April 25, 2013

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

खूप छान होती ती, गोड होती...

"जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण..

आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ...

कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता. मरीनड्राईव्हला Queen's Neckless म्हणतात आणि 'ती Queen म्हणजे मीच, हा रस्ता म्हणजे माझाच Neckless आहे' असं मात्र ती गंमतीने म्हणायची. मला जर कधी या संदर्भातला निर्णायक अधिकार प्राप्त झाला तर मी मरीनड्राईव्हच्या रस्त्याला तिचं नांव देईन..

mb

फारा वर्षांपूर्वी वरळी सीफेसला बाबूलाल नावाचा एक पाणीपुरीवाला होता. तिला बाबूलालची पाणीपुरी अत्यँत प्रिय होती. बाबूलालच्या मुलाला धंद्यात मुळीच रस नव्हता पण चांगली नौकरीही मिळत नव्हती. खूप खटपट करून तिने बाबूलालच्या मुलाला टाटासमुहात चिकटवला होता अशी आठवण वहिदाजींनी सांगितली होती. मरण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ऑक्सिजनवर असताना तिने बाबूलालची पाणीपुरी खायची इच्छा व्यक्त केली होती...!

मथुरापेढा, अजमेरी कलाकंद, आणि आमच्या मुंबैच्या मेरवनचा मावाकेक तिला खूप आवडत असे. 'मुंबै माझं First Love' असं ती म्हणत असे आणि त्यानंतर तिला लखनऊ आवडत असे. खूप निष्पाप, निर्विष होती ती...

अंथरुणावर खिळण्यापूर्वीची २-३ वर्ष ती स्पूलवरती एकटीच दीदीची गाणी ऐकायची आणि रडायची. अंथरुणावर खिळल्यावर दीदी तिला एकदा भेटायलाही गेली होती तेव्हा दीदीचा हात हातात घेऊन खूप रडली होती ती...

मुंबईत आता बांद्र्याला तिची कबर आहे..तिच्यावर भरपूर धूळ आहे..

खरं तर त्या कबरस्तानातील तिची कबरही आता हरवत चालली आहे..!

खुदा निगेहेबान हो तुम्हारा या गाण्यात,

उठे जनाजा जो कल हमारा
कसम है तुमको न देना कांधा...!


हे तिनं म्ह्टलं होतं ते तसं एका अर्थी खरंच ठरलं....

शेवटली काही वर्ष फार एकाकी होती ती.. कुणी भेटायला येईल का? निदान फोनवर तरी कुणी बोलेल का..?

कुठल्याही चित्रपटाच्या शुटींगच्या अखेरच्या दिवशी सर्व कामगारांना भरपूर मिठाई वाटायची ती...

तिचा तो अरेबियन व्हिलाही आता नामशेष झाला.. आम्हाला ती वास्तूही जतन करून ठेवता आली नाही..!

इथे वेळ कुणाला आहे..? शापित का होईना, परंतु मधुबाला नावाची एक कुणातरी यक्षिण होती हे देखील आता आम्ही फार काळ लक्षात ठेवू की नाही, हे माहीत नाही..!

-- तात्या.

1 comment:

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

दक्षिणे लक्ष्मणो यस्य असे म्हणून दक्षिणा देत चला म्हणजे झालं...

कधी ब्राह्मणाला तर कधी "वराला"... "लाराला" नव्हे...

बाकी खुदा मेहमबान तो ग१०भी पहलवान असे म्हणतात... त्यातलेच आम्ही देखिल, मुसाफिर... आता जरासे झालोय पुसाफिर इतकेच...