October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: