September 14, 2010

मेरे मौला करम हो करम..

मेरे मौला करम हो करम... (येथे ऐका)

मेरे मौला मौला, मेरे मौला मौला हो करम...
मेरे मौला करम हो करम
मेरे मौला करम हो करम...

हे देवा, हे मौला, खुदा, तुझ्या दारी आलो आहे..रेहेम कर, कृपा कर. खूप थकलो आहे, दर दर भटकतो आहे, फाके पडले आहेत..

१ ली ओळ - मेरे मौला करम हो करम

शुद्ध निषाद, शुद्ध रिखभ आणि कोमल गंधार यांचं राज्य. या तिघांनी मिळून साकारलेली करुणता. हात जोडले आहेत- प्रार्थनेकरता..! Low tone मध्ये.

२ री ओळ - मेरे मौला करम हो करम

डोकं ठेवतो बा तुझ्या पायावर.. माझ्या अश्रुंनी भिजवले आहेत तुझे चरण. दया कर!
नी़सारेम रे ...! किरवाणी रागातली 'तोहे बिन मोहे चैन नही आवे..' ही राशिदखाची सुरेख बंदिश सहजच आठवली.. 'रेप' संगती जीव हळवा करून जाते..!

'तुमसे फर्याद करते है हम...'

दुसरीकडे कुठे मी माझं गार्‍हाणं मांडणार? तुझ्याचकडे येणार ना? तेवढा हक्क आहे रे माझा तुझ्यावर! 'फर्याद' शब्दावरची छोटेखानी हरकत आतपर्यंत पोहोचते..!

पटदिपातली 'मपनीसांधप...संगती! हीच संगती 'मर्मबंधातली ठेव ही..' करता वापरली आहे... रे देवा, माझ्या मर्मबंधाची गाठ तुझ्यापाशीच बांधली आहे रे..'दु:ख देवासि सांगावे..' असं म्हटलं आहे आमच्या बाबूजींनी..! तूच माझा सुहृद..!

मेरे मौला करम हो करम..!

मग सांग मी कुठे जाऊ? तुझ्याकडेच येणार ना रे? मान्य करतो की सर्वत्र तुझंच राज्य आहे.. तुझ्या कृपेनंच होतं सर्वकाही.. तू सगळ्यांचं ऐकतोस असं ऐकून आहे..मग माझंही ऐक ना रे..! तू अभाग्यांचा सहारा.. तू बुडत्याचा आधार..संकटांची वादळं तू क्षणात दूर कातोस.. मग माझ्याही आयुष्यातली घोंघावणारी वावटळ शमव की रे..!

'तू करे जो मेहेरबानिया, दूर हो जाए हर एक ग़म!'

सुंदर ओळ, सुंदर सुरावट!

ही मूळ उर्दू प्रार्थना थोडे शब्द बदलून खाकी या चित्रपटाकरता फार सुंदर रितीने वापरली आहे. टची आहे!
एक साधा, सरळ, सहृदयी, सेवाभावी डॉ अन्सारी.. त्याला दहशतवादी ठरवण्यात येतं.. तो निर्दोष आहे हे फक्त चार पोलिस अधिकार्‍यांना माहीत असतं.. अखेर तो मारला जातो. दहशतवादी ठरवला गेल्यामुळे त्याच्या मयतालाही कुणी जात नाही. अखेर तेच चार पोलिस अधिकारीच त्याला दफन करतात..गाण्याचं चित्रिकरण केवळ सुरेख..!सोबत त्याचं अनाथ झालेलं पोरगं आणि त्याची असहाय्य, म्हातारी विधवा आई. ती तिथे हजर असते..मेरे मौला करम हो करम...

कोण विचारतो त्या माउलीला? कोण ऐकतो तिची ही प्रार्थना?!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: