October 30, 2008

अवघा रंग एक झाला....

'अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग..'

रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!

रघुनंदन पणशीकर..

'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द! आजच्या तरूण पिढीतला एक अतिशय चांगला, कसदार आणि प्रॉमिसिंग गवई, ज्याच्याकडून अजून मोप मोप ऐकायला मिळणार आहे असा..!

रधुनंदन पणशीकर माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे. मी त्यांना रघुनंदनराव किंवा रघुबुवा असं संबोधतो. एक चांगला रसिक आणि जाणकार श्रोता म्हणून रघुनंदनराव मला मान देतात, त्यांच्या बैठकीत बसवतात, मित्र म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवतात हा त्यांचा मोठेपणा! असो.

औचित्य होतं मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ या सांस्कृतिक कार्याला वाहून घेतलेल्या एका संस्थेने आज आयोजित केलेल्या
दिवाळी-पहाट या कार्यक्रमाचं! सुंदर सकाळची वेळ. तानपुरे जुळत होते, तबला लागत होता, मंचावर रघुनंदनराव गाण्याकरता सज्ज झाले होते.

'हे नरहर नारायण...' या बिभासमधल्या विलंबित रूपक तालातल्या पारंपारिक बंदिशीने गाण्याला सुरवात झाली. राग बिभास. शुद्ध धैवत, कोमल धैवत, दोन्ही अंगाने गायला जाणारा सकाळच्या प्रहरचा एक जबरदस्त इन्टेन्स्ड राग. बिभास हा तसा गंभीर तरीही आपल्याच मस्तीत हिंडणारा राग आहे. 'तुम्हाला असेल माझी गरज तर याल माझ्यापाठी!' असं म्हणणारा आहे. रघुबुवांनी बिभासची अस्थाई भरायला सुरवात केली. कोमल रिखब, शुद्धगंधार, पंचम, दोन्ही धैवतांचा अत्यंत बॅलन्स्ड वापर करत रघुबुवांनी बिभासमध्ये रंग भरायला सुरवात केली. सगळा माहोल बिभासमय झाला. 'हे नरहर नारायण..' ने एक सुंदर दिवाळी पहाट उजाडली..! विलंबितानंतर 'मोर रे मीत पिहरवा..' ही पारंपारिक द्रुत बंदिश अतिशय सुंदर गाऊन बिभासची सांगता झाली!

बिभासने पूर्वा उजळली होती, छान केशरी झाली होती. आता तिच्यावर रंग चढले ते हिंडोलचे. राग हिंडोल. एक जादुई, अद्भूत असा राग. त्यातल्या तीव्र मध्यमामुळे हिंडोलचा एक विलक्षणच दरारा पसरतो. त्याचं जाणं-येणं हे अक्षरश: एखाद्या हिंदोळ्यासारखंच असतं. 'तोडी, ललत, भैरव, रामकली हे असतील सकाळचे काही दिग्गज राग, लेकीन हमभी कछू कम नही..!' असा रुबाब असतो हिंडोलचा!

रघुबुवांनी आज हिंडोल चांगला जमूनच गायला, कसदार गायला. हिंडोलातल्या अद्भूततेला रघुबुवांनी आज अगदी पुरेपूर न्याय दिला.

"बन उपवन डोल माई,
ऋतुबसंत मन भावन
सब सखीयन खेल हिंडोले.."

ही मध्यलय एकतालातली मोगुबाई कुर्डिकरांची बंदिश. ही बंदिश आज रघुबुवांनी फारच सुरेख गायली. पाहा मंडळी, आपल्या रागसंगीताला, त्यातल्या रचनांनादेखील गुरुशिष्य परंपरेचा कसा सुंदर वारसा असतो ते! मोगुबाई या किशोरीताईंच्या माता व गुरू. त्यामुळे त्यांच्याकडनं ही बंदिश किशोरीताईंना मिळाली, व तीच तालीम किशोरीताईंनी रघुबुवांना दिली आणि म्हणूनच या थोर गुरुशिष्य परंपरेमुळेच ही सुंदर बंदिश आज तुमच्या-माझ्या पिढीला ऐकायला मिळाली/मिळत आहे!

हिंडोल नंतर रघुबुवांनी मध्यलय एकतालातला तोडी रागातला एक पारंपातिक तराणादेखील सुंदर रंगवला. त्यानंतर रंगमंचावर अवतरली ती आपली समृद्ध संगीत रंगभूमी. 'दिन गेले हरिभजनावीण..' हे कट्यारमधलं नाट्यपद रघुबुवांनी सुरू केलं! दारव्हेकर मास्तरांच्या अन् वसंतखा देशपांड्यांच्या कट्यारमधली सगळीच पदं अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक बढिया! सुंदर गंधर्व ठेका आणि अत्यंत कल्पक आणि प्रतिभावंत असं अभिषेकीबुवांचं संगीत असलेलं "दिन गेले.." हे पददेखील त्याला अपवाद नाही. रघुबुवा हे पद गाऊन श्रोत्यांना मराठी संगीत रंगभूमीच्या त्या वैभवशाली काळात घेऊन गेले असंच मी म्हणेन..!

त्यानंतर सारी मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेली. रघुबुवांनी स्वत: बांधलेलं यमन रागातलं अतिशय सुरेख असं मधुराष्टक,
बोलावा विठ्ठल-करावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा, अवघा रंग एक झाला, हे अभंग रघुबुवांनी अतिशय उत्तम व कसदार गायले. श्रोत्यांची मनमुराद दाद मिळत होती. भैरवीतल्या 'अवघा रंग एक झाला..' मुळे खरोखरच अवघा रंग एक झाल्यासारखे वाटले. आजची ही मैफल म्हणजे गवई आणि रसिक श्रोते यांच्यातला एक उत्तम संवाद होता, एक अद्वैत होतं!

रघुबुवांची जमलेली मैफल..
खरंच मंडळी, रघुबुवांच्या आजच्या या संस्मरणीय मैफलीमुळे माझी दिवाळी अगदी उत्तम साजरी झाली. आजवरच्या माझ्या श्रवणभक्तिच्या मर्मबंधातल्या ठेवींमध्ये अजून एक मोलाची भर पडली, मी अजून श्रीमंत झालो, समृद्ध झालो!

दुग्धशर्करा योग -

मंडळी, आज माझं भाग्य खरंच खूप थोर होतं असंच म्हणावं लागेल. आजच्या रघुबुवांच्या मैफलीत मला भाईकाकांचे मधु कदम भेटले! भाईकाकांसोबत वार्‍यावरची वरात, रविवारच्या सकाळमध्ये चिपलूनच्या रामागड्याचं फार सुंदर काम करणारे मधु कदम! साक्षात भाईकाकांसोबत मराठी रंगभूमीवर,

"निघाली, निघाली, निघाली वार्‍यावरची वरात..!"

असं मनमुराद गाणारे मधु कदम!

मधुकाका आणि रघुनंदनराव यांच्यासोबत तात्या...
मधु कदम मुलुंडमध्येच राहतात. तेही आज मुद्दाम रघुबुवांच्या मैफलीचा आनंद लुटण्याकरता आले होते. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा मधुकाकाही तिथे आले. रघुबुवांनी आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. मध्यंतरानंतर मधुकाकांनी आपणहून बोलावून मैफलीत मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले. रघुबुवांच्या एखाद्या छानश्या समेला तो म्हातारा माझ्या हातात हात घेऊन दाद देऊ लागला! मंडळी, जेव्हा एक श्रोता दुसर्‍या श्रोत्याचा हातात हात घेऊन दाद देतो ना तेव्हा अभिजात संगीतातला तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा असतो एवढंच सांगू इच्छितो..!

रघुबुवांचं अभंगगायन ऐकून म्हातारा हळवा होत होता, मनोमन सुखावत होता!

