August 05, 2011

नंदावैनी...

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

"राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.."

"अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?"

"अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते!

"प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू? अरे अद्वैत, मारू नको ना त्याला. मी आता उठले ना, की झोडून काढेन हां सर्वांना!"

"मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

दुपारचे काहितरी बारा-साडेबारा वाजलेले असतात आणि नंदावैनी मुक्त कंठाने घरातलं पाळणाघर हाकत असते. एकिकडे,

"गोविंदा माझा कृष्णमुरारी..." असं कुठलंसं गाणं म्हणत मांडीवरल्या कुणा तान्ह्या आर्चिसला खेळवत असते, त्याला ग्राईपवॉटर का कायसं पाजत असते! चिन्मय, प्रसाद, नेहा, राहूल, अस्मिता, अथर्व, चैत्राली अशी दहापंधरा बाळगोपाळ मंडळी नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. या सार्यांचे आईवडिल मोठ्या विश्वासाने आपापली पिल्लं नंदावैनीकडे सोपवतात आणि दिवसभरच्या रोजीरोटीकरता मुंबईत कुठे कुठे कामावर निघून जातात. आता त्या पिल्लांची आई, बाप, काकू, मावशी सारं काही नंदावैनीच असते!

नंदावैनी..!

आमचीच चाळकरी. दोन मुलींना मागे ठेवून नवरा या जगातून चालता झाल्यावर शिवणकामाच्या मिळणार्‍या तुटपुंज्या पैशात नंदावैनीचं भागेनासं झालं. सुरवातीला एक, मग दोन, असं करत करत नंदावैनीचं सगळं घरच मुलांनी भरलं, त्या घराचं पाळणाघर झालं! अगदी चार-सहा महिन्यांच्या तान्ह्या आर्चिसपासून ते दुसरी-तिसरीत शिकणार्या प्रसाद -अस्मितेपर्यंत सर्व वयांची मुलं आज नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. आमची नंदावैनी या सार्‍यांची रिंगमास्टर! सकाळची-दुपारची शाळा सांभाळून आठवी/नववीत असलेल्या नंदावैनीच्या दोन मुलीही या बाळगोपाळांची अगदी प्रेमाने काळजी घेतात, त्यांना सांभाळतात.

नंदावैनी तशी फटकळ, परंतु प्रेमळही तेवढीच. एखाद्या मुलाच्या आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले आहेत म्हणूनच केवळ त्यांना सांभाळलं पाहिजे अशी कोरडी कर्तव्यभावना तिच्यापाशी कधीच नसे. नंदावैनी त्या सर्व मुलांचं अतिशय प्रेमाने करायची, प्रेमाने सांभाळायची! परंतु शेवटी मुलंच ती! त्यामुळे दंगामस्तीही अगदी भरपूर करत. त्यामुळे मग नंदावैनीचा तोंडपट्टाही सुरू व्हायचा. कुणाला रागव, कुणला धपाटा मार, कुणी अगदी छान, निमूट वागलं की त्याचं भरभरून कौतुक कर, "तू का त्याला उलट बोललास? दादा आहे ना तो तुझा?" असे मुलांवर नकळत संस्कार कर.. असे नानाप्रकार नंदावैनीकडे दिवसभर चालत असत. पाळणघर कसलं, नंदावैनीकडे रोज सकाळी भरणारं गोकूळच होतं ते! आणि का कुणास ठाऊक, परंतु मुलांनाही नंदावैनीचा लळा फार लौकर लागायचा. मग नंदावैनी कितीही ओरडू देत, रागावू देत, मुलांना नंदावैनी कधी परकी वाटायची नाही..

छान बोलका चेहेरा, दिसायला आखीव-रेखीव, मध्यम उंची, मध्यम बांधा असलेली पंचेचाळीशीतल्या घरातली आमची नंदावैनी आणि तिचं पाळणाघर हा आमच्या चाळीतला एक जिवंत झरा. नंदावैनी मुलांना सांभाळायचे जे पैसे घ्यायची त्यात त्या मुलांचं दुपारचं जेवण, मधल्यावेळचं खाणंही असे. दुपारच्या जेवणात वरणभात-तूप-मीठ-लिंबू हा पूर्णाहार कंपलसरी! तो प्रत्येक मुलाने खाल्लाच पाहिजे असा नंदावैनीचा कायदा असे. शिवाय सोबत भाजी पोळी, कधी तूपसाखरेच्या किंवा लसूणचटणी घातलेल्या पोळीची गुंडाळी मुलांनी खाल्लीच पाहिजे असाही नंदावैनीचा नियम असे. मॅगी, केलॉग्ज्स वगैरे शब्दांनादेखील त्या घरात बंदी होती! विविध वयोगटाच्या दहापंधरा मुलांचा त्या घरात मुक्त वावर असूनही नंदावैनीचं घर नेहमीच अतिशय स्वच्छ व टापटीप असे. आपल्याकडे लहान मुलं असतात तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे स्वच्छता असलीच पाहिजे अशीच नंदावैनीची तिच्या दोन्ही मुलींना शिकवण होती..

