September 22, 2012

जुने दिवस..

आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, 
सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन

ेक गुणी माणसं...
वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....

आज या सगळ्याची खूप आठवण येते..! आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..! 

खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!
-- तात्या अभ्यंकर.

September 14, 2012

इष्काची इंगळी...:)

इष्काची इंगळी..
येथे ऐका - http://www.hummaa.com/music/song/mala-ishkachi-ingali-dasali/134557#

जगदिशरावांची झकास लेखणी, आमच्या गावरान रामभाऊ कदमांचं फक्कड संगीत आणि उषाताईंची ठसकेदार गायकी..

सुरवातीची मस्त यमनातली आलापी..


मी एकलीच निजले रातीच्या अंधारात..
नको तिथ्थच पडला अवचित माझा हात
हाताखालती नागं काढून वैरीण ती बसली..!

नागं काढलेल्या इंगळीला 'वैरीण' म्हटलंय..! :)

जोरदारच लावणी बांधली आहे रामभाऊ कदमांनी.. सुंदर ढोलकी आणि हार्मोनियमचे यमनातले तुकडे केवळ अप्रतिम..!

साऱ्या घरात फिरले बाई गं..
मला 'अवशिद' गवलं न्हाई गं..

छ्या..! आजवर कधी कुणाला इष्काची इंगळी डसल्यावर टायमावर अवशिद मिळालंय का..? अहो अजून अशा अवशिदाचा शोध लागायचाय..! :)

'न्हाई गं.. ' हे शब्द उषाताईंनी अतिशय सुरेख म्हटले आहेत.. आणि त्यातला तो यमनामध्ये येणारा शुद्ध मध्यम.. तोही अगदी अवचितच येऊन पडला आहे..

खरंच कुठे गेली हो आता अशी गाणी..?

या इंगळीचा कळला इंगा..
खुळ्यावाणी मी घातला पिंगा..!

माझ्या मते खेबुडकरदादांच्या या ओळी सुवर्णाक्षरात लिहून ठेवाव्या अशा आहेत.. अहो ही इष्काची इंगळी एकदा का कडाडून चावली ना, की अक्षरश: भल्याभल्यांना पिंगा घालायला लावते.. अगदी खुळं करून सोडते बघा..!या अजरामर लावणीबद्दल उषाताईंना मोठ्ठं 'थँक यू..' आणि खेबुडकरदादांना व रामभाऊ कदमांना विनम्र आदरांजली..!

(इष्काच्या इंगळीचा मांत्रिक) तात्या अभ्यंकर.. :)