January 05, 2012

इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)

लेखाधार - अनेकांकडून तिच्याबद्दल लिहिले गेलेले आठवणीवजा लेख.

अलिकडेच केव्हातरी ठाण्याजवळच्या घोडबंदर रस्त्यावरून चाललो होतो. आता या घोडबंदर परिसराचा संपूर्ण कायापालट झाला आहे. लांबलचक रुंद रस्ता आणि आजुबाजूला मोठमोठे घरप्रकल्प आणि सर्वत्र सिमेन्टचं जंगल. परंतु एकेकाळी मात्र इथे अगदी भरपूर वनश्री होती, झाडंझुडपं होती. सर्व परिसरच अत्यंत रमणीय होता.

गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस ५५ चित्रपटाचं काम सुरू होतं आणि गुरुदत्तने चित्रपटाचा काही भाग चित्रित करण्यासाठी याच रमणीय परिसराची निवड केली होती. चित्रपटाचे संवादलेखक अब्रार अल्वीही सोबत होते. वास्तविक चित्रिकरणाच्यावेळी त्यांचं काहीच काम नव्हतं परंतु केवळ गुरुदत्तच्या आग्रहाखातर ते ऐन उन्हाळा असूनही सोबत आले होते. चित्रिकरणस्थळी पोहोचल्यावर त्यांनी एक छानसी हवेशीर सावली पाहून एका झाडाखाली निवांत बैठक मारली. एकिकडे चित्रिकरणाची लगबग सुरू होती तेवढ्यात 'ती' अल्वींच्या शेजारी आली आणि 'अरे वा! यहा बैठे हो आरामसे, आपके तो मजे है..' असं म्हणत तिनेही त्यांच्या शेजारीच मस्त बैठक मारली. मनमोकळं, निरागस, अल्लड, जीव खलास करणारं हास्य, मोहक अदा....! मूर्तीमंत सौंदर्यच अल्वींच्या शेजारी काही क्षण विसावलं होतं!काही दिवसांपूर्वी अल्वींची ही आठवण वाचनात आली होती.

मालाडला बाँबे टॉकिजच्या लगतची झोपडपट्टी. तिथे अताउल्लाखान नावाचा एक पठाण राहायला आला होता. सोबत त्याच्या बायकोचा व ८-९ पोरांचा कुटुंबकबिला. त्यापैकीच एक बेबी मुमताज. बेबी मुमताज दिसायला सुरेख, वागण्याबोलण्यात चांगलीच चंट आणि हुशार. गायचीही आवड. बेकार असलेल्या अताउल्लाखानने लेकीचं नशीब आजमावण्याकरता आणि त्यायोगे उत्पन्नाची काही सोय होते का ते पाहायला बेबी मुमताजला शेजारीच असलेल्या बाँबे टॉकिजात नेलं. तिथं त्यांची गाठ पडली बाँबे टॉकिजचे अध्वर्यू हिमांशू राय आणि देविकाराणी यांच्याशी. त्यांनी पाहताचक्षणी बेबी मुमताजला पसंद केलं आणि लगोलग तिचं 'बसंत' ह्या चित्रपटातून भारतीय रजतपटावर पहिलावहिलं आगमन झालं. ८-१० वर्षाच्या एका मोहक चिमुरडीनं रंगमंचावरून 'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' हे गाणं गायलं आणि गाण्यानंतर 'आप लोग कल आईये तो और सुनाउंगी गाना..' असं म्हणत चटकन एक छानशी अर्धगिरकी घेऊन मागे वळली. ती तिची पहिली मोहक अदा..!

ते वर्ष होतं १९४२. तेव्हापासून प्रवास सुरू झाला एका निस्सीम मनमोहक सौंदर्याचा. प्रवास सुरू झाला एका जीवघेण्या मोहक हास्याचा, प्रवास सुरू झाला मधाळतेचा अन् मादकतेचा.. 'प्रेम' या संकल्पनेवरच जिनं जिवापाड प्रेम केलं अशा एका शापित यक्षिणीचा प्रवास सुरू झाला. देविकाराणीने त्या बेबी मुमताज, अर्थात मुताज जहान बेगम दहलवीचं 'मधुबाला' असं नामकरण केलं आणि....

Venus of Indian Cinema चा उदय झाला..!

