July 23, 2013

आकाश पांघरूनी...


आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...

संगीताच्या नावाखाली आज बराचसा सुरू असलेला थिल्लरपणा, उथळपणा, जाहिरातबाजी, रातोरात होणारे इंडियन, चायनीज, जॅपनीज आणि कुठलेकुठले आयडॉल्स, महागायक, महागायिका, महागुरु, रातोरात झालेले गौरव महाराष्ट्राचे...!

या सगळ्यांपासून दोन-पाच मिनिटं का होईना, थोडं दूर जायचं आहे? केवळ आणि केवळ तृप्ती आणि समाधान देणारं एक अतिशय साधं परंतु तितकंच सुरेख गाणं ऐकायचंय?

मग मधुकर जोशींनी लिहिलेलं, दशरथ पुजारींनी बांधलेलं आणि हळव्या स्वराच्या सुमनताईंनी गायलेलं हे गाणं कृपया ऐका..

गगनात हासती त्या स्वप्नील मंद तारा
वेलीवरी सुखाने निजला दमून वारा
कालिंदीच्या तिरी या जळ संथ संथ वाहे..

कुठे २-४ गाणी धड नाही गायलीत तर लगेच दूरदर्शनद्वारा मिळणारी डोक्यात हवा जाणारी, संगीताला घातक असणारी अनाठायी, अवाजवी प्रसिद्धी..मग लगेच मोठमोठाले झगमगटाचे दिमाखदार संगीत सोहळे, ज्यांना गाण्यातला सा देखील माहीत नाही, परंतु नाट्यचित्रसृष्टीतले केवळ सेलिब्रिटी आहेत म्हणून, परंतु संगीताच्या दृष्टीने सर्वथा केवळ अपात्र असणार्‍या व्यक्तिंच्या कॉमेन्ट्स, त्यांची कवतिकं, आणि त्याच संगीतसंध्येच्या निमित्ताने त्यांच्या नवीन येणार्‍या एखाद्या चित्रपटाची जाहिरातबाजी किंवा प्रोमोज..!

संगीतसाधना करणार्‍या माझ्या प्रिय मित्रमैत्रिंणींनो, दमलेल्या त्या वार्‍यासारखीच कदाचित तुमची अवस्था झाली असेल.. तेव्हा त्याच्याच प्रमाणे एखाद्या वेलीवर जरा सुखाने विसावा.. थोडं चिंतन-मनन करा.. केवळ आनि केवळ निखळ, निर्व्याज साधना कशी करता येईल याचा थोडा विचार करा इतकाच विनम्र सल्ला..!

भरला स्वरात त्याच्या भक्तीतला सुगंध
ओठांत आगळाच आनंद काहि धुंद
त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे

सारं जग शांत निजलेलं आहे.. कुठलीही जाहिरातबाजी, गोंगाट न करता केवळ एक एकतारी घेऊन दोहे गाणार्‍या त्या कबीराकडून खूप शिकण्यासारखं आहे.. तो फक्त स्वत:च्या समाधानाकरता, स्वानंदाकरता गातो आहे, आणि म्हणूनच पर्यायाने तो त्या श्रीहरीकरता गातो आहे.. आणि त्यामुळेच त्याच्या स्वराला भक्तीचा सुगंध आहे..

सारं जग शांत निजलेलं असताना तो श्रीहरी मात्र त्याचं गाणं तल्लीनतेने ऐकतो आहे... वर म्हटल्याप्रमणे,

त्याच्या समोर पुढती साक्षात देव आहे..!

काहूर अंतरीचे भजनात लोप होई
भक्तीत श्रीहरीच्या मन हे रमून जाई

मला किती एस एम एस मिळतील?, मी जिंकेन का?, मग लगेच मला रातोरात एखाद्या अल्बममध्ये गाण्याचा चान्स मिळेल का?..

नसू देत असं कुठलंही भयानक काहूर तुमच्या अंतरी..!

बघा बुवा पटलं तर.. नायतर द्या सोडून.. पण हे गाणं मात्र नक्की ऐका..

-- तात्या.

July 14, 2013

एकलम खाजा...

हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत..

आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत..

गोटे.

छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो..

मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत..

मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी..

सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं..

एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे..

मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट..

एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..!

या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात..

एकलम खाजा
धोबी राजा
तिराण बोके
चारी चौकटे
पंचल पांडव
सैय्या दांडव
सप्तक टोले
अष्ठक नल्ले
नवे नवे किल्ले
दस्सी गुलामा
अक्क्ल खराटा
बाल मराठा..

अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते..

सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..!

काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..!

टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा..

तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या....

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती...

आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं..

स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता..

चालायचंच.. कालय तस्मै नमः..

काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..!

-- डब्बल पिदितला तात्या.

July 02, 2013

ओले अंजीर आणि बेळगावी कुंदा..!

एकदा सहजच अण्णांना भेटायला कलाश्रीमध्ये गेलो होतो. बाहेरच्या खोलीत अण्णा निवांतपणे बसले होते. 'काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाण्याहून..' असे जुजबी प्रश्न अण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे वत्सलाताई आल्या. त्यांनी मला ओले अंजीर दिले. अतिशय गोड आणि सुरेख होते.. मी ते अंजीर पटापट मटकावले परंतु मला प्रश्न असा पडला की त्याची देठं टाकायची कुठे? मग बाहेर जाताना ती सोबत न्यायची आणि टाकून द्यायची असं मी ठरवलं आणि तसाच बसून राहिलो..

माझी चुळबुळ वत्सलाताईंच्या लक्षात आली.. 

'माझ्याजवळ द्या ती देठं इकडे.. मी टाकते.."

त्या इतक्या सहजतेने म्हणाल्या की मलाच ती देठं त्यांच्या हातात देतांना अवघडल्यासारखं वाटलं..

"यांना तो बेळगावी कुंदापण दे.." अण्णा म्हणाले..

ताईंनी लगेच तत्परतेने आत जाऊन माझ्याकरता तो कुंदा आणला..

मग निरोप घेतला..

अण्णांनी विचारलं, "कसे जाणार?" 

अण्णांना एकूणच रस्ते, गाड्या यात विलक्षण इंटरेस्ट.. :)

"साडेचारची कोयना आहे.. ती पकडणार.."

हां हां बरोबर.. कोयना आठपर्यंत जाईल ठाण्याला.."

जगभर प्रवास केलेल्या अण्णांनी 'मी कोयना एक्सप्रेस पकडून ठाण्याला जाणार..' या प्रवासातदेखील इतकी उत्सुकता दाखवली की मला गंमतच वाटली..! :)

असो.. आता फक्त आठवणी आहेत..!

तात्या.

July 01, 2013

बुड बुड घागरी.. :)

स्नान, अंघोळ आणि तिचे नानाविध प्रकार आणि नानाविध रुपं..

"छ्या लेका दूर हो..४-४ दिवसात अंघोळ कर नाहीस.." इथपासून ते रोज छान छान श्रीमंती टबात ऊन ऊन पाण्यात अंघोळ करणारे..!

मुंबै उपनगरी रेल्वेतून जाताना बरेच वेळा काही भय्ये साधारणपणे लालसर चड्डीवर अंघोळ करताना फार सुरेख दिसतात.. डोक्याला शांपूबिंपू असली श्रीमंती भानगड नाही. ‌साबणच लावतात डोक्याला आणि थंड पाण्यानेच अंघोळ करतात..

पण मी एक पाहिलं आहे.. बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करणारे बरेचवेळा स्वताःचीच बढाई मारताना दिसतात..

"कितीही थंडी असो.. मी बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करतो..ह्या ह्या ह्या... "

अशी फुशारकी मारतात..

अंघोळ.. एक प्रसन्न प्रकार..

पूर्वी बंब असायचे. झकासपैकी कढत कढत पाणी देणारे बंब.. आता गिझर, गॅसगिझर आले..

'काय पण म्हणा.. बंबातल्या पाण्याने अंघोळ करायची मजाच वेगळी.. ' हे म्हणणारे आता फार कमी राहिलेत..

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला मनसोक्त केलेली विहिरी-नदीतली अंघोळ.. व्वा..! आडातलं पाणी बाकी काय आल्हाददायक गार असतं..!

गंगा-गोदावरी आदी तिर्थात केलेली अंघोळ.. हरिद्वार-अलाहाबाद आदी कुंभात केलेली अघोळ... व्वा..!

सहज लिहायला बसलो.. पण किती प्रकार सुचताहेत अंघोळीचे.. साला, लेखणी प्रसन्न आहे आपल्याला.. भाईकाकांचा भक्कम आशिर्वाद आहे.. :)

ब्राह्मणात नाही, पण इतर बऱ्याच जातीत मयताला घालतात ती अंघोळ.. तेव्हाची रडारड.. भसाभस पाणी ओतत असतात त्या मयतावर.. त्याला बिचाऱ्याला पत्ताच नसतो.. माझ्या ओळखीच्या एका म्हाताऱ्याचं मयत. चमत्कारिक कुबड होतं त्या बिचाऱ्याला. त्याच्या पायावर पाणी घातलं की तो डोक्याकडनं उठून बसायचा.. आणी डोक्यावर पाणी घातलं की पाय वर करायचा..!

लहानपणीची आई-आज्जीने घातलेली काऊचीऊची अंघोळ.. नंतर तीट-पावडर.. व्वा..!

नरकचतुर्दशीची दिवाळीच्या पहाटे छान सुगंधी तेल-उटण्याचं अभ्यंग स्नान..

डोक्याला छान खोबरेल तेल लावून छान कढत पाण्याने बहिणीने घातलेली भाउबिजेची अंघोळ..!

"अरे जा आता अंघोळीला.. "

"हे काय, तुमची अंघोळ वगैरे झाली वाटतं.. "

"आज पाणी नाही.. अंघोळीला बुट्टी.. "

"लांबून प्रवासाहून आलाय. घ्या जरा अंघोळ वगैरे करून.. आमटीभात तयार आहे.. "

"साल्याच्या नावाने अंघोळ केली.. "

अंघोळीच्या बाबतीतले असे असंख्य संवाद..

एक अंघोळ मात्र खूप उदास. नकोशी वाटणारी.. स्मशानात अग्नी देण्यापूर्वीची किंवा मयताहून आल्यानंतरची अवेळी अंघोळ..

पण त्या अंघोळीने आप्तस्वकियांच्या आठवणी, त्यांचे प्रेमळ स्पर्श, त्यांची शाबासकी, माया, ममत्व.. कधीच वाहून जात नाही. बादलीभर पाण्याची ती ताकद नाही..!

बराय तर मंडळी.. पाणी तापलं आहे. आलोच दोन तांबे घेऊन..! :)

-- तात्या अभ्यंकर.