July 11, 2014

आक्कामावशी...

आदरणीय गुरुवर्य भाईकाका...

शिरसाष्टांग नमस्कार....

एक छोटेखानी व्यक्तिचित्रं लिहायचा प्रयत्न केलाय तेवढा गोड मानून घ्या.. माझ्या गणगोतातली आक्कामावशी..!

तिचं हे व्यक्तिचित्रं तुम्हाला समर्पित...

--------------------------------------------------

आक्कामावशी दारावर यायची.. आम्ही तिला आक्कामावशी म्हणायचो.. एका मोठ्या टोपलीत नाना प्रकारची शेव, फरसाण, मस्का खारी आणि नानकटाई असं घेऊन आक्कामावशी यायची आणि दारोदार विकायची.. तिच्या त्या टोपलीतच दोन तव्यांचा तराजूही असे..

तुम्ही काय शेव, फरसाण घ्याल ते वजन करून कागदातच बांधून द्यायची.. सोबत तो लाँड्रीमध्ये असतो तसा दोर्‍याचा एक मोठा गुंडा असे.. प्लॅस्टिकच्या पिशव्या नाहीत की स्टॅपलर नाही..! :)

"शेव देऊ का रे..? खाऊन तर बघ..."

"आजची भावनगरी.. एकदम मस्त.. खाऊन तर बघ.."

"अरे नानकटाई देऊ का..? एकदम ताजी आहे.. तोंडात विरघळेल.."

आक्कामावशीचं मार्केटिंग मस्त असायचं.. सोबत प्रत्येक गोष्टीचं आमच्या हातावर सँपल ठेवायची.. :)

"अगं आक्कामावशी.. आता कशी काय आलीस तू..? बघतेस ना.. दफ्तर भरतोय..."

आकाशवाणी मुंबई ब वर कामगार विश्व संपलेलं असायचं आणि नंदूरबारचे वगैरे बाजारभाव सांगत असायचे.. आमची पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पॅन्ट चढवून झालेली असायची.. दफ्तर भरायचा कार्यक्रम सुरू असायचा..

"अरे ते पलीकडचे जोशी आहेत ना.. त्यांच्या घरी रेडियोवर 'तुझे गीत गाण्यासाठी..' हे गाणं लागलं होतं.. तेवढी ऐकत बसले बघ.. म्हणून उशीर झाला.."

आक्कामावशी मनमोकळेपणाने उशीर होण्याचं कारण सांगायची..

आमचं घर काय, जोश्यांचं काय, भडसावळ्यांचं काय.. आक्कामावशीचा सर्वत्र हक्काचा राबता होता...

"आज शाळेत डबा काय नेतो आहेस रे..?"

"अगं मावशी.. आज फोडणीची पोळी आहे.."

हे ऐकल्यावर आक्कामावशीने लगेच मूठभर शेव कागदात बांधून दिली..

"दुपारी डबा खाताना तुझ्या त्या फोडणीच्या पोळीवर ही शेव घाल.. छान लागेल.." असं म्हणून छानशी हसलेली आक्कामावशी मला आजही जशीच्या तशी आठवते...!

असाच एक दिवस.. आज आक्कामावशीच्या डोक्यावरच्या त्या टोपलीसोबत हातात एक दुधाची बरणीही होती..

"आई आहे का रे घरात..? उत्तम चीक आणलाय बघ.. खरवस करून खा.."

मध्येच केव्हातरी आक्कामावशी उत्तम प्रतीचा चीक आणायची.. मग काय आमची मजाच मजा.. छान वेलची, जायफ़ळ वगैरे घातलेला गुळाचा उत्तम खरवस खायला मिळायचा.. :)

"मेल्या खरवस खाऊन वर लगेच भसाभसा पा़णी नको पिऊस हो.. नाहीतर मारशील रेघा... हा हा हा.."

मनमुराद, निष्पाप हसायची आक्कामावशी..!

असाच एक दिवस.. बाहेर गडबड ऐकू आली म्हणून डोकावलो तर शेजारच्या भडसावळ्यांना फीट आली होती.. नेमकी तेव्हाच आकामावशीही आली होती.. भडसावळे जमिनीवर आडवे पडून थरथरत होते...

आक्कामावशीने ताबडतोब प्रसंगाचा ताबा घेतला...

"धाव जा पहिला आणि कंगवा घेऊन ये.."

"स्मिता..कांदा आण एक फोडून पटकन..!"

आक्कामावशी आम्हा सगळ्यांना हक्काने आदेश देऊ लागली..  लगेच तिने भडसावळळ्यांचा तोंडात कंगवा घातला.. फोडलेला कांदा नाकाशी धरला.. हातपाय रगडले.. डॉक्टर येईस्तोवर आक्कामावशीच आमची MD FRCS होती...!

कोण होती हो आक्कामावशी..? कुठली होती..?

माहीत नाही...!

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात आक्कामावशी आली होती.. कुलकर्ण्यांनी तिला खास आमंत्रण दिलं होतं..!

मधोमध किंचित सुदृढ आक्कामावशी आणि वरवधू यांचा एक फोटोही काढल्याचं आठवतंय मला..!

आमची पंगत बसली होती.. बघतो तर श्रीखंडाचं पातेलं घेऊन आक्कामावशी येत होती आग्रह करायला..!

माझ्या पानात चांगलं भरभक्कम श्रीखंड वाढत म्हणाली...

"अरे घे मेल्या.. संपवशील आरामात.. लाजतोस काय..?"

दारावर येणारी, शेव फरसाण विकणारी आक्कामावशी..

भडसावळ्यांच्या फीटवर उपचार करणारी आक्कामावशी...

जोश्यांच्या घरी घटकाभर बसून 'तुझे गीत गाण्यासाठी..' ऐकणारी आक्कामावशी...

माझ्या फोडणीच्या पोळीवर मूठभर शेव बांधून देणारी आक्कामावशी...

कुलकर्ण्यांच्या मुलाच्या लग्नात घरचं कार्य समजून श्रीखंडाचा आग्रह करणारी आक्कामावशी...!

पण काय गंमत असते पाहा.. आक्कामावशी दारावर यायची तेवढीच तिची आठवण असायची.. ती केव्हापासून येत नाहीशी झाली हे कळलंच नाही...!

आता आक्कामावशी कुठे असेल हो..?

असेल की नसेल..?..!

आक्कामावशी.. ये की गं फरसाण घेऊन..

आक्कामावशी.. लवकर ये.. तुला बाबूजींची 'तुझे गीत गाण्यासाठी..', स्वर आले दुरुनी..' अशी म्हणशील ती गाणी ऐकवतो..

काय गं आक्कामावशी.. आकाशवाणी मुंबई ब चा कामगार विश्व कार्यक्रम, ते नंदूरबारचे बाजारभाव...यांच्यासोबत काळाच्या ओघात तूही कुठे नाहीशी तर झाली नाहीस ना..??.

आक्कामावशी.. आज फोडणीची पोळी केल्ये.. थोडी शेव हवी होती गं...!

-- तात्या अभ्यंकर..