May 27, 2010

ललीमावशी...

माझी मैत्रीण ललीमावशी गेली. अलीकडे तशी आजारी-आजारीच असायची.

ललीमावशी!

ललिता सुधीर फडके.. माझे गुरुजी - थोर संगीतकार, गायक बाबूजी यांची पत्नी. स्वत:ही एक उत्तम गायिका असलेली ललीमावशी!

ललिताबाई फडके म्हणून सर्वांना परिचित. मी तिला 'ललीमावशी' म्हणायचा. वास्तविक ती मला वयानं, मानानं, अनुभवानं, ज्ञानानं खूप वडील. तरीही तिचा उल्लेख मी माझी 'मैत्रीण' असा केला आहे, याला कारण तिचं माझ्याशी वागणं..एखाद्या जवळच्या जिवलग मैत्रिणीसारखीच ती मला भासायची, तसं माझ्याशी वागायची..खूप लोभ होता तिचा माझ्यावर..

शंकर निवास, शिवाजी पार्क, मुंबई, हे माझं श्रद्धास्थान.. तिथे बाबूजी-ललीमावशी राहायचे. त्या वास्तूत मी अनेकदा गेलो आहे.. बाबूजींना खूप घाबरायचो मी. बाबूजींना भेटायचं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं.. सतत कुठल्याश्या कामात व्यग्र असलेले बाबूजी जुजबी बोलायचे.. कधी मुडात असले म्हणजे, "काय पंडितजी, काय म्हणतोय तुमच्या गाण्याचा अभ्यास? आम्हाला केव्हा ऐकवणार तुमचं गाणं?" अशी थट्टाही करायचे. पण मी त्यांच्या पुढ्यात फार काळ थांबत नसे.
.
सगळी भीड, भिती गळून पडायची ती ललीमावशी भेटल्यावर.. "अरे ये ये. ब-याच दिवसांनी आलास! तुला माझी आठवणच होत नाही.. त्यातून तू काय बुवा, बाबूजींचा भक्त!" असं हसून म्हणायची..
मग अगदी भरपूर मनसोक्त गप्पा मारायची माझ्यासोबत. तिला खूप बोलायला हवं असायचं माझ्याशी.. गीतरामायणाच्या आधीपासून ते वीर सावरकर चित्रपटापर्यंतचा खूप मोठा कालावधी पाहिला होता तिनं. अनेक गमतीशीर, सुखदु:खाच्या, लहानमोठ्या घटनांची साक्षीदार होती ती..भरभरून बोलायची.
बाबूजींच्या आयुष्यातल्या अनेक सुखदु:खाच्या-मान-अपमानाच्या प्रसंगात, वीर सावरकर चित्रपट पूर्ण होण्यास झालेल्या विलंबामुळे बाबूजींना होणार्‍या असह्य मनस्तापात, बाबूजींच्या लहानमोठ्या आजारपणात, अत्यंत खंबीरपणे केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक 'शक्ती' म्हणून बाबूजींच्या पाठीशी उभी असलेली ललीमावशी!

श्रीधररावांचंही तिला खूप कौतुक.. "अरे तू तो अमका अमका अभंग ऐकला आहेस काय? तू ते अमकं गाणं ऐकलं आहेस काय? श्रीधरनं केलं आहे!" असं मला कौतुकानं सांगायची..कधी श्रीधरपंतही घरी असायचे. मग त्या शंकरनिवासच्या आतल्या लहानश्या खोलीत कॉटवर बसलेली ललीमावशी आणि तिच्या पायाशी हार्मोनियम घेऊन मला नव्या नव्या चाली ऐकवणारे श्रीधरराव आणि मी श्रोता! अशी ती भरलेली छोटेखानी संगीतसभा मला आजही आठवते.. श्रीधरपंतही अगदी हौसेने, आनंदाने, आपुलकीने त्यांच्या नव्या नव्या चाली मला ऐकवायचे.. ललीमावशी चेहेर्‍यावरून सांडलेलं कौतुक आजही माझ्या डोळ्यासमोर आहे..

कधी कधी "तू काय बुवा, अभिजात संगीतवाला. त्यातून साक्षात भीमण्णांचा शिष्य..!" अशीही माझी टिंगल करायची.. मी बांधलेल्या बंदिशी अगदी आवर्जून ऐकायची, मनमोकळी दाद द्यायची! सुवासिनी चित्रपटात 'आज मोरे मन..' ही तोडीतली बंदिश अण्णांनी आणि ललीमावशींनी मिळून गायली आहे.. काही कारणाने अण्णा बरेच उशिरा आले, मग कसं रेकॉर्डिंग केलं, बाबूजींच्या सूचना काय होत्या..अश्या अनेक आठवणीत ललीमावशी रमून जायची.. "तू पुण्यालाच राहायला का जात नाहीस? म्हणजे भीमण्णा तुला अगदी सकाळ-संध्याकाळ गाण्याची तालीम देतील.. मी सांगेन त्यांना!" असं म्हणायची! Smile

उदार, दानी स्वभावाची माझी ही मैत्रीण स्वत: उत्तम सुगरणही होती.. शाकाहारी-मांसाहारी, जेवण कुठलंही असो, तिच्या हाताला चव होती.. मी ती चव अनुभवली आहे.. माहेरची देऊळगावकर. म्हणजे सारस्वत असल्यामुळे मासळीचा स्वयंपाकही ती उत्तम करत असे..

आणि आल्यागेल्याचं अगत्य? अक्षरश: असंख्य लोकांचं त्या घरी येणंजाणं असे..पण कधी कुणी त्या घरातून विना काही खाल्ल्याशिवाय गेलं नाही.. लाडू-वडी-चकली-चिवडा, घरात खास काही बनवलेलं असेल तर ते, जे काही असेल ते ललीमावशी आलेल्यागेलेल्याच्या हातावर ठेवायची..!

ललीमावशीला बटाटावडा फार आवडायचा.. मग बरेचदा त्यांच्या घरासमोरच असलेल्या प्रकाशचा बटाटवडा मी तिच्याकरता घेऊन जायचा. "आला का माझा बाबू बटाटेवडा घेऊन?" असं कौतुकाने म्हणायची.. मग आम्ही दोघं आवडीनं बटाटावडा खायचो.. पुन्हा मग ती गप्पात रमून जायची..जुना काळ आपसूक माझ्या पुढ्यात उलगडायला लागायचा! मध्येच, "बाबूजी बसले आहेत बघ आतल्या खोलीत.. त्यांना नेऊन दे पाहू हा वडा..घाबरू नकोस हं. बिनधास्त जा! ते काही तुझ्यावर रागावणार नाहीत!" असं मिश्किलपणे म्हणायची माझी ही मैत्रीण! Smile


असो..

'मोठं मोठं डोळं तुजं..' हे ललीमावशीचं गाणं उगाचच कानी गुणगूण करून राहिलं आहे..

चालायचंच एकंदरीत! जुना काळ मागे पडतो आहे, जुनी माणसं पिकल्या पानासारखी गळून पडताहेत.. अजून भाग्य इतकंच की आशीर्वादाचा एक थरथरता हात पुण्यात भीमण्णांच्या रुपाने अजूनही आहे.. माझ्या मस्तकावरचे अन्य आशीर्वादाचे हात अदृश्य होत आहेत.. भाईकाका गेले, बाबूजी गेले, ललीमावशीही गेली...
पुन्हा कधीतरी शिवाजी पार्कात जाणं होईलच.. पाय आपसूकच प्रकाशकडे वळतील आणि नकळतच बटाटावड्यांची पार्सल ऑर्डर माझ्याकडून जाईल..पण कुणासाठी?? समोरच्या शंकरनिवासात तो बटाटावडा आवडीनं, चवीनं आणि मुख्य म्हणजे कौतुकानं खाणारं आता कुणीच नसेल!

-- तात्या अभ्यंकर.

5 comments:

Anonymous said...

श्री अभ्यंकर : लेख काही ज़मला नाही, पण ललिताबाई फडके यांच्या श्रद्‌धांजलीचा धागा ही त्याची चर्चा करायची ज़ागा नाही म्हणून ते सोडून देऊ या. बाई मोठी मिठास होती खरी. एकदा दादरला तास-दोन तास काय करावे हे न सुचल्यामुळे मी ओळखदेख नसतां बाबूजींच्या घरी घुसलो, आणि ललिताबाईंनी (स्वत:चे) पाय ओढत-ओढत चालत इतकं उत्तम स्वागत केलं की मला फार संकोच वाटला. बाबूजी कुठे राहतात याची कल्पना होतीच. फावला वेळ हाती आहेच, तर निदान ती इमारत ज़वळून पाहू म्हणून तिकडे गेलो. खाली फलकावर सगळ्या घरमालकांची नांवे इंग्रजीत तर 'सुधीर फडके' हे एकमेव नाव देवनागरीत. ते कौतुक मला वर ओढून गेलं. त्याआधी ३-४ महिने पहिले मी बाबूजींशी फोनवर एका कामानिमित्त बोललो होतो. पण तेव्हा ते चांगलेच बहिरे झाले होते, आणि त्यानन्तर वर्षाच्या आतच ते गेलेच.

