November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

2 comments:

प्रदीप पोवार (Pradeep Powar) said...

प्रिय तात्या,

मला "लुका-छुपि बहूत हूई, सामने आजा ना" या रंग दे बसंती मधल्या गाण्याबद्दल खुप दिवसांची आणि खुप लिहायची इच्छा आहे. पण माझे धाडस होत नाही आणि विषय सोडवत नाही. प्लिज तुम्ही लिहा मी ते वाचतो. तुम्ही लिहीले की ते फक्त वाचून माझी लिहीण्याची इच्छा पुर्ण होईल.
रंग दे बसंती मधले हे गाणं ज्या घटनेच्या पार्श्वभुमीवर आलेले आहे आणि त्याचे बोल याबद्दल लिहायला माझ्याजवळ शब्द अपुरे पडतात.
त्यानंतर त्या गाण्याला असलेला रहमान आणि लतादिदिंचा आवाज, संगितासाठी वापरलेली शांत स्वभावाची वाद्ये कशाबद्दल आणि काय काय लिहावे असे झाले आहे.
तेव्हा प्लिज तुम्ही लिहा मी वाट बघत आहे.

तात्या अभ्यंकर. said...

nakki lihito saheb kevatari..

-- tatyaa.