February 18, 2017

पळसुलेकाकू..

“तात्या, एकदा येऊन जा रे. तुझ्याकरता कोकणातून अमृत कोकम आणलं आहे..”

असा पळसुले काकूंचा फोन आला. त्या दरवर्षी मला प्रेमाने अमृतकोकमचा एक कॅन देतात. पळसुलेकाकू आमच्या गाण्यातल्याच. भावगीतं वगैरे अगदी हौशीने गातात. छान गातात..

ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो. पळसुलेकाका चट्टेरीपट्टेरी हाफ चड्डी घालून मस्त पंख्याखाली वारा खात बसले होते..

“ये तात्या. बस. बाझव अजून महाशिवरात्र झाली नाही तो उकडायला लागलं सुद्धा..!”

पळसुले काकानी स्वागत केलं. पळसुल्यांची छान अगदी दोनच खोल्यांची नेटकी जागा. पळसुलेकाकूंनी छान आवरलेलं घर. बाहेरची खोली, आत स्वयंपाकघर. एकुलती एक मुलगी लग्न होऊन सिंगापूरला गेलेली.

स्वयंपाकघरातून पळसुलेकाकू अमृतकोकम घेऊन आल्या. छान गो-या, चेहे-यावर सात्विक आणि प्रसन्न भाव.

“बस तात्या, रव्याचा लाडू आणते..”

मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा तिथे एक सुरेश नावाचा माणूस बसला होता. “तात्या, हा सुरेश. estate agent आहे.” – पळसुलेकाकानी ओळख करून दिली..

“छ्या साले ठाण्यात जागांचे भाव कायच्या काय झाले हो..” – आता सुरेशने संभाषणात भाग घेतला..

"तिथे लुईसवाडीमध्ये एक चांगला तयार राहता बंगला आहे. मालक ५ करोड मागतो आहे..” – सुरेश म्हणाला..

सुरेशचं हे वाक्य संपतं न संपतं तोवर पळसुलेकाकू आतून आमच्याकरता रव्याचे लाडू घेऊन आल्या.

“पाच करोड.. हम्म... अगं माझं जरा चेकबुक आण गं..”

पळसुलेकाकांनी आता पळसुलेकाकुना चेकबुक आणायला सांगितलं..

आम्हाला काही कळेचना. बंगल्याची ५ करोड किंमत ऐकून पळसुलेकाका आता advance बयाणाचा चेकबिक देतात की काय? असं क्षणभर वाटून गेलं..

पळसुलेकाकूंनी त्यांना चेकबुक दिलं..“हे घ्या चेकबुक. का हो पण..?”

“अगं काही नाही, MSEB चं साडेआठशे रुपये बील आलं आहे. तात्याला चेक देतो. तो जाता जाता भरून टाकेल. छ्या.. वीज साली काय महाग झाली आहे हल्ली. आणि तात्या, जाताना जरा त्या कोप-यावरच्या प्लंबरला आमच्याकडे यायची आठवण कर रे. तसा मी फोन केलाय म्हणा. सालं संडासचं फ्लश काम करत नाहीये. पाणी गळत राहतं आणि टाकी भरतच नाही..”

तोंडात रव्याचा लाडू असतानाच मला हसू आवरेना. कुठे त्या ५ करोडच्या बंगल्याचा बयाणा आणि कुठे ते MESB चं साडेआठशे रुपये बील आणि गळका फ्लश..!

मला असेच साधे लोक मनापासून आवडतात..

रव्याचा लाडू खाउन सुरेश निघून गेला. पळसुले तो बंगला खरीदनेसे रह गये..”

“अगं उद्याच्या भिशीमध्ये तू ते सुमनताईचं गाणं म्हणणार आहेस ना? तात्याला ऐकव की..”

पळसुलेकाकूंनी लगेच उत्साहाने मला ते सुमनताईचं गाणं गाऊन दाखवलं..

एकदाच यावे सखया तुझे गीत कानी
धुंद होऊनी मी जावे धुंद त्या सुरांनी..

काकूंनी खूप छान म्हटलं गाणं.. अगदी त्यांच्या रव्याच्या लाडवासारखंच साधं, परंतु तितकंच गोड आणि सात्विक..

-- तात्या अभ्यंकर..

No comments: