आपली सगळी अक्कल अचानक गहाण ठेवून तो इसम म्हणेल ते, अगदी म्हणेल ते करायला तयार होतात. मायाजाली मुंबईचं आणि छानछोकीचं जबरदस्त आकर्षण त्यांची सगळी विचारशक्तीच गमावून बसतं..

आणि मग या मुली मुंबईला येतात किंवा आणल्या जातात. आणि मग इथूनच पुढे शेकडो वाटा फुटतात हे लक्षात घ्या. मग कुणी माधुरी दीक्षित होता होता एखादी extra होऊनच रहाते, कुणी कुठल्या पबमध्ये entertainer बनते, कुणी escort services वाल्यांच्या हाती लागते, कुणी डान्सबर मध्ये थिरकत लाखो कमावते, कुणी एखादी छोटी-मोठी नोकरी करून इतर वेळी चक्क call girl चा व्यवसाय करते..

अर्थात, अशाही अनेक जणी आहेत की ज्या मुंबईचं वास्तव लक्षात आल्यावर वेळीच सावरून सन्मार्गालाही लागतात, सन्माननीय मार्गाने स्वत:चं करीयर घडवतात..

ही सुखविंदर कौर ऊर्फ so called राधेमा ही ह्याच सर्वाची बळी आहे. पंजाबात लग्न केलं, दोन मुलं झाली, नवरा आखातात गेला.. परंतु मूळचं जरा बरं रंगरूप..आणि वर म्हटल्याप्रमाणे मुंबईचं सुप्त आकर्षण.. मला खात्री आहे..तू सुरेख दिसतेस, तू खूप मोठी स्टार होशील, तू देवी आहेस..वगैरे वगैरे कुठल्याही बहाण्याला ती सहज फसणारी होती आणि फसलीच..

पुढे मुंबईत आली. पण हिच्या बाबतीत तेवढी एकाच वेगळी गोष्ट झाली आणि ती म्हणजे पब, call girl, डान्स बार, escort वगैरे नेहमीच्या वाटेत न शिरता ही अध्यात्म नावाच्या बाजारात शिरली. देवी झाली. तुम्ही तिचा डिझायनर मेकप बघा, कपाळावरचा फिल्मी टिळा बघा, उंची ड्रेस, महागड्या चपला बघा..माझा वर मांडलेला मुद्दा तुम्हाला पटेल. end of the day, अध्यात्माच्या बाजारातही तिच्या मनातली छानछोकी पूर्ण झालीच की..!

पुढे तिच्या चौक्या, तिचे दरबार, तिचे महागडे भक्त..या सगळ्या गोष्टी अनिवार्यच होत्या त्यामुळे त्या इतिहासात मी जात नाही. ते आता सर्वांनाच माहीत आहे..

मी फक्त कुठेतरी या सगळ्यामागचं मूळ आणि या सगळ्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच..

एरवी..माझ्या आध्यात्माच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. एका वेश्येत सुद्धा विठोबा पाहून तिला नमस्कार करणारे तुकोबा हीच माझी आध्यात्माची साधीसोपी व्याख्या आहे. असो!

-- (मुंबईचा) तात्या अभ्यंकर..

August 08, 2015

साखर-खोबर्याचा गोडवा...

तयासि तुळणा कैसी, मेरु मांदार धाकुटे..

वा! काय सुंदर शब्द आहेत!

खूप वर्षांपूर्वी..म्हणजे साधारण १९७६-७७ च्या सुमारास मी अगदी तिसरी-चौथीत असताना मला आठवतंय..आमच्या सोसायाटीमध्ये एक मेहेंदळे नावाचं कुटुंब रहायचं. त्यातले भाऊ मेहेंदळे तीन सांजा झाल्या की दर शनिवारी आम्हा सगळ्या बाळगोपाळाना इमारतीच्या गच्चीत जमवायचे. आणि मग ती हनुमंताची पर्वत उचलणारी लहानशी तसबीर ठेऊन, छान उदबत्ती वगैरे लावून आम्ही सगळे भीमरूपी महारुद्रा म्हणायचे. त्यानंतर नारळ फोडून त्याचे लहान तुकडे करून आणि त्यात साखर घालून आम्ही सगळे लहान लहान हनुमान तो सुंदर प्रसाद खायचो. पुढे काळाच्या ओघात ती आरतीही केव्हातरी बंद झाली..

तेव्हा संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा या गोष्टी घराघरात चालायच्या. अर्थात, त्यातल्या १९, २९ वगैरे पाढ्याना मी आजही घाबरतो तो भाग वेगळा! :)

पण तेव्हा तीन सांजेला देवाला नमस्कार करून घरातल्या सगळ्या वडिललधा-यांना नमस्कार करायची पद्धत होती. मी आजही संध्याकाळी दिवाबत्ती करून म्हातारीच्या पाया पडतो!

आता whatsapp आले, video games आले, स्कायपी आल्या, सेल्फी आले.. चालायचंच. माझी कुठलीच तक्रार नाही..

पण भाऊ मेहेंदळे यांच्यासारख्या बुजुर्गांनी किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा हा अनमोल ठेवा दिला आहे. तो आपण टिकवला पाहिजे!

काळाच्या ओघात भाऊ मेहेंदळेही गेले. पण त्या साखर-खोबर्याचा गोडवा आजही कायम आहे. कारण तो अक्षय आहे!

असो..

-- तात्या अभ्यंकर.

August 06, 2015

भिडे आजोबा.. :)

मगाशी साक्षात एक शिल्पं बघितलं. रस्त्याने एक अत्यंत आकर्षक तरुणी चालली होती. पांढरा शुभ्र पंजाबी बिनबाह्यांचा ड्रेस, चालण्यात एक रुबाब. हातात पर्स, छत्री वगैरे. मी तर साला ते अफाट सौंदर्य बघून क्षणभर स्तब्धच झालो.

तेवढ्यात तिचा चपलेचा काहीतरी problem झाला की चप्पल सटकली असं काहीसं झालं असावं, म्हणून ती क्षणभर थबकली आणि पुन्हा मार्गस्थ झाली.

क्षणभर एक वादळच येऊन गेलं की काय असं वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा क्षण्भर थबकलो होतो तेव्हा माझ्यापुढे १०-१२ फुटावर चालत असणारा एक म्हाताराही तिच्याकडे पाहत जागीच थबकला होता. मुलगी तर केव्हाच आम्हाला पास झाली होती. तिच्या वाटेने निघून गेली होती. पण त्या म्हाता-याबद्दल मला उत्सुकता होती म्हणून मी थोडा पुढे गेलो आणि त्याला गाठला.

बघतो तर पुष्पांजली सोसायटीतले आमचे भिडे आजोबा. एकदम मस्त friendly म्हातारा आहे! :)

"काय आजोबा.. कसं काय..? कोण होती हो ती मुलगी..? छान होती ना..?"

मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला तशी म्हाताराही खुलला..! :)

"हो रे.. खरंच छान होती रे. बहुतेक ऑफिसला चालली असावी.."

"मग..? बाकी काय कसं आजोबा, कुठपर्यंत फेरी..?"

"अरे नेहमीची फेरी. अंघोळ वगैरे आटपून जरा देवदर्शन. मग यायचं जरा एक चक्कर मारून. एरवी मी दुस-या वाटेने जातो पण आज जरा पोष्टात काम होतं म्हणून इकडून आलो.."

"आता उद्यापासून ह्याच वाटेने सकाळचा फेरफटका पूर्ण करत जाईन. वेळ बघून ठेवली आहे.."

"कुठली वेळ..?"  मला एक क्षण कळेचना.

"अरे तिच्या ऑफिसला जायची रे.. कुठल्या ऑफिसला वगैरे जात असेल तर हीच वेळ असेल ना.? ख्या ख्या ख्या..!" :)

"अरे बाबा..ही वेळा बघून ठेवायची सवय खूप जुनी आहे. आता या वयात कशी सुटेल..?"

म्हातारा आपली कवळी दाखवत मनमुराद हसला.. :)

"भिडे आजोबा..गुरु आहात..!"

"हा हा हा.. दे टाळी.. चल जरा चहा घेऊ.."

चहा घेताना आजोबा मिश्कीलपणे पुटपुटले..

"संध्याकाळी ऑफीस किती वाजता सुटतं कुणास ठाऊक.."

-- (भिडे आजोबांचा नातू) तात्या.. :)

July 16, 2015

माझं आध्यात्म..!

दर्शन, प्रदर्शन आणि जाहिरात म्हणजे आध्यात्म नव्हे..

आमच्या भागवतधर्माने नामस्मरण हा अतिशय सोपा आणि सर्वांना केव्हाही, कधीही करता येण्याजोगा भक्तिमार्ग सांगितला आहे. माझ्या मते तरी हेच खरे आध्यात्म..!

ठीक आहे..श्रुतीस्मृतीपुराणोक्त, कर्मकांड..होमहवन, पोथ्यापुराणं हे मीही मानतो. ते करण्याला ना नाही. पण त्याची जाहिरात नको, अवडंबर नको. कारण जाहिरात, अवडंबर ह्या गोष्टी आल्या की त्यातला देव निघून जातो आणि उरतात ती केवळ ढोंगी कर्मकांड..! तसं होता कामा नये..!

"मग..? गेली पंचवीस वर्ष गुरुवारचा उपास करतोय..!"  

असं अभिमानाने सांगितलंत रे सांगितलंत की गेली ती २५ वर्ष फुकट..!

अभिमान आला, अहं आला की अध्यात्म संपलंच म्हणून समजा..!

उप-वास करताय ना..? मग तो स्वत:पुरता.स्वत:च्या घरात मर्यादित ठेवा. काय खिचडी,फळं खायची ती कुणालाही त्रास न देता खा..

"माझा उपास आहे हो..माझ्याकरता खिचडी करा.."

ज्या क्षणी अहंभावाने अशी ऑर्डर सोडाल की त्या क्षणी त्या उपासाचं महत्व संपलंच म्हणून समजा..!

अगदी आमच्या भागवतधर्मातल्या वारीचंही तसंचं आहे.

"मग..? अहो गेली पंचवीस वर्ष न चुकता वारीला जातोय..!"

असं अभिमानाने म्हटलंत की ती २५ वर्ष फुकट गेलीच म्हणून समजा. २५ वर्ष वारीला जाताय ना..मग काळजी करू नका. विठोबाचं लक्ष आहे तुमच्याकडे..!

"हो..मला रविना टंडन अतिशय आवडते..तिचं सौंदर्य मला भावतं असं खुलेपणाने म्हणा. तिथे आध्यात्म आहे.. पण मनातल्या मनात रवीना आवडत असूनही,

"रवीना माझ्या बहिणीसारखी आहे.."

असं म्हटलंत की त्यातलं आध्यात्म संपलंच म्हणून समजा..! :)

असो.. हे झाले माझे व्यक्तिगत अध्यात्मिक विचार. कुणाला पटतील, कुणाला न पटतील. कुणाला पचतील, कुणाला न पचतील..!

ते सर्वांना पटलेच पाहिजेत असा जर माझा आग्रह असेल तेथे माझंही आध्यात्म संपलं....! :)

कारण आध्यात्मात आग्रह नसतो..हट्ट नसतो..असते ती फक्त परमात्म्यावरची निर्व्याज श्रद्धा.. मग त्या परमात्म्याला तुम्ही गणपती, शंकर, विठोबा, दत्त, अल्ला, येशू, गुरुग्रंथसाहेब.. काहीही नाव द्या.. It makes no difference..!

आणि अखेर अध्यात्म्याचा तरी सगळा हा अट्टाहास का..? तर शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून..!

फार सुंदर अभंग आहे आमच्या अण्णांचा..! असो..

-- तात्या अभ्यंकर.

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार या महान ग्रंथातून साभार..!) :)

July 14, 2015

हो..मी जुनाट आहे..

हो..मी जुनाट आहे. तुमचा आरोप मला मान्य आहे..

मला काही नकोत ते malls, whats app, सेल्फी. मला काही नको. मोबाईल तर मुळीच नको. मला कुणाला फोन करायचाच असेल तर तो मी पोस्टात जाऊन आठ आणे भरून करेन. पूर्वी करायचो तसा..!

मला हवी आहेत ती बाबूजींची आणि सुमन कल्याणपूरची संध्याकाळी आकाशवाणीवर लागणारी गाणी. घाल घाल पिंगा.हे सुमनताईंचं गाणं ऐकायचं आहे मला..!

मला हव्या आहेत सुधा नरवणे आणि सुहासिनी मुळगावकर. मी शोधतो आहे त्या दोघींना..!

मला कुठल्याही वृत्तवाहिन्या नको आहेत.. मला हवे आहेत ते अनंत भावे आणि प्रदीप भिडे.

मला हवी आहे छानशी दिसणारी..बातम्या देणारी कृष्णधवल स्मिता तळवलकर..

मला हवे आहेत ते संध्याकाळी ७ वाजताच लागणारे कुकर आणि त्यातला गरमगरम वरणभात. सोबत तोंडी लावायला काकडी-टोमेटो ची कोशिंबीर किंवा फोडणीची मिरची..आणि पोळीसोबत आईनं केलेली शिकरण..जी कुस्करताना तिच्या बुडलेल्या हाताची तिला चव आहे..!

मला सकाळी ६ वाजता आकाशवाणीवर गायलेला आमच्या अण्णांचा अभंग ऐकायचा आहे. मला ऐकायचे आहेत लासलगाव, नंदूरबारचे बाजारभाव.. आणि मला मनापासून ऐकायचं आहे वनिता मंडळ..

हो..मी जुनाट आहे. तुमचा आरोप मला मान्य आहे..

-- तात्या अभ्यंकर..

June 06, 2015

भारतीय स्त्री सौंदर्य..

भारतीय स्त्री सौंदर्य -

गोरं गुलाबी सरळ नाकाचं काश्मिरी सौंदर्य.. काश्मिरी पुलावाइतकंच मोहक..!

लखनवी सौंदर्य - केशराचं दूध शिंपडलेल्या, साजूक तुपातल्या घमघमणा-या गोश्त बिर्याणीसारखं..!

पंजाबी सौंदर्य - मस्त आकर्षक उफाड्याचं..मेथी का साग आणि मकाईच्या की रोटी इतकंच चवदार सौंदर्य..!..

युपीचं नमकीन सौंदर्य..भौजाईचा मोकळेपणा..!

दिल्लीचं पराठागल्लीतलं खास हिंदुस्थानी सौंदर्य..!

मुंबई..बंगलोर..मधलं कार्यालयीन स्लीव्जलेस सौंदर्य..!

राजस्थानातलं अजमेरी कलाकंदांसारखं नाजूकसाजूक सौंदर्य..!

बंगालातली मिष्टी..रोशोगुल्ला सौंदर्य..क्या केहेने..!

खास गुजराथी साडीतलं..अने घागराचोलीतलं नवरात्री सौंदर्य..अगदी ताजा ढोकला अने फाफडा..

माझ्या मराठीतलं..नाकी नथ आणि नौवारी साडीतलं सौंदर्य..कधी मराठमोळी पुरणपोळी तर कधी कोल्हापूरातल्या मिसळीसारखं झणझणीत..तर कधी कोकणातलं गोरंगोमट चित्पावनी सौंदर्य..!

आणि माझ्या दक्षिण भारतातलं..मोठ्या बोलक्या डोळ्यांचं..सुरेख केशसंभाराचं..आणि कमनीय बांध्याचं सौंदर्य..!

माझ्या भारतीय स्त्री सौंदर्याला माझा सलाम.. जियो..!

-- (भारतीय स्त्रीसौंदर्याचा रसिक) तात्या..:)

April 28, 2015

हृषिदा आणि सादगी..

हृषिदांच्या चित्रपटातील 'घर' ही संकल्पना आणि त्यामागील सादगी, साधेपणा..

मान्य आहे की हृषिदांच्या बर्या०च चित्रपटांमध्ये जरा ऐसपैस किंवा बंगलेवजा घर दाखवण्यात आले आहे. परंतु त्यात कुठेही भडकपणा किंवा भपका नसे. ते घर, तो बंगला आणि त्यात राहणारी माणसं इतकी आपलीशी वाटत की आपणही दोन दिवस त्या घरी जाऊन त्या पात्रांसोबत राहावं असं वाटत असे. हृषिदांच्या चित्रपटातील 'घर' या संकल्पनेबद्दल खूप दिवस लिहायचं माझ्या मनात होतं. यापूर्वी या विषयावर कुणी लिहिलं आहे की नाही ते माहीत नाही..

अनुराधा चित्रपटातल्या बलराज सहानी या गावातल्या डॉक्टरचं घर. त्यात राहणारी एक सोज्वळ बायको, आणि त्यांची एक गोड मुलगी. सबंध चित्रपटात हे घर, त्यातल्या खोल्या आपल्यसमोर येत असतात. त्यातला साधेपणा बघा..

आशीर्वाद चित्रपटातलं डॉ संजीवकुमार आणि सुमिता सन्यालचं नीटनेटकं घर बघा. त्या घराभोवती फुलांची छान बाग करणारे दादामुनी..

आनंद चित्रपटातला बाबूमोशायचा खानदानी बंगला बघा. अगदी साधा आणि सात्विक. घरामध्ये वडिलांसमान असलेला एक जुना नोकर. आनंदचं त्या घरातलं वावरणं, त्याच घरात आनंदने अखेरचा श्वास घेणं.. त्याच घरात आनंदने अगदी घरगुती स्वरुपात गायलेलं मेने तेरे लिये ही.. हे गाणं.. किंवा त्याच घरात एका संध्याकाळी आनंदने गायलेलं कही दूर जब दिन ढल जाए.. हे अंतमुख करणारं गाणं..!

गुड्डी चित्रपटातलं घर बघा. भाऊ, वहिनी, वडील ए के हंगल, आणि सर्वांची लाडकी असलेली गुड्डी.. अगदी घरगुती वेषात बुद्धिब़ळाचा डाव मांडून बसलेले हंगल.

घर, घराचं घरपण आणि त्यातली तुमच्याआमच्या सारखी साधी माणसं, त्यांची आपसातली नाती या सगळ्या गोष्टी हृषिदांनी कशा जपल्या आहेत हे तुम्हाला त्यांच्या चित्रपटातून बघायला मिळेल. माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे..!

बावर्ची चित्रपटातील चांगला चौसोपी वाडा. वाड्यातच प्रत्येकाच्या वेगळ्या खोल्या. कुटुंबप्रमुख हरिंन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांची वेगळी खोली. त्या खोलीत असलेली त्यांची दागिन्यांची पेटी. :)

एके दिवशी 'क्यो न सब लोग एक जगह एकठ्ठा होकर चाय पिये.?' असं म्हणत बावर्चीने घरातल्या सगळ्या मंडळींना चहासाठी एकत्र बोलावणं.. आणि चहा पिता पिता सगळ्यांनी म्हटलेलं ..भोर आयी गया अंधियारा..हे मन्नादांचं अप्रतिम गाणं..!

मिली चित्रपटातला दादामुनींचा फ्लॅट, त्यात राहणारी त्यांची बहीण उषा किरण.. वरच्या मजल्यावरचा ओपन टेरेस असलेला अमिताभचा फ्लॅट. त्या सोसायटीतली मुलं, माणसं.. आजारी मिलीची खोली. एके रात्री तिचं वडील दादामुनी यांना मिठी मारून रडणं.. मिलीचा सैन्यातला भाऊ..

घर आणि नातेसंबंध हृषिदांनी कसे जपले आहेत पाहा.. उगीच नाही मी आज त्यांच्या नावानं टीपं गाळत..!

गोलमाल मधला भवानीशंकरांचा ऐसपैस बंगला, त्यात राहणारी त्यांची बहीण शुभा खोटे आणि देखणी मुलगी बिंदिया गोस्वामी.. तर रामप्रशाद दशरथप्रशाद शर्माचं साधं बैठं घर. त्याच्या बहिणीने छान, नीटनेटकं ठेवलेलं..घराच्या स्वयंपाकघराला दीना पाठक आत येऊ शकेल अशी एक खिडकी..! :)

खूबसुरत चित्रपटातील दीना पाठकने जपलेली त्या घरातील शिस्त.. दादामुनी, तीन मुलं, सुना, अशी एकत्र कुटुम्बपद्धती.. त्या घरात राहायला आलेली सुनेची बहिण रेखा.. तिचा अल्लडपणा, तिचा वात्रटपणा, दादामुनींसोबत तिची असलेली दोस्ती..! :)

मला सांगा, हल्लीच्या चित्रपटात कुठे पाहायला मिळतं का हो असं? आठवतंय कुणाला हल्लीच्या चित्रपटातलं असं सात्विक घर आणि त्यातील माणसं आणि त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबवत्सलता..??

म्हणजे मग घर आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या मूल्यांची जपणूक करणार्या हृषिदांचं महत्व कळतं आणि त्यांच्यावर डोळस भक्ति जडते..!

हल्ली फक्त रा वन ने ३०० कोटींचा धंदा केला आणि चेन्नई एक्सप्रेसने ५०० कोटींचा धंदा केला असा आणि इतकाच बाजार पाहिला की खरोखर खूप कीव येते, दया येते..!

या ३०० किंवा ५०० कोटीं पेक्षा मला मिशावाले भवानी शंकर आणि रामप्रशाद दशरथप्रशाद शर्मा खूप खूप मोठे आहेत.. कारण ते माझे आहेत.. कायमचे...!

Hats off to you.. हृषिदा..!

-- तात्या अभ्यंकर..

April 03, 2015

प्रासंगिक करार..:)

पूवी शाळेतल्या सहली जायच्या तेव्हा मला आठवतंय, शाळा मरामापम (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) च्या यष्ट्या बुक करायच्या..

'प्रासंगिक करार..' असं त्या एसटीवर लिहिलेलं असे..

आज अनेक वर्षांनी प्रासंगिक करार हे शब्द आठवले आणि उगीचंच हळवा झालो..अजूनही शाळा प्रासंगिक करार करून यष्ट्या बुक करतात का हो..?

 मरामापम ची एस टी..माझं एक श्रद्धास्थान..!

मला व्हायचं आहे त्या एस टी चा कंडक्टर... शहरापासून दूर.. कोकणातल्या एखाद्या अगदी रिमोट गावाहून तालुक्याच्या गावाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक.. अशी एस टी सुटते..त्या एस टी चा कंडक्टर व्हायचंय मला..

"काय जोशीबुवा..आज तालुक्याला काय काढलं काम..?" अशी एखाद्या प्रवाशाची चौकशी करायची आहे..

मग जोशीबुवा त्याच्या चुलत्याने त्याची पोफळी कशी हडप केली आहे आणि मुंबईच्या हायकोर्टात त्याचा कज्जा कसा सुरू आहे ती कथा सांगणार..मला ऐकायची आहे ती सगळी कथा.. :)

गावातल्या पोरांना तालुक्याच्या शाळेत सोडणारी एस टी..तिचा कंडक्टर व्हायचंय मला..

त्या पोरांचे ते शाळेचे गणवेष.. त्यांची दप्तर.. या सगळ्यात तालुका येईस्तोवर हरवून जायचं आहे मला..पाचवीतला कुणी बबन्या, आठवीतली कुणी चिंगी, नापासाच्या हापट्या खाणारा कुणी शंकर.. यांच्यातच मनसोक्त रमायचं आहे मला..!

मला स्मार्ट फोन, FB, whatsapp, सेल्फी, मोठेमोठे Mall.. हे काहीही नको आहे..

शहरापासून दूर.. कोकणातल्या एखाद्या अगदी रिमोट गावाहून तालुक्याच्या गावाला सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा सुटणा-या एस टी चा कंडक्टर व्हायचंय मला..

-- तात्या अभ्यंकर..

March 30, 2015

तात्याचे आध्यात्मिक विचार.. :)

एका चटणी-भाकरीहून अधिक आस नाही..खरंच नाही..थोडी भाकरी आणि गडवाभर पाणी..!

एक वितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..

आणि बाकी साथीला असते ती भागवतधर्मात सांगितलेली नामस्मरणाची अक्षय शिदोरी..

मग त्या शिदोरीत सुदाम्याचे पोहेही असतील, ग्यानबा-तुकयाची अमृतवाणीही असेल..परंतु ते अक्षय असेल, अवीट असेल..