बोलताबोलता साहजिकच भाईकाकांच्या आठवणी निघाल्या.

"भाई? आता काय सांगू तुला? अरे आमच्यात सख्ख्या भावापेक्षाही जवळचं नातं होतं रे! ते माझे बंधु,सखा, गुरू.. अगदी सबकुछ होते रे.."

डोळ्याच्या कडा ओलावत म्हातारा माझ्याशी बोलत होता..!

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

'पुलकीत' माणसं कशी असतात ते मी जवळून पहात होतो. आतल्या आत रडत होतो..!

मंडळी, इथे डिटेल्स देत नाही, परंतु आज मधुकाकांना एक कौटुंबिक दु:ख आहे हे मला माहीत आहे. काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेल्या या कलाकाराची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची आहे. परंतु आज म्हातारा अगदी सगळं विसरून रघुबुवांचं गाणं ऐकत होता, त्यातल्या लयीसुरांशी एकरूप झाला होता!

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?

असो,

अवघा रंग एक झाला.. या भैरवीतल्या अभंगाने मैफल संपली. मी रघुबुवांचा आणि मधुकाकांचा निरोप घेऊन निघालो..

निघतांना माझ्या कानात भैरवीचे सूर तर होतेच, परंतु मधुकाकांचे शब्दही होते..

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..

October 29, 2008

दिपावलीच्या शुभेच्छा...

सर्व मराठी आंतरजालकर्मीना व ब्लॉगकर्मींना माझ्या व्यक्तिगत व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

तात्या अभ्यंकर,
मिसळपाव डॉट कॉम.

बापू सोनावणे...!

बापू सोनावणे!

एक काळा ढुस्स माणूस. कोळश्याच्या रंगाची आणि बापूच्या रंगाची स्पर्धा केली असती तर बापू अगदी सहज जिंकला असता. गोलमटोल चेहेरा, देहयष्टीही तशीच गोलमटोल. बुटका. सोनेरी काड्यांचा चष्मा, गळ्यात जाडजूड सोन्याची चैन (बापू चेनचा उच्चार 'चैन' असाच करतो,), मनगटात सोन्याचं ब्रेसलेट, दोन्ही हातातल्या बोटात मिळून पाचसहा चांगल्या जाडजूड सोन्याच्या आंगठ्या. बापूचा काळा ढुस्स रंग आणि त्याच्या अंगावरल्या सोन्याचा पिवळाजर्द रंग या काळ्या-सोनेरी रंगाच्या चमत्कारिक कॉम्बिनेशनमध्येच लोकांना बापूला पाहायची सवय होती!

"अरे बापू, तू असा काळाकुट्ट आणि त्यावर ते पिवळंजर्द सोनं हे काहिच्याकाहीच दिसतं बघ! छ्या! शोभत नाही तुला सोनं!"

असं मी म्हटलं की बापूचं त्यावर पिचक्या आवाजातलं तुटक उत्तर,

"दिसू दे ना कायच्याकाय! काय फरक पडतो?!"

बापूला अशी तुटक आणि लहान लहान वाक्य बोलायची सवय आहे. आवाजाचा टोन अत्यंत लहान, बर्‍याचदा आत गेलेला,पिचका! सफारीसूट हा बापूचा नेहमीचा पोषाख.. सोन्यानाण्याने मढलेला काळाकभिन्न बापू सफारीसुटारच सगळीकडे फिरतो!

बापू हा माझा शाळेपासूनचा मित्र. त्याची आणि माझी अगदी खास गट्टी. गळ्यात गळे घालून ती कधी आम्हाला दाखवता आली नाही परंतु आजही अगदी दोनचार दिवसात एकमेकांना भेटलो नाही तर आम्हाला चैन पडत नाही. माझा फोन नाही गेला, तरी बापूचा हमखास येतोच. तोही तुटक. "संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!" इतकाच.

