June 30, 2014

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

घनःशाम सुंदरा श्रीधरा..

हे गाणं किती सुरेख आणि सात्त्विक आहे हे मी आजपर्यंत अनेकदा शब्दात मांडायचा प्रयत्न केला..परंतु प्रत्येक वेळा लिहिलेले कागद चुरगाळून टाकले..संपूर्ण लिहायला कधी जमलंच नाही..!

काय शब्द योजावेत, होनाजींच्या काव्यावर लिहावं, की वसंतराव देसाईंच्या चालीवर लिहावं? गायकीवर लिहावं, की दीदी आणि पंडितराव नगरकर यांच्या सुरांवर लिहावं..? त्यातल्या भूपावर आणि किंचितश्या देसकारावर लिहावं..की त्या गाण्यात असलेल्या कमालीच्या प्रसन्नपणावर लिहावं..?. काही समजतच नाही...!

आजपर्यंत मी देवमाणूस हा शब्द ऐकला आहे.. त्याच शब्दाचा आधार घेऊन मी पंडितराव नगरकरांच्या गळ्याला देवगळा असं म्हणेन..या माणसाच्या गळ्यात जगातली सगळी सगळी सात्त्विकता भरून राहिली होती हो..!

जाता जाता एकच म्हणावंसं वाटतं.. की साक्षात श्रीकृष्णाने सरस्वतीच्या अंगणात छान सडासंमार्जन करून सुरालयीची घातलेली सुरेख रांगोळी म्हणजे हे गाणं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 28, 2014

बिती ना बिताई..

आयुर्विमा महामंडळाच्या एका बड्या साहेबांनी आज मला त्यांची गाडी आणि चालक दिला..

"तात्या.. जा.. आज गाडी तुझी..!"

ठाण्याहून गाडी घेऊन थेट निघालो तो डायरेक्ट पंचमदांचा घरासमोर..!

स्वस्थपणे ५-१० मिनिटं एकटाच उभा होतो त्यांच्या घरासमोर.. 

जिंदगी के सफर में
मुसाफिर हु यारो..
कुछ तो लोग कहेंगे
रैना बिती जाए
बिती ना बिताई रैना
इस मोड से जाते है..

कित्येक गाणी रुंजी घालू लागली कानात.. 

तिथून निघालो तो थेट जुहू किनार्‍यावरील किशोरदांच्या घरापाशी..!

कारण किशोरदा, पंचम, गुलजार... हे सगळे एकच आहेत..यांचा आत्मा एकच आहे..शरीरं वेगवेगळी आहेत..! 

मला माहीत नाही..कुठल्या जन्मीचे ऋणानुबंध हे...!

ही मंडळी तुम्हा-आम्हाला किती आनंद देऊन गेली... आपण वर्षातून एकदा ५ मिनिटं पण त्यांच्याकरता काढू नयेत..?..!

किशोरदांच्या घरासमोरच्या समुद्राच्या पुळणीवर एकटाच उभा होतो ५ मिनिटं...

समोर अंधारलेला समुद्र... त्याची गाज.. पाऊस नाही... वातावरण कोंडलेलं.. खूप घुसमटलेलं..!

पाऊस पडायला हवा जोरदार.. मुसमुसून..हमसूनहमसून.. छान..मोकळा.. धुवाधार...!

पंचमदा, किशोरदा...बाबूजी..भीमण्णा... सगळे सगळे खूप अस्वस्थ करतात मला.. ही माणसं मला भरपूर छान कोवळं ऊन देऊन गेली.. शीतलछाया देऊन गेली...मनमुराद पाऊस देऊन गेली...

तरीही पुन्हा पुन्हा तृषार्त वाटतं.. छे..! खूप पाऊस पडायला हवा आहे... वातावरण मोकळं हवं आहे.. कुणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेऊन मनसोक्त रडायचं आहे मला.. त्यानंतरचा मोकळेपणा हवा आहे मला.. त्या रडण्यातलं समाधान हवं आहे मला..!

"वो गोलिया क्या खतम हो गई..?"

परिचय या चित्रपटात डॉक्टरांच्या या प्रश्नावर हरिभाई उत्तरतो..

"सासे खतम हुई..!"

परतीच्या वाटेवर होतो.. कानात 'बिती ना बिताई..' सुरू होतं..!

-- तात्या अभ्यंकर..

June 15, 2014

पुरिया...

पुरिया रागाचा स्वभाव आणि आमच्या भीमण्णांचा स्वभाव यात नेहमीच मला एक साम्य दिसत आलेलं आहे..

धीरगंभीर, टक्केटोणपे खाल्लेला, अनुभवी असा एक बुजुर्ग पुरिया..

जो मूलत: अबोल आहे.. सततचं फक्त आत्मचिंतन.. आणि त्यायोगे स्वत:मधल्या आत्मिक शक्तिचा सतत विकास..!

पुरिया.. एक तेजस्वी योगी.. जो चाललाय आपल्याच वाटेने.. आपलीच वाट शोधत...

चेहेर्‍यावर एक आश्वासक परंतु घनगंभीर भाव.. एक निर्भयता...

उगीच कुठे हॅ हॅ नाही.. की हू हू नाही..

काही गहन प्रश्न विचारावा.. आणि अगदी मोजक्याच शब्दात परफेक्ट उत्तर यावं असा पुरिया.. उगीच कुठे भारंभार चर्चा नाहीत की परिसंवाद नाहीत...!

अण्णाच एकदा म्हणाले होते,

मी आणि माझं संगीत.. आम्ही प्रवासी आहोत.. अनोळखी वाटेवरचे..! आकाशाची उंची, सागराची खोली उगाच कशाला तपासून पाहा..?

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

एक अद्वैत..!

अण्णा.. आणि अण्णांचा पुरिया...!

माझ्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा..

सावल्या लांबतील... तिन्ही सांजा होतील... तंबोरे लागतील... आणि कोमल रिखबाला अगदी हलका स्पर्श करून अण्णा शुद्ध निषादावर कृपा करतील आणि त्याच्यावर विसावतील..

ज्यावरून तानपुर्‍यातला निषाद जुळवावा.. असा तेजस्वी निषाद..!

आणि पुरियाची व्रतस्थ वाट सुरू होईल...!

-- तात्या अभ्यंकर..