February 18, 2011

मेघना माझी बहीण..

परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं.

मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच.

मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच!

मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली. पण मेघना खरी रमली ती डबींगच्या क्षेत्रात, संचलन-निवेदनाच्या क्षेत्रात..
परवा सहज म्हणून मेघनाशी गप्पा मारत बसलो होतो, तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी जाणून घेत होतो आणि हळूहळू थक्कही होत होतो! आमची ही लहानशी मेघना आज इतकी कर्तृत्ववान असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं!

"तुला पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क इत्यादी वाहिन्यांवरची नॉडी, निन्जा हातोडी, डिझ्झी, डेक्स्टर्स लॅब मधली डिडी ही पात्रं माहित्येत का? त्या सर्वांकरता माझा आवाज वापरला आहे!"

"बे वॉच" कार्यक्रमात मी पॅमेला अ‍ॅन्डरसनला आवाज दिला आहे!"

"एका लीन नावाच्या चिनी अभिनेत्रीकरता माझा आवाज डब केला गेला आहे. बाल हनुमानमधील 'बाल हनुमानही मीच आहे."

"आणि तुला गंमत महित्ये का? पुणे आणि 'मुंबै-सेन्ट्रल' रेल्वे स्थानकात ध्वनिमुद्रीत उद्घोषणेतून (रेकॉर्डेड अनाउंन्समेन्ट) जी बया बोलते ना, तीही मीच!" Smile

मेघना सांगत होती. आपण तर साला फक्त कौतुकाने तिच्याकडे पाहात होतो!त्यानंतर मला मेघनाने तिथल्या तिथे निरनिराळ्या आवाजात बोलण्याचा एक छोटेखानी पर्फॉर्मन्सच करून दाखवला..

वाक्य होतं - "खूप दिवसांनी भेटलास, अगदी बरं वाटलं!"

हे वाक्य एक अगदी चिमुरडी, एक तिसरी-चौथीत असलेली, एक कॉलेजकुमारी, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक आज्जीबाई या स्त्रिया कसं बोलतील तसं अगदी एकापाठोपाठ एक बोलून दाखवलं! प्रत्येक पात्राच्या वेळेस क्षणात केलेला आवाजातील बदल, हेल, शब्दोच्चार, प्रत्येक वयाचा लेहेजा तिनं इतका सुंदर सांभाळला की क्या केहेने! अगदी सह्ही पर्फॉर्मन्स होता तो..

मेघनासमोर प्रामुख्याने दोन क्षेत्रं होती -एक म्हणजे अभिनय किंवा दुसरं म्हणजे डबींग- निवेदन-संचलन (रंगमंचीय किंवा दूरचित्रवाणी सादरीकरण इत्यादी.) आणि मेघनाने निवडलं ते डबींगचं क्षेत्र आणि आजमितीला मेघना एक अतिशय व्यस्त डबीग आर्टीस्ट म्हणून कार्यरत आहे. विदेशी चित्रपटाच्या ज्या हिंदी डीव्हीडीज आणि सीडीज इथे बनवल्या जातात त्यातही मेघनाला डबिंग कलाकार म्हणून काम करण्याच्या खूप संधी आहेत/येत असतात.

मेघनाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे. आजमितीस मराठीतील जवळ जवळ सगळ्या कलाकारांशी सह-अभिनयातून म्हणा, एखाद्या रंगमंचीय कार्यक्रमातून म्हणा, मुलाखतीतून म्हणा, मेघनाचा उत्तम परिचय आहे, मैत्री आहे. अभिनय क्षेत्र तिनं सोडलं आहे असं नाही, परंतु त्या क्षेत्रात राहण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स ठेवावे लागतात, काही एक रॅपो ठेवावा लागतो ते ठेवणं मेघनाला तितकसं जमत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही असं आपण म्हणू.. तरीही आभाळमाया, चार दिवस सासूचे, माझं सोनूलं सोनूलं, किंवा सनईचौघडे, मी शिवाजीराजे भोसले.. यासारख्या मोजक्याच चित्रपटांतून तिनं भूमिका केल्या आहेत..परंतु वर म्हटल्याप्रमाणे मेघना खरी रमते ती डबिंगमध्ये किंवा रंगमंचीय/दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातच.

लोभ असावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई - सॉलिड टीम!, 'मी मराठी' वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे तार्‍यासंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, ई टीव्ही वरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयी कार्यक्रम, 'साम' टीव्ही वरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत 'आयुर्वेद' हा कार्यक्रम... यादी मोठीच आहे!

मेघनाने काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे/करते. ते करत असताना तिला राजकीय क्षेत्रातली मंडळी, त्यांची पदं-मानमरातब, प्रोटोकॉल, इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी-विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं (कॉर्पोरेट शोज) सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणार्‍या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शीत करणे ही सर्व कामं मेघना लीलया करते. पण हे सगळं सहज साध्य होत नाही, नसतं! त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास!

श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता मेघनाने भारतातल्या १२ ते १३ राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता माहितीप्रद असे कॉर्पोरेट शोज केले आहेत!

सचिन ट्रॅव्हल्स या नावाजलेल्या यात्राकंपनी सोबतही मेघना निगडीत आहे. त्यांचा 'हॅलो प्रवासी' हा कार्यक्रम ती करते. एकदा त्या कंपनीच्या यात्रेकरूंसोबत मेघना दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावरही गेली होती. तिथं तिनं त्या लोकांकरता विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली आयपीएलचा सामनाही कव्हर केला होता.

"दक्षिण अफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलात चार दिवस राहण्याचा अनुभव केवळ रोमांचकारी होता!"
मेघना सांगते!

किती हरहुन्नरी! किती क्षेत्रात तिचा वावर आहे! किती नानाविध विषयात तिला गती आहे, तिचा अभ्यास आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत! खरंच अभिमान वाटतो..!रुपारेल महाविद्यालयातून बी ए ही पदवी घेणार्‍या मेघनाचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून एम ए ला लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबै विद्यापिठातून ती एम ए ला पहिली आली आहे!

काय नी किती लिहू मेघनाबद्दल?
जियो मेघना, जियो...!

-- तात्या अभ्यंकर.

4 comments:

एक चाहता said...

मेघनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ईथे, कारण आम्हाला तीची ओळख तुमच्या मुळेच...

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

बाळ ठाकरे गेले तरी बाल हनुमानाला आवाज देणारी व्यक्ती अजून शिल्लक आहे नक्कीच...

आवाज कोणाचा हा प्रश्नच उपलब्ध होत नाही...

सबब, उद्याच्या हनुमान जयंतीच्या आजच शुभेच्छा...

मोठे व्हा आणि मस्त दंगा करा... एवढाच काय तो आमचा शुभसंदेश...

म्हणजे संडे के संडे, गामा को लेकर, गाते चले...

सचिन आमच्या गल्लीत रहात नसल्याने आम्ही मेघनाला शुभेच्छा देणेच वसंत करतो...

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

सचिन आणि मेघना च्या वाढदिवशी सांगू इच्छितो की वी रियली आर इन अ "मेस", कॉल्ड "होली मेस"... जाणकार ते जाणतातच...

सो इट इज बेटर टू से "बाई तू साडीच नेस"...

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

ह्या वर्षी देखिल बाल हनुमानाच्या मानाच्या आवाजाला आमच्या मनःपूर्वक वार्षिक शुभेच्छा...

आपकी खुशकिस्मती जारी रहे... भगवान आपकी सब मनोकामना पूरी करे. हनुमानाशी प्रत्यक्ष संवाद साधणारी व्यक्ती किती नशीबवान असते ते सांगणे महाकर्मकठीण आहे. (हे आमचे स्वानुभवाचे बोल)