शाळेमधल्या संस्कृत, गणीत, भाषा, व्याकरण, वह्यांची टापटीप इत्यादी गोष्टींचा मला आणि बापूला अगदी मनसोक्त तिटकारा. तरीही शाळेत त्या गोष्टींना फाट्यावर मारून चालत नसे. झक मारत, लक्ष देऊन सगळा अभ्यास करावा लागे. त्यामुळे बापू हा माझा समदु:खी होता. तसे आम्ही दोघेही 'ढ' आणि 'उनाड' याच कॅटॅगिरीत जमा. "अभ्यास करून कुंणाचं भलं झालंय?" हे आम्हा दोघांना जोडणारं कॉमन तत्वज्ञान! त्यातूनच आमची गट्टी जमली असावी. मी जातपात मानत नाही, परंतु जन्माने ब्राह्मण असल्याचा टिळा होताच माझ्या कपाळावर. परंतु वर्गातल्या इतर हुशार ब्राह्मण मुलांनी मला कधीच जवळ केलाच नाही. ती मुलं माझ्याशी सतत एक अंतर राखूनच असायची. त्यामुळे सोनावणे, शिंदे, कोळी, नाखवा याच मुलांनी मला जवळ केला, याच मंडळीत मी मनापासून रमलो. बापूही त्यांच्यातला एक.

"भडव्या तू भट, आणि इतका 'ढ' कसा रे?" हा तुटक प्रश्न तेव्हासुद्धा मला बापू अनेकदा विचारी!

आज बापू हा माझा शेयरबाजाराच्या धंद्यातील अशील आहे. त्याच्या सगळा पोर्टफोलियो मीच सांभाळतो.

"बापू, हे तुझं स्टेटमेन्ट. अमूक शेयर घेतले, अमूक विकले. सध्या मार्केट खूप पडलं आहे त्यामुळे घेतलेल्या शेयरचे भाव सध्या खाली असून ते शेयर नुकसानीत आहेत.."

"मार्केट पडलं?", "मग तुझा उपयोग काय?", झक मारली आणि तुला काम दिलं!"

पिचक्या आवाजात नेहमीप्रमाणे बापूने दोनचार तुटक वाक्य टाकली! जणू काही मार्केट मीच पाडलं असाच बापूचा समज असावा!

"आता मार्केट बरंच खाली आहे. अजून काही पैशे असतील तर दे. चांगला चांगला माल सस्त्यात मिळतो आहे. एखाद लाख असले तरी पुष्कळ आहेत.."

अनेक तेज्यामंद्या बघितल्यामुळे, शिवाय माझी मुळातली जन्मजात तेजडिया वृत्ती, आणि आज ना उद्या घेतलेल्या गुणी शेयरना मजबूत भाव येईल, असा मार्केटवरचा दृढ विश्वास मला गप्प बसू देईना!

"एक लाख?", माझ्या बापाचा माल की तुझ्या रे?"

"बघ बुवा! असतील तर दे..!"

असा आमचा संवाद झाला. बापूला भेटून मी घरी आलो. अर्ध्यापाऊण तासातच बापूचा १२ वर्षाचा छोकरा माझ्या दारात हजर. त्याने एक पाकिट माझ्या हातात दिलं. आत बघतो तर लाखाचा चेक!

दहावी नापास झाल्यावर बापूने अक्षरश: अनेक धंदे केले. आंबे विक, फटाके विक, वडापावची गाडी लाव, कुठे मुल्शीपाल्टीच्या होर्डिंग्जचा सबएजंट हो, कुठे पेन्टिंगची लहानमोठी कामं घे, अश्या अनेक धंद्यात बापू आजही आहे. पण बापूच्या हाताला यशच भारी! भरपूर पैसा मिळत गेला, आजही मिळतो आहे. आज बापू ही बिल्डर लायनीतली एक बडी आसामी आहे. बड्या बड्या राजकारण्यात नी सरकारी अधिकार्‍यात बापूची उठबस आहे. बापू ही नक्की काय नी किती पोहोचलेली चीज आहे याची एक लहानशी झलक मला एकदा मिळाली तो किस्सा..

मी एकदा असाच सहज गप्पा मारायला म्हणून बापूच्या घरी गेलो होतो. हेल्मेट न घालता स्कूटर चालवल्याबद्दल माझं लायसन हवालदाराने पकडलं होतं. गाडीचे पेपर्सही जवळ नव्हते. 'ऑफीसला येऊन पेपर दाखवा, दंड भरा आणि लायसन घेऊन जा..' असा हवालदाराने दम दिला होता! बोलता बोलता हा सगळा किस्सा मी सहज बापूला सांगितला.

"हेल्मेट नाय?", डोसकं फोडून घेशील केव्हातरी!"

बापूची नेहमीची तुटक वाक्य सुरू झाली. जरा वेळाने बापूने डायरी पाहून एक फोन नंबर फिरवला.

"साळूके साहेब आहेत का? द्या जरा!"

"नमस्कार साळूंकेसाहेब. सोनावणे बोलतो. काय नाय, एक लायसन सोडवायचं होतं. अभ्यंकर नावाचा आरोपी आहे . जरा बघाता का?"

बापूने पोलिसातल्या कुठल्यातरी इसमाला फोन लावला होता.

"धन्यवाद साहेब. आत्ता लगेच पाठवतो अभ्यंकरला."

"जा आत्ता लगेच. साळूंकेना भेट. ट्रॉफिकला पीएसाअय आहेत. त्यांचाकडन लायसन घे!"

पोलिसांच्या मगरमिठीतून एक नवा पैसा न देता, बसल्या जागी एक फोन करून लायसन सोडवणारा बिल्डरलाईनमधला बापू हा सामान्य इसम नव्हे याची मला खात्री होतीच! ट्रॉफिकच्या साळूंकेने एका मिनिटात माझं लायसन माझ्या हातावर ठेवलं अन् तिथून मी निसटलो.

"ट्रॉफिक", "चैन", हे बापूचे खास उच्चार. दारूच्या पेगचा उच्चारदेखील बापू "प्याग" असाच करतो.

बापूचं घर आज भरलेलं आहे. बिल्डरलाईनमधल्या बापूने बक्कळ पैका कमावला आहे. चाळीशीच्या बापूला चांगली चार मुलं आहेत. बापूची बायको सदा हसतमुख. बापू मला कधी कधी रविवारचा त्याच्या घरी जेवायला बोलावतो. मला मटणातल्या नळ्या आवडतात हे बापूला माहीत आहे. जेवायच्या आधी बापू बाटली काढणार. स्वत:चा, माझा पेग भरणार! लगेच सोबत खाण्याकरता बायकोला ऑर्डर - "ए, सुकं मटन आण.." मटणाचा उच्चार बापू 'मटन' असा करतो.

जरा वेळने,

"ए, ताटं आण."

त्याचा तो पिचका, खोल गेलेला आवाज बापूच्या बायकोला मात्र बरोब्बर ऐकू जातो!

मी जेवायला बसलो की बापू बायकोला म्हणणार,

"ए, त्याला नळी दे!"

"नको रे बापू, ऑलरेडी दोन नळ्या आहेत माझ्या पानात! तू घे की.."

बापूच्या बायकोनं केलेलं फस्क्लास मटण आणि त्यातल्या नळ्या चापण्यात मी गुंग असतो. काळा ढुस्स बापू गालातल्या गालात मिश्किलपणे हासत मला मटण चापताना पाहून खुश होतो. वर पुन्हा,

"साल्या, तू खाऊन खाऊनच मरणार..." अश्या शुभेच्छाही देतो!

माझ्या गणगोतातला हा बापू रंगवताना तो कुणी संत, महात्मा, सज्जन, पापभिरू माणूस आहे असा माझा मुळीच दावा नाही. नगरसेवक मंडळीत, मुल्शीपाल्टीत, सरकारदफ्तरी, "वजन" ठेवणे व आपलं काम साधून घेणे ही बिल्डरलाईनमधली अपरिहार्यता बापूलाही चिकटली आहे. हल्लीच्या जगात ती लाईनच तशी आहे, त्याला बापूचाच काय, कुणाचाच विलाज नाही. नायतर धंदा करणंच मुश्किल, अशातली गत!

तरीही आमचा बापू खूप गुणी आहे, अत्यत कष्टातून वर आलेला आहे. बापूचा बाप चांभार होता. रस्त्याच्या कडेला बसून चांभारकी करून बापूच्या बापाचा सात मांणसांचा संसार झाला. बापू हा तिसरा की चवथा! परंतु लहान वयातच वडापाव, आंबे, फटाके, असे नाना धंदे करून बापूने सगळ्या घरादाराला हातभार लावला. सुदैवाने बापूच्या पदरात यशाचं मापही अगदी भरपूर पडत गेलं. हा हा म्हणता दिवस बदलले. ठाण्या-मुबई-पुण्यात बापूचे काही प्रोजेक्ट्स उभे राहिले. बापू चांगला पैसेवाला झाला, पण कधी कुणाशी माजोरीपणे वागला नाही. बापाच्या पश्चात भावाबहिणींचं अगदी यथास्थित केलंन, कुणाला काही कमी पडू दिलं नाही.

"काय बापू? दोन दिवस कुठे होतास? तुझा मोबाईलही लागत नव्हता.."

"आयटमला घेऊन खंडाळ्याला गेलो होतो. गेम वाजवायला!"

बापूने हे उत्तर अगदी सहज दिलं!

"अरे काय रे हे बापू? अरे चांगली चार पोरं तुझ्या पदरात आहेत, चांगली बायको आहे घरी! शोभतात का तुला हे असले धंदे?"

"मग काय झालं? मला मजा करायची होती. म्हणेल ते पैशे टाकून नेली एका पोरीला! त्यात बिघडलं कुठे?" जुलुम जबरदस्तीचा सौदा थोडीच केलाय?"

पिचक्या आवाजात चारपाच तुटक वाक्यात समर्थन करून बापू मोकळा!

"साला आपला काही पैसा कष्टाचा, काही हरामाचा. त्यातला हरामाचा पैसा हा असाच जाणार! तो थोडाच टिकणार आहे?!"

खरं सांगतो मंडळी, नीती-अनिती, व्यभिचार, या शब्दांच्या व्याख्याही बापूला माहीत नाहीत. खरंच माहीत नाहीत. पण हरामाचा पैसा टिकत नाही, तो असाच या ना त्या मार्गाने खर्च होतो हे तत्वज्ञान बापूला कुणी शिकवलं होतं कुणास ठाऊक?

चालायचंच! बापू जो आहे, जसा आहे, माझा आहे! प्रत्येक माणसात गुणदोष असतात, तसे बापूतही आहेत. आमच्या मैत्रीवर त्याचा काहीच फरक पडत नाही! "चूतमारिच्या, एक नंबरचा कंजूष तू! चल, दारू पाज..!" असं मला म्हणणारा, "आयटमला घेऊन गेम वाजवायला खंडाळ्याच्या बंगल्यावर गेलो होतो.." असं म्हणणारा बापू, बांधकाम साईट सुरू असलेल्या कुणा कामगाराची आई सिरियस झाली, तेव्हा रात्री दोन वाजता खिशात काही पैसे घेऊन तिला हास्पिटलात ऍडमिट करायलाही जातो..!

असो, बापू सोनावणे ही काळी, बुटकी, जाडजूड अजब व्यक्ति मला आवडते आणि तिचाही माझ्यावर अत्यंत जीव आहे एवढंच मला ठाऊक आहे!

गेल्या तीनचार दिवसात बापू भेटला नाही. आज बहुदा त्याचा फोन येईल,

"तात्या, संध्याकाळी भजीपाव खायला भेट रे..!"

-- तात्या अभ्यंकर.

हेच लेखन येथेही वाचता येईल..