January 16, 2011

येऊ देत आता अजून एक विमान...!

देवा परमेश्वरा,


आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..!

देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..!

ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत.

माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत..

आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..!

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा..!

त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!

दहा वर्षाचा एक मुलगा कलेचं वेड घेऊन घरातून पळाला. खूप खस्ता खाल्या, अपार कष्ट केले. पुढे त्याचं फळ मिळालं, त्याचा वेलू गगनावेरी गेला. अक्षरश: न्हाऊ घातलं सर्वांना त्या अलौकिक सुरांनी.

'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!

'एकामेवाद्वितिय..', 'परंतु या सम हा..' ही सारी बिरुदं रोजचीच झाली, सवयीची झाली..!

या वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्यायांनी 'सवाईगंधर्व संगीत महोत्सव..' हा संगीताचा महायज्ञ सुरू ठेवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ..!

लौकिकार्थाने आयुष्यभर एखाद्या बादशहासारखे, सम्राटासारखे वावरले ते...! परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र तेवढेच साधे आणि सादगीभरे राहिले..!

परंतु आता मात्र नको हा वनवास, नकोत त्या अंथरुणातल्या हालअपेष्टा..!

काहीच दिसांपूर्वी त्यांच्या दर्शनाकरता गेलो होतो त्यांच्या घरी..!
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?

" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"

देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!

देवा, लोकांना कदाचित माझी ही प्रार्थना आवडणार नाही. दुषणं देतील मला लोकं..! परंतु पर्वा नाही. कारण माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अन् त्याहूनही अधिक निस्सीम अशी डोळस श्रद्धा आहे...!

"अणुरणिया थोकडा.." लिहिंणार्‍या तुकोबांकरता देवा तू विमान पाठवलं होतंस..

त्याच ओळीतल्या भावार्थात आणि त्यातल्या मालकंसाच्या दैवी सुरात कोट्यावधीच्या जनसमुदायाला डोलायला लावणार्‍या, समाधीस्त करणार्‍या भूतलावरच्या एका योग्याकरताही विमान पाठव..

येऊ देत आता अजून एक विमान...!

-- तात्या.

4 comments:

हेमंत पोखरणकर said...

". ."

Abhijit Kaskhedikar said...

tatya...

are amchya manatil bhavana tu lihile ahe...

nuste shirshak vachoonach ashrooncha baandh futala...

pan kai karawe...ithe fakta athavatoi to jogiya...manatala..'piya ke milan ki aas'

-Kashya

रसिक@गुरुदृष्टी said...

विमान वेळेवर येईलच ह्याची खात्री...

तोपर्यंत थोडासा धीरज रख्खा...

क्यू न आपसे कुछ गाना गाया...?

एकभक्त said...

मनाच्या श्लोकात उत्तर सांगितले आहे...

अंतकाळी रामच अलगदपणे मुक्त करेल...

अहो ते गुंतागुंतीचे काम पूर्ण होईपर्यंत आपण अढळ श्रद्धेने वाट पहाणे संयुक्तिक आहे...

शक्य असल्यास मनाच्या श्लोकांचे एकदा वाचन करावे ही विनंती...