ऐहिक सुखं सगळ्यानाच हवीहवीशी वाटतात..त्यात काही चुकीचं आहे किंवा तो गुन्हा आहे असं म्हणण्याचा मानभावीपणा मी करणार नाही.. त्यातून मीही नाही सुटलो आणि तुम्हीही सुटला नाहीत...पण आपलं चुकतं इतकंच की आपण ती सुखं अवीट आणि अक्षय आहेत हे धरून चालतो..!

आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की एक दिवस असा येईल की हात उचलून तोंडात घास घ्यायची देखील आपल्यात ताकद उरणार नाही..भले मग समोर उच्चप्रतीच्या सुवासिक बासमतीचा भात असेल..कानानं धड ऐकू येणार नाही..डोळ्यांनी धड दिसणार नाही..

पण तेव्हाही आपल्याला गोड वाटेल तो फक्त विठोबाच..! कारण तो अक्षय आहे..अवीट आहे..त्याकरता दिसंयाचीही गरज नाही आणि ऐकू येण्याचीही गरज नाही..

या जगात देव नाही..असं जे लोक म्हणतात त्यांचं मला हसू येतं.. माझं काही भलं झालं नाही..माझ्या आयुष्यात अमुक अमुक वाईट गोष्टी घडल्या म्हणून या जगात देव नाही..

अहो पण मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला देव बसलेलाच नाहीये..तो तुमचं भलंही करत नाही आणि वाईटही करत नाही..तुमचं भलं होतं किंवा तुमचं वाईट होतं ती तुमची destiny..! शिवाय भलं आणि वाईट या गोष्टी सापेक्ष आहेत..त्यात देवाचा काहीही संबंध नाही..तो या सगळ्याच्या परे आहे..परंतु तरीही त्याच्या नामस्मरणात सात्विक आनंदाचा अक्षय झरा शोधणं म्हणजेच आध्यात्म..!

ग्यानबा-तुकयाला हा अक्षय आनंदाचा झरा सापडला आणि त्यांनी तो तितक्याच उदारतेने हातचं काहीही राखून न ठेवता इदं न मम या भावनेने लोकाना वाटला म्हणून ते मोठे..म्हणून ते संत..

अन्यथा.. मला आणि माझ्या भावंडाना आमचे आईवडील टाकून गेले..आम्ही उघड्यावर पडलो..देवानं आमचं भलं केलं नाही आणि म्हणून या जगात देवच नाही..असं ज्ञानोबाना देखील सहज म्हणता आलं असतं..!

अर्थात, आमचे ज्ञानोबाराया निरीश्वरवाद्यांइतके बुद्धिमान नव्हते हे आमचं भाग्य..! :)

त्यामुळे आम्ही निरीश्वरवादी आहोत..आम्ही देव मानत नाही..असं जे लोक म्हणतात त्यांना माझ्या शुभेच्छा.. :)

-- श्री श्री तात्याशंकर..

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार.. - या महान ग्रंथातून साभार..) :)

March 28, 2015

सोरट.. :)

१५ पैशांना उत्तम लिंबू सरबत..

२० पैशांची ती काचेची जादू.. तिच्या मधोमध काच असे आणि चहुबाजूंनी प्राण्यांची चित्र असायची..समजा हत्ती यायला हवा असेल तर या बाजूने काचेवर आधी हत्तीचं चित्र पालथं घालायचं आणि मग काच गुंडाळायाची.. दुसरीकडून कागद उघडले की काचेआड तो हत्ती दिसायचा..!

आठवते का कुणाला ती काचेची जादू..? :)

१० -१५ पैशात लीचीवाला सांगेल त्या प्राण्याचे आकार करून द्यायचा..एका जाड लाकडी बांबूला गुंडाळलेली ती चिकट लीची..

१० पैशाला बुन्दिचा उत्तम लाडू मिळायचा.. वाण्याकडच्या काचेच्या बरणीत ते लाडू ठेवलेले असयाचे.. :)

१० पैशात सोरट खेचायचं.. समोर आमिष म्हणून बक्षिसांमध्ये एक आणि दोन रुपायाच्या करकरीत नोटा असायच्या.. पण सोरट मध्ये त्या नोटा कधीच कुणाला लागत नसत.. पण तेव्हा हे कळायचं नाही..

अहो..दहा पैशात जर कुणाला एक आणि दोन रुपायच बक्षिस लागलं असतं तर त्या बिचा-या सोरटवाल्याने  काय खाल्लं असतं हे समजायला आयुष्याची चाळीस वर्ष जावी लागली..!

असो..

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी..!

-- (मनाने अजूनही १९७० च्या दशकातच वावरणारा) तात्या..:)

March 22, 2015

तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे..

मी म्हटलं होतं ना.. की भीमण्णा, बाबूजी, भाईकाका, पंचमदा, किशोरदा, हृषिदा, प्राणसाहेब, दादामुनी, उत्पल दत्त यापैकी कुणी ना कुणी रोज माझ्या सोबतीला असतात..

काल रात्री माझ्या घरी भाईकाका आले होते.. खूप गप्पा मारल्या आम्ही..

घरी आल्याआल्या मला म्हणाले की गुढीपाडवा आहे आज..गोड काय केलं आहेस..?

"चितळेचं आम्रखंड आणलं आहे.."

"मला आण पाहू लगेच.." :)

पण नंतर का माहीत नाही..अचानक थोडं वातावरण गंभीर झालं.. अंतुबर्वा येऊन बसला आमच्यात..!

"विशाल सागरतीर आहे, नारळाची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत..सारं काही आहे..पण त्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देउन जातं..आणि मग उरतं ते केवळ भयाण विनोदाचं अभेद्य असं कवच..!"

"संध्याकाळी त्या माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरतं..!"

"भाईकाका.. केवळ या दोन वाक्यांकरता मी तुम्हाला माझ्या मनाचं ज्ञानपीठ देउन टाकलं आहे.."

"अरे असू दे रे.." -- भाईकाका म्हणाले..

"का हो भाईकाका.. नारायणच्या मुलाच्या मुठीत तो सकाळपासूनचा काळवंडलेला लाडूच तुम्ही का हो ठेवलात..?"

"जाऊ दे रे.. चल..आपण गजा खोतला भेटू..!" - भाईकाका हसून म्हणाले.. :)

गजा खोत मात्र निखळ आनंद देउन जातो.. पेटीच्या पट्टीत उगीच का कांता मधला उ शोधणारा भाबडा गजा खोत..:)

कलेवर, माणसांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारे रावसाहेब..

जिंदादिलीने आयुष्य जगायला शिकवणारे काकाजी..

केरसुणीने समुद्राच्या लाटा अडवायला जमलं नाही हे आयुष्याच्या अखेरीस कबूल करणारे आचार्य...

"सापडला रे सापडला..मला चितळेच्या आम्रखंडातही आत्मा सापडला.." असं म्हणून भाईकाका मनमुराद हसले..:)

"तात्या.. लेका चाळीशी ओलांडलीस.. पण उसासे टाकणारा तुझ्यातला नाथा कामत अजून तसाच तरूण आहे रे.."

माझ्या स्टेटसं वरचा प्रियामणीचा फोटो पाहत भाईकाका मिश्किलीने म्हणाले.. :)

"हो..भाईकाका.. पण नंदा प्रधान लिहून तुम्ही आम्हाला जखमी का केलंत..? त्यापेक्षा नाथा कितीतरी आनंद देणारा नाही का..?

नंदा प्रधान..आणि इंदू वेलणकर.. जीव ओवाळून टाकावासा वाटतो..!

पुष्कळ गप्पा रंगल्या आमच्या.. सगळ्याच इथे लिहिणं शक्य नाही..ज्या सहज आठवल्या त्या लिहिल्या..

मग मला भाईकाकनी आठवणीने त्यांचे नेहमीचे सल्ले दिले..

'तुला जे काही आवडेल..मग ते गाणं असो..कविता असो..चित्रपट असो.नाटक असो..काहीही असो..ते तू जगालाही मनमुराद सांग.."

"कुठल्याही माणसाकडे एकाच एक चष्म्यातून बघू नको..त्याला अनेक कंगोरे असू शकतात..ते तपासून बघायचा प्रयत्न कर..एखाद्याचे दोष शोधण खूपच सोपं आहे रे..!"

"दुस-याच्या कलेचे, गुणांचे योग्य ते कौतुक करून तू मोठा होत असतोस हे लक्षात ठेव..!"

"चल निघतो रे..कुमारच्या घरी मैफल आहे..भीमसेनही यायचा आहे..आता मस्त मैफल जमणार..तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे.."

असा आशीर्वाद देउन भाईकाका निघून गेले..

आता स्वर्गात ती मैफल जमली असेल.. कुमारांचं "उड जाएगा हंस अकेला.." भन्नाट सुरू असेल..!

-- तात्या अभ्यंकर..

March 14, 2015

घाल घाल पिंगा वा-या..

कसा असेल तो परस.. जेव्हा मोबाईल नव्हते, sms नव्हते, whatsapp नव्हतं.. काही काही नव्हतं..?

तेव्हा कसा असेल तो परस. जिथे फक्त वारा हाच सखासोबती होता..तिथे जाऊन पिंगा घालणारा होता.. माझ्या माहेरचा परस.. जिथे मी काचापाणी खेळले..जिथे मी सगरगोटे खेळले..असा माझ्या माहेरचा परस..!

परसात पिंगा घालणारा वारा..
'सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..' इतकाच निरोप पोहोचवणारा वारा..!

अरे भादव्यात वर्ष झालं की रे.. अरे वा-या, ना आईची काही खबर..ना भावाची काही खुशाली..तू जाशील का रे माझ्या माहेरी..आणि घालशील का रे पिंगा..?

माझी काळी ढूस्स कपिला..आणि तिची खोडकर नंदा.. अरे पण वा-या..ते तिचं तिच्या आईला ढूशी मारणं मला इथून दिसतं आहे रे.. मलाही माझ्या आईच्या मांडीवर मनसोक्त डोकं खुपसायचं आहे..तिच्याकडून डोक्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आहे रे..!

माझ्या बाबांनी लावलेला माझ्या परसातला तो पारिजातक...त्या माझ्या परसात त्याच्या फुलांचा पडलेला सडा.. अरे वा-या..आपण जाऊया का रे ती फुलं वेचायला..? नेशील तू मला..?

अरे ही अशी भाकरीसारखी दाट साय येते रे माझ्या कपिलेच्या दुधाला.. तशीच माझ्या आईची माया.. आणि मग ती माझ्या माहेराची साय-साखरेची खरवड..!

वा-या..तुला हवी आहे का रे ती सायसाखरेची खरवड..? मग जाशील माझ्या माहेरी..? खूप खूप समृद्ध आहे रे माझं माहेर.. तिथे सात्विकता आहे माझ्या आईची..माझ्या कपिलेची..आणि माझ्या पारीजातकाची..!

जाशील का रे माझ्या माहेरी..? घालशील मनसोक्त पिंगा.. मी ही तेव्हा तुझ्याचसोबत असेन..जाऊया आपण..?

-- तात्या अभ्यंकर..

March 10, 2015

राना..

"तात्यासाब, ये बॉटल में पिने का थंडा पानी भरके दो ना.."

रिकामी पाण्याची बाटली घेऊन नबिला आमच्या बारवर यायची. मग मी तिला बर्फाचं थंडगार पाणी त्या बाटलीत भरून द्यायचो..

शफाक आणि नबिला..
मुंबैच्या कोंग्रेसहाऊस येथील कोठ्यावर रोज रात्री प्रत्येक आपाच्या कोठ्यावर शफाक गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे विकायला यायचा.. जी उमराव अमीर मंडळी कोठ्यावर गाणं ऐकायला बसलेली असतील त्यांना तो ही गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे विकायचा.. मग ती मंडळी आपापल्या लाडक्या तवायफांना ती गुलाबाची फुलं द्यायची, हाताला गजरे बांधायची..

शफाक रोज दादरच्या फुलबाजारात जाऊन भरपूर गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याच्या कळ्या आणायचा आणि मग दिवसभर नबिला ते गजरे विणायची.. रात्री नऊ - साडे नऊ वाजले की शफाक काँग्रेस हाऊसला हजर व्हायचा..

आमच्या बारच्या मागेच त्यांचं खोपटं होतं.. तिथे शफाक-नबिलाचा आणि त्यांच्या २-३ कच्च्याबच्च्यांचा संसार चालायचा.. त्यांची मोठी मुलगी राना दहावीमध्ये होती..चांगली हुशार आणि चुणचुणीत होती..
मोगर्‍याचे गजरे आणि गुलाबाची फुलं यातून त्यांची कमाई मात्र भरपूर व्हायची.. कारण ती गुलाबाची फुलं आणि मोगर्‍याचे गजरे शफाक कोठ्यावरच्या तवायफबाजांना भरपूर चढ्या भावात विकायचा..

त्यांची दहावीतली मुलगी राना एकदा संध्याकाळी माझ्या बारमध्ये आली.. संध्याकाळच्या वेळेला ही इथे का? हा प्रश्न मला पडला.. रानाच्या हातात दहावीच्या बीजगणिताचं पुस्तक होतं आणि त्यातला Quadratic equation चा एक प्रॉब्लेम घेऊन ती तो मला विचारायला आली होती..!

फोरासरोडच्या देशीदारूच्या एका बारचा कॅशियर अभ्यंकर, आणि त्याला तवायफांच्या कोठ्यावर गजरे विकणार्‍या शफाक-नबिलाची चुणचुणीत मुलगी राना बीजगणित विचारायला आलेली होती..!

अजब प्रकार होता..!

मी माझ्या कुवतीनुसार तिला तो Quadratic equation चा प्रॉब्लेम बरोब्बर सोडवून दिला होता.. राना आनंदित झाली होती..

"तुझे कैसे पता.. की मै तुझे मदद कर सकता हू..?" -- मी तिला विचारलं..

"अम्मी ने कहा.. आप पढे-लिखे हो.. आप जानते होंगे.."

रानाने मनमोकळं हसून उत्तर दिलं होतं. मला खूप कौतुक वाटलं त्या पोरीचं.. मी तिला एक थंडा पाजला..
त्यानंतरी ८-१० वेळेला राना मला गणित विचारायला आली होती.. पोरगी खरंच हुशार होती.. काही एक चांगलं शिकायची जिद्द असलेली होती.. फोरासरोडच्या त्या भयाण दुनियेत राना म्हणजे चिखलात उगवलेलं एक कमळंच म्हणावं लागेल..

एके दिवशी रानाने माझ्याकरता स्वत:च्या घरून अंडाभूर्जी करून आणली होती.. एकदा खिमापाव घेऊन आली होती..

दिवस चालले होते, राना शिकत होती.. मी तिच्याकडे केवळ दहावीतली एक कष्टाळू विद्यार्थिनी म्हणून पाहात होतो.. पण या माझ्या कल्पनेला धक्का बसला जेव्हा तिचे आईवडील शफाक आणि नबिला मला मुद्दाम भेटायला आले तेव्हा..!

"तात्यासाब, राना अगर आपके यहा आए तो उससे बात मत करना.. आपकी कुछ गलती नही है..लेकीन अल्ला के लिये उससे कुछ बात मत करना.."

मला काही कळेचना..

"तात्यासाब, बुरा नही मानना.. लेकीन राना मोहोब्ब्त करने लगी है आपसे.. हम उसके माबाप है.. हम उसके दिल की बात समझ सकते है.. लेकीन वह अभी नासमझ है..जो बात हो नही सकती वो हो नही सकती.. बस..!"

बाझवला.. दहावीतली नासमजझ पोर गणिताच्या तात्यामास्तरांवर चक्क भाळली होती..?

पण ते वयच वेडं असतं.. फोरासरोडच्या त्या दुनियेत, जिथे ती वाढली, दहावीपर्यंत उत्तम शिकली होती..तिला एका सुशिक्षित घरातल्या, सभ्य, शिकलेल्या व्यक्तिबद्दल, तिच्याशी आपुलकीने बोलणार्‍या व्यक्तिबद्दल आपुलकी, प्रेम वाटणं ही काही अशक्य गोष्ट नवह्ती.. कुणाचं मन कुठे आधार शोधेल हे काही सांगता यायचं नाही..!

परंतु त्यानंतर राना विशेष कधी मला भेटायला आलीच नाही.. फार तर एकदोनदाच आली असेल.. तिचे आईवडील जे तिच्याबद्दल बोलले होते ते तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होतं..!

परंतु नंतर मात्र फारशी आली नाही.. तिला बहुतेक घरूनच तंबी मिळालेली असणार..! मीही तो विषय तिथेच सोडला होता, कारण मला मुळात त्यात कधीही इंटरेस्टच नव्हता..

राना काही यायची नाही परंतु शफाक आणि नबिला मात्र नेहमी मला आदाब करायचे..

पुढे फोरास रोड सुटला, देशीदारू बार सुटला..

शफाक आणि नबिला दोघेही अशिक्षित होते..परंतु त्यांची वागणूक किंवा समझदारी ही खूपच स्पृहणीय होती..
रानाचा आता निकाह झाला असणार.. शफाकची ती झोपडीही आता पाडली.. तो दुसरीकडे कुठेतरी राहतो.. रोशनआपच्या कोठ्यावर एकदा फुलं विकताना दिसला होता परंतु आमची काही बोलाचाली झाली नाही..
मुंबैचा अंधारलेला फोरास रोड.. आणि तेथील काळी, गलीच्छ परंतु तितकीच अनोखी दुनिया.. आणि त्या दुनियेत राना नावाची माझ्यावर जीव असलेली एक मुलगी..!

-- तात्या अभ्यंकर..

February 19, 2015

क्षितिज..!

अफजलखान, पन्हाळा-विशाळा, शास्ताखान, आग्रा-सुटका.. म्हणजेच महाराज नव्हेत..

या चार गोष्टी तर महाराजांनी सहज जाता जाता केल्या आहेत..महाराज या चार गोष्टींच्या खूप पल्याड आहेत..त्यांचा आवाका क्षितिजापर्यंत आहे..जिथे नभाची आणि सागराची भेट होते तिथे महाराज आहेत..

आपल्याला जमल्यास ते क्षितिज शोधायचं आहे..आपल्याला जमल्यास ते क्षितिज समजून घ्यायचं आहे..!

असो..

-- तात्या..

February 17, 2015

एक जळणारी चिता..

आज मी एक
चिता जळताना बघितली..

त्यात जळत होतं
आबांचं पार्थिव..

पण त्यात फक्त आबांचं पार्थिवच जळत होतं का..?

नाही..

त्या पार्थिवासोबत जळत होती
ती सादगी आणि तो साधेपणा..!

सादगी आणि साधेपणा..
ज्याची मुळातच आज वानवा आहे..

तिची अशी राख होणं
मला बघवलं नाही..

तिची अशी राख होणं
आपल्याला परवडणारं नाही..!

-- तात्या अभ्यंकर..

February 05, 2015

वार्षिक.. :)

आपल्याकडे जसे देवदेवतांचे वार्षिक उत्सव असतात तसे काही वार्षिक वादसुध्दा असतात..

उदाहरणार्थ - शिवरायांची जयंती आली की तारीख आणि तिथीचा वार्षिक वाद..

मोहनदासरावांची जयंती किंवा पुण्यतिथी आली की मोहनदासराव आणि नथुरामांच्या समर्थकांचा वार्षिक वाद..

३१ डिसेम्बरचा वार्षिक वाद..कुणी म्हणणार आमचं नववर्ष हे गुढीपाडव्याला तर कुणी म्हणणार आपण जगाप्रमाणे चालावं..

तसाच एक वार्षिक वाद आता जवळ येतोय आणि तो म्हणजे व्हेलेंटाईन डे, अर्थात प्रेमदिनाचा वार्षिक वाद.. कुणी म्हणणर कोण हा व्हेलेंटाईन..? यात हिंदुंचा काय संबंध..? तर कुणी म्हणणार वर्षातून एक दिवस प्रेमदिन साजरा केला म्हणून काय बिघडलं..?

तर असे हे सगळे वार्षिक वाद आपण दरवर्षी गुण्यागोविंदाने साजरे करत असतो.. सॉरी..घालत असतो.. :)

माझ्यापुरतं म्हणाल तर मी १४ फेब्रुवारीला जागतिक प्रेमदिन न मानता "जागतिक सौंदर्य दिन" मानतो.. कारण त्या दिवशी मधुबालाचा वाढदिवस असतो.. विषय संपला..!

-- (वार्षिक) तात्या.. :)

January 25, 2015

ये रे ओबामा..

ये रे ओबामा..

लेका आमच्या भारतात तुझं स्वागत...!

एका अनोख्या, जगावेगळ्या आणि जगातल्या सर्वात सुंदर भूमीवर उतरला आहेस तू..!

आमचे वेदपुराण, आमचं तत्त्वज्ञान, आमची संस्कृती, आमचं काव्य, आमचं साहित्य, सा-या जगात एकमेवाद्वितीय ठरलेलं आमचं रागसंगीत, आमच्या प्रत्येक राज्यातले वेगळे पेहेराव, विविध खाद्यपदार्थ, आमच्या विविध चालीरीती, आमचे अनोखे, आनंददायी सण-उत्सव..आमचे सामोसे, आमची रबडी, आमचे पराठे, आमची बिर्याणी, आमची पुरणपोळी, आमचा मऊभात-तूप-मेतकूट..!

किती किती लिहू..माझ्या या मातृभूमीबद्दल..?

एकता में अनेकता..आणि अनेकता में एकता..तुला फक्त आणि फक्त इथेच, या माझ्या भारतभूमीतच बघायला मिळेल..!

ये रे ओबामा..लेका आमच्या भारतात तुझं स्वागत...!

भाग्यावान आहेस लेका..म्हणून आमच्या पवित्र भूमीत तुला पाय ठेवायला मिळाला..!

तुझा,
-- (अभिमानी भारतीय) तात्या..

in built यूट्यूब किंवा mp३ player..!

माझ्या मते एखाद्याचा मृत्यू आपल्या मनाला जिंकू शकत नाही..

ठीक आहे..काळाच्या ओघात काही पानं..काही व्यक्ती विस्मृतीत जाऊ शकतात. थोडी धूळ जमू शकते.. परंतु एखादी आठवण, एखादी घटना, एखादा वास, एखादं गाणं. क्षणात ती धूळ पुसून टाकतं आणि ती अगदी २५-३० वर्षांपूर्वी गेलेली व्यक्ती जशीच्या तशी आपल्यासमोर उभी राहते..

मग तो प्रसंग, त्या व्यक्तीची ती आठवण जशीच्या तशी आपल्याला दिसते..ऐकू येते..आणि त्याकरता यूट्यूब किंवा mp३ player असं कुठलंही बाह्य साधन लागत नाही..

निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..!

अर्थात.. इथे मला मृत्यूला कुठेही degrade करायचं नाही.. त्याच्यासारखा दुसरा सखा नाही हेही तितकंच खरं..

असो.. मृत्यू या संकल्पनेविषयी पुन्हा केव्हातरी..

तूर्तास तुम्ही या रम्य सकाळी एखाद्या कसदार गायकाचा सात्विक अहिरभैरव ऐका.. तो तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल..तुमच्याशी संवाद साधेल..आपल्या रागसंगीतात ती ताकद आहे..

वाटल्यास.. मन्नदांचं अहिरभैरावातलं 'पुछो ना कैसे..' हे गाणं ऐका..

बघा.. हे वाचल्यावर तुमच्या मनात लगेच हे गाणं सुरू झालं ना..? मन्नादांचा गोड आवाज कानात रुंजी घालायला लागला ना..?

म्हणूनच मगाशी म्हटलं होतं की निसर्गानं ते यूट्यूब किंवा mp३ player आपल्या मनाला in-built दिलेलं असतं..! :)

मन्नादांचा मृत्यू आजही आपल्याला जिकू शकलेला नाही.. आणि कधी शकणारही नाही..!

-- (महान तत्त्ववेत्ता) तात्या अभ्यंकर...

January 22, 2015

गरम वडापाव..

अधूनमधून फोरासरोडला चक्कर मारलेली बरी असते.. काल मलाही तोच अनुभव पुन्हा आला आणि माझ्यासकट आपल्या तमाम फेबू कम्युनिटीचं हसू आलं.. :)

आपण सगळे किती चिंताग्रस्त असतो..आणि त्या निमित्ताने एकमेकांच्या किती उखाळ्या-पाखाळ्या काढत असतो..एकमेकांचा द्वेष करत असतो..हमरीतुमरीवर येऊन आपापले मुद्दे मांडत असतो.. !

किरण बेदी भाजपात गेली म्हणून कुणाला आनंद तर कुणाला दु:ख, मोदी हा माणूस या देशाचं भलं करणार..कुणाला याची खात्री तर कुणाला शंका.. दिल्लीत किरण सी एम बनणार की अरविंदा..म्हणून आपण चितेत..२६ जानेवारीला ओबामा येणारे म्हणून आपण आनंदीत..! :)

पण कालच्या त्या फोरासरोडच्या दुनियेत या सगळ्यापासुन मी खूप दूर गेलो..तिथे किरण बेदी काय, शाजीया इल्मी काय.. फडणवीस काय आणि मोदी काय.. कुणाला त्यांच्याबद्दल काहीही पडलेली दिसली नाही..एवढी चर्चा करायला तिथे कुणाला वेळच नव्हता.. माझा आजचा वडापाव महत्वाचा. माझा आजचा भुर्जीपाव महत्वाचा.. वह सेठ बडा दयावान है.. उसने मेरेकू पचास रुपिया टीप दिया..!

बास.. That's All..!

काल त्या नाजनीनकडे आम्ही सगळे होतो.. मी, नाजनीन, फरीदा, ढक्कन, मन्सूर.. पण ओबामा भारतात येतोय...ही गोष्ट कदाचित मला एकट्यालाच माहीत असावी..! :)

अरविंदा, शाजीया, मोदी, बेदी, फडणवीस, ओबामा, साक्षी महाराजम भाजपा, सेना, आप, पंजा..हे सगळे तुम्हाआम्हा लोकांचे भरल्या पोटी चघळायचे विषय..

फोरासरोडच्या दुनियेत १० रुपायाचा गरम वडापाव या सगळ्याहून अधिक महत्वाचा..!

-- तात्या अभ्यंकर.. 

साखरफुटाणे...

आज बरेच दिवसांनी आमच्या फोरासरोडला गेलो होतो.. नाजनीनचा आयुर्विम्याचा सहामाही हप्ता घेण्याकरता.. नाजनीनची जवानी आजही आहे..त्यामुळे आजही तिचा धंदा बरा आहे..

मी गेलो तेव्हा ती बसली होती एकासोबत..मला थांबावं लागलं..त्यांचा कार्यक्रम झाल्यावर नाजनीनने माझं हसत स्वागत केलं..

"आओ तात्यासेठ.. आप का हप्ता निकाल के रखेली है.."

नाजनीनकडेच मन्सूर भेटला.. जो मला एकेकाळी सर्वात प्रथम रौशनीकडे घेऊन गेला होता..जरा वेळाने तिथे डबल ढक्कन आला...

डब्बल ढक्कन.. एकेकाळी चरसी होता..रस्त्यात पडलेला असायचा.. मी त्याला तेव्हा Bombay Mercantile बँकेचा डेली कलेक्शन एजंट बनवला होता.. आता तो पोस्टाचंही काम करतो..मला आनद वाटला..

"अबे ढक्कन..इथर आ भोसडीके..जा एक IB हाफ लेके आ..सोडा और चन्ना भी.."

नाजनीनचा ठेवणीतला आवाज.. सोबत शिव्या..

मला खरं तर ते आवडलं नाही.. फोरासरोडच्या एका वेश्येकडे तिच्या खर्चाने मी कशाला दारू पिऊ..?
पण नाजनीनचा आग्रहच असा होता की तो मोडवेना..

मग मी आणि नाजनीनने दोघांनी मिळून ती हाफ मारली.. जुन्या गप्पा झाल्या. नाजनीनची कुणी एक भाचीही तिथे होती.. नुकतीच आली होती यु पी मधून.. किंवा आणली गेली होती..नव्यानेच धंदा शिकली होती..!

"तात्यासेठ.. ये फरीदा.. बोले तो एकदम गरम पावभाजी है.. बैठोगे क्या..?"

म्हातारीचे संस्कार.. मी ती २१ वर्षाची गरम पावभाजी कशी खाणार होतो..?

आणि गरम पावभाजी..? नाजनीन कुठून आणते हे असले शब्द..? साली आमच्या मुंबईची भाषाच अजब आहे..त्याकरता इथल्या अजब मातीशीच सलगी हवी.. त्याकरता पोटात आग हवी.. ती भडकल्याशिवाय एक स्त्री. दुस-या एका तरूण मुलीला "गरम पावभाजी" कसं म्हणेल..?

असो..

आमचं तिच्यायला mental constipation च जास्त..! सभ्य, सुशिक्षित पांढरपेशा सामाजातला होतो ना मी..!

खरंच..मुंबईचा तो बाजार म्हणजे वासनेचा तो एक अक्षय धंदा आहे..रोज तिथे नव्या नव्या मुली येत असतात.. आणल्या जात असतात.. नवे नवे कस्टमर येत असतात.. पैशाच्या बदल्यात शरीर..आणि पर्यायाने पोटाची आग..!

एक डाळभात किंवा भुर्जीपाव किंवा साधा एक वडापाव..याची खरी किंमत तिथेच कळते..!

खूप मोठी दुनिया आहे ती..! तिला काळगोरं, चांगलं वाईट ठरवणारा मी कोण..?

हाफ सोबत ढक्कनने माझ्याकरता बच्चूच्या वाडीतले कबाब आणले होते..नाजनीनने बाजूच्या गाडीवरचा तवा पुलाव मागवला..मन्सूरने १२० पान आणून दिलं..

कुठली ही अजब आपुलकी आणि माया..?

बस पकडून भायखळ्याला आलो.. तिथे अचानक काही भगवी निशाण घेतलेली मंडळी भेटली.. ते शिर्डीला चालत जाणारे लोक असतात ना.. ती मंडळी होती..त्यातील एकाने अचानक माझ्या हातावर प्रसादाचे साखरफुटाणे ठेवले..!

२०-२१ वर्षाच्या त्या गरम पावाभाजीकडे बघून ती न खाता माझं मन क्षणभर हळवं झालं..म्हणून तर लगेच बाबांनी मला प्रसादरुपी साखरफुटाणे दिले नसतील ना..?..!

-- तात्या अभ्यंकर..

January 18, 2015

स्वर आले दुरुनी..

हल्लीचा तो खूप काहीतरी चमत्कारिक अभ्यास.. वयाला न शोभणारा..!

पालकांचे इंटरव्ह्यू, महागड्या फिया.. पेरेंट्स डे वगैरे वगैरे.. छ्या..! सगळा बकवास..हे सगळं बघितलं की मी बापडा लगेच इतिहासात रमतो..!

प्रधान बिल्डींग, ठाणे स्थानकाजवळ..खंडेलवाल मिठाईवाल्याच्या समोर.. साल १९७५ की १९७६...

P E Society ची प्राथमिक शाळा..इयत्ता पहिलीत शिकणारा एक कुणी शेखर अभ्यंकर..

साधीसुधी शाळा.. वर्गात खाली बसायला चक्क जाजमं घातलेली..

गोडसे बाई, जोशी बाई..

आम्हा लहानग्यांची शी शू काढणा-या ताराबाई..कमलताई..

लाकडी जिने.. प्रशस्त वर्ग..

फळा..खडू.. आणि शाईचं पेन..वर्गातली धमाल मजा मस्ती..

शनिवारी शाळा लवकर सुटायची..माझा मामा मला न्यायला यायचा..मग समोरच्या खंडेलवाल मिठाईवाल्याकडे कधी सामोसा, तर कधी खमणी..

कधी गोखाल्याकडे मिसळ आणि पियुष..:)

आज वाटतं की एखादं गणित चुकांवं आणि गोडसेबाईनी माझा कान पकडावा..पण त्यांच्या कान पकडण्यातही त्यांचं प्रेमच दिसावं..!

काहीशा करारी चेहे-याच्या ताराबाई..गोड,स्वोज्वळ चेहे-याच्या ताराबाई..

वर्गातला तो एक सामुहिक वास..! मुलांचा, त्यांच्या दफ्तरांचा, वह्या-पुस्तकांचा, डब्यातल्या मटकीची उसळ आणि पोळीचा.. तूपगूळ पोळीच्या गुंडाळीचा..!

तेव्हा केलोग्ज वगैरे नव्हते..तूपगूळ पोळीची गुंडाळी.. लसूणचटणी पोळीची गुंडाळी..तेव्हा त्याला franky की कुठलासा फालतू शब्द वापरत नसत.. गुंडाळीचं म्हणत असतं..!

अवचित कधी बाबूजींचं 'स्वर आले दुरुनी..' हे गाणं कानी पडतं आणि मी हळवा होतो..

मग आजही गोडसेबाईंची आठवण होते..बाई आता कुठे असतील हो..? वयस्कर असतील खूप.. असंच जाऊन कडकडून त्यांना भेटावं वाटतं..

"बाई..मी शेखर.. आजपासून ३८-३९ वर्षांपूर्वी तुमचा विद्यार्थी होतो..असं म्हणावसं वाटतं..!

काळाच्या ओघात सगळं हरवलं..

पण मनात कुठेतरी ताराबाईच्या चेहे-यावरचा सोज्वळपणा आणि तूपगूळ पोळीच्या गुंडाळीतला गोडवा मात्र आजही जपून ठेवला आहे..!

-- तात्या अभ्यंकर...

January 11, 2015

बुवा..बाई आणि बोवा..

पंडित किंवा पंडितजी.. वगैरे पदव्या आमच्या भीमाण्णाना खरं तर आवडत नसत..अगदी मनापासून आवडत नसत..

मुंबईच्या नेहरू सेंटरच्या हायफाय वातावरणात एकदा अण्णांचं गाणं होतं.. आता नेहरू सेंटर म्हणजे काही गिरगाव ब्राह्मण सभा नव्हे, की कोल्हापुराचा देवल क्लब नव्हे की एखादी जुनी गायन सभा नव्हे.. नेहरू सेंटर काय किंवा NCPA काय.. तिथे दिखाऊपणाच जास्त.. गाणं समजण्यापेक्षाही "आम्ही क्लासिकलची concert attend केली.." असं म्हणण्यात धन्यता मानणारे लोकच अधिक..:)

नेहरू सेंटरला सगळंच हायफाय वातावरण.. पंडितजी पंडितजी म्हणून अण्णाना फुकट परेशान करणारं पब्लिकच जास्त.. आणि आमचे अण्णा अगदी म्हणजे अगदीच साधे हो.. सादगीभरे..!

चामारी, भक्कम चुना-तंबाखूवालं पान जमवलं..आणि एकदा का तंबोरे लागले की गाणं सुरू.. कुठे माईकच चेक कर..त्याचा बासच कमी-अधिक करायला सांग.. उगाच उजवा हात छातीवर ठेऊन लोकांकडे पाहून नाटकी हास.. अशी नाटकं अण्णांना जमत नसत..:)

मी नेहरू सेंटरला पोहोचलो..ग्रीनरूममध्ये गेलो.. स्वारी पान जमवत बसली होती..तबले-तंबोरे जुळत होते..

मी पायावर डोकं ठेवलं..

"या..अभ्यंकर..काय म्हणतंय ठाण..?" -- अण्णांनी त्यांच्या खास खर्जाच्या आवाजात नेहमीची चौकशी केली..

"ठाण ठीक आहे.. तुम्ही कसे आहात बुवा..?"

आणि इथे मात्र कधी फारसं न बोलणा-या अण्णांना एकदम बोलावसं वाटलं.. ते कुठेतरी नेहरु सेंटरच्या त्या दिखाऊ हायफाय वातावरणाला आणि पंडितजी पंडितजी ला कंटाळले असावेत.. ते एकदम म्हणाले,

"व्वा..! बुवा हाच खरा शब्द..! पंडितला काही अर्थ नाही.. हल्ली बाजारात गल्लोगल्ली पंडित झालेत.. आमच्या वेळेला बुवा, बोवा आणि बाई हे तीनच शब्द होते.. गाणारा तो बुवा..वझेबुवा, भास्करबुवा.. आणि गाणारी ती बाई.. मोगुबाई, हिराबाई.. आणि कीर्तन करणारे ते बोवा..!"

असं म्हणून छान समाधान पसरलं त्यांच्या चर्येवर.. पंडितजी पंडितजीच्या त्या हायफाय वातावरणात माझं बुवा म्हणण त्यांना कुठेतरी सुखावून गेलं होतं..!

कानडाउ भीमसेनु करनाटकु
तेणे मज लावियला वेधू..

असं एकदा कविवर्य वसंत बापट म्हणाले होते..!

असो.. अनेक आठवणी आहेत आणि आता त्याच फक्त उरल्या आहेत..!

-- (कानडाउ भीमसेनुचा भक्त) तात्या..

January 02, 2015

माझा वाढदिवसं...

आज म्हणे माझा वाढदिवस आहे..

एका वर्षाने वाढलो, अजून थोडा गधडा झालो... दुनियाही बदलली.. संगणक, मोबाईल, Tab, whatsapp सगळं काही आलं..

Moll आले, Multiplex आले.. सारं काही आलं.. बोलबोलता मुंबई पुणे express way ही झाला.. लहानपणी दिसणा-या केवळ फियाट आणि आम्बासेडर, या व्यतिरिक्त इतरही अनेक छान छान गाड्या दिसू लागल्या..

पण मी मात्र अजून मुंबई ब वर सकाळी ६ वाहता लागणा-या अण्णांच्या अभंगातच अडकलो आहे.. मी मात्र अजून बाबूजींच्या स्वर आले दुरुनी मध्येच अडकलो आहे..मी मात्र अजून भाईकाकान्च्या म्हैस आणि अंतू बर्व्यातच अडकलो आहे..

मी अजून शाळेतल्या त्या फौंटन पेन मध्येच अडकलो आहे..

माझे कान मात्र अजून सकाळी सात वाजता "सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत.." हे खणखणीत शब्द ऐकण्याकरताच आसुसले आहेत...

मला मात्र अजून सकाळी ११ वाजताचं कामगार विश्व ऐकता ऐकता जेवायचं आहे आणि शाळेचं दफ्तर भरायचं आहे..

मला प्रसन्न जोशी, निखिल वागळे कुणी कुणी नकोत.. मला आजही ते दाढीवाले अनंत भावे आणि प्रदीप भिडेच माझे वाटतात..

मी आजही आसुसलो आहे सुहासिनी मुळगावकरने सादर केलेल्या गजरा ह्या कार्यक्रमाकरता..

मी मात्र आजही अडकलो आहे संध्याकाळी मुंबई ब वर फक्त १५ मिनिटं लागणा-या घाल घाल पिंगा वा-या किंवा तीनही सांजा सखे मिळाल्या या गाण्यात..

नारळ वीस रुपये झाला म्हणे..! मला मात्र आजही नाक्यावारच्या वाण्याकडून २ रुपायाची नारळाची वाटी आणायची आहे..!

मला २४ तास टीव्ही नको आहे..वाहिन्या तर कोणत्याच नको आहेत.. मला फक्त मुंबई दूरदर्शन केंद्रावरचं गुरुवारी लागणारं छायागीत हवं आहे..

मला नको आहेत कोणतेही संगणक आणि व्हिडियो खेळ.. मला फक्त हवे आहेत ऐकलंम खाजा धोबी राजा वाले ढप आणि गोट्याचे खेळ..

मला कोणतेही Realty show नको आहेत.. मला हवी आहे फक्त संध्याकाळची रामरक्षा आणि पर्वाचा आणि पाढे..!

मला बाकावर उभं राहायचं आहे,,मला वर्गाबाहेर आंगठे धरून उभं राहायचं आहे..

म्हणे आज माझा वाढदिवस आहे..! मग गिफ्ट म्हणून काय हवं आहे मला..?

मला संध्याकाळी ७ वाजताच घरोघरी लागणा-या कुकरच्या शिट्या ऐकायच्या आहेत.. त्यात शिजणा-या सात्विक वरणभाताचा घास मला हवा आहे.. आणि हो.. पोळीसोबत थोडी शिक्रणही हवी आहे मला.. आईनं केलेली..!

-- तात्या अभ्यंकर..