अत्यंत प्रतिभाशाली अन् नैसर्गिक अभिनय क्षमता, लहान वयापासूनच असलेला विलक्षण आत्मविश्वास, जगाला वेड लावणारं हास्य - कधी स्मितं तर कधी अल्लड खळखळणारं, आणि सार्‍या विश्वात एकमेवाद्वितीय ठरावं असं सौंदर्य.. या सगळ्याचं बेमालूम मिश्रण म्हणजे ती..! १४ फेब्रुवारी हा तिचा जन्मदिन. सारी दुनिया तो दिवस 'प्रेमदिन' म्हणून साजरा करते.. माझ्या मते १४ फेब्रुवारी हा जसा प्रेमदिन आहे तसाच तो 'The Devine Beauty Day..' म्हणूनही तिच्या नावे सार्‍या जगभरात, निदान भारतात तरी साजरा व्हावा..!

एव्हाना मालाडच्या झोपडीतून तिचं कुटुंब पेडररोडवरच्या अपमार्केट मध्ये राहायला आलं होतं. एकाच वेळेला अनेकानेक चित्रपटांचं चित्रिकरण सुरू झालं होतं आणि सुरेन्द्र, सप्रू, सुरेश इत्यादींपासून ते अशोककुमार, देवसाब, आरके यासारख्या नामवंतांसोबत ती अगदी लीलया सराईतपणे आपला ठसा उमटवीत होती. परंतु लहान वयापासूनच चित्रपटात काम सुरू केल्यामुळे फॉर्मल शिक्षण म्हणून जे असतं ते तिच्याजवळ नव्हतं. त्यामुळे डॉ सुशिलाराणी पटेल यांच्याकडे संभाषणात्मक इंग्रजीचे धडे गिरवायला तिने सुरवात केली..

बाबुराव पटेल हे 'फिल्म इंडिया' या पहिल्या सिमेमासिकाचे संपादक तसंच सिनेदिगदर्शक. त्यांच्या पत्नी डॉ सुशिलाराणी पटेल याही लेखक, अभिनेत्री तसंच पत्रकारही. या पटेल दाम्पत्याचा तिच्यावर विलक्षण लोभ.. सुशिलाराणींनी आठवण सांगितली होती - 'त्या काळात रोज संध्याकाळी चित्रिकरण संपलं की तेवढ्याच उत्साहाने ती आमच्या घरी यायची. जेवढी सुरेख-मोहक, तेवढीच अल्लड आणि निष्पाप मनमोकळ्या स्वभावाची होती ती. घरच्या गरिबीपायी फॉर्मल शिक्षण नव्हतं परंतु बुद्धीमत्ता होतीच. त्यामुळेच ती माझ्याकडे अवघ्या ३ महिन्यात अगदी उत्तम इंग्रजी बोलायला शिकली. बर्‍याचदा तिचं आमच्याकडे खाणं-पिणंही व्हायचं.. त्यातून ' गरमागरम पकोडे' हे तिचे विशेष लाडके! Smile

ती जेव्हा अगदी प्रथम त्यांच्या घरी आली तेव्हा सुशिलाराणींनी लिहून ठेवलं आहे -

"She was wearing no make up. Her dazzling smile and lovely olive complexion required no artificial help. She was well built and complete natural..!"

असो..

तूर्तास थोडा हळवा झालो आहे म्हणून इथेच थांबतो. साक्षात कर्दनकाळ असलेल्या बापालाही 'नो रिग्रेटस्' असं म्हणून माफ करणारा तिचा स्वभाव, तिची दानशूरता, तिचं आणि दिलिपकुमारचं प्रेमप्रकरण, तिचं आणि किशोरदाचं बस्तान न बसलेलं लग्न, सार्‍या दुनियेची हृदयं काबीज करणारी ती, परंतु तिचा स्वत:चा मात्र जीवघेणा हृदयरोग आणि त्यानंतरचं भयानक एकाकीपण व त्यातच तिचं अकाली जाणं...! अजून खूप काही लिहिन म्हणतो. जमेल की नाही ते सांगता येणार नाही..!

'मेरे छोटेसे मन मै छोटीसी दुनिया रे...' या गाण्याचा उल्लेख वर केला आहे. याच गाण्याच्या काही ओळी आहेत,

'छोटी सी दुनिया की छोटी छोटी बाते,
छोटे छोटे दिन और छोटी छोटी राते..
छोटी उमरिया रे.."

कसा योगायोग असतो पाहा.. 'छोटी उमरिया रे..' असं म्हणून ते कडवं संपतं. पण तीच ओळ तिच्याबाबतीतही 'छोटी उमरिया रे..' म्हणून खरी ठरते आणि मुमताज जहान बेगम दहलवी अवघ्या ३६ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेते..!(पुढील भाग सवडीने)

-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

shailesh said...

तात्या..तुमचा लेख सुध्दा..मधुबाला सारखा चुटपुट लावुन..जाणारा