दुपारच्या वेळेस ती बालगोपाळ मंडळी जरा वेळ झोपायची तेवढाच काय तो नंदावैनीला थोडा आराम. मग पुन्हा नंदावैनी मधल्या वेळच्या खाण्याच्या मागे असे. कधी उकड, कधी मोकळी भाजणी, कधी तिखटामिठाचा शिरा असा बेत असे. मग त्या सर्व मुलांचं मधल्यावेळचं खाणं चालायचं. त्यानंतर कुणाकडून कविता म्हणून घे, कुणाकडून पाढे म्हणून घे, एखाद्या लहानग्याला तुकडेतुकडे जोडून वाघ किंवा हत्ती पूर्ण करायला सांग, असे नानाप्रकार चालायचे. कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची!

मुंबईच्या धकाधकीच्या दुनियेत कामावरून घरी परतायला आईवडिलांना संध्याकाळचे सात साडेसात तरी वाजत. इकडे संध्याकाळ होऊ लागली की नंदावैनी पुन्हा एकदा रिंगमास्टर बनायची.

"चला, प्रत्येकाने स्वच्छ हातपायतोंड घुवून घ्या, पर्वचा म्हणायचा आहे ना? मग जायचंय ना सर्वांना आपाल्या घरी?"

असं म्हणून कडेवरच्या कुणा लहानग्या अर्चनाचा पापा घेऊन, "आता जायच्ययं ना आईकडे?" असं म्हणायची. ती लहानगी अर्चना काही कळल्यासारखं अगदी गोड हसायची! नंदावैनीसकट घरातल्या सगळ्याच बाळगोपाळांना ते निरागस हास्य निखळ, निर्विष आनंद देऊन जायचं!

मग नंदावैनी स्वत:च प्रत्येक मुलाला फ्रेश करायची, स्वच्छ करायची. ती आणि तिच्या मुली प्रत्येकाचा भांग, पावडरकुंकू वगैरे करायच्या. मग सगळ्यांनी हात जोडून देवापुढे बसायचं. एखादी सुरेखशी उदबत्ती आणि मंद ज्योतीची समई नंदावैनीच्या देवघरात तेवत असायची. आणि मग सुरू व्हायचं -

"शुभंकरोति कल्याणम्.."

तोवर एकेका आईवडिलांचं आपापल्या पिल्लाला नेण्याकरता नंदावैनीच्या घरी येणं सुरू झालेलं असायचं. मग,

"आज काही जेवलाच नाही.."

"आज एक मुलगा मुळ्ळीसुद्धा रडला नाही बरं का!"

"आज प्रणवला चांगला धपाटलाय बरं का! पाढे पाठ करत नाहीत आणि दिवसभर नुसती मस्ती..!"

"आज जरा डॉक्टरलाच दाखवा, दिवसभर रेघा मारतोय..!"

असा प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या आईवडिलांकडे त्या त्या मुलाचा नंदावैनी रिपोर्ट करायची!

आपलं पोरगं नंदावैनीकडे आहे म्हणजे सुखरूप आहे असा विश्वास प्रत्येक आईवडिलांना होता. नंदावैनीने रट्टा मारलेला असणार म्हणजे आपल्याच लेकाचं काहीतरी चुकलेलं असणार.. अशी खात्री होती प्रत्येकाची! २६ जुलै सारख्या प्रलयातही, जेव्हा कुणाच मुलाचे आईवडिल रात्रभर घरी येऊ शकले नव्हते तेव्हाही ते मुलांच्या बाबतीत मात्र निश्चिंत होते. "अगदी रात्रभर जरी मुलांना नंदावैनीकडे रहायला लागलं तरी चिंता नको.." अशी त्यांची निचिंती होती. नंदावैनीवरचा तो विश्वास होता..!

त्या दिवशी संध्याकाळी कुणा प्रणवचे आईवडिल नंदावैनीचा निरोप घ्यायला आले होते. लाडक्या प्रणवला नंदावैनीकडून सेन्डऑफ होता.. अगदी ३-४ महिन्यांचा असल्यापासून ते ३ वर्षांचा होईस्तोवर प्रंणव नंदावैनीकडेच सांभाळायला होता. आता प्रणवचे आईवडिल दोघेही त्याला घेऊन अमेरीकेला चालले होते..! निरोपाची वेळ आली. नंदावैनीनी कपाटातून छानश्या सोनेरी कागदात पॅक केलेली कुठलीशी एक भेटवस्तू काढली आणि प्रणवला जवळ बोलावलं. काहीतरी वेगळं जाणवून छोटासा प्रंणवही जरा कावराबावराच झाला होता..

नंदावैनीनी प्रणवला उचलून कडेवर घेतला. त्याचा एक गोड पापा घेऊन हातातली भेटवस्तू त्याच्या हातात दिली,

"पुन्हा येशील ना रे मला भेटायला? अमेरिकेला गेल्यावर नंदावैनीला विसरणार नाहीस ना रे? की विसरशील गधड्या मला?"

"मी तुला खूप मारलं ना रे लहानपणी?"

असं म्हणून त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

नेहमीप्रमाणेच दुसरा दिवस उजाडला आणि नंदावैनीकडचं गोकूळ पुन्हा एकदा भरलं..!

आज त्या गोकुळात प्रंणव नव्हता. उद्या तो चांगला शिकून कुणीतरी मोठा यशस्वी डॉक्टर/विंजिनियर होईल, त्याचं नांव होईल, त्याच्या आईवडिलांचं नांव होईल. पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!

-- तात्या अभ्यंकर.