भालजींच्या चित्रपटांची सुरुवात 'बहु असोत' गीताने होत असे. ललिताबाईंची एक आठवण ही की 'थोरातांची कमळा' मधे हे गाणं ललिताबाई आणि वासुदेवराव भाटकरांच्या आवाज़ात आहे, अशी माझी माहिती आहे. पण नक्की खात्री नाही, अर्धा-एक टक्का स्मरणशक्ती दगा देऊ शकते. हा चित्रपट उपलब्ध आहे. पुढे 'आनन्दघन'च्या संगीतात मोहित्यांची मंजुळा मधे 'बहु असोत' हे समूहगीत म्हणून आहे. नन्तर, बहुदा, तांबडी माती मधे, हे लता-हृदयनाथ गायले आहेत. तसा हृदयनाथ चांगलाच गायला आहे, पण लता इतकी अशक्य चांगली सुरात आहे की दुसरा आवाज़ ऐकूच येत नाही, तो मुद्‌दाम ऐकावा लागतो. ते असो. पण हे गाणं ललिताबाईंच्या आवाज़ात ऐकायची माझी कधीची इच्छा आहे, ती आता परत उफाळून आली आहे.

- नानिवडेकर

डॉ.श्रीराम दिवटे said...

तात्या, चक्क तुम्ही माझ्या ब्लॉगचे फोलोअर झाला आहात? माझा काही क्षण विश्वासच बसेना. हरेकृष्णाजी तुम्ही आहात हे वाचून आनंद झाला.
असो.
खरे तर मीच तुम्हांला फॉलो करायला हवे आहे. तुमचं लेखन मला आवडतंच. शिवाय मिपावर माझा जीव जडलाय. तेथेही आपले लेख वाचावयास मिळतात.
अच्छा. आता गट्टी जमलीच आहे तेव्हा भट्टीही नक्कीच जमेल...

डॉ.श्रीराम दिवटे said...

तात्या, तुम्ही माझ्या ब्लॉगचे फॉलोअर झालात? खरे तर मीच तुम्हांला फॉलो करायला हवे. तुम्ही गुरु आहात अन् मी चेला! मिपावर माझा जीव जडलाय. तिथे तुमचे लेखन वाचावयास मिळतेच. 'हरेकृष्णाजी' तुम्ही आहात हे पाहून खूप आनंद झाला.
असो.
गट्टी जमेलच, अन् भट्टीही!
तुमचा लेखन प्रपंच खूप मोठ्ठा आहे जरा सवड काढूनच वाचवा लागणार आहे.
ललीमावशी मिपावर वाचावयास मिळाली. लेखन आवडलं.
पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहत आहे...
-डॉ.श्रीराम दिवटे.

महेंद्र said...

तात्या,
तुमच्या किंवा नानिवडेकरांच्या इतकं माझं या विषयात ज्ञान नाही, पण तुम्ही लिहिलेली व्यक्ती चित्रं आवडतात. हे पण आवडलं.
आणि नानीवडेकर - हॅट्स ऑफ टु यु.. काय मेमरी आहे तुमची !! कॉमेंट वाचायला पण मजा आली .

प्रभाकर कुळकर्णी said...

तात्या अभ्यंकर , तुम्ही राव भलते डेन्जर मानुस दिसता राव . तुम्ही राव गुरु नाही महा गुरु कॅटगीरीत ले दिसता मला . एक सांगा समजा मी मुंबईला आलो तर मला तुम्ही भेटताल काय? काय ते जॉनी वाकरची बाटली व आजची बाई म्हनौन समीरा रेड्डीचा फ़ोटो . तुम्ही यार भयंकर आणी उघड उघड करनारे दिसता . तुम्ही एक सांगता काय? तुम्ही नक्की कोन ? लेखक? गायक? अकाउन्टन्ट? तुमचा व्यवसाय काय आहे ? बाटली, बाई व खादाडी चा बन्दोबस्त कसा करता ?