रंगी रंगला श्रीरंग..'
रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!
रघुनंदन पणशीकर..
'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द! आजच्या तरूण पिढीतला एक अतिशय चांगला, कसदार आणि प्रॉमिसिंग गवई, ज्याच्याकडून अजून मोप मोप ऐकायला मिळणार आहे असा..!
रधुनंदन पणशीकर माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे. मी त्यांना रघुनंदनराव किंवा रघुबुवा असं संबोधतो. एक चांगला रसिक आणि जाणकार श्रोता म्हणून रघुनंदनराव मला मान देतात, त्यांच्या बैठकीत बसवतात, मित्र म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवतात हा त्यांचा मोठेपणा! असो.
औचित्य होतं मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ या सांस्कृतिक कार्याला वाहून घेतलेल्या एका संस्थेने आज आयोजित केलेल्या
दिवाळी-पहाट या कार्यक्रमाचं! सुंदर सकाळची वेळ. तानपुरे जुळत होते, तबला लागत होता, मंचावर रघुनंदनराव गाण्याकरता सज्ज झाले होते.
'हे नरहर नारायण...' या बिभासमधल्या विलंबित रूपक तालातल्या पारंपारिक बंदिशीने गाण्याला सुरवात झाली. राग बिभास. शुद्ध धैवत, कोमल धैवत, दोन्ही अंगाने गायला जाणारा सकाळच्या प्रहरचा एक जबरदस्त इन्टेन्स्ड राग. बिभास हा तसा गंभीर तरीही आपल्याच मस्तीत हिंडणारा राग आहे. 'तुम्हाला असेल माझी गरज तर याल माझ्यापाठी!' असं म्हणणारा आहे. रघुबुवांनी बिभासची अस्थाई भरायला सुरवात केली. कोमल रिखब, शुद्धगंधार, पंचम, दोन्ही धैवतांचा अत्यंत बॅलन्स्ड वापर करत रघुबुवांनी बिभासमध्ये रंग भरायला सुरवात केली. सगळा माहोल बिभासमय झाला. 'हे नरहर नारायण..' ने एक सुंदर दिवाळी पहाट उजाडली..! विलंबितानंतर 'मोर रे मीत पिहरवा..' ही पारंपारिक द्रुत बंदिश अतिशय सुंदर गाऊन बिभासची सांगता झाली!
बिभासने पूर्वा उजळली होती, छान केशरी झाली होती. आता तिच्यावर रंग चढले ते हिंडोलचे. राग हिंडोल. एक जादुई, अद्भूत असा राग. त्यातल्या तीव्र मध्यमामुळे हिंडोलचा एक विलक्षणच दरारा पसरतो. त्याचं जाणं-येणं हे अक्षरश: एखाद्या हिंदोळ्यासारखंच असतं. 'तोडी, ललत, भैरव, रामकली हे असतील सकाळचे काही दिग्गज राग, लेकीन हमभी कछू कम नही..!' असा रुबाब असतो हिंडोलचा!
रघुबुवांनी आज हिंडोल चांगला जमूनच गायला, कसदार गायला. हिंडोलातल्या अद्भूततेला रघुबुवांनी आज अगदी पुरेपूर न्याय दिला.
"बन उपवन डोल माई,
ऋतुबसंत मन भावन
सब सखीयन खेल हिंडोले.."
ही मध्यलय एकतालातली मोगुबाई कुर्डिकरांची बंदिश. ही बंदिश आज रघुबुवांनी फारच सुरेख गायली. पाहा मंडळी, आपल्या रागसंगीताला, त्यातल्या रचनांनादेखील गुरुशिष्य परंपरेचा कसा सुंदर वारसा असतो ते! मोगुबाई या किशोरीताईंच्या माता व गुरू. त्यामुळे त्यांच्याकडनं ही बंदिश किशोरीताईंना मिळाली, व तीच तालीम किशोरीताईंनी रघुबुवांना दिली आणि म्हणूनच या थोर गुरुशिष्य परंपरेमुळेच ही सुंदर बंदिश आज तुमच्या-माझ्या पिढीला ऐकायला मिळाली/मिळत आहे!
हिंडोल नंतर रघुबुवांनी मध्यलय एकतालातला तोडी रागातला एक पारंपातिक तराणादेखील सुंदर रंगवला. त्यानंतर रंगमंचावर अवतरली ती आपली समृद्ध संगीत रंगभूमी. 'दिन गेले हरिभजनावीण..' हे कट्यारमधलं नाट्यपद रघुबुवांनी सुरू केलं! दारव्हेकर मास्तरांच्या अन् वसंतखा देशपांड्यांच्या कट्यारमधली सगळीच पदं अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक बढिया! सुंदर गंधर्व ठेका आणि अत्यंत कल्पक आणि प्रतिभावंत असं अभिषेकीबुवांचं संगीत असलेलं "दिन गेले.." हे पददेखील त्याला अपवाद नाही. रघुबुवा हे पद गाऊन श्रोत्यांना मराठी संगीत रंगभूमीच्या त्या वैभवशाली काळात घेऊन गेले असंच मी म्हणेन..!
त्यानंतर सारी मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेली. रघुबुवांनी स्वत: बांधलेलं यमन रागातलं अतिशय सुरेख असं मधुराष्टक,
बोलावा विठ्ठल-करावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा, अवघा रंग एक झाला, हे अभंग रघुबुवांनी अतिशय उत्तम व कसदार गायले. श्रोत्यांची मनमुराद दाद मिळत होती. भैरवीतल्या 'अवघा रंग एक झाला..' मुळे खरोखरच अवघा रंग एक झाल्यासारखे वाटले. आजची ही मैफल म्हणजे गवई आणि रसिक श्रोते यांच्यातला एक उत्तम संवाद होता, एक अद्वैत होतं!
रघुबुवांची जमलेली मैफल..

खरंच मंडळी, रघुबुवांच्या आजच्या या संस्मरणीय मैफलीमुळे माझी दिवाळी अगदी उत्तम साजरी झाली. आजवरच्या माझ्या श्रवणभक्तिच्या मर्मबंधातल्या ठेवींमध्ये अजून एक मोलाची भर पडली, मी अजून श्रीमंत झालो, समृद्ध झालो!
दुग्धशर्करा योग -
मंडळी, आज माझं भाग्य खरंच खूप थोर होतं असंच म्हणावं लागेल. आजच्या रघुबुवांच्या मैफलीत मला भाईकाकांचे मधु कदम भेटले! भाईकाकांसोबत वार्यावरची वरात, रविवारच्या सकाळमध्ये चिपलूनच्या रामागड्याचं फार सुंदर काम करणारे मधु कदम! साक्षात भाईकाकांसोबत मराठी रंगभूमीवर,
"निघाली, निघाली, निघाली वार्यावरची वरात..!"
असं मनमुराद गाणारे मधु कदम!
मधुकाका आणि रघुनंदनराव यांच्यासोबत तात्या...

मधु कदम मुलुंडमध्येच राहतात. तेही आज मुद्दाम रघुबुवांच्या मैफलीचा आनंद लुटण्याकरता आले होते. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा मधुकाकाही तिथे आले. रघुबुवांनी आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. मध्यंतरानंतर मधुकाकांनी आपणहून बोलावून मैफलीत मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले. रघुबुवांच्या एखाद्या छानश्या समेला तो म्हातारा माझ्या हातात हात घेऊन दाद देऊ लागला! मंडळी, जेव्हा एक श्रोता दुसर्या श्रोत्याचा हातात हात घेऊन दाद देतो ना तेव्हा अभिजात संगीतातला तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा असतो एवढंच सांगू इच्छितो..!
रघुबुवांचं अभंगगायन ऐकून म्हातारा हळवा होत होता, मनोमन सुखावत होता!
बोलताबोलता साहजिकच भाईकाकांच्या आठवणी निघाल्या.
"भाई? आता काय सांगू तुला? अरे आमच्यात सख्ख्या भावापेक्षाही जवळचं नातं होतं रे! ते माझे बंधु,सखा, गुरू.. अगदी सबकुछ होते रे.."
डोळ्याच्या कडा ओलावत म्हातारा माझ्याशी बोलत होता..!
"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."
'पुलकीत' माणसं कशी असतात ते मी जवळून पहात होतो. आतल्या आत रडत होतो..!
मंडळी, इथे डिटेल्स देत नाही, परंतु आज मधुकाकांना एक कौटुंबिक दु:ख आहे हे मला माहीत आहे. काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेल्या या कलाकाराची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची आहे. परंतु आज म्हातारा अगदी सगळं विसरून रघुबुवांचं गाणं ऐकत होता, त्यातल्या लयीसुरांशी एकरूप झाला होता!
ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?
असो,
अवघा रंग एक झाला.. या भैरवीतल्या अभंगाने मैफल संपली. मी रघुबुवांचा आणि मधुकाकांचा निरोप घेऊन निघालो..
निघतांना माझ्या कानात भैरवीचे सूर तर होतेच, परंतु मधुकाकांचे शब्दही होते..
"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."
-- तात्या अभ्यंकर.
हेच लेखन येथेही वाचता येईल..
1 comment:
surekh
Post a Comment